॥ श्रीरामचरितमानस ॥

(मराठी अनुवाद)

॥ अयोध्याकाण्ड ॥

अध्याय ८ वा

॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥


Download mp3

समाचार जैं लक्ष्मण पावति । उठुनि विकल, मुख उदास धावति ॥
तनु सकंप पुलकित जल नयनां । प्रेमाऽधीर धरति अति चरणां ॥
तिष्ठति बघत न वदवे काहीं । मीन दीन जणुं बाह्य जला ही ॥
काय होय विधि ! सचिंत झाले । सकल सुकृत सुख अमचें पळलें ॥
मला काय रघुनाथ सांगतिल । ठेविति भवनिं किं वनिं ये म्हणतिल ॥
राम बघति बंधुस कर जोडुनि । उभा, देह-घर-काडी मोडुनि ॥
वदले वचन राम नयनागर । शील - स्नेहार्जव - सुख -सागर ॥
प्रेमें बाळ ! न कातर होई । परिणामीं मुद समजुनि हृदईं ॥

दो० :- माय-बाप-गुरु-धनी-वच सहज मान्य करतात ॥
जन्मलाभ ते लुटिति जगिं व्यर्थ न तर जगतात ॥ ७० ॥

श्रीराम लक्ष्मण संवाद प्रकरण -
(हा विषारी) समाचार जेव्हा लक्ष्मणास मिळाला तेव्हा ते व्याकुळ व उदास मुख होऊन उठून धावले ॥ १ ॥ शरीराला कंप सुटला आहे, रोमांच उभे राहीले आहेत, डोळे पाणावले आहेत. (अशा स्थितीत) प्रेमाने अधीर होऊन (रघुनाथाचे) पाय धरले ॥ २ ॥ काहीच बोलवत नसून (राममुखाकडे) नुसते असे बघत राहीले की जणू पाण्याच्या बाहेर काढलेला दीन मासाच ! ॥ ३ ॥ दैवा ? होणार तरी कय ? (असे मनात म्हणत) चिंतातुर झाले आणि (वाटले की) आमचे सर्व सुकृत आणि सुख नाहीसे झाले ॥ ४ ॥ मला रघुनाथ काय सांगतील बरं ! घरी ठेवतील की वनात ये असे म्हणतील ? ॥ ५ ॥ बंधु घर, देह इत्यादिकांशी काडीमोड करुन हात जोडून उभा आहे असे रामचंद्रांनी पाहीले ॥ ६ ॥ (तेव्हा) नीतीनिपुण आणि शील, स्नेह, सरलता (आर्जव) व सुख यांचे सागर राम म्हणाले ॥ ७ ॥ बाळ ! परिणामीं आनंद होणार आहे हे मनात समजून प्रेमाने (असा) घाबरा होऊ नकोस. ॥ ८ ॥ माता, पिता, गुरु व धनी यांचे वचन जे सहज मान्य करतात ते (च) जगात जन्माचा लाभ लुटतात नाहीतर ते वृथा जगतात (जन्म व्यर्थ घालवितात) ॥ दो० ७० ॥

जाणुनि बंधु ! वचन ऐकावें । माता-तात-पदां सेवावे ॥ व्
भवनिं भरत रिपुसूदन नाहीं । राव वृद्ध मम दुःख मना ही ॥
घेउनि गेलो तुम्हांस वनिं जर । होइ अयोध्या अनाथ अति तर ॥
गुरु पितरौ परिजन परिवारा । गांजिल दुःसह दुःखपसारा ॥
रहा करा सकलां परितोष हि । ना तर तात घडे बहु दोषहि ॥
जिथें प्रजा प्रिय दुःखी भारी । तो नृप खचित निरय-अधिकारी ॥
रहा तात या नीति-विचारीं । ऐकत लक्ष्मण विव्हळ भारी ॥
सुकवी शीतल वचन तयाला । तुहिनपात कीं तामरसाला ॥

दो० :- उत्तर ये ना प्रेमवश व्याकुळ धरले पाय ॥
नाथ ! दास मी स्वामि तुम्हिं त्यजता काय उपाय ॥ ७१ ॥

बंधू ! हे जाणून माझे म्हणणे ऐकावे व माता - पितरांच्या चरणाची सेवा करावी ॥ १ ॥ भरत व शत्रुघ्न घरी नाहीत व राजे वृद्ध झालेले असून त्यांच्या मनात माझे दु:ख आहे ॥ २ ॥ (अशा स्थितीत) मी जर तुम्हांला वनात घेऊन गेलो तर अयोध्या (सर्व प्रकारे) अति अनाथ होईल ॥ ३ ॥ गुरु, माता, पिता, पुरजन (प्रजा) व परिवार यांना दु:सह दु:खांचा पसारा गांजील ॥ ४ ॥ (म्हणून घरी) रहा व सर्वांचा परितोष करा. नाहीतर तात ! मोठा दोष, घडेल ॥ ५ ॥ (कारण ज्या राजाच्या राज्यात) जिथे प्रजा फार दु:खी असते तो राजा अवश्य नरकाचा अधिकारी बनतो ॥ ६ ॥ तात ! या नीतीच्या विचाराने घरी रहा हे ऐकता ऐकताच लक्ष्मण भारी व्याकुळ झाले ॥ ७ ॥ व ज्याप्रमाणे हिमपाताने कमळ सुकून जावे तसे लक्ष्मण त्या शीतल वचनाने (एकाएकी) सुकून गेले ॥ ८ ॥ प्रेमवश झाल्याने उत्तर (तोंडातून बाहेर) येत नाही व व्याकुळ होऊन पाय धरले व म्हणाले की नाथ ! आपण स्वामी आहांत व मी दास आहे (तरी माझा) त्याग करता ? (मग) काय उपाय (मला करता येणार !) ॥ दो० ७१ ॥

मज गोस्वामि ! दिली शुभ शिकवण । कातरतें मम गमे कठिण पण ॥
नरवर धीर धर्मधुर-धारी । निगम-नीतिचे ते अधिकारी ॥
प्रभूस्नेहिं शिशु मी प्रतिपालित । मंदर मेरु किं मराल उचलित ॥
गुरु पितृमाय न कुणि मज ठावे । नाथ ! विश्वसा, वदें स्वभावें ॥
जगिं जितकीं स्नेहादिक नातीं । प्रीती प्रचिती श्रुति निज गाती ॥
सर्व एक तुम्हिं मजला स्वामी ! । दीनबंधु हृदयांतर्यामी ॥
धर्म नीति शिकविणें तयाला । कीर्ति भूति सुगती प्रिय ज्याला ॥
मनतनवचनें पदिं रत झाला । कृपा सिंधु कीं त्यजणें त्याला ॥

दो० :- करुणासिंधु सुबंधु-वच परिसुनि मृदुल विनीत ॥
प्रभु समजाविति धरुनि हृदिं बघुनी स्नेह-सुभीत ॥ ७२ ॥

गोस्वामी आपण मला चांगलीच शिकवण दिलीत; पण माझ्या भित्रेपणामुळे मला ती कठीण वाटते ॥ १ ॥ जे कोणी धर्माची धुरा धारण करणारे धैर्यवान नरश्रेष्ठ असतील तेच वेद व नीती यांचे अधिकारी होत. ॥ २ ॥ मी तर शिशु आहे व प्रभुच्या स्नेहाने माझे प्रतिपालन केले आहे हंस कधी मंदर वा मेरू पर्वत उचलू शकेल कां ? ॥ ३ ॥ मला गुरु, माता, पिता इ. कोणी ठाऊक नाही नाथ ! हे मी स्वभावताच सांगत आहे आपण विश्वास ठेवावा ॥ ४ ॥ जगात जितकी स्नेह आदी करुन नाती, प्रीती, प्रतीती इत्यादी आपले (तुमचे) वेद वर्णितात ॥ ५ ॥ ती सर्व मला स्वामी ! दीनबंधू ! व हृदयांतर्यामी ! तुम्ही एकच आहांत ॥ ६ ॥ ज्याला कीर्ती, ऐश्वर्य व सदगती (मोक्ष इ.) प्रिय वाटतात त्याला धर्माचा व नीतीचा उपदेश करणे जरुर आहे ॥ ७ ॥ जो मनाने, वाणीने व देहाने आपल्या पदीं रत झाला असेल त्याला का कृपासिंधु ! त्यागावा ! ॥ ८ ॥ सुबंधूचे विनम्र व कोमल वचन ऐकून व तो स्नेहाने फार घाबरला आहे असे जाणून करुणासिंधू प्रभूंनी त्याला हृदयाशी धरुन (त्याची) समजूत घातली ॥ दो० ७२ ॥

घ्यावा जननी निरोप जाउनि । चला बंधु ! वनिं वेगें येउनि ॥
मुदित परिसुनी रघुवर-वाणी । झाला लाभ महा गत हानी ॥
आले जननिकडे हर्षित-मन । अंध पुन्हां पावे जणुं लोचन ॥
जाउनि नत शिर जननि-पदांसी । मन रघुनंदन-जानकि पाशीं ॥
माता, बघुनि उदास, विचारी । लक्ष्मण कथा निवेदिति सारी ॥
घाबरली वच कठोर परिसुनि । मृगी जणू दव चहुदिशिं निरखुनि ॥
लक्ष्मण लक्षिति घडे अनर्थ हि । स्नेहविवश ही अकार्य करिल हि ॥
आज्ञा घेण्या सभय धजति ना । जा वनिं सवें म्हणे किं म्हणे ’ना’ ॥

दो० :- स्मरुनि सुमित्रा राम सिता-रूप-सुशील-स्वभाव ॥
नृपस्नेह, मस्तक पिटी पापिण साधी डाव ॥ ७३ ॥

बंधु ! आता जाऊन आईचा निरोप घ्यावा व त्वरेने येऊन वनात चलावे ॥ १ ॥ रघुवराची वाणी ऐकून लक्ष्मणास आनंद झाला (कारण) महाहानी टळली व महालाभ झाला (असे वाटले) ॥ २ ॥
श्रीलक्ष्मण - सुमित्रा भेट -
जणूं अंधाला पुन्हा डोळे मिळावे त्याप्रमाणे हर्षित मनाने मातेकडे आले. ॥३ ॥ (जवळ) जाऊन आईच्या पायावर मस्तक ठेवून नमन केले (खरे, पण) मन रघुनंदन व जानकीपाशी आहे ॥ ४ ॥ लक्ष्मणास म्लान पाहून मातेने विचारले तेव्हा लक्ष्मणांनी सर्व हकीकत सांगितली ॥ ५ ॥ ते कठोर वचन ऐकून सुमित्रा अशी घाबरली की जणू चारी बाजूस वणवा लागलेला पाहून जशी मृगीच ॥ ६ ॥ लक्ष्मणाला वाटले की अनर्थच घडला ! (कारण) ही स्नेहाला वश होऊन अकार्यच करणार ! ॥ ७ ॥ (त्यामुळे) आज्ञा मागण्यास धीर होत नाही (कारण की) रघुनाथा बरोबर वनात जा असे म्हणेल की जाऊ नको असे म्हणेल अशी धास्ती वाटत आहे. ॥ ८ ॥ राम व सीता यांचे रुप सुशील व शुद्ध भाव आणि राजाचा रामावरील स्नेह यांचे स्मरण होताच सुमित्रा आपले डोके बडवूं लागली (व म्हणाली की) पापीणीने डाव साधला ॥ दो० ७३ ॥

कुसमय जाणुनि धैर्या धरते । सहज सुहृद मृदु वचना वदते ॥
बाळ ! तुझी माता वैदेही । पिता राम सर्वस्वीं स्नेही ॥
अवध तिथें जिथं राम-निवास । तिथें दिवस जिथं रवि-प्रकाश ॥
सिता राम जर जाति वना ही । अयोध्येंत तव काम च नाहीं ॥
गुरु पितरौ स्वामी सुर बांधव । प्राणांसम सब सेव्यचि वास्तव ॥
जीवन जीवा प्राणां प्रिय ही । सकल-सखा निस्वार्थि रामही ॥
पूजनीय जे प्रिय अति जितके । मान्य राम-नात्याने तितके ॥
हे जाणुनि वनिं संगें जा हो ! । घेइ बाळ जगिं जीवन-लाहो ॥

दो० :- भूरि-भाग्य-भाजन बनसि मज सह, टळो पिडाहि ॥
कीं तव मन करि रामपदिं ठाव छलादि विनाहि ॥ ७४ ॥


सुमित्रेचा लक्ष्मणास सुंदर उपदेश
-(ही शोक करीत बसण्याची वेळ नाही) कुसमय आहे असे जाणून सुमित्रेने धीर धरला व ती सहज सुहृद असल्याने मधुर वाणीने म्हणाली ॥ १ ॥ बाळ ! तुझी माता वैदेही आहे व सर्व प्रकारे स्नेह करणारे राम तुझे पिता आहेत. ॥ २ ॥ जिथे सूर्य प्रकाश असेल तिथे जसा दिवस असतो (च) तसाच रामनिवास जेथे असेल तीच अयोध्या ॥ ३ ॥ सीतारामच जर वनांत जात आहेत तर अयोध्येत तुमचे कामच नाही ॥ ४ ॥ गुरु, पिता, माता, स्वामी, देव व बंधू यांची प्राणांसारखी सेवा करावी हे योग्यच आहे पण. ॥ ५ ॥ जीवाचे जीवन, प्राणांना सुद्धा प्रिय व सर्वांचे निस्वार्थी सखा रामच आहेत. ॥ ६ ॥ जगात जितके म्हणून पूजनीय वाटतात व जे कोणी अति प्रिय वाटतात ते सर्व रामाच्या संबधांनेच मान्य आहेत. ॥ ७ ॥ हे जाणून तू रामाबरोबर वनात जा कसा ! आणि बाळ या जगात जीवनलाभ घे (जन्म सुफल कर. कृतकृत्य हो.) ॥ ८ ॥ (बाबा, किंवा बाळा) माझ्यासह तू अपार भाग्याचे पात्र बनलास ! सर्व इडापिडा टळो ! कारण की तुझ्या मनाने छलकपटादि सोडून रामचरणी ठाव केला आहे ॥ दो०७४ ॥

पुत्रवती युवती जगिं तीच किं । रघुपति भक्त जिचा सुत होत किं ॥
न तरि वांझ बरि विते वृथा ते । रामविमुख सुत मानि हितातें ॥
राम जाति वनिं तुमचें भाग्य हि । ताता ! काहीं कारण नान्य हि ॥
सकल-सुकृत-फल हेंच महान हि । स्नेह राम सीतापदिं सहज हि ॥
लोभ - मोह - मद - ईर्षा - रोषां । स्वप्निंहि हो‍उं नका वश दोषां ॥
दूर सर्वपरि विकार ठेवा । मन तन वचनीं करणें सेवा ॥
तुम्हां सुलभ वनिं सकलाराम । माय-बाप सह सीताराम ॥
राम वनीं पावती ना क्लेशहि । सुत तें करणें हा उपदेशहि ॥

छं :- उपदेश हा किं तुम्हांमुळें सुख राम सीता पावती ॥
प्रिय मातृ पितृ परिवार पुर-सुख याद काननिंविसरती ॥
तुलसी प्रभुसि उपदेश आज्ञा देइ आशीर्वाद हा ।
रतिं नित्य अविरल अमल सियररघुवीरपदिं हो नव महा ॥ १ ॥
सो० - मातृचरणिं वंदून निघति शीघ्र साशंक मनिं ॥
वागुर दृढ तोडून जणूं पळे मृग भाग्यवश ॥ ७५ ॥

या जगात तिलाच पुत्रवती युवती म्हणावे की जिचा पुत्र रघुपतिभक्त होतो. ॥ १ ॥ नाही पेक्षा वांझ चांगली; (कारण) रामविमुख पुत्र आपल्या हिताला कारण होईल असे जिला वाटते ती (पशूप्रमाणे) व्यर्थ विते ॥ २ ॥ बाळा ! तुमच्याच भाग्याने राम वनात जात आहेत; दुसरे काही सुद्धा कारण नाही ॥ ३ ॥ सीतारामचंद्राच्या पायी सहज स्नेह असणे हेच सर्व सुकृतांचे महान फळ आहे. ॥ ४ ॥ लोभ मोह, मद, ईर्षा व क्रोध या दोषांना स्वप्नांत सुद्धा वश होऊ नका ॥ ५ ॥ सर्व परींनी विकारांना दूर ठेवून मनाने, देहाने, व वाणीने सेवा करावी ॥ ६ ॥ सीता व राम हे आईबाप बरोबर असल्याने तुम्हाला वनात सर्व आराम (सुखसोई) सुलभ आहेत ॥ ७ ॥ पुत्रा ! राम वनांत क्लेश पावणार नाहीत ते करावे, हाच माझा उपदेश आहे. ॥ ८ ॥ हा उपदेश आहे की (थोडक्यांत) तुमच्यामुळे राम व सीता यांना सुख होईल आणि माता, पिता, प्रिय परिवार आणि अयोध्येतील सुख यांची आठवण त्यांनी विसरावी तुलसीदास म्हणतात की, प्रभुला उपदेश देऊन आज्ञा (निरोप) दिली व हा आशीर्वाद दिला की सीता रघुविरपदी तुमचे नित्य नवे निर्मल, महान व घनदाट प्रेम होवो ॥ छंद ॥ भाग्यवशात जाळे तोडून जसे हरिणाने पळून जावे तसेच जणू काय मातेला वंदन करुन साशंक मनाने शीघ्र निघाले - गेले ॥ दो० ७५ ॥

जानकिनाथ तिथें गत लक्ष्मण । प्रिय संगतिनें होति मुदित-मन ॥
राम सितापद सुंदर नमले । तयां सवें नृपमंदिरिं वळले ॥
वदति परस्पर पुर-नर-नारी । विधि हरि जुळवुनि सुयोग भारी ॥
कृश तनु दुःखी उदास वदनें । जणूं विकल माशा मध-हरणें ॥
कर चोळिति शिर पिटती रडती । जणूं विण पंख विहग विव्हळती ॥
खूपच गर्दी राजद्वारीं । वर्णवे न तो विषाद भारी ॥
बसविति भूपा सचिव उठवुनी । आले राम असें प्रिय वदुनी ॥
सीतेसह युग तनय निरखले । व्याकुळ भारि भूमिपति बनले ॥

दो० :- सीतेसह सुत सुभग युग बघ बघुनी व्याकूळ ॥
स्नेह-विवश बहु वार त्यां हृदयिं धरिति राऊळ ॥ ७६ ॥

विपिन - गमन - प्रकरण -
जानकी व जानकीनाथ जेथे आहेत तेथे लक्ष्मण गेले व प्रियाच्या संगतीने त्यांचे मन प्रसन्न - आनंदित झाले ॥ १ ॥ राम व सीता यांच्या सुंदर चरणांना वंदन केले व त्यांच्या बरोबर नृप - मंदिराकडे चालले ॥ २ ॥ (यांना जाताना पाहून) नगरातील स्त्रिया व पुरुष आपसात म्हणतात की दैवाने चांगला जुळवून आणलेला सुयोग की हो नष्ट केला ! ॥ ३ ॥ सर्व लोक शरीराने कृश, मनाने दु:खी झालेले असून त्यांची तोंडे अशी म्लान झाली आहेत की जणू मध काढून नेल्यानंतरच्या मधमाशाच ॥ ४ ॥ लोक हात चोळीत आहेत, डोके पिटीत रडत असा आक्रोश करीत आहेत की जणू पंखहीन पक्षीच विह्वळत आहेत. ॥ ५ ॥ राजद्वाराजवळ खूपच गर्दी झाली असून तेथील अत्यंत विषादाचे वर्णनच करता येत नाही ॥ ६ ॥ रामचंद्र आले आहेत असे प्रिय बोलून सचिवाने राजांस उठवून बसविले ॥ ७ ॥ सीतेसहित दोन्ही पुत्रांना निरखून पाहताच भूमीपति भारी व्याकुळ झाले ॥ ८ ॥ सीतेसहित आपल्या दोन्ही सुंदर पुत्राना पुन्हा पुन्हा पाहून दशरथ राजा व्याकुळ होऊ लागले व स्नेहाला विशेष वश होऊन त्या तिघांना वारंवार हृदयाशी धरु लागले ॥ दो० ७६ ॥

बोलुं न शकवे नृप विव्हळती । शोकजनित दाहें हृदिं जळती ॥
अति अनुरागें पदिं शिर नमती । आज्ञा रघुविर उठुनि मागती ॥
तात आशिषा आज्ञा दीजे । हर्ष-समयिं कां विषाद कीजे ॥
प्रिय-प्रेमवश घडे प्रमादू । तैं यशनाश जगीं अपवादू ॥
स्नेहें, श्रवुनि उठुनि, नरनाहू । बसविति धरुनि रघुपति-बाहू ॥
ऐका तात ! तुम्हां मुनि म्हणती । राम चराचरनायक असती ॥
शुभ वा अशुभ कर्म-अनुसारें । ईश देइ फल हृदय-विचारें ॥
कर्म करी जो त्या फळं मिळती । निगम-नीति अशि सगळे वदती ॥

दो० :- कोणि एक अपराध करि भोगी दुजा फळास ॥
अति विचित्र भगवंत-गति जगीं कळे कोणास ॥ ७७ ॥

दशरथ राजास बोलवत नाही सारखे विह्वळत आहेत आणि शोकाने उत्पन्न झालेल्या दाहाने हृदय जळत आहे ॥ १ ॥ वडिलांच्या पायावर अति अनुरागाने डोके ठेवले व उठून रघुवीराने निरोप मागितला ॥ २ ॥ (म्हणाले की) बाबा ! मला आशीर्वाद देऊन आज्ञा द्यावी हर्षाच्या प्रसंगी विषाद कां बरे करता ? ॥ ३ ॥ बाबा ! प्रेमास्पद माणसाच्या प्रेमाला वश झाल्याने प्रमाद घडतो आणि यशाचा नाश व जगात निंदा होते ॥ ४ ॥ (रघुवीराचे म्हणणे) ऐकून स्नेहाने उठून नरनाथाने रघुपतींचा दंड धरुन त्यांना खाली बसविले ॥ ५ ॥ (आणि म्हणाले की) हे पहा तात ! राम चराचर नायक आहेत असे मुनी तुमच्या विषयी म्हणतात ॥ ६ ॥ शुभ वा अशुभ कर्माला अनुसरुन हृदयाचा विचार करुन, ईश फल देतो ॥ ७ ॥ आणि जो कर्म करतो तोच त्याची फले भोगतो असे वेद, नीती व सर्वच म्हणतात ॥ ८ ॥ कोणीतरी एकाने अपराध करावा व त्याचे फळ (शिक्षा) दुसर्‍या कोणीतरी भोगावे हे कसे ? (त्यावर राम म्हणतात) भगवंताची गति अति विचित्र आहे ती या जगात कोणास कळणार ? ॥ दो० ७७ ॥

घरिं रामा राखाया राया । त्यजुनी छल बहु करी उपायां ॥
नाहिं रहात, रामकल जाणे । धर्म-धुरंधर धीर शहाणे ॥
मग नृप सीते हृदयीं घेई । प्रेमें बहु उपदेशा देई ॥
बहुवन दुःखे दुःसह सांगति । सासु-सासरा-पितृसुख वानति ॥
रामचरणिं अनुरक्त सितामन । शुभ न गमे गृह विषम न कानन ॥
इतर सकल सीते समजाविति । विपिन-विपत्ती विशेष वानिति ॥
सचिव-नारि गुरुनारि शहाणी । स्नेहानें सांगति मृदुवाणीं ॥
वनगमनाज्ञा तुम्हांस तों ना । श्वशुर-सासु-गुरु-वचना माना ॥

दो० :- शिकवण शीतल मधुर मृदु हित, न रुचे सीतेस ॥
शरच्चंद्र-कर लागतां जणुं कोकीला क्लेश ॥ ७८ ॥

रामाला घरी ठेऊन जाण्यासाठी राजाने छल कपट सोडून पुष्कळ उपाय केले ॥ १ ॥ पण रामाच्या कला वरुन जाणले की ते धर्मधुरंधर धीर व शहाणे असल्याने रहात नाहीत ॥ २ ॥ तेव्हा राजाने सीतेस हृदयाशी धरली व फार प्रेमाने बहुत उपदेश केला ॥ ३ ॥ (दशरथांनी) वनांतील बहुत दु:सह दु:खे पुष्कळ सांगितली आणि सासू - सासरा आणि पिता यांच्या येथील पुष्कळ सुख वर्णन केले ॥ ४ ॥ (परंतु) सीतेचे मन रामचरणीं अनुरक्त असल्यामुळे तिला घर चांगले वाटत नाही व वन कठीण वाटत नाही ॥ ५ ॥ (तिथे असलेल्या) इतर सर्वांनीही वनातील विपत्तींचे विशेष वर्णन करुन सीतेला समजावले ॥ ६ ॥ सचिवाची पत्‍नी आणि ज्ञानी गुरुपत्‍नी (अरुंधती) यांनी स्नेहाने गोड शब्दांत सांगीतले की ॥ ७ ॥ तुम्हाला काही वनात जाण्याची आज्ञा झालेली नाही तेव्हा तुम्ही सासरा - सासू व गुरु (वडील माणसे) सांगत आहेत ते ऐका ॥ ८ ॥ शीतल, मधुर, मृदु व प्रेमळ शिकवण सीतेला आवडली नाही (उलट) शरद ऋतूतील चंद्राचे किरण लागताच जणू कोकीसारखे क्लेश झाले ॥ दो० ७८ ॥

सिता न दे संकोचें उत्तर । रुष्ट उठे तैं कैकई सत्वर ॥
मुनिपट-भूषण-भाजन आणी । ठेउनि पुढें वदे मृदुवाणीं ॥
नृपा प्राण-प्रिय तुम्हिं रघुवीरू । शील स्नेह न सोडिति भीरू ॥
सुकृत सुयश परलोक हि भंगति । तुम्हां न तरि वनिं जा कधिं सांगति ॥
करा विचारें रुचे तुम्हां तें । जननी-वचनें सुख रामातें ॥
भूपा वचन बाण सम लागे । प्राण निघून न जाति अभागे ॥
लोक विकल मूर्छित नरराणा । करणें काय सुचे कोणा ना ॥
त्वरित राम मुनिवेषा करुनी । निघति जनक जननिस शिरनमुनी ॥

दो० :- वनिता बंधु समेत वन साज सजुनि सामान ॥
नमुनि विप्र गुरुपदां प्रभु निघति हरुनि जनभान ॥ ७९ ॥

सीतेने संकोचाने उत्तर दिले नाही, तेव्हा कैकयी रोषाने त्वरेने उठली ॥ १ ॥ मुनीवस्त्रे (वल्कले) मुनीभूषणे व मुनीपात्रे तिने आणली आणि ती पुढे ठेऊन मृदु वाणीने म्हणाली की ॥ २ ॥ रघुवीर ! तुम्ही राजांना प्राणांसारखे प्रिय आहांत व ते कातर बनले असल्याने शील व स्नेह सोडूं शकणार नाहीत. ॥ ३ ॥ सुकृत, सुयश व परलोक यांचाही नाश झाला तरी वनात जा असे तुम्हाला कधीही सांगणार नाहीत ॥ ४ ॥ (कैकयी म्हणाली की मी सांगितले त्याचा) विचार करून तुम्हास रुचेल ते करा जननीच्या भाषणाने रामास सुख झाले ॥ ५ ॥ कैकयीचे भाषण भूपास बाणांसारखे लागले (व मनात म्हणाले की) हे अभागी प्राण निघून का जात नाहीत ॥ ६ ॥ सर्व लोक व्याकुळ झाले आहेत नरनाथ दशरथ मूर्च्छित पडले आहेत व काय करावे हे कोणास सुचत नाहीसे झाले आहे. ॥ ७ ॥ रामचंद्रांनी त्वरेने मुनिवेष केला आणि जनक व जननी कैकयी यांना मस्तकाने नमन करुन ते निघाले ॥ ८ ॥ रमा (पत्‍नी-सीता) व बंधुसहित वनाचा साज व सर्व सामान सजून विप्र व गुरु यांच्या पायांना नमन करुन व सर्वाचे देहभान हरण करून प्रभू निघाले - चालले ॥ दो० ७९ ॥

निघुनि वसिष्ठद्वारिं थांबलें । लोक विरह दव-दग्ध पाहिले ॥
प्रिय वचनीं सकलां समजाविति । विप्रगणां रघुवीर आणविति ॥
गुरुकरिं वर्षासनें देवविति । आदर-दान-विनय-वश वळविति ॥
याचक दान-मान-संतोषित । प्रेमें पूत मित्र परितोषित ॥
दासि दास बोलावुनि नंतर । सोंपुनि गुरुसि वदति जोडुनि कर ॥
गोस्वामी ! सकलां सांभाळा । प्रेमें जनक-जननि-सम पाळा ॥
वारंवार जुळुनि युग पाणी । सर्वां राम वदति मृदु वाणीं ॥
सर्वपरीं ते मम हितकारी । जे भूपा देती सुख भारी ॥

दो ० :- मम विरहें माता सकल होति न दुःखें दीन ॥
तोचि उपाय करा सकल पुरजन महा प्रवीण ॥ ८० ॥

(राजद्वारांतून) निघून वसिष्ठ गुरुंच्या दाराशी (नगराबाहेर) येऊन थांबले तेथे दिसले की सर्व विरह दावाग्निने होरपळून गेले आहेत ॥ १ ॥ प्रिय वचने बोलून सर्वांची समजूत घातली व रघुवीराने विप्रांच्या समुदायांना बोलावून घेतले ॥ २ ॥ गुरुंच्याकडून त्यांना वर्षासने देवविली आणि आदर, दान व विनयाने सर्वांना वश केले ॥ ३ ॥ दानाने व सन्मानाने याचकांस संतोषित केले व पवित्र प्रेमाने मित्रांना परितुष्ट केले ॥ ४ ॥ नंतर आपल्या दासदासींना बोलावून घेऊन त्यांना गुरुंच्या हाती सोपवून, गुरुजींना हात जोडून विनवले की - ॥ ५ ॥ गोस्वामी ! या सर्वाचे पालन पोषण, सांभाळ जनक जननीं प्रमाणे करावा ॥ ६ ॥ रामचंद्रांनी वारंवार हात जोडून सर्वांना मृदु वाणीने सांगीतले की ॥ ७ ॥ जे कोणी महाराजांना फार सुखी ठेवण्याचा प्रयत्‍न करतील ते माझे सर्व प्रकारे हितकर्ते होत. ॥ ८ ॥ माझ्या सर्व माता माझ्या विरहाने दु:खाने दीन होणार नाहीत असा उपाय तुम्ही अत्यंत प्रवीण पुरजनांनी सर्वांनी करावा ॥ दो० ८० ॥

असें राम सकलां समजाविति । गुरु-पद-पद्‌मिं हर्षि शिर नमविति ॥
प्रार्थुनि पणपति-गौरि-गिरिशां । निघति रघुपति मिळत आशिषां ॥
राम निघत अति विषाद झाला । आर्त-नाद दुःसह कानांला ॥
कुशकुन लंकें, पुरिं अतिशोकहि । हर्ष-विषाद-विवश सुरलोकहि ॥
मूर्छा विगत नृपति मग जागति । सुमंत्रास बोलावुनि सांगति ॥
जाति राम वनिं प्राण न जाती । तनुमधिं कोण्या सुखा राहती ॥
व्यथा बलवती याहुन कोणति । प्राण तनुस ज्या दुःखें सोडति ॥
धीर धरुनि मग वदले नरपति । सखे ! सरथ जा सवें शीघ्र अति ॥

दो० :- अति सुकुमार-कुमर युग जनक सुता सुकुमार ॥
रथिं बसवुनि वन दावुनी आणा वासरिं चार ॥ ८१ ॥

याप्रमाणे रामचंद्रांनी सर्वांची समजूत घातली आणि गुरुपद कमलांवर हर्षाने मस्तक नमविले ॥ १ ॥ गणपती, गौरी व शंकर यांना प्रार्थनादी करुन आशीर्वाद मिळाल्यावर रघुराज निघू लागले ॥ २ ॥ राम निघताच (नगरात) अत्यंत विषाद भरला व त्यावेळचा आर्तनाद कानांना दु:सह झाला. ॥ ३ ॥ (प्रयाणाच्या वेळी) लंकेत अपशकुन झाले अयोध्यापुरीत अति शोक भरला व (सर्व) देवलोक हर्ष व विषाद यांना विशेष वश झाले ॥ ४ ॥ (रघुवीराने प्रयाण केल्यावर) मग मूर्च्छा उडली व राजे जागे झाले (तेव्हा) सुमंत्रास बोलावून म्हणाले की - ॥ ५ ॥ राम वनात जात आहेत तरीसुद्धा माझे प्राण जात नाहीत; या क्षुद्र देहांत कोणत्या सुखासाठी राहीले आहेत (कोणास ठाऊक) ॥ ६ ॥ यापेक्षा अधिक बलवान कोणती व्यथा असेल की ज्या दु:खाने प्राण तनुला सोडून जातील ! ॥ ७ ॥ मग धीर धरून नरपति (दशरथ) म्हणाले की मित्रा ! रथ घेऊन त्वरेने बरोबर जा पाहूं ! ॥ ८ ॥ दोन्ही कुमार अति सुकुमार आहेत आणि जनकसुता सुकुमार आहे (म्हणून) त्यांना रथांत बसवून वन दाखवून चार दिवसांनी (परत) घेऊन या ॥ दो० ८१ ॥

धीर बंधु युग जर ना परतति । सत्यसंध रघुराज दृढव्रति ॥
सांगा कर जोडुन मम विनतिसि । प्रभु धाडा मिथिलेस किशोरिसि ॥
सीता भीत यदा वन बघतां । सांगा निरोप अवसर मिळतां ॥
श्वशुर सासु संदेश किं धाडति । मुली तुम्हाला ये क्लेश वनीं अति ॥
माहेरीं कधिं कधींहि सासरिं । रुचे तुम्हाला तिथें रहा तरि ॥
यापरिं करा उपायां नाना । ये तर अवलंबन या प्राणां ॥
ना तर शेवट मरण मला ही । जैं विधि वाम, न निजवश काहीं ॥
आणुनि दावि राम सिय लक्ष्मण । वदुनि पडति मूर्छित नृप तत्क्षण ॥

दो० :- आज्ञा मिळतां नमुनि शिर रथ सुवेग सजतात ॥
सीतेसह युगु बंधु जिथं बहिर्नगर जातात ॥ ८२ ॥

धैर्यशाली, सत्यसंध, दृढव्रती, रघुराज, दोघे बंधू जर परतले नाहीत ॥ १ ॥ तर हात जोडून माझी विनंती (प्रार्थना) सांगा की प्रभु ! मिथिलेश कुमारीला (तरी) परत पाठवावी ॥ २ ॥ अरण्य पाहून जेव्हा सीता घाबरुन जाईल तेव्हा योग्य संधी पाहून माझा निरोप सांगा की ॥ ३ ॥ मुली ! सासूसासर्‍यांनी असा निरोप सांगितला आहे की (अयोध्येस) परत ये, वनांत अत्यंत क्लेश आहेत बरं ! ॥ ४ ॥ (परत आल्यावर) इच्छा असेल त्याप्रमाणे कधी माहेरी रहा, कधी सासरी रहा ॥ ५ ॥ सुमंत्रा ! या प्रमाणे नाना उपाय करुन पहा. परत आली (सीता) तर या माझ्या प्राणांना आधार होईल ॥ ६ ॥ नाहीतर शेवट हाच येणार की मला मरण येणारच दैव फिरले की आपल्या स्वाधीन काही रहात नाही.॥ ७ ॥ राम सीता आणि लक्ष्मण यांना आणून दाखव (मित्रा !) असे म्हणून तत्क्षणीं दशरथ राजे मूर्च्छित होऊन जमिनीवर पडले ॥ ८ ॥ राजाची आज्ञा मिळताच मस्तक नमवून (सुमंत्र गेले व) अति वेगवान रथ सजविला व नगराबाहेर जेथे सीतेसह रामलक्ष्मण होते तेथे सुमंत्र (रथ घेऊन) गेले. ॥ दो० ८२ ॥

मग सुमंत नृप-वचन सांगुनी । रथिं चढविति रामास विनवुनी ॥
बसुनि सीतेसह रथि दो भ्राते । निघति नमुनि मनिं अयोध्येस ते ॥
जात राम, पुरि अनाथ पाहति । लोक विकल सब मागें धावति ॥
कृपासिंधु बहुपरिं समजावति । फिरति प्रेमें परतुनि धावति ॥
दिसे अयोध्या भीषण भारी ।काळरात्र कीं जणुं अंधारी ॥
घोर जंतु सम पुर-नर नारी । बघुनि परस्पर भितात भारी ॥
जणुं भूतें परिजन मसाण घर । मित्र सुहृद सुत जणुं यम किंकर ॥
बागांमधि तरु वेलि कोमेजति । नदी तलाव न मुळीं पाहवति ॥

दो० :- हयगज अगणित केलिमृग पुरपशु चातक मोर ॥
पिक रथांग शुक सारिका सारस हंस चकोर ॥ ८३ ॥

मग सुमंत्राने राजाची आज्ञा रामास सांगितली व विनंती करुन त्यास रथात बसण्यास सांगितले ॥ १ ॥ सीते सहित दोघे भाऊ रथांत बसले व अयोध्येला मनात नमन करून ते निघाले ॥ २ ॥ राम जाताच अयोध्या अनाथ झालेली पाहून लोक व्याकुळ झाले व (रथाच्या) मागो माग धावू लागले ॥ ३ ॥ कृपा सिंधू रामांनी त्यांची नाना परींनी समजूत काढली तेव्हा लोक परत फिरले पण (पुन्हा) प्रेमाने परतून (मागे) धावू लागले ॥ ४ ॥ अयोध्या अशी भारी भयानक दिसू लागली की जणू अंधारी काळरात्रच ॥ ५ ॥ नगरातील स्त्रिया व पुरुष घोर जंतूंसमान दिसू लागले व एकमेकांस पाहून फार भिऊ लागले ॥ ६ ॥ कुटुंबातीिल माणसे भुतांसारखी व घरे स्मशानासारखी भासू लागली आणि मित्र, सुहृद, सुत यमदूतां प्रमाणे दिसू लागले ॥ ७ ॥ बागांमध्ये वृक्ष व लता कोमेजून गेल्या व नद्या तलावांकडे पाहवत नाहीसे झाले ॥ ८ ॥ घोडे, हत्ती, असंख्य क्रीडामृग, पुरपशु, चातक मोर, कोकिळा, चक्रवाक, पोपट साळुंख्या करकोचे वगैरे हंस व चकोर ॥ दो० ८३ ॥

राम-वियोग विकल सब तिष्ठति । जिथं तिथं चित्रलिखित जणुं वाटति ॥
नगर सफल वन गव्हर भारी । खग् मृग विपुल सकल नर नारी ॥
विधि करि किरातिनी कैक‍इला । दव दुःसह दश दिशीं लाविला ॥
सहूं न शकति रघुवर-विरहानळ । लोक सकल पळुं लागति विव्हळ ॥
सकल विचार करति सुख नाहीं । विना राम लक्ष्मण सीता ही ॥
जिथें राम तिथं सब सुखसाधन । विण रघुवीर अयोध्यें काम न ॥
जाति सवें हा निश्चय ठरवुनि । सुर दुर्लभ-सुख-सदनां सोडुनि ॥
राम-चरण-पंकजें प्रिय जया । विषय-भोग कीं करिति वश तयां ॥

दो० :- बाल वृद्ध टाकुनि गृहां जाति लोक सब साथ ॥
करिति वास यमसा तटीं प्रथम दिवसिं रघुनाथ ॥ ८४ ॥

रामवियोगाने व्याकुळ होऊन जेथल्या तेथे असे (तटस्थ) राहीले आहेत की जणूं चित्रातल्या सारखेच दिसता आहेत ॥ १ ॥ अयोध्यानगर फळांनी लगडलेले घनदाट वन आहे व नरनारी त्यातील विपुल पशूपक्षी आहेत ॥ २ ॥ दैवाने कैकेयीला भिल्लीण केली आणि तिने दाही दिशांना दु:सह वणवा लागला ॥ ३ ॥ त्यांना रामविरहरुपी आग असह्य झाली व सगळे लोक व्याकुळ होऊन पळत सुटले ॥ ४ ॥ सर्व लोक विचार करुं लागले की रामलक्ष्मण व सीता यांच्या शिवाय सुख नाहीच. ॥ ५ ॥ जिथे राम असतील तिथे सर्व सुख साधन आहे, म्हणून रघुवीरावाचून अयोध्येत काही काम नाही ॥ ६ ॥ असा निश्चय ठरवून देवांना सुद्धा दुर्लभ असे सुख व सुखमय सदने टाकून सर्व लोक (रामा) बरोबर जाण्य़ास निघाले ॥ ७ ॥ ज्यांना रामचरणपंकजे प्रिय आहेत त्यांना का विषयभोग वश करतील ? (हे घडणे शक्यच नाही) ॥ ८ ॥ लहान मुले व म्हातारी माणसे यांना घरात टाकून सर्व लोक (रथाच्या) मागोमाग गेले व बालवृद्ध घरे टाकून गेले. (म्हणून) रघुनाथांनी पहिल्या दिवशी तमसा नदीच्या तीरावर मुक्काम (वस्ती) केला. ॥ दो० ८४ ॥

* * * * *

श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु

GO TOP