॥ श्रीरामचरितमानस ॥

(मराठी अनुवाद)

॥ बालकाण्ड ॥

अध्याय ३६ वा

॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥


Download mp3

करति आरती पुनः पुन्हां ही । प्रेमा प्रमोद वदवत नाहीं ॥
भूषण मणि पट नाना जाती । ओवाळति विविधा नहिं गणती ॥
वधूं सहित निरखुन् सूत चारी । परमानन्द मग्न नृप-नारी ॥
सिता-राम-छवि घडिघडि बघती । मुदित, सफल जगिं जीवनगणती ॥
सखि सीतामुख घडिघडि पाहुनि । गान करिति निज पुण्यावानुनि ॥
क्षणा क्षणा सुर सुमन वर्षती । गाति नाचती भेट अर्पती ॥
बघुनि मनोहर जोडे चारी । शोधि शारदा उपमागारीं ॥
देतां ये ना अति लघु लागत । टकमक राही प्रेमें पाहत ॥

दो० :- निगम-नीति कुलरीतिं कृत अर्घ्य पायघडि देत ॥
ओवाळुनि सह वधूं सुत भवनीं घेउनि येत ॥ ३४९ ॥

( माता ) पुन:पुन्हा आरती ओवाळूं लागल्या कारण प्रेम व प्रमोद इतका वाढला आहे की त्याचे वर्णन करणे शक्य नाही ॥ १ ॥ भुषणे, रत्ने, वस्त्रे इत्यादी नाना जातीचे विविध अगणित पदार्थ ओवाळून टाकित आहेत ॥ २ ॥ व चारी पुत्रांना त्यांच्या वधूसहित निरखून पाहून सर्व राण्या परमानंदात मग्न झाल्या आहेत ॥ ३ ॥ सीता व राम यांच्या रुपाकडे पाहून पुन:पुन्हा मुदित होत आहेत व जगातील आपले जीवन सफल झाले असे त्यास वाटत आहे ॥ ४ ॥ ( राण्यांच्या ) सखी वारंवार सीतेचे मुख पाहून आपल्या पुण्याची थोरवी वाखाणीत - गान करीत आहेत ॥ ५ ॥ देव क्षणाक्षणाला फुलांचा वर्षाव करुन नृत्य व गान करीत आपली भेट अर्पण करीत आहेत ॥ ६ ॥ चारी मनोहर जोडपी पाहून शारदेने उपमांच्या आगारात उपमा शोधल्या ॥ ७ ॥ पण एकही उपमा देता येईना कारण त्या अतिक्षुद्र वाटल्या तेव्हा आश्चर्य प्रेमाने पाहातच राहीली ( त्यांच्याकडे ) ॥ ८ ॥ औक्षणादी करुन वेदविधी व कुलरीती केल्या आणि पायघड्या व अर्घ्य घालीत सर्व माता वधूंसहित पुत्रांना राजवाड्यात घेऊन गेल्या ॥ दो० ३४९ ॥

चार सहज सुंदर सिंहासन । जणूं मनोजें निर्मित आपण ॥
बसवुनि कुमरि कुमारां त्यांवर । प्रक्षालित पद पावन सादर ॥
धूप दीप नैवेद्य वेद-विधिं । पूजित वर सवधू मंगलनिधि ॥
पुनः पुन्हां आरति ओवाळति । व्यजन चारु चामर शिरिं ढाळति ॥
वस्तु अमित ओवाळुन टाकति । मोद-मग्न माता सब शोभति ॥
परम तत्त्व जणुं पावे योगी । लभत अमृत जणुं संतत रोगी ॥
जन्मरंक जणुं परीस पावत । जणुं जन्मांध सुलोचन लाभत ॥
मूक वदनिं शारदें वसावें । जणूं शूर समरीं जय पावे ॥

दो० :- या सौख्या शत-कोटिपट मातांनां आनंद ॥
बंधू्सह परिणीत घरिं आले रघुकुलचंद ॥ रा ॥
लोकरीति जननी करिति वरवधु संकुचतात ॥
पाहुन मोद विनोद अति सस्मित राम मनांत ॥ ३५०म ॥

सहज सुंदर अशी चार सिंहासने मांडलेली असून ती जणू मदनाने आपल्या हातांनी बनविली आहेत ॥ १ ॥ त्यावर कुमारी व कुमारांना बसवून मातांनी त्याचे पावन पाय आदराने धुतले ॥ २ ॥ ( आणि ) देवविधी प्रमाणे मंगलनिधान वरांचे त्यांच्या वधूसह धूप, दीप, नैवद्य वगैरे उपचारांनी पूजन केले ॥ ३ ॥ पुन:पुन्हा आरत्या ओवाळल्या व त्यांच्या मस्तकांवर सुंदर पंखे व सुंदर चवर्‍या ढाळल्या ॥ ४ ॥ ( मग ) अगणित, अपार वस्तु त्यांच्यावरुन ओवाळून टाकल्या गेल्या व सर्व माता मग्न होऊन शोभू लागल्या ॥ ५ ॥ योग्याला जणू परम तत्वाचा लाभ व्हावा, संतत रोग्याला जणूं अमृत लाभावे ॥ ६ ॥ मुक्याच्या जिव्हेवर जणू शारदेने निवास करावा व जणूं शूराला युद्धात जय मिळावा ॥ ८ ॥ वरील सहाही जणांच्या सुखाच्या शतकोटीपट मातांना आनंद झाला कारण रघुकुलचंद्र बंधूसह विवाहित होऊन घरी आले ॥ दो० ३५० रा ॥ जननी लोकरीती रिवाज करु लागल्या तेव्हा वर व वधू यांना संकोच वाटू लागला. लोकरीतीतील थट्टा व विनोद यामुळे मातांना होणारा आनंद पाहून राम मनातल्या मनात स्मित करते झाले ॥ दो० ३५० म ॥

करिति सुविधिं सुर पितरपूजना । पुरतां सकलहि मनोवासना ॥
त्यां वंदुनि मागति वरदाना । बंधूं सहित राम-कल्याणा ॥
अंतर्हित सुर आशिस देती । मोदें माता पदरीं घेती ॥
नृप वर्‍हाडि बोलावुनि घेती । यान वसन मणि भूषण देती ॥
आज्ञा मिळे, ध्यात हृदिं रामा । मुदित जाति सब निज निजधामा ॥
पुर-नर-नारिंस अहेर दिधले । घरिं घरिं उत्सव-घोष चालले ॥
याचक जन जें जें ही मागति । प्रमुदित भूप देति तें त्यांप्रति ॥
सेवक सब वाजंत्री नाना । केले तुष्ट दान-सन्मानां ॥

दो० :- जोहारुनि आशीर्वचन देति गाति कीर्तीस ॥
तै गुरु भूसूर-युत गृहीं गमन करिति नृपतीश ॥ ३५१ ॥

मनातील सर्व इच्छा पूर्ण झाल्यामुळे मातांनी देव व पितर यांचे पूजन यथाविधि उत्तम प्रकारे केले ॥ १ ॥ त्या सर्वांना वंदन करुन भावासहित रामाचे कल्याण व्हावे हे वरदान मागितले ॥ २ ॥ देवांनी गुप्त राहून आशीर्वाद दिले व ते मातांनी आनंदाने पदरात घेतले ॥ ३ ॥ ( राजवाड्यात प्रवेश केल्यावर ) दशरथ राजांनी सर्व वर्‍हाड्यांना बोलावून घेतले व वाहने, वस्त्रे, भूषणे व रत्ने इत्यादि आहेर त्यांना दिले ॥ ४ ॥ आज्ञा मिळताच ते सर्व लोक रामाचे ध्यान करीत आनंदाने आपापल्या घरी गेले ॥ ५ ॥ ( त्यानंतर ) नगरातील स्त्रिया व पुरुष ( वरातीबरोबर राजवाड्यात आलेले ) त्या सर्वांना आहेर दिले. ( ती सर्व मंडळी घरोघरी परत गेली ) व त्यांनी आपापल्या घरी अभिनंदन उत्सव सुरु केले व तेथे घरोघरी वाद्ये वाजू लागली ॥ ६ ॥ याचकांनी जे जे काही मागीतले ते ते त्यास मोठ्या आनंदाने दशरथ राजांनी दिले ॥ ७ ॥ सगळे सेवक व सर्व प्रकारचे वाजंत्री यांना देणग्या व सन्मान ( शाबासकी ) देऊन तृप्त केले ॥ ८ ॥ ते सर्व जोहार करुन आशीर्वाद देऊ लागले व दशरथांची कीर्ती गावू लागेल. तेव्हा नृपश्रेष्ठ दशरथांनी गुरु आणि ब्राह्मण यांच्यासह घरात - अंत:पुरात प्रवेश केला ॥ दो० ३५१ ॥

जसें वसिष्ठ मुनी आज्ञापिति । लोक-वेद-विधि सादर साधिति ॥
राण्या भूसुरगर्दी पाहुनि । सादर उठति भाग्य अति जाणुनि ॥
क्षालुनि चरणां स्नान घालविति । भूप पूजुनी भोजन वाढिति ॥
प्रेम-दान-आदर परिपोषित । आशिस देत जाति संतोषित ॥
बहुविध केली कौशिक-पूजा । नाथ ! धन्य मजसा ना दूजा ॥
किती प्रशंसा भूपति करिति । सपत्‍नीक पदरज शिरिं धरिती ॥
दिला वास वर निजगृहिं जाणुनि- । सेवूं राण्यांसह मन पाहुनि ॥
मग गुरुपद-पंकजां पूजती । प्रीति न थोडी मनीं, विनवती ॥

दो० :- वधू समेत कुमार सब राण्यांसहित महीश ॥
घडिघडि वंदिति गुरुपदां देति अशीस मुनीश ॥ ३५२ ॥

वसिष्ठ मुनींनी जशी आज्ञा दिली त्याप्रमाणे लोकरीती व वेदविधी दशरथांनी आदराने उरकले ॥ १ ॥ भूसुरांची बरीच गर्दी राजाबरोबर आलेली पाहून सर्व राण्या आपले अत्यंत भाग्य समजून उठल्या व सर्व ब्राह्मणांचे पाय धुऊन त्यास स्नान घालविले, नंतर दशरथांनी सर्वांचे पूजन करुन त्यास भोजन घातले ॥ ३ ॥ प्रेम आदर व दान यांनी परिपुष्ट केलेले ते ब्राह्मण संतुष्ट होऊन आशीर्वाद देत गेले ॥ ४ ॥ दशरथांनी कौशिक मुनींची नाना प्रकारे प्रार्थना = पूजा केली व म्हणाले की नाथ ! माझ्या सारखा धन्य दुसरा नाही ॥ ५ ॥ भूपतीने विश्वामित्रांची कितीतरी प्रशंसा केली व त्यांच्या पायाची धूळ राण्यांसहित मस्तकावर धारण केली ॥ ६ ॥ स्वत:च्या घरातच त्यास उत्तम निवासस्थान दिले हेतू हा की राण्य़ांना व स्वत:स त्यांच्या मनातील हेतू जाणून सेवा करता यावी ॥ ७ ॥ मग गुरु वसिष्ठांच्या चरणकमलांची पूजा केली व प्रार्थना केली ती अपार प्रीतीने ! ॥ ८ ॥ मग वधूंसहित सर्व कुमारांनी व राण्यांसहित राजाने गुरुचरणांना वारंवार वंदन केले व मुनीश्वर वसिष्ठांनी आशीर्वाद दिले ॥ दो० ३५२ ॥

विनति करिति नृप अति अनुरागुनि । पुढतिं संपदा सब सुत ठेवुनि ॥
मुनिवर हक्क मागुनी घेती । बहुविध आशीर्वादां देती ॥
हृदयीं राखुनि सीतारामां । हर्षें गुरु गेले निजधामा ॥
विप्रवधूंना भूप आणविति । भूषण चीरें चारु देवविति ॥
सुवासिनिंस बोलावुनि घेती । रुचि-अनुरूप महीपति देती ॥
उचित मानकरि मागुन घेती । रुचि अनुरुप महीपति देती ॥
प्रिय पाहुणे पूज्य जे गमले । नृपें यथोचित त्यां आदरले ॥
विबुध बघुनि रघुवीर-विवाहा । सुम वर्षुनी स्तवुनि उत्साहा ॥

दो० :- पिटुनि नगारे निघति सुर निज निज पुरिं, सुखपूर्ण ॥
वदत परस्पर रामयश प्रेमा हृदय अपूर्ण ॥ ३५३ ॥

आपली सर्व संपत्ती व सर्व पुत्र यांना पुढे ठेऊन दशरथ राजांनी अनुरागयुक्त अंत:करणाने प्रेमाने प्रार्थना केली ॥ १ ॥ मुनीश्रेष्ठांनी आपल्या हक्काचे तेवढेच मागून घेतले व विविध प्रकारे आशिर्वाद दिले ॥ २ ॥ ( आणि ) सीता व राम यांस हृदयात ठेऊन गुरु हर्षाने आपल्या घरी गेले ॥ ३ ॥ राजाने ब्राह्मणांच्या सर्व स्त्रियांना आणविल्या व त्यांना सुंदर वस्त्रे, अलंकार इ. देवविले ॥ ४ ॥ ( मग ) सुवासिनींना ( क्षत्रियांच्या व स्वगोत्रातील ) बोलावून घेऊन त्यांना त्यांच्या रुची प्रमाणे वस्त्रे, भूषणे देवविली ॥ ५ ॥ जे योग्य वाटले ते मानकर्‍यांनी मागितले व त्यांच्या त्यांच्या इच्छेप्रमाणे राजाने त्यांना दिले ॥ ६ ॥ प्रिय पाहुणे मंडळीत जे पूजनीय वाटले त्यांचा राजाने यथोचित सन्मान केला ॥ ७ ॥ रघुवीर विवाह पाहून, पुष्पवृष्टी करुन उत्साहाची ( उत्सवाची ) प्रशंसा करत व नगारे पिटून देव सुखपूर्ण हृदयाने आपापल्या पुरीस जाण्य़ास निघाले जाताना ते एकमेकांस रामयश वर्णन करुन सांगत आहेत व त्यांचे हृदय प्रेमाला अपुरे पडू लागले आहे. ( प्रेम हृदयात मावत नाही ) ॥ ८ ॥ व ॥ दो० ३५३ ॥

सर्वपरीं सन्मानुनि सकलां । परमोत्साह भूपमनिं भरला ॥
राणीवसा तिथें मग शिरती । सह नववधू कुमारां बघती ॥
घेति मांडिवर समोद जेव्हां । वदवे कुणा किती सुख तेव्हां ॥
प्रेमें वधूंस अंकीं बसविति । घडिघडि हर्षित लाड चालविति ॥
बघुनि सोहळा मुद अंतःपुरिं । सकल-हृदयिं आनंद वास करिं ॥
होई विवाह कसा नृप वदती । श्रवुनि सर्व हृदिं हर्षा भरती ॥
जनक राज गुण-सुशील महती । प्रीति रीति शोभन संपत्ती ॥
भूप भाटसे विविधा वर्णिति । करणी, राण्या प्रमुदित परिसति ॥

दो० :- स्नान स-सुत नृप करुनि गुरु विप्र, आणविति जाति ॥
बहुपरिं करतां भोजना पंच घडी गत राति ॥ ३५४ ॥

सर्वांचा सर्व प्रकारे सन्मान केल्यावर राजाच्या मनात परम उत्साह भरला ॥ १ ॥ मग जिथे ( कौसल्येच्या महालात ) सर्व राण्या होत्या तेथे दशरथ शिरले व नववधूंसहित कुमारांना त्यांनी पाहीले ॥ २ ॥ ( मग ) जेव्हा कुमारांना आपल्या मांडीवर घेतले तेव्हा दशरथांस किती सुख झाले हे कोण वर्णन करुं शकणार ? ॥ ३ ॥ मग प्रेमाने वधूंना मांडीवर बसविल्या व हर्षाने वारंवार त्याचे लाड करुं लागले ॥ ४ ॥ हा सोहळा पाहून अंत:पुरात आनंद भरला, आनंदाने सर्वांच्या हृदयात निवासच केला ॥ ५ ॥ विवाह कसा झाला ते राजाने सविस्तर वर्णन करून सांगितले, ती हकीकत ऐकता ऐकता सर्वांच्या हृदयात आनंदाला भरती आली ॥ ६ ॥ दशरथ राजाने जनकराजाचे गुण, शील, मोठेपणा, प्रीतीरीती ( वागणूक - व्यवहार ) व सुंदर संपत्ती यांचे वर्णन एखाद्या भाटाप्रमाणे केले, ती जनकाची करणी राण्यांनी अति आनंदाने श्रवण केली ॥ ७-८ ॥ नंतर राजाने पुत्रांसह स्नान केले व गुरू, ब्राह्मण व आपले ज्ञातीबांधव यांना बोलावून आणून विविध प्रकारांचे भोजन केले तो पाच घटका रात्र संपली ॥ दो० ३५४ ॥

मंगल-गान करिति वर भामिनि । ही सुखमूल मनोहर यामिनि ॥
विडे सकल आचवतां पावति । स्रक् सुगंध भूषित छवि शोभति ॥
रामा निरखुन, आज्ञा घेती । शिर नमुनी जाती स्वनिकेतीं ॥
प्रेमा प्रमुद विनोद महत्ता । सुसमय समाज सुमनोहरता ॥
वर्णवे न शत वाणी-शेषां । वेद विरंचि महेश गणेशां ॥
मग मी वर्णूं तरी कशापरि । भूमि-नाग कीं शिरीं धरा धरि ॥
नृप सर्वां देउनि बहुमाना । मृदुवचनें बोलवि राण्यांना ॥
वधू बालिका आल्या पर-घरिं । पक्ष्म लोचना तशा जपा तरि ॥

दो० :- श्रान्त तनय निद्रावश जाउन् निजवा त्यांस ॥
सांगुनि गत विश्राम गृहिं ध्यात रामचरणांस ॥ ३५५ ॥

( पुरुष जेवीत असता ) सुंदर श्रेष्ठ स्त्रिया ( राण्या ) मंगलगान करीत आहेत व ( आजची ) ही रात्र सुखाचे मूळ व मनोहर झाली आहे ॥ १ ॥ सर्व मंडळी आचवल्यावर त्यांना विडे मिळाले, पुष्पहार, अत्तर, गुलाब इ. सुगंधी द्रव्यांनी विभूषित झाल्याने रुप फारच शोभू लागले ॥ २ ॥ सर्वांनी रामचंद्रास निरखून पाहीले आणि दशरथांची आज्ञा ( निरोप ) घेऊन नमस्कार करुन मंडळी आपापल्या घरी परत गेली ॥ ३ ॥ प्रेम, प्रमोद, विनोद मोठेपणा सुसमय समाज व अति मनोहरता यांचे वर्णन शेकडो शारदा व शेकडो शेष, सर्ववेद, विरंची, महादेव व गणेश यांना सुद्धा करता येत नाही ॥ ४-५ ॥ मग मी यांचे वर्णन कशा प्रकारे करु शकेन ? गांडूळाने ( भूमीनाग ) कधी आपल्या मस्तकावर पृथ्वी धारण केली आहे काय ? कधीच नाही ॥६ ॥ ( जेवावयास आलेल्या ) सर्वांचा आदर सत्कार राजाने मृदु वचनांनी केला व गोड शब्दांनी राण्यांना जवळ बोलावल्या ॥ ७ ॥ सुना अगदी लहान मुली असून परघरी आल्या आहेत, तरी डोळ्यांच्या पापण्या जशा जपतात तशा त्यांना जपा ( बरं ! ) ॥ ८ ॥ मुलगे सुद्धा दमले भागलेले असून झोपेला आलेले दिसतात, तरी जाऊन त्यांना लवकर निजवा बरं ! असे सांगून रामचरणांचे ध्यान करीत दशरथ आपल्या शयनागारात झोपावयास गेले ॥ दो० ३५५ ॥

सुंदर सहज भूप वच ऐकुनि । जडित कनकमणि पलंग घालुनि ॥
सुभग सुरभि-पय-फेन-समाना । कोमल रुचिर चादरी नाना ॥
तक्के सुंदर घडे न वर्णन । स्रक्-सुगंध मणि-मंदिरिं शोभन ॥
रत्‍नदीप अति चारु चांदवे । जाणे जो पाही, न सांगवे ॥
शेज रचुनि रुचि रामा उठविति । प्रेमानें मग पलंगिं निजविति ॥
कितिदां बंधूंनां आज्ञापित । ते मग निज निज शेजे निद्रित ॥
श्याम मंजु मृदु गात्रा बघती । प्रेमें सर्वहि माता म्हणति ॥
जातां मार्गीं महाभयंकर । हत कशि बाळ ! ताडका दुर्धर ॥

दो० :- घोर निशाचर बिकट भट समरिं न गणति कुणास ॥
कसे -ससेना मारिले मारिच सुभुज खलांस ॥ ३५६ ॥

दशरथ राजाचे सहज सुंदर वचन ऐकून ( राण्यांनी ) सहज सुंदर सोन्याचे रत्नजडित पलंग घातले ॥ १ ॥ सुंदर व गाईच्या दुधावरील फेसासारख्या कोमल, उज्वल व रम्य विविध गाद्या व चादरी घातल्या ॥ २ ॥ तक्के, उशा, गिर्द्या इतक्या सुंदर आहेत की बोलता सोय नाही. सुंदर मणिमंदिरात पुष्पहार विविध सुंगधी पदार्थ व रत्‍नदीप असून वर अति रमणीय चांदवे लावले आहेत, जो पाहील तो जाणू शकतो पण त्यालाही ती शोभा सांगता येत नाही. ॥ ४ ॥ सुंदर शय्या ( शेज ) रचून मातांनी रामचंद्रास उठविले व नेऊन पलंगावर प्रेमाने निजविले. ॥ ५ ॥ बंधूंना कितीतरी वेळा आज्ञा दिली तेव्हा ते आपापल्या शेजेवर जाऊन झोपले ॥ ६ ॥ मातांनी रामाच्या श्यामल, कोमल, व सुंदर शरीराकडे पाहीले व त्या सर्व प्रेमाने म्हणाल्या की बाळा ! तू मार्गाने जात असता ती महाभयंकर दुर्धर त्राटका मारली तरी कशी बाबा ( या कोवळ्या हातांनी ! ) ॥ ७-८ ॥ आधीच घोर निशाचर, त्यातही अक्राळ-विक्राळ वीर, आणि त्यातही स्वभावाने दुष्ट असल्यामुळे जे युद्धात कोणालाही जुमानीत नसत त्या मारीच सुबाहुंना त्याच्या सैन्यासह मारले तरी कसे ( या कोवळ्या लुसलुशीत गोंडस हातांनी ? ) ॥ दो० ३५६ ॥

धन्य ! मुनिकृपें तुमचीं सारीं । बाळ ! संकटें ईश निवारी ॥
दोघांनी कृत मुनि-मख-रक्षण । प्राप्त गुरुकृपें विद्या तत्क्षण ॥
मुनि-वधु तरे चरणरजलागुनि । कीर्ति राहिली विश्वा व्यापुनि ॥
कमठ-पाठ-पवि-कूट-कठोर । भग्न भूपगणिं भवधनु घोर ॥
विश्व विजययश जानकि पावुनि । आलां भवना बंधु विवाहुनि ॥
अति मानुष तव कर्मे सगळीं । केवळ कौशिक-कृपेंच घडलीं ॥
आज सुफल जगिं जन्म आमचें । तात ! बघुनि विधुवदना तुमचें ॥
तुम्हां न बघतां गेले दिन जे । गणो विरंचि न जीवनिं गत ते ॥

दो० :- राम वदुनि वर नम्र वच तोषवती मातांस ॥
स्मरत शंभु-गुरु-विप्र-पद डोळा लागे त्यांस ॥ ३५७ ॥

बाळ ! मी धन्य झाले की मुनीकृपेने ईश्वराने तुमच्यावरची सर्व संकटे निवारण केली ॥ १ ॥ तुम्ही दोघांनी मुनींच्या यज्ञाचे रक्षण केलेत व गुरुकृपेने ताबडतोब सर्व विद्या प्राप्त झाल्या ॥ २ ॥ पायांची नुसती धूळ लागून मुनीपत्‍नी तरुन गेली आणि तुमची कीर्ती विश्वाला व्यापून राहीली. ॥ ३ ॥ भगवान कूर्माची पाठ, वज्र व पर्वत यांच्या पेक्षाही कठोर व घोर असे शिवधनुष्य भूपसमूहात मोडले. ॥ ४ ॥ आणि विश्वविजयाचे यश व जानकी मिळवून भावांचे विवाह उरकून घरी ( सुखरुप ) आलांत ॥ ५ ॥ तुमची ही सर्व कर्मे मनुष्य शक्तीच्या पलिकडील आहेत ती केवळ कौशिक मुनींच्या कृपेनेच घडली. ॥ ६ ॥ बाळा ! तुझे चंद्रमुख पाहून आज या जगात आमचे जन्म सुफळ झाले ॥ ७ ॥ तुझ्या दर्शनावाचून जे काही दिवस गेले त्यांची गणना ब्रह्मदेवाने आमच्या गेलेल्या आयुष्यात करुं नये ( अशी आम्ही त्याला विनंती करतो ) ॥ ८ ॥ रामचंद्रांनी उत्तम व नम्र वचनांनी सर्व मातांना संतुष्ट केले आणि शंभु, गुरु व विप्र यांच्या चरणांचे स्मरण करता करता त्यांस डोळा लागला ॥ दो० ३५७ ॥

झोपेंतहि मुख फार मनोहर । सायं सोनकमल जणुं सुंदर ॥
करती जागर घरघर नारी । करिती मंगल-विनोद भारी ॥
पुरी विराजे राजे रजनी । राण्या म्हणति पहा कीं सजणी ॥
सह सुंदर वधु सासू निजती । शिरमणि जणुं उरिं फणी लपवती ॥
प्रातःशुचिकाळीं प्रभु जागति । अरुण चूड वर बोलूं लागति ॥
मागध बंदि गाति गुण, भारी । ये जनगण जोहारा द्वारीं ॥
नमुनि विप्र सुर गुरु पितृ माते । आशिस मिळुनि मुदित ते भ्राते ॥
सादर जननी आनन बघती । ते सह नृपा द्वारिं मग निघती ॥

दो० :- करुनि शौच सब सहज शुचि पावन सरिता-स्नान ॥
नित्य कर्म कृत, पितृनिकट चौघे येति सुजाण ॥ ३५८ ॥

झोपेतसुद्धा राममुख फारच मनोहर दिसत आहे जणूं संध्याकाळचे सुंदर सोने ( लाल ) कमळच जणूं ! ॥ १ ॥ घरोघरी स्त्रिया जागरण करीत असून आपापसात मांगलिक थट्टा - विनोद भरपूर करीत आहेत ॥ २ ॥ राण्या म्हणतात की सखी पहा तर खरी ( आजची ) रात्र कशी शोभायमान झाली आहे आणि नगरी कशी विशेष सुशोभित झाली आहे ! ॥ ३ ॥ सुंदर वधूंना जवळ घेऊन सासवा ( अशा ) झोपल्या की जणू सर्पांनी आपले शिरमणी आपल्या उराशी लपवून ठेवले ॥ ४ ॥ प्रभु पवित्र प्रात:काळी जागे झाले तो कोंबडे सुंदर आरवूं लागले ॥ ५ ॥ मागध, बंदी इ. गुणगान करूं लागले आणि पुष्कळ नगरवासी जोहार करण्यासाठी राजवाड्याच्या द्वाराशी आले ॥ ६ ॥ विप्र, सुर, गुरु, पिता व माता यांस नमन केले, आशीर्वाद मिळाल्याने सर्व बंधू आनंदित झाले ॥ ७ ॥ जननीनी आदराने चौघांचेही मुखावलोकन केले व नंतर ते चौघे राजाबरोबर राजद्वारी बाहेर जाण्यास निघाले ॥ ८ ॥ सहजच पवित्र असणार्‍या बंधूनी सर्व प्रकारचे शौच करुन पावन सरितेत स्नान केले व प्रात:काळचे नित्यकर्म उरकून चारी सुजाण बंधू वडिलांजवळ ( दरबारत ) आले ॥ दो० ३५८ ॥

* * * * *

श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु

GO TOP