॥ श्रीरामचरितमानस ॥

(मराठी अनुवाद)

॥ बालकाण्ड ॥

अध्याय ३५ वा

॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥


Download mp3

बघुनि रामछवि अति अनुरागति । प्रेम-विवश पायां पडुं लागति ॥
प्रीति भरे उरिं लाज न राही । स्नेह सहज तो वर्णुं कसा ही ॥
उटणीं लावुनि चौघां स्नपविति । षड्रसान्न सुप्रेमें वाढिति ॥
राम जाणुनि सुसमय बोलति । स्नेह-शील-संकोचयुक्त अति ॥
भूप अयोध्ये जाऊं म्हणती । आज्ञा घेण्या अम्हां धाडती ॥
माय ! मुदित मन आज्ञा द्यावी । बालक म्हणुनी प्रीति करावी ॥
वचनें राण्या उदास बनती । प्रेम-विवश सासु न वदुं शकती ॥
कुमारींस पोटाशीं धरती । सोंपुनि पतिस विनति अति करती ॥

छं० :- विनवुनि सिता रामा समर्पुनि जोडुनी कर विनवते ॥
कुरवंडु ! तात सुजाण सकलांची गती तुम्हिं जाणते ॥
परिवार पुरजन मज नृपानां प्राण सीता, जाणणें ॥
तुलसीश ! बघुनी स्नेह शील हि किंकरी निज मानणें ॥ १ ॥
सो० :- आपण सुपूर्णकाम ज्ञानि-शिरोमणि भाव-प्रिय ॥
ग्राहक जनगुण राम ! दोष दलन करुणायतन ॥ ३३६ ॥

रामरुप पाहून राण्या अति अनुरक्त झाल्या व प्रेमाकुल होऊन वारंवार पाया पडू लागल्या ॥ १॥ प्रीतीने छाती भरुन आली व लाजमर्यादांचा विसर पडला. राण्यांच्या त्या सहज स्नेहाचे वर्णन कसे करता येणार ! ॥ २ ॥ चौघा भावांच्या अंगाला उटणी (सुवासिक तेले इ.) लाऊन त्यांनी स्नान घातले व अति प्रेमाने जेवण्यास वाढले ॥ ३ ॥ योग्य समय (संधी) जाणून शील अति स्नेह व संकोचयुक्त वचन राम बोलले ॥ ४ ॥ (आज) अयोध्येस जाऊ असे राजे म्हणाले व त्यांनी आंम्हाला आज्ञा (निरोप) घेण्यासाठी इकडे धाडले ॥ ५ ॥ (म्हणून) माते ! आंम्हांला आनंदित (प्रसन्न) मनाने निरोप द्यावा व बालक समजून आमच्यावर प्रीती करावी (असो द्यावी) ॥ ६ ॥ रामचंद्राच्या भाषणाने सर्व राण्या अगदी उदास बनल्या व सासूबाई तर इतक्या प्रेमाविह्वळ झाल्या की त्याना बोलवेना ॥ ७ ॥ नंतर कुमारींना पोटाशी धरल्या व त्यांना त्यांच्या त्यांच्या पतीला सोपवून फार विनंती केली ॥ ८ ॥ छं०- विनवून मग रामचंद्रास सीता सोपवून हात जोडून सीता माता विनवूं लागली - तात ! (तुमची इडा पिडा टळो) मी हा देह कुरवंडून टाकते, तुम्ही सुजाण आहांत व सर्वांची गती तुम्ही चांगली जाणता, परिवाराला पुरजनांना, मला व मिथिला पतींना ही सीता प्राणांसारखी (प्रिय) आहे हे जाणून तुलशीश ! तिच्या शीलाकडे व स्नेहाकडे पाहून तिला निजदासी मानणे ॥ सीता-माता सुनयनाकृत (मृगनक्षत्र) रामस्तुतीसो०- ॥ रामा ! तुम्ही परिपूर्ण काम आहात (कारण) आपण ज्ञान्यांचे शिरोमणी आहात, पण भावाचे भुकेले (भावप्रिय) असून दासांचे गुण एवढेच ग्रहण करणारे आहांत; दोषांचे उच्चाटन करणारे व करुणेचे माहेरघर आहांत ॥ दो० ३३६ ॥

वदुनि राणि पद धरून राही । प्रेमपंकिं जणुं मग्न गिरा ही ॥
स्नेहमयी वर वाणी परिसुनि । राम सासुला बहु सन्मानुनि ॥
घेति निरोपा कर युग जोडुनि । पुनः पुन्हां सर्वांना प्रणमुनि ॥
आशीर्वाद मिळे शिर नमलें । भावांसह रघुराव परतले ॥
मंजु मधुर मूर्तिस मनिं आणति । स्नेह-शिथिलता राण्या पावति ॥
धीर धरुनि मग मुलींस बाहति । माता वारंवारहि भेटति ॥
बोळविती परि परतुनि भेटति । प्रीति परस्पर अशि वाढे अति ॥
विलग करिति सखि घडिघडि बिलगत । जशि नवधेनु बालवत्साप्रत ॥

दो० :- प्रेम-विवश नर नारि सब सह सखि राणिवसा हि ॥
जणुं विदेहपुरिं येउनी । करुणा-विरह किं राहि ॥ ३३७ ॥

असे म्हणून राणी पाय धरुन (तटस्थ होऊन) राहीली. जणू प्रेमाच्या दलदलीत वाणी रुतून राहीली आहे. ॥ १ ॥ स्नेहमयी (प्रेमाने थबथबणारी) उत्तम वाणी ऐकल्यानंतर रामचंद्रांनी सासूचा अनेक प्रकारे सन्मान केला ॥ २ ॥ (व मग) रामचंद्रांनी दोन्ही हात जोडून आज्ञा मागीतली (निरोप घेतला) व सर्वांना पुन:पुन्हा प्रणाम केला ॥ ३ ॥ आशीर्वाद मिळाले व पुन्हां नमस्कार करुन भावांसहित रघुराज (राम) तेथून परत फिरले ॥ ४ ॥ (मग) त्या मनोहर मधुर मूर्तीला मनात आणताच सर्व राण्या स्नेह शिथिल झाल्या ॥ ५ ॥ मग कसा तरी धीर धरुन मुलींना हाक मारून माता त्यांना वारंवार भेटल्या ॥ ६ ॥ मुलींना पोचवितात व पुन्हा परतून भेटू लागतात, अशी परस्परांची प्रीती अत्यंत वाढली ॥ ७ ॥ माता व कन्या पुन: पुन्हा एकमेकीस बिलगत असता, नवीन व्यालेल्या गाई व त्यांची वासरे यांना जशी एकमेकांपासून दूर करावीत तशी सखी त्यांना विलग - दूर करूं लागल्या ॥ ८ ॥ नगरातील सर्व स्त्रिया व पुरुष आणि सखीसहित सर्व राणीवसा प्रेमविह्वल आहेत (ते पाहून) असे वाटूं लागले की विदेहपुरीत जणूं करुणा व विरह (ही दंपती) येऊन राहीली आहेत. ॥ दो० ३३७ ॥

जानकिनें शुक मैना पाळित । कनक-पंजरीं, स्वयें सुशिक्षित ॥
व्याकुळ वदति कुठें वैदेही । श्रवुनि धीर ना त्यजि कोणाही ॥
झाले खगमृग विकल अशापरिं । कशि वदवेल किं मनुज-दशा तरि ॥
येति सबंधु तदा मिथिलापति । प्रेमपूर लोचन जल मोचति ॥
धैर्य विलोकत सीते उडलें । परम विरागी नांवच उरलें ॥
रायें जानकि हृदयीं धरली । ज्ञान-महा-मर्यादा सरली ॥
समजाविति बहु सचिव शहाणे । तदा विषाद-समय नहि, जाणे ॥
वारंवार मुली हृदिं धरल्या । सजुनि पालख्या शुभ मागवल्या ॥

दो० :- प्रेम-विवश परिवार सब बघुनि सुलग्न नरेश ॥
मेण्यांमधिं बसविति मुलीं स्मरुनी सिद्धि गणेश ॥ ३३८ ॥

जानकीने पोपट व मैना यांना सोन्याच्या पिंजर्‍यात ठेऊन त्यांचे पालन करुन त्यांस स्वत: शिकविले होते ॥ १ ॥ ते पक्षी व्याकुळ होऊन म्हणू लागले की वैदेही कुठे आहे ? हे ऐकून धीर कोणाला नाही सोडून जाणार ॥ २ ॥ पशु व पक्षी सुद्धा अशा प्रकारे विरह - व्याकुळ झाले असता माणसांची दशा कशी झाली असेल याचे वर्णन कसे करता येईल ? ॥ ३ ॥ तेव्हा मिथीलापती जनक बंधूसह आले, प्रेमाला पूर आला असून डोळे अश्रू मोचन करीत आहेत ॥ ४ ॥ सीतेला पाहताच जनकाचा धीर सुटला व परम वैराग्यसंपन्न एवढे नाव मात्र राहीले ॥ ५ ॥ राजा जनकाने जानकीला आपल्या हृदयाशी धरली व अशा रीतीने ज्ञानाची महामर्यादा संपली (असे दिसले) ॥ ६ ॥ शहाण्या पुष्कळ सचिवांनी विदेह राजाला पुष्कळ समजावले. तेव्हा विचार केला की विषाद करीत बसण्याची ही वेळ नाही ॥ ७ ॥ मग मुलींना वारंवार हृदयाशी धरल्या व सुंदर मेणे चांगले सजवून आणण्यास सांगीतले ॥ ८ ॥ सर्वच परिवार प्रेमविह्वळ झालेला आहे हे जाणून व उत्तम मुहूर्त आहे असे पाहून नरेशांनी सिद्धी गणेशाचे स्मरण करून मुलींना मेण्यात बसविल्या. ॥ दो० ३३८ ॥

भूप मुलींना बहु समजाविति । नारिधर्म कुलरीती शिकविति ॥
देती दासी-दासां बहुतर । सीतेला प्रियसेवक शुचितर ॥
सीता निघत विकल पुरवासी । होति शकुन शुभ मंगल रासी ॥
भूसर सचिव समेत समाजा । जाति बरोबर पोचवुं राजा ॥
समय जाणुनि वाद्यें वाजति । रथ गज वाजि वर्‍हाडी साजति ॥
विप्रां सब दशरथ अणवोनी । दान-मान-परिपूर्ण करोनी ॥
चरण-सरोज-रजा धरि शीसां । मुदित महीप मिळत आशीसा ॥
स्मरुनि गणेशा प्रयाण केलें । मंगल मूल शकुन बहु झाले ॥

दो० :- हर्षति वर्षति सुमन सुर करितिं अप्सरा गान ॥
स्वपुरिं अयोध्याधिप निघति मुदित पिटून निशाण ॥ ३३९ ॥

भूपालांनी मुलींची पुष्कळ समजूत घातली; आणि स्त्रीधर्म व कुलरीती शिकवल्या. ॥१॥ सीतेला प्रिय असलेले फार पवित्र सेवक दासी व पुष्कळ दास बरोबर दिले. ॥२॥ सीता सासरी चालली असे पाहून सर्व पुरवासी व्याकुळ झाले व सर्व मंगलांची रास असे शुभशकुन होऊ लागले. ॥३॥ ब्राह्मण सचिव व सर्व समाज यांस बरोबर घेऊन जनक राजा पोचविण्यासाठी बरोबर चालत निघाले. ॥४॥ प्रयाणाच्या वेळेनुसार वाद्ये वाजू लागली. वर्‍हाड्यांनी आपापले हत्ती, घोडे, रथ इ. वाहने व याने सज्ज केली आणि करविली. ॥५॥ दशरथांनी सर्व विप्रांना बोलावून आणवून दान व मानसन्मान देऊन परिपूर्ण केले, ॥६॥ व त्यांच्या चरणकमलांची धूळ मस्तकीं धारण केली. आशीर्वाद मिळाले तेव्हा महीपती दशरथ आनंदित झाली. ॥७॥ गणेशाचे स्मरण करून प्रयाणास प्रारंभ केला तेव्हा पुष्काळ मंगलमूल शकुन झाले. ॥८॥ दो०- देवांनी हर्षित होऊन सुमनांची वृष्टी केली, अप्सरा गायन करूं लागल्या व अयोध्यापती डंके पिटून आपल्या नगरास - अयोध्येस जाण्यास निघाले. ॥ दो० ३३९ ॥

महाजनां नृप विनयें फिरविति । सादर सकल याचकां अणविति ॥
भूषण वसनं वाजि गज दिधले । प्रेमपुष्ट संपन्न बनवले ॥
बहुवेळां बिरुदावलि भाषुनि । फिरले सकल राम हृदि राखुनि ॥
पुनः पुन्हां कोसलपति सांगति । प्रेमें जनक न परतूं पाहति ॥
नृप पुनरपि विनविति जनकांला । राजन् फिरा दूर बहु आलां ॥
तदा रथांतुनि भूप उतरले । नयनीं प्रेमपूर पाझरले ॥
तैं विदेह वदले कर जोडुनि । वचना स्नेहसुधें जणुं घोळुनि ॥
करुं तरि कशी स्तुती मी विनती । महाराज मज दिधली महती ॥

दो० :- व्याह्यां स्वजनां दशरथें दिला मान बहुरीतिं ॥
भेटिं परस्पर विनय अति हृदयिं न मावे प्रीति ॥ ३४० ॥

पोचविण्यास आलेल्या सचिवादि महाजनांना दशरथ राजांनी विनयाने परत फिरविले व सर्व याचक भिक्षेकरी यांना आदराने बोलावून घेऊन ॥ १ ॥ अलंकार, वस्त्रे, हत्ती, घोडे वगैरे अनेक प्रकारचे वित्त दिले व प्रेमाने पुष्ट करून त्यास संपन्न बनविले ॥ २ ॥ ते पुन:पुन्हा ब्रीदावलीचा घोष करीत रामचंद्रांस हृदयात साठवून परत फिरले ॥ ३ ॥ कोसलपतींनी जनक राजास वारंवार सांगितले की महाराज आता पुरे झाले; आपणही आता परत जावे, पण त्यांचा परत फिरण्याचा विचार दिसला नाही. ॥ ४ ॥ पुन्हा (थोड्या वेळाने) दशरथांनी जनकास सांगीतले की महाराज ! आता तरी फिरावे, फार दूरवर आपण आलांत ! ॥ ५ ॥ (तरीहीं जनक परत फिरत नाहीत हे पाहून) दशरथ राजे स्वत:च रथातून खाली उतरले, व त्यांच्या डोळ्यांतून प्रेमाचे पूर पाझरुं लागले ॥ ६ ॥ तेव्हा विदेह असे वचन बोलले की, जणूं ते स्नेहरुपी अमृतातच पाकविलेले असावे ! ॥ ७ ॥ ते म्हणाले महाराज ! मी आपली स्तुती व प्रार्थना करुं तरी कशी ! (अशक्य आहे) आपण मला फारच मोठेपणा दिलांत ! ॥ ८ ॥ (मग) दशरथांनी आपल्या स्वजनांस - व्याह्यांस अनेक प्रकारे मान दिला. त्यांच्या परस्पर भेटीने व अत्यंत विनयाने प्रीती दोघांच्याही हृदयात मावेनाशी झाली (ती अश्रूं द्वारे बाहेर ओसंडू लागली) ॥ दो० ३४० ॥

नमिति जनक शिर मुनि-समुदाया । आशीर्वाद देति ते राया ॥
मग सादर भेटति जामात्यां । रूप-शील-गुण-सिंधू भ्रात्यां ॥
जुळुनि रुचिर पंकेरुह पाणी । प्रेमजात जणुं वदले वाणी ॥
राम ! कशापरिं करूं प्रशंसा । मुनि-महेश-मन-मानस-हंसा ॥
करिति योग योगी ज्या लागुनि । क्रोध मोह मद ममता त्यागुनि ॥
व्यापी ब्रह्म अकल अविनाशी । चिदानंद निर्गुण गुणराशी ॥
मन-वाणी आदि न ज्या जाणति । तर्कवे न सर्वहि अनुमानति ॥
नेति म्हणुनि महिमा श्रुति सांगत । जें त्रयकाळिं एक रस राहत ॥

दो० :- नयन-विषय मज होइ तें जें समस्त-सुखमूल ॥
सकल लाभ जीवा जगीं ईश यदा अनुकूल ॥ ३४१ ॥

जनकानी सर्व मुनिसमुदायाला मस्तक लवून नमस्कार केला व त्या सर्वांनी राजाला आशीर्वाद दिले ॥ १ ॥ नंतर रुप, शील, व गुण यांचे सागर असलेल्या चौघा बंधूंना आपल्या जावयांना आदराने भेटले ॥ २ ॥ जनककृत (आर्द्रा नक्षत्र) रामस्तुती(मग) कमळासारखे सुंदर असे आपले हात जोडून जणू काय प्रेमापासून जन्मलेली वाणी बोलले ॥ ३ ॥ मुनि व महेश यांच्या मनरुपी मानसात हंसाप्रमाणे विहार करणार्‍या रामा ! मी आपली स्तुती कशाप्रकारे करु ? ॥ ४ ॥ क्रोध, मोह, मद व ममता यांचा त्याग करुन योगी ज्याच्या प्राप्तीसाठी योगसाधना करतात ॥ ५ ॥ जे व्यापक ब्रह्म, अलक्ष्य, अविनाशी, सच्चिदानंद स्वरुप, निर्गुण असून गुणांचाही सागरही आहे ॥ ६ ॥ ज्याला मनवाणी आदि कोणी जाणू शकत नाहीत जेथे तर्काचा उपयोग नाही, तरी पण सर्व अनुमान करतातच ॥ ७ ॥ ‘ नेति ’ म्हणून ज्याचा महिमा श्रुती वर्णन करतात व जे तिन्ही काळी एकरस असते ॥ ८ ॥ ते समस्त सुखाचे मूळ माझ्या चर्मचक्षूंचा विषय बनले, शंकर अनुकूल झाले म्हणजे जीवाला या जगात सर्वलाभ होतो. ॥ दो० ३४१ ॥

दिलें सर्व परिं महत्व मजला । निज जन जाणुनि केला अपला ॥
गिरा सहस्रहि शेष मिळोनि । कल्प कोटि जरि बघति गणोनी ॥
मम भाग्य नि अपल्या गुणगाथा । सरति न वदतां श्रुणु रघुनाथा ॥
एकचि बल मज कांहीं वदतां । अति थोड्या स्नेहें तुम्हिं रिझतां ॥
घडि घडि मागतसें कर जोडुनि । चुकून न मन जावो पद सोडुनि ॥
परिसुनि वचा प्रेम परिपुष्ट । पूर्ण-काम रामहि परितुष्ट ॥
श्वशुरां बहु विनवुनि सन्मानति । पितृ-कौशिक-वसिष्ठ-सम जाणति ॥
मग नृप भरता विनवुनि भेटुनि । प्रेमें आशिर्वादा देऊनि ॥

दो० :- भेटति लक्ष्मण-रिपुहनां मग देती आशीस ॥
प्रेम विवश सब परस्पर, कितिदां नमिती शीस ॥ ३४२ ॥

रघुनाथ ! आपण मला सर्व प्रकारे महत्व दिलेत, कारण आपला एक दास समजून मला आपलासा केलात ॥ १ ॥ हजार शारदा व हजार शेष एकत्र मिळून त्यांनी कोटी कल्पे गणना करुन पाहीली ॥ २ ॥ तरी भाग्य आणि आपल्या गुणगाथा सांगून संपणार नाहीत ॥३ ॥ मी जे काही अल्पसे बोललो ते या एकाच बलावर की आपण अति थोड्या स्नेहाने सुद्धा प्रसन्न होता ॥ ४ ॥ मी हात जोडून वारंवार इतकेच मागतो की, माझ्या मनाने चूकून सुद्धा आपल्या चरणास सोडू नयेत ॥ ५ ॥ जनकाचे जणू प्रेमाने परिपुष्ट झालेले भाषण ऐकून, ज्यांच्या सर्व कामना परिपूर्ण झाल्या आहेत ते राम परितुष्ट झाले ॥ ६ ॥ (नंतर त्यांनी) सासर्‍यांना विनंती करुन पिता, कौशिक व गुरु वसिष्ठांसारखे जाणून त्यांचा सन्मान केला ॥ ७ ॥ मग जनकराजांनी भरतास विनंती केली व त्यास प्रेमाने भेटून आशीर्वाद दिला (आणि मग) ॥ ८ ॥ ते लक्ष्मण - शत्रुघ्नास भेटले व त्यास आशीर्वाद दिले. (भेटतानां) जनकराजा व भरतादिक परस्परांच्या प्रेमाला वश झाले व भरतादिकांनी वारंवार नमस्कार केले ॥ दो० ३४२ ॥

करुनी कितिदां स्तुती सुविनती । रघुपति बंधूं समेत निघती ॥
जनक धरिति कौशिक-पद जा‍उनि । चरणरेणु शिरिं नयनां लावुनि ॥
तव मुनीशवर ! दर्शनिं कांहीं । मनीं प्रतीति किं दुर्लभ नाहीं ॥
जें सुख सुयश लोकपति वांछति । करतां मनोरथां परि लाजति ॥
सुलभ सुयश सुख मज तें स्वामी ! । सिद्धि तव दर्शन-अनुगामी ॥
विनवुनि पुनः पुन्हां शिर नमलें । आशीर्वच मिळतां नृप वळले ॥
डंके पिटुनी वरात चाले । सर्वहि मुदित थोर लघु झाले ॥
रामा ग्रामनारिनर पाहुनि । सुखमय होति नयन फल पावुनि ॥

दो० :- जागजागिं वस्ती करित पथलोका सुख देत ॥
निकट अयोध्ये सुदिनिं ही सुंदर वरात येत ॥ ३४३ ॥

अनेक वेळा स्तुती व नम्र विनंत्या करुन रघुपती भावांसह निघाले ॥ १ ॥ जनकांनी जाऊन विश्वामित्रांचे पाय धरले व पायधूळ मस्तकाला व डोळ्यांना लावली ॥ २ ॥ (व म्हणाले की) मुनीश श्रेष्ठा ! माझ्या मनाला अशी प्रतीती आली की तुझ्या दर्शनाने (जगांत) कांहीही दुर्लभ नाही. ॥ ३ ॥ ज्या सुखाची व सुयशाची इच्छा लोकपाल करतात पण जे मनोरथ करण्यास सुद्धां त्याना लाज वाटते ॥ ४ ॥ स्वामी ! ते सर्व सुख व सुयश मला सहज लाभले, (सर्व) सिद्धि तुमच्या दर्शनाच्या मागोमाग धावत येतात ॥ ५ ॥ याप्रमाणे विविध विनविण्या करुन पुन:पुन्हा नमस्कार केला व आशीर्वाद मिळतांच जनकराजे घराकडे वळले ॥ ६ ॥ डंके पिटले गेले व वरात चालू लागली तेव्हा उच्च, नीच, लहान, थोर, सर्वच मंडळी आनंदित झाली ॥ ७ ॥ (मार्गावरील) गावातील स्त्री - पुरूष रामचंद्रांस पाहून, आपल्या नेत्राचे फळ पावून सुखी होऊं लागले ॥ ८ ॥ जागोजागी वस्ती करीत व ग्रामस्थ लोकांस सुख देत शुभ दिवशी ही सुंदर वरात अयोध्येजवळ येऊन पोचली. ॥ दो० ३४३ ॥

डंके पिटिति पणव वर वाजति । ध्वनि शंखादि वाजि गज गाजति ॥
झांजा डिंडिम मृदंग सुस्वर । वाजति सणया राग मनोहर ॥
आकर्णुन जन वरात आली । मुदित सकल पुलकांकित झालीं ॥
चारु सदनं निज सजिलीं थाटें । पुरवेशी पथ हाट चव्हाटे ॥
गल्लिं सकळ अर्गजें शिंपिल्या । रांगोळ्या वर विविध विरचिल्या ॥
किति वदुं विपणि सुसाजित नाना । तोरण केतु पताक वितानां ॥
सफल पूगफल कदलि रसालां । रोपिति बकुल-कदंब-तमालां ॥
फलित सुभग तरु लवले धरणीं । मणिमय आलवाल कल करणी ॥

दो० :- नानाविध मंगल कलश घरघर रचिति सजून ॥
ब्रह्मादिक सुर ईर्षित रघुवर-पुरी बघून ॥ ३४४ ॥

(अयोध्यापुरी दुरुन दिसू लागताच) वरातीत डंके मोठ्याने बडविले गेले, लहान मोठे ढोल जोरने वाजू लागले. शंख, तुतार्‍या शिंगे यांचा ध्वनी निघू लागला घोडे खिंकाळू लागले व हत्ती चित्कार करून (गर्जना) घुमूं लागले ॥ १ ॥ डिंडिम झांजा, मृदुंग, वाजू लागले व सनया सुस्वर मनोहर राग - रागिणी छेडू लागल्या. ॥ २ ॥ हे सर्व लोकांच्या कानी पडताच नगरातील सर्व लोकांनी ‘ वरात आली ’ हे जाणले त्यामूळे सर्व जनता आनंदाने रोमांचित झाली ॥ ३ ॥ ज्यांनी त्यांनी आपली सुंदर सदने थाटाने सजविली, शृंगारली त्याचप्रमाणे नगरवेशी, राजरस्ते, चव्हाटे, बाजार इ. सजविले गेले ॥ ४ ॥ सर्व रस्ते, गल्ल्या, बोळ, इ. अर्गजाने शिंपले व जिथे तिथे चव्हाट्यांवर सुंदर रांगोळ्यांचे चौक भरले ॥ ५ ॥ बाजार किती सुंदर व किती विविध प्रकारांनी शृंगारले गेले हे कसे वर्णन करता येणार ! तोरणे, ध्वजा, पताका, मंडप इत्यादि भराभर उभारले गेले. ॥ ६ ॥ फळे लागलेल्या पोफळी (सुपारी) घडांसह केळी, कैर्‍यांनी लगडलेले आम्रवृक्ष, तसेच कदंब, बकुल व तमालवृक्ष रस्त्यांच्या दुतर्फा लावले गेले ॥ ७ ॥ फळे लागलेले हे सुंदर मांगलिक वृक्ष भूमीपर्यत लवले आहेत व त्याच्या भोवतालची (पाणी घालण्याची) आळी रत्नांची केलेली असून त्यांची रचना सुंदर आहे. ॥ ८ ॥ सोन्याचे नानाविध मंगल कलश विविध प्रकारांनी शृंगारून घरघरी (दारात व तोरणावर) सुंदर रीतीने स्थापन केले आहेत यावेळची रघुवर - पुरी पाहून ब्रह्मादिक देवांना (सुद्धां) ईर्षा वाटू लागली ॥ दो० ३४४ ॥

भूप-भवन ते समयिं सुशोभित । रचना बघुन मदन मन मोहित ॥
शकुन, सुमंगल चेतोहरपण । ऋद्धि सिद्धि सुखसंपत् शोभन ॥
जणुं उत्सव सब सहज मनोहर । जमुनि राहिले नृपघरिं तनुधर ॥
निरखावया राम-वैदेही । वदा लालसा कुणा नव्हे ही ॥
मिळुनि थव्यांनी निघति सुवासिनि । निज छविं निंदिति मदन विलासिनि ॥
सकल सुमंगल सजुनि आरति । गाती जणुं बहुवेषिं भारती ॥
भूप-भवनिं कलकलाट भारी । वर्णूं केविं समय, सुख सारीं ॥
कौसल्यादि राम-माता अति- । प्रेम-विवश तनुभाना विसरति ॥

दो० :- दिलीं द्विजां दानें विपुल पुजुनि गणेश पुरारि- ॥
प्रमुदित परम दरिद्र जणुं पावुनि पदार्थ चारि ॥ ३४५ ॥

दशरथ राजाचा महाल त्यावेळी इतका सुशोभित दिसत आहे की त्यांची रचना पाहून मदनाचे मन मोहित झाले ॥ १ ॥ शकुन, सर्व सुंदर मंगल चेतोहरपणा (मनोहरता) ऋद्धी, सिद्धी, सुखे व सुंदर संपत्ती इत्यादी सर्व सहज मनोहर उत्सवच जणू एकत्र जमून शरीरधारी बनून राजाच्या घरी येऊन राहीले आहेत.॥ २-३ ॥ राम व वैदेही यांना निरखून पाहण्याची लालसा कोणाला नसेल ते सांगा पाहूं ॥ ४ ॥ सुवासिनी स्त्रिया थव्याथव्यानी मिळून निघाल्या; त्या आपल्या सौंदर्याने मदन विलासिनीची निंदा करीत आहेत. ॥ ५ ॥ सर्व सुंदर मंगल द्रव्यांनी आरती सजवून बहुत वेष घेतलेल्या पुष्कळ सरस्वतीच जणूं मंगल गीते गात आहेत.॥ ६ ॥ राजभवनात भारी गोंगाट सुरु आहे. हा समय आणि यावेळची सर्व सुखे याचे वर्णन मी करू तरी कसे ? ॥ ७ ॥ कौसल्यादि सर्व राममाता अत्यंत प्रेमविवश होऊन देहभान विसरुन गेल्या ॥ ८ ॥ (मग धीर धरुन) गजानन व शंकर यांचे पूजन करुन त्यांनी विप्रांना विपुल दाने दिली व इतक्या प्रमुदित झाल्या की जणू परम दरिद्री माणसाला चारी पुरुषार्थांची प्राप्ती झाली. ॥ दो० ३४५ ॥

प्रेमा-प्रमोद-वश सब माता । गात्र शिथिल पद ये ना जातां ॥
रामदर्शना अति अनुरागें । जी ती औक्षण सजवूं लागे ॥
विविधा वाद्यें वाजुं लागलीं । मुदित सुमित्रें मंगल सजलीं ॥
हळद पत्रं दधि दूर्वा फूल । पान पूगफूल मंगल मूल ॥
रोह अक्षता लाजा रोचन । तुलसि-मंजरी मंजुल शोभन ॥
चित्रित कांचन-कलश सजविले । मदन-शकुनिं जणुं नीड बनविले ॥
शकुन सुगंध न जाति वर्णिले । राण्यांनीं सब मंगल सजिलें ॥
विरचित रुचिर आरत्या नाना । मुदित करिति कल मंगल गाना ॥

गो० :- कनक ताटभर कमलकरिं वस्तु घेतिं वरमाय- ॥
निघतिं मुदित ओवाळण्या पुलक-पल्लवित काय ॥ ३४६ ॥

सर्व माता प्रेम व प्रमोद यांना वश झाल्यामुळे त्यांची गात्रे शिथिल पडली. व त्यांना पाऊल सुद्धा टाकवेना ॥ १ ॥ पण (कसा तरी धीर धरुन) राम - दर्शनाच्या अनुरागाने जी ती औक्षणाची तयारी करू लागली ॥ २ ॥ तोच नाना वाद्ये वाजू लागली व आनंदित झालेल्या सुमित्रेने सर्व मंगले द्रव्ये सजविली ॥ ३ ॥ हळद, आम्रपल्लव, दही, दूर्वा फुले, विड्यांची पाने, सुपार्‍या इ. मंगलमूल असलेल्या वस्तू व रोह, अक्षता, लाह्या, गोरोचन, आणि सुंदर व निर्दोष तुलसीच्या मंजिर्‍या सज्ज केल्या ॥ ४-५ ॥ बाहेरुन चित्रे काढून सुंदर सजविलेले सोन्याचे कलश जणू काय मदनरुपी (सुतार) पक्ष्यांनी बनविलेली घरटीच आहेत. ॥ ६ ॥ शुभ शकुन व सुगंधी द्रव्ये इतकी आहेत की त्यांचे वर्णन करता येणे शक्य नाही सर्व राण्यांनीही मंगल पदार्थ सजविले ॥ ७ ॥ आरत्यांची नाना प्रकारे सुंदर रचना केली व सर्वजणी आनंदित होऊन मंगलगान करु लागल्या ॥ ८ ॥ त्या मंगल वस्तू कनकाच्या ताटात मनोहर दिसतील अशा भरुन ती ताटे आपल्या करकमलात घेऊन वरमाता ओवाळण्यासाठी आनंदाने निघाल्या त्यावेळी त्यांच्या देहावर रोमांचरुपी पालवी फुटली ॥ दो० ३४६ ॥

धूप-धूम्रिं नम मेचक बनलें । श्रावणिं घन जणुं दाटुन भरले ॥
सुर-तरु-सुम-माळा सुर वर्षति । जणुं बलाक-अवली मन कर्षति ॥
मंजु तोरणें मणिमय निर्मित । जणूं पाकरिपु-चाप सुसज्जित ॥
सौधीं भामिनि लपती प्रगटति । चारु चपल जणुं चपला चमकति ॥
दुंदुभि-रव घन-गर्जन घोर । याचक चातक दर्दुर मोर ॥
सुर सुगंधि शुचि वर्षति वारी । सस्य सुखी सब पुर नर नारी ॥
समय बघुनि गुरु दे आदेशा । रघुकुलमणि करि पुरीं प्रवेशा- ॥
स्मरुनि शंभु गिरिजा गणराजा । मुदित महीपति सहित समाजा ॥

दो० :- होति शकुन वर्षति सुमन देव वाद्य-गजरांत ॥
विबुधवधू नाचति मुदित मंगलगीतें गात ॥ ३४७ ॥

धुपाच्या धुराने आकाश इतके झाकाळून गेले की जणूं श्रावण महिन्यात ते मेघांनी दाटून भरले आहे ॥ १ ॥ देव कल्पवृक्षांच्या फुलांच्या माळाच वर्षू लागले व त्या जणूं काय बगळ्यांच्या रांगांचे मन आकर्षण करू लागल्या ॥ २ ॥ मणिरत्नांची जी सुंदर तोरणे बनविली आहेत ती जणूं सुंदर इंद्रधनुष्येच उभारली आहेत ॥ ३ ॥ वाड्यांच्या सौधांवर सुंदर स्त्रिया प्रगटत व गुप्त होत आहेत त्या जणूं रमणीय विजाच अत्यंत चपलतेने चमकत आहेत ॥ ४ ॥ नगार्‍यांचा ध्वनी जणू मेघांची घोर गर्जना आहे व याचक हे जणू चातक, बेडूक व मोर आहेत ॥ ५ ॥ देव स्वर्गीय सुंगधी जलाची वृष्टी करीत आहेत तो जणूं पाऊस पडत आहे व सर्व पुरनरनारी हे जणूं सुखी झालेले साळीचे पीक आहे ॥ ६ ॥ (पुर प्रवेशाची शुभ) वेळ जाणून वसिष्ठ गुरुंनी आज्ञा दिली व रघुकुलमणी दशरथांनी शंभु गिरीजा व गणपती यांचे स्मरण करुन आनंदाने सर्व समाजासह नगरात प्रवेश केला ॥ ७-८ ॥ (तेव्हा) शुभ शकुन होऊ लागले व देवांनी वाद्यांचा गजर करुन पुष्पवृष्टी सुरु केली व अप्सरा मंगल गीते गात नृत्य करुं लागल्या ॥ दो० ३४७ ॥

मागध सूत बंदि नट नागर । गाति यशा त्रैलोक्य-विभाकर ॥
जय रव विमल वेद वर-वाणी । मंगलमय दश दिशिं ये कानीं ॥
विपुल वाद्य तैं वाजूं लागति । नभिं सुर नगरीं जन अनुरागति ॥
थाट वरातीचा वदवे ना । महा मोद मनिं सुख मावेना ॥
पुरवासी राया जोहारति । फार, बघुनि रामास सुखावति ॥
ओवाळिति बहु मणिगण-चीरां । वारि विलोचनिं पुलक शरीरां ॥
आरति करति मुदित् पुरनारी । हर्षति बघुनि कुमरवर चारी ॥
शिबिका-पडदे सुंदर सारुनि । सुखमय होती वधूंस पाहूनि ॥

दो० :- असें देत सर्वां सुख राजद्वारीं येत ॥
ओवाळिति मुदें माता तनयां वधूं समेत ॥ ३४८ ॥

मागध सूत, बंदी व नागरनट त्रैलोक्याला प्रकाशित करणार्‍या यशाचे गान करु लागले ॥ १ ॥ जयजयकाराचा ध्वनी व वेदपठणाचा श्रेष्ठ विमल ध्वनी दाही दिशांस ऐकू येऊ लागले ॥ २ ॥ नाना प्रकारची विपुल वाद्ये वाजू लागली आकाशात देव व नगरात लोक अनुरक्त झाले ॥ ३ ॥ वरातीचा थाटमाट तर सांगता येणे शक्य नाही सर्वांना अपार मोद झाला असून सुख मनात मावेनासे झाले ॥ ४ ॥ (दशरथांनी नगरात प्रवेश केल्यावर) पुरवासी लोक राजाला जोहार करु लागले व रामाला पाहताच ते फार सुखी झाले ॥ ५ ॥ पुरजनांनी पुष्कळ रत्ने, मोती, वस्त्रे वगैरे वस्तू ओवाळून टाकल्या व त्यांचे नेत्र अश्रुंनी डबडबले व शरीरांवर रोमांच उभे राहीले ॥ ६ ॥ नगरातल्या स्त्रिया आनंदाने (ठिकठिकाणी) आरती ओवाळू लागल्या चारी कुमारांना वरवेषात पाहून त्यांना हर्ष होऊं लागला ॥ ७ ॥ त्या मेण्यांचे पडदे दरवाजे उघडुन पाहू लागल्या व वधूंना पाहून सर्व जणी सुखी होऊ लागल्य़ा ॥ ८ ॥ याप्रमाणे (मिरवत मिरवत) सर्वांना सुख देत राजद्वारपर्यंत आले तेव्हा माता आनंदित होऊन नव वधूंसहित कुमारांना औक्षण व आरती करु लागल्या ॥ दो० ३४८ ॥

* * * * *

श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु

GO TOP