॥ श्रीरामचरितमानस ॥

(मराठी अनुवाद)

॥ बालकाण्ड ॥

अध्याय २ रा

॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥


Download mp3

आकरिं चारि लाख चवर्‍यांशी । विविध जीव भू-जल-नभ-वासी ॥
सिताराममय सब जग जाणुनि । करतो प्रणति पाणियुग जोडुनि ॥
मजसि कृपाकर-किंकर समजुनि । कृपा करा सर्वहि छल विसरुनि ॥
मज निजमति बल निश्चिति नाहीं । म्हणुन विनवितो सर्वांनाही ॥
मज इच्छा रघुपति-गुण-गानीं । चरित अगाध नि मम मति सानी ॥
नुमजें अंगा एक उपाया । मन मति रंक मनोरथ राया ॥
मति अति नीच उच्च रुचि रुचिरहि । अमृत इच्छि जगिं मिळत तक्र नहि ॥
सज्जन मम उद्धटता क्षमतिल । मन लावून शिशु-शब्द ऐकतिल ॥
बोल बोबडे बालक बोलति । माता पिता मुदित-मन ऐकति ॥
क्रूर कुटिल हसतिल कुविचारी । जे पर - दूषण - भूषण - धारी ॥
प्रिय निज काव्य न कोणा गमतें । असो सुरस वा अति नीरस तें ॥
हर्षति परिसुनि परकाव्याही । ते वर पुरुष न बहु जगिं काहीं ॥
बहु नर सरसरिसम जगिं राहति । जे निज जल-वृद्धिनेंच वाढति ॥
सज्जन सकृत् सिंधुसम कोणी । ज्यास वॄद्धि विधु पूर्ण बघोनी ॥

दो० :- भाग्य अल्प अभिलाष अति एक असे विश्वास ।
श्रवणें संत सुखावती खल करितिल उपहास ॥ ८ ॥

चारी खाणीत व चौर्‍यांशी लक्ष योनीत पृथ्वी, पाणी व आकाश यात राहणारे नाना प्रकारचे जीव जगात आहेत॥१॥ ते सर्व म्हणजे जगच सीताराममय आहे असे जाणून मी हात जोडून प्रणाम करतो ॥२॥ मला कृपाकराचा किंकर समजून व माझे छळ कपट विसरून तुम्ही सर्व माझ्यावर कृपा करावी ॥३॥ मला स्वतःच्या बुद्धीचा व बलाचा भरवसा वाटत नाही म्हणून मी सर्वांना विनवणी करीत आहे ॥४॥ रघुपतीच्या गुणांचे वर्णन करावे अशी माझी इच्छा आहे, आणि चरित्र अगाध असून माझी बुद्धी अगदी क्षुद्र आहे ॥५॥ काव्याची अंगे व उपाय यातले एकसुद्धा मला माहीत नाही, मन व बुद्धी कंगाल आहेत व मनोरथ मात्र राजा आहे ॥६॥ माझी मती अति नीच आहे, रुचि उच्च असून सुंदरही आहे, अमृत मिळावे अशी इच्छा आहे, पण जगात ताक सुद्धा मिळत नाही (अशी माझी स्थिती आहे) ॥७॥ या माझ्या उद्धटपणाबद्दल सज्जन-संत मला क्षमा करतील व माझे बालकाचे बोल मन लाऊन श्रवण करतील ॥८॥ जेव्हा बालके बोबडे बोल बोलू लागतात तेव्हा आई बाप पण ते (बाळबोल) मोठ्या आनंदाने श्रवण करतात ॥९॥ (पण) क्रूर कुटिल कुविचारी लोक हसतील कारण ते दुसर्‍यांच्या दोषांना आपली भूषणे म्हणून धारण करतात (दुसर्‍यांचे दोष शोधून काढून ते इतरांस दाखविणे त्यास भूषणास्पद वाटते) ॥१०॥ आपले स्वतःचे काव्य उत्तम रसाळ असो की अत्यंत नीरस असो ते कोणाला गोड वाटत नाही? (सगळ्यांनाच बहुदा वाटते) दुसर्‍यांचे काव्य श्रवण करून सुद्धा ज्यांना हर्ष असे श्रेष्ठ पुरुष जगात फार नसतात (काही थोडे असतात) [परकाव्य = १. जो आपला प्रिय आहे त्याचे काव्य; २. परमात्म्याचे वर्णन करणारे काव्य.]॥११-१२॥ आपल्या स्वतः मधील पाण्यात भर पडल्याने स्वतःच वाढणारे तलाव व नद्या जशा पुष्कळ तसे (आपल्याच काव्याने आनंदाला पूर येणारे) लोक जगात पुष्कळ; ॥१३॥ पण चंद्राची पूर्ण वृद्धी पाहून वाढणारा जसा एक सागरच तसा एखादाच सज्जन असतो. (जो दुसर्‍याची भरभराट पाहुन, काव्य-महती ऐकून आनंदित होतो) दोहा – माझे भाग्य अगदी अल्प असून अभिलाषा फार मोठी आहे, परंतु एक अति विश्वास वाटतो की (माझे काव्य) श्रवण करुन संत सुख पावतील व खल मात्र त्याची थट्टा, टर उडवतील. ॥दो. ८॥

खल परिहासें हित मम थोरचि । काक कथिति कलकंठ कठोरचि ॥
हंसा बक चातकास वाघुळ । विमल कथेला हसति मलिन खळ ॥
रति न रामपदिं काव्यरसिक नहि । कथा हास्यरस सुखद तयांसहि ॥
मम मति भोळी प्राकृतिं रचना । हसण्या योग्य हसोत दोष ना ॥
ग्राहकशक्तिहि ना प्रभुपद-रति । कथा निरस ही श्रवणिं तयांप्रति ॥
हरिहरपदरति मति न कुतर्की । त्यां ही रघुवरकथा मधुर कीं ॥
रामभक्तिभूषित मनिं जाणुनि । परिसति सुजन सुवाणीं वानुनि ॥
कवि न, वचनिं मी नसे प्रवीणू । सकल कला सब विद्या हीनू ॥
नाना अर्थ अलंकृति अक्षर । विविधा छंद - प्रबंध सुंदर ॥
भावभेद रसभेदां पार न । काव्य दोष - गुण बहु, अठ्ठावन ॥
काव्य-विवेक न एकहि मातें । सत्य लिहीं नव-कागदिं हातें ॥

दो० :- मम रचना सबगुणरहित विश्वविदित गुण एक ॥
तो जाणुनि परिसति सुमति ज्यंमधिं विमल विवेक ॥ ९ ॥

खलांनी केलेल्या परिहासाने माझे हितच होईल. कावळे म्हणतात की कोकिळेचा स्वर कठोर आहेच.॥१॥बगळे हंसांना आणि वाघळे चातकांना हसतात तसेच मलिन खल विमल कथेला हसतात.॥२॥ जे काव्यरसिकही नाहीत, व रामचरणी स्नेह नाही त्यांनाही हे काव्य हास्य रसमय वाटून सुखदायक होईल.॥३॥ (कारण) एकतर प्राकृत भाषेत ग्रंथ, व त्यातही माझी बुद्धी भोळी-भाबडी, म्हणून कोणी हसले तर हसू द्या, त्यात त्यांचा दोष मुळीच नाही. त्यांनी हसण्या योग्यच हे आहे.॥४॥ ज्यांच्या ठिकाणी प्रभुचरण प्रेम नाही व अर्थग्रहण शक्तीही नाही त्यांनी ही कथा श्रवण केली तर त्यांना ही रघुवर कथा निरस वाटेल ॥५॥ ज्यांची बुद्धी तर्कटी नाही आणि जे शिवविष्णु भक्तीमान आहेत त्यांना ही रघुवर कथा मधुर वाटेल.॥६॥(ही कथा) रामभक्तीने विभूषित आहे. हे मनात जाणून संत श्रवण करतील (एवढेच नव्हे तर) ऐकताना प्रशंसा करतील की वाणी सुंदर आहे.॥७॥ मी कवि नाही व भाषाशास्त्रात प्रवीण नाही व मी सकल कलाहीन व सर्व विद्याहीन आहे.॥८॥ अक्षरे, विविध अर्थ, नाना प्रकरचे अलंकार व नाना प्रकारच्या छंदांची – वृत्तांची सुंदर रचना (प्रबंध) (इत्यादी मला काहीच माहित नाही.)॥९॥भावांचे भेद व रसांचे भेद यांना तर पार नाही (ते अगणित आहेत) तसेच काव्याचे दोष व गुण पुष्कळ आहेत, अठ्ठावन्न आहेत असे कोणी म्हणतात.॥१०॥ (असे जे अनेक प्रकारचे ज्ञान काव्यनिर्मितीस लागते) यातील एकाही प्रकरचे ज्ञान मला नाही, हे मी कोर्‍या कागदावर सत्य (प्रतिज्ञापूर्वक) लिहून देतो.॥११॥ माझी रचना-कविता इतर सर्व गुणांनी रहित आहे. पण तिच्यात विश्वविदित असा एक गुण आहे तो जाणून ज्यांच्यात निर्मळ विवेक (ज्ञान) असेल ते शुभमतिमान लोक (कथेचे) श्रवण करतील ॥दो. ९॥

यामधिं रघुपति-नाम उदार । श्रुति-पुराण-अति-पावन-सार ॥
मंगलभवन अमंगलहारी । उमे सहित जें जपति पुरारी ॥
काव्य विचित्र सुकविकृत जेंही । रामनाम-विण शोभत नाहीं ॥
सर्वपरी भूषित विधुवदना । वर नारि न शोभे विण वसना ॥
सबगुण रहित कुकविकृत वाणी । रामनाम यश अंकित, गणुनी ॥
श्रवण कथन बुध करती सादर । संत गुणग्राही सम मधुकर ॥
यदपि काव्यरस यांत न एक हि । रामप्रताप आहे प्रगटहि ॥
हाच भ्ररंवसा मम हृदयाला । कोण सुसंगिं न मोठा झाला ॥
त्यजि धूम्रहि निज सहज कडूपण । अंगरुसंगि करि सुगंध अर्पण ॥
भाषा ग्राम्य वस्तु भलि कथिता । रामकथा करि मंगल जगता ॥

छंद- करि मंगला हरि कलिमला रघुनाथ-गाथा परम ही ।
गति काव्य - सरिते कुटिल जेवीं पुण्यपाथांची महीं ॥
प्रभु-सुयश-संगतिं होइ कृति भलि सुजनमन-सुखदायिनी ।
भव-अंगिं भूति मसाणिंची ती स्मरत शोभन पावनी ॥ १ ॥
दो० :- प्रिय सकलां अति होइ मम काव्य रामयशरंगिं ॥
दारु-विचार किं करी कुणि वंदिति मलय-सुसंगिं ॥ १० रा ॥
श्याम सुरभि पय विशद अति गुणद करिति सब पान ॥
गिरा ग्राम्य सिय-राम यश ऐकति गाति सुजाण ॥ १० म ॥

यात रघुपतीचे उदार नाम आहे आणि ते सर्व वेद-पुराणादिकांचे अति पावन सार (अमृत) आहे.॥१॥ (राम नाम) मंगलांचे भवन व अमंगलांचा विनाश करणारे त्याचांच जप उमेसहित त्रिपुरारि (शंकर) करीत असतात.॥२॥उत्तम कवीने केलेले काव्य विचित्र असले तरी ते सुद्धा रामनामाशिवाय शोभा पावत नाही.॥३॥(जशी) चंद्रमुखी उत्तम स्त्री सर्व प्रकारांनी विभूषित असली तरी वस्त्राशिवाय तिची शोभा नाही.॥४॥(उलट) सर्व गुणांनी रहित (गुणहीन) व वाईट कविचे काव्य जर राम-नाम, रामयश यांनी अंकित असेल तर ते तसे आहे हे जाणून बुध (ज्ञानीभक्त, संत)मोठ्या आदराने त्याचे श्रवण कथन करतात कारण संत मधुकरां (मधमाशां) सारखे गुणग्रहण करणारे असतात ॥५-६॥ जरी या काव्यात एकही काव्यरस नाही तरी या काव्यात रामाचा प्रताप अगदी उघडा आहे ॥७॥ हाच माझ्या हृदयाला भरवसा वाटत आहे कारण की सुसंगाने कोण मोठा नाही झाला? ॥८॥ धूर सुद्धा आपला स्वाभाविक कडूपणा टाकून चंदनाचा संगतीने सुगंध देतो.॥९॥ (तशीच) भाषा गावंढळ आहे, पण जगाचे मंगल करणारी रामकथा ही वस्तु (ग्रंथ विषय) वर्णिली आहे.॥१०॥ छंद - ही श्रेष्ठ रघुनाथ गाथा (कथा) कलिमल हरण करणारी व मंगल करणारी आहे. पवित्र नद्यांची गती जशी कुटिल असते, तशी या कवितेची – सरितेची गती कुटिल (नागमोडी) आहे परंतु ही कविता सरिता प्रभुच्या निर्मळ यशरुपी पवित्र जलाच्या संगतीने भली होईल, ठरेल व ही सज्जनांच्या मनाला सुख देणारी होईल, जसे भवाच्या (शंकराच्या) शरीराला लागलेले स्मशानातील (चिता) भस्म शोभन होते व स्मरण केल्याने पावन करते (तशी ही भाषा होईल) दोहा- रामयशाच्या रंगामुळे (संगतीने) माझे हे काव्य सर्वांना प्रिय होईल कारण की जशी मलयाच्या सुसंगतीने सर्व काष्ठे वंदनीय ठरतात, कोणते लाकूड आहे याचा कोणी विचार करते का? ॥दो. १० रा ॥ गाय काळी असली तरी तिचे दुध अगदी शुभ्र आणि गुणकारी असते, म्हणून सर्व लोक ते पितात, (तसेच या काव्याचे) भाषा अगदी ग्राम्य, पण तीत सीताराम यश आहे. म्हणून शहाणे लोक तिचे श्रवण, कथन, गान करतील. ॥ दो.१० म॥

मणि माणिक मुक्ता छवि जैसी । अहिगिरिगजशिरिं खुले न तैसी ॥
नृप-मुकुटीं तरुणीतनुं बसतां । लाभति कीं सौंदर्य-विपुलता ॥
तशीं सुकवि-काव्यें बुध वदती । उपजुनि इथें तिथें छवि लभती ॥
भक्तीस्तव विधि-भवना त्यागुनि । स्मरत शारदा येते धाउनि ॥
रामचरित-सरिं घडे स्नान ना । ते श्रम जाति न कोटि-साधनां ॥
कवि कोविद मनिं अशा विचारिं । गाती हरियश कलिमलहारी ॥
करतां प्राकृतजनगुणगानें । गिरा शिरा पिटि अनुतापानें ॥
हृदय सिंधु मति शुक्ति समाना ॥ स्वाति शारदा गमे सुजाणां ॥
जर वर्षी वर वारि विचारू । होति काव्य - मुक्तामणि चारू ॥

दो० :- ओविति वेधुति वेधुनि युक्तिनें रामचरित वर ताग ॥
घालिति सज्जन विमल हृदिं शोभा अति अनुराग ॥ ११ ॥

मणि माणके व मोती यांची जी शोभा आहे, ती सर्प, पर्वत व हत्ती यांच्या मस्तकावर तशी खुलत नाही ॥१॥ राजाच्या मुकुटांत किंवा तरुणीच्या शरीरावर राहील्याने त्यांना शोभा प्राप्त होते व ती विपुल वाढते.॥२॥ तसेच बुध-संत म्हणतात की चांगल्या कवींची काव्ये एके ठिकाणी जन्माला येतात व अन्य ठिकाणी शोभा पावतात. (पिकते तेथे विकत नाही.) ॥३॥ सुकवीने शारदेचे स्मरण करताच भक्तीसाठी ती विधिभवनाचा (सत्यलोकाचा) त्याग करुन धावत येते.॥४॥ पण रामचरित्र रुपी तलावात स्नान करता आले नाही तर तिचे ते (धावत येण्याचे) श्रम दुसर्‍या कोट्यवधी उपायांनी (साधनांनी) जात नाहीत. ॥५॥ हा विचार मनात आणून कोविद कवि कलिमलहरण करणार्‍या हरियशाचेच गान करतात. ॥६॥ प्राकृत जनांचे गुणगान केल्याने सरस्वती आपले कपाळ बडवीत पश्र्चातापाने दु:खी होते.॥७॥ सुजाण लोकांना वाटते की हृदय सिंधुसारखे व बुद्धी मोत्याच्या शिंपल्यासारखी आहे व शारदा स्वाती नक्षत्रासारखी आहे.॥८॥ उत्तम विचाररुपी पाण्याचा वर्षाव जर तिने केला तर सुंदर काव्यरुपी मुक्तामणी (मोती) तयार होतात.॥९॥ दोहा-(ती काव्यरुपी सुंदर मुक्ताफळे) युक्तीने विंधून त्यात रामचरित्ररुपी उत्तम ताग्याचा धागा ओवतात, तेव्हा तो हार सज्जन आपल्या निर्मळ हृदयावर धारण करतात तेव्हा अति अनुराग रुपी शोभा येते. ॥दो. ११॥

जे जात किं कलिकालिं करालीं । कृति काकांची वेष मराली ॥
गति कुपथीं श्रुति-पथा सांडिती । कपटकाय कलिपंक-भांडिं तीं ॥
वंचक मिरविति रामभक्त वर । काम - कोप - कनकांचे किंकर ॥
अशांमधें जगिं गणा प्रथम मज । वृष घाण्याचा धिग् धर्मध्वज ॥
निज अवगुण वर्णीन जर सांगें । वाढे कथा पार ना लागे ॥
अल्पचि वर्णन केलें यास्तव । पारखि चतुर शितें भाता तंव ॥
परिसुनि बहुविध माझी विनंती । श्रवुनि कथा कुणि दोष न देती ॥
या ऊपर जे करिति अशंका । ते मजहुनि जड मति अति रंका ॥
चतुर न म्हणविता मी कवि नाहीं । गात यथामति राम-गुणांही ॥
कोठे रघुपतिचरित अपारहि । मम मति कुठें निरत संसार हि ॥
जो मारुत गिरि मेरु उडवितो । वदा तूल किति तया पुढतिं तो ॥
रामप्रभुता अमित, समजतां । कथा गानिं मनिं अति कातरता ॥

दो०:- शेष शारदा शिव विधि आगम निगम पुराण ॥
नेति नेति वदुनी करिति संतत यद्‍गुण-गान ॥ १२ ॥

जे या कलिकालात जन्माला आले व ज्यांची कृती कावळ्याची असून वेष हंसाचा आहे ॥१॥ जे वेदमार्गाचा त्याग करुन कुमार्गाने गमन करतात, त्यांचे शरीर कपटाचे आहे, ते कलियुगातील पापांची पात्रेच होत.॥२॥ असे जे वंचक असून वरवर रामभक्त म्हणून मिरवतात पण काम, क्रोध व कनक यांचे जे किंकर (गुलाम) आहेत्. ॥३॥ असे जे कोणी जगात असतील त्यात माझी गणना प्रथम करावी (करणे योग्य आहे) कारण मी घाण्याच्या बैलासारखा वृथा कष्ट करणारा व धिक्कारण्यास योग्य असा धर्मध्वजी आहे.॥४॥ जर मी आपले अवगुण सांगोपांग सांगू लागलो तर कथा इतकी वाढेल की ती कधी संपणार नाही.॥५॥ एवढ्यासाठी अगदीअल्प वर्णन केले शिवाय चतुर पुरुष शितावरुन भाताची परीक्षा करतात.॥६॥ या प्रमाणे माझी बहुत प्रकारची विनंती ऐकून कथा ऐकल्यावर कोणी दोष देणार नाहीत ॥७॥ इतके सांगून सुद्धा जे कोणी अतिशंका घेतील ते माझ्याहून सुद्धा अधिक मूर्ख आहेत व त्यांची मती रंक आहे (असे ठरेल) ॥८॥ मी कवि नाही व चतुरही म्हणवित नाही, मी आपल्या बुद्धीप्रमाणे रामाचे गुण गात आहे (हे विसरू नये) ॥९॥ श्री रघुपतीचे अपार चरित्र कुठे व संसारात गढलेली माझी मती कुठे ? ॥१०॥ जो वारा मेरु पर्वताला उडवून देतो त्याच्यापुढे कापसाचा पाड तो काय लागणार? ॥११॥ रामचंद्रांचा प्रभाव असा अमित आहे हे जाणून रामकथागान करण्यास मन कचरते.॥१२॥दोहा - शेष, शारदा, शिव, व ब्रह्मदेव, वेद-शास्त्रे व पुराणे इति नाही, इति नाही असे म्हणून सुद्धा ज्यांचे गुणगान सतत करीत असतात. ॥दो. १२॥

ती प्रभुची प्रभुता सब जाणति । परि वदल्याविण कोणि न राहति ॥
तिथें वेद हें कारण दावित । भजनीं विविधा प्रभाव भाषित ॥
एक अनीह अरूप अनाम । अज सच्चिदानन्द परधाम ॥
व्यापक विश्वरूप भगवंत । देह धरुनि कृत चरित अनंत ॥
करितिं सकल हें भक्तालागीं । प्रणतिं कृपाल परम अनुरागी ॥
कृपा सु-ममता दासांवरती । करुनि कृपा जे क्रोध न करती ॥
गतप्रदायक दीन-दयालहि । सरल सबल साहिब रघुराजहि ॥
हें जाणुनि बुध हरियश-वर्णन । करिति गिरा निज सुफल सुपावन ॥
त्याच बळें रघुपति-गुण-गाथा । वदतो नमुनि रामपदिं माथा ॥
मुनिहीं हरियश कथिलें प्रथमहि । तोपथ धरतां मजला सुगमहि ॥

दो० :- भूप करविती सेतु जैं अति अपार सरितांस ॥
अति लघु मुंगिहि जातसे अश्रम परतीरास ॥ १३ ॥

त्या प्रभूचा तो (तसला) प्रभाव जाणतात तरी पण वर्णन केल्याशिवाय कोणीही रहात नाहीत. ॥१॥ याचे कारण वेदांनी असे दाखवले आहे व की भजनाचा प्रभाव विविध प्रकारचा आहे, असे सांगीतले आहे ॥२॥ जो एक इच्छारहित, रुपरहित, नामरहित, जन्मरहित, सत्-चित्-आनंद स्वरुप, परम अधिष्ठान, सर्वव्यापक, विश्र्वरुप व भगवान आहे, त्यानेच देह धारण करून अनंत, विविध चरित्र केले आहे.॥३-४॥ ते सर्व केवळ भक्तांच्या हितासाठी – प्रेमासाठीच असते ते परम कृपाळु असून शरणागतावर त्यांचा परमस्नेह - अनुराग असतो ॥५॥ जे आपल्या दासावर अति ममता व कृपा करतात, व कृपा केल्यावर पुन्हा कधी क्रोध करीत नाहीत ॥६॥ जे गेलेले पुन्हा मिळवून देतात, दीनांवर दया करतात, सरळ स्वभावाचे, अति बलवान स्वामी रघुराजच आहेत. ॥७॥ हे जाणून संत हरियशाचे वर्णन करतात व आपली वाणी सुफल व अति पावन करतात.॥८॥त्याच बळावर मी सुद्धा रामपदी मस्तक नमवून रघुपति गुणकथा सांगेन ॥९॥ माझ्या पूर्वीच पुष्कळ मुनींनी रामयश वर्णिले आहे. तो मार्ग मी धरला म्हणजे मला सुद्धा सोपे जाईल. ॥१०॥ दोहा- ज्या मोठ्या दुस्तर नद्या असतात त्यांना जेव्हा राजेलोक पूल बांधवितात तेव्हा (त्यावरुन) अति लहान मुंगीसुद्धा श्रमाशिवाय परतीराला जाते.॥दो.१३॥

यापरीं करुनि मना बल अर्पण । करिनहि रघुपति कथेस शोभन ॥
व्यासादिक कविपुंगविं नाना । कृत सादर हरि - सुयश वर्णना ॥
त्यांच्या मी नमितों पदकमलां । पुरवा मनोरथां मम सकलां ॥
कलियुग-कविनां करतों वंदन । जिहिं वर्णित रघुपतिचे गुणगण ॥
जे प्राकृत कवि सुज्ञ अति भले । निजभाषें जिहिं हरियश लिहिलें ॥
झाले जे होतिल जे असति । त्यजुनि कपट सकलां त्या प्रणती ॥
व्हा प्रसन्न हें द्या वरदान । साधु - समाजिं काव्य - सन्मान ॥
जो प्रबंध बुध ना आदरिती । वृथा बालकवि ते श्रम करिती ॥
कीर्ति भूति कविता ती लायक । सुरसरि-सम सकलां हितकारक ॥
राम - सुकीर्ती भाषा बोजड । याच विषमतें वाटे हो ! जड ॥
कृपें आपुल्या मजहि सुलभ तें । रेशिम तरटावरहि शोभतें ॥

दो० :- विमल कीर्ति कविता सरल सुज्ञ आदरिति तीस ॥
सहज वैर विसरूनि रिपु परिसुनि वानिति जीस ॥ १४ रा ॥
तें न होइ विण विमल मति मम मतिबल लवभार ॥
करा कृपा हरियश वदें विनवित वारंवार ॥ १४ म ॥
कवि कोविद रघुवरचरित - मानस मंजु मराल ॥
बाल - विनति ऐकुनि सुरुचि लक्षुनि कृपा कराल ॥ १४ चं ॥
सो० :- वंदे मुनि - पद - कंजु ज्यानीं रामायण रचित ॥
सखर सुकोमल मंजु दोषरहित दूषणसहित ॥ १४ द्रा ॥
वंदे चारी वेद भववारिधिं जहाजा - सदृश ॥
ज्यां स्वप्निंहि ना खेद वर्णित रघुवर-विशद यश ॥ १४ य ॥
वंदे विधिपदरेणु भवनिधि निर्मिर्ति, जेथुनिहि ॥
संत सुधा शशि धेनु प्रकटति खल विष वारुणिहि ॥ १४ न ॥
दो० :-विनति जुळुनि कर, नमुनि बुध ग्रह सुर विप्र पदांस ॥
व्हा प्रसन्न पुरवा सकल शुभ मम मनोरथास ॥ १४ मः ॥

या प्रमाणे मनास बल देऊन मी सुद्धा ही सुंदर रघुपती कथा (लेखन) करीन.॥१॥ कविवंदन – व्यासादिक ज्या मोठमोठ्या अनेक कविंनी मोठ्या आदराने श्रीहरीच्या सुयशाचे वर्णन केले त्या सर्वांच्या चरण-कमलांना मी वंदन करतो.(व विनवितो की) त्यांनी माझे सकल मनोरथ पूर्ण करावेत.॥२-३॥ ज्या कविंनी रघुपतींच्या गुणगणांचे वर्णन (संस्कृतात) केले त्या कलियुगातील कविंना मी वंदन करतो ॥४॥ ज्या अति चतुर व अति सूज्ञ प्राकृत कवींनी आपल्या मातृभाषेत श्रीहरिचे यशगान केले त्या पूर्वी झालेल्या, विद्यमान असलेल्या व पुढे होणार्‍या सर्वांना मी निष्कपटाने नमन करतो.॥५-६॥ (आपण सर्वजण) प्रसन्न व्हा व हे वरदान द्या की साधुसमाजात (माझ्या) काव्याचा सन्मान होईल. ॥७॥ (कारण) ज्या प्रबंधाचा साधु समाजात आदर होत नाही ते काव्य (ग्रंथ) लिहिण्याचे परिश्रम त्या मूर्ख कविने व्यर्थ केले (असे ठरते) ॥८॥ कीर्ती, धनादि ऐश्वर्य व काव्य ही तेव्हाच योग्य ठरतात जेव्हा ती गंगे प्रमाणे सर्वांना हितकारी होतात ॥९॥ (या माझ्या काव्यात) रामचंद्रांची उत्तम, सुंदर कीर्ती आहे (त्यामुळे एक अडचण दूर झाली) पण माझी भाषा अगदी बोजड आहे, हीच मोठी विषमता आहे. त्यामुळे मला जड वाटते, हो ! (गंगेसमान माझे काव्य सर्वांना हितकर होईल का?) ॥१०॥ (पण) आपल्या सर्वांच्या कृपेने (हे अवघड कार्यही) मला सुलभ होईल कारण रेशीम तरटावर सुद्धा सुंदर-मनोहारी दिसते.॥११॥ दोहा - जी कविता सरल असून जिच्यात विमल रामकीर्ती आहे व जिचे श्रवण केल्यावर वैर विसरुन वैरी सुद्धा जिची वाखाणणी करतात त्याच कवितेला सूज्ञ आदर देतात. ॥दो १४ रा॥ पण ही गोष्ट बुद्धी विमल असल्याशिवाय होत नाही व माझ्या बुद्धीचे बल तर अगदी थोडे आहे, म्हणून मी वारंवार विनवीत आहे की, मी हरियश गात आहे, तरी माझ्यावर कृपा करा. ॥ १४ म ॥ कविश्रेष्ठ हो ! आपण रघुवर चरित्ररुपी मानसातले (मानस सरोवरातले) सुंदर हंस आहात, म्हणून माझी बालकाची विनंती ऐकून व माझी रुचि चांगली आहे हे लक्षात घेऊन आपण माझ्यावर कृपा कराल (अशी आशा आहे). ॥दो १४ चं॥ समष्टी वंदन – सखर असून अतिकोमल व सदूषण असून दोष रहित असे सुंदर रामायण ज्यांनी रचले त्या वाल्मीकी मुनींच्या पदकमलांना मी वंदन करतो.॥ दो. १४ द्रा ॥ भवसागरात जे जहाजासारखे आहेत व रघुवराचे विशद यश वर्णन करीत असता ज्यांस स्वप्नात सुद्धा श्रम होत नाहीत त्या चारी वेदांना मी वंदन करतो.॥ दो. १४ य ॥ जेथून भवसागर निर्मिती झाली त्या ब्रह्मदेवाच्या पायांच्या रजाला मी वंदन करतो त्याच भवसागरातून संत, अमृत, चंद्र धेनू व खल, विष व वारुणी (मदिरा) ही सर्व प्रगट झाली.॥ दो. १४ न ॥ बुध, ग्रह, देव आणि विप्र यांच्या पायास नमन करुन हात जोडून मी विनंती करतो की सर्वांनी प्रसन्न होउन माझा शुभ मनोरथ पूर्ण करावा ॥दो.१४म:॥

नमूं शारदा नी सुरसरिता । युगल पुनीत मनोहर-चरिता ॥
मज्जन पानिं पाप हरि एका । श्रवणिं कथनिं दुजि हरि अविवेका ॥
गुरुपितृमाय महेश - भवानी । प्रणमूं दीनबंधु दिनदानी ॥
स्वामि सखा सेवक सियपतिचे । हित निरुपधि सबपरीं तुलसिचे ॥
कलि पाहुनि जगहित गिरिजा हर । मंत्रजाल जिहिं सृजिलें शाबर ॥
अर्थ न वर्णमेळ, जप केवळ । महिमा प्रगट महेश - महाबळ ॥
ते उमेश अनुकूलहि मजला । करिति कथा मुद मंगल - मूला ॥
स्मरुनि शिव शिवा प्रसाद पावुनि । वदतो रामचरित मनिं हर्षुनि ॥
कवितां मम शिवकृपें विराजे । जणुं सोडुप - उडु सुनिशा भ्राजे ॥
जे स्नेहें ही कथा सांगतिल । सावधान समजुनी ऐकतिल ॥
होतिल रामचरण - अनुरागी । कलिमलरहित सुमंगल भागी ॥

दो० :- जर हर गौरि पसाय कीं मजहि खरा स्वप्नांत ॥
जो प्रभाव कथिला, खरा हो प्राकृत काव्यांत ॥ १५ ॥

आता मी शारदेला व गंगेला नमन करतो, दोन्ही पवित्र असून दोघींचे चरित्र मनोहर आहे.॥१॥ एक् गंगा स्नान व पान यांच्या योगाने पापहरण करते व दुसरी शारदा श्रवण व कथनाने अविवेक हरते ॥२॥ मी महेश-भवानी यांना प्रणाम करतो (कारण) जे माझे गुरु, पिता व माता असून दीनबंधू व प्रतिदिनीं (मला) दान देणारे आहेत. ॥३॥ ते (महेश) सीतापती रामचंद्रांचे सेवक, सखा व स्वामी असून तुलसी दासाचे सर्व प्रकारे निष्कपटी मित्र (हितकर्ते) आहेत.॥४॥ कलियुग आले आहे असे पाहून ज्या गिरिजाहरांनी जगाच्या कल्याणासाठी शाबर मंत्रांचे समूह उत्पन्न केले ॥५॥ त्यामध्ये अक्षरांचा व अर्थाचा मेळ नाही फक्त जपच (करावा लागतो) तरीपण त्यांचा प्रभाव अगदी प्रगट आहे. याचे कारण महेशाचे महासामर्थ्य. ॥६॥ तेच उमेश माझ्यावर प्रसन्न आहेत म्हणून ते ही कथा-प्रकृत काव्य-मोद व मंगलांचे मूळ करतील ॥७॥ शिवा व शिव यांचे स्मरण करून त्यांचा प्रसाद मिळाल्यावर मी आता मनात हर्षयुक्त होऊन रामचरित वर्णन करतो ॥८॥ माझी कविता शिवकृपेने अशी विराजत आहे की जणुं सुंदर (शारदीय पौर्णिमेची) रात्रच चंद्र व नक्षत्रमंडलासह प्रकाशत आहे.॥९॥ ही रामचरितकथा जे कोणी सावधानपणे व स्नेहाने सांगतील व जे कोणी सावधानपणे समजून ऐकतील- ॥१०॥ ते रामचरण-अनुरागी होतील. कलिमल रहित होतील व सुमंगलाचे भागीदार होतील ॥११॥ दोहा - कारण जर हर व गौरी यांचा माझ्यावर स्वप्नांत व खरा (जागृतीत) सुद्धा (कृपा) प्रसाद असेल तर पूर्वी जो प्रभाव सांगीतला तो या प्राकृत काव्यातही खरा होईल.॥दो.१५॥

* * * * *

श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु

GO TOP