॥ श्रीरामचरितमानस ॥

(मराठी अनुवाद)

॥ अयोध्याकाण्ड ॥

अध्याय २५ वा

॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥


Download mp3

परिसुनि मुनिवच बघुनि राममन । गुरू स्वामि अनुकूल पूर्ण, पण- ॥
अपल्या शिरिं सब जाणुनि भारहि । वदुं शकति ना करिति विचारहि ॥
पुलकित वपू सभेमधिं उठले । स्नेह नीर नीरजाक्षिं भरलें ॥
मुनिनथें वक्तव्य कथित मम । काय सांगु त्याहुनि अधिकोत्तम ॥
प्रभुचा स्वभाव मी जाणतसें । अपराध्याही कोप कधिं नसे ॥
कृपा स्नेह मजवरी विशेषहि । खेळतहि कधिं दिसे न रोषहि ॥
आशिशुपण मी त्यक्त न संगा । कधिं करिती ना मम मन भंगा ॥
अनुभविली प्रभु कृपारीत कीं । खेळिं दिली मज हारिं जीत की ॥

दो० :- स्नेह भीड बश मी हि कधिं सम्मुख वदलों नाहिं ॥
दर्शन तृप्ति न अझुन ही प्रेम तृषित नेत्रां हि ॥ २६० ॥

मुनींचे म्हणणे ऐकून व रामाच्या मनातील भाव जाणून ( खात्री झाली की) गुरुजी व स्वामी पुर्ण अनुकूल आहेत पण ॥ १ ॥ सर्व भार आपल्या ( एकट्याच्या) च शिरावर येऊन पडला; हे जाणून कांही सांगूं शकेनात ( काय बोलावे हेच कळेना) म्हणून विचार करु लागले ॥ २ ॥ ( मग) शरीर रोमांचित होऊन सभेत उठून उभे राहीले व त्याच्या कमळा सारख्या नेत्रांत स्नेहजल भरले ॥ ३ ॥ मी जे सांगावयाचे ते मुनीनाथांनी सांगून टाकले आहे, त्याहून अधिक चांगले ( अधिक + उत्तम) मी काय सांगू ॥ ४ ॥ माझ्या प्रभूचा स्वभाव मी जाणतो अपाराध्यावर सुद्धा कोप करीत नाहीत ॥ ५ ॥ माझ्यावर तर विशेषच कृपा व स्नेह करतात, व खेळताना सुद्धा कधी क्रोधाचा लेशही दिसला नाही ॥ ६ ॥ मी शिशुपणापासून त्यांचा संग कधी सोडला नाही व त्यांनी कधीही माझा मनोभंग केला नाही. ( माझ मन मोडत नाही) ॥ ७ ॥ प्रभूची कृपा करण्याची रीत अनुभविली की खेळात माझ्यावर हार आली असतानाही त्यांनी मला जीतच द्यावी ॥ ८ ॥ मी सुद्धा स्नेहाने व संकोचामुळे कधी तोंडावर शब्दही उलट बोललो, नाही व अजून सुद्धा या प्रेमतृषार्त नेत्रांची दर्शनाने तृप्ती झालेली नाही ॥ दो० २६० ॥

विधिस न बघवे प्रेमा सुंदर । पाडी नीच जननिमिषिं अंतर ॥
हें हि वदत मज बरें न दिसतें । कोण साधु शुचि झाला स्वमतें ॥
माय मंद मी साधु सुचाली । मनिं अस आणित कोटिं कुचाली ॥
कोद्रव कणिस सुशालि फळे कीं । कालव शुक्तिंत मोति मिळे कीं ॥
स्वप्निं हि कोणा दोष न लेशहि । मम अभाग्य सिंधु च अगाध हि ॥
नेणुनि निज अघ परिणामांना । जननिस दाह कुशब्दिं दिला ना ! ॥
हरलों शोधुन हृदयिं सर्वपतिं । मम हितकर एकचि उरलें तरि ॥
सिताराम मत्स्वामी, प्रभु गुरु । गमे होइ परिणामीं हित पुरु ॥

दो० :- साधुसभें प्रभु गुरु निकट तीर्थिं वदें सद्‌भाव ॥
प्रेम कपट सत्यानृता जाणति मुनि रघुराव ॥ २६१ ॥

पण आमच्यातील हे प्रेम दैवाला पाहवले नाही व त्या नीचाने नीच जननीच्या निमित्ताने ( प्रेमांत) अंतर पाडले ॥ १ ॥ पण हे बोलणेसुद्धा मला शोभत नाही. ( कारण) आपल्या स्वत:च्याच मताने कोण साधु व पवित्र झाला ? ॥ २ ॥ माता नीच आणि मी मात्र साधु सदाचारी ? असे मनांत आणताच ते दुराचार्‍यांवर कुचाळी कोटीत आणते ॥ ३ ॥ कोद्रवाचे कणीस कधी उत्तम साळी फळले आहे कां ? व कालवाच्या शिंपीत कधी मोती मिळाले आहेत कां ? ॥ ४ ॥ कोणाच्याच स्वप्नात सुद्धा दोषाचा लेशही नाही; माझ्या अभाग्याचा सागरच अगाध आहे ॥ ५ ॥ माझ्या स्वत:च्या परिणाम न ओळखता मी जननीला दुर्वचनांनी वृथा जाळली नां ? ॥ ५ ॥ सर्वपरींनी मी आपल्या हृदयात सोधून पाहून हरलो; तरी पण माझे हित करणारे एकच ( साधन – आधार) उरले आहे. ॥ ७ ॥ सीताराम माझे स्वामी आहेत आणि गुरु सर्वसर्मर्थ प्रभु आहेत; म्हणूनच वाटते की शेवटी माझे कल्याण होईल. ॥ ८ ॥ मी साधुंच्या सभेत गुरु व स्वामी यांच्या समीप या तीर्थात सद्‍भावाने सांगतो की माझ्यात प्रेम आहे की कपट आहे सत्य आहे की खोटेपणा आहे हे मुनीराज रघुराज जाणतात . ॥ दो० २६१ ॥

भूपति मृत पाळुनी प्रेम-पण । जननि कुमति साक्षीस भुवनगण ॥
पाहवती ना व्याकुळ माता । पुरवासी ज्वरिं दुःसह जळतां ॥
मीच किं सकल अनर्थ मुळाशीं । श्रवुनि कळुनि हें सहुं शूलांसी ॥
ऐकुनि कीं रघुनाथ गत वना । मुनिवेषें सह सिता लक्ष्मणा ॥
पद त्राण विण चालत पायीं । शंकर साक्षि जगें या घायीं ! ॥
बघुनि निषादाचे सुस्नेहा । कुलिश कठिण उर भगन नव्हे हा ॥
अतां येत सब नेत्रिं दिसे धड । सर्व साहवी जीव जनुनि जड ॥
पथिं इंगळ्या सापिणि, ज्या पाहुनि । देति रोष विष विषमहि टाकुनि ॥

दो० :- दो रघुनंदन ते सिता अहित जिचे चित्तास ॥
त्यजुनि तिचा सुत विधि कुणा दे दुःसह दुःखास ॥ २६२ ॥

प्रेमाचा पण व प्रतिज्ञा पालन करुन भूपति मरण पावले ( कारण) जननीला कुमति उत्पन्न झाली याला सर्व भुवने साक्षी आहेत ॥ १ ॥ व्याकुळ झालेल्या माता व दु:सह ज्वराने जळत असलेले पुरवासी, यांच्याकडे पाहवत नाही ॥ २ ॥ रघुनाथ सीता व लक्ष्मणासहित मुनिवेष करुन वनात गेले आणि काही पादत्राण न घालता पायी चालत गेले ॥ ३ ॥ हे ऐकले व शंकर साक्षी आहेत की या घावाने ही मी अद्याप जगलो आहे ? ॥ ४-५ ॥ ( नंतर) निषादाचा सुंदर स्नेह पाहुन सुद्धा ही वज्राहून कठीण छाती दुभंग झाली नाही. ॥ ६ ॥ आता येथे आल्यावर या डोळ्यांनी सर्व चांगले पाहीले, पण हा जड जिवंतपंणीच सर्व ( यातना) सोसवीत आहे ॥ ७ ॥ ज्यांना पाहुन रस्त्यातील इंगळ्या व सापिण यांनी आपला रोष व दु:सह वीष यांचा सुद्धा त्याग केला ॥ ८ ॥ ते दोघे रघुनन्दन व सीता जिच्या चित्तास शत्रू वाटले तिच्या पुत्राला सोडून दैवाने ( तरी) दु:सह दु:ख आणखी कोणास सोसावयास लावावे ? ॥ दो० २६२ ॥

भरत सुवाणि विकल अति ऐकत । आर्ती प्रीति विनय नय संयुत ॥
शोकमग्न तळमळे सभा ती । जणूं कमलवन कीं हिमपातीं ॥
बहुविध कथा पुरातन सांगुनि । भरता प्रबोधिती ज्ञानी मुनि ॥
वदले उचित वचन रघुनंद हि । दिनकर कुल कैरव वन चंद हि ॥
ग्लानी तात वृथा करता अति । जाणुनि ईशाधीन नीव गति ॥
मम मत कीं त्रिभुवनीं त्रिकाळीं । पुण्यश्लोक तात तव खालीं ॥
मनिं आणिति कुटिलता तुम्हांवर । करिति लोक ते घाता इह पर ॥
दोष जननिवर जड ते ठेवित । जिहिं गुरु साधुसभा नहिं सेवत ॥

दो० :- मिटे पाप संसार सबम् अखिल अमंगल नाश ॥
लोकिं सुयश परलोकिं सुख स्मरतां तन नामास ॥ २६३ ॥

आर्ती, प्रीती, विनय व नीती यांनी युक्त असलेली अति व्याकुळ पण श्रेष्ठ अशी भरताची वाणी ऐकताच ॥ १ ॥ ती सर्व सभा शोकमग्न होऊन अशी तळमळू लागली की जणू कमलाच्या वनात हिमपातच झाला ॥ २ ॥ ( तेव्हा) अनेक प्रकारच्या पुरातन कथा सांगून ज्ञानी मुनी वसिष्ठांनी भरताला प्रबोध केला ॥ ३ ॥ मग सुर्य कुळरुपी चंद्रविकासी कमलांच्या वनास चंद्राप्रमाणे प्रसन्न करणारे रघुनन्दन रामचंद्र योग्य असे बोलले ॥ ४ ॥ तात ! जीवांची मति ईश्वराच्या आधीन आहे हे जाणून सुद्धा ग्लानी करता ती व्यर्थ आहे ॥ ५ ॥ माझे मत असे आहे की त्रिभुवनात व तिन्ही काळांत सर्व पुण्यश्लोक व्यक्ती तुमच्या खालीच आहेत ॥ ६ ॥ जे कोणी तुमच्या विषयी कुटिलता मनात आणतील ते लोक आपल्या इहलोकाचा व परलोकाचाही घात करतील ॥ ७ ॥ त्यांनी गुरु व साधुसभा यांचे सेवन केले नाही तेच लोक तुमच्या मातेवर दोष ठेवीत असणार, ते जड आहेत. ॥ ८ ॥ जे कोणी तुमच्या नामाचे स्मरण करतील त्यांचे सर्व पाप, सर्व संसार समाप्त होईल व सर्व अमंगलांचा नाश होऊन इहलोकी कीर्ती व परलोकी सुख मिळेल. ॥ दो० २६३ ॥

सहज सत्य वदुं साख्शी शंकर । भरत राहि महि तुम्हिं राखां तर ॥
व्यर्थ कुतर्क नका करुं ताता । प्रेम वैर ना लपति लपवतां ॥
मुनिगण निकट विहगमृग जमती । बाधक वधिक विलोकुनि पळती ॥
कळे हिताहित पशुपक्ष्या तंव । ज्ञानगुणागर तर तनु मानव ॥
तात तुम्हां मी नाट जाणतों । काय करूं पडलें संकट तों ॥
नृपें त्यजुनि मज सत्य पाळिलें । प्रेम-पणास्तव तनुला त्यजिलें ॥
कष्ट मना तद्वचन भंगतां । त्याहुनि तव संकोच अधिकता ॥
त्यांत दिली गुरुनीं आज्ञा ही । करुं अवश्य जें म्हणाल काहीं ॥

दो० :- भीड सोडुनी मुदित मन सांगा करुं तें आज ॥
सत्यसंध रघ्वर वचन परिसुनि सुखी समाज ॥ २६४ ॥

शंकरास साक्षी ठेऊन स्वभावत:च सत्य आहे ते सांगतो भरत ! ही भूमी तुम्ही राखलीत तरच राहील नाहीतर नष्ट होईल ॥ १ ॥ तात ! निष्कारण कुतर्क करु नका प्रेम व वैर लपवून लपत नाहीत ॥ २ ॥ पशुपक्षी मुनीगणांच्या जवळ जातात, पण बाधा देणारा व्याध पाहिला म्हणजे पळून जातात. मित्र शत्रू पशु पक्षांना सुद्धा कळतात मग मनुष्य देह तर ज्ञान व गुण यांचे आगरच आहे ॥ ४ ॥ तात ! मी तुम्हांला चांगले जाणतो पण काय करुं ! मी तर धर्म – संकटात अडचणीत पडलो आहे ॥ ५ ॥ राजांनी माझा त्याग करुन सत्य पाळले व प्रेमाचा पण पूर्ण करण्यासाठी शरीराचा त्याग केला ॥ ६ ॥ त्यांचे वचन मोडण्यास मनाला फार कष्ट होतात व त्याहीपेक्षा तुमचा संकोच अधिक वाटत आहे ॥ ७ ॥ त्यांच गुरुजीनीही आज्ञा दिली आहे; तरी तुम्ही जे काही म्हणाल ते अवश्य करीन ॥ ८ ॥ तरी प्रसन्न मनाने भीड – संकोच सोडून सांगा म्हणजे ते मी आज करतो सत्यप्रतिज्ञ रघुवराचे वचन ऐकून सर्व समाज सुखी झाला ॥ दो० २६४ ॥

सुरगण सहित सभय सुरराजहि । शोचति हौं बघे किं अकाज हि ॥
परी न करवे उपाय काहीं । मनें सह्रणगत सब रामाही ॥
चिंतुनि पुन्हां परस्पर म्हणती । भक्त भक्ति वश रघुपति असती ॥
स्मरतां अंबरिषा दुरासा । सुर-सुरपतिची परम निराशा ॥
सहती उर बहुकाळ दुःख जंव । प्रल्हादें प्रगटित नरहरि तंव ॥
वदति पिटुनि शिर लागति कानां । सुरगति अतां भरतकरिं जाणां ॥
आन उपाय न दिसतो देवां । मानिति राम सुसेवक सेवा ॥
प्रेमें स्मरा हृदयि भरता तरि । जो गुणशीलें वश रामा करि ॥

दो० :- परिसुनि सुरमत सुरगुरु वदति तुम्ही बहुभाग ॥
सकल सुमंगल मूल जगिं भरत चरणिं अनुराग ॥ २६५ ॥

देवगणांसहित इंद्रराज भयभीत झाले व चिंता करु लागले की कार्यनाश होऊं पहात आहे ॥ १ ॥ पण उपाय तर काही करता येण्यासारखा नाही ! तेव्हा सर्व देव मनाने रामाला शरण गेले ॥ २ ॥ पुन्हा विचार करुन म्हणतात की ( रामाला शरण जाऊन काय उपयोग) रघुपति तर भक्ताच्या भक्तीला वश झाले आहेत ॥ ३ ॥ अंबरीष व दुर्वास ऋषी यांचे स्मरण होताच देव व देवराज इंद्र यांची फार निराशा झाली ॥ ४ ॥ ( तेव्हा कोणी म्हणाले की) देवांनी ( भगवंताला शरण जाऊन सुद्धा) पुष्कळ काळपर्यंत पुष्कळ संकटे जेव्हा सोसली तेव्हा शेवटी प्रल्हादानेच भगवान नृसिंहास प्रगट केले ( आता भक्तालाच शरण गेले पाहीजे) ॥ ५ ॥ कपाळ पिटून एकमेकांच्या कानाशी लागून सांगतात की आता देवांची गति भरताच्यांच हाती आहे ॥ ६ ॥ देवांना आता दुसरा उपायच नाही कारण राम आपल्या सुसेवकाच्या सेवेचा मान राखतात ॥ ७ ॥ तेव्हा आता प्रेमाने भरताचे हृदयांत स्मरण करा कारण त्यांनी आपल्या गुणांनी व शीलाने रामचंद्रांस वश केले आहे ॥ ८ ॥ देवांचे हे मत ऐकून देवगुरु बृहस्पती म्हणाले – देव हो ! तुम्ही महा भाग्यवान आहांत कारण जगात सकल सुमंगलाचे मूळ म्हणजे भरत चरणी अनुराग करणेच आहे ॥ दो० २६५ ॥

सीतापति सेवक पदसेवन । कामधेनुशत समान शोभन ॥
भरत भक्ति तुमचें मनिं आली । साधि कार्य विधि, चिंता कसली ॥
पहा भरत महिमा सुरराजा । स्वभावतांच विविश रघुराजा ॥
देव न भीति मना स्थिर करणें । भरत राम-पडछाया गणणें ॥
सुरचिंता सुरगुरु मत ऐकति । अंतर्यामी प्रभु संकोचति ॥
निजशिरिं भार भरत मनिं जाणति । हृदिं अनुमानें बहु करु लागति ॥
निश्चय केला मनीं विचारें । रामाज्ञेंतचि मम हित सारें ॥
निज पण मोडुनी ममपण राखति । स्नेह कृपा मजवरी अहा ! अति ॥

दो० :- करिति अनुग्रह अमित अति बहुविध सीतानाथ ॥
प्रणमुनि मग वदले भरत जुळुनि जलज युग हात ॥ २६६ ॥

सीतापती सेवकांच्या चरणांची सेवा शंभर कामधेनूंसारखी सुंदर आहे. ॥ १ ॥ भरत – भक्ती तुमच्या मनांत आली त्या अर्थी विधीने तुमचे कार्य साधले ( समजा) आता कसली चिंता करता ? ॥ २ ॥ सुरराजा ! भरताचा महिमा पहा की रघुराजा स्वभावताच विशेष वश आहेत ॥ ३ ॥ तरीपण देवांनो, भीती मुळीच नाही, मन अगदी स्थिर करा, कारण भरत रामाची पडछाया आहेत असे समजा ॥ ४ ॥ देवांची चिंता व सुरगुरुचे मत अंतर्यामी प्रभूंनी ऐकले व त्यांना संकोच उत्पन्न झाला ॥ ५ ॥ आपल्या शिरावर सर्व भार आहे हे भरतांनी जाणले व नानाविध अनुमानाने तर्क हृदयांत करुं लागले ॥ ६ ॥ शेवटी विचारपूरर्वक निश्चय केला की रामाज्ञा पालन करण्यातच माझे सारे हित आहे ॥ ७ ॥ स्वत:चा पण मोडून माझा पण राखला ! माझ्यावर अहा ! अति स्नेह आहे व अति कृपा केली ॥ ८ ॥ सीतानाथांनी ( माझ्यावर) नाना प्रकारे अति अमित अनुग्रह ( प्रसाद) केला ! ( असे मनांत ठरवून) मग प्रणाम करुन कमलासारखे दोन्ही हात जोडून भरत म्हणाले ॥ दो० २६६ ॥

अतां काय वदुं वदवूं स्वामी । कृपा अंबुनिधि अंतर्यामी ॥
गुरू प्रसन्न नाथ अनुकूल हि । नुरति मलिन् मन कल्पित शूल हि ॥
स्वभयें भीत नसुनि चिंता मुळिं । दिनकर दोष न देव ! दिशाभूलिं ॥
मम अभाग्य नी जननि कुटिलता । विधिगति विषमहि काल कठिणता ॥
सकल करुनि पण घाला घालिति । प्रणतपाल पण प्रभु निज पाळिति ॥
ही नव रीति न अपली काहीं । वेदिं विदित जनिं गुप्त हि नाही ॥
जगत अहित, हित स्वामिच साचे । भले भलेपणिं होइ कुणाचे ? ।
देव तरूसा स्वभाव देवा ! । संमुख विमुख न कधिं कोणा वा ॥

दो० :- निकट जाति जाणून तरु छाया शुच शमवीच ॥
मागत अभिमत लभत जगिं रावरंक सुचि नीच ॥ २६७ ॥

कृपासिंधु ! अंतर्यामी ! स्वामी ! मी आता सांगू काय नी सांगवू काय ? ॥ १ ॥ गुरुजी माझ्यावर प्रसन्न आहेत व नाथ मला पूर्ण अनुकूल आहेत ( हे पाहून) माझ्याच मनात निर्माण केलेले काल्पनिक सर्व शूळ नष्ट झाले ( एकही उरली नाही) ॥ २ ॥ मी स्वत:च मानलेल्या भयाने घाबरलो होतो, ( खरे पाहता) चिंता मुळीच नव्हती कोणाची दिशाभूल होते तेव्हा तो सुर्याचा दोष नसतो ॥ ३ ॥ माझे अभाग्य, जननीचा दैवाची प्रतिकूलता आणि काळाचा कठोरपणा या सर्वांनी मिळून प्रतिज्ञेने ( पण करुन) माझ्यावर घाला घातला पण प्रभूंनी आपला प्रणतपाल ( पण) हा ब्रीद पाळला म्हणून वाचलो ॥५॥ ही काही आपली नवी रीत नाही वेदांत व लोकात प्रसिद्ध असून गुप्त नाही ॥ ६ ॥ सर्व जग शत्रू असो, स्वामीच काय ते खरे मित्रहितकर्ते आहेत म्हणून भले – चांगले व्हायचे ते कोणाच्या भलेपणामुळे होणार ? ॥ ७ ॥ ( स्वामींच्याच भलेपणाने) आपला स्वभाव कल्पवृक्षासारखा आहे कधी कोणाला अनुकूल नाही किंवा विमुख प्रतिकूल नाही ॥ ८ ॥ तरु ओळखून जे कोणी जवळ जातील – जातात त्यांचा शोक, चिंता, छाया शमवितेच व मागतांच जे पाहीजे असेल ते सर्वांना जगातील राजा, रंक, चांगला, वाईट, कोणी कसाही असो, पावतो – त्याला मिळते ॥ दो० २६७ ॥

बघुनि नाथ गुरु अति सुस्नेहा । गत, तळमळ, थळ नहिं संदेहा ॥
तेंचि करा करुणाकर आतां । क्षोभ न हो प्रभुचित्तिं जनहिता ॥
जो स्वामिस संकोचिं पाडतो । स्वहित इच्छि, मतिनीच दास तो ॥
सेवक हित तों स्वामी सेवा । करणें, त्यजुनि सकल सुख हेवा ॥
स्वार्थ नाथ फिरतां सर्वाचे । आज्ञा पालन कोटिहिताचें ॥
हें स्वार्थ नि परमार्थ हि सार । फल सब सुकृत सुगति-शृंगार ॥
देव एक अम विनति ऐकणें । उचित गमे तें नंतर करणें ॥
तिलक साज आणिला सकल ही । प्रभो ! मान्य तर करा सुफल ही ॥

दो० :- सानुज धाडुनि विपिनिं मज करणें सकल सनाथ ॥
नातर फिरवा बंधु युग चलतो मी प्रभुसाथ ॥ २६८ ॥

नाथ व गुरु यांचा अति उत्तम स्नेहास पाहून माझी सर्व तळमळ गेली व संदेहाला स्थान राहीले नाही ॥ १ ॥ करुणासागर ! आता तेच करावे की ज्याच्या योगाने दासाच्या हितासाठी प्रभूच्या मनात क्षोभ होणार नाही ॥ २ ॥ स्वामीला संकोचात पाडून आपले हित इच्छितो तो सेवक नीच बुद्धि होय ॥ ३ ॥ सकल सुख व लोभ सोडून स्वामींची सेवा करणे हेच सेवकाचे हित होय. ॥ ४ ॥ नाथ ! परत फिरण्यात सर्वांचे स्वार्थ साधतील पण आज्ञापालन करणे कोटी हिताचे आहे ॥ ५ ॥ हेच स्वार्थ आणि परमार्थाचेही सार आहे हे सकल सुकृताचे फळ आहे आणि सुगति मुक्ती रुपी स्त्रीचा शृंगार आहे ॥ ६ ॥ राज्यतिलक ( अभिषेक) करण्याची सर्व तयारी आणली आहे, मान्य असेल तरच हे प्रभो ! ती सुफल करावी ॥ ७-८ ॥ अनुजासह मला वनात पाठवून आपण सर्वांना सनाथ करावे ( अयोध्यत परत जावे) अथवा दोघा भावांना ( लक्ष्मण शत्रुघ्न) परत पाठवावेच मी प्रभूंच्या बरोबर चलतो ॥ दो० २६८ ॥

नातर बंधु तिघे वनिं जातिल । सीतेसह रघुराजा फिरतिल ॥
प्रभुमन जेणें प्रसन्न व्हावें । करुणा सागर तेंच करावें ॥
देव दिला मम शिरिं अति भारहि । मजला नीति न धर्म विचारहि ॥
स्वार्थास्तव सगळें मी वदतों । आर्ताचें मनिं विवेक नसतो ॥
दे उत्तर ऐकुन आज्ञेला । तो सेवक लाजवि लाजेला ॥
तो मी अवगुण उदधि अगाधू । स्वामी स्नेहें वानिति साधू ॥
अतां कृपालु मला तें रुचतें । ज्यांत नाथ अन नहिं संकुचतें ॥
प्रभुपद शपथ वदें सद्‌भावें । विश्व सुमंगल एक उपावें ॥

दो० :- सुप्रसन्न संकोचविण प्रभु जें ज्या कथितील ।
तें करितिल शिरिं धरुनि सब विघ्नपेंच सुटतील ॥ २६९ ॥

किंवा तिघे भाऊ वनात जातील आणि सीतेसह रघुराज परत जातील ॥ १ ॥ जेणें करुन प्रभूंचे मन प्रसन्न होईल तेच करुणासागर प्रभु ! आपण करावे ॥ २ ॥ देव ! आपण माझ्या शिरावर अतिभार ( बोजा) दिला आहे, पण मला नीती विचार नाही की धर्म विचारही माहीती नाही ॥ ३ ॥ मी जे बोलत आहे ते स्वार्थासाठी बोलत आहे व आर्ताच्या मनांत विवेक नसतो ॥ ४ ॥ स्वामींची आज्ञा ऐकून जो उत्तर देतो तो सेवक लाजेला लाजवतो ॥ ५ ॥ ( असा जो) तो मीच अवगुणांचा अगाध सागर असून स्वामी स्नेहामुळे मला चांगला साधु म्हणतात ( साधु म्हणून प्रशंसा करतात इतकेच) ॥ ६ ॥ आतां कृपालु ! ज्यात नाथांच्या मनाला संकोच वाटणार नाही ते करणे मला आवडते ॥ ७ ॥ प्रभूंच्या पायांची शपथ घेऊन सद्‍भावनेने सांगतो की विश्वाचे सुमंगल या एकाच उपायाने होईल ॥ ८ ॥ संकोच रहित सुप्रसन्न ( मनाने) होऊन प्रभु ज्यांना जे सांगतील ते सर्वजण शिरसामान्य करतील व ( अशानेच) सर्व विघ्ने व पेच अडचणी टळतील ॥ दो० २६९ ॥

भरत वचन शुचि परिसुनि हर्षति । ’साधु साधु’ सुर सुमनें वर्षति ॥
अडचणींत कोसलपुरवासी । प्रमुदित मन तापस वनवासी ॥
चुप रघुनाथ बसति संकोची । प्रभुगति बघुनि सभा सब शोची ॥
जनकदूत ते अवसरिं ठाकति । श्रवुनि वसिष्ठ शीग्र बोलावति ॥
प्रणमुनि जेव्हां रामा पाहति । दिसता वेष दुःख अति पावति ॥
दूतां मुनिवर झाले पुसते । वदा विदेह भूप कुशला तें ॥
तैं संकोचुनि महिं शिर नमवुनि । वदले चर वर करांस जुळवुनि ॥
स्वामी सादर पुसतां आपण । नाथ ! होय तें कुशल कारण ॥

दो० :- नातर कोसलनाथ सह गता कुशलता नाथ ! ॥
मिथिलाऽयोध्या फार, जग झालें सकल अनाथ ॥ २७० ॥

भरताचे पवित्र भाषण ऐकून देवांना हर्ष झाला व ‘ साधु साधु ’ ( शाबास शाबास) म्हणून त्यांनी पुष्पवृष्टी केली ॥ १ ॥ सगळे अयोध्यावासी लोक अडचणीत पडले; तपस्वी व वनवासी ! यांना फार आनंद झाला ॥ २ ॥ संकोची स्वभावाने रघुनाथ चुप बसले – राहीले व ही प्रभूंची दशा पाहून सर्व सभा चिंता शोकमग्न झाली. ॥ ३ ॥ जनक दूतांचे आगमन – ( सर्व सभा चिंतातुर झाली आहे) त्या समयी जनकराजांचे दूत येऊन ठेपले. हे ऐकतांच वसिष्ठांनी त्यांस लवकर बोलावून घेतले ॥ ४ ॥ त्यांनी मुनिवरांस प्रणाम केला व रामाकडे पाहीले तेव्हा तो मुनीवेष दिसताच त्यांना फार दु:ख झाले ॥५॥ मुनिश्रेष्ठ दूतांना म्हणाले की विदेहराजांचे कुशल सांगा पाहूं ! ॥ ६ ॥ त्यांनी लाजेने जमिनीकडे मान लवविली व ते चतुर दूत हात जोडून म्हणाले की ॥ ७ ॥ स्वामी ! आपण आदराने विचारता हेच नाथ ? कुशलाला कारण झाले (होत) आहे ॥ ८ ॥ नाथ ! नाही तर कोशलनाथांच्या बरोबर कुशलता ( अमरावतीत) गेली होती मिथिला व अयोध्या फारच अनाथ झाल्या असून सर्व जगच अनाथ झाले आहे ॥ दो० २७० ॥

कोसलपतिगति जनकजनिं कळे । लोक शोकवश होति बावळे ॥
दिसले तदा विदेह जयांसी । नाम सत्य वाटे न तयांसी ॥
राणि कुचाळि कळत नरपाला । सुचे न मणिविण जेवीं व्याला ॥
भरत राज्य रघुवर वनवासहि । मिथिलेश्वर हृदिं भीति विषादहि ।
नृपति पुसति बुध सचिव समाहीं । सांगा उचित काय तें आजीं ॥
पेंच उभयपरिं बघत कोशले । चला रहा वा कुणि न बोलले ॥
धरुनि धीर नृपती सुविचारी । धाडिति चार चतुर चर नगरीं ॥
भरत सुभाव कुभाव पहावे । न कळों देतां सत्वर यावे ॥

दो० :- गत नगरींचर भरतगति कृति जाणून बघून ॥
चित्रकूटि निघतां भरत हेर जाति परतून ॥ २७१ ॥

कोसलपती दशरथ राजांची गति ( मृत्यु) जनकांच्या लोकांत कळली तेव्हा सगळे लोक शोकाकुल होऊन अगदी भ्रमिष्टासारखे झाले ॥ १ ॥ त्यावेळी विदेह ज्यांना दिसले त्यांना ‘ विदेह ’ हे नांव सत्य आहे असे वाटले नाही ॥ २ ॥ राणीने केलेली दुष्टता राजा जनकांना कळताच मणी गेला म्हणजे सर्पाला जसे काही सुचत नाहीसे होते तसे राजांना सुचत नाहीसे झाले ॥ ३ ॥ भरताला राज्य व रघुवरांस वनवास ( हे कळताच) मिथिलेश्वरांच्या हृदयांत सुद्धा विषाद उत्पन्न झाले ॥ ४ ॥ ( तेव्हा) नृपतींनी बुध व सचिव यांच्या समाजात ( सभेत) विचारले की आज ( अशा परिस्थितीत) काय करणे योग्य ते सांगा ॥ ५ ॥ अयोध्येकडे बघता ( विचार करता) दोन्ही प्रकारे पेच पडल्याने चला ( अयोध्येला) का रहा ( नका जाऊ) असे कोणीच म्हणाले नाहीत ॥ ६ ॥ धीर धरुन सुविचारी नृपतींनी अयोध्या नगरांत चर चतुर हेर पाठवले ॥ ७ ॥ ( त्यांना सांगीतले की) भरताची भावना चांगली आहे की दुष्ट आहे याचा छडा लावून कोणाला कळूं न देता त्वरेने परत या. ॥ ८ ॥ तेव्हा हेर अयोध्या नगरांत गेले; भरताच्या दशेवरुन त्याची भावना जाणली, त्याची कृती पाहीली आणि भरत चित्रकूटास जाण्यास निघाले तेव्हा हेर परतले ॥ दो० २७१ ॥

दूत येउनी भरत-कृती गति । जनक समाजिं यथामति वर्णिति ॥
तैं गुरु परिजन सचिव महीपति । स्नेह शोकवश विकल सकल अति ॥
धरुनि धीर भरता वाखाणिति । सुभटां दरोग्यांस बोलाविति ॥
घर-पुर देशिं सुरक्षक राखुनि । हय गज रथ बहु याने साजुनि ॥
द्वघटि साधुनी शीघ्र निघाले । कृत विश्राम न पथिं महिपालें ॥
स्नान पहाटे प्रयागिं उरकति । निघुनि उरतुं यमुना सब लागति ॥
आम्हां खबरिस धाडिति नाथा । असें म्हणुनि महिं नमिनी माथा ॥
सहा सात सह किरात धाडिति । चरां परत मुनि नाथ पाठविति ॥

दो० :- जनकागमना ऐकुनी हर्षित अवधसमाज ॥
रघुनंदन संकोचती अति सुचिंत सुरराज ॥ २७२ ॥

दूतांनी परत येऊन भरताची कृती व दशा जनकांच्या यथामति वर्णन करुन सांगितली ॥ १ ॥ तेव्हा ते ऐकून गुरु – शतानंद राजपरिवार, सचिव, महीपती, व इतर सगळे लोक स्नेहाने व शोकाने अति व्याकुळ झाले ॥ २ ॥ धीर धरुन जनक राजांनी भरताची प्रशंसा केली आणि चांगले वीर व दरोगे यांना बोलावून घेतले ॥ ३ ॥ घर, नगर व देश यांच्या संरक्षणासाठी चांगले रक्षक ठेवून हत्ती, घोडे रथ, व इतर वाहने सज्ज करविली ॥ ४ ॥ मुहूर्त साधून महिपाल शिघ्र निघाले व त्यांनी मार्गात झोप, विश्रांती घेतली नाही ॥ ५ ॥ ( आज) पहाटेस प्रयागांत स्नान करुन निघाले व सर्व यमुना उतरुं लागले ॥ ६ ॥ तेव्हा नाथ ! आम्हाला खबरीसाठी पाठविले असे म्हणून दुतांनी जमिनीवर मस्तक नमवून नमस्कार केला ॥ ७ ॥ मुनिनाथांनी सहा सात किरातांना त्यांच्याबरोबर दिले व दूतांना निरोप देऊन परत पाठवले ॥ ८ ॥ जनकांच्या आगमनाची बातमी ऐकून सर्व अयोध्या समाजाला हर्ष झाला. रघुनंदनास अति संकोच वाटू लागला व सुरराजाला अति चिंता पडली. ॥ दो० २७२ ॥

ग्लानिगलित कुटिला कैकेई । सांगे कोणां दूषण देई ? ॥
असें गणुनि मनिं मुदित नारिनर । राहुं चर दिन होइ फार बरं ॥
अशापरीं तो वासर सरला । प्रातः स्नाना समाज वळला ॥
स्नान करुनि पूजिति नर नारी । गणपति गौरि पुरारि तमारी ॥
रमारमण चरणां मग वंदुनि । विनविति सांजलि, पदरां पसरुनि ॥
राजाराम जानकी राणी । अवध मोद अवधी नृप-धानी ॥
स्ववश वसो सुखी सहित समाजा । राम अक्रोत भरत युवराजा ॥
सकलां या सुखसुधें सिंचणें । जीवन लाभ देव जगिं देणें ॥

दो० :- गुरु समाज बंधूं सहित रामराज्य नगरांत ॥
होवो असतां राम नृप अयोध्येंत देहांत ॥ २७३ ॥

कुटिल कैकेयी ग्लानीने गळून गेली पण सांगणार कोणाला व दोष कोणाला देणार ! ॥ १ ॥ स्त्री पुरुषांनी असा विचार केला की फार बरं झालं; या निमित्ताने आणखी चार दिवस राहू तरी म्हणून त्यांना आनंद झाला ॥ २ ॥ अशा प्रकारे तो दिवस गेला व प्रात:काळ होताच सर्व लोक स्नानाला जाऊं लागले ॥ ३ ॥ स्त्रिया व पुरुष स्नान करुन गणपती, गौरी, पुराजी, सूर्य व विष्णू ( पंचायतन) यांची पूजा करु लागले. मग चरणांस वंदन करुन पुरुष हात जोडून व स्त्रिया पदर पसरुन विनवितात की - ॥ ४-५ ॥ राम राजे होवोत, जानकी राणी होवो व आनंदाची सीमा अशी राजधानी अयोध्या समाजासहित स्वतंत्रतेत व सुखात ( पहिल्या सारखी) वसो आणि राम भरतांस युवराज करोत ॥ ६-७॥ देवा ! या सुखारुपी सुधेचे सर्वांवर सिंचन करावे व जगात जन्म घेतल्याचा लाभ व्हावा ॥ ८ ॥ गुरु, सर्व समाज व रामबंधु यांच्या सहित अयोध्या नगरीत रामराज्य होवो, व राम राजे असता अयोध्येत मरण येवो ( देहान्त होवो अशी प्रार्थना सर्व करीत आहेत) ॥ दो०२७३ ॥

* * * * *

श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु

GO TOP