॥ श्रीरामचरितमानस ॥

(मराठी अनुवाद)

॥ बालकाण्ड ॥

अध्याय २२ वा

॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥


Download mp3

देव सकल गत निज निज धामा । भूसह मनिं पावति विश्रामा ॥
जें काहीं विधिचें आज्ञापन । हर्षित करिती विबुध विलंब न ॥
क्षितिवर वनचर देहां धरती । अतुलित बली प्रतापी बनती ॥
गिरितरु-नरव-आयुध सब वीर । हरिची वाट बघति मति धीर ॥
गिरिं-काननिं भरपूर निवसुनी । निज निज सेना रुचिर बनवुनी ॥
हें सब रुचिर चरित मी कथिलें । ऐका जें मध्येंच राखिलें ॥
रघुकुलमणि जे अयोध्यधिपति । नामें दशरथ विदित वेदिं अति ॥
धर्मधुरंधर गुणधी ज्ञानी । हृदयिं भक्ति मति शारंग्-पाणी ॥

दो० :- कौसल्यादी स्त्रिया प्रिय सब आचरण पुनीत ॥
पति-अनुकूला प्रेमदृढ हरिपदकमलिं विनीत ॥ १८८ ॥

सर्व देव आपापल्या स्थानी ( धामी ) गेले व भूमीसहित त्या सर्वांच्या मनाला विश्राम मिळाला ॥ १ ॥ विधीने जी कांही आज्ञा दिली ती देवांनी विलंब न लावता हर्षाने अमलात आणली ॥ २ ॥ त्यांनी पृथ्वीवर वन-चर देह धारण केले व ते सर्व अतुल बलवान व प्रतापी बनले ॥ ३ ॥ पर्वत, वृक्ष व नखे ही आयुधे असलेले ते वीर धीरमती हरीची वाट बघत ॥ ४ ॥ आपापले सैन्य चांगले तयार करून पर्वतात व अरण्यात पूर्ण भरुन राहीले ॥ ५ ॥ मी हे सर्व चरित्र सांगितले जे मध्येच सोडून दिले होते ते ऐका. ॥ ६ ॥ श्रीरामावतार व बाललीला प्रकरण - अयोध्या नगरीचे राजा, रघुकुल शिरोमणी जे दशरथ नावाचे होते ते वेदांमध्ये सुद्धा अती प्रसिद्ध आहेत.॥ ७ ॥ धर्म-धुरंधर, गुणसागर व ज्ञानी असून त्यांच्या हृदयात शारंगपाणी प्रभूची भक्ती होती व बुद्धी शारङ्‍गपाणीच्या ( राम = विष्णू ) ठायी रत होती. ॥ कौसल्यादि त्यांच्या सर्व स्त्रीया त्यांना प्रिय होत्या. त्यांचे सर्वांचे आचरण पवित्र होते, त्या पतीला अनुकूल होत्या, विशेष नम्र होत्या व त्यांचे पतीच्या ठिकाणी व हरीपदकमलांच्या ठिकाणी दृढप्रेम होते ॥ दो० १८८ ॥

एकवार भूपाल मना ही । ग्लानि होइ मजला सुत नाहीं ॥
त्वरें भूप गेले गुरु-भवनीं । पायिं पडुनि कृत परम विनवणी ॥
निज दुख सुख सब गुरुला सांगति । तैं वसिष्ठ विविधा समजावति ॥
धीर धरा होतिल सुत चारी । त्रिभुवन-विदित भक्त-भय-हारी ॥
शृंगी ऋषिला वसिष्ठ अणविति । पुत्रकाम शुभ यज्ञा करविति ॥
भक्ति सहित मुनि आहुति अर्पति । तदा अग्नि चरुपाणी प्रगटाति ॥
जें वसिष्ठ! हृदयीं अवधारित । कार्य सकल तें तुमचें साधित ॥
हें हवि वाटुनि दे नृप जाउनि । योग्य जसें ज्यां तसें विभागुनि ॥

दो० :- पावक होति अदृश्य तैं समजाउनि सभ्यांस ॥
परमानंदी मग्न नृप पुरे न मन हर्षास ॥ १८९ ॥

एकदा राजाच्या मनात ही ग्लानी उत्पन्न झाली की मला मुलगा नाही ॥ १ ॥ ते लगेच त्वरेने गुरुच्या घरी गेले व पायां पडून पुष्कळ विनवण्या केल्या ॥ २ ॥ व आपले सर्व सुख-दु:ख गुरुंना सांगितले, तेव्हा वसिष्ठांनी अनेक प्रकारे त्यांची समजूत घातली ॥ ३ ॥ ( वसिष्ठ म्हणाले ) जरा धीर धरा ( चार ) पुत्र होतील व ते चारी त्रिभुवनांत प्रसिद्ध होतील व आपल्या भक्तांचे भयहरण करणारे होतील ॥ ४ ॥ मग वसिष्ठांनी शृंगी ( ऋष्यशृंग ) ऋषीला आणवून त्यांच्याकडून पुत्रकामेष्टी हा शुभ यज्ञ करविला ॥ ५ ॥ मुनींनी भक्तीयुक्त अंत:करणाने आहुती अर्पण केल्या तेव्हा अग्निदेव हातात पायस घेऊन प्रगट झाले. ॥ ६ ॥ ( अग्नीदेव म्हणाले ) वसिष्ठा ! तुम्ही जे काही मनाशी ठरविले होते ते तुमचे सर्व कार्य सिद्ध झाले असे समजा ॥ ७ ॥ राजा ! हा हवि तू जाऊन ( राण्य़ांना ) ज्यांना जसे योग्य तसे विभागून दे. ॥ ८ ॥ ( असे सांगून ) मग सर्व सभासदांस समजावून अग्नि अदृश्य झाले. राजा परमानंदात मग्न झाला व त्याच्या हृदयात हर्ष मावेना ॥ दो० १८९ ॥

नृप तैं प्रिय नारीं बोलावत । कौसल्यादी आल्या चालत ॥
कौसल्येला अर्ध अर्पुनी । दोन भाग अर्ध्याचे करुनी ॥
एक कैकयिस नृप दे त्यांतुनि । मग उरलेला द्विधा विभागुनि ॥
कौसल्या-कैकयि करिं ठेवुनि । खूष सुमित्रा कृता देववुनि ॥
यापरि झाल्या सगर्भ नारी । हर्षिंत हृदयिं सुखावति भारीं ॥
जैं पासुनि गर्भा हरि आले । लोकिं सकल संपत् सुख झालें ॥
सकल विराजति मंदिरिं राणी । शोभा - शील - तेज - सत्खाणी ॥
कांहि काल जैं सुखयुत गेला । प्रगटाया प्रभु समय उदेला ॥

दो० :- लग्नवार तिथि योग सब ग्रहादीक अनुकूल ॥
सकल चराचर हर्षयुत रामजन्म सुखमूल ॥ १९० ॥

तेव्हा ( लगेच ) राजाने प्रिय नारींना बोलावले कौसल्यादि ( तिघी ) तिथे चालत आल्या. ॥ १ ॥ ( तेव्हा राजाने ) अर्धे पायस कौसल्येला दिले व राहीलेल्या अर्ध्याचे दोन भाग केले ॥ २ ॥ त्यातून एक भाग कैकयीला दिला व उरलेल्याचे पुन्हा दोन भाग करुन ॥ ३ ॥ ते कौसल्या व कैकेयी यांच्या हातावर ठेऊन सुमित्रेला देवविले व तिला प्रसन्न केले ॥ ४ ॥ या प्रमाणे तिन्ही राण्या गर्भवती झाल्या; त्यामुळे त्यांना फार उत्साह वाटू लागला व त्या हृदयात फार सुखी झाल्या ॥ ५ ॥ ज्यावेळी हरी गर्भात आले तेव्हा पासून सर्व लोकांत सुख व संपदा यांचा सुकाळ सुरु झाला ॥ ६ ॥ सर्व राण्या शोभा ( राम ) शील ( भरत ) व तेज ( ल. श. ) यांच्या सुंदर खाणी बघत मंदिरात पूर्ण प्रकाशमान झाल्या ॥ ७ ॥ असा काही काळ जेव्हा निघून गेला तेव्हा प्रभू प्रगट होण्याचा समय प्राप्त झाला ॥ ८ ॥ लग्न, वार, तिथी, योग ग्रह इत्यादि सर्व गोष्टी अनुकूल होत्या व सर्व स्थावर, जंगम सृष्टी हर्षित झाली; कारण रामजन्म सुखाचे मूळ आहे. ॥ दो० १९० ॥

नवमी तिथि मधु महिना पावन । शुक्ल पक्ष अभिजित् हरिभावन ॥
मध्य दिवस अति शीत न घाम । पावन काल लोक-विश्राम ॥
शीतल मंद सुगंधि गंधवह । सुरां हर्ष संतां उत्साह ॥
वन कुसुमित गिरि रत्‍नविभूषित । सरिता सकल सुधारस पूरित ॥
तो अवसर विरंचि जैं जाणे । निघति सकल सुर सजुनि विमानें ॥
गगन विमल संकुल सुरनिवहीं । गुण गाती गंधर्व सर्वही ॥
रचुनि रुचिर सुमनांजलि वर्षति । नभीं दुंदुभी दुम् दुम् गर्जति ॥
अहि मुनि सुर करती स्तवनातें । अर्पिति विविधा निज सेवा ते ॥

दो० :- सुरगण विनवुनि पोचले जेथें निज निज धाम ॥
जगनिवास प्रभु प्रगटे अखिल लोक-विश्राम ॥ १९१ ॥

नवमी तिथी होती, पवित्र चैत्र महिना होता, पवित्र असा शुक्ल पक्ष होता, व हरीला आवडणारा अभिजित मुहूर्त होता ॥ १ ॥ मध्यान्ह काळ, फार थंडी नाही, फार उन्हाळा नाही असा लोकांच्या विश्रांतीचा पावन काल होता. ॥ २ ॥ शीतल, मंद व सुगंधी असा वारा वाहू लागला, देवांना हर्ष झाला, संतांना उत्साह वाटू लागला ॥ ३ ॥ वने फुलली, डोंगर पर्वत रत्‍नांनी विभूषित दिसू लागले व सर्व नद्या अमृतासारख्या जलाने भरुन वाहू लागल्या. ॥ ४ ॥ तो समय जेव्हा विरंचीनी जाणला तेव्हा ते निघाले व सर्व देव ( ही आपापली ) विमाने शृंगारून निघाले ॥ ५ ॥ आकाश निर्मल आहे व ते सुरसमुहांनी भरून गेले. व सर्व गंधर्व ( प्रभूचे ) गुण गावू लागले. ॥ ६ ॥ ( त्या सर्वांनी ) पुष्पांजलिंची सुंदर रचना करून त्यांचा वर्षाव केला व आकाशात देवांच्या दुंदुभींचा दुमदुमाट सुरु झाला ॥ ७ ॥ नाग, मुनी व देव स्तुती करुन आपली अनेक प्रकारची भेट ( सेवा ) समर्पण करू लागले ॥ ८ ॥ ( याप्रमाणे ) सुरगणांनी प्रार्थना केली व जेथे आपापले स्थान होते तेथे ते पोचले व ( नंतर ) सर्व (ब्रह्मादि ) लोकांना विश्राम देणारे जगनिवास प्रभू प्रगटले ॥ दो० १९१ ॥

छं. :- ते प्रगट कृपालू दीन-दयालू कौसल्या-हितकारी ॥
मुद माते भारी मुनि-मन-हारी अद्‌भुतरूप विचारीं ॥
लोचनाभिरामा तनुघनशामा निज आयुध भुजचारी ।
भूषण वनमाला नयन विशाला शोभसिंधु खरारी ॥ १ ॥
कर जोडुन वदली, स्तुती आपली करूं अनंता कशि, ती ।
गुण-माया-ज्ञानातीत अमानहि वेद पुराणें कथिती ॥
करुणा-सुख-सागर सकलगुणागर वदति असें श्रुति संत ॥
तो मम हितलागीं जन-अनुरागी प्रगट इथें श्रीकान्त ॥ २ ॥
ब्रह्मांड निकाया निर्मित माया प्रति रोमीं ज्या वेद म्हणे ।
त्या मदुदर-वास वदत उपहासहि चलित धीरधी श्रवुनि बने ।
जैं ज्ञान उपजलें प्रभु मृदु हसले चरित विविध विध करुं बघती ॥
माते समजाविति सुकथे सांगति सुत वात्सल्या जशि धरि ती ॥ ३ ॥
मग माता बोले ती मति डोले त्यजा तात या रूपा ।
करिजे प्रियशीला अति, शिशुलीला अनुपम सुखद अमूपा ।
सुरपति करि रुदना ऐकुनि वचना सुज्ञ धरुनि शिशुरूपा ॥
य चरिता गाती हरिपदिं जाती ते न पडति भवकूपा ॥

दो० :- विप्र-धेनु-सुर-संत-हित धरिति मनुज-अवतार ॥
स्वेच्छेनें निर्मित तनू माया-गुण-गो-पार ॥ १९२ ॥

कौसल्याकृत (भरणी नक्षत्र) रामस्तुती
-- कृपाळू स्वभावानेच व दीनांवर दया करणारे ते प्रभू कौसल्येचे हित करण्यासाठी प्रगट झाले मुनींचे मन चोरुन घेणार्‍या त्या अदभूत रुपाचा विचार येताच मातेला भारी हर्ष झाला. नेत्रांना अभिराम असणारे, घनश्याम तनू असलेले (प्रभू) आपली आयुधे हातांनी फिरवित आहेत (चारी हातात आपली आयुधे धारण केली आहेत) अंगावर विविध भूषणे असलेले, वनमाला धारण केलेले, विशाल नयन असलेले व शोभेचे सागर असलेले असे ते खराचे शत्रु आहेत. ॥ छंद १ ॥ ती (कौसल्या) दोन्ही हात जोडून म्हणाली, की अनंता ! मी आपली स्तुती कशी करुं ? तुम्ही माया, तिचे त्रिगुण, ज्ञान (ज्ञानेंद्रिये-मन व बुद्धी) यांच्या अतीत आहांत व मानरहित (प्रमाणातीत) आहांत असे वेद-पुराणे म्हणतात, पण (तेच तुम्ही) करुणासागर व सुखसागर असून सकल गुणांचे आगर आहांत असे (श्रुती व संत) म्हणतात; आणि (तेच तुम्ही) श्रीकान्त - लक्ष्मीपती - भक्तप्रेमी असल्यामुळे माझ्या कल्याणासाठी येथे प्रगट झाला आहांत ॥ छंद २ ॥ ज्याच्या प्रत्येक रोमारोमात मायेने निर्मित अनेक ब्रह्मांड - निकाय - (समुदाय) आहेत असे वेद म्हणतात, त्याला माझ्या उदरात वास करावा लागला असे म्हणताच उपहास होतो; व हे ऐकून धीरधी सुद्धा भ्रान्त होतील असे ज्ञान जेव्हा उपजले तेव्हा प्रभूंनी स्मित केले कारण अनेक प्रकारची लीला (चरित्र) करण्याची त्यांची इच्छा आहे (म्हणून) सुकथा सांगून मातेला अशी समजावली की तिने पुत्रवात्सल्य धारण करावे ॥ ३ ॥ मग मातेची ती बुद्धी ढळली व ती बोलली की हे तात ! हे रुप टाकावे व अती प्रियशील अशा अनुपम सुख देणार्‍या पुष्कळ बाललीला कराव्यात देवांच्या सूज्ञ स्वामींनी ते वचन ऐकून शिशुरुप धरुन रडण्यास प्रारंभ केला हे चरित्र जे गातील ते हरिपदी जातील (किंवा) ते भवकूपात पडणार नाहीत (मुक्त होतील) ॥ छंद ४ ॥ विप्र, गाई, देव व संत याच्या हितासठी मनुज अवतार धारण केला माया, गुण व इंद्रिये यांच्या पार असलेले व स्वत:च्या इच्छेने निर्माण केलेले असे हे शरीर आहे. ॥ दो०१९२ ॥

प्रिय अति शिशुरुदनाला ऐकत । शीघ्र येति राण्यां सब चालत ॥
हर्षें धावति चहुं दिशिं दासी । मग्नानंदिं सकल पुरवासी ॥
पुत्रजनन दशरथास कळलें । ब्रह्मानंद-मग्न जणुं झाले ॥
प्रेमपरम मनिं पुलक वपूवरि । करुनि धीर मति बघे उठूं तरि ॥
नामहि शुभद जयाचें, श्रवणीं । तो प्रभु आला माझे भवनीं ॥
परमानंद-पूर्ण-मन राजा । वदे वाजवा विविधा बाजां ॥
बोलवुं वसिष्ठ गुरुल धाडति । द्विजांसहित नृपभवना ठाकति ॥
अनुपम बालक जाउन बघती । रुपराशि गुण वदत न सरती ॥

दो० :- श्राद्धा नांदीमुख करुनि जातकर्म संपादि ॥
नृप विप्रां दे दान मणि धेनु कनक वसनादि ॥ १९३ ॥

अत्यंत प्रिय असा तो शिशुरुदनाचा आवाज कानी पडताच सर्व राण्या घाई घाईने चालत तेथे आल्या ॥ १ ॥ दासी हर्षाने ( नगरात ) चारी दिशांस धावत सुटल्या व सगळे नगरवासी लोक आनंदात मग्न झाले ॥ २ ॥ पुत्र जन्मास आला हे कळताच दशरथ जणूं ब्रह्मानंदात बुडाले ॥ ३ ॥ मनांत अत्यंत प्रेम उत्पन्न झाले, शरीरावर रोमांच उभे राहीले तरी सुद्धा मती धीर करून उठण्याचा प्रयत्‍न करूं लागले ॥ ४ ॥ ज्याच्या नामाचे श्रवण सुद्धा मंगलदायक आहे तो प्रभू माझ्या घरी आला ! ॥ ५ ॥ ( असे स्मरण होताच ) दशरथ राजांचे मन परमानंदाने पूर्ण भरले व त्यांनी सांगीतले की विविध वाद्ये वाजवा ॥ ६ ॥ ( नंतर ) वसिष्ठ गुरुंना बोलावणे पाठवले ते ब्राह्मणांना घेऊन राजगृही आले ॥ ७ ॥ ( नंतर त्यांनी ) जाऊन त्या अनुपम बालकाचे दर्शन घेतले; तो ते केवळ लावण्याची राशीच दिसले व गुणांचे वर्णन करण्याने ते संपणार नाहीत ( असे वाटले ) ॥ ८ ॥ दशरथ राजांनी नान्दी श्राद्ध करुन जातकर्म संस्कार केला व विप्रांना रत्‍ने, गाई, सुवर्ण वस्त्रे इत्यादी दान दिले ॥ दो १९३ ॥

ध्वज केतन तोरणं पुर झाकिति । जाइ न वदलें शृंगारित किति ॥
सुमनवृष्टि गगनांतुनि सुटती । ब्रह्मानंदिं लोक सब बुडती ॥
मिळुनि नारी बहु वृंदें निघती । सहज साजयुत उठुनि धावती ॥
घट हाटक ताटीं शुभ भरती । मंगल गात राजगृहिं शिरती ॥
आरति करुनि वस्तु ओवाळति । पुनः पुन्हां शिशुचरणां प्रणमति ॥
मागध सूत बंदिगण गायक । गाती पावन गुण रघुनायक ॥
सर्वहि दान देति सर्वस्वहि । जे पावति ते राखिति त्या नहि ॥
मृगमद-कुंकुम-चंदन चिखलें । भरले मधें मधें पथ सगळे ॥

दो. :- गृहिं गृहिं उत्सव घोष शुभ प्रगटत सुषमाकंद ॥
जिथें तिथें सब हर्षयुत नगर-नारि-नरवृंद ॥ १९४ ॥

ध्वजा, पताका व तोरणे यांनी सर्व नगरी झाकून टाकली नगरी अशी शृंगारली गेली की त्याचे वर्णन शब्दांनी करता येणे शक्य नाही ॥ १ ॥ आकाशातून वारंवार पुष्पवृष्टी होऊं लागली व सर्व लोक ब्रह्मानंदात मग्न झाले ॥ २ ॥ सहजशृंगार केलेल्या स्त्रिया ( तशाच ) उठून धावत निघाल्या. पुष्कळ जणी एकत्र जमून थव्याथव्यानी ( राजवाड्याकडे ) चालल्या ॥ ३ ॥ सोन्याच्या ताटात सोन्याचे मंगल कलश ठेऊन व मंगल द्रव्ये भरून मंगल गीते गात गात राजवाड्यात शिरू लागल्या ॥ ४ ॥ ( सुतिकागृहाच्या दरवाज्याजवळ जाऊन ) आरती करून विविध वस्तू ओवाळून टाकून पुन:पुन्हा बालकाच्या चरणांस वंदन करू लागल्या ॥ ५ ॥ मागध सूत, बंदी, व गायक यांचे समुदाय रघुनायकाचे पावन गुण गावू लागले ॥ ६ ॥ सर्वांनीच सर्वस्वाचे दान दिले व ज्यांना ते मिळाले त्यांनी सुद्धा ते ठेवले नाही. ॥ ७ ॥ कस्तुरी, केशर व चंदन यांच्या चिखलाने सर्व मार्ग मधे - मधे भरून गेले ॥ ८ ॥ परमशोभेचे मुलस्थान प्रगट होताच घरोघरी मंगलोत्सवांचा गजर सुरु झाला व नगरातील स्त्री-पुरुषांचे थवेच्या थेवे जिथे तिथे हर्षित झालेले दिसूं लागले. ॥ दोहा १९४ ॥

कैकयि एक सुमित्रा तों द्वय । प्रसवे सुत सुंदर ते अतिशय ॥
त्या सुख संपत् समय् समाजा । वर्णुं न शकति गिरा अहिराजा ॥
अशी अयोध्या शोभित झाली । प्रभु-दर्शना निशा जणुं आली ॥
जणुं भानुस पाहुनि संकोचित । परि बनली संध्या किं यथोचित ॥
अगरु धूप बहु जणूं सम तमा । पसरे उडुनि गुलाल लालिमा ॥
मंदिर-मणीगण जणुं तारा अति । नृप-गृह-कळस किं पूर्ण निशापति ॥
वेदपाठ अतु मृदु जो भवनीं । जणुं मुखर किं पुरी उपवनीं ॥
कौतुक पाहुनि पतंग भुलला । एक मास त्या जात न कळला ॥

दो. :- होत मासदिन दिवस तो नुमजे मर्म कुणी हि ॥
रथ समेत रवि थबकला होई निशा कशी हि ॥ १९५ ॥

कैकयी एका पुत्रास प्रसवली तर सुमित्रा दोन पुत्रांस प्रसवती झाली व ते ही अतिशय सुंदर आहेत. ॥ १ ॥ त्यावेळचे सुख, संपत्ती, समय व समाज यांचे वर्णन शेष शारदा यांना सुद्धा करता येणार नाही . ॥ २ ॥ ( त्यावेळी ) अयोध्या अशी शोभू लागली की जणू प्रभूच्या दर्शनासाठी रात्रच आली आहे असे वाटले ॥ ३ ॥ तथापि जणू काय भानूला पाहून ती संकोचित झाली पण यथायोग्य प्रकारे संध्या बनली असे वाटले ॥ ४ ॥ अगरू व धूप यांचा आकाशात पसरणारा जो धूर तोच जणू रात्रीच्या अंधारासारखा होय. व जो गुलाल उडत होता तोच जणू सायंकाळी पसरणारा लाल, तांबूस वर्ण होय. ॥ ५ ॥ मंदिरावर ( कौसल्येच्या राजवाड्यावर ) जडलेल्या मण्यांचा जो समूह तेच जणू मोठाले तारे व राजाच्या घराचा जो कळस तोच जणूं पूर्णचंद्र होय. ॥ ६ ॥ घरात अती मृदु आवाजाने चालू असलेला जो वेदघोष तोच जणू नगररुपी उपवनात संध्यासमयी पक्ष्यांनी चालविलेला किलबिलाट होय ॥ ७ ॥ ते कौतुक पाहून सूर्य भुलुन गेला हे त्यास कळले सुद्धा नाही ॥ ८ ॥ तो दिवस महिन्याच्या ( तीस ) दिवसांचा झाला पण हे मर्म कोणीही जाणले नाही. ( तेवढा काळ ) सूर्य आपल्या रथासह थबकून राहीला त्यामूळे रात्र होणार कशी ? ॥ दो० १९५ ॥

हें रहस्य कळलें कोणा ना । दिनमणि निघे करत गुणगाना ॥
बघुनि महोत्सव सुरमुनि नागहि । जाति भवनिं वर्णित निज भागहि ॥
आणि एक सांगूं निज चोरी । श्रुणु गिरिजे तव दृढ मति भारी ॥
काक भुशुंडी मी दोघेजण । मनुजरूप, कोणि न जाणे पण ॥
प्रेम-परम-मोदें सुख फुलले । फिरतों मार्गिं मग्न मन भुललें ॥
हें शुभ चरित तयासच कळतें । ज्यावर रामकृपा जळ गळतें ॥
त्या अवसतिं जो जैसा आला । दिलें नृपें जें रुचलें त्याला ॥
गज रथ तुरग हेम गो हीरे । दिधलीं भूपें विविधा चीरें ॥

दो०. :- सर्वांचें मन तोषवी जो तो दे आशीस ॥
चिर जीवोतहि सकल सुत दास तुलसिचे ईश ॥ १९६ ॥

हे रहस्य कोणालाच कळले नाही व सूर्य प्रभुचे गुणगान करीत गेला ॥ १ ॥ ( पहिल्या दिवसाचा ) महोत्सव बघून सुर, मुनी आणि नाग आपापल्या भाग्याची प्रशंसा करीत आपापल्या स्थानी गेले ॥ २ ॥ गिरीजे, ऐक तुझी मती फार दृढ आहे म्हणून तुला आणखी एक स्वत:चीच गुप्त गोष्ट सांगतो, ऐक. ॥ ३ ॥ मी आणि काकभुशुंडी असे दोघेही मनुष्यरुप बनलो होतो पण आम्हालाही कोणी ओळखले नाही ॥ ४ ॥ परमानंदाने प्रेमाने व सुखाने फुलुन गेलेले आम्ही दोघे अयोध्येच्या रस्त्यात फिरत आहोत व मन मग्न होऊन भुलून गेले आहे ॥ ५ ॥ ज्याच्यावर रामकृपाजलाची वृष्टी होते त्यालाच हे शुभ चरित्र कळते ॥ ६ ॥ त्यावेळी जो जसा आला त्याला राजाने जे ज्यास पाहीजे होते ते त्यास दिले ॥ ७ ॥ हत्ती, रथ, घोडे, सुवर्ण, भूमी, धेनू, हिरे इत्यादी वस्तू व नाना प्रकारची वस्त्रे राजाने दिली ॥ ८ ॥ राजाने सर्वांचेच, मन संतुष्ट केल्याने जो तो ( अंत:करण पूर्वक ) आशीर्वाद देऊ लागला की तुलसीदासांचे ईश – हे सर्व राजपुत्र चिरंजीव होवोत. ॥ दो० १९६ ॥

कांहीं दिन या प्रकारिं पळले । दिवस रात्र जाती ना कळलें ॥
नामकरण-अवसरास जाणुनि । बोलाविलें नृपें ज्ञानी मुनि ॥
पूजुनि भूप म्हणे मुनि-देवा । मनिं निर्धारित नांवें ठेवा ॥
यांचीं नांवें अनेक अनुपम । मी वदेन नृप! यथा बुद्धि मम ॥
जो आनंद-सिंधु सुखरासी । त्रिजगी पावे लवें सुखासी ॥
तो सुखधाम राम तन्नाम । सब लोकां दायक विश्राम ॥
जो ही विश्व-भरण-पोषण करि । नाम तयाचें भरत जाण तरि ॥
यत्स्मरणें रिपु नाश पावतो । श्रुति-विश्रुत शत्रुघ्न-नाम् तो ॥

दो० :- लक्षण-धाम राम प्रिय सकल जगा आधार ॥
त्या गुरु वसिष्ठ ठेवी लक्षण नाम उदार ॥ १९७ ॥

या प्रमाणे काही दिवस केव्हाच निघून गेले, दिवस व रात्री केव्हा आल्या गेल्या हे कोणास कळले सुद्धा नाही. ॥ १ ॥ नामकरणाची वेळ आहे असे जाणून राजाने ज्ञानी मुनीस बोलाविले ॥ २ ॥ (वसिष्ठ मुनींची) पूजा करून राजाधिराज म्हणाले, मुनिश्रेष्ठ आपण मनात ठरविली असतील ती नांवे ठेवावीत ॥ ३ ॥ (कौसल्येच्या मांडिवरील पुत्राकडे पहात वसिष्ठ म्हणाले) राजा ! यांची अनेक (अनंत) नामे आहेत व ती सर्व उपमारहित आहेत (तरीपण) मी आपल्या बुद्धीनुसार सांगेन ॥ ४ ॥ जो आनंदाचा सागर आहे, सुखाची रास आहे व ज्याच्या आनंदाच्या लेशाने त्रैलोक्य सुखी होते ॥ ५ ॥ व जो सर्व सुखाचे माहेरघर असून सर्व लोकांना विश्राम देणारा आहे त्याचे नांव ‘राम’ असे आहे. ॥ ६ ॥ विश्वाचे भरण – पोषण जो करतो त्यालाच ‘भरत’ त्याचे नाम असे जाणावे ॥ ७ ॥ ज्याच्या स्मरणाने शत्रुनाश होतो तो वेदविदित ‘शत्रुघ्न’ समजावा ॥ ८ ॥ सर्व शुभ लक्षणांचे धाम, रामप्रिय असलेला व सर्व जगाचा आधार असणारा जो त्याचे ‘लक्ष्मण’ असे उदार नाव गुरु वसिष्ठांनी ठेवले ॥ दो० १९७ ॥

ठेविति नांवें गुरु सुविचारीं । वेद तत्त्व नृप! तव सुत चारी ॥
मुनि-धन्, जन सर्वस्व शंभु असु । ते सुख मानिति बालकेलि रसु ॥
जाणुनि निज हितपति आशिशुपण । रामचरणरत झाले लक्ष्मण ॥
भरत शत्रुहा दोनी भ्रात्यां । प्रभुसेवकशी प्रीती स्तुत्या ॥
श्याम गौर सुंदर युग्में तीं । निरखति जननी दृष्ट काढती ॥
शील-रूप-गुण-धामहि चारी । तदपि राम सुखसागर भारी ॥
इंदु अनुग्रह हृदीं प्रकाशे । सुचविति किरण मनोहर हासें ॥
वर पर्यंकिं अंकिं कधिं अंबा । गोंजारी अति छकुल्या! प्रिय बा ॥

दो :- बह्म निरंजन अगुण अज व्यापक विगत विनोद ॥
तो कौसल्ये-अंकिं दे प्रेमभक्ति-वश मोद ॥ १९८ ॥

अध्यात्मदृष्ट्या अर्थ - अवतार --> परब्रह्म = राम (नर), विष्णू = भरत, मृत्युंजय । शंकर = शत्रुघ्न, नारायण = लक्ष्मण. अवतार  नारायण विष्णू = राम, पांचजन्य शंख = भरत, सुदर्शन चक्र = शत्रुघ्न, शेष = लक्ष्मण.
राम - तुरिया --> सीतेची साक्षी
भरत - प्राज्ञ --> सुषुप्ती (मांडवी)
शत्रुग्न – तैजस --> श्रुतकीर्ती (स्वप्नावस्था)
लक्श्मण – विस्व --> उर्मला (जागृतावस्था)
याप्रमाणे गुरुंनी सुविचारपूर्वक नावे ठेवली ( व म्हणाले ) नृपा ! तुमचे चारी पुत्र वेदतत्वे होत. ॥ १ ॥ जे मुनींचे धन, भक्त – सेवकांचे सर्वस्व, शिवाचे प्राण – अशा ( चौघांनी ) बाललीला करण्यात सुख मानले ॥ २ ॥ राम आपले हितकर्ते स्वामी आहेत हे जाणून अगदी बालपणापासून लक्ष्मण रामचरणरत झाले ॥ ३ ॥ भरत व शत्रुघ्न दोघां भावामध्ये स्वामी – सेवक भावाप्रमाणे स्तुत्य अशी प्रीती जडली ॥ ४ ॥ श्याम व गौर वर्णाच्या त्या दोन सुंदर जोड्यांकडे निरखून पाहीले की माता त्यांची दृष्ट काढत असे ॥ ५ ॥ चारी भाऊ शील, रुप व गुण यांचे माहेरघर आहेत, तथापि राम भारी ( सर्वात ) सुखसागर आहेत. ॥ ६ ॥ त्यांच्या हृदयात अनुग्रह (कृपा) रुपी चंद्र पूर्ण प्रकाशमान झाला आहे हे मनोहर हास्य रुपी किरणांनी सुचविले जात आहे ॥ ७ ॥ कौसल्या माता कधी सुंदर पाळण्यात तर कधी मांडिवर ठेऊन (घेऊन) लाडुल्या, छकुल्या, लडिवाळा इत्यादि म्हणत त्यास आंजारित – गोंजारित लाड करीत असे ॥ ८ ॥ जे ब्रह्म जो परमात्मा व्यापक मायादिमल रहित, गुणातीत, जन्मरहित व क्रीडा – विनोद विरहित आहे तोच प्रेमभक्तीला वश होऊन कौसल्येच्या मांडिवर तिला मोद – सुख – आनंद देत आहे. ॥ दो० १९८ ॥

* * * * *

श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु

GO TOP