॥ श्रीरामचरितमानस ॥

(मराठी अनुवाद)

॥ लंकाकाण्ड ॥

॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥

अध्याय ३ राDownload mp3

दशमुख म्हण कोण तूं वांदर । मी रघुवीर दूत दशकंधर ॥
होति मैत्रि मम जनकाची तव । आलो बाबा तव चि हितास्तव ॥
उत्तम कुल तुम्हिं पुलस्ति पौत्रहि । पूजित विविधा विरंचि रुद्रहि ॥
वर पावुनि सब केलीं काजे । लोकपाल जित सर्वहि राजे ॥
नृप अभिमानें मोहें कीं बा । हरिली त्वां सीता जगदंबा ॥
श्रुणु आतां मम शुभ वचनाला । क्षमिती प्रभु तव अपराधाला ॥
धरुनि दांतिं तृण कंठिं कुठारी । परिजन सहित सवें निजनारी ॥
सादर जनकसुतेचे मागें असे चला सब भीती त्यागें ॥

दो० :- प्रणतपाल रघुवंशमणि त्राहि अतां मज त्राहि ॥
आर्त गिरा ऐकतां प्रभु करितिल अभय तुलाहि ॥ २० ॥

दशमुख म्हणाला – काय रे माकडा तूं कोण ? त्यावर अंगद म्हणाला हे दशकंधरा ! मी रघुवीराचा दूत आहे. ॥ १ ॥ माझ्या पित्याची व तुझी मैत्री होती म्हणून मी तुझ्या हितासाठी ( मैत्रीचा प्रस्ताव घेऊनच ) आलो आहे. ॥ २ ॥ तुमचे उत्तम कुळ, तुम्ही पुलस्ति मुनींचे नातू, ब्रह्मदेव व शंकर यांचे विविध प्रकारे पूजन करुन त्याच्याकडून वर मिळविलेले व सर्व कार्ये करुन सगळे लोकपाल व राजे जिंकले आहेत तुम्ही. ॥ ३ ॥ हे पहा राजा, तू जगदंबा सीता राजमदाने चोरुन आणलीस की मोहाने ? ॥ ५ ॥ तरी आता माझे शुभ-कल्याण कारक वचन ऐक. म्हणजे प्रभु तुझे सर्व अपराध क्षमा करतील. ॥ ६ ॥ दाती तृण धरुन गळ्यात कु‍र्‍हाडी बांधा, आपल्या परिवारासहित आपल्या स्त्रीला बरोबर घ्या आणि आदराने सन्मानाने जनकसुतेला पुढे करुन तिच्यामागे मी सांगीतलेल्या पद्धतीने सर्व भीतीचा त्याग करुन चला. ॥ ७-८ ॥ हे शरणागत पालका ! हे रघुवंश शिरोमणी ! आता माझे रक्षण करा, रक्षण करा. अशी आर्त वाणी ऐकताच प्रभु तुला निर्भय करतीलच. ॥ दो० २० ॥

रे कपि पोत बोल संभाळुन । मूढा जाणसि मज सुर शत्रु न ॥
वद तव नाम हि तव जनकाचें । नातें मानुं कसें मित्राचें ॥
अंगद नाम तनय वालीचा । योग तयासि कधीं भेटीचा ? ॥
लाजे ऐकुनि अंगद वच तें । वाली वानर होता स्मरतें ॥
अंगद तूच वालिचा बालक । उपजसि वंशानल कुल घातक ॥
गर्भ न गळला वृथा जन्मसी । स्वमुखें तापस दूत म्हणविसी ॥
वालि कुशल कोठें वद आहे । विहसुनि अंगद असं वदताहे ॥
वालिकडे जा आतां दश दिन । कुशल विचार किं मित्रा भेटुन ॥
रामविरोधें कसें कुशल तें । सर्व तोच तुज वदेल पुरतें ॥
श्रुणु शठ भेद होइ मनिं त्याचें । श्री रघुवीर हृदयिं नहिं ज्याचें ॥

दो० :- अम्हिं कुलघातक सत्य तुम्हिं कुलपालक दशशीस ॥
अंध हि बधिर न वदति अस नयन कान तुज वीस ॥ २१ ॥

वानराच्या पिल्ला, सांभाळून बोल मूर्खा ! मी देवांचा शत्रू आहे हे तू जाणत नाहीस ? ॥ १ ॥ तुझे व तुझ्या बापाचे नांव सांग त्याशिवाय मी मित्राचे नाते कसे मानूं ? ॥ २ ॥ माझे नांव अंगद, मी वालीचा पुत्र, त्याच्या भेटीचा कधी योग आला होता कां ? ॥ ३ ॥ ते अंगदाचे बोलणे ऐकून रावण लाजला, खजिल होऊन म्हणाला, हं हं आठवलं. होता एक वाली नावाचा वानर ! ॥ ४ ॥ काय रे अंगदा, तूंच का वालीचा मुलगा ? कुळाचा घात करणारा कुलांगारच निपजला आहेस ! ॥ ५ ॥ गर्भ का गळला नाही ? व्यर्थ जन्माला आलास ! कारण तू स्वत:च्या मुखाने (पित्याला मारणा‍र्‍याला) त्या तापसाचा दूत म्हणवतोस स्वत:ला ! ॥ ६ ॥ वाली कुशल आहे ना, कुठे आहे ते सांग त्यावर मोठ्याने हसून अंगद म्हणाला, ॥ ७ ॥ दहा दिवसांनी तूच वालीकडे जा आणि आपल्या मित्राला भेटून कुशल विचार हं ! ॥ ८ ॥ राम विरोध केल्याने कुशल कसे होते ते सर्व तुला तोच पुरते सांगेल. ॥ ९ ॥ शठा, ऐक, ज्याच्या हृदयांत श्रीरघुवीर नसतील त्याच्याच मनांत भेद होऊं शकतो. ॥ १० ॥ हे दशशीसा ! आम्ही कुलघातक आणि तुम्ही मात्र खरे कुलपालक कां ? आंधळे बहिरे सुद्धा असे म्हणणार नाहीत, तुला तर वीस डोळे व कान आहेत. ॥ दो० २१ ॥

शिव विरंचि सुर मुनि समुदाय । सेवुं इच्छिती ज्याचे पाय ॥
होऊन त्यांचा दूत बुडविलें । कुळ, अशि मति तव हृदय न फुटलें ॥
कपिची कठोर वाणी ऐकुनि । वदे दशानन नयन वटारुनि ॥
खल तव कठिण वचन सब सहतो । नीति धर्म मी जाणत असतो ॥
कपि वदला तव धर्म शीलता । अम्हिही श्रुत परनरि चोरिता ॥
दृष्ट दूत रक्षकता नयनीं । धर्मव्रतधारी मर बुडुनी ॥
नाककनविण भगिनी बघुनी । क्षमा कृता त्वां धर्म जाणुनी ॥
जगजाहिर तव धर्मशीलता । दर्शन अम्हांहि भाग्यें महता ॥

दो० :- जल्पुं नको जड जंतु कपि शठा पहा मम बाहु ॥
लोकपालबल विपुल शशि ग्रसन हेतु सब राहु ॥ २२रा ॥
मग नभसरिं मम करनिकर कमलीं करतां वास ॥
शोभित होइ मराल इव शंभुसहित कैलास ॥ २२म ॥

शंकर ब्रह्मदेव, सर्व देव आणि मुनिसमुदाय ज्यांच्या पायाच्या सेवेची इच्छा करतात त्यांचा दूत होऊन आम्ही कुळ बुडवले अशी बुद्धी तुझ्या ज्या हृदयांत उत्पन्न झाली ते फुटले का नाही ? ॥ १-२ ॥ कपीची कठोर वाणी ऐकून दशानन डोळे वटारुन म्हणतो की रे खला तुझे सर्व कठोर भाषण मी सहन करीत आहे कारण मी नीती व धर्म जाणत असतो. ॥ ३-४ ॥ कपि म्हणाला की तुझी धर्मशीलता आम्ही सुद्धा ( इतरांप्रमाणे ) ऐकली आहे की तू परस्त्रीची चोरी केलीस. ॥ ५ ॥ दूतांचे रक्षण करण्याची तुझी नीती आम्ही डोळ्यांनी पाहीली आहे. ( असे ) धर्माचे व्रत धारण करणारा बुडून का नाही मरत ? ॥ ६ ॥ नाक कान विहीन बहिणीला पाहून तू क्षमा केलीस ती ( राज ) धर्म जाणूनच. ॥ ७ ॥ ( अशी ) तुझी धर्म शीलता जगजाहीर आहे ! मोठ्या भाग्यानेच आम्हालाही तुझे दर्शन झाले. ॥ ८ ॥ रे जड जंतु कपि ! वृथा वल्गना करु नको, शठा हे माझे बाहू पहा लोकपालांचे विपुल बलरुपी विपुल शशींना ग्रासण्यास कारण झालेले हे सर्व राहू आहेत ॥ २२ रा ॥ आणखी ऐक आकाशरुपी सरोवरांत माझ्या हातांच्या समूहरुपी कमलांवर वास करीत असता शंभुसहित कैलास पर्वत हंसा सारखा शोभू लागला. ॥ दो० २२ म ॥

तुमच्या कटकामधिं हे अंगद ! । कोण लढेल मजसि योद्धा वद ॥
प्रभु तव नारि विरह बलहीन । अनुज दुःखि तद्‍दुःखें दीन ॥
तुम्हिं सुग्रीव कूलतरु दोही । अमचा अनुज भीरु अरि तोही ॥
जांबवंत मंत्री अति वृद्ध । त्या कीं अतां रणिं करवें युद्ध ॥
शिल्पिकर्म जाणति नलनील । हां ! कपि एक महाबलशील ॥
प्रथम येइ नगरा जो जाळी । ऐकुनि वदला कुमार वाली ॥
सत्य वचन वद निशिचर नाहा । खरेच कीं कपि करि पुरदाहा ॥
जाळि अल्प कपि रावणनगरी । कोण सत्य हें मानि वच तरी ॥
जो अति सुभट शंसिसी रावण ! । तो सुग्रीवदूत साधारण ॥
चाले बहु तो वीर न ठरतो । आम्हिं धाडुं घेण्यास खबर तो ॥

दो० :- सत्य नगर जाळी कपि प्रभु-आज्ञा च नसून ॥
फिरुन गत न सुगलाकडे राही सभय लपून ॥ २३रा ॥
सत्य वदसि दशकण्ठ सब श्रवुनि रोष मज नाहिं ॥
कटकिं न अमच्या कुणि तुजसि लढतां शोभे ज्याहि ॥ २३म ॥
प्रीति विरोध समां सवें करा असे हा न्याय ॥
जर मृगपति वधि बेडुकां बरें न म्हणे कुणि काय ॥ २३चं ॥
लघुता रामाला जरी तुज वधणें अति दोष ॥
तदपि कठिण दशकण्ठ बघ क्षात्र जातिचा रोष ॥ २३द्रा ॥
वक्रोक्ती धनु वचन शर दाहि हृदय रिपु कीश ॥
प्रत्युत्तर सांडसें जणुं काढी भट दशशीस ॥ २३य ॥
हसुनि वदे दश मौलि तैं कपिगुण मोठा एक ॥
जो प्रतिपाळी दद्धिता करी उपाय अनेक ॥ २३नमः ॥

हे अंगदा ! तुमच्या सैन्यात असा कोण योद्धा आहे की जो माझ्याशी लढेल ? असेल कोणी तर सांग. ॥ १ ॥ तुझा स्वामी स्त्री विरहाने दुर्बल झालेला आणि त्याचा धाकटा भाऊ त्याच्या दु:खाने दु:खी व दीन झालेला. ॥ २ ॥ तुम्ही आणि सुग्रीव तर आणि कुलतरु सारखे ( परस्पर हितशत्रू ) आहात आणि आमचा भाऊ ? तो ही अति भ्याड ! ॥ ३ ॥ जाबंवंत मंत्री अतिवृद्ध त्याला का आता रणांगणात युद्ध करता येणार आहे ? ॥ ४ ॥ नलनील गवंड्याचे काम जाणणारे आहेत हां ! एक महाबलशील कपि माझ्याशी लढण्यास योग्य आहे ज्याने पूर्वी येऊन नगर जाळले तो. हे ऐकताच वालीकुमार म्हणाला, ॥ ५-६ ॥ हे निशाचर नाथा ! सत्य सांग, कपिने ( पुरदाह ) नगर जाळले हे खरेच की काय ? ॥ ७ ॥ रावणाची नगरी ? एका क्षूद्र कपीने जाळली ? हे म्हणजे खरे मानील तरी कोण ? ॥ ८ ॥ तू रावण असून ज्याला अति उत्तम योद्धा म्हणतोस व ज्याची प्रशंसा करतोस तो तर सुग्रीवाचा एक साधारण दूत आहे. ॥ ९ ॥ जो पुष्कळ चालतो तो वीर ठरत नाही, आम्ही तर त्याला खबर घेण्यासाठीच पाठवला होता. ॥ १० ॥ कपीने खरोखरच नगर जाळले पण त्याने ते प्रभूची आज्ञा नसूनच केले ( म्हणून तो ) परत गेल्यावर सुग्रीवापाशी न जाता भयाने लपून राहीला ( त्याचे कारण आता समजले )॥ दो० २३ रा ॥ दशकंठा तू म्हणालास ते सर्व खरेच ( म्हणून ) ते ऐकून मला रोष आला नाही, आमच्या सैन्यात असे कोणीही नाही की ज्याला तुझ्याशी लढाई करणे शोभेल ! ॥ दो० २३ म ॥ प्रीती किंवा विरोध समानांच्या बरोबर करावा, अशी नीती वा न्याय आहे, मृगराज सिंह जर बेडकास मारेल तर त्याला कोणी ठीक म्हणेल काय ? ॥ दो० २३ चं ॥ तुला ठार मारण्यात रामाला कमीपणाच आहे, अति दोष आहे, तथापि हे दशकंठा, ऐक, क्षत्रिय जातीचा रोष, क्रोध फार कठीण असतो. ॥ दो० २३ द्र ॥ वक्क्रोक्ती रुपी वचनांचे धनुष्याने अंगदाने ( अनेक ) बाण मारुन शत्रूचे हृदय जाळून काढले. तेव्हा योद्धा रावण प्रत्युत्तर रुपी सांडसाने ते बाण काढीत आहे. ॥ दो० २३ य ॥ तेव्हा दशशीर हसून म्हणाला की कपीचा एक मोठा गुण आहे की जो प्रतिपालन करतो त्याच्या हितासाठी अनेक प्रकाराने उपाय करीत आहे. ॥ दो० २३ नम: ॥

धन्य कीश जो स्वामी काजा । जिथं तिथं नाचे पिऊन लाजा ॥
नाचुनि उडुनी जना रिझवितो । धर्म निपुण अति पतिहित करतो ॥
स्वामिभक्त अंगद ! तव जाती । प्रभुगुण कां न वदसि या रीती ॥
गुणग्राहि मी परम सुजाणहि । तव कटु रटन घेत कानीं नहि ॥
कपि वदला तव गुणग्रहणता । सत्य, पवनसुत झाला वदता ॥
वन भंगुनि सुत वधि जाळी पुरि । त्यानें कृत अपकार न मुळिं तरि ॥
चिंतुनि तव तो स्वभाव सुंदर । कृता धृष्टता म्या दशकंधर ॥
येतां दिसले जें कपि वदला । त्वेष रोष नहि लज्जा तुजला ॥
अशि मति म्हणुनिच बाप खादला । असें वदुनि दशशीस हासला ॥
बापा गिळुनी गिळतो तुजला । अतां काहिं परि सुचलें मजला ॥
वालि विमल यश भाजन जाणुन ।तुला अधम अभिमानी मारुंन ॥
वद रावण रावण जगिं कितके । मी वदतो श्रुणु कळले जितके ॥
गत बलिजया एक पाताळां । ठेविति बांधुन शिशु हय शाळां ॥
खेळति बालक जाती मारिति । येइ दया बलि तदा सोडविति ॥
एक सहस्रभुजा आढळला । जंतु गणुनि धावुनी पकडला ॥
गमती खातर भवनिं आणिला । त्या पुलस्त्य मुनिनीं सोडविला ॥

दो० :- एक वदत संकोच मज, ठेवि वालि कक्षांत ॥
क्रोध तजुनि वद सत्य, तूं कुठला रावण यांत ॥ २४ ॥

हा कीश धन्य आहे कारण की हा लोकलज्जा कोळून पिऊन आपल्या स्वामी कार्यासाठी जिथे तिथे नाचत आहे. ॥ १ ॥ नाचून बागडून लोकरंजन करुन हा आपल्या स्वामीचे हित करीत आहे असा हा अति धर्मनिपुण आहे. ॥ २ ॥ रे अंगदा ! तुझी माकडाची जातच स्वामीभक्त ! तेव्हा तू आपल्या स्वामीचे गुणगान असे वर्णन करणारच ! ॥ ३ ॥ मी गुणग्राहक व परम सुजाण असल्याने तुझ्या कटु कठोर बडबडीकडे विशेष लक्ष देत नाही. ॥ ४ ॥ अंगद म्हणाला, ही तुझी गुणग्राहकता अगदी सत्य आहे पवनसुताने ती मला सांगीतली आहे. ॥ ५ ॥ अशोक वनाचा विध्वंस करुन, तुझ्या मुलाचा वध केला, लंकापुरी जाळली तरी सुद्धा तुला वाटते की त्याने मुळीच अपकार केला नाही. ॥ ६ ॥ तो तुझा सुंदर स्वभाव जाणून हे दशकंधर ! मी सुद्धा तशीच थोडी धृष्टता केली ॥ ७ ॥ तो कपि जे काही म्हणाला, ते येथे आल्यावर मलाही दिसलेच, की तुला त्वेष, क्रोध व लज्जा मुळीच नाही. ॥ ८ ॥ अशी बुद्धी आहे म्हणून तर तू आपल्या बापाला खाल्लास, असे म्हणून दशशीस हासला. ॥ ९ ॥ अंगद म्हणाला बापाला तर गिळलाच आणि आता तुलाहि गिळतोच, पण आताच मला काही आठवले, सुचले. ॥ १० ॥ तू वालीच्या विमल यशाचे पात्र आहेस हे जाणून हे अधम ! रे अभिमान्या ! तुला मारीत नाही (वाचवतो) ॥ ११ ॥ रावणा ! या जगात रावण रावण म्हणविणारे किती रावण आहेत रे ? मला जितके माहीत आहेत, ते मी सांगतो हं ! ॥ १२ ॥ एक रावण बलीला जिंकण्यासाठी पाताळात गेला, त्याला लहान मुलांनी घोड शाळेत बांधुन ठेवला. ॥ १३ ॥ लहान मुले खेळता खेळता त्याला ( टपली ) मारुन निघून जात, शेवटी बलीला दया आली व त्याने सोडवला. ॥ १४ ॥ एक रावण सहस्त्रबाहूला सापडला तेव्हा त्याने जंतू समजून धावत जाऊन त्यास पकडला. ॥ १५ ॥ गमतीखातर त्याला घरी नेला पुढे पुलस्त्य मुनींनी ( मध्यस्थी करुन ) त्याला सोडविला. ॥ १६ ॥ मला सांगण्यास संकोच वाटतो की, एका रावणाला वालिने आपल्या काखेत ठेवला होता, तरी रावणा, क्रोध न करता खरे सांग, यांतला तू नेमका कुठला रावण ? ॥ दो० २४ ॥

श्रुणु शठ तो रावण बलवाला । हरगिरि जाणे यद्‌भुजलीला ॥
यत्‌शूरता उमापति जाणे । ज्यास पूजिलें शिरसुमनानें ॥
स्वकरें काढुन निजशिरकमलें । अमित वार त्रिपुरारि पूजले ॥
भुजविक्रम जाणतात दिक्‌पति । अजुन टोचणी उरिं त्यांच्या अति ॥
उरकाठिण्य दिग्गजां कळलें । जैं जैं त्यांस बळें आक्रमलें ॥
त्यांचे दंत कराल न रुपले । उरिं लागतां मुळ्यासम तुटले ॥
जो चालत अशि डोले धरणी । चढत मत्त गज जशि लघु तरणी ॥
रावण तो श्रुत जगीं प्रतापी । श्रवणिं न आला मृषा प्रलापी ? ॥

दो० :- लघु म्हणसी त्या रावणा नरगुण करसी गान ॥
रे कपि बर्बर खर्व खल कळे तव अतां ज्ञान ॥ २५ ॥

रे शठा ! ऐक, हा तो रावण बलिष्ठ आहे की ज्याची भुजलीला हर व हरगिरी जाणतात. ॥ १ ॥ शिरे रुपी ( कमल ) फुले वाहून ज्यांची पूजा केली ते उमापती ज्याची शूरता जाणतात. ॥ २ ॥ आणि ज्याने आपल्या हाताने शिरकमले खुडून अगणित वेळां त्रिपुरारीची पूजा केली, तोच हा रावण आहे बरं ! ॥ ३ ॥ ज्याच्या बाहूंचा पराक्रम दिक्पाल जाणतात आणि त्यांच्या उरात अजून सुद्धा टोचणी लागली आहे तो हा रावण ! ॥ ४ ॥ जेव्हा जेव्हा मी मुद्दाम स्वारी केली तेव्हा तेव्हा माझ्या छातीचा कठीणपणा दिग्गजांना कळला आहे. ॥ ५ ॥ त्यांचे विक्राळ दंत रावणाच्या छातीत रुतले तर नाहीतच पण छातीला लागताच मुळ्यांसारखे त्याचे तुकडे झाले. ॥ ६ ॥ मत्त हत्ती लहान नौकेत चढू लागला म्हणजे ती जशी डोलेत तशी तो चालू लागला की धरणी डोलते. ॥ ७ ॥ असा प्रतापी म्हणून तो सर्व जगांत प्रसिद्ध आहे तो रावण रे मिथ्या प्रलाप करणार्‍या कधी ऐकला आहेस की नाही ? ॥ ८ ॥ अशा त्या रावणाला तू हलका-तुच्छ म्हणतोस आणि ( सामान्य ) मानवाचे गुण गात बसतोस, रे जंगली कपि, तुच्छ माकडा, दुष्टा तुझे ज्ञान कळले हं मला ! ॥ दो० २५ ॥

अंगद सरुष वदे तैं वाणी । संभाळुनि वद जड अभिमानी ॥
दशशतभुज भुजगहन अपार । दहन अनल सम यस्य कुठार ॥
यस्य परशु सागर खर धारां । बुडले नृप अगणित बहु वारां ॥
तो स्वगर्व ज्या बघतां त्यागी । तो कीं नर दशशीर्ष ! अभागी ! ॥
मूर्खा शठा ! मनुज कीं राम । नदी किं गंगा धन्वी काम ॥
पशु सुरधेनु कल्पतरु रूख । अन्न दान का रस पीयूख ॥
गरुड खग किं अहि सहस्र आनन । चिंतामणि कां दगड दशानन ? ॥
श्रुणु मतिमंद लोक वैकुंठ । लाभ किं रघुपति भक्ति अकुंठ ॥

दो० :- मान मथुनि तव सचमु, वन भंगुनि पुर जाळून ॥
शठ रे कपि हनुमान जो गत तव सुत मारून ॥ २६ ॥

तेव्हा अंगद रोषाने म्हणाला की रे जड ! अभिमानी ! सांभाळून बोल ॥ १ ॥ सहस्त्रभुजाचे अपार गहन ( असण्यारा ) जाळून टाकणारा दावानल ज्याचा परशु होता. ॥ २ ॥ ज्याच्या परशुरुपी सागराच्या तीक्ष्ण धारेत अगणित राजे पुष्कळ वेळा बुडाले. ॥ ३ ॥ त्याने ज्याला पाहताच आपला गर्व सोडला, दशशीर्ष ! रे अभागी ! तो काय मनुष्य होय ? ॥ ४ ॥ रे मूर्खा शठा ! राम काय मनुष्य आहेत काय रे ? कामदेव ( त्रैलोक्याला वश करणारा ) काय सामान्य धनुर्धर आहे ? गंगा जिला शंकर आपल्या मस्तकावर धारण करतात ती काय सामान्य नदी आहे ? ॥ ५ ॥ कामधेनू ( सर्व इच्छा पुरविणारी ) काय पशु आहे ? आणि कल्पतरु काय साधा वृक्ष आहे ? अन्नदान हे काय सामान्य दान आहे ? आणि ( मेलेल्यास जिवंत करणारे ) अमृत काय साधा रस आहे ? ॥ ६ ॥ गरुड ( भगवंताचे वाहन ) म्हणजे साधा पक्षी व सहस्त्र मुखांचा शेष साधा सर्प आहे कां ? चिंतामणी म्हणजे साधा दगड धोंडा पाषाण आहे ? ॥ ७ ॥ अरे मतिमंदा ! ऐक, वैकुंठ हा काय लोक आहे ? आणि रघुपतींची अकुंठ भक्ती हा काही सामान्य लाभ आहे कां ? ॥ ८ ॥ रे शठा ! जो तुझ्या सैन्यासह तुझा मान मर्दन करुन वनाचा विध्वंस करुन तुझे पुर जाळून व तुझ्या पुत्राला ठार मारुन ( सुखरुप ) गेला तो हनुमान काय साधा कपि म्हणतोस ? ॥ दो० २६ ॥

श्रुणु रावण सोडुनि चातुर्या । भजसि न कृपासिंधु रघुवर्या ॥
रामद्रोहि खला जर बनशिल । ब्रह्मरुद्र तुज रक्षुं न शकतिल ॥
मूढ मृषा न बढाया तूं कर । रामवैर अशि करिल दशा बर ॥
तव शिरनिकर कपींचे पुढतीं । रामशरें धरणींवर पडती ॥
तीं तव शिरंकंदुक सम नाना । भल्ल कीश खेळति मैदानां ॥
जैं समरीं कोपति रघुनायक । सुटतिल अति कराल बहु सायक ॥
तैं करवे किं घमेंड अशी तुज । करुनि विचार उदार राम भज ॥
श्रवत वचन रावण जळफळे । जळत महानलिं जणुं घृत गळे ॥

दो० :- कुंभकर्णसम बंधु मम सुत विश्रुत शक्रारि ॥
जाणसि ना मम पराक्रम विजित चराचरसारिं ॥ २७ ॥

रावणा ऐक ! चातुर्य सोडून तू कृपासिंधु रघुश्रेष्ठास का भजत नाहीस ? ( शरण जात नाहीस ) अरे दुष्टा तूं जर रामद्रोही झालास तर ब्रह्मा, रुद्र सुद्धां तुझे रक्षण करुं शकणार नाहीत. ॥ १-२ ॥ रे मुढा, फुकटच्या बढाया मारु नकोस रामवैर तुझी अशी दुर्दशा करील बरं ! ॥ ३ ॥ तुझ्या मस्तकाचे ढीग रामबाणांनी कपींच्या पुढे धरणीवर पडतील. ॥ ४ ॥ ती तुझी शिरे ( घेऊन ) अनेक भल्ल आणि कपि चेंडूसारखी मैदानात खेळतील जेव्हा रघुनायक रणांगणांत क्रुद्ध होतील आणि अति कराल बाण सुटतील तेव्हा ही तुझी सारी घमेंड तेथे तुला करता हेईल काय याचा विचार करुन उदार रामचंद्रास शरण जा. ॥ ६-७ ॥ हे वचन ऐकताच रावणाचा असा जळफळाट झाला की महा अनल पेटलेला असताना त्यात तूप पडावे. ॥ ८ ॥ कुंभकर्णासारखा माझा बंधु आहे, आणि माझा पुत्र इंद्रजित म्हणून प्रसिद्ध आहे आणि मी सर्व चराचर सृष्टी जिंकली हा माझा पराक्रम तुला माहीत नाही काय ? ॥ दो० २७ ॥

शठ ! शाखामृग साह्य जोडतां । सिंधुबद्ध इतकिच ही प्रभुता ॥
लंघिति खग अनेक वारीशा । शूर न होती ते श्रुणु कीशा ॥
बलजल पूरित मम भुजसागर । बुडले ज्यांत शूर बहु सुरनर ॥
वीस पयोधि अगाध अपार हि । कोण वीर जो पावे पारहि ॥
मी दिक्पतिकरिं नीर भरविलें । भूपसुयश खल मज ऐकविलें ॥
समर सुभट तव नाथ असे जर । ज्याचे गुण वर्णिसि वरचेवर ॥
दूत धाडि मग कोण्या काजें । रिपुशीं प्रीति करत ना लाजे ॥
हरगिरि मथन निरख मम बाहु । शठ गा स्वामी स्तुति मग पाहूं ! ॥

दो० :- शूर कवण रावण सदृश स्वकरें कापुनि शीस ॥
हुत अति हर्षें अनलिं बहु वार साक्षि गौरीश ॥ २८ ॥

शठा ! शाखामृगांचे साह्य मिळाल्यावर सागर बद्ध केला ही इतकीच प्रभूता नां ! ॥ १ ॥ अनेक पक्षी अनेक सागर ओलांडून जातात, माकडा ! ऐक म्हणून काही ते शूर ठरत नाहीत. ॥ २ ॥ बलरुपी जलाने भरलेला माझा बाहूरुपी सागर आहे ज्यात ( आजवर ) पुष्कळ शूर देव व मनुष्य बुडाले आहेत. ॥ ३ ॥ असे वीस अगाध आणि अपार सागर आहेत, असा कोण वीर आहे की जो यांच्या पार जाऊ शकेल ? ॥ ४ ॥ मी दिक्‌पालांच्या हातानी पाणी भरविले आहे आणि दुष्टा ! मला तू एका भूपाचे सुयश सांगत बसलास ? ॥ ५ ॥ ज्याचे गुण तू पुन:पुन्हा वर्णन केलेस तो तुझा नाथ जर रणांत मोठा बलवान योद्धा आहे ॥ ६ ॥ तर मग दूत पाठविण्याचे काम काय ? शत्रूशी प्रीती ( सख्य ) करण्यास त्यास लाज नाही वाटत ? ॥ ७ ॥ हरगिरीचे मंथन करणार्‍या या माझ्या बाहूंकडे निरखून बघ आणि मग तुझ्या स्वामींचे गोडवे गा पाहूं. ॥ ८ ॥ रावणासारखा कोण शूर आहे की ज्याने अति हर्षाने अनेक वेळां आपल्या हाताने शिरे कापून ती अति हर्षाने अग्नित हवन केली याला गौरीपती साक्षी आहेत. ॥ दो० २८ ॥

जळतां पाहूं यदा कपालां । विधिनें लिखित अंक मम भालां ॥
नरहस्तें वध अपला वाचीं । तैं हसलों विधिगिरा असाची ॥
स्मरुनि तेंहि मनिं भीति न मातें । भ्रमें जरठ विधि लिहि लेखातें ॥
अन्य वीरबल शठ मज पुढतीं । वदसी त्यजुनी लाज पत किती ॥
अंगद वदला जगीं लाजरा । रावण ! तुजसम कोणि न दुसरा ॥
लाजवंत सहज तूं स्वभावें । स्वमुखें निज गुण गान न ठावें ॥
शिर गिरि कथा मनीं राहिली । वीस वेळ यास्तव गाइली ॥
तें भुजबल तूं उरि रक्षित जैं । बलि सहस्रभुज वालि विजित तैं ॥
श्रुणु मति मंदा वद पुरतें रे । शूर किं नर छेदिल्या शिरें रे ॥
वीर न म्हणती इंद्रजालिला । स्वकरें कापि शरीरा सकला ॥

दो० :- जळति पतंग विमोहवश भार वाहि खरवृंद ॥
त्यानां शूर न म्हणति कुणि कर विचार मतिमंद ॥ २९ ॥

ब्रह्मदेवाने माझ्या कपाळावर लिहून ठेवलेले विधिलिखित शिरे जळत असता जेव्हा मी पाहीले, ॥ १ ॥ तेव्हा माणसाच्या हाताने माझा वध आहे हे मी वाचले आणि हसलो की विधीवाणी खरी नाही. ॥ २ ॥ त्या लेखाची मनात आठवण झाली तरी मला भय वाटत नाही कारण की ते फार म्हातार्‍या विधिने भ्रमात लिहीले आहे. ( अशी मला खात्री आहे. ) ॥ ३ ॥ रे शठा ! दुसर्‍या वीराचे बळ माझ्यासमोर लाज व पत सोडून किती गात आहेस ? ॥ ४ ॥ अंगद म्हणाला की हे रावणा ! जगात तुझ्या सारखा लाजरा ( लाजाळु ) दुसरा कोणी नाही. ॥ ५ ॥ तू स्वभावाने सहज लाजाळु आहेस म्हणून तर आपल्या तोंडाने स्वत:चे गुणगान करण्याचे तुला ठाऊक नाही. ॥ ६ ॥ शिर आणि कैलासगिरी यांची कथा तुझ्या मनांत राहीली म्हणून ती तूं वीस वेळां सांगीतलीस. ॥ ७ ॥ पण जेव्हा तू बली, सहस्त्रबाहू व वाली यांच्याकडून जिंकला गेलास तेव्हा ते भुजबळ तूं आपल्या उरात लपवून ठेवले होतेस काय ? ॥ ८ ॥ अरे मतिमंदा ! ऐक, आणि पुरते उत्तर दे. मस्तके कापून घेतल्याने कोणी शूर होतो काय ? ॥ ९ ॥ इंद्रजाली ( जादूगार ) आपल्या हाताने आपली शिरे कापून घेतो, म्हणून त्याला कोणी वीर म्हणत नाही. ॥ १० ॥ विशेष मोहाला वश होऊन पतंग ( आपले देहच अग्नित अर्पण करतात ) आणि गाढवांचा तांडा भार वाहतो म्हणून त्यांनाही कोणी शूर म्हणत नाहीत ( म्हणून ) अरे मतिमंदा नीट विचार कर. ॥ दो० २९ ॥

खल ! न वितंडवाद अतां कर । सोड मान मनिं मम वचना धर ॥
दशमुख ! आलो ना दौत्यास्तव । प्रेषित रघुवीरें मज यास्तव ॥
वदले बहुवार कीं कृपाल । नहि गजारियश वधुनि शृगाल ॥
प्रभुचें वचन मनीं तें स्मरतो । शठ कठोर वचनां तव सहतो ॥
ना तर तव मुख भंजन करुनी । नेतो सीते बळें उचलुनी ॥
कळलें तव बल अधम सुरारी । शून्यिं हरुनि अणिली परनारी ॥
तूं निशिचरपति गर्व बहूत । मी रघुनायक सेवक दूत ॥
जर न राम अपमाना डरतो । तुज देखत असं कौतुक करतो ॥

दो० :- तुज महिं अपटुनि चमु वधुनि तव गावा ध्वंसून ॥
तव युवतींसह जानकिसि जाइन शठ घेऊन ॥ ३० ॥

रे खला, आता वितंडवाद करु नको मान सोड, आणि मी सांगतो ते मनावर घे ॥ १ ॥ दशमुखा, मी दौत्य करण्यासाठी नाही आलो, रघुवीराने मला एवढ्याचसाठी पाठवला आहे ॥ २ ॥ सिंहाने कोल्हा मारण्यात सिंहाचे यश ( शौर्य ) नाही असे कृपालु वारंवार म्हणाले आहेत. ॥ ३ ॥ प्रभूचे हे वचन माझ्या स्मरणात आहे म्हणून हे शठा ! तुझी कठोर वचने मी सहन करीत आहे. ॥ ४ ॥ नाहीतर तुझ्या ( सर्व ) मुंड्या मुरगळून तुझी सर्व मुखे तोडून फोडून टाकून मी आपल्या बळाने सीतेला उचलून नेली असती. ॥ ५ ॥ रे अधमा ! अरे सुरारि ! दुसरे कोणी नाही अशी संधी साधून तू परस्त्री चोरुन आणलीस, यावरुनच तुझे बळ मला कळले ॥ ६ ॥ तू निशाचरांचा राजा आणि तुला ( बळाचा व शौर्याचा ) फार गर्व आहे. ( उलट ) मी तर रघुनायकाच्या सेवकाचा एक ( क्षुद्र ) दूत आहे ॥ ७ ॥ पण रामचंद्रांच्या अपमानाला जर घाबरलो नसतो तर तुझ्या डोळ्यादेखत असे कौतुक करणार होतो. ॥ ८ ॥ हे शठा ! तुला जमिनीवर अपटून मारुन, तुझ्या सैन्याचा वध करुन, आणि तुझ्या गावाला उध्वस्त करुन तुझ्या सर्व बायकांसह जानकीला घेऊन जाईन. ॥ दो० ३० ॥

असे करिन तरि नसे महत्वहि । मृता मारणें नहि पुरुषत्वहि ॥
कौल कामवश कृपण विमूढहि । अति दरिद्र अयशी अति वृद्ध हि ॥
रोगी सदा सतत जो क्रोधी । विष्णु विमुख श्रुति संत विरोधी ॥
तनु पोषक निंदक अघ खाणी । जिवंत शवसम दौदा प्राणी ॥
हें जाणुनि खल वधतो ना तुज । अतां क्रोध उपजवूं नको मज ॥
तैं निशिचरपति कुपित बोलतो । ओठ चावि सब हात चोळतो ॥
रे कपि अधम अतां मरुं पाहसि । मोठा घास सान मुखिं घालसि ॥
यस्य बळें जल्पसि कटु कपि जड । त्या प्रताप बल तेज बुद्धि रड ॥

दो० :- जाणुनि अगुण अमान त्या देइ पिता वनवास ॥
तें दुःखहि युवती विरह निशिदिन माझा त्रास ॥ ३१रा ॥
गर्व तुला ज्यांच्या बळें ऐसे मनुज अनेक ॥
खाति निशाचर दिन-निशीं त्यज जड ! हट अविवेक ॥ ३१म ॥

असे जरी मी केले तरी त्याला काहीच महत्व नाही, कारण मेलेल्यास मारण्यात काय पुरुषार्थ ? ॥ १ ॥ कौल म्हणजे शाक्तपंथी वाममार्गी, कामी, कंजूष, विमूढ, अतिदरिद्री, अपकीर्ती झालेला, संतविरोधी, शरीराचेच पोषण करणारा आणि निंदक हे सर्व पापांची खाण असून हे चौदा प्रकारचे प्राणी जिवंत असून प्रेतासारखेच आहेत. ॥ २-४ ॥ हे जाणून, हे खला ! मी तुझा वध करीत नाही; आता मात्र तू माझ्यात क्रोध उपजवूं नकोस. ॥ ५ ॥ तेव्हा निशाचरपती – रावण क्रुद्ध होऊन सर्व ओठ चावीत व हात चोळीत म्हणाला, ॥ ६ ॥ रे अधम कपि ! आता तू मरु पहात आहेस ( म्हणूनच ) लहान तोंडी मोठा घास घेत आहेस. ॥ ७ ॥ रे जड कपि तूं ज्याच्या बळावर कठोर बडबड करीत आहेस त्याच्याजवळ प्रताप, बल, तेज, व बुद्धी यांची रडच आहे. ॥ ८ ॥ तो अगुण अमान आहे असे जाणून त्याला पित्याने वनवास दिला ते दु:ख आणि तरुण स्त्रीचा विरह आणि रात्रंदिवस (त्याला) माझी भीती आहे. ॥ दो० ३१ रा ॥ ज्यांच्या बळाने तुला गर्व चढला आहे अशा अनेक माणसांना निशाचर रात्रंदिवस खातात, म्हणून हे मूर्खा ! तूच हा अविवेक व हट्ट सोडून दे. ॥ दो० ३१ म ॥

निंदी जैं रामास दशानन । भडके क्रोध कपींद्र हुताशन ॥
हरिहर निंदा ऐकति कानां । गोहत्या सम पाप तयानां ॥
कट्‍कटून कपि कुंजर भारी । त्वेषें भुजदंडा महिं मारी ॥
डोलत धरणि सभासद खचले । पळत सुटति भय मरुते ग्रसले ॥
पडत उठे अवरुनि दशकंधर । महिवर पतित मुकुट अति सुंदर ॥
घेउनि काहीं तो शिरि टेकी । प्रभूकडे काहीं कपि फेकी ॥
येतां बघुनि मुकुट कपि पळती । हा हा ! दिवसा उल्का पडती ॥
कीं, क्रोधें रावणें फेकले । चार कुलिश अति जवें ठाकले ॥
प्रभु हसुनी म्हणती किं भिउं नका । राहु केतु ना कुलिश न उल्का ॥
हे दशकंठ किरीट किं असती । वालिसुतानें प्रेरित येती ॥

दो०:- उडुनि पवनसुत धरी करिं ठेवी प्रभुसमीप ॥
कौतुक बघती भल्ल कपि द्युति सम वासरदीप ॥ ॥ ३२रा ॥

दशाननाने जेव्हा रामाची निंदा केली तेव्हा कपींद्राचा क्रोधाग्नी भडकला. ॥ १ ॥ कारण हरि किंवा हर यांची निंदा जे कानांनी ऐकतात त्यांना गोहत्येचे पातक लागते. ॥ २ ॥ ( त्यामुळे ) कपिकुंजराने कट्कटा असा भारी ध्वनी करुन आवेशाने आपले दोन्ही भुजदंड जमिनिवर आपटले. ॥ ३ ॥ ( त्याबरोबर ) धरणी डोलली आणि सभासद खाली पडले आणि भयरुपी मरुताने ग्रासले जाऊन ( अति घाबरुन ) ( जीव घेऊन ) पळत सुटले. ॥ ४ ॥ दशकंठ जमिनीवर पडता पडता सावरुन कसातरी उठला ( तरीपण ) त्याचे सर्व अति सुंदर मुकुट जमिनीवर पडलेच. ॥ ५ ॥ त्यातील काही घेऊन त्याने आपल्या डोक्यावर ठेवले व काही ( चार ) कपिने झुगारुन प्रभूकडे फेकून दिले. ॥ ६ ॥ मुकुट येत असलेले पाहून वानर पळूं लागले ( त्यांना वाटले ) हाय ! हाय ! तारे दिवसाच गळून पडू लागले ( मोठा अपशकुन झाला ). ॥ ७ ॥ किंवा रावणाने क्रोधाने फेकलेले हे चार कुलिश ( हिरा/वज्र ) अति वेगाने येत आहेत की काय ? ॥ ८ ॥ प्रभु हसून म्हणाले की भिऊ नका हे राहू, केतू नाहीत किवा कुलिश, वा उल्काही नाहीत. ॥ ९ ॥ हे दशकंठाचे मुकुट आहेत वालिसुताने फेकून दिल्याने ते इकडे येत आहेत. ॥ १० ॥ ( हे ऐकताच ) पवनसुताने उडी मारुन ते हातात धरले व प्रभूच्या जवळ आणून ठेवले तेव्हा भल्ल कपि कौतुकाने त्यांच्याकडे पाहू लागले कारण त्यांचा प्रकाश ( तेज ) सूर्यासारखा होता. ॥ दो० ३२ रा ॥

* * * * *

श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु

GO TOP