॥ श्रीरामचरितमानस ॥

(मराठी अनुवाद)

॥ बालकाण्ड ॥

अध्याय १६ वा

॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥


Download mp3

हिमगिरिगुहा एक अति पावन । सुरनदि वाहे समीप शोभन ॥
आश्रम परम पवित्र सुशोभन । बघुनि रमे अति देवर्षीमन ॥
बघुनि गिरि, नदी, विपिनविभागीं । रमे रमापति-पदानुरागीं ॥
हरिला स्मरत शापगति बाधित । सहज विमल मन मग्न समाधिंत ॥
स्रुरपति मुनिगति बघुनी भ्याला । बाहुनि सन्मानी कामाला ॥
हस्तकयुत जावें ममहेतू । निघे हर्ष मनिं जलचरकेतू ॥
सुनासीर धरि मनिं या त्रासा । इच्छी सुरर्षि मम पुरवासा ॥
जे कामी लोलुप या जगतीं । सकलां कुटिल काकसे डरती ॥

दो. :- सुकें हाड घे पळे शठ श्वान बघुनि मृगराज ॥
घेइल हिरुनि म्हणून जड तशि सुरपतिस न लाज ॥ १२५ ॥

नारद मोह कथा – हिमालय पर्वतात एक अतिपावन गुहा आहे व जवळच सुंदर सुरनदी – गंगा वाहत आहे. ॥ १ ॥ सुंदर व परम पवित्र आश्रम पाहताच देवर्षीचे मन तेथे रमले ॥ २ ॥ तो पर्वत, ती नदी व तेथील वन इत्यादी विशेष भाग पाहून त्यांचे मन रमापतिपद – प्रेमात रमले ॥ ३ ॥ हरीचे स्मरण करु लागताच शापाची गती कुंठित झाली व त्यांचे सहज विमल असलेले मन समाधीत मग्न झाले ॥ ४ ॥ नारदमुनींची ती स्थिती पाहून सुरपती ( इंद्र ) भिऊन गेले व त्यानी कामदेवाला बोलावून त्याचा सन्मान केला ॥ ५ ॥ ( व विनविले की ) माझ्यासाठी तुम्ही आपल्या हस्तकांना घेऊन जावे ( इत्यादी ), तेव्हा ज्यांच्या ध्वजावर जलचराचे चिन्ह आहे ते ( कामदेव – मदन ) मनात हर्ष पावले व निघाले ॥ ६ ॥ सुनासीर – इन्द्राने मनात अशी धास्ती धरली की देवर्षी नारद माझे पुर व माझे निवासस्थान मिळवूं पहात आहे. ॥ ७ ॥ ( याज्ञ. म्हणतात या जगात जे कामी व लोभी असतात ते कुटील कावळ्यांसारखे सर्वांना घाबरतात॥ ८ ॥ मृगराज सिंहाला पाहताच कुत्रा जसे सुके हाड घेऊन पळतो ( कारण ) त्या शठाला वाटते की मृगराज माझ्याजवळचे हाडुक हिसकावून घेईल. तसे वाटताना देवराज ( इंद्राला ) जरासुद्धा लाज वाटली नाही. ॥ दो० १२५ ॥

त्या आश्रमा मदन जैं केला । निजमायें ऋतु वसंत केला ॥
विविध विटप बहुरंगीं फुलती । कूजति कोकिल भृंग गुंजती ॥
त्रिविध मनोहर वाहे वारा । कामकृशानुस वाढविणारा ॥
रंभादिक सुरनारि नवीना । सकल विषमशरकलाप्रवीणा ॥
करिति गान सह तानतरंगां । क्रीडति विविधा पाणिपतंगा ॥
पाहुनि साह्या मदन हर्षला । बहुविध माया प्रपंच रचला ॥
व्यापि न कामकला मुनिला लव । स्वभयें पापी भीत मनोभव ॥
कोण तयाची सीमा भक्षक । ज्यासि रमापति महा सुरक्षक ॥

दो. :- सहित सहाय सभीत अति मदन मानि मनिं हार ॥
जाउनि धरि मुनि चरण तैं वदुनि दीन वच फार ॥ १२६ ॥

मदन जेव्हा त्या आश्रमाजवळ गेला तेव्हा त्याने आपल्या मायेने वसंत ऋतू निर्माण केला ॥ १ ॥ नाना प्रकारच्या वृक्षांना विविध रंगांची फुले आली. कोकिळा कूजन करुं लागल्या व भुंगे गुजारव करुं लागले ॥ २ ॥ कामरुपी अग्निला वाढविणारा शीतल, मंद, सुगंधी वारा मनोहर वाहूं लागला ॥ ३ ॥ विषय शराच्या ( काम ) सकल कलांमध्ये प्रवीण असलेल्या रंभादिक तरुण अप्सरा ॥ ४ ॥ ताना घेत आरोहावरोहासहित गाऊ लागल्या व हातात चेंडू ( पतंग – कंदुक ) घेऊन नाना प्रकारांनी क्रीडा करुं लागल्या ॥ ५ ॥ याप्रमाणे आपणास साह्य मिळालेले पाहून मदनाला हर्ष झाला व त्याने आपल्या मायेचा विस्तार नाना प्रकारे केला. ॥ ६ ॥ पण कामदेवाच्या एका सुद्धा कलेचा मुनीवर लवलेश सुद्धा परिणाम झाला नाही तेव्हा पापी मनोभव ( काम ) स्वत:च्या कल्पित भयानेच घाबरुन गेला. ॥ ७ ॥ रमापती ज्याचा महासुरक्षक आहे त्याची सीमा कोण खाईल ? ॥ ८ ॥ तेव्हा आपल्या सहायकासह अतिभयभीत होऊन मदनाने मनात हार मानली व जवळ जाऊन अतिदीन वचने बोलून मुनींचे पाय धरले ॥ दो० १२६ ॥

नारदमनिं मुळिं रोष न आला । प्रिय वचनें तोषवि कामाला ॥
घे आज्ञा नमुनी पदिं मस्तक । फिरला मदन सहित निज हस्तक ॥
मुनिची सुशीलता निज करणी । जाउनि सुरपति सभेंत वर्णी ॥
ऐकुनि सर्वहि विस्मय पावति । हरिसि नमिति मुनिवरा प्रशंसति ॥
मग नारद पोचले शिवाप्रति । जित मी कामा गर्व मना अति ॥
मारचरित शंकरांस सांगति । प्रिय अति जाणुन महेश शिकवति ॥
वारंवार विनवुं मुनि तुजसी । निवेदिली ही कथा मज जशी ॥
हरिपाशीं तशि कधिं न वदावी । निघे प्रसंग हि तरि लपवावी ॥

दो. :- हित उपदेशिति शंभु जरि नहिं नारदा पसंत ॥
भरद्वाज कौतुक बघा हरीच्छा च बलवंत ॥ १२७ ॥

नारदांच्या मनात मुळीच रोष आला नाही. ( उलट ) त्यांनी प्रिय बोलून कामदेवाचे सांत्वन केले ( तोषविला ) ॥ १ ॥ मुनींच्या पायावर पुन्हा मस्तक ठेवून व त्यांचा निरोप घेऊन मदन आपल्या हस्तकांसहित परत फिरला. ॥ २ ॥ सुरपतीच्या सभेत जाऊन त्याने मुनीची सुशीलता व आपण काय काम केले ते सर्व वर्णन केले. ॥ ३ ॥ ते ऐकून सर्वांनाच आश्चर्य वाटले, व सर्वांनी मुनींची प्रशंसा करुन हरीला नमस्कार केला ॥ ४ ॥ ( मदन निघून गेल्यानंतर ) मी कामाला जिंकला असा अतिगर्व मनात उत्पन्न झालेले नारद शिवाकडे जाऊन पोचले ॥ ५ ॥ व त्यांनी मदनाचे सर्व चरित्र शंकरांस सांगितले, तेव्हा नारद अत्यंत प्रिय आहेत हे जाणून महेशांनी त्यांस शिकविले उपदेश केला की - ॥ ६ ॥ मुने ! मी तुला वारंवार विनंती करतो की ही हकीकत जशी मला सांगितलीत ॥ ७ ॥ तशी हरीजवळ कधी सुद्धा सांगूं नका बरं ! तो प्रसंग जरी सहज निघाला तरी सुद्धा अगदी गुप्त ठेवा हं ! ॥ ८ ॥ शंभूंनी हिताचा उपदेश केला ( खरा ) पण नारदांस तो मुळीच पसंत पडला नाही. भरद्वाजा ! हरीची इच्छा बलवत्तर हेच खरे काय मजा झाली ती पहा ( ऐका तर खरी !) ॥ दो० १२७ ॥

राम करूं इच्छिति तें घडतें । कोणि नसे जो करी उलट तें ॥
शंभु-वचन मुनि-मना न आलें । तैं विरंचि-लोकास निघले ॥
एकवार वर-वीणा-पाणी । गात हरिगुणां प्रवीण गानीं ॥
क्षीराब्धीं मुनिनाथ पोचते । श्रुति शिर जेथें श्रीपति वसती ॥
उठुनि रमापति मुदित भेटले । ऋषि समवेत निजासनिं बसले ॥
चराचरेश्वर वदले विहसुनि । केली बहुदिनिं दया आज मुनि! ॥
कामचरित नारदें वर्णिलें । पूर्विंच यद्यपि शिवें वर्जिलें ॥
अति रघुपतिची प्रचंड माया । मोहि न कोणा जगिं जाता या ॥

दो. :- करुनि रुक्ष मुख मृदु वचा वदले श्रीभगवान ॥
तुमचें स्मरणें पळति कीं मोह मार मद मान ॥ १२८ ॥

राम करूं इच्छितात तेच घडते, त्याच्या उलट करुं शकेल असा कोणीही नाही. ॥ १ ॥ शंभूंचे म्हणणे मुनींच्या मनास आवडले नाही; तेव्हा ते विरंचीलोकास निघून गेले. ॥ २ ॥ गायनकलेत प्रवीण असे ते मुनीराज एकदा हातात सुंदर वीणा घेऊन हरिगुणगान करीत निघाले व क्षीरसागरात जेथे वेदप्रतिपाद्य ( श्रुतिशिर ) श्रीपती राहतात तेथे गेले ॥ ३–४ ॥ रमापती उठून आनंदाने भेटले व ऋषीसह आपल्या आसनावर बसले ॥ ५ ॥ मग चराचरेश्वर विशेष हसून म्हणाले की मुनी राज ! आज फार दिवसांनी माझ्यावर दया केलीत ( फार दिवसांनी दर्शन दिलेत ! ) ॥ ६ ॥ सांगू नका असे शिवांनी पूर्वीच बजावले होते तरी नारदांनी कामदेवांचे सर्व चरित्र विस्तारपूर्वक सांगितले ॥ ७ ॥ ( याज्ञ म्हणतात भर ! ) रघुपतीची माया अत्यंत प्रचंड आहे ती या जगात जन्मलेल्या कोणाला नाही मोहित करीत ? ॥ ८ ॥ आपले मुख रुक्ष करून श्रीभगवान मृदु वचन बोलले की तुमचे स्मरण केल्यानेच मोह, काम, मद, मान इ. नष्ट होतात, होतील. ( तुम्ही कामाला जिंकाल यात नवल तें काय ? ) ॥ दो०१२८ ॥

मुने मोह मनिं होई त्यांचे । ज्ञान विराग हृदयिं ना ज्यांचें ॥
ब्रह्मचर्य रत तुम्हीं धीरधी । मनसिज पीडा शके करुं कधीं ॥
नारद वदति सहित अभिमाना । सकल कृपा तुमची भगवाना ॥
करुणानिधि मनिं बघति विचारुनि । महागर्व तरु उरिं ये उगवुनि ॥
त्या मी शीघ्र करिन उन्मूलन । सेवक्-हितकारी अमचा पण ॥
मुनि हित होइल कौतुक मम पण । अशा उपाया योजिन वेळ न ॥
निघति नमुनि मुनि शिर हरिचरणीं । अहं प्रबल तैं अंतःकरणीं ॥
तैं प्रेरिति निज माये श्रीपति । ऐका तिची कठिण करणी अति ॥

दो. :- विरचि नगर ती पथिं जया शत योजन विस्तार ॥
श्रीनिवासपुरिहुनि अधिक रचने किती प्रकार ॥ १२९ ॥

मुने ! ( हे पहा की ) ज्यांच्या हृदयात ज्ञान वैराग्य नसते त्यांच्या मनात मोह निर्माण होतो ॥ १ ॥ तुम्ही तर ब्रह्मचर्य रत असून धीर वुद्धी आहात, तेव्हा मनात उद्‌भवणारा काम तुम्हाला कधी तरी पीडा करू शकेल का ? ( कधीच नाही ) ॥ २ ॥ नारद अभिमानाने म्हणतात की भगवंता ही सगळी तुमचीच कृपा ॥ ३ ॥ करूणानिधीनी मनात विचार करुन पाहिला तेव्हा दिसले, ठरले की नारदांच्या हृदयात मोठा थोरला गर्वतरु उगवला आहे ॥ ४ ॥ ( जो विशाल गर्वतरु उगवला आहे ) त्याला मी लवकर समूळ उपटून टाकीन, ( कारण ) ‘सेवक- हितकारी’ हा आमचा पण ( प्रतिज्ञा ब्रीद ) आहे ॥ ५ ॥ मुनीचे हित होईल व माझी सहज लीला होईल असा उपाय मी वेळ न लावता योजीन ॥ ६ ॥ तेव्हा मुनी हरिचरणांना मस्तक नमवून निघाले, पण अंत:करणात अहंकार – गर्व फार बळावत आहे. ॥ ७ ॥ मग श्रीपतींनी आपल्या मायेला प्रेरणा (आज्ञा) दिली. आता तिची कठीण करणी श्रवण करा. ॥ ८ ॥ तिने ( मुनीच्या ) मार्गामध्येच एका नगराची विशेष रचना निर्मिती केली त्याचा विस्तार शंभर योजने होता व त्याची अनेक प्रकारची रचना श्रीनिवासपुरी पेक्षा अधिक ( सुंदर ) होती. ॥ दो० १२९ ॥

वसति नगरिं सुंदर नर नारी । जणुं बहु मनसिज रति तनुधारी ॥
त्या पुरिं वसे शीलनिधि राजा । सैन्य अमित गजवाजि समाजा ॥
शत सुरेशसम विभव, विलासहि । रूपतेजबलनीति निवासहि ॥
त्यास कुमारी विश्वमोहिनी । श्री मोहे यद्‌रूप पाहुनी ॥
ती हरि माया सबगुणखाणी । शोभा तिची कोण कशि वानी ॥
करी स्वयंवर ती नृपबाळी । भूप अमित आले त्याकाळीं ॥
मुनि कौतुकी करुनि पुरिं गमना । पुसते झाले सकल पुरजनां ॥
श्रवुनि चरित सब, नृपगृहिं आले । बसवीले पूजुनी नृपालें ॥

दो. :- भूपति दाखवि नारदा तनयेला आणून ॥
नाथ हिचे गुण दोष सब वदा विचार करून ॥ १३० ॥

त्या सुंदर नगरात राहणार्‍या स्त्रिया व पुरुष इतकी सुंदर आहेत की जणू मदन व रती यांनीच अनेक रुपे घेतली आहेत असे वाटते ॥ १ ॥ त्या नगरात शीलानिधी नावाचा राजा राहतो आहे व त्याचे अगणित हत्ती घोडे, इत्यादिंनी युक्त सैन्य सर्व साजासह आहे. ॥ २ ॥ शेकडो सुरेशासारखे त्याचे वैभव व विलास असून तो रुप, बल व नीती यांचे निवासस्थानच आहे. ॥ ३ ॥ जिला पाहून श्रीलक्ष्मीसुद्धा मोहित होईल अशी – विश्वमोहिनी नावाची कुमारी आहे. ॥ ४ ॥ हीच सर्व गुणांची खाण हरिमाया ! तिच्या शोभेचे वर्णन कोण कसे करणार ॥ ५ ॥ ती राजकन्या आपले स्वयंवर करीत असल्याने अगणित राजे त्यावेळी ( नगरात ) आलेले आहेत. ॥ ६ ॥ (अशा त्या ) नगरात कौतुकी मुनी नारद प्रवेश करते झाले व नगरातील लोकांना त्यानी सर्व हकीकत विचारली ॥ ७ ॥ ( त्या मुलीचे ) सर्व चरित्र ऐकून नारद राजाच्या घरी गेले. राजाने त्यांची पूजा करून त्यास ( सिंहासनावर ) बसवले. ॥ ८ ॥ राजाने आपल्या कन्येला आणून नारदास दाखविली ( आणि विनविले की ) नाथ ! आपण मनात नीट विचार करुन हिचे सर्व गुणदोष सांगावे. ॥ दो० १३० ॥

रूप बघुनि मुनि विरति विसरले । बहुत वेळ मग बघतचि बसले ॥
तिचें लक्षणा निरखुनि भुलले । हृदयिं हर्ष, ना प्रगट बोलले ॥
जो हिज वरिल अमर तो होइल । रणीं कधीं जिंकिला न जाइल ॥
सेविति सकल चराचर त्याला । वरिल शीलनिधिकन्या ज्याल ॥
बघुनि सकल लक्षणं उरिं राखति । कांहिं बनावट भूपा सांगति ॥
वदुनि नृपा तव सुता सुलक्षणि । निघति सचिंत नारद तत्क्षणिं ॥
करुं जाउन तो यत्‍न विचारीं । जेणें मजही वरिल कुमारी ॥
वेळ कुठें जप तप करण्याला । दैवा! मिळे कशी बरं बाला! ॥

दो. :- हवीं अशा वेळीं परम शोभा रूप विशाल ॥
ज्यां पाहुनि कुमरी रिझे मग घालिल जयमाळ ॥ १३१ ॥

तिचे रुप पाहून मुनी वैराग्य विसरले व बराच वेळ तिच्याकडे बघतच राहीले. ॥ १ ॥ तिची लक्षणे निरखून पाहताच मुनी तिच्यावर मोहित झाले, हृदयात हर्ष झाला, पण ती लक्षणे त्यांनी उघड बोलून दाखविली नाहीत ॥ २ ॥ हिला जो वरील तो अमर होईल व कधीही रणात जिंकला जाणार नाही ॥ ३ ॥ ही शीलानीधी कन्या ज्याला वरील त्याची सेवा सर्व सचराचर जीव करतील. ॥ ४ ॥ सर्व लक्षणे पाहून मनात ठेवली व काही बनावट रचून भूपाला सांगीतली ॥ ५ ॥ तुमची मुलगी सुलक्षणी आहे, असे सांगून नारद चिंताग्रस्त होऊन तेथून निघाले ॥ ६ ॥ आता जाऊन असा यत्‍न करु की जेणे करुन ही कुमारी मला वरील ॥ ७ ॥ पण आता जपतपादी साधन करण्यास वेळ कुठे आहे ? अहा रे दैवा ! ही उत्तम बालिका अशी बरं मिळेल ? ॥ ८ ॥ अशा वेळी अत्युत्तम शोभा व विशाल रुप ही दोन्ही अशी पाहीजेत की ज्यांना पाहून कुमारी प्रसन्न होईल व मग मला जयमाळ घालील ॥ दो० १३१ ॥

मागूं हरिपाशीं सुंदरता । उशिर होय बा! तिथें पोचतां ॥
हरिसम हितकर कोणि न मातें । तोच करो वेळिंच साह्यातें ॥
परोपरीनीं तदा विनवलें । प्रभु कृपालु कौतुकी प्रगटले ॥
प्रभुस बघुनि मुनि लोचन निवले । काम होइलच हृदयिं हर्षले ॥
दीन आर्त अति वदुनि कथेतें । करा कृपा करणें साह्यातें ॥
द्या प्रभु मज अपुल्या रूपा या । अन्य उपाय न तिज पावया ॥
नाथ दास मी जेणें हित मम । होइल, करणें तसें शीघ्रतम ॥
निजमायाबल विशाल बघुनी । दीन दयाल वदति मनिं हसुनी ॥

दो. :- जेणें होइल परमहित श्रुणु नारदा त्वदीय ॥
आम्हिं तेंच करुं नान्य कीं वचन न मॄषाऽस्मदीय ॥ १३२ ॥

हरीच्या जवळ सौंदर्य मागू ( म्हणजे झाले ) पण काय करावे बर ! तेथे पोचण्यास तर उशीर लागेल ॥ १ ॥ हरीच्या सारखा माझा हितकर्ता कोणी नाही, तोच अगदी वेळेवर साह्य करो ॥ २ ॥ ( नंतर ) नाना प्रकारांनी प्रार्थना करताच कृपालू कौतुकी ( लीला प्रिय ) प्रभू तेथे प्रगट झाले ॥ ३ ॥ प्रभूला पाहताच मुनीचे डोळे निवले व आता काम होणारच असा हृदयात हर्ष झाला ॥ ४ ॥ अतिदीन वाणीने, अति आर्त बनून, नारदांनी विश्वमोहिनीची सर्व कथा ( प्रभूला ) निवेदन केली ( व म्हणाले की ) प्रभो कृपा करुन मला साह्य करा. ॥ ५ ॥ प्रभू ! हे आपले रुप मला द्या. त्याशिवाय तिच्या प्राप्तीचा दुसरा उपाय नाही ॥ ६ ॥ ( देवा ! ) मी आपला दास आहे आपण माझे स्वामी ( नाथ ) आहात, तरी जेणे करुन माझे हित होईल ते शक्य तितके अगदी लवकर करा ! ॥ ७ ॥ आपल्या मायेचा विशाल पराक्रम पाहून दीनदयाळू प्रभु मनात हसून म्हणाले ॥ ८ ॥ नारदा ! ऐका जेणे करुन तुमचे परमहित होईल तेच आम्ही करुं दुसरे काही सुद्धां करणार नाही, आमचे वचन कधी खोटे नसते ( हे तुम्ही जाणताच ) ॥ दो० १३२ ॥

मागि कुपथ्य गदाकुल रोगी । वैद्य न देई बघा मुनि योगी ॥
मी तसेंच तुमचे साधिन हित । होति वदुनि हें प्रभु अन्‍तर्हित ॥
मायावश मुनि झाले मूढ । कळली ना हरिगिरा अगूढ ॥
तिथें त्वरें ऋषिराज पोचले । जिथें स्वयंवर ठाण शोभलें ॥
बसले राजे सहित समाजां । निजासनीं बहु सजुनी साजां ॥
मुनिमनिं हर्ष किं रूप मला अति । वरिल मलाच, न चुकुन दुजाप्रति ॥
कृपाब्धिनें मुनिहित साधाया । दिलें कुरूप, न ये वर्णाया ॥
त्या लीले कोणि न अवगमती । नारद जाणुन शिर सब नमती ॥

दो. :- तिथें रुद्रगण दोन त्यां होते भेद कळे हि ॥
विप्रवेषिं फिरती बघत परम कौतुकी तेहि ॥ १३३ ॥

अहो मुनी ! अहो योगी ! हे पहा ( ऐका ) की व्याधीने पीडलेला रोगी कुपथ्य मागतो तेव्हा वैद्य ते त्यास देत नाही ॥ १ ॥ मी तुमचे हित ( अगदी) तसेच करण्याचे ठरविले आहे. असे म्हणून प्रभू अंतर्धान पावले ॥ २ ॥ मायेला वश होऊन मूढ नसलेल्या (पण बनलेल्या) मुनीला हरीची ही स्पष्ट ( अगूढ ) भाषा कळली नाही ॥ ३ ॥ जिथे स्वयंवराचे स्थान सुशोभित केलेले होते तिथे ऋषीराज घाईघाइने जाऊन पोचले ॥ ४ ॥ अनेक राजे नटून थटून आपापल्या समाजासह आपापल्या आसनावर बसले ॥ ५ ॥ मुनीच्या मनाला हर्ष झाला की या सर्वांपेक्षा माझे रुप अतिशय सुंदर आहे; म्हणून ती कन्या इतर कोणास चुकून सुद्धा न वरता मलाच वरील ॥ ६ ॥ पण कृपासागराने मुनींच्या हितासाठी ( त्यांना ) इतके कुरुप दिले होते की ते वर्णन करता येणार नाही. ॥ ७ ॥ त्या लीलेतील मर्म कोणाच्याच लक्षात आले नाही नारद आहेत असे जाणून सर्वांनी त्यांस नमस्कार केला. ॥ ८ ॥ पण तिथे दोन रुद्रगण होते त्यांना मात्र मर्म कळले आहे ते तर फारच कौतुकी असल्याने विप्रवेष घेऊन पहात हिंडत होते ॥ दो० १३३ ॥

ज्या समाजिं मुनि बसले होते । रूपाहंकृति हृदिं अधिका ते ॥
तिथें रुद्रगण बसले दोनी । विप्रवेषिं जाणे ना कोणी ॥
कूट वचन नारदा ऐकविति । देइ बरी हरि सुंदरता किति ॥
राजकुमारि रिझे छवि पाहुनि । यांस विशेष वरिल हरि जाणुनि ॥
दुसर्‍यांचे करिं मन मोहित मुनि । हसति शंभुगण अति सुख पावुनि ॥
मुनि जरि वचनां विचित्र परिसति । भ्रमित अमित मति मुळीं न उमगति ॥
चरित विशेष न कुणा कळे तें । दिसे रूप परि नृपकन्येतें ॥
मर्कटमुखा भयंकर काये । बघतां हृदयीं क्रोध तिला ये ॥

दो० :- सखीं सहित सुकुमारि जणुं चाले राजमराल ॥
फिरे निरीक्षित नृपगणां करसरोजजयमाल ॥ १३४ ॥

रुपाचा अहंकार ज्याच्या हृदयात अधिक झाला आहे असे ते ( नारद ) मुनी ज्या समाजात बसले होते ॥ १ ॥ त्या समाजात हे दोघे रुद्र्गण जाऊन बसले ! त्यांचा ब्राह्मणवेष असल्याने त्यांना कोणी ओळखले नाही. ॥ २ ॥ नारदास ऐकू जाईल अशा रीतीने ते गूढभाषण ( आपसात ) करु लागले यांना हरीने किती सुंदर रुप ( हरिसौंदर्य = माकडाचे रुप ) दिले आहे ! ॥ ३ ॥ यांचेरुप पाहून राजकुमारी यांच्यावर मोहित होईल. विशेष हरी जाणून यांनाच ती वरील ॥ ४ ॥ मुनींना मोह झाला असून त्यांचे मन दुसर्‍यांच्या ताब्यात गेले आहे व शंभुगण अती सुखी होऊन हसत आहेत. ॥ ५ ॥ ( हरिगणांचे ) ते विचित्र संभाषण जरी मुनींना ऐकू येत होते तरी बुद्धी अतिशय भ्रांत झाल्याने त्यांना त्यातला अर्थ कळला नाही. ॥ ६ ॥ ते विशेष चरित्र कोणालाच कळले नाही, पण त्या राजकन्येला ते रुप दिसले ॥ ७ ॥ ते माकडाचे तोंड व भयंकर देह दृष्टीस पडताच तिला क्रोध आला ॥ ८ ॥ जेव्हा ती सुंदर कुमारी सखीला बरोबर घेऊन जणूं राजहंसा सारखी चालू लागली, कर कमलात कमलांची जयमाला घेतलेली ती सर्व राजांना निरखून पहात फिरु लागली ॥ दो० १३४ ॥

बसले नारद फुलून जिकडे । चाळवि चक्षु न चुकून तिकडे ॥
मुनि फिरफिरुनि उठति तळमळती । हरगण बघुनि दशा स्मित करती ॥
नृपतनुधर तिथं कृपाल आले । मुदित कुमारि घालि जयमाले ॥
लक्ष्मीपति गत घेउन नवरी । भूप समाजिं निराशा जबरी ॥
मोहनष्टधी विकल अति मुनी । गाठ सुटुनि जणुं मुक्ता गळुनी ॥
सस्मित वदले हरगण तैं, मुनि! । पहा मुकुरिं मुखवटा किं जाउनि ॥
वदुनि उभय अति सभय पळाले । मुनि निज मुख जलिं बघते झाले ॥
बघुनि वेष अति रोष वाढला । शाप घोर अति तयांस दिधला ॥

दो० :- व्हा निशिचर जा उभय ही कपटी पापि असां किं ॥
हसलां मज घ्या फल, पुन्हां कोणा मुनिस हसां किं ॥ १३५ ॥

( कामलोभ ) मनोराज्यातील आनंदाने फुलून गेलेले नारद जिकडे बसले होते त्या बाजूस त्या कुमारीने चुकूनसुद्धा दृष्टी फिरवली नाही. ॥ १ ॥ तेव्हा नारदमुनी पुन्हा पुन्हा उठून उभे राहू लागले व फार तळमळू लागले त्यांची ती दशा पाहून हरगण स्मित करु लागले. ॥ २ ॥ एवढ्यात कृपाळू ( भगवान नारायण ) राजाच्या रुपात तेथे आले व राजकुमारीने त्यांस आनंदाने जयमाळ घातली ॥ ३ ॥ लक्ष्मीपती ( नारायण ) नवरीला घेऊन गेले, तेव्हा सर्व राजेलोकांची जबर निराशा झाली ॥ ४ ॥ मोहाने बुद्धी नष्ट झाल्यामुळे मुनी अत्यंत व्याकुळ झाले. त्याना वाटले की गाठ सुटुन मुक्ता गळून पडली ॥ ५ ॥ तेव्हा ते हरगण स्मित करुन म्हणाले की अहो! मुनी आरशात बघा की जाऊन एकदा ! ॥ ६ ॥ असे म्हणून ते दोघे अतिभयभीत होऊन पळत सुटले व मुनींनी जाऊन आपले मुख पाण्यात पाहीले ॥ ७ ॥ आपला तो वेष पाहताच रोष अतिशय वाढला व त्यांना घोर शाप दिला की - ॥ ८ ॥ तुम्ही दोघेही कपटी व पापी आहांत म्हणून जा व्हा निशाचर दोघेही. मला हसलात त्याचे हे फळ ( पदरात ) घ्या, आता पुन्हा कोणा मुनीला हसाल का ? ॥ दो० १३५ ॥

मगजळिं बघति रूप निज मिळलें । तरि संतुष्ट न चित्तीं इवले ॥
अधर थरकती क्रोध मनासी । सपदि निघति कमलापतिपासी ॥
शाप देउं वा प्राण, ठरविले । मम उपहासा जगतिं करविलें ॥
मध्यमर्गिं भेटति दनुजारी । सवे रमा ती राजकुमारी ॥
मृदु सुरनाथ वदति वचनाला । व्याकुळसे मुनि कुठें निघालां ॥
हें ऐकत अति कोप संचरे । मायाविवश बोध मति विसरे ॥
परसंपदा तुम्हां ना बघवे । ईर्षा कपट विशेषें करवे ॥
सिंधुमथनिं रुद्रास चकविलें । प्रेरुनि सुर विषपान करविलें ॥

दो०. :- सुराऽसुरां विष शंकरा स्वयें रमा मणि चारु ॥
स्वार्थसाधु तुम्हिं कुटिलही कपटि सदा व्यवहारु ॥ १३६ ॥

मग पुन्हा पाण्यात पाहीले तो आपले स्वत:चे रूप मिळालेले दिसले तरी चित्तात जरा सुद्धा संतुष्ट झालेले दिसले नाहीत ॥ १ ॥ ओठ थरथर कापत आहेत व चित्तात क्रोध आहे, (अशा दशेत ) ते ताबडतोब कमलापतीकडे जाण्यास निघाले ॥ २ ॥ मनाशी ठरविले की जाऊन शाप देईन वा ( पायाशी ) प्राण देईन, कारण त्यांनी जगात माझा उपहास करविला. ॥ ३ ॥ दनुजारि त्यांना वाटेतच भेटले तेव्हा रमा ( लक्ष्मी ) व ती राजकुमारी बरोबर होत्या. ॥ ४ ॥ ( नारदास पाहताच ) सुरनाथ ( देवाधिदेव ) मृदु वाणीने म्हणाले की मुने ! व्याकुळ झाल्यासारखे कोठे निघालात ? ॥ ५ ॥ हे शब्द कानीं पडताच सर्वांगात क्रोधाचा संचार झाला. व मायेला विशेष वश झाल्याने बुद्धीची ज्ञानशक्ती उरली नाही ॥ ६ ॥ ( व तोफखाना सुरु केला ) तुम्हाला दुसर्‍याचे ऐश्वर्य, संपत्ती बघवत नाही, ईर्षा व कपट फार चांगले करता येते ( नाही कां ? ) ॥ ७ ॥ समुद्र मंथनाच्या वेळी देवांना प्रेरणा देऊन रुद्राला फसविलेत व विषपान करायला लावलेत ( तेच ना तुम्ही ? ) ॥ ८ ॥ सुरा असुरांना दिलीत, विष शंकरांना दिलेत, स्वत: मात्र रमा ( लक्ष्मी ) व सुंदर कौस्तुभ मणी उपटलांत, तुम्ही स्वार्थसाधू व कुटिल असून सदा कपटी व्यवहार करता ॥ दो०१३६ ॥

महा स्वतंत्र न कोणि शिरावरि । रुचे मना जें तेंच करां तरि ॥
खला सुजन सुजना खल करतां । हर्ष विषाद न मनिं तिळ धरतां ॥
धीट बना ठकवुनि सकलानां । संतत उत्साही मन भय ना ॥
कर्म शुभाशुभ तुम्हां न बाधी । कोणि आजवर तुम्हां न साधी ॥
केला आज अहेर थोर घरिं । निज कर्माचा घ्या बदला तरि ॥
धरुनि फसविला मज जे देहा । तोच धरा मम शाप असे हा ॥
कीश वेष मज दिला भयानक । माकड होतिल तुम्हां सहायक ॥
मम अपकार तुम्हीं कृत भारी । दुःखी व्हाल वियोगें नारी ॥

दो. :- धरुनि शाप शिरिं हर्ष हृदिं प्रभु विविधा विनवून ॥
घे निजमाया-प्रबलते कृपाब्धि आकर्षून ॥ १३७ ॥

तुमच्या शिरावर कोणी नाही ( त्यामुळे ) अत्यंत स्वतंत्र झाला आहात. आणि मनाला वाटेल ते करता ॥ १ ॥ दुर्जनाला सज्जन व सज्जनाला दुर्जन बनवता, ( पण ) तुमच्या मनाला जरासुद्धा सुख – दु:ख होत नाही ॥ २ ॥ या सगळ्यांना ठकवून ठकवून धीट बनला आहांत व सदा सर्वदा निर्भय व उत्साही असता ॥ ३ ॥ तुम्हाला पुण्य पापादिकर्म मुळीच बाधत नाही व आजपर्यंत तुम्हाला कोणी वाटेवर नाही आणले ॥ ४ ॥ आज चांगल्या थोर घरी आहेर केला आहात तरी त्याचा मोबदला – परत आहेर आता घ्या पदरात ॥ ५ ॥ जो देह धरुन मला फसविलात तोच देह तुम्ही धारण करा असा माझा शाप आहे ॥ ६ ॥ तुम्ही मला भयानक माकडाचे रुप दिलेत म्हणून तुम्हाला भयानक माकडेच साह्य करतील ॥ ७ ॥ तुम्ही माझे फार मोठे अहित केलेत, म्हणून तुम्ही स्त्रीविरहाने दु:खी व्हाल ॥ ८ ॥ प्रभूंनी ( नारदाचा ) शाप शिरसा मान्य केला व हृदयात हर्ष झाला आणि नारदांना नाना प्रकारे विनंती करुन कृपासागरांनी आपल्या मायेच्या प्रबलतेस आकर्षुन घेतली ॥ दो० १३७ ॥

जैं हरि हरिती माया सारी । तिथें रमा ना राजकुमारी ॥
मुनि सभीत अति धरि हरिचरणा । पाहि! वदे प्रणतार्ती हरणा ॥
ठरो मृषा मम शाप कृपालू । म्हणति मदिच्छा दीनदयालू ॥
मी वदलों कितितरि दुर्वचनें । पापनाश मम कसा? मुनि म्हणे ॥
जा शंकरशतनामा जपणें । शीघ्र हृदयिं विश्राम पावणें ॥
प्रिय शिवसम मजला नहि कोणी । ही प्रतीति सोडा न चुकोनी ॥
कृपा पुरारि न करिति जयासी । भक्तिलाभ मम मुनि! न तयासी ॥
महिं विचरा हें धरुनि उराशीं । अतां न माया येइ तुम्हांसी ॥

दो. :- प्रभु बहु मुनिला प्रबोधुनि पावति अंतर्धान ॥
सत्यलोकिं नारद निघति करत राम गुणगान ॥ १३८ ॥

जेव्हा हरींनी सारी माया हरण केली तेव्हा तेथे रमाही दिसेना व राजकुमारीही ॥ १ ॥ तेव्हा मुनी अतिभयभीत झाले व ‘प्रणतार्ति हरणा पाहि’ असे म्हणत त्यांनी हरीचे चरण धरले ॥ २ ॥ व म्हणाले हे कृपाळा ! माझा शाप खोटा ठरो. दीन दयाळू हरी म्हणाले की ती माझीच इच्छा होती ॥ ३ ॥ मुनी म्हणाले की मी कितीतरी अपशब्द बोललो तरी हे माझे पाप कशाने नष्ट होईल ? ॥ ४ ॥ ( अता येथून ) जा व शंकर शतनामांचा जप करा म्हणजे हृदयाची तळमळ जाऊन शीघ्र विश्रांती पावाल ॥ ५ ॥ मला शिवासारखा दुसरा कोणी प्रिय नाही हा विश्वास मात्र चुकून सुद्धा सोडू नका ॥ ६ ॥ मुने ! काय सांगू ! त्रिपुरारी शिव ज्याच्यावर कृपा करीत नाहीत त्याला माझी भक्ती कधीही मिळत नाही ॥ ७ ॥ म्हणून ( हे मी सांगितलेले ) सदैव उराशी बाळगून खुशाल जगभर फिरा म्हणजे माझी माया यापुढे तुमच्याजवळ येणार नाही ॥ ८ ॥ मुनीला नाना प्रकारे प्रबोध करुन प्रभू अंतर्धान पावले, तेव्हा नारदमुनी राम – गुण गान करीत सत्यलोकास जाण्यास निघाले ॥ दो० १३८ ॥

हरगण मुनिस जात पथिं पाहुन । विगत मोह मनिं विशेष हर्षुन ॥
नारदनिकट भीत अति आले । पाय धरुनि अति दीन म्हणाले ॥
मुनिवर! आम्हीं हरगण विप्र न । कृत अपराध महा फळला पण ॥
शापानुग्रह करा कृपाळू । वदले नारद दीनदयाळू ॥
निशिचर जन्मा जरि दोघे जा । पावा विपुल विभव बलतेजा ॥
विश्वभुजबळें जिंका जेव्हां । विष्णु मनुजतनु धरतिल तेव्हां ॥
मरण समरिं हरिं-करिं हि तुम्हांला । मुक्त व्हाल याल न जन्माला ॥
ते मुनिपदिं शिर नमुनि निघाले । जातां काळ निशाचर झाले ॥

दो. :- एक कल्पिं या मुळें प्रभु धरिति मनुज‍अवतार ॥
सुररंजन सज्जन सुखद हरि भंजन भू-भार ॥ १३९ ॥

मोहमुक्त झालेल्या व मनात विशेष हर्षित होऊन मार्गाने जात असलेल्या मुनींना पाहून हरगण अतिभीतभीत नारदांजवळ आले व त्यांचे पाय धरुन अतिदीन ( वाणीने ) म्हणाले - ॥ १-२ ॥ मुनीश्रेष्ठ आम्ही विप्र नसून हरगण आहोत, आम्ही मोठा अपराध केला व त्याचे फळ पण आम्हास मिळाले ॥ ३ ॥ आपण कृपाळु आहात तेव्हा आता शापानुग्रह करावा ( तेव्हा ) दीनदयाळू नारद म्हणाले ॥ ४ ॥ तुम्ही दोघेही निशाचर जन्मास जाल हे जरी खरे असले, तरी तुम्ही अपार वैभव, तेज व बल पावाल ॥ ५ ॥ तुम्ही आपल्या बाहुबळाने जेव्हा विश्व जिंकाल तेव्हा विष्णू ( नारायण ) मनुष्य देह धारण करतील ॥ ६ ॥ तुम्हांला रणांगणात हरीच्याच हातून मरण येईल व तुम्ही मुक्त व्हाल, पुन्हा जन्माला येणार नाही ॥ ७ ॥ ते हरगण मुनींच्या पायांना नमन करुन निघाले; व ( काही ) काळ निघून गेल्यावर निशाचर झाले. ॥ ८ ॥ यामुळे एका कल्पात प्रभूंनी मनुष्यावतार धारण केला कारण हरी देवांचे रंजन करणारे, सज्जनांना सुख देणारे व भूभार भंजन करणारे आहेत. ॥ दो० १३९ ॥

ऐशा हरि-जन्मा-कर्मांना । सुंदर सुखद विचित्र न गणना ॥
कल्पीं कल्पीं प्रभु अवतरती । चारुचरित नानाविध करती ॥
तैं तैं कथा-प्रबंधां पावन । रचुनी मुनीश करिती गायन ॥
अनुपम नाना प्रसंग वानिति । परिसुनि सुज्ञ न विस्मय मानिति ॥
हरि अनंत हरिकथा अनंत । श्रवति कथिति बहुविधिं सब संत ॥
सुंदर रामचंद्र-चरितानां । कल्पकोटि पुरति न गातानां ॥
हा प्रसंग मी कथित भवानी । मोहति मुनि हरिमायें ज्ञानी ॥
प्रभु कौतुकी प्रणतहित-कारी । सेवत सुलभ सकल दुखहारी ॥

सो. :- सुर नर मुनि कुणि नाहिं ज्या न मोहि माया प्रबल ॥
सुविचारें मनिं याहि भजा महामायापतिस ॥ १४० ॥

हरीच्या अशा सुंदर, सुखद व विचित्र जन्मांना व कर्माना गणना नाही ॥ १ ॥ प्रत्येक कल्पात प्रभू अवतार घेतात व नाना प्रकारचे सुंदर चरित्र करतात. ॥ २ ॥ त्या त्यावेळी मुनिश्रेष्ठ पावन – कथा प्रबंध रचून त्या चरित्रांचे गायन करतात ॥ ३ ॥ ते नाना प्रकारचे अनुपम प्रसंग विस्ताराने वर्णन करतात म्हणून जे सूज्ञ असतात ते त्याच्या श्रवणाने आश्चर्य मानीत नाहीत. ॥ ४ ॥ हरी जसे अनंत आहेत तशा त्यांच्या कथाही अनंत आहेत. म्हणून सर्व संत त्या विविध प्रकारांनी सांगतात व श्रवण करतात. ॥ ५ ॥ रामचंद्रांच्या सुंदर चरित्रांचे गान करण्यास कोटी कल्पे सुद्धा पुरणार नाहीत ॥ ६ ॥ भवानी ! हरिमायेने मुनी मोहित होतात हा प्रसंग मी कथन केला ॥ ७ ॥ प्रभू कौतुकी प्रणतहित करणारे असून सेवा करण्यास सुलभ व सर्व दु:ख हरण करणारे आहेत ॥ ८ ॥ देव, मनुष्य, किंवा मुनी वा असा कोणीच नाही ज्यास प्रबल माया मोहू शकत नाही, याच सुविचाराने महामायापतीला भजावे ॥ दो० १४० ॥

* * * * *

श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु

GO TOP