॥ श्रीरामचरितमानस ॥

(मराठी अनुवाद)

॥ किष्किंधाकाण्ड ॥

॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥

अध्याय २ रा



Download mp3

चले वदुनि हें अति अभिमानी । तृण समान सुग्रीवा मानी ॥
भिडले उभय वालि अति तर्जे । मारुनि मुष्टि महाध्वनि गर्जे ॥
तैं सुग्रीव विकल अति पळला । मुष्टि-मार वज्रासम गमला ॥
कथित किं मी रघुवीर कृपाल हि । बंधु न हा साक्षात् मम काळ हि ॥
एकरूप तुम्हिं भाउ भासलां । भ्रम पडुनी मी त्या न मारला ॥
सुगल देहि लावतां कराला । पीडा जाउनि कुलिश जहाला ॥
गळां घालुनी प्रसून-माला । धाडिति देउनि बला विशाला ॥
मग बहुपरिं ते लढूं लागती । विटपांश्रयिं रघुराज पाहती ॥

दो० :- बहु छल बल सुग्रीव करि कचला मनीं भिऊन ॥
मारिति वालिस राम तैं हृदयीं शर ताणून ॥ ८ ॥

(तारेला) असे सांगून तो अति अभिमानी वाली चालू लागला. (कारण) सुग्रीव त्याला अगदी कस्पटासमान वाटत होता. ॥१॥ वाली आणि सुग्रीव हे दोघे भिडले (मल्लयुद्ध सुरू झाले). वाली सुग्रीवाला अति धाकदपटशा घालवून दटावू लागला व मुष्टिप्रहार त्याला वज्रासारखा वाटला(लागला). ॥३॥ कृपाळू रघुवीर मी तुम्हाला सांगितलेच होते की हा माझा बंधु नसून प्रत्यक्ष माझा काळच आहे. ॥४॥ तुम्ही दोघे भाऊ रूपाने सारखे दिसलांत व त्यामुळे माझ्या मनांत भ्रम उत्पन्न झाला म्हणून मी त्याला मारला नाही. ॥५॥ (असे राम म्हणाले आणि) सुग्रीवाच्या देहावरून रघुनाथाने आपला हात फिरवला; त्या बरोबर सर्व पीडा जाऊन तो देह वज्र बनला. ॥६॥ (खुणेसाठी) त्याच्या गळ्‌यात फुलांची माळ घातली व विशाल बल देऊन त्याला पुन्हा युद्धाला पाठवला. ॥७॥ पुन्हा ते दोघे नाना प्रकारे लढू लागले व रघुराज वृक्षाच्या आश्रयाने (त्यांचे युद्ध) पाहू लागले. ॥८॥ दो. सुग्रीवाने नाना प्रकारे छल व बळ यांचा उपयोग केला पण तो भिऊन मनात कचरला तेव्हा रामचंद्रांनी धनुष्य ताणून वालीच्या हृदयातच बाण मारला ॥दो.८॥

पडे विकल महिं सायक लागुनि । उठुनि बसे प्रभु समोर पाहुनि ॥
श्याम गात्र शिरिं जटा बांधिले । अरुण नयन शर चाप सज्जिले ॥
घडि घडि बघुनि चित्त पदिं लाउनि । सुफल जन्म गणि प्रभुस ओळखुनि ॥
प्रीति हृदयिं मुखिं कठोर वचनें । निरखुनि रामाकडे मग म्हणे ॥
स्वामी धर्मास्तव अवतरलां । व्याधासम मारलात मजला ॥
मी वैरी, प्रिय सुकंठ गमला । दोष कोण नाथ ! किं मज वधला ॥
अनुजवधू भगिनी सुतनारी । श्रुणु शठ कन्या सम या चारी ॥
यांस कुदृष्टीनें जो पाही । वधतां त्यास जरा अघ नाहीं ॥
मूढ धरिशि तू अति अभिमाना । नारीमंत्र न घेशी कानां ॥
मम भुजबल आश्रित तो कळुनी । मारूं बघसि अधम अभिमानी ॥

दो० :- राम पहा ! स्वामीपुढें युक्ति न चले मदीय ॥
प्रभु ! अझुनि हि मी पापी अंतीं गती त्वदीय ॥ ९ ॥

बाण लागून वाली व्याकुळ होऊन जमिनीवर पडला; पण समोर प्रभू आहेत असे पाहून तो उठून बसला. ॥१॥ श्याम शरीर, मस्तकावर जटा बांधलेले, लाल नेत्र आणि हातात बाण व सज्ज केलेले धनुष्य; ॥२॥ अशा त्या रूपाकडे वारंवार बघुन चित्त चरणावर लावले व आपला जन्म सुफल झाला असे त्याने मानले. कारण राम प्रभू आहेत हे त्याने ओळखले. ॥३॥ हृदयात प्रीती आहे पण मुखात कठोर वचने आहेत (असा) वाली रामाकडे पाहून म्हणाला, ॥४॥ स्वामी ! तुम्ही धर्मासाठी अवतार घेतला असून मला व्याधाप्रमाणे मारलात ! ॥५॥ मी आपला वैरी कां व सुग्रीव आपल्याला प्रिय का वाटला ? व माझा असा दोष कोणता की नाथ ! तुम्ही माझा वध केलात ॥६॥ रे शठा, ऐक धाकट्‌या भावाची बायको, बहीण, पुत्राची बायको (सून) व कन्या या चौघी कन्येसारख्या आहेत ॥७॥ यांच्याकडे वाईट दृष्टीने पाहतो त्याचा वध करण्यात काहीही पाप नाही. ॥८॥ रे मूढा ! तुला अतिशय अभिमान झाला होता म्हणून तुझ्या स्त्रीने केलेला हितोपदेश तू ऐकला नाहीस. ॥९॥ आणि सुग्रीव माझ्या बाहुबलाचा आश्रित आहे हे तुला (तुझ्या पत्‍नीकडून कळून सुद्धा) तू त्याला मारू पहात होतास, इतका अधम अभिमानी होतास. ॥१०॥ दो. (वाली म्हणाला) हे पहा राम ! स्वामींच्या पुढे माझ्या युक्त्या प्रयुक्त्या टिकत नाहीत. पण हे प्रभू ! अंतकाळी मी तुम्हाला शरण आलो आहे, तरी मी अजून पापीच ! ॥दो. ९ ॥

श्रवत राम अति कोमलवाणी । वालि-शिरीं स्पर्शति निजपाणी ॥
अचल करूं तनु राखा प्राणां । वालि म्हणे श्रुणु कृपानिधाना ॥
जन्म जन्म मुनि झिजति साधनीं । अंतीं राम न येइ आननीं ॥
नाम बळें ज्या शंकर काशीं । दे सकला सम गति अविनाशी ॥
मम लोचन-गोचर आला तो । योग पुन्हां प्रभु ! असा किं येतो ॥
छं० :- तो नयन गोचर यद्‌गुणां श्रुति नेति नित्यहि वानती ॥
मन-पवन-जय, गो निरस करुनी ध्यान, मुनि कधिं पावती ॥
प्रभु बघुनि मज अभिमान वश अति, वदति तनु राखी तरी ॥
तो कवण शठ हटि छाटि सुरतरु बाभळिस कुंपण करी ॥ १ ॥
अतां कृपेनें मज पहा, द्या नाथ जो वर मागतो ॥
ज्या योनिं कर्मे जन्म तेथे राम पद-अनुराग तो ॥
प्रभु ! तनय मम सम विनय बल कल्याणदा ! हा स्वीकरा ॥
करिं धरुनि सुरनरनाथ ! अपला दास अंगद हा करा ॥

दो० :- रामपदीं प्रीतिनें दृढ वाली त्यजि देहास ॥
सुमन-माळ जशि कंठिंची कळत न गळत गजास ॥ १० ॥

अतिकोमल मनाच्या रामचंद्रांनी ती दीन कोमल वाणी ऐकताच वालीच्या मस्तकास आपल्या हाताने स्पर्श केला. ॥१॥ (म्हणाले की) तुमची तनू अचल करतो, प्राण ठेवा हवेतर, वाली म्हणाला हे कृपानिधाना ! ऐका­ ॥२॥ मुनी जन्मोजन्मी साधना करून देह झिजवितात तरी अंतकाळी मुखात ‘राम’ हे नाम सुद्धा येत नाही. ॥३॥ ज्याच्या नामाच्या बळाने शंकर काशी क्षेत्रात सर्वांना समान अविनाशी अशी गति ते (मुक्ती) देतात; ॥४॥ तो (परमात्मा राम) माझ्या नेत्रांचा विषय झाला आहे. प्रभू असा योग पुन्हा येईल काय ? (शक्यच नाही) ॥५॥ छंद­ ॥ ज्यांच्या गुणांचे वर्णन श्रुती सुद्धा नेति नेति म्हणून नित्य करीत असतात व ज्याची प्राप्ती पवन (=प्राण) आणि मन यांच्यावर विजय मिळवून, इंद्रिये नीरस करून, ध्यान धरून, कधी तरी मुनी करू शकतात तो परमात्मा (मरताना) माझ्या नेत्रांचा विषय झाला आहे परंतु मी अति अभिमान वश आहे हे पाहून प्रभू मला म्हणाले की देह ठेवा. पण असा कोण महामूढ असेल की हट्टाने कल्पतरूला तोडतो आणि बाभळीला त्याचे कुंपण घालील ? ॥१॥ नाथ ! आता माझ्याकडे कृपेने पहा व मागतो तो वर मला द्या, ज्या योनीत कर्माने जन्म येईल तेथे हे राम ! तुमच्या पायाच्या ठिकाणी अनुराग असावा हे प्रभो ! कल्याण देणार्‍या ! हा माझा मुलगा विनय, बल इ. गुणांनी माझ्या सारखाच आहे, त्याचा आपण स्वीकार करावा व आपल्या हाती धरून हे सुरनाथ ! या अंगदाला आपला दास करावा. ॥२॥ ॥ दो. ॥ रामचरणांच्या ठिकाणी दृढ प्रीती धरून वालीने देहाचा असा त्याग केला की हत्तीच्या गळ्‌यातील माळ आपोआप गळून पडावी व त्याला अजिबात भानही नसावे तसे ॥दो. १०॥

वालिस राम धामिं निज धाडति । सकल नगरजन विव्हळ धावति ॥
तारा विविधा करी विलपना । सुटले कुंतल तनू-भान ना ॥
तारा विकल दिसत रघुराया । दिधले ज्ञान निरसली माया ॥
क्षितिजल पावक गगन समीर । पंच-रचित अति अधम शरीर ॥
प्रगट पुढें तनु ती निद्रित तव । जीव नित्य रडसी कोणास्तव ॥
उपजे ज्ञान चरणिं मग नमुनी । परम भक्ति वर घेइ मागुनी ॥
दारुनारि सम सबजीवांप्रति । उमे ! राम गोस्वामि नाचवति ॥
तैं सुग्रीवा आज्ञा दिधली । क्रिया मृताची सविधि साधली ॥
राम कथिति अनुजा समजाउनि । सुग्रीवास राज्य द्या जाउनि ॥
रघुपति चरणीं मस्तक नमलें । रघुनाथाज्ञें सकल चालले ॥

दो० :- लक्ष्मण बोलावी त्वरें पुरजन विप्रसमाज ॥
राज्य सुग्रीवा अर्पिलें अंगद कृत युवराज ॥ ११ ॥

रामचंद्रांनी वालीला निजधामास पाठवले. सर्व नगरलोक व्याकुळ होऊन पळत सुटले. ॥१॥ तारा नाना प्रकारांनी विलाप करू लागली व तिचे केसही सुटले आणि तिला देहभानही राहीले नाही. ॥२॥ तारा विकल व्याकुळ झाली आहे असे दिसताच रघुनाथांनी तिला ज्ञान दिले व तिची माया दूर सारली. ॥३॥ पृथ्वी ­जल ­अग्नि­ आकाश व वायु या पंचतत्त्वांचे झालेले ते अधम शरीर. ॥४॥ ते तर तुझ्यासमोर प्रगाट आहे व ते झोपलेले आहे, आणि जीव तर नित्य आहे, मग तू रडतेस ती कोणासाठी ? तारेला ज्ञान प्राप्ता झाले तेव्हा ती प्रभूच्या पाया पडली व तिने परमभक्तीचा वर मागून घेतला. ॥६॥ उमे ! इंद्रियांचे स्वामी राम सर्व जीवांना काष्ठपुतळी सारखे नाचवीत असतात. ॥७॥ मग रघुपतींनी सुग्रीवाला आज्ञा केली व मेलेल्या वालीची उत्तर क्रिया यथाविधी केली गेली. ॥८॥
सुग्रीव राज्याभिषेक -
रामचंद्रांनी लक्ष्मणास समजावून सांगितले व म्हणाले की जाऊन सुग्रीवाला राज्य द्या. ॥९॥ रघुपतींच्या चरणांना सर्वांनी नमस्कार केले व रघुनाथाच्या आज्ञेने सगळे किष्किंधेस निघाले. ॥१०॥ लक्ष्मणाने जाऊन त्वरेने नगरलोक व ब्राह्मण समाज यांना बोलावून आणले व सुग्रीवास राज्य अर्पण करून अंगदास युवराज केला. ॥११॥

उमे रामसम-हित जगतांतहि । गुरु पितृ माय न बंधू प्रभु नहि ॥
सुर नर मुनि सर्वांची रीती । स्वार्थास्तव सब करिती प्रीती ॥
वालिभयें व्याकुळ दिनरातीं । तनु सव्रण चिंताज्वर छातीं ॥
तो सुकंठ केला कपिराव । अति कृपालु रघुविर-स्वभाव ॥
कळुनिहि अशा प्रभुस परिहरती । विपज्जालिं नर कां ना पडती ॥
मग सुगला बोलावुनि अणविति । नानाविध नृपनीती शिकविति ॥
प्रभु वदले श्रुणु सुगल हरीश्वर । पुरिं न जाउं दश चारहि वत्सर ॥
ग्रीष्म विगत वर्षाऋतु आला । निकट निवास करिन शैलाला ॥
अंगद सहित राज्य तुम्हिं करणें । संतत मनिं मम कार्या स्मरणें ॥
भवनीं जैं सुग्रीव परतले । गिरीं प्रवर्षण राम हि वसले ॥

दो० :- देव ठेवती गिरिगुहा पूर्विच रुचिर करून ॥
राम कृपानिधि काहिं दिन वसतिल हें जाणून ॥ १२ ॥

उमे ! या जगात रामचंद्रासारखा हितकर्ता, गुरू, पिता, माता, बंधू स्वामी इ. कोणी नाही. ॥१॥ देव मनुष्य मुनी इ. सर्वाचीच रीत आहे की स्वार्थासाठीच सगळे प्रेम करतात. ॥२॥ वालीच्या भयाने रात्रंदिवस व्याकुळ झालेला शरीर जखमांनी भरलेले व चिंताज्वराने छातीत जळत असलेला ॥३॥ जो सुग्रीव त्याला कपीराज केला ! असा रामचंद्रांचा अतिकृपाळू स्वभाव आहे. ॥४॥ हे कळून सुद्धा जे अशा प्रभूचा त्याग करतात ते मनुष्य विपत्तींच्या जाळ्‌यात का नाही अडकणार ? ॥५॥ मग सुग्रीवाला बोलावून आणविला व त्याला नाना प्रकारे राजनीती शिकविली. ॥६॥ आणि प्रभू म्हणाले, कपीश्वर ! ऐका, मला चौदा वर्षे नगरीत जायचे नाही. ॥७॥ ग्रीष्म ऋतू संपून आता वर्षा आला ऋतू आला आहे. तेव्हा मी आता डोंगरावरच वस्ती करेन. ॥८॥ तुम्ही अंगदासह राज्य करा (पण) माझे कार्य मनात स्मरण करा (विसरू नका). ॥९॥ जेव्हा सुग्रीव आपल्या भवनास परत गेले तेव्हा राम प्रवर्षण गिरीवर राहिले. ॥१०॥ दो. कृपानिधी राम येऊन काही दिवस निवास करतील जे जाणून देवांनी एक सुंदर गुहा तयार करून ठेवली होती. ॥ दो० १२ ॥

* * * * *

श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु

GO TOP