॥ श्रीरामचरितमानस ॥

(मराठी अनुवाद)

॥ उत्तराकाण्ड ॥

॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥

अध्याय ३ राDownload mp3

पुरी अयोध्या सजिली सुंदर । सुमनवृष्टिझड लाविति निर्जर ॥
वदति राम अणवुनि दासांला । प्रथम सख्यांना स्नानें घाला ॥
श्रवत वचन जिथं तिथं जन धावति । शीघ्र सुग्रिवादिकाअंस न्हाणिति ॥
बोलावुनि भरतास कृपाब्धीं । स्वकरें उकलिति जटांस आधीं ॥
तिन्ही बंधुनां स्नानें घालति । भक्तवत्सलहि कृपालु रघुपति ॥
भरतभाग्य नी प्रभुकोमलता । शेष कोटिशत थकतिल वदतां ॥
स्वतां जटा निज राम उकलिती । गुरु आज्ञेनें स्नाना करिती ॥
प्रभु सुस्नात भूषणें घालति । अंग अनंग बघुनि शत लाजति ॥

दो० :- सासु सादर जानकिस शीघ्र करिति सुस्नात ॥
दिव्य वसनं वर भूषणें प्रत्यंगीं सजतात ॥ ११रा ॥
राम वाम दिशिं रूपगुण-खनि राजते रमा हि ॥
बघुनि मुदित सब माता गणुनि सुफल जन्मा हि ॥ ११म ॥
श्रुणु खगेश त्या अवसरीं ब्रह्मा शिव मुनि वृंद ॥
आले बसुनि विमानिं सब सुर बघण्या सुखकंद ॥ ११चंद्र ॥

अयोध्यापुरी सुंदर शृंगारली गेली देवांनी तर पुष्पवृष्टीची झडच लावली ॥ १ ॥ रामचंद्रानी सेवकांना बोलावून घेऊन सांगीतले की प्रथम सुग्रीवादि माझ्या मित्रांना मंगल स्नाने घाला ॥ २ ॥ आज्ञा ऐकताच सेवक धावत गेले व सुग्रीवादिकांना सर्वांना त्वरेने मंगल स्नाने घातली ॥ ३ ॥ कृपासागराने भरतास बोलावून आपल्या हातांनी त्याच्या जटा उकलल्या ॥ ४ ॥ नंतर रामचंद्रांनी भरत, लक्ष्मण, शत्रुघ्नांना (अभ्यंग) स्नाने घातली रघुपती असे भक्तवत्सल व कृपालु आहेत ॥ ५ ॥ भरताचे भाग्य आणि प्रभुची कोमलता यांचे वर्णन करताना शेकडो कोटी शेषही थकतील ॥ ६ ॥ मग रामचंद्रांनी आपल्या जटा स्वत:च मोकळ्या केल्या व गुरुजींची आज्ञा घेऊन स्नान केले ॥ ७ ॥ स्नान झाल्यावर प्रभूंनी आपल्या अंगावर भूषणे धारण केली तेव्हा प्रभूची शरीर शोभा पाहून शेकडो मदन लाजले ॥ ८ ॥ (तिकडे) सासवांनी सीतेला त्वरेने अभ्यंग स्नान घातले व दिव्य वस्त्र-भूषणांनी तिला प्रत्यंगी सजविले ॥ दो० ११ रा ॥ रुप, गुण यांची खाण जानकी रामचंद्रांच्या डाव्या बाजूस शोभत आहे त्या दोघांना पाहून सर्व माता आपला जन्म सुफल झाला असे जाणून आनंदित झाल्या ॥ दो० ११ म ॥ हे खगराज ऐक त्यावेळी ब्रह्मदेव शंकर सर्व मुनीवृंद आणि सगळे सुर सुखकंदाला पाहण्यासाठी विमानात बसून आले ॥ दो० ११ चंद्र ॥

प्रभुस बघुनि मुनि मनिं अनुरागति । त्वरित दिव्य सिंहासन मागति ॥
रविसम तेज, न जा‍इ वर्णिलें । विप्रां राम नमुनि शिर बसले ॥
जनकसुतेसह रघुराजाला । बघुनी प्रहर्ष मुनि निकराला ॥
वेदमंत्र तैं द्विज उच्चारिति । नभिं सुरमुनि जय जयति पुकारिति ॥
प्रथम तिलक मुनि वसिष्ठ करती । मग सब विप्रां देति अनुमती ॥
माता पुत्रा पाहुन हर्षति । पुनःपुन्हां आरति ओवाळति ॥
विप्रां दान विविध विध दिधलें । याचक सकल अयाचक केले ॥
सिंहासनीं त्रिलोकी स्वामी । देव वाजविति दुंदुभि नामी ॥

छं० :- गंधर्व किंनर गाति, पुष्कळ दुंदुभी नभिं वाजती ।
अप्सरा नाचति वृंद्, परमानंद सुर मुनि पावती ॥
भरतादि अनुज विभीषणांगद हनुमदादि सभोंवती ।
धृत छत्रचमरें व्यजन धनु असि चर्म शक्ती शोभती ॥ १ ॥
श्रीसहित दिनकर वंश भूषण काम बहु छवि शोभते ।
नव अंबुधर वर गात्रिं अंबर पीत सुरमन मोहतें ॥
मुकुटांगदादि विचित्र भूषण अंगिं अंगिं सुसज्ज; जे ।
अंभोज नयन विशाल उर भुज; निरखिती नर धन्य ते ॥ २ ॥
दो० :- ती शोभा समाज सुख वदतां ये न खगेश ! ॥
शेष गिरा श्रुति वर्णिती तो रस जाणि महेश ॥ १२रा ॥
भिन्न भिन्न करुनी स्तुती सुर गत जिथे स्वधाम ॥
बंदी वेषें वेद तैं येति जिथें श्रीराम ॥ १२म ॥
देतीं प्रभु सर्वज्ञ, अति आदर कृपानिधान ।
कोणि न जाणे मर्म हें करूं लागती गुणगान ॥ १२चं ॥

प्रभूला जानकीसहित पाहून वसिष्ठ मुनी मनात अनुरक्त झाले व त्यांनी त्वरेने दिव्य सिंहासन आणण्यास सांगीतले ॥ १ ॥ सूर्यासारखे तेज असलेल्या त्या सिंहासनाचे वर्णन करता येणे शक्य नाही राम जानकीसह ब्राह्मणांना नमस्कार करुन त्यावर बसले ॥ २ ॥ जानकीसह रघुरायाला सिंहासनावर पाहून सर्व मुनी समूहास फार हर्ष झाला ॥ ३ ॥ मग ब्राह्मण वेदमंत्रांचा उच्चार करुं लागले व आकाशात वेद व मुनी मोठ्याने जयघोष करु लागले ॥ ४ ॥ प्रथम वसिष्ठ मुनींनी राज्यतिलक लावला व मग इतर विप्रांना टिळक लावण्यास अनुमती दिली ॥ ५ ॥ पुत्राला पाहून मातांना हर्ष झाला व त्या वारंवार आरती ओवाळूं लागल्या ॥ ६ ॥ रघुराजाने ब्राह्मणांना अनेक प्रकारची दाने दिली व याचकांना इतके दिले की त्यांना पुन्हा याचना करण्याची इच्छाच होऊ नये त्यांना अयाचक बनविले. ॥ ७ ॥ त्रैलोक्याचे स्वामी राजसिंहासनावर बसलेले पाहून देवांनी दुंदुभी आदि शुभ वाद्ये वाजविण्यास प्रारंभ केला ॥ ८ ॥ आकाशात पुष्कळ दुंदुभी वाजत आहेत, गंधर्व किंनर गात आहेत व अप्सरांचे समूह नृत्य करीत आहेत, आणि देव व मुनीं परमानंद पावन आहेत भरत, लक्ष्मण व शत्रुघ्न हे भाऊ, बिभीषण अंगद हनुमान आदि छत्र, चामरे, पंखा, धनुष्य, तलवार, ढाल आणि शक्ति घेतलेले सभोवती शोभत आहेत. ॥ छं १ ॥ सीतेसहित रविवंशविभूषण रामचंद्रांची शोभा अनेक कामदेवांसारखी शोभते आहे. नवीन सजल मेघासारख्या सुंदर श्याम शरीरावरील पीतांबर देवांचे मन मोहित करीत आहे मुकुट, बाजूबंद इ. विचित्र विभूषणे प्रत्येक अंगावर सजविलेली आहेत आणि कमलासारखे व विशाल नेत्र छाती व बाहू आहेत, जे कोणी या रुपाचे दर्शन करतात ते नर धन्य होत. ॥ छं.२ ॥ हे सगेशा ! ती शोभा, तो समाज व ते सुख यांचे वर्णन करता येणे शक्य नाही शेष, शारदा व वेद त्यांचे वर्णन करीत असतात (पण त्यांनाही अंत लागत नाही) मात्र त्यातील रस महेश जाणतात ॥ दो. १२ रा ॥ भिन्न भिन्न स्तुती (आकाशातच) करुन सर्व देव आपापल्या धामास गेले तेव्हा जेथे श्रीराम आहेत तेथे भाटांच्या वेषाने वेद आले ॥ १२ म ॥ सर्वज्ञ प्रभू रामचंद्रांनी त्यांना अति आदर दिला पण यातील मर्म कोणी जाणू शकला नाही आणि वेद गुणगान करुं लागले ॥ दो १२ चंद्र ॥

जय सगुण निर्गुण रूप, अनुपम रूप भूप शिरोमणे ।
दशकंठ, निशिचर चंड खल तम भुजबलें हत दिनमणे ॥
अवतार नर, संसार भार हरून दुःख विनाश हे ॥
जय प्रणतपाल दयाल हे प्रभु ! शक्तियुक्त नमामहे ॥ १ ॥
तव विषम माया वश सुरासुर नाग नर अगजग हरे ।
भ्रमतात भवपतिं अमित, दिननिशिं काल गुण कर्में खरें ॥
ज्यां नाथ ! करुणायुत विलोकां त्रिविध ताप तयां न, हे ! ।
भवखेद छेदन दक्ष अम्हां रक्ष राम नमामहे ॥ २ ॥
जे ज्ञानमान विमत्त तव भवहरणि भक्ति न आद्रिती ।
ते प्राप्त सुर दुर्लभ पदादति पडत आम्हां अढळती ॥
विश्वास युत सब आस सांडुनि दास तव होती खरे ।
तव जपुनि नामा श्रमविना भव तरति त्या स्मरतों हरे ॥ ३ ॥
जे चरण शिव अज पूज्य, रज शुभ लागतां मुनिवधु तरे ।
नखनिर्गता मुनिवंदिता जग पावनी सुरसरि, हरे ॥
ध्वज कुलिश अंकुश कंज युत वनिं फिरत कंटक किण वरी ।
पदकंज युग्म मुकुंद राम रमेश भजतों अंतरीं ॥ ४ ॥
अव्यक्त मूलमनादि तरु, चार त्वचा, श्रुति बोलती ।
षट् स्कंद, शाखा पंचवीस, अनेक पानें सुमन तीं ॥
फल युगलविध कटु मधुर, वल्ली आश्रिता ज्या एक हे ।
पल्लवत फूलत नित्य नव, संसार विटप नमामहे ॥ ५ ॥
जे ब्रह्म अजमद्वैतमनुभवगम्य मनपर ध्यायती ।
वदुं जाणुं दे त्या, नाथ आम्हीं गावुं कीर्तिच सगुण ती ॥
करुणानिधे प्रभु ! सद्गुणाकर देव ! हा वर मागतों ।
मन वचन कर्म, विकार सोडुनि, तव पदीं अनुराग तों ॥ ६ ॥
दो० :- वेदानीं देखत सकल केली स्तुती उदार ।
पावुनि अंतर्धान गत जेथें ब्रह्मागार ॥ १३रा ॥
श्रुणु विनतासुत शंभु तैं येति जिथें रघुवीर ॥
स्तुति करिती गद्‍गद्‍गिरें पूरित पुलक शरीर ॥ १३ ॥

वेदकृत पूर्वाषाढा नक्षत्र स्तुती –
हे सगुणरुप ! हे निर्गुणरुप ! हे अनुपमरुप असलेल्या राजांच्या शिरोमणी ! आपले ऐश्वर्य प्रगट करा हे दिनमणे ! दशकंठ रावण व इतर प्रचंड निशाचर खलरुपी तमाचा तुम्ही आपल्या भुजबलाने नाश केलात तुम्ही मनुष्यावतार घेऊन जगाचा भार हरण केलात व दु:खाचा विनाश केलात प्रणतांचे पालन करणार्‍या दयाळु प्रभो ! शक्तीसहित असलेल्या तुम्हाला आम्ही नमस्कार करतो. तुम्ही आपले ऐश्वर्य प्रगट करा.॥ छं १ ॥ हे हरे ! तुमच्या विषम मायेला वश होऊन काल कर्म आणि गुणांनी देव, दानव, नाग, मानव व सर्व स्थावर जंगम जीव, रात्रंदिवस अनंत भवाच्या मार्गात भ्रमण करीत राहीले आहेत. खरोखर हे नाथ ! तुम्ही करुणायुक्त द्दष्ठीने ज्यांना पाहता त्यांनाच त्रिविध ताप होत नाहीत जन्म मरणाच्या दु:खाचे व श्रमाचे छेदन करण्यात कुशल असणार्‍या रामा ! आमचे रक्षण कर आम्ही तुला नमस्कार करतो. ॥ छं २ ॥ जे ज्ञानाच्या अभिमानाने उन्मत्त होऊन तुझ्या भवसंहारक भक्तीचा आदर करीत नाहीत, ते प्राप्त झालेल्या देवांना सुद्धा अति दुर्लभ अशा मोक्षपदावरुन पतन पावताना आंम्हाला आढळतात परंतु जे विश्वासयुक्त होऊन सर्व भरवसा सोडून खरोखर तुझे दास होतात ते तुझ्या नामाचा जप करुन विनाश्रम भव तरतात, त्या तुझ्या नामाचे आम्ही स्मरण करतो ॥ छं ३ ॥ जे चरण शिव व ब्रह्मा यांना पूज्य आहेत ज्यांच्या शुभ रजाच्या स्पर्शाने मुनिवधु अहल्या तरली. हे हरी ! ज्या चरणांच्या नखापासून मुनिवंदित व जगाला पावन करणारी देवनदी गंगा प्रगट झाली आणि ध्वज, वज्र, अंकुश व कमल या चिन्हांनी मंडित ज्या चरणांवर वनात हिंडत असता काटे लागून घट्टे पडलेले आहेत, ते चरण कमल युग्म हे मुकुंद ! हे राम ! हे रमेश ! आम्ही हृदयांत भजत असतो. ॥ छं.४ ॥ वेद सांगतात की अव्यक्त हे मूळ असलेला एक अनादि तरु आहे त्याला चार साली (= त्वचा) आहेत, सहा स्कंध आहे व पंचवीस शाखा आहेत पाने, फुले अगणित आहेत, कडू गोड अशी दोन प्रकारची फळे आहेत, त्याचा आश्रय केलेली केवळ एकच वेल आहे आणि पालवी व फुले नित्य नवी येतच असतात, असा जो संसार विपट वृक्ष त्या तुम्हाला आम्ही नमन करतो. ॥ छं ५ ॥ ब्रह्म अज आहे, अद्वैत आहे, अनुभवगम्य आहे, व मनातीत आहे, असे असून जे त्याचे ध्यान करतात, त्यांना असे बोलू द्या व जाणू द्या आम्ही मात्र हे नाथ ! आपली सगुण कीर्तीच गात असतो. हे करुणा सागरा प्रभो ! सदगुणाकर हे देवा ! आम्ही तर हा वर मागतो की मनाने, वाणीने व कर्माने विकारांचा त्याग करुन तुमच्या चरणांच्या ठिकाणी आमचे प्रगाढ प्रेम असावे ॥ छं. ६ ॥ वेदांनी सर्वांच्या देखत अशी उदार स्तुती केली व अंतर्धान पावून ब्रह्मलोकास गेले ॥ दो० १३ रा ॥
शंभुकृत्त उत्तराषाढा नक्षत्र स्तुती - हे विनता पुत्रा, ऐक ! तेव्हा मग जिथे रघुवीर होते तेथे शंभु आले आणि गद्‌गद्‌वाणीने स्तुती करु लागले, तेव्हा त्यांचे शरीर रोमांचांनी फुलले ॥ दो० १३ म ॥

छं (तोटक) :- जय राम रमारमणं शमनं । भव ताप भयाकुल पाहि जनं ॥
अवधेश सुरेश रमेश विभो । शरणागत मागत पाहि प्रभो ॥
दशशीस विनाशनवीस भुजा । कृत दूरि महा महि भूरि रुजा ॥
रजनीचर वृंद पतंग महा । शर पावक तेजिं प्रचंड दहां ॥
महिमंडल मंडन चारुतरं । धृत सायक चाप निषंग वरं ॥
मद मोह महा ममता रजनी । तमपुंज दिवाकर तेज अनी ॥
मनजात किरात निपात करी । मृग लोक कुभोग शरांनिं उरीं ॥
जहि नाथ अनाथ हि पाहि हरे । विषयाटविं पामर भूलभरे ॥
बहु रोग वियोगिं हि लोक हत । भवदंघ्रि निरादर हा फळत ॥
भवसिंधु अगाधहि ते पडती । पद पंकजिं प्रेम न जे करती ॥
अति दीन मलीन हि दुःखिसदा । पदपंकजिं प्रीति न ज्यांस कदा ॥
अवलंब कथा तुमच्या हि जयां । प्रिय संत अनंत सदैव तयां ॥
मद मान न राग न लोभ कदा । सम मानति वैभव ते विपदा ॥
तव सेवक यास्तव होति मुदा । मुनि सांडिति योग दुरास सदा ॥
युत भक्ति निरंतर नेम तनें । पदपंकज सेविति शुद्ध मनें ॥
सम मान अनादर मानुनिया । सब संत सुखी फिरती जगिं या ॥
मुनि मानस पंकज भृंग भजे । रघुवीर महा रणधीर अजे ॥
तव नाम जपामि नमामि हरी । भवरोग महागद मान अरी ॥
गुणशील कृपा परमायतनं । प्रणमामि निरंतर मारमणं ॥
रघुनंद निकंदय द्वंद्व घनं । महिपाल विलोकय दीनजनं ॥
दो० :- पुनः पुन्हां मागतो वर हर्षे द्या श्रीरंग ॥
पदसरोजिं अनपायिनी भक्ति सदा सत्संग ॥ १४रा ॥
शिव गत वर्णुनि रामगुण हर्षें कैलासास ॥
देवविती प्रभु कपिनां सर्व सुखप्रद वास ॥ १४म ॥

हे राम ! रमारमणा, हे भवतापविनाशका ! आपला उत्कर्ष प्रगट करा. आणि भवतापाच्या भयाने व्याकुळ झालेल्या जनांचे व माझे दासाचे रक्षण करा. हे अयोध्याधीशा, देवांच्या स्वामी, हे रमापती, हे विभो ! मी शरणागत (इतकेच) मागत आहे की माझे रक्षण करा. ॥ १ ॥ दहा डोकी व वीस बाहू असणार्‍या रावणाचा विनाश करुन आपण या पृथ्वीला सर्व कष्टांना संकटांना दूर केलेत राक्षसांचे समूहरुपी महापतंग आपण आपल्या बाणरुपी प्रचंड पावकाच्या तेजात जाळून टाकलेत ॥ २ ॥ आपण भूमंडळाचे सर्वात सुंदर मंडन आहांत व श्रेष्ठ धनुष्य बाण व भाता धारण केलेले आहात महामद, महामोह आणि ममता रुपी रात्र यांच्या अंधकार समूहाचा विनाश करणारे आपण सुर्य असून आपले तेज सूर्य किरण सैन्यासारखे आहे. ॥ ३ ॥ कामरुपी भील्ल मनुष्य प्राणी रुपी मृगांच्या हृदयांत कुभोग रुपी बाण मारुन त्यांचा नि:पात करीत आहे तरी हे हरी ! आपण त्याला ठार मारा व विषयरुपी अरण्यात भुलीने भरलेल्या पामर अनाथांचे आपण रक्षण करा ॥ छं. ४ ॥ अनेक रोगांनी व वियोगांनी लोक मारले गेले आहेत. पण हे तुमच्या चरणांच्या अनादराचे फळ त्यांना मिळत आहे जे तुमच्या चरण कमलांच्या ठिकाणी प्रेम करीत नाहीत ते लोकच अगाध भवसिंधुत पडतात ॥ ५ ॥ ज्यांची तुमच्या चरणकमली कधी प्रीती नाही ते लोक सदा अति दीन, पापी व सदा दु:खी असतात, पण ज्यांनी तुमच्या कथांचा आधार घेतला आहे त्यांना संत आणि भगवान प्रिय वाटतात ॥ ६ ॥ त्यांना मद नसतो की मान नसतो, विषयप्रीती नसते की लोभ नसतो, ते वैभव व विपत्ती समान मानतात यामुळे मुनी ज्ञानमार्गी योगाची खोटी आशा सोडून आनंदाने सदा तुमचे सेवक बनतात. ॥ ७ ॥ ते भक्तीने शरीराने निरंतर नेमानिष्ठ होऊन शुद्ध हृदयाने तुमच्या चरणकमलांची सेवा करतात आणि मान व अपमान समान मानून ते सर्व संत (सदा) सुखी होऊन या जगात संचार करतात. ॥ ८ ॥ हे मुनींच्या मनरुपी कमळातील भृंगा ! महा रणधीर आणि अजेय रघूवीर ! मी आपल्याला भजतो हे हरि मी आपले नाम जपत असतो व आपल्याला नमस्कार करतो आपण भवरोगाचे महान औषध आणि अभिमानाचे शत्रु आहात ॥ ९ ॥ तुम्ही गुण, शील, कृपा यांचे परम निवासस्थान आहांत तुम्ही श्रीरमण आहांत मी तुम्हांला निरंतर प्रणाम करतो हे रघुनंदन ! सर्व द्वंद्वांचे निकंदन करा आणि हे महीपालका या दीन दासाकडे आणि दीन जनांकडे (कृपाद्दष्टीने) अवलोकन करा ॥ १०॥ श्रीरंगा ! मी आपल्याजवळ हा वर पुन:पुन्हा मागतो की मला तुमच्या चरणकमलांची अविनाशी भक्ती आणि सदा तुमच्या भक्तांची संगती (सत्संग) प्राप्त व्हावी; आपण मला आनंदाने इतकेच द्या. ॥ दो० १४ रा ॥ रामगुणांचे वर्णन करुन शिव हर्षित होऊन कैलासास गेले तेव्हा मग प्रभुंनी कपींना सर्व प्रकारचे सुख देणारी निवासस्थाने देवविली ॥ दो० १४ म ॥

श्रुणु खगपति ही कथा पावनी । त्रिविध ताप भव भय नाशनी ॥
या शुभ महाराज अभिषेका । श्रवत लभति नर विरति विवेका ॥
जे सकाम नर ऐकति गाती । पावति सुख विविधा संपत्ती ॥
सुरदुर्लभ सुख भोगुनि जगतीं । अंतकाळिं रघुपति पुरिं जाती ॥
मुक्त विरागी विषयी ऐकति । भक्ति सुगति नव वैभव पावति ॥
रामकथा वर्णिली यथामति । दुःख दैन्य भय हरणी खगपति ॥
विरति विवेक भक्ति दृढ करणी । मोह नदींते सुंदर तरणी ॥
नित नव मंगल कोसलपुरीं । हर्षित असति वर्ग सब परीं ॥
प्रीति रामपदकंजिं नित्य नव । सर्वां, वंदिति ज्या मुनि अज शिव ॥
भिकार्‍यांस वसनादिक नाना- । दिलीं विविध दानें विप्रानां ॥

दो० :- ब्रह्मानंदीं मग्न कपि प्रभुपदिं सर्वां प्रीत ॥
त्यां न कळति जातां दिवस महिने सहा व्यतीत ॥ १५ ॥

राज्याभिषेक फलश्रुती –
हे खगपती ! ऐक ही कथा सर्वांना पावन करणारी आहे त्रिविध ताप आणि भवभय यांचा विनाश करणारी आहे ॥ १ ॥ महाराज रामचंद्रांच्या या शुभ राज्याभिषेकाचे श्रवण केल्याने निष्काम मानवांना वैराग्य आणि ज्ञान मिळेल ॥ २ ॥ जे सकाम लोक ऐकतील वा गातील त्यांना अनेक प्रकारचे सुख व संपत्ती मिळेल ॥ ३ ॥ ते जगात देवांना दुर्लभ असे सुख भोगून अंतकाळ झाल्यावर रघुपती पुरीत (जन्मास) जातील ॥ ४ ॥ मुक्त, विरक्त व विषयी लोक श्रवण करतील तर ते क्रमश: सदगती व नववैभव पावतील ॥ ५ ॥ हे पक्षीराज ! मी आपल्या बुद्धीनुसार रामकथा वर्णन केली ही दु:ख, दैन्य व भय हरण करणारी आहे. ॥ ६ ॥ ही वैराग्य, ज्ञान आणि भक्ती यांना द्रुढ करणारी असून, मोहनदी तरुन जाण्यास ही सुंदर नौका आहे ॥ ७ ॥ अयोध्यापुरीत नित्य नवे मंगलोत्सव होऊ लागले व सर्व वर्गाचे लोक सर्व प्रकारे हर्षित राहू लागले ॥ ८ ॥ रामचंद्रांच्या ज्या चरणकमलांना मुनी, ब्रह्मदेव व शिव वंदन करतात त्या चरणकमलांच्या चरणी सर्व लोकांची प्रीती नित्य नवी वाढत आहे ॥ ९ ॥ भिकार्‍यांना (लोकानी) अनेक प्रकारची वस्त्रे भूषणे दिली व ब्राह्मणांना विविधविध दाने दिली ॥ १० ॥ सर्व कपि ब्रह्मानंदांत मग्न आहेत व सर्वांची प्रभुपदीं प्रीती आहे त्यामुळे दिवस केव्हा व कसे सरले हे कळले सुद्धा नाही असे सहा महिने निघून गेले. ॥ दो० १५ ॥

विस्मृत गृह, ना स्वप्निं आठवण । जसें परद्रोहास संत-मन ॥
बोलाविति तैं सख्यां रघुपती । ते येऊन सादर शिर नमती ॥
परम प्रीतिनें निकट बसविले । भक्त सुखद मृदु वचन बोलले ॥
सेवा केली तुम्हीं मम अती । कशी मुखांवर वर्णूं महती ॥
त्यक्त मदर्थ सदन सौख्याला । प्रिय अति यास्तव तुम्हिं मज झाला ॥
अनुज राज्य वैभव वैदेही । परिजन सदनें काया स्नेही ॥
सगळे प्रिय न तुम्हांसम जाणा । मृषा न वदतो, हा मम बाणा ॥
सर्वां प्रिय सेवक ही नीती । दासांवर मम अधिका प्रीती ॥

दो० :- मित्र ! अतां जावें गृहीं भजा मला दृढनेम ॥
समजुनि सर्वग सर्वहित करा सदा सुप्रेम ॥ १६ ॥

संतांचे मन जसे परद्रोहाला विसरलेले असते, त्या प्रमाणे सर्व कपि घरदार विसरले, स्वप्नात सुद्धा त्यांना आठवण झाली नाही. ॥ १ ॥ (सहा महिन्यानंतर) मग रघुपतींनी कपि मित्रांना बोलावले, ते आले व सर्वानी आदराने पायांना नमन केले ॥ २ ॥ रघुपतींनी त्यांना परम प्रीतीने जवळ बसविले, व भक्तांना सुख देणारे प्रभु मधुर मृदु वाणीने म्हणाले ॥ ३ ॥ तुम्ही माझी अत्यंत सेवा केलीत, पण तुमच्या तोंडावर मी तुमचा मोठेपणा वर्णूं तरी कसा ? ॥ ४ ॥ तुम्ही माझ्यासाठी घराचा व गृहसौख्याचा त्याग केलात, त्यामुळे तुम्ही मला अत्यंत प्रिय झाला अहांत ॥ ५ ॥ धाकटे भाऊ, राज्य वैभव, संपत्ती, वैदेही, परिवार, देह आणि स्नेही हे सगळे मला प्रिय आहेत, परंतु तुमच्या इतके नाहीत, हे लक्षांत ठेवा मी खोटे नाही सांगत, (कारण) हा माझा बाणा आहे ॥ ६-७ ॥ सेवक सर्वांनाच प्रिय असतात ही नीती आहे पण माझी दासांवर अधिक प्रीती असते. ॥ ८ ॥ मित्रांनो ! आता तुम्ही सर्व आपापल्या घरी जा, आणि दृढ नेमाने मला भजा, मी सर्वांमध्ये आहे, सर्वांचे हित करणारा आहे, हे जाणून माझ्य़ावर सदा अति प्रेम करा. ॥ दो० १६ ॥

प्रभुवच परिसुनि सब मग्नही । कोण अम्हि कुठें स्मृति तन नहीं ॥
कर जोडुनि टक लाउनि बघती । अति अनुरागें वदूं न शकती ॥
प्रेम परमत्यांचे प्रभु पाहती । ज्ञान विविध विधिनें उपदेशति ॥
प्रभु सम्मुख काहिं न वदुं शकती । घडि घडि चरण सरोंजां बघती ॥
प्रभुअणिविति भूषण वसनानां । अनुपम सुंदर सुरंगि नाना ॥
सुग्रीवाला प्रथम अर्पिलीं । स्वकरें भरते त्यास घातली ॥
प्रभु आज्ञें लक्ष्मण लंकेशा । अर्पिति, रुचलीं भानुकुलेशा ॥
स्तब्ध बसे अंगद ना हालत । प्रभु बघुनी प्रीति, न बोलावत ॥

दो० :- जांबवंत नीलादिकां आहेरिति रघुनाथ ॥
रामरूप हृदिं धरुनि सब जाति नमुनि पदिं माथ ॥ १७रा ॥
अंगद नमि शिरौठुनि, जल नयनिं करास जुळून ॥
अति विनीत वच वदे जणुं प्रेमरसीं घोळून ॥ १७म ॥

सुग्रीवादिक कृत अभिजित नक्षत्र स्तुती –
प्रभुचे वचन ऐकून ते सगळे मग्न झाले आपण कोण, कोठे आहो याचे आणि देहाचे भान स्मरणच त्यांना राहीले नाही. ॥ १ ॥ हात जोडून टक लावून बघत राहीले (स्तुती, प्रार्थना करावी असे वाटते) पण अति प्रेमामुळे बोलताच येणे अशक्य झाले ॥ २ ॥ प्रभूंनी त्यांचे परम प्रेम पाहीले, जाणले व विविध प्रकारांनी त्यांना ज्ञान उपदेशले ॥ ३ ॥ प्रभूच्या समोर त्यांनी काहीही बोलणे शक्य नव्हते त्यामुळे ते पुन:पुन्हा प्रभुच्या चरण कमलांकडे (दीन मुद्रेने) पाहू लागले. ॥ ४ ॥ मग प्रभुनी अलंकार व नाना वस्ते मागविली ती उपमारहित सुंदर व विविध सुंदर रंगाची होती ॥ ५ ॥ प्रथम प्रभूंनी आपल्या हातांनी सुग्रीवास वस्त्र – भूषणे अर्पण केली ती भरताने स्वहस्ते त्यांच्या अंगावर व अंगात घातली ॥ ६ ॥ प्रभूच्या आज्ञेने लक्ष्मणाने लंकेश बिभीषणाला अर्पण केली ती भानुकुलनाथ रघुपतींना आवडली ॥ ७ ॥ अंगद हालचाल न करतां स्तब्ध बसून राहीला त्याची प्रीती पाहून प्रभूंनी त्याला बोलाविला नाही ॥ ८ ॥ जाबंवंत नीलादि सर्व वानरांना रघुनाथाने आहेर केला तेव्हा सुग्रीवादि सर्व रामरुप हृदयांत धरुन रघुनाथाच्या चरणी मस्तक नमवून चालू लागले ॥ दो० १७ रा ॥ मग अंगदाने उठून नमस्कार केला, नेत्रांत जल आले आहे व तो हात जोडून जणूं प्रेमरसात घोळून अत्यंत विनीत वाचेने बोलूं लागला. ॥ दो० १७ म ॥

श्रुणु सर्वज्ञा कृपा सुख सिंधो । दीन दयाकर आर्त सुबंधो ॥
मरतेवेळिं नाथ ! गत वाली । मज जैं प्रभु पदरामधिं घाली ॥
स्मरुनी अशरणशरणपणा निज । भक्त हितंकर ! त्यागुं नका मज ॥
तुम्हिं माझे प्रभु गुरु पितृ माता । जाउं कुठें, त्यजुं पदजलजाता ॥
पहा विचारुनि तुम्हिंच नृपोत्तम । प्रभुस तजुनि गृहिं काय काम मम ॥
बाला ज्ञान बुद्धि बल हीना । रक्ष नाथ ! शरणागत दीना ॥
सकल नीच गृह सेवा करिन हि । पद पंकज पाहुनि भव तरिन हि ॥
वदुनि पडे चरणीं प्रभु ! पाही ! । नाथ ! अतां न वदा गृहिं जा ही ॥

दो० :- श्रवुनि नम्र अंगद वचन रघुपति करुणाशीव ॥
प्रभु उठवुनि हृदयी धरिति सजल नयन राजीव ॥ १८रा ॥
निज उर माला वसन मणि वालिसुता घालून ॥
बोळविति भगवंत मग विविधा समजावून ॥ १८म ॥

अंगदकृत श्रवण नक्षत्र स्तुती - हे कृपासागरा, हे सुखसिंधो ! दीनांच्या दयासागरा ! हे आर्तांच्या उत्तम बंधो ! हे नाथ श्रवण करा, मरण समयी वालीने जेव्हा मला तुमच्या पदरात घातला तेव्हा तो (माझा पिता) देह सोडून गेला. ॥ १-२ ॥ म्हणून हे भक्तांचे हित करणार्‍या प्रभो ! तुमच्या अशरण शरण पणाचे स्मरण ठेवून माझा त्याग करु नका ॥ ३ ॥ तुम्हीच माझे स्वामी, गुरु, माता इ. सर्व आहांत मी तुमच्या चरण कमलांचा त्याग करुन जाऊं तरी कुठे ? ॥ ४ ॥ हे नृपोत्तमा ! आपणच विचार करुन पहा की प्रभूला सोडून घरी माझे काम तरी काय आहे ? ॥ ५ ॥ या ज्ञानहीन, बुद्धीहीन, बलहीन बालकास या शरण आलेल्या दीनाला हे नाथ ! आपण ठेऊन घ्या ॥ ६ ॥ मी तुमच्या घरची सर्व हलकी कामे करेन आणि तुमच्या चरणकमलांकडे पाहून भवसागर तरुन जाईन ॥ ७ ॥ असे सांगून ` प्रभो रक्ष ’ असे म्हणून पायांवर पडला आणि म्हणाला की नाथ ! आता नका हो सांगू मला की ‘ घरी जाच ’ ॥ ८ ॥ अंगदाचे नम्र वचन ऐकून करुणेची सीमा श्रीरघुपती प्रभूंनी त्याला उचलून हृदयाशी धरला आणि त्यांचे राजीव नयन अश्रुंनी भरले ॥ दो० १८ रा ॥ मग भगवंताने त्याची नाना प्रकारे समजूत घातली व आपल्या गळ्यातील मणि रत्नहार, वस्त्रे व भूषणे त्याच्या अंगावर घालून त्याला निरोप दिला. ॥ दो० १८ म ॥

भरत अनुज लक्ष्मण न थोडें । भक्तकृतज्ञ पोचवूं जाती ॥
अंगदहृदयीं प्रेम न थोडें । बघे प्रभुकडे घडि घडि कोडें ॥
घडि घडि करि दण्डवत् प्रणाम । मनिं किं रहा म्हणतिल मज राम ॥
राम विलोकन चाल बोलणें । स्मरत विषादहि हसत भेटणें ॥
प्रभुमत बघुनि विनति बहु करुनी । जाई हृदयिं पदपंकज धरुनी ॥
सादर सब कपिनां पोचवले । मग भावांसह भरत परतले ॥
तैं धरुनी सुग्रीव पदानां । करि हनुमंत विनंती नाना ॥
काहीं दिन रघुपति पद सेवा । करुन बघेन चरण तव देवा ॥
पुण्य पुंज तुम्हिं पवन कुमारा ! । जाउन सेवा करुणागारा ॥
तेव्हां कपि सत्वर सगळे गत । श्रुणु हनुमंता वदे वालिसुत ॥

दो० :-प्रभुस दंडवत वदा, कर जुळुनि विनंति तुम्हांस ॥
घडोघडी मम आठवण देणें रघुनाथास ॥ १९रा ॥
असे वदुनि गत वालिसुत परत येई हनुमंत ॥
प्रभुस वदे तत्प्रीति तैं मग्न होति भगवंत ॥ १९म ॥
कुलिशाहुनिहि कठोर अति कोमल कुसुमाहून ॥
राम चित्त कीं खगेश्वर कोणा येइ कळून ॥ १९चंद्र ॥

शत्रुघ्न लक्ष्मणासहित भक्तकृतज्ञ भरत (सुग्रीवादिकांस) पोचविण्यास चालले ॥ १ ॥ अंगदाच्या हृदयात रामप्रेम अपार आहे, त्यामुळे तो वारंवार प्रभूकडे प्रेमानी (केविलवाण्या मुद्रेने) बघत आहे ॥ २ ॥ आणि वारंवार दंडवत नमस्कार करीत आहे. मनात वाटत आहे की राम मला रहा म्हणतील ॥ ३ ॥ रामचंद्राचे पाहणे, चालणे, बोलणे आणि हसत हसत भेटणे इ० स्मरण करुन त्यास दु:ख वाट आहे ॥ ४ ॥ पण प्रभूचे मत पाहून नाना प्रकारे प्रार्थना विनंती करुन, हृदयांत श्रीरामचरण कमले धारण करुन अंगद निघाला ॥ ५ ॥ (इतक्यात सुग्रीवादि) सर्व कपींना पोचवून भावासह भरत परत आले ॥ ६ ॥ तेव्हा मग सुग्रीवाचे पाय धरुन हनुमंताने अनेक प्रकारे विनंती केली व सांगीतले की देवा ! काही दिवस रघुपतीची चरण सेवा करुन मी पुन्हा तुमच्या सेवेत हजर होईन ॥ ७-८ ॥ (तेव्हा सुग्रीव म्हणाला) हे पवन कुमारा ! तुम्ही पुण्य़राशी आहांत, तुम्ही यापुढे नेहमीच कृपाधाम रघुपतीची सेवा करा ॥ ९ ॥ तेव्हा सगळे कपि त्वरेने गेले (व हनुमान परत वळले तोच) वालिसुत अंगद येऊन म्हणाला, की हनुमंता ! ऐका ॥ १० ॥ मी तुम्हास हात जोडून विनंती करतो की तुम्ही प्रभुला माझा दंडवत नमस्कार सांगा आणि वारंवार श्रीरघुनाथास माझी आठवण देत जा ॥ दो० १९ रा ॥ असे सांगून अंगद गेला आणि हनुमान परत आला व त्याने अंगदाच्या प्रीतीचे वर्णन प्रभूजवळ केले, तेव्हा भगवान प्रेममग्न झाले ॥ दो १९ म ॥ हे खगेश्वरा ! रामचंद्रांचे चित्त वज्रापेक्षाही अत्यंत कठोर व फुलापेक्षाही अति कोमल आहे, ते कोणास कसे कळूं शकेल ? ॥ दो० १९ चंद्र ॥

मग कृपाल अणविती निषादा । देति वस्त्रभूषणें प्रसादा ॥
निज भवना जा स्मरण करा । मनकृतिवचनें धर्म अनुसारा ॥
मित्र ! बंधु मम तुम्हिं सब भरतहि । येत जात जा नगरीं सततहि ॥
श्रवत वचन उपजे सुख भारी । पायिं पडे लोचनिं बहु वारी ॥
चरण नलिन हृदिं धरि, ये भवना । सांगे प्रभू स्वभाव परिजनां ॥
रघुपति चरित बघुनि पुर वासी । घडि घडि म्हणती धन्य सुखराशी ॥
रामराज्यिं वसता लोकत्रय । झाले हर्षित विगत शोक भय ॥
कोणि कुणासि न करिति शत्रुता । प्रभूप्रतापें गता विषमता ॥

दो० :- वर्णाश्रम निज निज धर्म निरत वेदपथिं लोक ॥
वर्तति, पावति सदा सुख नहिं भय रोग न शोक ॥ २० ॥

मग कृपालु रघुनाथाने निषादराजास बोलावून आणला व त्यास वस्त्र – भूषणे प्रसाद म्हणून दिली ॥ १ ॥ (आणि सांगीतले की) तुम्ही आता घरी जा आणि माझे स्मरण करीत जा आणि मनाने कर्माने व वाणीने धर्माचे पालन करा. ॥ २ ॥ मित्रा ! तुम्ही भरतासारखे माझे भाऊच आहांत, तेव्हा नेहमी अयोध्येत येत जात रहा. ॥ ३ ॥ प्रभूचे वचन ऐकून त्याला भारी सुख झाले, तो रघुनाथाच्या पाया पडला व त्याचे नेत्र अश्रुनी भरले ॥ ४ ॥ भगवंताच्या चरण कमलांस हृदयात धारण करुन तो आपल्या घरी परत आला व त्याने प्रभूचा स्वभाव परिजनांना सांगीतला ॥ ५ ॥
श्रीरामराज्य वर्णन - श्रीरघुपतीचे चरित्र पाहून पुरवासी वारंवार म्हणू लागले की सुखसागर रामचंद्र धन्य आहेत.॥ ६ ॥ राम राज्यावर बसल्यावर तिन्ही लोक हर्षित झाले व शोकभय इ. विकार गेले ॥ ७ ॥ कोणी कोणासी शत्रुत्व करीनासे झाले, कारण रामप्रभूचा प्रतापाने विषमता गेली ॥ ८ ॥ सर्व लोक आपापल्या वर्णधर्माचे व आश्रम धर्माचे पालन करण्यात तत्पर असून वेदमार्गाने सर्व लोक वागू लागले, व त्यामुळे सदा सुखात राहू लागले आणि रोग, भय, शोक इ. विकार राहीले नाहीत ॥ दो० २० ॥

दैहिक दैविक भौतिक ताप हि । रामराज्यिं होती न कोणासहि ॥
प्रीति परस्पर सब नर करती । रत निजधर्मिं यथा श्रुतिनीती ॥
चारी चरणिं धर्म जगिं राही । पूर्ण सदा, स्वप्निंहि अघ नाहीं ॥
रामभक्ति रत नर नी नारी । सकल परमगतिचे अधिकारी ॥
अल्पमृत्यु नहि पीडा काहीं । सुंदर सकल विरुज काया ही ॥
कोणि न दुःखि दरिद्री दीन न । कोणि अबुद्ध न लक्षणहीन न ॥
सब निर्दंभ धर्मरत शुची । चतुर नारि नर सब गुण रुची ॥
सब गुणज्ञ पंडित ही ज्ञानी । सकल कृतज्ञ धूर्त नहिं कोणी ॥

दो० :- रामराज्यिं खगपती श्रुणु चराचरीं जगिं काहिं ॥
कालकर्म नी प्रकृति गुण कृत दुःख न कोणा हि ॥ २१ ॥

स्वत:च्या देहापासून उत्पन्न होणारे, देवयोनीतील जीवांपासून उत्पन्न होणारे, व भूतांपासून उत्पन्न होणारे ताप रामराज्यात कोणासच होत नाहीत. ॥ १ ॥ सगळे लोक एकमेकांवर प्रीती करतात आणि वेदशास्त्रांनी सांगितलेल्या नीतीने आपापल्या धर्माचरणात गढलेले असतात ॥ २ ॥ धर्म आपल्या (सत्य, शौच, दया, दान) या चारी चरणांनी पूर्णपणे जगात नांदू लागला, कारण स्वप्नातही पाप घडेनासे झाले ॥ ३ ॥ सर्व स्त्रिया आणि पुरुष परमगतीचे मोक्षाचे अधिकारी असून सगळे सदा रामभक्ती परायण झाले. ॥ ४ ॥ अल्पकालीन मृत्यु नाही, कोणाला काही पीडा नाही. सर्वांचे देह सुंदर व निरोगी आहेत. ॥ ५ ॥ कोणी दु:खी नाही, कोणी दरिद्री नाही, कोणी मूर्ख नाही की कोणी शुभलक्षणहीन नाही ॥ ६ ॥ सगळे लोक दंभरहित, धर्मशील आणि पुनीत आहेत. सर्व स्त्रीपुरुष चतुर असून गुणांची आवड असणारे आहेत. ॥ ७ ॥ सर्व गुणांची किंमत जाणणारे पंडित आणि ज्ञानी आहेत सगळे लोक कृतज्ञ असून धूर्त कोणी नाही ॥ ८ ॥ हे पक्षीराजा, ऐक सर्व स्थावर जंगम जगात काल् – कर्म – स्वभाव व गुण यांपासून उत्पन्न होणारे दु:ख कोणाला जरासुद्धा नाही. ॥ दो० २१ ॥

भूमि सप्त सागर मेखला । एक भूप रघुपति कोसला ॥
बहु भुवनें प्रतिरोमिं जयासी । ही प्रभुता न विशेष तयासी ॥
तो प्रभु महिमा अमित समजता । हें वर्णन हीनता विपुलता ॥
खगपति ! तो महिमा जे जाणिति । तेही चरितिं या अति रति मानिति ॥
तो कळण्याचे फल लीला ही । मुनिवर संयमि कथिति महा ही ॥
रामराज्यिं जी सुख संपदा । वर्णुं न शकति फणीश शारदा ॥
सब उदार सब पर उपकारी । विप्र चरण सेवक नर नारी ॥
पुरुष एकपत्‍नी व्रत धारी । त्या मन वच कृतिं पति हितकारी ॥

दो० :- ’भेद’ नृत्य नर्तक गणीं दंड करीं संन्यासि ॥
रामचंद्र राज्यिं श्रवणिं ’जिंका’ शब्द मनासि ॥ २२ ॥

कोसलभूप श्री रघुपती सप्तसमुद्र मेखलांकित पृथ्वीचे एक मात्र भूप आहेत ॥ १ ॥ ज्याच्या रोमारोमात अनेक ब्रह्मांड भुवने आहेत, त्याला ही प्रभुता काही विशेष नाही ॥ २ ॥ प्रभूचा तो अपार महिमा कळल्यावर हे वर्णन करीत बसणे त्यांना फारच हिनता आणणारे आहे. ॥ ३ ॥ (परंतु) तो अपार महिमा ज्यांनी जाणला आहे ते सुद्धा या लीला चरित्रावर फार प्रेम करतात ॥ ४ ॥ (कारण्) तो महिमा जाणण्याचे फळ ही लीलाच आहे. असे इंद्रियसंयमी महामुनीवर सुद्धा म्हणतात ॥ ५ ॥ रामराज्यात जी सुखे व ज्या संपत्ती होत्या त्यांचे वर्णन शेष व सरस्वती सुद्धा करु शकत नाहीत. ॥ ६ ॥ सर्व लोक उदार व सगळेच परोपकारी आहेत स्त्रिया व पुरुष विप्रचरणांची सेवा करणारे आहेत. ॥ ७ ॥ सर्व पुरुष एक पत्नीव्रताचे पालन करणारे आहेत व त्यांच्या स्त्रिया मन – वाणी – कृतीने पतिहित करणार्‍या आहेत. ॥ ८ ॥ रामराज्यात ‘ भेद ’ फक्त नृत्य करणार्‍या वर्तकांत, दंड फक्त संन्याश्यांच्या हाती व जिंका शब्द फक्त मनालाच वापरला जातो. ॥ दो० २२ ॥

फुलती फळति सदा तरु कानन । संगे विहरति जग पंचानन ॥
सहज वैर मृग विहंग विसरति । प्रीति परस्पर सकल वाढविति ॥
कूजति विहगवृंद, मृग नाना । चरति लुटित मुद भीति जरा ना ॥
शीतल मंद सुगंधि गंधवह । भृंग गुंजती प्रसून रस वह ॥
लता विटप मागत मधु झरती । दुग्ध यथेष्टहि धेनू स्रवती ॥
सदा सस्य संपन्ना धरणी । त्रेतायुगात कृतयुग करणी ॥
गिरी विविध मणिखाणी प्रगटती । जाणुनि जगदात्मा जगभूपति ।
सरिता सकल वहति वर वारी । स्वादु विमल शीतल सुखकारी ॥
सागर निज मर्यादा पाळति । टाकिति रत्‍न तटीं नर पावति ॥
सरसिज संकुल सकल तडागहि । सुप्रसन्न दशदिशा विभागहि ॥

दो० :- विधु निजकरिं कवि पूर्ण महि रवि यथेष्ट तपतात ॥
वारिद याचित देति जल रामचंद्र राज्यांत ॥ २३ ॥

वनातील वृक्ष सुद्धा सदा सर्वदा फुलू फळूं लागले हत्ती आणि सिंह एकत्र विहार करु लागले ॥ १ ॥ पशु आणि पक्षी सुद्धा आपसातील स्वभाव वैर विसरले व एकमेकांवर प्रीती वाढवू लागले ॥ २ ॥ पक्ष्यांचे समुदाय निर्भयपणे कूंजन करु लागले व विविध पशूंचे कळप आनंद लुटीत संचार करु लागले त्यांना जराही भीती वाटत नाहीशी झाली ॥ ३ ॥ शीतल, मंद व सुगंधी वारा सतत वाहू लागला पुष्परस वाहून नेणारे भृंग सदा सर्वदा गुंजारव करु लागले ॥ ४ ॥ लता आणि वृक्ष मागताच हवा तितका पुष्परस (मध) देऊं लागले व गाई पाहीजे तितके दूध (आपण हून) देऊ लागल्या ॥ ५ ॥ भूमी सदा सर्वदा पिकांनी भरलेली राहू लागली याप्रमाणे त्रेतायुगात कृतयुगाची परिस्थिती निर्माण झाली ॥ ६ ॥ जगदात्मा भगवान जगाचे भूपती झाले आहेत हे जाणून पर्वतांनी नाना प्रकारच्या रत्नांच्या खाणी प्रगट केल्या ॥ ७ ॥ सर्व सरिता रुचिकर निर्मल, शीतल व सुखदायक असे उत्तम जल वाहू लागल्या ॥ ८ ॥ सागर आपल्या मर्यादांचे पालन करु लागले व रत्ने किनार्‍यांवर टाकू लागले व लोक ती घेऊ लागले ॥ ९ ॥ सर्व तलाव कमलांनी भरुन गेले सर्व आकाश अति प्रसन्न झाले ॥ १० ॥ रामचंद्रांच्या राज्यात चंद्र आपल्या किरणांनी सर्व पृथ्वीला पूर्ण करु लागला आणि सूर्य इष्ट (योग्य) तितकीच उष्णता देऊ लागला व मेघ ही मागणीप्रमाणे जल देऊं लागले ॥ दो० २३ ॥

* * * * *

श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु

GO TOP