॥ श्रीगणेशाय नमः ॥

॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥

॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥

॥ जय जय रघुवीर समर्थ ॥

॥ श्रीरामचरितमानस ॥

(मराठी अनुवाद)

॥ प्रथम सोपान ॥

॥ बालकाण्ड ॥

अध्याय १ ला

॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥


Download mp3

अनुवादक-कृत मंगलाचरण

आर्या :- श्रीरामनाम-महवित् पूज्याग्र्यो विघ्ननाशको देवः ॥
तं गणनाथं वन्दे हंसारूढां च शारदां रसदाम् ॥ १ ॥
श्रीरामभक्तवंद्यं रघुपतिभक्तार्तिनाशनं धीरम् ॥
वन्दे रघुवीरनुतं शरणागतरक्षकं महावीरम् ॥ २ ॥
शरदंबराभनीलं शरत्सरोरुहसुरम्यमुखकञ्जम् ॥
रामं विधिशिववन्द्यंयं वन्दे वाल्मीकिविमलवागीड्यम् ॥ ३ ॥
आद्यकवेरवतारं भवतारकरामचरितविस्तारम् ॥
कामारिप्रियभक्तं तुलसीदासं नमामि साष्टांङ्गम् ॥ ४ ॥
यस्याशीर्वादघनो मानसगूढार्थवृष्टिना हृदयम् ॥
सततं प्लावयतीदं गंगादासं नमामि भक्त्या तम् ॥ ५ ॥
व० ति० :- यत्पादपंकजपरागपवित्रमौलि
र्भूयो न पश्यति नरो जठरं जनन्याः ॥
तं वासुदेवमजमीशमनंतबोधम् ॥
श्रीमद्‍गुरुं शरणदं प्रणतो‍स्मि नित्यम् ॥ ६ ॥
अनुष्टुभ् :- तुलसीमंजरीशुद्धा रामभ्रमरभूषिता ॥
रामाज्ञया स्वभाषायां प्रज्ञानेनाऽनुवाद्यते ॥ ७ ॥

मूळ मंगलाचरण

वर्णानामर्थसङ्घानां रसानां छंदसामपि ॥
मंगलानां च कर्तारौ वन्दे वाणी-विनायकौ ॥ १ ॥
भवानी-शङ्करौ वन्दे श्रद्धा-विश्वासरूपिणौ ॥
याभ्यां विना न पश्यन्ति सिद्धाः स्वान्तस्थमीश्वरम् ॥ २ ॥
वन्दे बोधमयं नित्यं गुरुं शंकररूपिणम् ॥
यमाश्रितो हि वक्रोऽपि चंद्रः सर्वत्र वन्द्यते ॥ ३ ॥
सीतारामगुणग्राम-पुण्यारण्य-विहारिणौ ॥
वन्दे विशुद्धविज्ञानौ कवीश्वर कपीश्वरौ ॥ ४ ॥
उद्‌भव-स्थिति-संहारकारिणीं क्लेशहारिणीम् ॥
सर्वश्रेयस्करीं सीतां नतोऽहं रामवल्लभाम् ॥ ५ ॥

शा० वि० - यन्मायावशवर्ति विश्वमखिलं ब्रह्मादिदेवाऽसुरा ।
यत्सत्वादमृषेव भाति सकलं रज्जौ यथाऽहेर्भ्रमः ॥
यत्पादप्लव एक एव हि भवाम्बोधेस्तितीर्षावताम् ।
वन्देऽहं तमशेषकारणपरं रामाख्यमीशं हरिम् ॥ ६ ॥

व० ति० :- नाना-पुराण-निगमागम-संमतं यद् ।
रामायणे निगदितं क्वचिदन्यतोऽपि ॥
स्वान्तःसुखाय तुलसी रघुनाथ-गाथा ।
भाषानिबन्धमतिमज्जुलमातनोति ॥ ७ ॥

सो० :- स्मरत सिद्धि दे तूर्ण गणनायक करिवरवदन ॥
करो कृपा तो पूर्ण बुद्धिराशि शुभगुणसदन ॥ मं०१ ॥
मूक होइ वाचाल पंगु चढे गिरिवरिं गहन ॥
कॄपया यस्य दयाल द्रवु तो सब कलि-मल-दहन ॥ मं०२ ॥
नील-सरोरुह-शाम तरुण-अरुण-वारिज-नयन ॥
करो हृदयिं मम धाम सदा क्षीर-सागर-शयन ॥ मं०३ ॥
कुंद-इंदु-सम देह उमारमण करुणायतन ॥
जो करि दीनीं स्नेह करो कृपा मर्दन मदन ॥ मं०४ ॥
वंदे गुरुपद-कंज कृपासिंधु नररूप हर ॥
महामोहतमपुंज यद्वचनें रविकर-निकर ॥ मं०५ ॥

श्री रामचरीत् मानस मराठी अनुवाद (केवळ सरलार्थ)
ब्रह्मीभूत परम पूज्य परमहंस परिव्राजकाचार्य प्रज्ञानानंद सरस्वती कृत अनुवादाचे मंगलाचरण -
१) श्रीराम व रामनामाचा प्रभाव जाणणारे, प्रथम पूज्य असलेले व विघ्नांचा अंत करणारे जे देव गणनाथ (गणपति) त्यांना व रस देणार्‍या हंसारूढ शारदेला मी वंदन करतो.
२) श्रीरामभक्तांना वंद्य, जो रघुपतींच्या भक्तांची संकटे नाहीशी करतो, जो धीर आहे, श्री रघुवीराने (स्वतः) ज्याची स्तुती केली, व जो शरण आलेल्यांचे रक्षण करतो त्या महावीराला (हनुमंताला) मी वंदन करतो.
३) शरद ऋतूमधील तलावात वाढणार्‍या नीलकमलाप्रमाणे ज्यांचे मुख अति रमणीय आहे असे, शंकर व ब्रह्मदेव यांना वंदनीय असणार्‍या रामांची ज्या विमल वाणी-वाल्मीकींनी स्तुती केली (किंवा ज्या वाल्मीकींच्या विमल वाणीस स्तुती योग्य असे राम) अशा रामांना मी वंदन करतो.
४) आद्यकवीचे अवतार असलेले, संसारातून तारणार्‍या, श्रीरामचरिताचा विस्तार करणारे, कामारि-शंकरांचे प्रिय भक्त किंवा जे शंकरांना प्रिय होते, त्या तुलसीदासांना (मी) साष्टांग नमस्कार करतो. ५) ज्यांचा आशीर्वाद रूपी मेघ मानसाच्या गूढार्थरुपी जलाच्या वृष्टीने या हृदयास सतत भिजवित आहे त्या बाबादासांना प्रेमाने (मी) नमस्कार करतो.
६) ज्यांच्या चरणरुपी कमळाच्या परागांनी ज्याचे मस्तक पावन झाले आहे. असा नर पुन्हा जननीचे उदर पहात नाही, जे जन्मरहित ईश्वर स्वरूप असून ज्यांचे ज्ञान अंत रहित आहे; त्या शरणागताला आश्रय देणार्‍या श्रीमान् सद्‌गुरू वासुदेवानंद सरस्वतींना (पोटे स्वामी) मी नित्य प्रणाम करतो.
७) रामचंद्र रघुपतीरुपी भ्रमराने भूषित झालेल्या शुद्ध तुलसीमंजरीचा अनुवाद, रामचंद्राच्या आज्ञेने प्रज्ञानानंदाकडून स्वभाषेत-मातृभाषेत (मरठीत) केला जात आहे.
गोस्वामी तुलसीदास कृत मूळ मंगलाचरण-
१) वर्ण (अ पासून क्ष पर्यंतची अक्षरे) अर्थांचे समुदाय, छंद, रस व सर्व प्रकारचे मंगल करणार्‍या वाणी व विनायक यांना मी वंदन करतो. (गूढार्थाने सीता व राम यांना वंदन आहे)
२) ज्यांच्याशिवाय या सिद्धांना सुद्धा स्वान्तस्थ-हृदयात असलेल्या ईश्वराचे दर्शन करता वा घेता येत नाही त्या श्रद्धा आणि विश्वास रुपी भवानी व शंकरांना मी वंदन करतो.
३) ज्यांचा आश्रित झाल्याने वाकडा (व्दितीयेचा) चंद्र सुद्धा वंद्य झाला त्या शंकररुपी ज्ञानमय गुरुमहाराजांना मी नित्य वंदन करतो.
४) सीतारामांच्या गुणसमूहरुपी पुण्य अरण्यात विहार करण्याचा स्वभाव असलेल्या विशुद्ध (विमल) विज्ञान संपन्न कवीश्वर वाल्मीकी व कपीश्वर हनुमान या दोघांना मी वंदन करतो.
५) जगाची उत्पत्ती, स्थिती व लय करणारी, क्लेशांचा विनाश करणारी आणि सर्व प्रकारचे श्रेय-मंगल-कल्याण करणारी व रामास फार प्रिय असणारी - रामवल्लभा-जी सीता तिला मी नमस्कार करतो. (नमतो) ६) सगळे विश्व आणि ब्रह्मदेवादिक् सर्व देव व असूर सुद्धा ज्यांच्या मायेला वश होऊन वर्ततात - वागतात. ज्यांच्या सत्तेवर-अधिष्ठानावर, दोरीवर सर्प भासावा तसे हे सगळे विश्व खरे असल्यासारखे वाटते-भासते आणि संसार रुपी सागर तरुन जाण्याची इच्छा असणा‍र्‍यांस ज्यांचे पायरुपी एकच एक तराफा-जहाज आहे त्या सर्व कारणातीत असलेल्या ईशाला, राम नावाच्या हरीला मी वंदन करतो.
७) नाना पुराणे निगम (वेद) व आगम (तंत्र व षड्दर्शनादि) यांना मान्य असलेले जे रामायणात वर्णन केले आहे. ते घेऊन व क्वचित दुसर्‍या ठिकाणचे (रामायणातील) घेऊन तुलसीदास स्वतःच्या अंतःकरणाच्या सुखासाठी अति सुंदर रघुनाथ कथा निबंधाची अति सुंदर रचना करीत आहे.
सोरठा
१) ज्यांचे स्मरण करताच ताबडतोब कार्य सिद्धि होते वा सिद्धी प्राप्त होते, जे गणांचे नायक आहेत, व ज्याचे मुख सुंदर हत्तीच्या मुखासारखे आहे, ते बुद्धीची राशी व शुभ गुणांचे माहेर घर माझ्यावर पूर्ण कृपा करोत.
२) ज्याच्या कृपेने मुका वाचाल होतो व पंगु (सुद्धा) दुर्गम अशा (गहन) महापर्वतावर चढू शकतो तो सकल कलिमलांचे दहन करणारा दयाळु (माधव-विष्णु) माझ्यावर द्रवो - माझी त्याला दया येवो.
३) जे नील कमलासारख्या श्याम वर्णाचे आहेत, ज्यांचे नेत्र नवीन फुललेल्या लाल कमळासारखे आहेत, व जे सदा क्षीरसागरात शयन करतात ते प्रभु सदा माझ्या हृदयात घर करोत (राहोत).
४) कुंदाचे फूल व चंद्र यांच्यासारखे (गौरवर्णी) ज्यांचे शरीर आहे ते उमापति (उमेच्या ठिकाणी रममाण होणारे) व करुणेचे निवासस्थान असणारे जे दीनांवर स्नेह करतात व जे मदनाचा विनाश करणारे आहेत ते माझ्यावर कृपा करोत.
गुरुवंदना -
५) जे नररुपाने साक्षात हर (शंकर) आहेत व जे कृपासिंधु आहेत त्या गुरुंच्या पदकमलांना मी वन्दन करतो. त्यांची वचने (रामचरितमानस कथन) महामोहरुपी अंधकार राशीला सूर्यकिरणांच्या समूहा सारखी आहेत. <

चौ० :- वंदे गुरु - पद - पद्म - परागा । सुरुचि-सुवास सरस-अनुरागा ॥
अमृत-मुळीमय चूर्ण सुचारू । शमन सकल भवरुज परिवारू ॥
सुकृति शंभुतनु विमल विभूती । मंजुल मुद - मंगला प्रसूती ॥
जन-मन-मंजु-मुकुर-मलहरणी । करत तिलक गुणगण वशकरणी ॥
श्रीगुरु-पद-नख-मणि-गण-जोती । स्मरतां दिव्य - दृष्टि हृदिं होती ॥
दलन मोहतम सुप्रकाश तो । महाभाग्य ज्या हृदयीं पडतो ॥
हृदय-विलोचन विमल उघडती । दुःख दोष भवशार्वर झडती ॥
रामचरित-मणि-माणिक दिसती । प्रगट गुप्त जिथं जे खनिं असती ॥

दो० :- नेत्रिं सु-अंजन घालितां साधक सिद्ध सुजाण ॥
वनिं पर्वतिं कौतुकिं बघति भूतळिं भूरि निधान ॥ १ ॥

१) गुरुच्या चरणरुपी कमलांतील परागांना मी वंदन करतो. त्यात सुरुचिकपी सुवास सुगंध असून ते अनुराग रसाने युक्त आहेत.२) (श्री गुरुमहाराजांच्या पायांची धूळ ही धूळ नसून) अमृत मुळीचे फार सुंदर चूर्ण आहे व ते भवरोग व त्याचा परिवार याचे शमन विनाश करते. ३) (शरीराला लागणारी ही गुरूपद धूली) सुकृती रुपी साक्षात शिवाच्या अंगावरील विमल विभूती आहे व सुंदर मंगलाची व आनंदाची जननी (प्रसवणारी) आहे ४) (गुरुपदधूलि-विमल-विभूति सेवकाच्या मनरुपी सुंदर आरश्यावरील मळ दूर करणारी असून तिचा (कपाळावर) टिळा लावला असता ती गुणसमूहास वश करणारी आहे ५) श्री गुरुमहाराजांच्या चरणनखरुपी मणिसमूहाच्या ज्योतीचे-प्रकाशाचे स्मरण करताच, स्मरण-ध्यान करणार्‍याचे हृदय दिव्यदृष्टी युक्त होते. म्हणजेच हृदयाला दिव्य दृष्टी प्राप्त होते. ६)तो सुंदर प्रकाश मोहरुपी अंधाराचा संहार करतो. तो ज्याच्या हृदयात पडेल त्याचे भाग्य मोठे ! (तो महाभाग्यवंताच्याच हृदयात प्रकट होतो.) ७) ज्याच्या हृदयाचे निर्मळ डोळे उघडतात व संसृती रुपी (भव) रात्रीतील दु:खे व दोष नष्ट होतात (हे निर्मळ डोळे म्हणजे ज्ञान व वैराग्य) ८) मग त्यास रामचरित्र रुपी मणिमाणके जेथे खाणीत गुप्त वा प्रगट असतील ती दिसूं लागतात. दो.१- डोळ्यांत सिद्धांजन घातले म्हणजे जसा साधक सिद्ध व सुजाण होतो व त्यास सहज लीलेने (कौतुकि) वनात, पर्वतात, किंवा जमिनीत असलेले गुप्त धनाचे ठेवे दिसतात (वन-इतिहास, पर्वत - वेदपुराणे)

गुरुपद-रज मृदु मंजुल अंजन । नयनामृत दृग् - दोष - विभंजन ॥
तत्कृत विमल विवेक - विलोचन । वर्णिन रामचरित भवमोचन ॥
वंदे प्रथम महीसुर - चरणां । मोहजनित सब संशय - हरणां ॥
सुजन समाज सकल गुण - खाणी । करतो प्रेमें प्रणति सुवाणीं ॥
साधु - चरित शुभ चरित कपासी । निरस विशद गुणमय फल ज्यासी ॥
दुःख सहुनि परछिद्रां झांकति । जेणें जगतिं वंद्य यश पावति ॥
मुद - मंगलमय संत - समाजहि । जो जगिं जंगम तीर्थराज ही ॥
रामभक्ति जिथं धार भागिरथि । ब्रह्मविचार प्रचार सरस्वति ॥
विधिनिषेधमय कलिमल - हरणी । कर्मकथा ती भानुनन्दनी ॥
वेणी हरिहर - कथा विराजे । श्रवत सकल मुद - मंगलदा जे ॥
वट विश्वास अचल निजधर्मां । गणा तीर्थपति - साज सुकर्मा ॥
सकल सुलभ सब दिन सब देशां । सादर सेवत शमवी क्लेशां ॥
अकथ अलौकिक तीर्थराज हा । उघडा महिमा सद्य फलद हा ॥

दो० :- परिसुनि समजति मुदित मन मज्जति अति अनुरागिं ॥
लाभ चारि फल या तनूं साधुसमाज - प्रयागिं ॥ २ ॥

श्रीगुरुमहाराजांचे पदरज हे मृदु व मंजुळ नयनामृत अंजन आहे. त्याने सर्व दृष्टी दोषांचे भंजन होते.॥१॥ त्याने मी आपल्या ज्ञान-नयनाला निर्मल केल्यावर आता भव-संसृती पाशातून सोडविणारे श्रीराम चरित्र वर्णन करीन ॥२॥ मोहाने जन्म दिलेल्या सर्व संशयांचा संहार करणार्‍या महीसुरांच्या-ब्राम्हणांच्या चरणांना मी प्रथम वंदन करतो ॥३॥ सकल गुणांची खाण असणार्‍या सज्जनांच्या समुहाला मी प्रेमाने व सुंदर (नम्र, गोड ) वाणीने प्रणाम करीत आहे ॥४॥ ज्याचे फळ नीरस, उज्वल व गुणमय असते अशा कापसाच्या चरित्रासारखे साधुंचे चरित्र शुभ असते ॥५॥ ते स्वत: दु:खे सहन करुन् दुसर्‍यांची छिद्रे झाकतात व तेणेंकरुन जगात वंद्य होतात व वन्दनीय यश पावतात ॥६॥ संतसमाज मुदमंगलमय आहे कारण की तो जगातील जंगम तीर्थराजच आहे. ॥७॥ जिथे (साधुसमाज प्रयागात) रामभक्ती ही भागीरथीची धार-प्रवाह आहे, व ब्रह्मविचाराचा प्रचार (प्रवचन-निरुपण) ही सरस्वती आहे. ॥८॥ विधी-निषेधांनी युक्त व कलिपापांचा संहार करणारी कर्मकांडाची कथा ही सूर्यकन्या यमुना आहे.॥९॥ हरिहरकथा ही त्रिवेणी विराजत असून श्रवण घडताच जी मोदमंगलदायक आहे.॥१०॥निजधर्माच्या ठिकाणी अचल विश्वास हा अक्षय-वट आहे असे मानावे व सत्कर्मास तीर्थराजाचा सारा सरंजाम गणावे ॥११॥ हा (साधुसमाजरुपी) तीर्थराज सर्व देशात, सर्वांनाच सर्वकाळी सुलभ आहे व त्याचे आदराने सेवन केले असता तो सर्व क्लेशांना शमवितो.॥१२॥ हा तीर्थराज अलौकिक व अवर्णनीय आहे व याचा प्रभाव अगदी उघड-प्रगट दिसतो आणि हा सद्य (ताबडतोब, रोख) फलदायी आहे.॥१३॥ साधुसमाजरूपी प्रयागात जे कोणी सेवक (जन) मुदित् मानाने, आनंदाने श्रवण करुन समजतील, व अनुरागात मग्न होतील ते (त्रिवेणीत मज्जन करणारे) याच तनुत अर्थ,धर्म, काम व मोक्ष ही चारी फळे (पुरुषार्थ) प्राप्त करतील. ॥ दो. २ ॥

मज्जन फल तत्काल पहावें । बकें हंस पिक काकें व्हावें ॥
ऐकुनि कुणि विस्मय ना माना । गुप्त संत-संगतिमहिमा ना ॥
वाल्मीकी - नारद - घटजांनी । निज होणें कथिलें स्वमुखांनीं ॥
स्थलचर जलचर नभचर नाना । जीवां जगिं चेतनां जडानां ॥
मति गति भूति भलेपण कीर्ती । जैं ज्या जेथें प्राप्त जशीं तीं ॥
तो सत्संगति - महिमा जाणा । लोकीं वेदिं उपाय दुजा ना ॥
विण सत्संग विवेक न होतो । रामकृपेविण सुलभ न हो ! तो ॥
सत्संगति मुद - मंगल - मूलहि । ती फल सिद्धि साधनें फूलंहि ॥
सुधारती शठ सुसंग पावुनि । लोहिं हेमता परीस लागुनि ॥
विधिवश सुजन कुसंगीं पडती । निजगुण फणिमणि सम अनुसरती ॥
विधि-हरि-हर कवि कोविद वाणी । लाजे साधू-महिमा गानीं ॥
तो मजला वदवेलच कैसा । शाकविक्या मणिगुणगण जैसा ॥

दो० :- वंदे संतसमान मन हित अनहित ना कोणि ॥
अंजलिगत शुभ सुमनं जशिं सम सुगंध कर दोनि ॥ ३रा ॥
संत ! सरल-मन जगत-हित स्नेहशील जाणून ॥
रामपदीं द्या रति कृपें बाल-विनति ऐकून ॥ ३म ॥

सत्संग - महिमा - मज्जन केल्याचे फळ तत्काल अनुभवास येते.(कसे ते) पहा बगळा हंस होतो व कावळा कोकिळ होतो ॥१॥ हे ऐकून कोणी आश्चर्य मानू नका; कारण सत्संगतीचा महिमा गुप्त नसतो (अगदी प्रगट असतो) ॥२॥ वाल्मीकी, देवर्षी नारद,घट्योनी अगस्ती यांनी आपआपल्या मुखाने आपली हकीकत (कसे होतो व सत्संगतीने कसे झालो) सांगीतली आहे.॥३॥जगात नाना प्रकारचे जमिनीवर चालणारे, पाण्यात् संचार करणारे, आकाशात उडणारे जड वा चेतन जीव आहेत. ॥४॥ त्यापैकी ज्यांना जिथे जेव्हा ज्या प्रकाराने (उपायाने) सुमति, शुभगति, ऐश्वर्य चांगुलपणा (मोठेपणा) वा कीर्ती मिळाली ॥५॥ तो (केवळ) संत संगतीचाच प्रभाव आहे असे जाणावे. (या गोष्टी) प्राप्त होण्यास लोकांत किंवा वेदांमध्ये (सुद्धा) दुसरा उपाय नाही ॥६॥ सत्संगाशिवाय विवेक व ज्ञान प्राप्त होत नाही पण अहो ! तो सत्संग रामकृपेशिवाय मिळणे कठीण आहे (सुलभ नाही)॥७॥ आनंद मंगलांचे मूळ सत्संगतिच आहे; कारण सत्संगति-लाभ हेच फळ व हीच सिद्धी व (इतर) सर्व साधने फुले आहेत ॥८॥ परीसाचा स्पर्श झाला म्हणजे लोखंड सोने बनते तसेच संत संगतीचा लाभ झाला म्हणजे शठ-खल सुधारतात ॥९॥ (परंतु) दैववशात सज्जनांना-संताना कुसंगतीत पडावे लागले तरी नागाच्या मण्यासारखे ते आपल्या संत गुणांचेच अनुकरण करतात. (कुसंगतीचा त्यांच्यावर काहीही परिणाम होत नाही) ॥१०॥ ब्रह्मा, विष्णु, महेश, कवि, शास्त्रज्ञपंडित (कोविद) यांची वाणी आणि सरस्वती, शारदा, साधूंचा महिमा वर्णन करताना लाजते ॥११॥ (असा जो) तो महिमा मला कसा बरे वर्णन करता येईल? भाजीविक्या जसा रत्‍नाच्या अनेक गुणांचे वर्णन करु शकत नाही. (तसेच माझे) ॥१२॥ ओंजळीतील (शुभ) सुगंधी फुले (सुमन) जशी दोन्ही हातांस सारखेच सुगंधित करतात तसेच संतांचे मन समान असते व त्यास मित्र वा शत्रू कोणी नसतात; अशा संताना मी वंदन करतो. ॥३रा॥ संत हो, आपण सरळ मनाचे असून जगाचे हित करणारे आहात, म्हणून माझी बालकाची विनवणी ऐकून व आपला स्नेह व शील जाणून माझ्यावर कृपा करुन मला श्रीराम पदकमलांच्या ठिकाणी प्रेम द्या.( मला इतर काही नको). दो.३म ॥

अथ वन्दे सद्‌भावें खलगण । दक्षिणास जे वाम अकारण ॥
परहितहानि लाभ त्यां वाटत । हर्ष विनाशिं विषादहि नांदत ॥
हरिहर - यश - राकेशा राहू । पर - अकाजिं भट सह्स्त्र-बाहू ॥
परदोषां लक्षिति सह साक्षी । पर - हित - घृतिं यांचे मन माशी ॥
तेजिं कृशानु रोषिं महिषेश्वर । अघ - अवगुण - धन - धनी धनेश्वर ॥
सर्वां हितकर उदय केतु सम । कुंभकर्ण सम निजतां उत्तम ॥
परिहरती तनु परापकारा । पीक विनाशुनि वितळति गारा ॥
वंदे खल - शेषास सरोषा । वर्णी सहस्त्रमुखिं परदोषां ॥
पुन्हां प्रणति पृथुराज - समाना । पर अघ ऐके शतशत - कानां ॥
पुन्हां शक्रसम विनविं तयातें । संतत सुरानीक हित ज्यातें ॥
प्रीती संतत वचनवज्रिं ज्या । सहस्त्राक्षिं परदोष निरखि त्या ॥

दो० :- उदासीन-अरि-मित्र-हितश्रवणिं जळति खलरीति ॥
जाणुनि करयुग जोडुनी दास विनवि सप्रीति ॥ ४ ॥

खलवंदन - आता मी शुद्ध भावनेने खलगणांना वंदन करतो जे कारण नसताही हितकर्त्याशी विरोध करतात ॥१॥ त्यांना परहित हानि वाटते व परहिताची हानी हा लाभ वाटतो दुस‍र्‍यांचा विध्वंस (विनाश) झाला की त्यांना हर्ष वाटतो व दुसरे (सुखाने) नांदु लागले की त्यांस विषाद-खेद होतो॥२॥हरिहर यशरुपी पूर्ण चंद्रास ग्रासणारे हे राहु (सारखे) आहेत व दुसर्‍यांचे (शत्रुंचे) अहित करण्यात सहस्त्रार्जुना सारखे योद्धे आहेत.॥३॥ हे साक्षीदार बरोबर घेऊन दुसर्‍यांचे दोष लक्षपूर्वक बघत असतात आणि दुसर्‍यांच्या हितरुपी तुपात यांचे मन माशी बनुन पडते.॥४॥ हे खलगण तेजाने अग्निच असून रोषाने महिषासुर आहेत पाप व दुर्गुणरुपी धनाने श्रीमंत झालेले हे कुबेरच आहेत.॥५॥यांचा उदय धुमकेतुच्या उदयासारखा सर्वांचेच (अ)हित करणारा असतो! म्हणून हे जर कुंभकर्णासारखे निजून राहीले तर उत्तम ॥६॥ खलगण दुसर्‍यांचा अपकार करण्यासाठी आपल्या देहाचा सुद्धा त्याग करतात; जशा गारा पिकांचा विनाश करून वितळून नष्ट होतात॥७॥ रोषयुक्त होऊन हजार मुखांनी परदोष वर्णन करणार्‍या खलाला शेषासारखा मानून मी वंदन करतो.॥८॥पुन्हा त्याला पृथु राजा सारखा मानून वंदन करतो, कारण तो दहा हजार कानांनी पर अघ (निंदा) श्रवण करतो.॥९॥ज्याला सुरानीक सतत हितकर वाटते त्याला (खलाला) शक्रासमान मानून मी पुन्हा वंदन करतो.॥११॥ उदासीन असो, शत्रू असो की मित्र असो कोणाचे हित झालेले ऐकले की जळफळाट होणे ही खलांची रीत आहे हे जाणून हा दास दोन्ही हात जोडून विनंती करीत - विनवित आहे.॥दो. ४॥

मी आपल्यापरिं केली विनंती । घेति चुकुन ते ध्यानिं कधि न ती ॥
प्रेमें वायस फार पाळले । काक निरमिष कधीं जाहले ॥
वंदे संत असंत पदांही । दुःखद उभय भेद परि कांहीं ॥
हरुनि वियोगीं प्राणां नेती । एक मिळत दारुण दुख देती ॥
उभय जगामधिं सवें उपजतां । जलज जळू जशि गुणीं विषमता ॥
सुधा सुरासम साधु असाधू । जनक एक जग-जलधि अगाधू ॥
भले बुरे निज निज कर्तूतीं । घेती कीर्ति अकीर्ति विभूति ॥
सुधा सुधाकर सुरसरि सज्जन । गरल अनल कलिमलसरि दुर्जन ॥
गुण अवगुण सगळेच जाणती । जो ज्या रुचे श्रेष्ठ तो गणती ॥

दो० := भल्या भलेपण लाभतें नीचत्वही नीचास ॥
सुधाप्रशंसा अमरतें मरणें स्तुति गरळास ॥ ५ ॥

मी आपल्यापरीने त्यांना विनंती केली.(पण मला माहित आहे की) ते चुकून सुद्धा तिकडे लक्ष देणार नाहीत.॥१॥ (कारण) वायसांना फार प्रेमाने जरी पाळले तरी त्या कावळ्यांनी मांसभक्षण करण्याचे कधी सोडले आहे काय? (कधीही नाही) ॥२॥ संत असंत साम्य भेद - (आता मी) संत व असंत या दोघांच्याही पायांना (एकदम) नमन करतो; कारण दोघेही दु:खदायक आहेत; पण दोघांत काही भेद आहे. ॥३॥ एक (संत) आपला वियोग होताना (दुसर्‍यांचे) प्राण हरण करुन नेतात व एक (असंत) मिळताच दारुण दु:ख देतात ॥४॥ (संत व दुर्जन) हे दोघेही या जगात बरोबरच उत्पन्न होत असता त्यात कमळ व जळू याच्या प्रमाणे गुणभेद असतो. ॥५॥ साधु व असाधु हे दोघे अमृत व दारु सारखे आहेत व दोघांचा जनक एकच म्हणजे जगरुपी अगाध सागर ॥६॥ चांगले व वाईट आपआपल्या कृतीने चांगले किंवा वाईट होतात आणि कीर्ती आणि अपकीर्ती रुपी वैभव मिळवितात (हा एक अर्थ). चांगले व वाईट आपआपल्या करणीने कीर्ती व अपकिर्तीरुपी वैभव मिळवितात (हा दुसरा अर्थ). ॥७॥ अमृत, चंद्र गंगा व साधू तसेच विष, अग्नि, कविनाशा-सुखाविनाशा नदी आणि दुर्जन यांना आपआपल्या कर्तृत्वामुळेच चांगले वाईट म्हंटले जाते किंवा- अमृत, चंद्र, गंगा यांच्यासारखे साधु असतात आणि विष, अग्नि, आणि कलिमलसरिता यांच्या सारखे व्याध म्हणजे खल (हा दुसरा अर्थ) ॥८॥ या अमृतादिकांचे व विषादिकांचे गुण व अवगुण सर्वांनाच माहित आहेत यातील चांगले काय व वाईट काय हे जो तो आपापल्या रुचीप्रमाणे ठरवितो.(२ रा अर्थ -) गुण व अवगुण सगळे जाणतातच पण ज्याला जो आवडतो तो त्याला उत्तम वाटतो - म्हणतो.॥९॥ परंतु चांगला-भला असेल त्याला चांगुलपणाच मिळतो व नीचाला नीचत्व मिळते अमृताची प्रशंसा होते ती अमरता (देण्याच्या) गुणामुळे व विषाची वाहवा होते ती मृत्युकारी गुणामुळेच ॥दो. ५॥

खल - अघ - अगुण साधु - गुण वर्णन । दोन अपार पयोधिच ठाव न ॥
म्हणुन अल्प गुण दोष वानले । त्याग न संग्रह विना जाणले ॥
बर्‍यां वाइटां विधिनें सृजिलें । गणुनि दोष गुण वेदिं निवडिले ॥
श्रुति - इतिहास - पुराणिं निवेदित । विधीप्रपंच गुणागुण - मिश्रित ॥
दुख सुख पाप पुण्य दिनराती । साधु असाधु सुजाति कुजाती ॥
दानव देव नि उच्च नीच पण । विष पीयूष मरण संजीवन ॥
माया ब्रह्म जीव जगदीश्वर । लक्ष्मि अलक्ष्मि रंक अवनीश्वर ॥
काशि मगध सुरसरि क-विनाशी । मरु मालव महिदेव गवाशी ॥
स्वर्ग नर्क अनुरक्ति विरक्ती । निगमागमिं गुणदोष-विभक्ती ॥

दो० :- जडचेतन गुणदोषमय कर्ता निर्मि जगास ॥
संत हंस गुण घेति पय त्यजुनि जला दोषास ॥ ६ ॥

खलांच्या पापांचे व अवगुणांचे वर्णन व साधु गुणांचे वर्णन हे दोन अपार अगाध सागर आहेत.॥१॥ म्हणून मी थोड्याश्यांचेच वर्णन केले; हेतु हा की अवगुणांचा - दोषांचा - पापांचा त्याग व सद्‌गुणांचे ग्रहण जाणल्याशिवाय करता येत नाही. ॥२॥ चांगल्यांना व वाईटांना विधीनेच निर्माण केले व गुणांचा व दोषांचा विचार करुन वेदांनी व शास्त्रांनी चांगले व वाईट अशी विभागणी केली.॥३॥ वेद, इतिहास, पुराणादीकांत सांगितले आहे की विधिनिर्मित (ईशकृत सृष्टी) गुणदोष मिश्रित आहे.॥४॥ सुख - दुख, पाप - पुण्य, दिवस-रात्र, साधु-दुर्जन, उत्तम जाती - वाईट जाती, देव-दानव, लक्ष्मी-अलक्ष्मी, रंक व सम्राट, काशी व मगध, देश, गंगा व कविनाशी नदी, माखाड व माळवा देश, ब्राह्मण व गोमांस खाणारे, स्वर्ग व नरक, आसक्ती व वैराग्य, इत्यादी प्रकारे वेद व शास्त्रे यांनी गुण-दोषांची विभागणी केली आहे. ॥५-९॥ दोहा - कर्त्याने हे जग जड व चैतन्य आणि गुण व दोष यांनी अगदी मिश्रित असे निर्माण केले आहे. संत हंसासारखे असल्याने गुणरुपी दुध घेतात व विकार रुपी जलाचा त्याग करतात ॥दो. ६॥

देइ विधाता विवेक हा जैं । गुणिं हि रमे मन त्यजि दोषा तैं ॥
काल कर्म नी स्वभाव दडपणिं । भले प्रकृतिवश चुकति भलेपणिं ॥
ती घे हरि जन-चूक सुधारुनि । देइ सुयश दुखदोष निवारुनि ॥
करिती खलहि भलें ससंगें । तरी स्वभाव मलिन ना भंगे ॥
बघुनि सुवेषहि जगवंचक जे । वेषबलें पुजिलेहि जाति ते ॥
बेंड फुटे अंतिं न निर्वाहू । कालनेमि रावण इव राहू ॥
सन्मानहि कृत - कुवेष संतां । जगिं सम जांबवता हनुमंता ॥
हानि कुसंगीं लाभ सुसंगमिं । लोकीं सकल विदित निगमागमि ॥
चढे पवनसंगतिं रज गगनीं । होइ चिखल नीचग-जल-मिलनीं ॥
सज्जन-खल-गृहिं शुक साळुंक्या । राम वदति मुखिं शिव्या शेलक्या ॥
धूम काळिमा कुसंगिं बनतो । लिहिति पुराण शाइ जैं शुभ तो ॥
तो जल-अनल-अनिल संघातां । होइ जलद जग-जीवन दाता ॥

दो० :- ग्रह भेषज जल् पवन पट मिळुनि कुयोग सुयोग ॥
होति कुवस्तु सुवस्तु जगिं बघति सुलक्षण लोक ॥ ७ रा ॥
नाम भेद विधि पक्षिं करि सम तम जरी प्रकाश ॥
शशि पोषक शोषक गणुनि दे जगिं यश-अयशास ॥ ७ म ॥
जगिं जडचेतन जीव सब राममयचि जाणून ॥
सर्व-पदाब्जां वंदितो सदा करां जोडून ॥ ७ चं ॥
देव दनुज नर नाग खग प्रेत पितर गंधर्व ॥
नमतो निशिचर किंनरां कृपा करा तरि सर्व ॥ ७ द्र ॥

हा नीरक्षीर विवेक विधाता जेव्हा देतो तेव्हा दोषांस सोडून मन गुणांतच रमते ॥१॥ काल, कर्म व स्वभाव यांच्या दडपणाने प्रकृतीला वश होऊन संत सुद्धा आपल्या भलेपणात चुकतात ॥२॥ ती सेवकाची चूक हरि सुधारून घेतात व दुःखदायक दोषांचा नाश करून सुयश देतात ॥३॥ सुसंग प्राप्त झाला तर खल सुद्धा भले (सत्कर्म) करतात, परंतु त्याचा मलिन स्वभाव जात नाही कारण तो अभंग असतो ॥४॥ जगाला ठकविणारे जे (भोंदू साधुवेषात) असतात त्यांचा साधुवेष दिसल्यानेच वेषाच्या बळावर-प्रतापाने ते सुद्धा पूजले जातात ॥५॥ पण त्यांचे दंभ (बेंड) शेवटी केव्हा तरी बाहेर पडतेच; ते निभावू शकत नाही यास उदाहरणे कालनेमी, रावण आणि राहू यांची आहेत ॥६॥ (याच्या उलट कुवेष केलेल्या संतांना सुद्धा मान मिळतो जसा जांबवान आणि हनुमान यास मिळाला (व मिळत आहे) ॥७॥ कुसंगतीने हानी आणि सुसंगतीने लाभ होतो हे सर्व लोकांत व वेद पुराणात प्रसिद्ध आहे ॥८॥ पवनाच्या संगतीने धूळ आकाशात चढते पण तीच नीचगामी पाण्यात पडली तर चिखल बनते ॥९॥ साधूंच्या घरातील पोपट आणि साळुंक्या तोंडाने राम-नामाचा उच्चार करतात व व दुर्जनांच्या घरातील शेलक्या शिव्या देतात ॥१०॥ कुसंगतीने धुर काळिमा बनतो, परंतु त्याची चांगली शाई झाली म्हणजे त्यानेच पुराणे शास्त्रे इ. लिहीतात. तोच धूर, जल, अग्नि व वायूच्या संगतीत आला की जगाला जीवन देणारा जलद (मेघ) बनतो ॥१२॥ ग्रह, औषध, जल, पवन व पट (वस्त्र) यांना कुयोग वा सुयोग मिळाल्याने कुवस्तु किंवा सुवस्तु वश होतात हे जगात सुलक्षणी लोक जाणतात. दोन्ही पक्ष सारख्याच प्रकाशाचे व अंधाराचे असतात तरी विधीने त्यांच्या नावात (शुद्ध पक्ष व कृष्ण पक्ष असा) भेद केला. एक चंद्राची वृद्धी करणारा व दुसरा क्षय करणारा असल्याने त्यास जगात यश व अपयश दिले. कार्पण्य भावाने वंदन – या जगात असलेले सर्व जड चेतन जीव राममयच आहेत हे जाणून मी त्या सर्वांच्या पदकमलांना सदा हात जोडून वंदन करतो. देव, दानव, मानव, नाग, पक्षी, प्रेत, पितर, गंधर्व, किन्नर व निशाचर या सर्वांनाच मी नमन करतो तरी आता या सर्वांनी (माझ्यावर) कृपा करावी.॥ दो. ७ ॥

* * * * *

श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु

GO TOP