॥ श्रीरामचरितमानस ॥

(मराठी अनुवाद)

॥ लंकाकाण्ड ॥

॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥

अध्याय ११ वाDownload mp3

त्याच रात्रिं जाउनि सीतेसी । त्रिजटा सांगे सकल कथेसी ॥
रिपुची शिरभुज वृद्धि परिसली । सीता हृदयिं भीति संचरली ॥
मुख उदास उपजे मनिं चिंता । त्रिजटेला वदली मग सीता ॥
काय होय कां वदसि न माई । कसा मरेल विश्व दुख दाई ॥
रघुपति शरिं शिर तुटुनि न मरतो । विधि विपरीत चरित सब करतो ॥
जगवी माझें अभाग्य त्यातें । हरिपदकमल विरहि मज करि तें ॥
जें करि कपट कनक मृग खोटा । तेंच दैव दाखवि मज सोटा ॥
जो विधि दुःसह दुःखें सहवी । लक्ष्मणास कटु वचनें वदवी ॥
रघुपति विरह सविष शर भारी । लक्षुनि मार वार बहु मारी ॥
दुःखिं अशाहि जगवि जो प्राणां । तो त्या वाचवि विधिच दुजा ना ॥
बहुपरिं करि विलाप जानकी । स्मरुनी स्मरुनि कृपानिधान कीं ॥
त्रिजटा वदली राज कुमारी ! । उरिं शर लागत मरे सुरारी ॥
प्रभु न मारि उरिं शर, कारण कीं । त्याचे हृदयीं वसे जानकी ॥

छं० :- तद्‍हृदयिं जानकि वास, जानकि हृदयिं माझा वास कीं ॥
मम उदरिं भुवन अनेक लागत बाण सर्वां नाश कीं ॥
सीतेस हर्ष विषाद अति, बघुनी वदे त्रिजटा पहा ॥
यापरिं मरि रिपु ऐक सुंदरिं ! सोड कीं संशय महा ॥
दो० :- कापित शिर होइल विक्रल तुटे तुझें तैं ध्यान ॥
रावण हृदयीं तदा शर मारिति राम सुजाण ॥ ९९ ॥

सीता त्रिजटा संवाद
त्याच रात्री सीतेपाशी जाऊन त्रिजटेने सर्व हकीकत तिला सांगीतली. ॥ १ ॥ शत्रूच्या शिरबाहूंची वृद्धि ऐकली आणि सीतेच्या हृदयात भीती संचरली. ॥ २ ॥ तिचे मुख उदास झाले आणि मनात चिंता उत्पन्न झाली तेव्हा सीता त्रिजटेला म्हणाली की, ॥ ३ ॥ माते ! काय होईल ते तू का ग नाही सांगत ? विश्वाला दु:ख देणारा तो कसा मरणार (ते सांग तरी एकदा). ॥ ४ ॥ रघुपतीच्या बाणांनी शिरें तुटून सुद्धा मरत नाही त्याअर्थी विधीच सर्व विपरीत लीला, करणी करीत आहे. ॥ ५ ॥ ज्याने मला हरिपद कमल विरही केली ते माझे अभाग्यच त्याला जगवीत आहे. ॥ ६ ॥ ज्या दैवाने खोटा कनकमृग केला तेच दैव मला अजून सोटा दाखवीत आहे. ॥ ७ ॥ ज्या विधीने मला दु:सह दु:ख सहन करायला लावली व ज्याने मजकडून लक्ष्मणास कटू वचने वदविली. ॥ ८ ॥ ज्याने रघुपती विरहरुपी मोठमोठे विषारी बाण पुष्कळ वेळा मला लक्षून कामदेव मारीत आहे, आणि अशाही दु:खात जो माझे प्राण वाचवीत आहे, तोच विधि त्याला जगवीत आहे. दुसरा कोणी नाही. ॥ ९-१० ॥ कृपानिधान रघुपतीचे पुन:पुन्हा स्मरण करुन जानकी नाना प्रकरे विलाप करीत आहे. ॥ ११ ॥ तेव्हा त्रिजटा म्हणाली की राजकुमारी ! त्याच्या उरात बाण लागला की सुरारि मरेल. ॥ १२ ॥ प्रभु त्याच्या उरात बाण मारत नाहीत कारण त्याच्या हृदयात जानकी वसत आहे. ॥ १३ ॥ त्याच्या हृदयात जानकीचा वास आहे, जानकीच्या हृदयात माझी वस्ती आहे, आणि माझ्या उदरात अनेक भुवने आहेत, त्यामुळे बाण लागताच त्या सर्वांचा नाश होईल ( असे प्रभुंना वाटते म्हणून ते त्याच्या हृदयात अजून बाण मारत नाहीत ) हे ऐकून सीतेला हर्ष व अति विषाद वाटला. हे पाहून त्रिजटा म्हणाली, की हे पहा सुंदरी ! ऐक या प्रकारे रिपु मरेल, महा संशय सोड, ॥ छंद ॥ शिरे कापता कापता जेव्हा तो व्याकुळ होईल तेव्हा त्याचे तुझे ध्यान तुटेल आणि तेव्हाच सुजाण राम रावणाच्या हृदयात बाण मारतील व तो मरेल. ॥ दो० ९९ ॥

यापतिं विविधा समजुत घाली । त्रिजटा मग निज गृहास गेली ॥
रामस्वभाव सीता स्मरतां । उपजे विरहव्यथाऽति चित्तां ॥
निन्दी इन्दुस निशे फार ती । युग सम होइ, न सरे रात्र ती ॥
करी विलापा मनामधिं किती । राम विरह दुःखी जानकि ती ॥
विरहदाह उरिं जै अति झाला । वाम विलोचन बाहू स्फुरला ॥
समजुनि शकुन मनीं धरि धीर । की भेटति कृपाल रघुवीर ॥
इथें अर्धनिशिं रावण जागे । सूता सरोष बोलूं लागे ॥
समर विमुख शठ ! केला मजला । अधम मंदमति धिग् धिग् तुजला ॥
तो धरि पद समजावी त्याला । उजाडतां रथिं बसुनि निघाला ॥
ऐकति दशमुख समरा येतो । कपिदळिं खळबळ महा उडे तों ॥
जिथें तिथें गिरि विटपां उपटिति । दांत खात भट भारी धावति ॥

छं० :- गत रुष्ट मर्कट विकट भल्ल कराल धृत भूधर करीं ॥
त्वेषें महा करतां प्रहारा पळति निशिचर भय उरीं ॥
उधळूनि दळ बळवंत मर्कट रावणा रणिं घेरती ॥
ताडुन चपेटा नखरिं फाडुनि वर्ष्म क्रुत विव्हळ अति ॥ १ ॥
दो० :- प्रबळ महा मर्कट बघुनि रावण करुनि विचार ॥
गुप्त हो‍उनि तत्क्षणीं करि माया विस्तार ॥ १०० ॥

अशी अनेक प्रकारे त्रिजटेने सीतेची समजूत घातली व ती आपल्या घरी गेली. ॥ १ ॥ रामचंद्राच्या स्वभावाचे स्मरण होताच सीतेच्या हृदयात अति विरह व्यथा उत्पन्न झाली. ॥ २ ॥ ती चंद्राला व निशेला फारच निन्दू लागली व ती रात्र युगासारखी झाल्याने सरता सरे ना. ॥ ३ ॥ मग ती मनातच कितीतरी विलाप करु लागली अशी ती जानकी रामविरहाने फार दु:खी झाली. ॥ ४ ॥ जेव्हा हृदयात अतिशय विरहदाह उत्पन्न झाला तेव्हा तिचा डावा डोळा व डावा बाहू स्फुरण पावला. ॥ ५ ॥ शकुन समजून तिने मनात धीर धरला की आता लवकरच कृपालु रघुवीर भेटतील. ॥ ६ ॥ इकडे अर्धी रात्र गेल्यावर रावण मूर्च्छेतून जागा झाला व आपल्या सारथीला रोषाने बोलू लागला. ॥ ७ ॥ अरे शठा ! तू मला रणातून पळवून आणलास ! अधमा ! मंदमति ! धिक्कार असो तुला. ॥ ८ ॥ त्याने रावणाचे पाय धरले व त्याची समजूत घातली मग उजाडताच रावण रथात बसून युद्धाला चालला. ॥ ९ ॥ दशानन युद्धाला येत आहे असे ऐकले तोच कपिसैन्यात मोठी खळबळ उडाली ॥ १० ॥ जिथे दिसेल तिथे पर्वत व वृक्ष उपटून घेऊन दात खात महायोद्धे धावले. ॥ ११ ॥ विकट मर्कट व कराल भल्ल हातात पर्वत घेऊन रोषाने धावत गेले व त्वेषाने मोठे प्रहार करताच निशाचरांच्या उरात भय वाटून ते पळत सुटले या प्रमाणे शत्रु सैन्याला उधळून बलवंत भल्ल मर्कटांनी रावणाला रणात गराडा घातला व चपेटा हाणून, नखांनी देह फाडून त्याला व्याकुळ केला. ॥ छंद ॥ महामर्कट महाप्रबल आहेत असे पाहून रावणाने विचार केला व गुप्त होऊन त्याने एका क्षणात मायेचा विस्तार केला ॥ दो० १०० ॥

छं० :- जैं मांडि तो पाखंड । तैं प्रगट जंतू चंड ॥
वेताळ भूत पिशाच । करिं सज्य धनु नाराच ॥
योगीणि धृत करवाल । करिं अन्य मनुज कपाल ॥
कृत सद्य शोणित पान । बहु नृत्य करती गान ॥
धर मार घोषति घोर । चौफेर निःस्वन थोर ॥
जैं येति मुख वासून । तैं जाति कीश पळून ॥
ज्या भागिं मर्कट जाति । तिथं आग अति बघताति ॥
कपि भल्ल विव्हळ फार । मग वर्षि वाळू अपार ॥
करि थक्क ठायिंच कीश । गर्जे महा दशशीस ॥
लक्ष्मण कपीश सुवीर । गतचेष्ट सर्व अधीर ॥
हा राम ! हा रघुनाथ ! । भट म्हणत चोळिती हात ॥
बळ सर्व ऐसे झोडि । मग अन्य माया सोडि ॥
प्रगटी किती हनुमान । येतात धृत पाषाण ॥
बहु वृंद वृंदे येति । रामास वेढुनि घेति ॥
धर मार द्या न पळून । हुप् हुप् पुच्छ तुकून ॥
दिशिं दाहिं पुच्छें खूप । त्या माजिं कोशल भूप ॥

छं० :- त्यां माजिं कोसल भूप सुंदर शाम तनु शोभा महा ॥
बहु इंद्रधनुकृत रुचिर कुंपणिं जणूं तुंग तमाल हा ॥
प्रभुला बघुनि सुर हर्ष खेदें वदति जय जय जय हरि ! ॥
रघुवीर एक चि तीरिं कोपुनि निमिषिं सब माया हरी ॥ १ ॥
कपि भल्ल मायामुक्त हर्षित विटप गिरिधर दौडती ॥
शर निकर वर्षुनि राम रावण भुज शिरें महिं पाडती ॥
श्रीराम रावण रणचरित्रा अमित कल्पें वानती ॥
श्रुति शारदा शत शेष सुकविहि तदपि पार न पावती ॥ २ ॥
दो० :- तद्‌गुण वर्णी अल्पसे जडमति तुलसीदास ॥
यथा शक्ति माशी जशी आक्रमिते आकाश ॥ १०१रा ॥
कापित शिर भुज वार बहु मरत न भट लंकेश ॥
क्रीडत प्रभु, सुर सिद्ध मुनि व्याकुळ बघुनि क्लेश ॥ १०१म ॥

त्याने जेव्हा पाखंड सुरु केले सुरु केले तेव्हा वेताळ भूत पिशाच्यादि भयंकर जीव हातात धनुष्य बाण घेतलेले प्रगट झाले. ॥ १ ॥ खडग व दुसर्‍या हातात नरमुंड घेऊन योगिणी अगदी ताजे रक्त पिऊन नृत्य गान करुं लागल्या. ॥ २ ॥ धरा मारा अशा भयानक आरोळ्या मारु लागल्या व तो मोठा ध्वनी सर्वत्र पसरला मग जबडा वासून खाण्यास येताच कीश पळूं लागले. ॥ ३ ॥ मर्कट भल्ल जिथे पळून जाऊं लागतात तिथे त्यांना आग दिसूं लागली असे सर्व भल्ल कपी फार व्याकुळ झाले ( तेव्हा तो गुप्त राहीलेला रावण ) अपार वाळूचा वर्षाव करु लागला. ॥ ४ ॥ सगळ्या कपीसेनेला जागच्या जागी खिळवून ठेवून दशाननाने महागर्जना केली लक्ष्मण कपीश – सुग्रीव इ. मोठ मोठे वीर सुद्धा सगळे निष्क्रिय झाले व सर्वांचा धीर सुटला. ॥ ५ ॥ हा राम ! हा रघुनाथ ! असे म्हणत सगळे वीर हात चोळूं लागले याप्रमाणे सगळे कपी सैन्य झोडून काढले, आणि त्याने दुसरी माया प्रगट केली. ॥ ६ ॥ अगणित हनुमान प्रगट केले व ते पाषाण घेऊन येताना दिसले ते पुष्कळ टोळ्या टोळ्यांनी आले व त्यांनी रामाच्या भोवती गराडा घातला. ॥ ७ ॥ हुप, हुप, करुन पुच्छे वर उचलून ओरडूं लागले की धरा, मारा, पळून देऊ नका दाही दिशांना खूप पुच्छे पसरली असून त्यांच्यामध्ये कोसलभूप राम आहेत. ॥ ८ ॥ त्यामध्ये कोसलभूप असून त्यांचे सुंदर श्याम शरीर महाशोभायुक्त दिसत आहे. जणूं पुष्कळ इंद्रधनुष्यांच्या केलेल्या सुंदर कुंपणात हा उंच तमाल वृक्षच आहे ! प्रभूला पाहून देव हर्षविषादाने “ जय जय जय हरी ” असे म्हणू लागले. रघुवीराने कोपून ती सर्व माया एकाच तीराने एका निमिषात हरण केली. ॥ छंद १ ॥ कपिभल्ल मायेतून मुक्त होताच हर्षाने पर्वत वृक्ष घेऊन धावू लागले व रामचंद्र बाणांचे समूह वर्षून रावणाची शिरे व बाहू जमिनीवर पाडू लागले. श्रीराम व रावण यांच्या युद्धाचे चरित्र अनंत कल्पे जरी वर्णन केले तरी वेद, शेकडो शारदा, शेकडो शेष आणि सुकवी सुद्धा त्यांचा अंत पावणार नाहीत. ॥ छं.२ ॥ जशी माशी आपल्या शक्ती प्रमाणे आकाशात उडते तसे रामचरित्राचे थोडसे गुण जडबुद्धी तुलसीदासाने वर्णन केले. ॥ दो० १०१ रा ॥
रावण वध – प्रभू वारंवार शिरे व बाहू कापीत असून वीर रावण मरत नाही प्रभु क्रीडा करीत आहेत पण सुर, सिद्ध व मुनी ते क्लेश पाहून व्याकुळ झाले. ॥ दो० १०१ म ॥

छाटत वाढति दाहि शिरें ती । प्रतिलाभें जसि लोभा भरती ॥
रिपु न मरे श्रम विशेष पडती । राम बिभीषण तोंडा बघती ॥
उमे यदिच्छें काळहि मरतो । दासप्रीति परीक्षी प्रभु तो ॥
श्रुणु सर्वज्ञ चराचर नायक । प्रणतपाल सुर मुनि सुखदायक ॥
नाभिकुंडिं या पीयुष वसतें । नाथ ! रावणा जीवनबल तें ॥
श्रवत कृपालु बिभीषण वचना । हर्षिं घेति करिं कराल बाणां ॥
अशकुन नाना होऊं लागति । शिवा श्वान खर रडति तदा अति ॥
बोलति खग अति जगार्ति हेतू । प्रगटति गगनीं जिथं तिथं केतू ॥
दारुण दाह दिशांनां दाही । रवि उपराग पर्व नसतांही ॥
मंदोदरि उर सकंप भारी । प्रतिमा ढाळिति लोचनवारी ॥

छं० :- प्रतिमा रडति पविपात नभिं, अतिवात पृथ्वी डोलते ।
वर्षति बलाहक रुधिर कच रज अशुभ अति वदवें कि तें ! ॥
उत्पात अमित बघूनि नभिं सुर विकल जयजय बोलती ।
सुर सभय बघुनि कृपाल रघुपति कार्मुकीं शर सोडती ॥ १ ॥
दो० :- ताणुनि धनु आकर्ण ते सोडिति शर एक्तीस ॥
रघुनायक सायक निघति जाणों काळ फणीश ॥ १०२ ॥

प्रत्येक लाभाने जशी लोभाची वृद्धी होते तशी रावणाची शिरे छाटताच पुन्हा वाढत आहेत. ॥ १ ॥ रिपु मरत नाही व विशेष श्रम पडत आहेत तेव्हा रामचंद्रांनी बिभीषणाच्या तोंडाकडे पाहिले. ॥ २ ॥ उमे ! ज्याच्या इच्छेने काळसुद्धा मरतो ते प्रभु दासाच्या प्रीतीची परीक्षा पहात आहेत. ॥ ३ ॥ ( बिभीषण म्हणाला ) हे सर्वज्ञ चराचर नायका ! ऐका आपण प्रणत पालक व सुर मुनींना सुख देणारे आहेत. ॥ ४ ॥ याच्या नाभीकुंडात अमृत वास करते, राहते व नाथ ! तेच रावणाच्या जीवनाचे बल ( आधार ) आहे. ॥ ५ ॥ कृपालु प्रभूंनी बिभीषणाचे वचन ऐकताच हर्षाने हातात कराल बाण घेतले. ॥ ६ ॥ तेव्हा नाना प्रकारचे अपशकुन होऊं लागले तेव्हा कोल्हे व गाढवे अति रडू लागली. ॥ ७ ॥ पक्षी जगाच्या दु:खाला कारण होणारे बोलू लागले व जिकडे तिकडे अगणित धूमकेतू प्रगट झाले. ॥ ८ ॥ दाही दिशांना दारुण दाह होऊं लागला व अमावास्या पर्व नसताच सूर्याला ग्रहण लागूं लागले. ॥ ९ ॥ मंदोदरीच्या हृदयात भारी कंप सुटला देवादिकांच्या प्रतिमा – मूर्ती नेत्रांतून अश्रू ढाळूं लागल्या. ॥ १० ॥ प्रतिमा रडूं लागल्या, निरभ्र आकाशातून विजा पडूं लागल्या, जोराचा वारा सुटला, भूकंप होऊ लागला, व मेघ रक्त – केस – धूळ इत्यादिंची वृष्टी करु लागले असे अपशकुन अति होऊं लागले, ते कसे वर्णन करता येणार ? अगणित उत्पात पाहून आकाशात जमलेले देव व्याकुळ होऊन जय जय कार करु लागले देव भयभीत झाले आहेत असे पाहून कृपालु रघुपतींनी धनुष्यावर बाण लावले. ॥ छंद ॥ मग त्यांनी धनुष्य कानापर्यत ओढून एकतीस ( ३१ ) बाण सोडले. ते रघुनायकाचे सायक असे चालले की जणूं काळसर्पराजच ! ॥ दो० १०२ ॥

सायक एक नाभि सर शोषी । दुजे लागले भुजशिरिं रोषीं ॥
घेउनि शिर भुज बाण चालले । महिं शिरभुजविण रुंड नाचलें ॥
धसे धरा धड प्रचंड धावत । प्रभु शर मारुनि दुखंड कापत ॥
मरतां करी घोर रव गर्जुनि । कुठें राम रणिं मारुं पुकारुनि ॥
डोले मही पडत दशकंधर । क्षुब्ध सिंधु धुनि दिग्गज भूधर ॥
धरणि पडे दो खंड वाढवुनि । मर्कट भल्ल समूहां चिर्डुनि ॥
मंदोदरीपुढें भुज शीस । ठेउनि शर गत जिथं जगदीश ॥
जाउनि सर्व निषंगीं प्रविशति । बघुनि देव दुंदुभी वाजविति ॥
प्रभु वदनीं तत्तेज समावत । बघुनि शंभु विधि हर्षा पावत ॥
जय जय रव भरला ब्रह्मांडां । जय रघुवीर प्रबल भुजदंडा ! ॥
वर्षति सुमन देव मुनिवृंद । जय कृपाल जय जयति मुकुंद ॥

छं० :- जय कृपाकंद मुकुंद ! द्वंद्व हरण शरण सुखदा प्रभो ।
खल दल विदारण परम कारण कारुणीक सदा विभो ॥
सुर सुमन वर्षति हर्ष संकुल दुंदुभी ध्वनि धम धमा ।
संग्राम अंगणिं राम अंगिं अनंग बहु छवि अनुपमा ॥ १ ॥
शिरिं जटा मुकुटिं सुपुष्प मधिंमधिं अति मनोहर राजति ।
जणुं नीलगिरिवर तडित पटल समेत तारे भ्राजती ॥
भुजदंडि शर कोदंड फिरविति रुधिर कण रुचि तनुवरी ।
जणुं अरुण चटक तमाल विटपीं विपुल बसले सुखभरीं ॥ २ ॥
दो० :- कृपादृष्टि वर्षुनी प्रभु करिति अभय सुरवृंद ॥
भल्ल कीश गण हर्षे जय सुखधाम मुकुंद ॥ १०३ ॥

पहिल्या बाणाने नाभिसर शुष्क केले, व बाकीचे भुजा ( २० ) व शिरे ( १० ) यांना रोषाने लागले. ॥ १ ॥ शिरे आणि बाहू घेऊन बाण ( लंकेत मंदोदरीस भेट देण्यास ) चालले आणि ते शिर भुजहीन रुंड नाचू लागले. ॥ २ ॥ ते प्रचंड धड धावू लागले तेव्हा धरणी खचली तेव्हा प्रभूंनी बाण मारुन कापून त्याचे दोन तुकडे केले. ॥ ३ ॥ मरताना रावण घोर गर्जून म्हणाला की कुठे आहे राम ? मी त्याला ललकारुन युद्धात मारतो. ॥ ४ ॥ दशकंठ पडताच भूकंप झाला सागर व नद्या क्षुब्ध झाल्या आणि दिग्गज व पर्वत डळमळूं लागले. ॥ ५ ॥ तो दोन तुकडे वाढवून भूमीवर पडला व त्याने मर्कट भल्लांचे समूह चिरडून टाकले. ॥ ६ ॥ मंदोदरीच्या पुढे बाहू व शिरे ठेऊन बाण जगदीशाकडे गेले. ॥ ७ ॥ जाऊन ते सर्व बाण भात्यात शिरले हे सर्व पाहूंन देवांनी दुंदुभी वाजविल्या. ॥ ८ ॥ रावणाचे तेज प्रभुच्या मुखात सामावले हे पाहून शंभू व ब्रह्मदेव यांना हर्ष झाला. ॥ ९ ॥ जय रघुवीर ! जय प्रबल भुजदंडा ! इ. जय जय ध्वनी ब्रह्मांडात भरला. ॥ १० ॥ जय कृपाल ! जय जयति मुकुंद ! इ. म्हणत देववृंद व मुनी वृंद पुष्पवृष्टी करुं लागले. ॥ ११ ॥
देवादिक कृत स्तुती – जय असो ! हे कृपारुपी जलदायका ! हे मुकुंदा ! हे रागद्वेषादि हरण करणार्‍या व शरणागतांना सुख देणार्‍या प्रभो ! हे दुष्टांच्या दळांचे विदारण करणार्‍या ! हे परम कारणा ! हे सदा करुणा करणार्‍या विभो ! आपला जय असो असे म्हणून देव हर्षनिर्भय होऊन पुष्पांचा वर्षाव करीत आहेत. दुंदुंभीचा धमधमाट चालला आहे व संग्रामरुपी अंगणात रामचंद्राचा अंगी अनेक अनंगांची अनुपम शोभा दिसत आहे. ॥ छं १ ॥ मस्तकावर जटांचा मुकुट आहे व त्यात मधे मधे गुंफलेली सुंदर फुले अशी अति मनोहर शोभत आहेत की जणू नील गिरीवर विद्युत्पटला सहित अनेक तारे विराजत आहेत आपल्या भुजदंडांनी बाण व कोदंड फिरवीत असून सुंदर रुधिरकण तनूवर जसे शोभत आहेत की जणूं लाल चिमण्या तमाल वृक्षावर विपुल सुखात मग्न होऊन बसल्या आहेत. ॥ छंद २ ॥ कृपादृष्टी वर्षून प्रभूंनी सुरसमुदायांना भयमुक्त केले व सर्व भल्ल व कपी समुदाय हर्षित होऊन “ जय सुखधाम मुकुंद ” अशी गर्जना करुं लागले. ॥ दो० १०३ ॥

* * * * *

श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु

GO TOP