॥ श्रीरामचरितमानस ॥

(मराठी अनुवाद)

॥ लंकाकाण्ड ॥

॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥

अध्याय ५ वाDownload mp3

रिपुचा समाचार जैं पावति । सचिवां राम निकट बोलावति ॥
चार बिकट लंकेच्या द्वारां । कशिं आक्रमणें करा विचारा ॥
तैं कपीश ऋक्षेश बिभीषण । स्मरुनि हृदयिं दिनकरकुल भूषण ॥
करुनि विचारा मंत्र ठरविती । चारदळें कपिकटक बनविती ॥
यथायोग्य सेनापति केले । यूथप सब बोलावुनि नेले ॥
प्रभूप्रताप कथुनि समजावति । सिंहनाद करुनी कपि धावति ॥
हर्षित रामचरणिं शिर नमवति । वीर घेति गिरिशिखरें धावति ॥
गर्जति तर्जति भल्ल कपीश । जय रघुवीर कोसलाधीश ॥
जाणति परमदुर्ग अति लंका । प्रभूप्रतापें निघति, न शंका ॥
मेघघटां सम वेढा घालिति । ड्ंके भेरी मुखें वाजविति ॥

दो० :- जयति राम जय लक्ष्मण जय कपीश सुग्रीव ॥
गर्जति सिंहनाद कपि भल्ल महा-बलशीव ॥ ३९ ॥

निशिचर – कीश लढाई ( प्रथम युद्ध ) शत्रूचा सर्व समाचार कळल्यावर रामचंद्रांनी सर्व सचिवांना बोलावले. ॥ १ ॥ ( आणि म्हणाले की ) लंकेच्या चार बिकट द्वारांवर आक्रमण कसे करायचे ते ठरवा. ॥ २ ॥ तेव्हा कपीश सुग्रीव, ऋक्षेश जांबवान, लंकेश बिभीषण यानी सूर्यकुल भूषण रामचंद्रांचे हृदयात स्मरण केले व विचार करुन निश्चय ठरविला व कपि सैन्याचे चार विभाग केले. ॥ ३ ॥ ( प्रत्येक विभागावर ) यथायोग्य सेनापती नेमले व सर्व युथपतींना बोलावून घेतले. ॥ ४-५ ॥ त्या सर्व युथपतींना प्रभूचा प्रताप सांगून त्यांची समजूत करुन दिली व ते सर्व युथपती कपी सिंहनाद करीत धावत निघाले. ॥ ६ ॥ हर्षित होऊन रामचरणांस मस्तक नमवून ते सर्व वीर गिरीशिखरे घेऊन धावत निघाले. ॥ ७ ॥ भल्ल व कपी यूथपती ‘ जय रघुवीर ’ ‘ जय कोसलाधीश ’ अशा गर्जना करीत धाकदपटशा दाखवूं लागले. ॥ ८ ॥ लंका अति परम दुर्ग आहे हे जाणून सुद्धा ते सर्व गेले कारण की प्रभूच्या प्रतापामुळे त्यांना मुळीच भय वाटत नाही. ॥ ९ ॥ मेघांच्या समुदाया प्रमाणे चारी दिशांनी त्यांनी लंकेस वेढा घातला व मुखानेच डंके भेरी वाजवूं लागले. ॥ १० ॥ कपि, भल्ल रामलक्ष्मण व सुग्रीव यांच्या जयजयकाराच्या गर्जना ते सर्व महाबळाची सीमा असलेले कपी व भल्ल करुन सिंहनाद करु लागले. ॥ दो० ३९ ॥

कोलाहल लंकेमधिं भारी । दशमुख कानिं महाहंकारी ॥
वानर धीटपणास पहा तर । विहसुनि आणवि सैन्य निशाचर ॥
आले काळें प्रेरित वानर । माझे सगळे क्षुधित निशाचर ॥
असे म्हणुनि शठ अट्टहास करि । विधि आहार देई बसल्या घरिं ॥
सुभट सकल चारी दिशिं जावें । भल्ल कीश धरधरुनी खावे ॥
उमे ! असा रावण अभिमानी । जशि टिटवी निजते किं उताणी ॥
निघति निशाचर आज्ञा मागुनि । भिंडिपाल भाले करिं घेउनि ॥
तोमर मुद्‌गर परशू चंड हि । शूल कृपाण परिघ गिरिखंड हि ॥
शठ अरुणोपल निकरां पाहति । मांसाहारि जसे खग धावति ॥
चंचुभंग दुःखा नहिं जाणति । तसे मूर्ख नरभक्षक धावति ॥

दो० :- नानायुध शरचापधर यातुधान बलवीर ॥
चढले तट बुरुजांवरी कोटि कोटि रणधीर ॥ ४० ॥

लंकेत भारी कोलाहल सुरु झाला तो महाहंकारी दशमुखाच्या कानी गेला. ॥ १ ॥ तेव्हा तो मोठ्याने हसून म्हणाला की वानरांचा धीटपणा पहा तर खरं ! मग त्याने निशाचरांचे सैन्य बोलावले. ॥ २ ॥ काळाने पाठविलेले वानर आले आहेत, व माझे सर्व निशाचर भुकेले आहेत. ॥ ३ ॥ असे म्हणून शठाने अट्टहास केला व म्हणाला की देवाने घर बसल्या आहार दिला आहे. ॥ ४ ॥ हे सुभटांनो चारी दिशांस जा आणि अस्वलांना, वानरांना धरधरुन खा. ॥ ५ ॥ उमे ! जशी टिटवी अभिमानाने उताणी निजते तसा रावण अभिमानी आहे. ॥ ६ ॥ आज्ञा मागून निशाचर निघाले त्यांनी भिंडीपाल, भाले, तोमर, मुदगर, प्रचंड परशु, शुळ, पट्टे, परिघ व गिरिखंडे हातात घेतली आहेत. ॥ ७-८ ॥ मांसाहारी पक्षी लाल पाषाणांचे समुदाय पाहून जसे धावतात, पण आपल्या चोची फुटून दु:ख होईल हे जसे त्यांना कळत नाही तसे ते शठ मूर्ख नरभक्षक राक्षस धावले. ॥ ९-१० ॥ नाना प्रकारची आयुधे, व धनुष्य बाण धारण करणारे कोट्यावधी बलवान व रणझुंझार राक्षसवीर तटाच्या बुरुजांवर चढले ॥ दो० ४० ॥

दुर्ग तटांवर शोभति तैसे । मेरु शृंगिं घन बसले जैसे ॥
डंके रणवाद्यें धडधडलीं श्रवुनि भटां वीरश्री चढली ॥
वाजति भेरि तुतारि अफाट । कातर उरिं तैं जाती फाट ॥
जातां बघति कपींच्या घट्टां । अति विशाल तनु भल्ल सुभट्टां ॥
धावति गणति न अवघड घाटां । फोडुनि गिरि करिं पाडिति वाटा ॥
कटकटती कोटी भट गर्जति । दशनिं ओठ खाती अति तर्जति ॥
रावण राम घोष युगठाईं । जयति जयति जय सुरू लढाई ॥
निशिचर शिखर समूहां टाकिति । उडुनि धरिति कपि तेच झुगारिति ॥

छ० :- गिरिखंड धरुनी चंड मर्कट भल्ल दुर्गीं टाकिती ॥
पद धरुनि फिरवुनि धरणिं अपटति पळति तैं पाचारिती ॥
अति तरल तेजस्वी प्रतापी उडुनि दुर्गीं प्रविशले ॥
कपि भल्ल मंदिरिं चढुनि चौदिशिं रामयश गाती भले ॥ १ ॥
दो० :- एकैका धरुनी कपि घेउनि जाति पळून ॥
आपण वर भट खालति पडति धरणिं येऊन ॥ ४१ ॥

मेरु पर्वत-शिखरावरचे मेघ दिसावेत तसे ते निशाचर दुर्ग तटांवर शोभू लागले. ॥ १ ॥ डंके वगैरे रणवाद्ये धड धडां वाजूं लागली तेव्हा त्या ध्वनीने योद्धांच्या अंगी वीरश्री चढली. ॥ २ ॥ भेरी – तुतार्‍या, शिंगे इ. अफाट वाजूं लागली व त्यामुळे भ्याडांच्या मनांत उरांत धडकी भरली. ॥ ३ ॥ तटावर जाऊन बघतात तो अति विशाल देही कपिंच्या घट्टा ( समूह ) व अति विशाल देही रीसांचे योद्धे त्यांच्या दृष्टीस पडले. ॥ ४ ॥ वानर भल्ल वीर वाटेतील घाट वा अवघड वाटा यांना न जुमानता पर्वत हातांनी फोडून वाटा करीत असे येत आहेत. ॥ ६ ॥ एकीकडे रावणाचा जयघोष, तर एकीकडे रामाचा जयघोष अशी जय जयकाराने लढाई सुरु झाली. ॥ ७ ॥ निशाचर शिखर – समूह वरुन ढकलूं लागले, तर कपी वर उडीमारुन तीच शिखरे हातात झेलून त्यांचेवर फेकूं लागले. ॥ ८ ॥ छंद – प्रचंड वानर, भल्ल ते पर्वतांचे खंड पकडून किल्यांत फेकीत आहेत. निशाचरांचे पाय पकडून त्यांना गरगरा फिरवून जमिनीवर आपटत आहेत व ते पळूं लागताच त्यांना आव्हान देऊं लागले. अति चपल तेजस्वी व प्रतापी कपी उड्डण करुन दुर्गात शिरले चहूंकडे कपी मंदिरांवर ( राक्षसांच्या घरांवर ) चढून रामचंद्रांचे उत्तम यशगान करुं लागले. ॥ छंद ॥ मग एकेक कपी व एकेक भल्ल राक्षसास उचलून घेऊन पळून येऊन आपण वर व त्यास खाली पाडू लागले. ॥ दो० ४१ ॥

राम प्रताप प्रबल कपि यूथ । मर्दिति निशिचर सुभट वरूथ ॥
दुर्गि चहुंकडे चढले वानर । जय रघुवीर प्रताप दिवाकर ॥
निशिचर निकर चहूं दिशिं पळती । जसे प्रभंजनिं मेघ वितळती ॥
हाहाकार होइ पुरिं भारी । रडती आतुर बालक नारी ॥
देति जमुनि बहु शिव्या रावणा । राज्य करत पाचारि किं मरणा ॥
निजदल विचलित जैं ये कळुनी । फिरवि सुभट लंकेश खवळुनी ॥
जो रण विमुख कळे मम कानां । त्या मी वधिन कराल कृपाणां ॥
भक्षित सकल भुक्त भोगानां । रणांगणीं प्रिय मानां प्राणां ॥
श्रवुनि उग्र वच सब चळचळले । सुभट लाजले सकोप वळले ॥
सम्मुख मरण हि वीरा शोभा । ते त्यजिती प्राणांच्या लोभा ॥

दो० :- बहु आयुध धर सुभट सब लढती ललकारून ॥
व्याकुळ केले भल्ल कपि त्रिशुल परिघ मारून ॥ ४२ ॥

श्रीराम प्रतापाच्या योगाने कपियूथ प्रबल आहेत ते निशाचरांच्या महावीर समूहांचे मर्दन करीत आहेत. ॥ १ ॥ दुर्गावर पुन्हा चारी बाजूंनी वानर चढले व ‘ जय रघुवीर प्रताप दिवाकर ’ अशा गर्जना करुं लागले. ॥ २ ॥ निशाचरांच्या टोळ्या चारी दिशांना पळूं लागल्या सोसाट्याच्या वार्‍याने मेघांना पळवून लावावे तसे ते सारे पळाले ॥ ३ ॥ लंकेत भारी हाहाकार उडाला रोगी, बालके व स्त्रिया रडत आहेत व पुष्कळ लोक एकत्र जमून रावणास शिव्या देत आहेत व म्हणताहेत की चागलं राज्य करीत असतां याने मरणाला आमंत्रण दिलं. ॥ ४-५ ॥ आपले सैन्य विचलित झाले असे रावणाला कळताच लंकेश फार खवळला व त्याने सुभटांना पळविले. ॥ ६ ॥ जो कोणी रणविमुख झाल्याचे माझ्या कानी येईल त्याचा मी तीक्ष्ण तरवारीने वध करीन. ॥ ७ ॥ माझे खाउन व सर्व भोग भोगून आता रणांगणांत प्राणांना प्रिय मानतां. ॥ ८ ॥ अशी रावणाची उग्र भाषा ऐकून सगळे चळा चळां कापूं लागले व ते सगळे सुभट लज्जित होऊन क्रोधाने परत फिरले. ॥ ९ ॥ युद्धात शत्रूसमोर मरणे हीच वीराची शोभा आहे ( अशा विचाराने ) त्यांनी प्राणांचा लोभ सोडला. ॥ १० ॥ पुष्कळ आयुधे धारण करणारे ते सर्व वीर आव्हान देत लढूं लागले व त्यांनी त्रिशूल परिघ इ. चा मारा करुन कपी, भल्लांना व्याकुळ केले. ॥ दो० ४२ ॥

पळू लागले भयातुर कपी । पुढें जिकितिल उमे ! यद्यपी ॥
कुठें म्हणे कुणि अंगद हनुमान् । कोठें द्विविद नील नल बलवान् ॥
निज दळ विकळ कळे हनुमाना । पश्चिमदारिं तदा बलवाना ॥
तिथें लढे घननाद ससेना । द्वार अभेद्य दिसे भंगे ना ॥
क्रोध पवनसुत मनिं अति आला । प्रबल वीर गर्जे सम काळा ॥
उडुनी लंका दुर्गीं पावे । घननादावर गिरिधर धावे ॥
रथ भंगुनि सूता निपाती । लाथ मारि घननादा छातीं ॥
सूत दुजा त्या व्याकुळ जाणुनि । त्वरें नेइ सदनीं रथिं घालुनि ॥

दो० :- अंगद ऐके पवनसुत गत एकल दुर्गांत ॥
रण झुंझार वालिसुत चढे उडुनि खेळांत ॥ ४३ ॥

उमे ! जरी कपी पुढे जिंकणार असले तरी यावेळी ते व्याकुळ होऊन भयाने पळत सुटले. ॥ १ ॥ कोणी म्हणाले की बलवान अंगद हनुमान नल नील व द्विविद कोठे आहेत ? ॥ २ ॥ तेव्हा पश्चिम द्वारी असलेल्या बलवान हनुमंतास कळले की आपले सैन्य व्याकुळ झाले आहे. ॥ ३ ॥ तिथे मेघनाद आपल्या सैन्यासह लढत होता, त्यामुळे ते द्वार भंग पावेना, अभेद्य वाटूं लागले. ॥ ४ ॥ तेव्हा पवन सुताच्या मनात अतिक्रोध आला व तो प्रबल वीर काळासारखा गर्जू लागला. ॥ ५ ॥ पवनसुत उडी मारुन लंकादुर्गात आला व पर्वत घेऊन मेघनादावर धावला. ॥ ६ ॥ रथाचा चुराडा करुन सारथ्याच्या नि:पात केला आणि मेघनादाच्या छातीत लाथ मारली. ॥ ७ ॥ दुसर्‍या सूताने तो व्याकुळ होऊन मूर्च्छित झाला आहे हे जाणून त्वरेने दुसर्‍या रथात घातला व घरी नेला. ॥ ८ ॥ पवनसुत एकटाच दुर्गात गेला आहे असे अंगदाच्या कानी आले. तेव्हा तो रणझुंझार वालीसुत खेळातच जणूं टुणकन उडी मारुन दुर्गावर चढला. ॥ दो० ४३ ॥

क्रुद्ध विरुद्ध युद्धिं दो वांदर । स्मरुनी राम प्रताप सादर ॥
धाउनि चढले रावण भवनां । करिति कोसलाधीश घोषणा ॥
धरुनि ढकलले कलशसह घरा । बघुनि होई लंकेश घाबरा ॥
करीं नारिगण बडविति छाती । प्राप्त अतां दो कपि उत्पाती ॥
कपि चेष्टानीं त्यांस दटाविति । रामचंद्र सुयशास ऐकविति ॥
घेउनि करिं कनकाचे स्तंभां । वदले करुं उत्पातारंभा ॥
गर्जुनि रिपुकटकामधिं पडले । मर्दुं लागले भारि भुजबळें ॥
लाथा कोणा कोणा थप्पड । राम भजाना घ्या फळ फक्कड ॥

दो० :- एक दुजावर मर्दिती तोडुनि फेकति मुंड ॥
पडति रावणा पुढतिं तीं फुटती जणुं दधिकुंड ॥ ४४ ॥

दोघे वानर वैरभावाने युद्धांत क्रुद्ध झाले व रामप्रतापाचे सादर स्मरण करुन ॥ १ ॥ दोघे धावत जाऊन रावणाच्या घरावर चढले आणि कोसलाधीशाची घोषणा करुं लागले. ॥ २ ॥ व त्यांनी कळसासहित ते भवन ढकलून दिले ते पाहून रावण घाबरा झाला ॥ ३ ॥ त्यांच्या स्त्रियांचा समुदाय हातांनी छाती बडवून घेऊन ‘ आता दोन उत्पाती कपी आले ’ असे म्हणूं लागल्या. ॥ ४ ॥ ते दोघे कपिचेष्टांनी त्यांना दटावूं लागले व रामचंद्रांचे सुयश त्यांच्या कानावर घातले. ॥ ५ ॥ मग सोन्याचे खांब हातात घेऊन म्हणाले की आता उत्पात करण्यास आरंभ करु या. ॥ ६ ॥ गर्जना करुन शत्रूसैन्याच्या मध्यभागी उड्या घेतल्या व भारी बाहुबळाने शत्रुंचे भारी मर्दन करु लागले. ॥ ७ ॥ कोणास लाथा मारुन तर कोणास थप्पड मारुन म्हणूं लागले की रामचंद्रास भजत नाही त्याचे घ्या चांगले फळ भोगा. ॥ ६ ॥ एकाला दुसर्‍यावर चिरडून टाकू लागले, मुंडकी तोडून ती फेकू लागले, ती रावणाच्या पुढे पडून जणूं दह्याची मडकीच फुटूं लागली. ॥ दो० ४४ ॥

महा महा जे प्रमुख सापडति । धरुनि पदां प्रभुपाशिं झुगारति ॥
वदे बिभीषण त्यांच्या नामां । त्यांसहि राम देति निज धामा ॥
खल नराद विप्रामिष भोगी । पावति गति जी याचति योगी ॥
उमे ! राम मृदु मन करुणाकर । मज रिपुभावें स्मरति निशाचर ॥
असें समजुनी देति परम गति । कोण कृपाल असा वद पार्वति ॥
श्रवुनि असे प्रभु, त्यजुनी भ्रम नर । भजति न जडमति अभागि पामर ॥
अंगद हनुमान् दुर्गीं शिरले । असें अयोध्याधीश बोलले ॥
लंकें कपियुग शोभति कैसे । मथिति सिंधु मंदर युग जैसे ॥

दो० :- मर्दुनि रिपुदळ भुजबळें बघुनि दिनाचा अंत ॥
उभयहि आले विनाश्रम उडुनि जिथें भगवंत ॥ ४५ ॥

जे मोठे मोठे प्रमुख सापडतात त्यांचा पाय पकडून त्यांना प्रभूच्या पायी झुगारुं लागले. ॥ १ ॥ बिभीषण त्यांची नावे सांगू लागला व राम त्यांना आपले धाम देऊ लागले. ॥ २ ॥ हे निशाचर, दुर्जन, माणसांना खाणारे, विप्रमांस भक्षण करणारे, सदा विषयभोगरत, जी गति योगी मागत असतात ( पण त्यांना मिळत नाही ) ती गति त्यांना मिळाली ॥ ३ ॥ ( कारण ) हे उमे ! राम कोमल मनाचे असून करुणासागर आहेत, हे वैरभावाने माझे स्मरण करतात असे जाणून त्यांना राम परमगति देतात. हे पार्वती ! असा कृपालु दुसरा कोण आहे सांग बरं ! ॥ ४-५ ॥ प्रभू असे आहेत हे ऐकून सुद्धा जे लोक भ्रम सोडून त्यांस भजत नाहीत ते जडबुद्धी अभागी पामर होत. ॥ ६ ॥ अंगद, हनुमान दुर्गात शिरले आहेत असे राम म्हणाले, ॥ ७ ॥ ते दोघे कपि लंकेत कसे शोभत आहेत तर दोन मंदर पर्वत सागर-मंथन करीत असतां जसे शोभतील तसे. ॥ ८ ॥ आपल्या बाहुबळाने शत्रुसैन्याचे मर्दन करुन, दिवस मावळताना पाहून, दोघेही श्रम न पडता, जेथे भगवान आहेत, तेथे उड्डाण करुन आले. ॥ दो० ४५ ॥

प्रभुपदकमलिं शीस तिहिं नमलें । बघुनि सुभट रघुपतिमनिं भरले ॥
रामकृपायुत बघती उभयां । परम सुखी ते श्रम गत विलया ॥
गेले अंगद हनुमान् कळलें । विविध भल्ल मर्कट सब वळले ॥
जैं प्रदोष बल कौणप पाहतां । भिडले भट करुनी कटकटां ॥
प्रबल युगल दल अति ललकारति । लढती सुभट, न जरा हि कचरति ॥
महावीर निशिचर काळीं मुख । नानावर्ण विशाल वलीमुख ॥
सबल युगल दल समबल योद्धे । कौतुक करिति लढति सुक्रोधें ॥
प्रावृट् शरद पयोद न गणती । जणूं मारुतें प्रेरित लढती ॥
अनिप अकंपन सह अतिकाया । विचलत सैन्य निर्मिती माया ॥
होइ निमिषिं अतिशय अंधार । रुधिर उपल बहुवृष्टी क्षार ॥

दो० :- बघुनिं निबिड तम दशदिशीं कपिदळिं खळबळ फार ॥
कुणी कुणा बघुं शकती ना चहुं दिशिं करिति पुकार ॥ ४६ ॥

त्या दोघांनी प्रभूच्या चरणकमलावर मस्तक नमविले, त्या सुभटांना पाहीले, तेव्हा ते रघुपतीच्या मनात भरले. ॥ १ ॥ रामचंद्रांनी कृपायुक्त दृष्टीने दोघांकडे पाहताच त्यांचे सर्व श्रम लयास गेले व ते परम सुखी झाले. ॥ २ ॥ अंगद हनुमान परत गेले असे कळताच अनेक जातींचे भल्ल मर्कट योद्धे परत वळले. ॥ ३ ॥ प्रदोष काळाचे बळ मिळताच राक्षस दशमुखाचा जय जयकार करीत युद्धास धावले. ॥ ४ ॥ शत्रूचे सैन्य येत असलेले पाहून कपि परत फिरले आणि कटकटा आवाज करुन वीर लढूं लागले. ॥ ५ ॥ दोन्ही सेना प्रबळ आहेत, व एकमेकांस अति ललकार्‍या देत योद्धे लढूं लागले, कोणीच हार खात नाहीत. ॥ ६ ॥ सगळे निशाचर महावीर काळ्या तोंडाचे आहेत, आणि मर्कट विशाल असून नाना वर्णाचे आहेत. ॥ ७ ॥ दोन्ही दळे समान बळाची आहेत आणि ते बलवान योद्धे अतिक्रोधाने लढत असून कौतुक करीत आहेत. ॥ ८ ॥ जणूं काय अगणित पावसाळी ढग आणि अगणित शरदांतील ढगच जोराच्या वार्‍याच्या प्रेरणेने एकमेकांशी लढत आहेत. ॥ ९ ॥ आपले सैन्य पळ काढूं पहात आहे असे पाहून अनिप व अकंपन यानी अतिकायासह माया निर्माण केली. ॥ १० ॥ निमिषांत सर्वत्र अंधार पसरला व रक्त पाषाण व राख यांची पुष्कळ वृष्टी होऊं लागली. ॥ ११ ॥ दाही दिशांना निबिड अंधार पाहून कपिसैन्यात फार खळबळ उडाली कोणी कोणास दिसेनासे झाले व सर्वत्र कपि हाकाच मारुं लागले. ॥ दो० ४६ ॥

सकल मर्म रघुनायक जाणति । अंगद हनुमान् यां बोलावति ॥
वृत्त सकल तें कानिं घातले । कपि कुंजर तैं क्रुद्ध धावले ॥
हसुनि कृपानिधि चाप जोडिती । पावक सायक सपदिं सोडती ॥
पडे प्रकाश कुठें तम नाहीं । ज्ञानोदयिं कीं संशय राही ? ॥
भल्ल वलीमुख प्रकाश पावुनि । धावति हर्षें श्रम भय जाउनि ॥
हनूमान अंगद रणिं गाजति । श्रवत हाक निशिचर पळ काढति ॥
धरुनि पळपुट्या अपटिति धरणीं । करिति भल्ल कपि अद्‌भुत करणी ॥
तंगड्या धरुनि समुद्रिं झुगारिति । मकर उरग झष भरभर भक्षिति ॥

दो० :- किति हत कितिं घायाळ किति चढले दुर्गि पळून ॥
भल्ल वलीमुख गर्जती रिपुदळ बळ उधळून ॥ ४७ ॥

रघुनायकाने सर्व मर्म जाणले व अंगद आणि हनुमान यांना बोलावले ॥ १ ॥ व ते सगळे वृत्त त्यांच्या कानावर घातले. ॥ २ ॥ त्या बरोबर कपी श्रेष्ठ रोषाने धावत निघाले. ॥ २ ॥ मग कृपानिधीनी हसून धनुष्य सज्ज केले व तत्काळ एक अग्निबाण सोडला. ॥ ३ ॥ त्या बरोबर सर्वत्र प्रकाश पडला, अंधार कुठेच राहीला नाही, असे ज्ञानोदय झाल्यावर संशय राहील काय ? ॥ ४ ॥ भल्ल कपींना प्रकाश मिळताच ते हर्षित होऊन ( शत्रुंवर ) धावले, त्यांचे श्रम व भय नष्ट झाले. ॥ ५ ॥ हनुमान आणि अंगद रणांत गर्जना करु लागले, त्याची हाक ऐकताच रणातून निशाचर पळत सुटले. ॥ ६ ॥ त्या पळपुट्यांना धरुन धरणीवर आपटून भल्ल व कपी अदभुत करणी करु लागले. ॥ ७ ॥ त्यांच्या तंगड्या धरुन त्यांना भराभर समुद्रात फेकूं लागले व त्यांना मगरी, सर्प, मासे पकडून भराभर खाऊं लागले. ॥ ८ ॥ कित्येक राक्षस मारले गेले, कित्येक घायाळ होऊन पडले व कित्येक पळून जाऊन दुर्गावर चढले याप्रमाणे शत्रूसैन्याला व बळाला उधळून लावून भल्ल कपी गर्जना करुं लागले. ॥ दो० ४७ ॥

निशा बघुनि कपि चारी अनी । आले जिथें कोसला धनी ॥
राम कृपेनें निरखिति सकलां । तदा वानरांचा श्रम हरला ॥
तिथें दशमुखें सचिव जमविले । कथित सुभट जे गेले वधिले ॥
अर्ध कटक कपिनीं संहरलें । काय करावें सांगा सगळे ॥
माल्यवंत अति जरठ निशाचर । रावण मातामह मंत्री वर ॥
वदला वचन नीति अति पावन । ऐका तात कांहिं मम शिकवण ॥
जैंहुनि हरुनि आणली सीते । अशकुन वदवति ना होती ते ॥
यश ज्याचें श्रुति पुराण गाती । रामविमुख कुणि सुख न पावती ॥

दो० :- हिरण्याक्ष भावासहित मधु कैटभ बलवान ॥
ज्यानें हत अवतीर्ण तो कृपासिंधु भगवान ॥ ४८रा ॥

रात्र झाली असे पाहून कपी सैन्याचे चारी विभाग जिथे राम होते तेथे आले. ॥ १ ॥ रामचंद्रांनी सर्वांना निरखून प्रेमाने पाहीले तेव्हा वानरांच्या श्रमांचा परिहार झाला. ॥ २ ॥
वानर निशाचर द्वितीय युद्ध – तिकडे लंकेत रावणाने सर्व निशाचरांना जमविले आणि जे जे महावीर युद्धांत मारले गेले त्यांची नावे सांगीतली. ॥ ३ ॥ आणि म्हणाला की अर्धे सैन्य वानरांनी ठार केले आहे, तरी आता काय करावे हे सगळेजण सांगा. ॥ ४ ॥ माल्यवान नांवाचा एक अगदी वृद्ध निशाचर, रावणाचा आजोबा ( आईचे वडील ) उत्तम मंत्री होता. ॥ ५ ॥ तो अति पावन नीती सांगू लागला – हे तात ! मी काही शिकवण देत आहे ती ऐका. ॥ ६ ॥ जेव्हा तुम्ही सीतेला हरुन आणलीत तेव्हापासून जे अपशकुन होत आहेत ते सांगवत नाहीत. ॥ ७ ॥ ज्याचे यश वेद पुराणे गातात त्या रामाशी विरोध करणारा कोणी सुख पावूं शकत नाही. ॥ ८ ॥ भावासहित हिरण्याक्ष व मधु-कैटभ ज्याने मारले तोच कृपासिंधु भगवान अवतरला आहे. ॥ दो० ४८ रा ॥

* * * * *

श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु

GO TOP