॥ श्रीरामचरितमानस ॥

(मराठी अनुवाद)

॥ अयोध्याकाण्ड ॥

अध्याय ७ वा

॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥


Download mp3

वदण्या माते समोर लाजति । साजे समया समजुनि बोलति ॥
राजकुमारि सांगुं ऐकावें । भलतें कांहीं मनी न घ्यावें ॥
तुमच्या मम कुशला इच्छा जर । अमचें वचनें गृहीं रहा तर ॥
मम आज्ञा सासू शुश्रूषण । अवघें भामिनि भवनिं भलेपण ॥
याहुनि धर्म अधिक ना दूजा । सादर - सासु - सासरा - पूजा ॥
जैं जैं स्मृति मम ये मातेला । प्रेम विकल होई भ्रम मतिला ॥
तैं सांगुनि तुम्हिं कथा पुराणी । सुंदरि ! समजावा मृदुवाणीं ॥
वदतो सहज शपथ शत मजला । सुमुखि राखुं मातेस्तव तुजला ॥

दो० :- श्रुति-गुरु-संमत-धर्मफल मिळे विनाही क्लेश ॥
हट्टें बहु संकट सहति गालव नहुष नरेश ॥ ६१ ॥

श्रीराम - सीता संवाद -- (रघुविरास) मातेच्या समोर (पत्‍नीशी) बोलण्य़ास लाज (संकोच) वाटत आहे पण या प्रसंगी शोभण्यासारखे आहे असे समजून बोलू लागले ॥ १ ॥ राजकुमारी ! मी सांगतो ते ऐका; (मात्र) भलता सलता समज मनांत करुन घेऊ नका ॥ २ ॥ तुमचे व माझे कल्याण व्हावे असे वाटत असेल तर आमच्या वचनाने घरी रहा ॥ ३ ॥ माझी आज्ञा व सासूंची सेवा शुश्रुषा करण्यामुळे हे भामिनी ! घरी राहण्यातच सर्व प्रकारे भलेपणा आहे. ॥ ४ ॥ आदराने सासू - सासर्‍यांची सेवा करण्यापेक्षा अधिक (श्रेष्ठ) धर्म नाही. ॥ ५ ॥ जेव्हा जेव्हा मातेला माझी आठवण येईल व प्रेमाने व्याकुळ होऊन बुद्धिभ्रम झाल्यासारखे होईल ॥ ६ ॥ तेव्हा तेव्हा सुंदरी ! तुम्ही पुराण - कथा सांगून मृदु मधुर शब्दांनी समजूत घालीत जा ॥ ७ ॥ सुमुखि मी सहज सांगतो (कपटाने नव्हे) शंभर शपथा घेऊन सांगतो की केवळ मातेसाठी मी तुला ठेवीत आहे ॥ ८ ॥ गुरु व श्रुति यांना संमत असलेल्या धर्माचे पालन केल्यास त्याचे फळ शारीरिक क्लेश न करताच मिळते, (पण) हट्ट करुन गालव (मुनि) व नहुषराजा यांना पुष्कळ संकटे सोसावी लागली ॥ दो० ६१ ॥

मी लवकर पाळुनि पितृवाणीं । येइन सुमुखी ऐक शहाणी ॥
वेळ न लागे दिवसां जाया । श्रुणु सुंदरि अमचे वचना या ॥
प्रेमें हट्ट कराल कें वामे । तर पावाल दुःख परिणामें ॥
कानन कठिण भयंकर भारी । घोर घर्म हिम वारा वारी ॥
कुश कंटक कंकर पथिं नाना । चालणें हि अनवाणी जाणा ॥
तुमचे चरण कमल मृदु सुंदर । मार्ग अगम्य महीधर दुर्धर ॥
दर्‍या गुहा नद नद्या नि निर्झर । दुर्गम अगाध बघणें दुष्कर ॥
व्याघ्र भल्ल वृक-करी-केसरी । गर्जनिं नुरते धैर्य अंतरीं ॥

दो० :- भूमि शयन, वल्कल वसनम् अशन कंद फल मूल ॥
तीं किं सदा प्रति दिन मिळति सर्व समयिं अनुकूल ॥ ६२ ॥

हे सुमुखी ! तूं शहाणी आहेस ऐक मी पित्याचे वचन पालन करुन लवकर येईन ॥ १ ॥ दिवस जायला वेळ नाही लागणार म्हणून सुंदरी ! आमचे हे वचन ऐक ॥ २ ॥ वामे ! (प्रेमळ स्त्रिये) प्रेमाला वश होऊन जर हट्ट कराल तर तुम्हांला शेवटी दु:ख भोगावे लागेल ॥ ३ ॥ अरण्य फार कठीण फार भयंकर असते ऊन, थंडी, वारा पाऊस व पाणी इत्यादी सर्वच भयंकर असतात ॥ ४ ॥ मार्गात कुश, काटे खडे (कच) इ. नाना प्रकार आहेत व चालावयाचे आहे अनवाणी ॥ ५ ॥ तुमचे चरण आहेत कमलासारखे कोमल व सुंदर; रस्ते अगम्य असून (वाटेत) दुर्धर पर्वत आहेत ॥ ६ ॥ दर्‍या, गुहा, नद, नद्या व नाले (वाटेत) आहेत आणि सर्व अगाध व अगम्य असून त्यांच्याकडे (नुसते) बघवत सुद्धा नाही ॥ ७॥ वाघ अस्वले, लांडगे, हत्ती व सिंह यांच्या गर्जनांनी हृदयांत धीर रहात नाही ॥ ८ ॥ जमिनीवर झोपावयाचे, वल्कले नेसावयाची, आणि कंदमूळ फळांवर जगायचे आहे. बरे ती तरी सदा सर्वकाळ रोज का मिळणार आहेत ? अनुकूल समय (देश, ऋतु, परिस्थिती) असेल त्याप्रमाणे सर्व मिळणार ! ॥ दो० ६२ ॥

निशिचर मनुजाहारि विचरती । कपटवेष नानाविध करती ॥
लागे डोंगरिंचें अति पाणी । विपिन-विपत्ति न वदवत वाणी ॥
व्याल कराल विहग वन घोर हि । निशिकर-निकर नारि-नर चोर हि ॥
डरति धीर गहना स्मरतां मनिं । तुम्हीं स्वभाव भीरु मृगलोचनि ॥
हंसगमनि ! तुम्हिं वना योग्य ना । श्रवुनि देति मज जन अपयश ना ॥
मानस सलिल सुधें प्रतिपालित । जगे मराली कीं लवणाब्धिंत ॥
नवरसाल-वनिं विहरणशीला । शोभे कारवि-विपिनिं कोकिळा ॥
रहा भवनिं या करुनि विचारा । चंद्रवदनि वन दुःख पसारा ॥

दो० :- सहज सुहृद गुरु धनी वच जे न शिरीं धरतात ॥
ते पस्तावति पोटभर कधिं न टळे हितघात ॥ ६३ ॥

मनुष्यांना खाणारे निशाचर वनात भटकत असतात व ते नाना प्रकारची कपट रुपे धारण करीत असतात ॥ १ ॥ डोंगरातील हवा प्राणी फार बाधते वनातील विपत्ती शब्दांनी वर्णन करता येत नाहीत ॥ २ ॥ मत्त हत्ती व सर्प, पक्षी व अरण्य सर्वच भयानक ! राक्षसांच्या झुंडीच्या झुंडी वनात असतात व ते स्त्री - पुरुषांना चोरुन नेतात (वनातील स्त्रिया व पुरुष चोर असतात) ॥ ३ ॥ काननाची आठवण झाली की धैर्यवान पुरुष सुद्धा घाबरुन जातात मृगलोचनी ! तुम्ही तर स्वभावताच भित्र्या आहांत ! ॥ ४ ॥ म्हणून हंसगमनी ! तुम्ही वनवासाला योग्य नाहीत (असे असून मी नेले तर) ऐकून लोक मला अपयश देतील नावे ठेवतील नां ! ॥ ५ ॥ मानस सरोवरातील अमृतासारख्या जलाने जिचे पालन पोषण झाले आहे अशी हंसी खार्‍या पाण्याच्या सागरात जगेल काय ? ॥ ६ ॥ नवीन आम्रवनांत विहार करणारी जी कोकिळा ती कारवीच्या वनांत शोभेल काय ?॥ ७ ॥ चंद्रवदनी ! याचा विचार करुन घरी रहा वन म्हणजे केवळ दु:खांचा पसारा आहे ॥ ८ ॥ स्वभावताच जे सुहृद आहेत ते गुरु, धनी यांनी याची आज्ञा व उपदेश जे शिरसामान्य करीत नाहीत त्यांना पोटभर पश्चाताप होतो व त्यांच्या हिताचा नाश झाल्याशिवाय रहात नाही ॥ दो० ६३ ॥

पतिवच मृदुल मनोहर ऐकुन । सजल ललित सीतेचे लोचन ॥
दाहति शीतल वचनें तीला ।शरदचंद निशि जशि कोकीला ॥
वदवे ना, विव्हळ वैदेही । स्वामी शुचि तजुं बघती स्नेही ॥
वारि विलोचनिं बळेंचि वारी । धीर धरुनि उरिं अवनिकुमारी ॥
नमुनि सासुपदिं करयुग जोडी । क्षमा देवि ! अति अविनय खोडी ॥
मला प्राणपति तें उपदेशित । ज्यामधिं माझें होइ परमहित ॥
करुनि विचारां गमे मम मना । पतिवियोगसम विश्विं दुःख ना ॥

दो० :- प्राणनाथ करुणायतन सुंदर सुखद सुजाण ॥
तुम्हिं रघुकुल कुमुदेंदुविण सुरपुर नर्क-समान ॥ ६४ ॥

(प्रिय) पतीचे कोमल व मनोहर भाषण ऐकून सीतेचे सुंदर नेत्र पाण्याने भरले ॥ १ ॥ शरद ऋतुतील चांदणी रात्र जशी चक्रवाकीचा दाह करते तशी ती शीतल वचने तिला दाहक झाली ॥ २ ॥ वैदेही विह्वळ झाली की माझे पवित्र स्नेही स्वामी माझा त्याग करु पहात आहेत (त्यामुळे) तिला बोलवे ना ॥ ३ ॥ डोळ्यातील पाणी दाबून धीर करुन अवनिसुता ॥ ४ ॥ सासूच्या पायांना नमन करुन, हात जोडून म्हणाली की देवी ! माझा उद्धट पणा, माझी खोडी क्षमा करावी ॥ ५ ॥ विचार करुन पाहता माझ्या मनाला वाटते की, पति वियोगासारखे दु:ख या जगात नाही ॥ ६ ॥ आपण माझ्या प्राणांचे आधार, करुणेचे माहेरघर, सुंदर सुखदायक, सुजाण व रघुकुल कुमुदांना चंद्र असून आपल्या वाचून मला सातस्वर्ग नरकासारखे आहेत. ॥ दो० ६४ ॥

माता पिता स्वसा प्रिय बंधू् । प्रिय परिवार सुहृद संबंधू ॥
सासु सासरा गुरु सहकारी । सुत सुंदर सुशील सुखकारी ॥
नाथ ! पतिविना स्नेह नि नातें । तापद तरणिहुणी स्त्रीला तें ॥
तन धन धाम धरणि नृप सत्ता । पतिविण सर्वचि शोक इयत्ता ॥
भोग रोगसम भूषण भारहि । यम-यातना सदृश संसारहि ॥
प्राणनाथ ! अपणांविण जगतीं । कोणि सुखद कांहीं मज नसती ॥
देह जिवाविण जलविण सरिता । नाथ ! तिंच पुरुषाविण वनिता ॥
प्रभु ! सुख सकल तुम्हांसह असतां । शरद विमल विधु-वदन निरखितां ॥

दो० :- खग मृग परिजन, नगर वन, वल्कल विमल दुकूल ॥
नाथ साथ सुरसदन-सम पर्णकुटी सुखमूल ॥ ६५ ॥

माता, पिता, प्रिय बहिणी व प्रिय भाऊ, प्रिय परिवार व सुहृद इ. संबंधी ॥ १ ॥ सासू, सासरा, गुरु, सहकारी सुंदर, सुशील सुख देणारे पुत्र ॥ २ ॥ हे सर्व स्नेहाचे संबंध आणि नाती हे नाथ ! स्त्रीला पतिशिवाय सूर्या पेक्षाही अधिक तापदायक आहेत. ॥ ३ ॥ शरीर, धनदौलत, जमिन - जुमला व राज्यसत्ता इत्यादी सर्व गोष्टी पतिवाचून शोकाची परमावधि आहेत ! ॥ ४ ॥ (पतिविहीन सतीला) विषयभोग रोगांसारखे व अलंकारादि भाररुप वाटतात. सर्व संसार म्हणजे यमयातना वाटतात. (देह यातनादेह वाटतो) ॥ ५ ॥ प्राणनाथ ! तुमच्या शिवाय मला (तरी) सर्व जगात कोणी व काहीसुद्धा सुखदायक नाही ॥ ६ ॥ जिवावाचून देह, व पाण्यावाचून जशी नदी तशीच नाथ ! पुरुषा (पती) वाचून स्त्री होय. ॥ ७ ॥ उलट प्रभो ! आपले शरद चंद्रासारखे निर्मल मुख निरखीत असतां आपल्या संगतीत मला सर्व प्रकारचे सुख मिळेल व मिळते ॥ ८ ॥ नाथ ! आपण बरोबर असल्यावर पशु पक्षीच कुटुंबातील व्यक्ती, वनच नगर, वल्कलेच मूल्यवान निर्मल रेशमी वस्त्रे होत व पर्णकुटीच देवांच्या प्रासादाप्रमाणे सर्व सुखाचे मूळ होय. ॥ दो० ६५ ॥

वन-सुर-देवि उदार सदा अति । सासु-सासर्‍यांसम सांभाळति ॥
कुश किसलय मय शय्या सुंदर । प्रभुसह मदन शयन सम सुखकर ॥
कंद मूल फल अमृत सुभोजन । अवध-सौध शत सम पर्वतगण ॥
प्रभु-पद-पद्‌मां पळ पळ पाहिन । जशि कोकी प्रमुदितअ दिनिं राहिन ॥
नाथ ! कथित बहु वन दुःखानां । बहु भय विषाद परितापानां ॥
तीं प्रभु-वियोग-लेशासम नहि । होति कृपानिधि सर्व मिळूनहि ॥
हें जाणुनी सुजाण-शिरोमणि । टाकुं नका मजला न्या हो ! वनिं ॥
काय करूं बहु विनती स्वामी । करुणामय हृदयान्तर्यामी ॥

दो० :- ठेवा पुरिं जर अवधि वरि राहति वाटे प्राण ॥
दीन बंधु सुंदर सुखद शीलस्नेह निधान ॥ ६६ ॥

सदा अति उदार असणारे वनदेव आणि वनदेवी, सासरा व सासूप्रमाणे माझा सांभाळ करतील ॥ १ ॥ कुश व कोवळी पाने यांनी तयार केलेली सुंदर शय्या प्रभूच्या संगतीत मला मदनाच्या गाद्यांसारखी सुखकर होईल. ॥ २ ॥ कंदमूळ फळे म्हणजे अमृताचे उत्तम भोजन व पर्वतांचा समूह म्हणजेच अयोध्येतील उंच उंच सौध (राजमहाल) होत. ॥ ३ ॥ क्षणोक्षणी प्रभूपद कमलांकडे पहात जाईन व कोकी जशी दिवसा अति आनंदित राहते तशी अगदी प्रसन्न राहीन. ॥ ४ ॥ नाथ ! आपण पुष्कळ वनदु:खांचे व पुष्कळ भय विषाद परिमाणांचे वर्णन केलेत (खरे) ॥ ५ ॥ (पण) कृपानिधी ! ती सर्व दुःखे, क्लेश प्रभुवियोग दु:खाच्या लेशासारखी सुद्धा होऊ शकणार नाहीत ॥ ६ ॥ सुजाण शिरोमणी ! हे जाणून, ध्यानी घेऊन माझा त्याग नका हो करुं ! मला न्या हो वनांत ! ॥ ७ ॥ स्वामी ! आपण करुणामय असून हृदयातील जाणणारे आहांत, तेव्हां मी फार काय विनंती करु ? ॥ ८ ॥ १४ वर्षांच्या अवधीपर्यंत माझे प्राण राहतील असे आपणास जर वाटत असेल तर ठेवा आयोध्येत आपण दीनबंधू, सुंदर, सुखदायक, आणि शील व स्नेह यांचे निधान आहांत (हे मात्र विसरुं नये) ॥ दो० ६६ ॥

हार न खाइन मार्गीं चालत । घडि घडि चरण-सरोजां पाहत ॥
सर्वपरीं प्रियदास्य करीन हि । सगळे श्रम पथजनित हरीनहि ॥
प्रक्षाळिन पद तरुतळिं बसुनी । घालिन वारा मुदित होउनी ॥
श्यामल देहीं श्रमकण दिसतां । क्लेश कुठें प्रिय पतिस निरखितां ॥
सम महिवरि तृण पल्लव घालिल । पाय रात्रभर दासी दाबिल ॥
वारंवार मूर्ति मृदु बघतां । लागेना मज वात-तप्तता ॥
प्रभुसंगें मज पाहि कुणि कसा । सिंह-वधूला क्रोष्टु शश जसा ॥
मी सुकुमारि नाथ वन जोगे । तुम्हां उचित तप मज सुख भोगें ॥

दो० :- श्रवुनि वचन असं कठिण जर उर न भग्न मम होत ॥
प्रभु वियोग-दुःखा विषम प्राण नीच साहोत ॥ ६७ ॥

मार्गाने चालताना मी क्षणोक्षणी आपल्या चरणकमलांकडे बघत गेले की मी हार खाणार नाही ॥ १ ॥ मला सर्व प्रकारे प्रिय असलेले प्रिय पतीचे दास्य मी करीन व मार्गांने चालल्यामुळे (आपणांस व मला) झालेले सर्व श्रम हरण करीन ॥ २ ॥ झाडाच्या छायेत बसून आपले पाय मी धुईन आणि मुदित होऊन वारा घालीन ॥ ३ ॥ श्यामल देहावर श्रमांमुळे आलेले घामाचे (श्वेत) बिंदू दिसले की प्रिय पतीला निरखून बघत राहीले म्हणजे क्लेश कुठे राहतील शिल्लक ? ॥ ४ ॥ सपाट जमिनीवर गवत व झाडांची पाने ही दासी पसरील व रात्रभर आपले पाय चेपत राहील ॥ ५ ॥ वारंवार कोमल मूर्तीकडे पाहात राहिल्याने उष्ण वार्‍याची झळ सुद्धा मला लागणार नाही. ॥ ६ ॥ प्रभु बरोबर असल्यावर माझ्याकडे कोणी (वाकड्या) नजरेने पाहील तरी कसा ? जसा कोल्हा किंवा ससा सिंहाच्या वधूला पाहू शकणार नाही (तसेच मला कोण पाहू शकतील) ॥ ७ ॥ मी मात्र सुकुमारी आणि नाथ तेवढे तपाला योग्य ! तुम्हीच तप करणे योग्य आणि मला मात्र सुख भोगांनी होईल ! ॥ ८ ॥ असे अकठीण - कठोर वचन ऐकून (सुद्धा) माझे हृदय ज्या अर्थी (शतश:) भग्न झाले नाही त्या अर्थी प्रभू ! आपल्या वियोगाचे दु:सह दु:ख (या) नीच प्राणांना सोसावे लागणारच ! ॥ दो० ६७ ॥

वदुनि विकल अति सीता झाली । वचन -वियोग न साहूं शकली ॥
रघुपति जाणति बघुनि दशा कीं । हटें ठेवितां प्राण न राखी ॥
वदति कृपालु भानुकुल नाथ किं । सोडुनि शोक चला वनिं साथ किं ॥
नव्हें विषादा वेळ आजची । शीघ्र तयारि करा गमनाची ॥
प्रिय भाषणें प्रिये समजावति । माते नमती आशिस् पावति ॥
प्रजादुःख हर ये हो ! सत्वर । निष्ठुर आइस विसरुं नको बरं ॥
विधे ! दशा मम पुन्हां टळे का । नयन मनोहर युगल दिसे का ॥
बाळ ! सुवेळ सुदिन कैं येइल । जननि जिवंत वदन विधु पाहिल ॥

दो० :- पुन्हां वदुनि हे वत्स ! बा ! रघुपति रघुवर लाल ! ॥
बाहुनि कैं हृदिं धरुनि, तनु हर्षें निरखिन बाळ ॥ ६८ ॥

असे सांगून सीता अत्यंत व्याकुळ झाली. नुसता वचन वियोगही तिला सोसवला नाही ॥ १ ॥ ती दशा पाहून रघुपतिंनी जाणले की तिला हट्टाने ठेवली तर ही प्राण राखू शकणार नाही. (प्राणांचे रक्षण करता येणार नाही) ॥ २ ॥ तेव्हा कृपाळू भानु कुलनाथ म्हणाले की शोक सोडून द्या व माझ्याबरोबर वनात चला की ॥ ३ ॥ (मात्र) आजची हे वेळ खेद, शोक करीत बसण्याची नाही वनात जाण्याची तयारी लवकर करा. ॥ ४ ॥ प्रिय भाषणाने प्रियेची समजूत घातली व मातेला वंदन केले (तेव्हा) आशीर्वाद मिळाले ॥ ५ ॥ (माता म्हणाली) बाळ ! लवकर ये हो ! आणि प्रजेचे दु:ख हरण कर; मात्र या तुझ्या निष्ठुर जननीला विसरू नकोस बर ! ॥ ६ ॥ अरे दैवा ! माझी ही दशा पुन्हा बदलेल कां ? व हे नयन मनोहर जोडपे (या डोळ्यांना) पुन्हा दिसेल कां ? ॥ ७ ॥ बाळ ! ज्या वेळी या तुझ्या मुखचंद्राला तुझी आई जिवंत असता पाहील तो दिवस व ती वेळ कधी येईल ? ॥ ८ ॥ हे वत्सा, बाबा, रघुपति, रघुवर, लाल, बाळ ! अशी हाक मारुन पुन्हा कधी हृदयाशी धरुन हर्षाने (तुझी) तनु निरखून पाहीन कां ? ॥ दो० ६८ ॥

स्नेह-सभीत बघुनि निज आई । विव्हळ भारी वचन न येई ॥
प्रबोधिती तिज राम परोपरि । स्नेह समयिंचा वर्णवेल तरि ? ॥
मग जानकि धरि सासुपदांतें । पहा अभागि परम मी माते ॥
सेवा समयिं दैव वनिं धाडि । करुनी भग्न मनोरथ गाडी ॥
त्यजा क्षोभ परि कृपा त्यजा ना । कर्म कठिण मम दोष जरा ना ॥
सासू व्याकुळ ऐकुनि वचनां । दशा कशापरिं वदवे वदना ॥
वारंवार हृदयिं तिज घेई । धैर्यें शिकवण आशिस देई ॥
सदा अचल सौभाग्य असो तव । गंगा-यमुना-जल वाहे जंव ॥

दो० :- सीते आशीर्वाद दे शिकवण सासू फार ॥
निघे नमुनि पदपद्मिं शिर प्रेमें अति बहुवार ॥ ६९ ॥

आपली आई स्नेहाने घाबरुन भारी व्याकुळ झाली आहे व मुखातून शब्द सुद्धा निघत नाही असे पाहून ॥ १ ॥ रामचंद्रांनी तिला परोपरीनी बोध केला. त्या समयीच्या स्नेहाचे वर्णन करता तरी येईल काय ? (अशक्य आहे) ॥ २ ॥ जानकीने मग सासूचे पाय धरले व म्हणाली की माते ! हे पहा की मी परम अभागी आहे ॥ ३ ॥ सेवेच्या काळी दैव वनात धाडीत आहे व माझ्या मनोरथरुपी गाडीचा चक्काचूर करुन टाकला आहे. ॥ ४ ॥ माझ्या विषयींचा क्षोभ सोडा, पण कृपा मात्र सोडू नका हो ! कारण कर्मच फार कठीण आहे, यात माझा मुळीच दोष नाही ॥ ५ ॥ (सीतेचे) भाषण ऐकून सासू व्याकुळ झाली या वेळच्या तिच्या दशेचे वर्णन मुखाने कशा प्रकारे करता येणार ! ॥ ६ ॥ सासूने तिला वारंवार हृदयाशी धरली व धैर्य धरुन तिला उपदेश केला व आशीर्वाद दिला ॥ ७ ॥ जोपर्यंत गंगा यमुनांचे जल वहात आहे तो पर्यंत तुझे सौभाग्य अचल असो ॥ ८ ॥ सासूने सीतेला पुष्कळ आशीर्वाद दिले व अनेक प्रकारे उपदेश केला सीतेने अति प्रेमाने पुष्कळ वेळा चरण कमलांना वंदन केले व ती निघाली ॥ दो० ६९ ॥

* * * * *

श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु

GO TOP