॥ श्रीगणेशाय नमः ॥

॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥

श्री जानकीवल्लभो विजयते

॥ श्रीरामचरितमानस ॥

(मराठी अनुवाद)

॥ चतुर्थः सोपानः ॥

॥किष्किंधाकाण्ड ॥

॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥

अध्याय १ लाDownload mp3

स्रग्धरा :- वैदेहीं मार्गमाणः प्रतितरुकुरगं जानकीं मन्यमानो ।
गाढाश्लेषं च दत्त्वा वितरति सुगतिं दुर्लभाम् मुक्तिरूपाम् ॥
दत्ते शोकप्रलापैः स्वहितपथवतां कामरूपे विरक्तिं ।
कामान्धानां चरित्रं जनिमृतिभयदं दर्शयन् पातु रामः ॥ १ ॥
पृथ्वी :- महाभयनिवारकं कलिमलौघ-संदाहकं ।
त्रिताप कुमुदातपं हरिपदाब्ज-संदर्शकम् ॥
भ्रमादितम-हारकं निजसुखप्रभा-भास्करं ।
स्मरारि-सुखदायकं मनुज रामनाम स्मर ॥ २ ॥

मूळ मंगलाचरण

शा. वि. :- कुन्देन्दीवर-सुंदरावतिबलौ विज्ञान धामावुभौ ।
शोभाढ्यौ वरधन्विनौ श्रुतिनुतौ गोविप्रवृंद-प्रियौ ॥
मायामानुषरूपिणौ रघुवरौ सद्धर्मवर्मौ हितौ ।
सीतान्वेषणतत्परौ पथिगतौ भक्तिप्रदौ तौु हि नः ॥ ३ ॥
ब्रह्माम्भोधि समुद्‌भवं कलिमल प्रध्वंसनं चाव्ययं ।
श्रीमच्छंभु-मुखेन्दु-सुंदरवरे संशोभितं सर्वदा ॥
संसारामयभेषजं सुखकरं श्रीजानकीजीवनं ।
धन्यास्ते कृतिनः पिबन्ति सततं श्रीरामनामामृतम् ॥ ४ ॥
सो :- कळुनि मुक्तिजनि-भूहि ज्ञान-खाणि अघ-हानिकर ॥
वास उमा शम्भूहि ती काशी कशि सेव्य न ॥ मं. १ ॥
जळत सकल सुर-वृंद विषम गरल जिहिं पान कृत ॥
त्यां न भजसि मन मंद कुणि कृपालु शंकर सदृश ॥ मं. २ ॥

अनुवादकृत मंगलाचरण श्लोक वैदेहीचा शोध करित असता प्रत्येक झाडाला व हरिणाला जानकी मानतात व गाढ आलिंगन देऊन मुक्तीरूपी दुर्लभ सद्‌गती जे देतात; आत्महिताच्या मार्गाने जाणार्‍यास आपल्या शोकाच्या प्रलापांनी कामरूपाच्या (स्त्रीच्या) विषयी वैराग्य देतात; ते कामांधाचे जन्म मृत्यूभयदायक चरित्र लीला करून दाखविणारे राम आमचे रक्षण करोत. ॥ १ ॥ महाभयाचे निवारण करणारे, कलियुगातील पापाच्या ओघांना साफ जाळून टाकणारे, विविध ताप रूपी कुमुदांना सूर्याच्या तापासारखे, हरिचरणकमलांचे उत्तम दर्शन करविणारे, भ्रमादिक अंधार नाहिसा करणारे, आत्मसुखरूप प्रकाश देण्यात भास्करासारखे आणि कामदेवाच्या शत्रूस (शंकरास) सुख देणारे हे रामनाम, हे मनुजा ! स्मरण कर. ॥ २ ॥

गोस्वामी तुलसीदासकृत मूळ मंगलाचरण

कुंदाची फुले व नीलकमल याप्रमाणे अति सुंदर, अति बलवान, विज्ञानाचे धाम, शोध संपन्न श्रेष्ठ धनुर्धर, वेदांनी स्तुती केलेले, गाई व ब्राह्मण समुदाय ज्यांना प्रिय आहेत असे, मायेने मनुष्यरूप धारण केलेले, रघुकुलात श्रेष्ठ, सद्धर्माचे संरक्षक, सर्वांचे हितकर्ते, सीतेचा शोध घेण्यात तत्पर असलेले, मार्गात (चालत) असलेले, ते दोघे रघुवर (राम व लक्ष्मण) आम्हाला भक्ती प्रदान करणारे आहेत, हे निश्चित. ॥ ३ ॥ रामायणरूपी सागराची ज्याच्यापासून उत्पत्ती झाली, (वेदरूपी सागरातून ज्याची निर्मिती झाली), ते कलीमलाचा विध्वंस करणारे, अविनाशी श्री शंभूच्या अतिसुंदर व श्रेष्ठ मुखात सर्वदा शोभायमान असणारे श्री राम नाम रूपी अमृत जे सतत पान करतात (पितात) ते कृती ‘बुद्धीमान’ धन्य होत. ॥ ४ ॥
मं. सो. १) पापांचा विनाश करणारी ज्ञानाची खाण व मुक्तीची जन्मभूमीच आणि जिथे उमा व शंभू निवास करतात हे कळून सुद्धा ती काशी सेव्य नाही हे कसे शक्य आहे ? मं. सो. २) समस्त देवसमाज जळून जात असता ज्यांनी भयानक गरळ प्राशन केले त्यांना हे मंद मना तू का भजत नाहीस ? (असा) शंकरासारखा कृपाळू कोण आहे ?

रघुराया मग पुढें चालले । ऋष्यमूक गिरि निकट पातले ॥
वास समंत्रि तिथें सुग्रीवा । बघतां येत अतुल-बल-सीवां ॥
म्हणे सुभीत ऐक हनुमाना ! । पुरुष युगल बल-रूप-निधानां ॥
बघ बा ! जाउनि बटुरूपें तूं ! । कळव खुणें, जाणुनि तद्धेतू ॥
प्रेषित वालि, मलिन मन ते, तर । त्यजिन शैल पळ काढिन सत्वर॥
विप्ररूप कपि, जाइ घेउनी । पुसे असें मग मस्तक नमुनी ॥
कोण तुम्हीं तनु शाम गौर वर । फिरा वीर वनिं भूपरूप धर ॥
कठीण भूमि कोमल पदगामी । कवण हेतु वनिं विचरां स्वामी ॥
मृदुल मनोहर सुंदर जरि वपु । सहतां दुःसह वनिं वातातपु ॥
तुम्हिं कीं त्रय देवांतुनि कोणी । नर नारायण तुम्हिं कीं दोनी ॥

दो० :- जग कारण तारण भव भंजन धरणीभार ॥
कीं तुम्हिं अखिल-भुवनपति धरा मनुज अवतार ॥ दो० १ ॥

मारुती मिलन -
मग रघूराया पुढे चालू लागले व ऋष्यमूक नावाच्या पर्वताजवळ पोचले. ॥१॥ तिथे मंत्र्यांसह सुग्रीव रहात आहे, अतूल बलाची सीमाच असे दोन पुरूष येत असलेले बघताच तो भयभीत होऊन म्हणाला ‘हनुमंता ऐक’ बल व रूप यांचे सागर असलेल्या त्या दोन पुरूषांना जाऊन बघ ॥२­३॥ बाबा ! तू बटू रूपाने जाऊन पहा; व त्यांच्या मनातील हेतू जाणून मला खूणेने कळव ॥४॥ मलिन मनाच्या वालिने पाठविले असतील व ते दोघे मनाने कपटी असतील (तर तशी खूण कर) मी हा पर्वत सोडून त्वरेने पळून जाईन ॥५॥ कपि विप्र रूप घेऊन गेला आणि मस्तक नमवून असे विचारले की­ ॥६॥ अगदी श्याम गौर वर्णाचे तुम्ही कोण आहात ? व राजबिंड्‌या रूपाचे वीर असून असे वनांत का हिंडत आहात ? ॥७॥ स्वामी ! ही भूमी कठीण आहे आणि आपण कोमल पायांचे असून पायी चालत वनातून हिंडण्यात आपला हेतू काय आहे ? ॥८॥ जरी आपले देह अति कोमल, मनोहर आणि सुंदर आहेत तरी आपण वनातील दु:सह वारा ऊन का सहन करीत आहात ? ॥९॥ तुम्ही त्रिदेवांपैकी (ब्रम्हा, विष्णू , महेश) कोणी आहात की तुम्ही नर ­ नारायण आहात ? ॥१०॥ की जगाचे मूळ कारण, भवसागरातून (जीवाला) तारणारे, सर्व भुवनांचे स्वामी असून धरणीभार नाहीसा करण्यासाठी मनुजावतारी (परब्रम्ह) आहात का ? ॥दो.०१॥

कोसलेश दशरथ-सुत जन्मुनि । वनि आलों पितृवचना मानुनि ॥
बंधू, नाम राम नी लक्ष्मण । सवें नारि सुकुमारि सुशोभन ॥
इथें निशिचरें हृत वैदेही । विप्र ! फिरूं शोधित तीतें ही ॥
वदलों आम्हीं चरित्र अमचें । सांगा विप्र कथेसी तुमचे ॥
प्रभु ओळखि पडला धरि चरणां । तें सुख उमे वर्णुं ये कवणा ॥
पुलकित तनु ये वचन न वदना । बघत रुचिर वेषाची रचना ॥
स्तुती करी मग सुधीर धरुनी । हर्ष हृदयिं निजनाथ जाणुनी ॥
स्वामी ! पुसिलें म्यां न्यायें मम । तुम्हिही पुसतां कसें नरासम ॥
फिरतो भुलला वश माये तव । मी प्रभु ओळखले ना यास्तव ॥

दो० :- एक मीं मंद मोहवश कुटिल-हृदय अज्ञान ॥
त्यांत मला प्रभु भुलविती दीनबंधु भगवान ॥ २ ॥

आम्ही कौसलाधीश दशरथ महाराजांचे पुत्र म्हणून जन्मास आलो आहोत. आणि पित्याचे वचन मानून वनात आलो आहोत. ॥१॥ आम्ही दोघे भाऊ असून माझे नाव राम व हा लक्ष्मण आणि आमचे बरोबर सुकुमार व फार सुंदर स्त्री होती. ॥२॥ (पण) इथे निशाचराने वैदहीला चोरून नेली, म्हणून हे विप्रा ! आम्ही तिच्या शोधार्थ हिंडत आहोत.॥३॥ आम्ही आपले चरित्र सांगितले (आता) अहो विप्रा आपण आपला परिचय द्यावा. ॥४॥ हे प्रभू आहेत हे हनुमंताने ओळखले. त्याने रामाचे पाय धरले. उमे ! ते सुख कोणाला वर्णन करता येईल ? ॥५॥ शरीर रोमांचीत झाले. मुखावाटे शब्द बाहेर पडत नाही व प्रभूच्या वेषाच्या सुंदर रचनेकडे पहात आहे ॥६॥ मग पक्का धीर धरून स्तुती करू लागला व (आपलेच) नाथ आहेत हे ओळखून हृदयात हर्ष मावेनासा झाला आहे.॥७॥ स्वामी ! माझ्या परिने ­न्यायाने मी आपणास नाना प्रश्न विचारले, पण आपणसुद्धा (अज्ञानी) माणसासारखे मला कसे विचारता ? ॥८॥ आपल्या मायेला वश झाल्याने मी भुलून जाऊन फिरत भटकत आहे. त्यामुळे मी प्रभू आपल्याला आळखू शकलो नाही ॥९॥ एक तर मी मंद, त्यात आपल्या मायेच्या मोहाला बळी पडलेला, त्यातही कुटील हृदयाचा व अज्ञानी असे असून प्रभू आपण मला दीन बंधू भगवान असूनही भुलविता ? ॥ दो.२ ॥

नाथ दोष मम जरि बहु असती । प्रभु न सेवका चुकुन भुलवती ॥
नाथ जीव तव मायें मोहित । केवळ तुमच्या कृपेंचि मोचित ॥
त्यांत शपथ रघुवीर सांगतो । कांहिं न साधन भजन जाणतो ॥
सेवक सुत पति-मातृ-भरोशीं । वसति निचिंत तयां प्रभु पोशी ॥
वदुनि असें व्याकुळ पदिं पडला । प्रगटि निज तनू प्रेमें भरला ॥
तैं रघुपति उठवुनि हृदिं धरिती । निज लोचनजल-सेकिं निवविती ॥
श्रुणु कपि मानुं नको मनिं ऊणें । तूं प्रिय मजला लक्ष्मण दूणें ॥
समदर्शी मज म्हणति सकल ही । प्रिय मज अनन्य-गति सेवक ही ॥

दो० :- तो अनन्य ज्याची अशी मति न ढळे हनुमंत ॥
मी सेवक, सचराचर रूपें प्रभु भगवंत ॥ ३ ॥

चित्रा नक्षत्र स्तुती नाथ माझ्यात जरी पुष्कळ दोष आहेत, तरी प्रभू कधी चुकून सुद्धा (मजसारख्या चित्रानक्षत्र स्तुती, अवगुणी) सेवकास भुलवीत नाहीत ! ॥१॥ नाथ ! जीव तुमच्याच मायेने मोहीत असल्याने मी केवळ तुमच्याच कृपेने यातून सुटू शकतो ॥ २॥ त्यांत हे रघुवीरा ! आपली शपथ घेऊन सांगतो की भजनादि (भक्तीचे) काही साधन जाणत नाही ॥३॥ सेवक स्वामीच्या व बालक मातेच्या भरवश्यावर निश्चिंत राहतात. तेव्हा अशांचे पालन करणे प्रभूला भागच आहे. ॥४॥ असे म्हणून व्याकुळ होऊन पायांवर पडला आणि आपले स्वत:चे मूळ (कपिरूप) शरीर प्रगट केले व प्रेमाने परिपूर्ण झाला ॥५॥ त्याबरोबर रघुपतींनी त्याला उठवून हृदयाशी धरला व आपल्या प्रेमाश्रुंनी त्याला आभिषेक करून शांतविला ॥६॥ ( व म्हणाले की) हे कपि ! ऐक तू मनात काहीही वाईट वाटून घेऊ नकोस, तू मला लक्ष्मणाच्याही दुप्पट प्रिय आहेस ॥७॥ मी समदर्शी आहे असे सर्वच म्हणतात पण मला अनन्य गति सेवकच प्रिय असतो. ॥८॥ चराचर विश्वरूपाने माझे स्वामी (प्रभू) भगवान आहेत आणि मी त्यांचा सेवक आहे. असा ज्यांचा निश्चय कधी ढळत नाही तोच हनुमंता अनन्य सेवक म्हणावा. ॥ दो. ३॥

बघुनि पवनसुत पति अनुकूल । हर्षित हृदिं हरले सब शूल ॥
नाथ ! शैलिं या कपिपति राहे । तो सुग्रीव दास तव आहे ॥
नाथ ! तयाशीं मैत्री कीजे । दीन गणुनि त्या अभय करीजे ॥
तो सीतेच्या शोधा करविल । चहुं दिशिं मर्कट कोटि पाठविल ॥
यापरिं सकल कथा समजाउनि । घे उभयां पाठीवर चढवुनि ॥
जैं सुग्रीव पाहि रामासी । अतिशय धन्य मानि जन्मासी ॥
नमुनि चरणिं शिर भेटे सादर । तया भेटले सानुज रघुवर ॥
कपि करि मनिं विचार या रीतीं । करितिल विधि मजशी हे प्रीती ॥

दो० :- दोहि कडिल हनुमंत तैं सकल कथा सांगून ॥
ठेउन पावक साक्षि दे दृढा प्रीति सांधून ॥ ४ ॥

स्वामी प्रसन्न आहेत असे पाहून हनुमान हृदयात हर्षित झाला व त्याचे सर्व शूल नष्ट झाले. ॥१॥
सुग्रीव ­ मैत्री
नाथ ! या शैलावर कपिपती सुग्रीव रहातो व तो तुमचा दास आहे ॥२॥ नाथ ! आपण त्याच्याशी मैत्री करावी व तो दीन आहे हे जाणून त्याला भयरहित करावा ॥३॥ तो सीतेचा शोध करवील (कारण की) तो कोट्‌यावधी माकडांना चारी दिशांना पाठवू शकेल ॥४॥ या प्रमाणे सर्व कथा समजावून सांगून हनुमंताने दोघांना आपल्या पाठीवर बसवून घेतले ॥५॥ जेव्हा सुग्रीवाने रामचंद्रास पाहिले तेव्हा त्याने आपला जन्म अतिशय धन्य मानला ॥६॥ मस्तक पायावर ठेवून आदराने भेटला, तेव्हा रघुनाथ अनुजासह त्याला भेटले ॥७॥ कपि­ सुग्रीव विचार करू लागला की हे विधी ! हे माझ्याशी या रीतीने प्रीती करतील का ? (कारण मी वानर व हे राजकुमार !) ॥८॥ दो.­ दोन्हीकडील सगळी कथा सांगून, पावक (=अग्नि)साक्षी ठेवून, दोघांत दृढ प्रीती सांधून दिली.(प्रातिज्ञा पूर्वक सख्य करविले)॥ दो. ४॥

प्रीति जडलि अंतर अणु नुरलें । लक्ष्मण रामचरित सब वदले ॥
सांगे सुगल नयनिं बहु वारी । मिळे नाथ मिथिलेश कुमारी ॥
इथें समंत्री एके वारा । बसलो होतो करित विचारा ॥
गगन पंथिं जातां मज दिसली । अतिशय विलपत परवश पडली ॥
राम राम हा राम ! ओरडत । आम्हां बघुनि दे टाकुनि निज पट ॥
मागति राम शीघ्र ते देती । पट उरिं धरुनि शोक अति करिती ॥
म्हणे सुगल ऐका रघुवीर । त्यजा शोक मनिं धरा सुधीर ॥
करिन सुसेवा सर्व तर्‍हेनें । येउनि भेटे जानकि जेणें ॥

दो० :- श्रवुनि सखावच हर्षे कृपासिंधु बलशीव ॥
कारण कवण वसा वनि सांगा मज सुग्रीव ॥ ५ ॥

दोघांची एकमेकांवर प्रीती जडली व अंतर(आडपडदा) जरा सुद्धा राहीले नाही. लक्ष्मणाने सर्व रामचरित्र सांगीतले ॥१॥ (ते ऐकून) डोळे पाण्याने भरले आहेत असा सुग्रीव म्हणाला की नाथ ! मिथिलेश्वरांची कन्या मिळेल (काही काळजी करू नका) ॥२॥ मी आपल्या मंत्र्यांसह येथे एके दिवशी विचार करीत बसलो होतो ॥३॥ तेव्हा आकाश मार्गाने जात असलेली एक स्त्री मला दिसली; ती परवश झालेली असल्याने अतिशय विलाप करित होती ॥४॥ राम ! राम ! हा राम ! असे ओरडत असलेल्या तिने आम्हाला पाहून आपले वस्त्र टाकून दिले ॥५॥ ते रामानी मागीतले व त्यांनी त्वरेने आणून दिले, व ते हृदयाशी कवटाळून राम अतिशय शोक करू लागले ॥६॥ सुग्रीव म्हणाला की रघुवीर ! मी सांगतो ते जरा ऐका, मनात चांगला धीर धरा व हा शोक सोडा पाहू ॥७॥ मी सर्व तर्‍हेने अशी व्यवस्था करेन की जेणे करून जानकी येऊन भेटेल ॥८॥ दोहा० ­ मित्राचे भाषण ऐकून कृपासिंधु व बलसीमा रघुवीर हर्षित झाले व (म्हणाले की) सुग्रीव ! तुम्ही वनात राहण्याचे कारण काय ते मला सांगा, बरं ! ॥ दो. ५ ॥

नाथ वालि मी दोघे भाई । प्रीति होति न वदली जाई ॥
मयसुत नांव जया मायावी । आला तो प्रभु ! अमचे गावीं ॥
अर्धरात्रिं पुर दारिं गर्जला । वाली रिपुबल साहुं न शकला ॥
धावे वालि, बघुनि तो पळला । बंधुसंग मग मीही धरला ॥
गिरिवर-गुहेमधें तो शिरला । तदा वालि मजला हें वदला ॥
एकपक्ष मम वाट पाहणें । आलों नातर मृतचि जाणणें ॥
तिथें मासभर वास खरारी ! । रुधिर-धार तैं वाहे भारी ॥
वाली हत मज वधील येउनि । पळ काढिला शिळा मी लाउनि ॥
स्वामिरहित पुर मंत्री पाहति । मला राज्य जबरीनें अर्पति ॥
त्या मारुनि घरिं वालि परतला । वैर धरी मनिं बघतां मजला ॥
रिपुसम मज मारी अति भारी । हरुनि घेइ सर्वस्वहि नारी ॥
त्याचें भय रघुवीर कृपाला । भ्रमवि विकल मज भुवनीं सकला ॥
इथें शापवश येउं शके ना । तदपि भीति मन मम विसरेना ॥
सेवक-दुःखे दीनदयाला । स्फुरुं लागति युग भुजा विशाला ॥

दो० :- श्रुणु सुगीवा वालिला एकचि शरें वधीन ॥
ब्रह्मरुद्रपदिं शरण जरि प्राण देहिं राही न ॥ ६ ॥

नाथ ! वाली व मी दोघे भाऊ आणि आमच्यात अशी प्रीती होती की ती सांगता येणे शक्य नाही ॥१॥ मायावी नावाचा मय दानवाचा मुलगा, प्रभू ! तो आमच्या गावी आला ॥२॥ मध्यरात्री पुरवेशीजवळ येऊन त्याने गर्जना केली (युद्धाला आव्हान दिले) व वाली शत्रूचे बळ सहन करू शकला नाही ॥३॥ तेव्हा वाली त्याच्यावर धावला, त्याला पाहून तो मायावी पळत सुटला, मग मी सुद्धा भावाच्या मागोमाग गेलो ॥४॥ तो मायावी एका पर्वताच्या मोठ्‌या गुहेत शिरला, तेव्हा वाली मला असे म्हणाला की ॥५॥ एक पंधरवडा माझी वाट पहा, व मी नाही आलो तर मी मेलो हे नक्की समजा ॥६॥ खरारी ! मी तेथे एक महिनाभर राहीलो, तेव्हा त्या गुहेतून एक रक्ताचा लोट वाहू लागला ॥७॥ वाली मारला गेला व आता तो मलाही येऊन मारेल (असे वाटून) मी एक शिळा लावून पळ काढला ॥८॥ (पुष्कळ दिवस) नगरी राजा विहीन आहे असे पाहून मंत्र्यांनी मला जबरीने राज्य दिले ॥९॥ त्याला मारून वाली घरी परत आला, आणि मला पाहून त्याने मनात वैर धरले ॥१०॥ शत्रुप्रमाणे त्याने मला भरपूर मार दिला व सर्वस्व आणि स्त्री सुद्धा हिरावून घेतली ॥११॥ हे कृपाळ रघुवीरा ! त्याच्या भयाने मला व्याकुळ करून सगळ्या भुवनात भ्रमविला ॥१२॥ येथे तो शापामुळे येऊ शकत नाही, पण माझे मन अजून त्याची भीती विसरत नाही ॥१३॥
वालीप्राण­वियोग­
सेवकाच्या दु:खाने दीन दयाल रघुवीराचे दोन्ही बाहू स्फुरण पावू लागले ॥१४॥ (राम म्हणाले) ऐक सुग्रीव ! मी एकाच बाणाने वालीचा वध करीन तो जरी ब्रम्हदेव व रूद्र यांच्या शरण गेला तरी त्याचे प्राण वाचणार नाहीत ॥ दो.६ ॥

मित्र दुःख ज्यां न दुःखकारि । तयां विलोकत पातक भारी ॥
दुःखगिरी निज रज सम जाणत । मित्र दुःख रज सुमेरु वाटत ॥
ज्यांस अशी मति सहज न असते । मैत्री करती कशास शठ ते ॥
कुपथ निवारुनि सुपथिं चालवी । प्रगटुनि गुण अवगुणांस लपवी ॥
देत घेत मनिं शंका न धरी । बल-अनुमानें सदा हित करी ॥
विपदीं स्नेहा शतपट करती । संत मित्रगुण हे श्रुति वदती ॥
पुढें वदति मृदु दाविति ममता । मागें अहित हि मनीं कुटिलता ॥
सर्पगतीसम चित्त जयांचें । अशां कुमित्रां त्यजत हिताचें ॥
सेवक शठ, नृप कृपण, कुनारी । कपटी मित्र शूलसम चारी ॥
सखे ! सोड शुच मदिय बळावर । साधिन कार्य तुझीं सब सत्वर ॥
म्हणे सुगल ऐका रघुवीर । वालि महाबल अति रणधीर ॥
दुन्दुभि-अस्थी ताल दाखवित । अनायास रघुनाथें उडवित ॥
बघुनि अमित बल वाढे प्रीती । वधितिल वालिस अशी प्रतीती ॥
वारंवार नमी पदिं शीसा । प्रभु जाणुनि मनिं हर्ष कपीशा ॥
उपजे ज्ञान वचन मग बोले । नाथ कृपें मम मन चि अलोलें ॥
महती सुख परिवार संपदा । सोडुन सब सेवीन प्रभुपदां ॥
हीं सब रामभक्तिला बाधक । वदति संत तव पद आराधक ॥
शत्रु मित्र सुख दुःखें जगतीं । मायाकृत, परमार्थे नसती ॥
वालि परमहित जया प्रसादां । भेट राम तव शमन विषादा ॥
स्वप्नीं होई युद्ध जयासी । जागृतिं जाणत लाज मनासी ॥
अतां कृपा प्रभु अशी करावी । निशिदिन भजनिं, तजुनि सब, जावीं ॥
परिसुनि विरतियुता कपि-वाणी । विहसुनि राम वदति धनुपाणी ॥
जें वदलात सत्य सब आहे । नव्हे वचन मम मित्र ! मृषा हें ॥
नट मर्कट इव जगा नाचविति । राम, खगेश ! वेद हें वर्णिति ॥
सुग्रीवा रघुनाथ घेउनी । निघति चाप सायक करिं धरुनी ॥
रघुपति देति सुकंठा धाडुनि । निकट जाइ गर्जे बल पाउनि ॥
ऐकत धावे क्रोधें वाली । स्त्री कर धरि पद समजुत घाली ॥
श्रुणु पति भेटति जे सुग्रीवा । ते दो बंधु तेज-बल-शीला ॥
कोसलेश सुत राम नि लक्ष्मण । जिंकुं शकति काळा रणिं तत्क्षण ॥

दो० :- प्रिये भीरु ! तो म्हणे श्रुणु समदर्शी रघुनाथ ।
मला कदाचित वधिति जरि तरि होईन सनाथ ॥ ७ ॥

मित्रधर्म ­ ज्यांना मित्राचे दु:ख दु:खकारक होत नाही त्यांना पाहताच भारी पातक लागते ॥१॥ स्वत:चे दु:खाचे डोंगर रजासारखे (धूळीकण) जाणतात व मित्राचे रजासारखे दु:ख सुमेरू पर्वतासारखे वाटते ॥२॥ अशी बुद्धी ज्यांच्यात स्वाभाविकपणे असत नाही ते शठ मैत्री करतात तरी कशाला ? ॥३॥ कुमार्गापासून निवारण करून सन्मार्गाने चालवितो आणि अवगुण दोष लपवून गुण प्रगाट करतो ॥४॥ देताना किंवा घेताना भय किंवा संशय बाळगीत नाहीत व आपल्या शक्तीच्या प्रमाणात सदा हित करतात ॥५॥ विपत्तीत शतपट स्नेह करतात; हे मित्रगुण आहेत असे संत व श्रुती सांगतात ॥६॥ तोंडावर गोड गोड बोलून ममता दाखवितात पण पाठीमागे अहित, करतात (अशी) मनात कुटिलता असते ॥७॥ (असे) सर्पाच्या गतीसारखे ज्याचे चित्त असते अशा कुमित्रास त्यागणेच हिताचे असते ॥८॥ शठ सेवक, कृपण राजा, कुनारी व कपटी मित्र या चारी व्यक्ती शूलाप्रमाणे पीडादायक आहेत ॥९॥ मित्रा ! माझ्या बळावर सर्व शोकचिंता सोडून दे मी तुझी सर्व कार्ये लवकरच साधीन ॥१०॥ सुग्रीव म्हणाला, रघुवीर ! ऐका वाली महाबलवान व अति रणधीर आहे ॥११॥ (असे म्हणून) त्याने दुंदुभीच्या हाडांचा सापळा व सात ताल वृक्ष दाखविले (तत्क्षणी) रघुनाथाने ते काही प्रयास न करता (सहज) उडवून दिले ॥१२॥ अमित (अपरंपार) बल पाहून प्रीती वाढली व हे वालीचा वध करतील अशी प्रीती उत्पन्न झाली ॥१३॥ वारंवार पायांवर मस्तक नमविले व हे प्रभू आहेत असे जाणून कपीशाला हर्ष झाला ॥१४॥ आणि आत्मज्ञान उपजले, तेव्हा म्हणाला की नाथ ! आपल्या कृपेने माझे मनच आता स्थिर झाले आहे ॥१५॥ महती, विषयसुख, संपत्ती वगैरे सर्व सोडून मी (आता) प्रभूच्या पायांची सेवा करीन ॥१६॥ ही राम भक्तीला बाधक आहेत असे तुमची आराधना करणारे संत म्हणतात ॥१७॥ शत्रु­मित्र, सुख­दु:खे इ. जगातील सर्व मायाजनित आहेत. त्यांना परमार्थिक आस्तित्व नाही ॥१८॥ राम ! विषादास शमन करणार्‍या ! तुमची भेट ज्याच्या प्रसादाने झाली तो वाली परम हितकर्ता होय ॥१९॥ ज्या एखाद्या बरोबर स्वप्नात युद्ध झाले तर जागे झाल्यावर तो विचार मनात आला की लाज वाटते, तेव्हा जशी कृपा करावी की सर्व सोडून रात्रंदिवस भजनात घालवू शकेन ॥२१॥ कपीची वैराग्ययुक्त वाणी ऐकून राम धनुष्य हातात घेऊन मोठ्‌याने हसून म्हणाले की ॥२२॥ हे मित्रा ! तुम्ही जे म्हणालात ते सर्व सत्य आहे पण माझे वचन खोटे होऊ शकत नाही ॥२३॥ गरूडा ! नट जसा माकडाला नाचवितो तसे राम सर्व जगाला नाचवितात असे वेद वर्णन करतात ॥२४॥ रघुनाथ सुग्रीवाला घेउन हातात धनुष्य व बाण घेऊन निघाले(वाली वधासाठी)॥२५॥ (मग) राघुपतींनी सुग्रीवाला पाठविले. त्याने रामाचे पाठबळ मिळाल्यामुळे जवळ जाऊन गर्जना केली. ॥२६॥ ती ऐकताच वाली क्रोधाने धावत निघाला. पण त्याच्या स्त्रीने­ तारेने त्याचा हात धरला व पाय धरून त्याची समजूत घालू लागली. ॥२७॥ तारा म्हणाली हे पते, ऐकाव जरा, सुग्रीवाला जे भेटले आहेत ते दोघे बंधू तेज व बल यांची परमावधि आहेत. ॥२८॥ ते कोशलराज दशराथांचे पुत्र राम व लक्ष्मण आहेत व ते काळाला सुद्धा तेव्हाच युद्धात जिंकू शकतील. ॥२९॥ दोहा­ : तो वाली म्हणाला की प्रिये ! भित्रे ! ऐक. रघुनाथ समदर्शी आहेत आणि जरी कदाचित त्यांनी मला मारला तरी मी सनाथ होईन ॥दो.७॥

* * * * *

श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु

GO TOP