॥ श्रीरामचरितमानस ॥

(मराठी अनुवाद)

॥ लंकाकाण्ड ॥

॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥

अध्याय २ राDownload mp3

दो० :- पवनतनयवच ऐकुनी विहसति राम सुजाण ॥
अवलोकुनि दक्षिणे प्रभु वदले कृपा निधान ॥ १२म ॥

पवनतनयाचे वचन ऐकून सुजाण राम मोठ्याने हसले व नंतर दक्षिण दिशेकडे पाहून कृपानिधान प्रभु म्हणाले, ॥ दो० १२ म ॥

बघ किं बिभीषण दक्षिण आशे । घन घमंड दामिनी विलासे ॥
मधुर मधुर गर्जति घन घोर । उपल वृष्टि होवो न कठोर ॥
म्हणे बिभीषण पहा कृपाला । नाहीं तडित न वारिद माला ॥
लंका शिखरावर आगार । जलसा तिथें बघे दशकंधर ॥
छत्र मेघडंबरी शिरावर । जणुं अति काळी जलदघटा वर ॥
ताटंकें मंदोदरि कानीं । प्रभु ! त्या जणुं चमकती दामिनी ॥
टाळ मृदंग वाजती अनुपम । मधुर मधुररव तो सुरसत्तम ॥
प्रभु सस्मित जाणुनि अभिमान हि । सज्य चापकृत शरसंधान हि ॥

दो० :- छत्र मुकुट ताटंक तैं तोडी एकचि बाण ।
सर्वां देखत पतित महि कुणा न मर्मज्ञान ॥ १३रा ॥
लीला करुनी रामशर ये आश्रयीं निषंग ॥
रावण सभा सशंक सब बघुनि महा रसभंग ॥ १३म ॥

रावणसभेचा महारसभंग – बिभीषण ! ( जरा ) दक्षिण दिशेकडे बघ की, मेघांनी कशी गर्दी केली आहे, वीज चमकत आहे. ॥ १ ॥ आणि मोठ मोठे ढग कसे मधुर मधुर गर्जत आहेत कठीण गारांचा पाऊस न पडो म्हणजे झाले. ॥ २ ॥ बिभीषण म्हणाला हे कृपाला, ही वीजही नाही, व मेघमालाही नाही. ॥ ३ ॥ लंका शिखरावर एक मंदीर आहे व तिथे जलसा चालू आहे व दशानन तेथे तो पहात आहे. ॥ ४ ॥ रावणाच्या मस्तकावर जे मेघडंबरी छत्र आहे तीच जणूं मेघांची फार काळी श्रेष्ठ ढगांची रास आहे. ॥ ५ ॥ मंदोदरीच्या कानात जी कर्णफुले आहेत, त्या हे प्रभु ! त्या विजा चमकत आहेत. ॥ ६ ॥ टाळ, मृदुंग अनुपम वाजत आहेत तोच हे सुरश्रेष्ठा ! तो मधुर मधुर ध्वनि होय. ॥ ७ ॥ रावणाला अभिमान झाला आहे हे जाणून प्रभूंनी स्मित केले व धनुष्य सज्ज करुन त्यावर बाण लावून नेम धरला. ॥ ८ ॥ एकाच बाणाने छत्र, मुकुट व ताटंक तोडून टाकली सर्वांच्या देखत छत्रादि भूमीवर पडली पण त्यातले मर्म कोणालाच कळले नाही . ॥ दो० १३ रा ॥ अशी लीला करुन रामबाण परत आला व त्याने भात्याचा आश्रय घेतला. महारसभंग झालेला पाहून रावणाची सर्व सभा भयभीत झाली. ॥ दो० १३ म ॥

भूमिकंप नहि नसे प्रभंजन । अस्त्र शस्त्र बघती न विलोचन ॥
निज निज चित्तीं सचिंत सारी । अशकुन होइ भयंकर भारी ॥
सभय सभा देखुनी दशानन । विहसुनि करि युक्तीनें भाषण ॥
शिरंहि गळत संतत शुभ ज्याला । मुकुट पडुनि कीं अशकुन त्याला ॥
निजा निजा निज निज गृहिं जाउनि । गेले भवनिं सकल शिर नमवुनि ॥
मंदोदरी उरिं चिंता बसली । कर्णफुलें जैं महिवरि पडलीं ॥
सजल विलोचन युग कर जोडी । म्हणे प्राणपति ! विनंति थोडी ॥
कांत ! राम वैरा परिहरणें । समजुनि मनुज, हट न मनिं धरणें ॥

दो० :- विश्वरूप रघुवंशमणि धरा वचनिं विश्वास ॥
लोक कल्पना वेद करि ज्याच्या प्रत्यंगास ॥ १४ ॥

भूकंप नाही की सोसाट्याचा वारा नाही, व अस्त्रशस्त्रादिही कोणाच्या डोळ्यांना दिसले नाही. ॥ १ ॥ सभेतील सारी मंडळी आपापल्या मनात सचिंत आहेत, कारण फारच मोठा अपशकुन झाला. ॥ २ ॥ दशाननाने सर्व सभा भयभीत झाल्याचे पाहीले व मोठ्याने हसून तो युक्तीने भाषण करु लागला. ॥ ३ ॥ मस्तके गळून सुद्धा ज्याचे सदा सर्वदा शुभच झाले त्याला मुकुट पडल्याचा कसला अपशकुन ? ॥ ४ ॥ जा, आपापल्या घरी जाऊन झोपा. रावणाला मस्तक नमवून सगळे घरी गेले, जेव्हा कर्णफुले जमिनीवर गळून पडली तेव्हापासून मंदोदरीच्या हृदयात चिंतेने ( कायमचे ) घर केले. ॥ ६ ॥
रावणास मंदोदरीचा (तिसरा) उपदेश - अश्रुभरल्या नेत्रांनी दोन्ही हात जोडुन मंदोदरी म्हणाली की प्राणपती ! माझी विनंती ऐकावी. ॥ ७ ॥ कांत ! रामवैराचा त्याग करावा; त्यास मनुष्य समजून मनात हट्ट धरु नये. ॥ ८ ॥ माझ्या म्हणण्यावर विश्वास ठेवा की रघुकुल शिरोमणी राम विश्वरुप आहेत व त्यांच्या प्रत्येक अंगाच्या ठिकाणी वेदांनी सत्यलोकादी लोकांची कल्पना केलेली आहे. ॥ दो० १४ ॥

पद पाताल शीर्ष अज धामहि । अंगिं इतर लोका विश्रामहि ॥
भृकुटि विलासच काल भयंकर । कच घनमाला नयन दिवाकर ॥
घ्राण यस्य अश्विनी कुमार । रजनी दिवस निमेष अपार ॥
श्रवण दशा दिश वेद चि वानी । श्वास मरुत निज ती श्रुति वाणी ॥
ओष्ठ लोभ यम दशन कराल । माया हास बाहु दिक्पाल ॥
आनन अनल अंबुपति जिव्हा । सृष्टि स्थिति संहार समीहा ॥
रोमराजि अठराहि वनस्पति । अस्थि शैल नस जाल नद्या अति ॥
उदर उदधि अधगो यातना । प्रभु जगमय कां बहु कल्पना ॥

दो० :- अहंकार शिव, बुद्धि अज, मन शशि, चित्त महान ॥
मनुज वास सचराचर रूप राम भगवान ॥ १५रा ॥
अशा विचारें प्राणपति ! त्यजुनी प्रभुवैरास ॥
प्रीति करा रघुवीर पदिं मम सौभाग्य न नास ॥ १५म ॥

प्रभु या ( विराट ) रुपाचे पाय पाताल-लोक, मस्तक ब्रह्मलोक व इतर अंगात अनेक लोकांचा निवास आहे. ॥ १ ॥ भृकुटीचा विलास हाच भयंकर काळ होय. केस ह्या मेघमाला असून सूर्य हे नेत्र आहेत. ॥ २ ॥ नाक अश्र्विनीकुमार असून दिवस व रात्र हे अपार निमेष म्हणजे पापण्यांचे खालीवर होणे आहे. ॥ ३ ॥ कान दश दिशा आहेत असे वेदच वर्णन करतात; ज्यांचा श्र्वास वायु आहे व श्र्वासापासून उत्पन्न झालेले जे वेद ती त्यांची वाणी आहे. ॥ ४ ॥ ओठ हा लोभ, कराल दाढा म्हणजे यम आणि हास्य माया आहे तर बाहू दिक्‌पाल आहेत. ॥ ५ ॥ मुख अग्नी, जिव्हा वरुण ( जल-देवता ) आहे उत्पत्ती – स्थिती व संहार ही सामान्य इच्छा आहे. ॥ ६ ॥ अंगावरील रोमावली ( लव ) या अठरा प्रकारच्या वनस्पती आहेत. हाडे पर्वत आहेत तर शिरांचे नसांचे जाळे या पुष्कळ नद्या होत. ॥ ७ ॥ पोट समुद्र आहे व खालची इंद्रिये यम – यातना आहेत. फार कल्पना कशाला ? प्रभु विश्वमय आहे. ॥ ८ ॥ अहंकार शिव ( रुद्र ), बुद्धी ब्रह्मदेव व मन चंद्र व चित्त विष्णू ( महतत्व ) आहे. मनुजरुप राम भगवान असून चराचराचा वास त्यांच्यात आहे व ते सचरांत व अचरांत ही वास करतात. ॥ दो० १५ रा ॥ प्राणपती ! अशा विचाराने प्रभूशी वैर सोडून रघुवीरपदीं प्रीती करा तर माझे सौभाग्य नाश न होता अबाधित टिकून राहील. ॥ दो० १५ म ॥

परिसुनि नारी वचन विहसला । अहो मोहमहिमा बलि कसला ! ॥
स्त्री स्वभाव सत्य चि कवि वदति । अवगुण आठ सदा हृदिं वसती ॥
साहस माया अनृत चपलता । भय अशौच अविवेक अदयता ॥
त्वां रिपुरूप जाइलें सगळें । अति विशाल भय मजसि घातलें ॥
प्रिये मला वश सहज सकळ तें । तुझ्या प्रसादें आतां कळतें ॥
प्रिये ! चतुरता तुझी समजली । प्रभुता मम कथिलिस अशि सगळी ॥
मृगलोचनी ! गूढ तव वाणी । कळत सुखद ऐकत भयदानी ॥
ठसलें मंदोदरी मानसीं । होइ काळवश धीभ्रम पतिसी ॥

दो० :- करत विनोद असा बहु उजाडतां दशकंध ॥
सहज अशंक लंकपति गत सभेंत मद-अंध ॥ १६रा ॥
सो० :- फुले फळे ना वेत यदपि सुधा वर्षति जलद ॥
मूर्खा ज्ञान न येत जरि गुरु मिळे विरंचि सम ॥ १६म ॥

स्त्रीचे भाषण ऐकून रावण खदखदा हसला व म्हणाला अहो ! केवढे आश्चर्य मोहाचा महिमा किती बलवान आहे ! ॥ १ ॥ कवी स्त्री-स्वभावाचे जे वर्णन करतात तेच खरे की स्त्रियांच्या हृदयात सदा आठ अवगुण निवास करतात. ॥ २ ॥ साहस, असत्य, माया, चपलता, भय, अपवित्रता, अविवेक आणि निर्दयता – ( हे ते आठ अवगुण होत ) ॥ ३ ॥ तू शत्रूचे सगळे वर्णन केलेस व मला फार मोठ्ठं भय घातलंस. ॥ ४ ॥ प्रिये ! हे सगळे तूं वर्णन केलेले रुप तर मला सहजच वश झालेले आहे ते तुझ्या प्रसादाने आता माझ्या ध्यानात आले. ॥ ५ ॥ प्रिये ! तुझी चतुरता मी ओळखली अशा रीतीने तू माझीच सगळी प्रभुता वर्णन केलीस ॥ ६ ॥ हे मृगलोचनी ! तुझी वाणी गुढ आहे हं ती कळली तर सुखदायक नाहीतर नुसत्या ऐकण्याने भयदायक आहे. ॥ ७ ॥ मंदोदरीच्या मनात हे ठसले की काळवश झाल्यामुळे पतीला बुद्धीभ्रम ( भ्रंश ) झाला आहे. ॥ ८ ॥ अशा प्रकारे रावणाने पुष्कळ विनोद केला. जेव्हा उजाडले, तेव्हा दशकंठ स्वभावताच निर्भय असणारा लंकापती मदांध होऊन सभेत गेला. ॥ दो० १६ रा ॥ मेघांनी जरी अमृताची वृष्टी केली तरी वेताला फुले किंवा फळे येणार नाहीत, तसेच ब्रह्मदेवासारखा गुरु मिळाला तरी मूर्खाला ज्ञान होत नाही. ॥ दो० १६ म ॥

प्रातरिथें उठलें रघुराव । पुसलें मत बोलावुनि सचिव ॥
वदा शीघ्र करुं काय उपाया । वदे जांबवान् वंदुनि पायां ॥
श्रुणु सर्वज्ञ सकल हृद्‌वासी । मति बल तेज धर्म गुण राशी ॥
मंत्र सांगतो मति अनुसारां । दूत धाडणें वालि कुमारा ॥
मंत्र रुचिर सब देती मान । वदति अंगदा कृपानिधान ॥
वालितनय मति बल गुण धामा । जा लंकेंत तात मम कामा ॥
तुम्हां कासया बहुत वदावें । परम चतुर मज आहे ठावें ॥
रिपुहित अमचें कार्य घडावें । असें शत्रुशीं तुम्हीं वदावें ॥

सो० :- प्रभुपदिं ठेवी शीस शिरसा मानुनि वच, उठत ॥
तो गुणसागर ईश राम कृपा ज्यावर अपलि ॥ १७रा ॥
स्वयंसिद्ध सब काज प्रभुनीं आदर दिला मज ॥
अस चिंतुनि युवराज हर्षित, तनु पुलकित सहज ॥ १७म ॥

अंगद शिष्टाई – ( प्रस्तावना )
इकडे रघुराज प्रात:काळी उठले व सर्व सचिवांना बोलावून घेऊन मत विचारले. ॥ १ ॥ काय उपाय करावा ते शीघ्र सांगा म्हणजे करु असे पायांना वंदन करुन जांबवंत म्हणाला, ॥ २ ॥ हे सर्वज्ञा ! आपण सर्वांच्या हृदयात निवास करता, आपण बुद्धी, बल, तेज, धर्म, आणि गुण यांचे सागर आहांत तथापि मी आपल्या बुद्धी प्रमाणे मंत्र ( सल्ला ) सांगतो, ऐका ! वालिकुमाराला दूत पाठवा. ॥ ३-४ ॥ सल्ला चांगला आहे असे म्हणून सर्व सचिवांनी मान दिला तेव्हा कृपासिंधु राम अंगदास म्हणाले, ॥ ५ ॥ बुद्धिबल गुण धामा, हे वाली तनया ! हे तात ! तू माझ्या कामासाठी लंकेत जा. ॥ ६ ॥ तुम्हांला बहुत कशाला सांगू ? तुम्ही परम चतुर आहांत हे मला माहीत आहे ॥ ७ ॥ शत्रूचे हित व्हावे आणि आमचे कार्य साधावे असे बोलणे तुम्ही शत्रुशी करा. ॥ ८ ॥ प्रभुचे वचन ( आज्ञा ) शिरसामान्य करुन अंगदाने पायावर मस्तक ठेवले व म्हणाला, हे राम ! ईश ! ज्याच्यावर आपण कृपा करता, तोच गुणसागर व समर्थ होतो. ॥ दो० १७ रा ॥ प्रभुचे सर्व कार्य स्वयंसिद्ध आहे पण प्रभुंनी मला आदर दिला असे मनांत चिंतन करुन युवराज अंगदास हर्ष झाला व त्याचे शरीर सहज पुलकित झाले. ॥ दो० १७ म ॥

नमुनि पदीं प्रभुला उरिं धरुनी । गेला अंगद सकलां नमुनी ।
प्रभू प्रताप सहज उरिं निधडा । वालि तनय रणपंडित गाढा ॥
पुरिं शिरला तों रावण बेटा । खेळत असतां गाठ अवचटां ॥
म्हणतां म्हणतां जुंपे भांडण । उभय अतुलबल वरी तरुणपण ॥
तो लत्ता अंगदा उगारी । भ्रमवि धरुन पद अपटुन मारी ॥
निशिचर निकर बघूनि भारि भट । ओरडुं शकति न, जाति पटापट ॥
कोणी कोणां मर्म न सांगति । त्याचा वध समजुनि चुप राहति ॥
कोलाहल नगरींत जहाला । जाळी लंके तो कपि आला ॥
नेणो अतां काय करि कर्ता । करिति विचार सभय अति चित्ता ॥
पुसल्या वाचुनि मार्ग दावती । ज्यांस विलोकि सुकुन ते जाती ॥

दो० :- सभाद्वारिं गेला मग स्मरुनि रामपद कंज ॥
पाहि सभोवति सिंहसा धीर वीर बलपुंज ॥ १८ ॥

प्रभूच्या चरणांना प्रणाम करुन, व प्रभु-प्रताप हृदयात धारण करुन सर्वांना नमस्कार करुन अंगद गेला. ॥ १ ॥ सहज निधडा वालीतनय, गाढा रणपंडित आणि त्यातही प्रभूचा प्रताप ! ॥ २ ॥ शिरला लंकापुरीत तोच रावणाचा एक मुलगा खेळत असता त्याची अचानक गाठ पडली. ॥ ३ ॥ बोलता बोलता दोघांचे भांडण जुंपले, दोघेही अतुल बली व तरुण ! ॥ ४ ॥ त्याने अंगदास लाथ उगारली, त्याबरोबर अंगदाने पाय धरला, गरगर फिरवला व जमिनीवर आपटून मारला. ॥ ५ ॥ हा फार मोठा योद्धा आहे हे जाणून राक्षसांच्या झुंडी आरडा-ओरडा न करतां, पटापट तिथून निघून गेल्या. ॥ ६ ॥ काय झाले हे कोणीच कोणास सांगीतले नाही, रावण-पुत्राचा वध झाला हे मर्म समजून मनातच ठेऊन सर्व जण गप्प राहीले. ॥ ७ ॥ लंकेत सर्वत्र कोलाहल सुरु झाला की लंका जाळणारा कपी ( परत ) आला आहे ! ॥ ८ ॥ जे ते अति भयभीत होऊन मनात विचार करु लागले की आता विधी ( ब्रह्मदेव ) काय करतो कोण जाणे. ॥ ९ ॥ सगळेजण त्याने न विचारताच त्याला रावण-सभेची वाट दाखवूं लागले. अंगद ज्या कोणाकडे सहज म्हणून पाही, ( त्याला वाटे आपले मरण आले म्हणून ) तो सुकून जाई. ॥ १० ॥ मग अंगद रामचरणकमलांचे स्मरण करुन सभेच्या द्वारापाशी गेला व तो धीर वीर बलशाही सिंहाप्रमाणे सभोवार पाहू लागला. ॥ दो० १८ ॥

त्वरें निशाचर एक पाठवी । समाचार रावणास कळवी ॥
श्रवत वदे विहसुनि दशशीस । या घेउनि कुठला तो कीश ॥
आज्ञा मिळत दूत बहु पळले । घेउनि कपिकुंजरास आले ॥
असा अंगदा दशमुख दिसला । सप्राणचि कज्जलगिरि बसला ॥
भुजा विटप शिर श्रृंगें जाणा । रोमावली लता जणुं नाना ॥
मुख नासिका नयन काननां । गिरिकंदरा गुहा अनुमाना ॥
शिरे सभें, मनि कचला न जरा । वालि तनय अति बलवान जबरा ॥
कपिला बघुनि सभासद उठले । रावण हृदयीं विशेष खवळे ॥

दो० :- यथा मत्तगज-गणिं शिरे पंचानन येऊन ॥
प्रभू प्रतापा स्मरुनि मनिं बसे सभेंत नमून ॥ १९ ॥

द्वारावरच्या निशाचरांपैकी एकाने रावणाला अंगद-कपि आल्याची वर्दी दिली. ॥ १ ॥ ते ऐकताच मोठ्याने हसून दशशीर म्हणाला या कुठला कपि आहे त्याला घेऊन या. ॥ २ ॥ आज्ञा मिळताच दूत धावले व कपिकुंजराला घेऊन सभेत आले. ॥ ३ ॥ जणूं सजीव काजळाचा पर्वत बसलेला असावा तसा अंगदास दशशीस दिसला. ॥ ४ ॥ भुजा हे वृक्ष, मस्तके ही शिखरे, आणि रोमावली या जणूं अनेक लता आहेत असे समजा. ॥ ५ ॥ तोंड, नाक, डोळे व कान या डोंगरातील द‍र्‍या व गुहा ! ॥ ६ ॥ अंगद सभेत शिरला, मनात जराही न कचरता‍( भिता ), कारण की वालीतनय अति जबर बलवान आहे. ॥ ७ ॥ कपीला पाहून सभासद ( आपसुकच ) उठले पण त्यामुळे मनांतून रावण फारच खवळला – चिडला. ॥ ८ ॥ मग हत्तींच्या कळपात सिंहाने प्रवेश करावा तसा अंगद शिरला, आणि मनात प्रभू-प्रतापाचे स्मरण करुन नमन करुन सभेत बसला. ॥ दो० १९ ॥

* * * * *

श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु

GO TOP