श्रीमद् वाल्मीकि रामायणे
किष्किंधाकाण्डे
॥ चत्वारिंशः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
श्रीरामस्याज्ञया सुग्रीवेण सीतान्वेषणाय पूर्वदिशायां वानराणां प्रेषणं, तत्रत्यानां स्थानानां वर्णनं च - श्रीरामांच्या आज्ञेने सुग्रीवांनी सीतेच्या शोध करण्यासाठी पूर्व दिशेला वानरांना धाडणे आणि तेथील स्थानांचे वर्णन करणे -
अथ राजा समृद्धार्थः सुग्रीवः प्लवगेश्वरः ।
उवाच नरशार्दूलं रामं परबलार्दनम् ॥ १ ॥
त्यानंतर बल-वैभवाने संपन्न वानरराजा सुग्रीव शत्रूंच्या सेनेचा संहार करणार्‍या पुरुषसिंह श्रीरामांना म्हणाले- ॥१॥
आगता विनिविष्टाश्च बलिनः कामरूपिणः ।
वानरेंद्रा महेंद्राभा ये मद्विषयवासिनः ॥ २ ॥
’भगवन् ! जे माझ्या राज्यात निवास करतात ते महेंद्राप्रमाणे तेजस्वी इच्छानुसार रूप धारण करणारे आणि बलवान् वानर-यूथपति येथे येऊन तळ ठोकून बसलेले आहेत. ॥२॥
त इमे बहुविक्रांतैः बलिभिर्भीमविक्रमैः ।
आगता वानरा घोरा दैत्यदानवसंनिभाः ॥ ३ ॥
’हे आपल्या बरोबर अशा बलवान् योध्यांना घेऊन आले आहेत की जे बर्‍याचशा युद्धस्थळावर आपला पराक्रम प्रकट करून चुकले आहेत. आणि भयंकर पुरुषार्थ करून दाखविणारे आहेत. येथे असे वानर उपस्थित झाले आहेत की जे दैत्य आणि दानवाप्रमाणे भयानक आहेत. ॥३॥
ख्यातकर्मापदानाश्च बलवंतो जितक्लमाः ।
पराक्रमेषु विख्याता व्यवसायेषु चोत्तमाः ॥ ४ ॥
अनेक युद्धात या वानर-वीरांच्या शूर-वीरतेचा परिचय मिळून चुकला आहे. हे बळाचे भाण्डार आहेत. युद्धात ते थकत नाहीत. त्यांनी थकव्यावर मात केलेली आहे. त्यास जिंकले आहे. हे आपल्या पराक्रमासाठी प्रसिद्ध, आणि उद्योग करण्यात श्रेष्ठ आहेत. ॥४॥
पृथिव्यंबुचरा राम नानानगनिवासिनः ।
कोट्योघाश्च इमे प्राप्ता वानरास्तव किङ्‌कrराः ॥ ५ ॥
’श्रीरामा ! येथे आलेले हे वानरांचे करोडो यूथ विभिन्न पर्वतांवर निवास करणारे आहेत. जल आणि स्थळ - दोन्ही ठिकाणी समान रूपाने चालण्याची शक्ति ते बाळगून आहेत. ते सर्वच्या सर्व आपले किंकर (आज्ञापालक) आहेत. ॥५॥
निदेशवर्तिनः सर्वं सर्वे गुरुहिते स्थिताःताः ।
अभिप्रेतमनुष्ठातुं तव शक्ष्यंत्यरिंदम ॥ ६ ॥
’शत्रुदमन ! ते सर्व आपल्या आज्ञेच्या अनुसार चालणारे आहेत. आपण यांचे गुरू-स्वामी आहात. हे आपल्या हितसाधनात तत्पर राहून आपल्या अभीष्ट मनोरथांना सिद्ध करू शकतील.’ ॥६॥
त इमे बहुसाहस्रैः अनीकैर्भीमविक्रमैः ।
आगता वानरा घोरा दैत्यदानवसंनिभाः ॥ ७ ॥
’दैत्य आणि दानवांसमान घोर रूपधारी हे सर्व वानर-यूथपति आपल्या बरोबर भयंकर पराक्रम करणार्‍या कित्येक हजार सेना घेऊन आलेले आहेत. ॥७॥
यन्मन्यसे नरव्याघ्र प्राप्तकालं तदुच्यताम् ।
त्वत्सैन्यं त्वद्वशे युक्तं आज्ञापयितुमर्हसि ॥ ८ ॥
’पुरुषसिंह ! आता या समयी आपण जे कर्तव्य उचित समजत आहात ते सांगावे. आपली ही सेना आपल्याला वश आहे. आपण हिला यथोचित कार्य करण्यासाठी आज्ञा द्यावी.’ ॥८॥
काममेषामिदं कार्यं विदितं मम तत्त्वतः ।
तथापि तु यथायुक्तं आज्ञापयितुमर्हसि ॥ ९ ॥
सीतामाईचा शोध घ्यायचा आहे हे प्रथम कार्य आहे याची मला तसेच या सेनेला पूर्ण जाणीव आहे, तरीपण हे कशाप्रकारे सिद्ध करावे त्याची आम्हाला आपण आज्ञा करावी. ॥ ९ ॥
इति ब्रुवाणं सुग्रीवं रामो दशरथात्मजः ।
बाहुभ्यां संपरिष्वज्य इदं वचनमब्रवीत् ॥ १० ॥
जेव्हा सुग्रीवांनी अशी गोष्ट सांगितली तेव्हा दशरथनंदन रामांनी दोन्ही भुजांनी पकडून त्यांना आपल्या हृदयाशी धरले आणि याप्रकारे म्हटले- ॥१०॥
ज्ञायतां सौम्य वैदेही यदि जीवति वा न वा ।
स च देशो महाप्राज्ञ यस्मिन् वसति रावणः ॥ ११ ॥
’सौम्या ! महाप्राज्ञा ! प्रथम हा तर शोध लाव की वैदेही सीता जिवंत आहे की नाही. तसेच रावण जेथे निवास करतो तो देश कोठे आहे ? ॥११॥
अभिगम्य तु वैदेहीं निलयं रावणस्य च ।
प्राप्तकालं विधास्यामि तस्मिन् काले सह त्वया ॥ १२ ॥
’जेव्हा सीता जिवंत असल्याची आणि रावणाच्या निवास स्थानाची निश्चित माहिती मिळेल तेव्हा जे समयोचित कर्तव्य असेल त्याचा मी तुझ्या बरोबर भेटून निश्चय करीन. ॥१२॥
नाहमस्मिन् प्रभुः कार्ये वानरेंद्र न लक्ष्मणः ।
त्वमस्य हेतुः कार्यस्य प्रभुश्च प्लवगेश्वर ॥ १३ ॥
’वानरराज ! हे कार्य सिद्धीस नेण्यास मी ही समर्थ नाही अथवा लक्ष्मण ही समर्थ नाही. कपीश्वर ! या कार्याची सिद्धि तुमच्याच हातात आहे. तुम्हीच हे पूर्ण करण्यास समर्थ आहात. ॥१३॥
त्वमेवाज्ञापय विभो मम कार्यविनिश्चयम् ।
त्वं हि जानासि मे कार्यं मम वीर न संशयः ॥ १४ ॥
’प्रभो ! माझ्या कार्याचा उत्तम प्रकारे निश्चय करून तुम्हीच वानरांना उचित आज्ञा द्या. वीरा ! माझे कार्य काय आहे, हे तुम्ही चांगल्या प्रकारे जाणता आहात यात संशय नाही. ॥१४॥
सुहृद् द्वितीयो विक्रांतः प्राज्ञः कालविशेषवित् ।
भवान् अस्मद्धिते युक्तः सुहृदाप्तोऽर्थवित्तमः ॥ १५ ॥
’लक्ष्मणा नंतर तुम्हीच माझे दुसरे सुहृद आहात. तुम्ही पराक्रमी, बुद्धिमान्, समयोचित कर्तव्याचे ज्ञाता, हितात संलग्न राहाणारे, हितैषी बंधु, विश्वासपात्र, तसेच माझ्या प्रयोजनाला तुम्ही उत्तम प्रकारे जाणणारे आहात.’ ॥१५॥
एवमुक्तस्तु सुग्रीवो विनतं नाम यूथपम् ।
अब्रवीद् राद्रामसांनिध्ये लक्ष्मणस्य च धीमतः ॥ १६ ॥

शैलाभं मेघनिर्घोषं ऊर्जितं प्लवगेश्वरः ।
सोमसूर्यनिभैः सार्धं वानरैर्वानरोत्तम ॥ १७ ॥

देशकालनयैर्युक्तो कार्याकार्यविनिश्चये ।
वृतः शतसहस्रेण वानराणां तरस्विनाम् ॥ १८ ॥

अधिगच्छ दिशं पूर्वां सशैलवनकाननाम् ।
तत्र सीतां च वैदेहीं निलयं रावणस्य च ॥ १९ ॥

मार्गध्वं गिरिदुर्गेषु वनेषु च नदीषु च ।
श्रीरामांनी असे म्हटल्यावर सुग्रीवांनी त्यांच्या आणि बुद्धिमान् लक्ष्मणांच्या समीपच निनत नामक यूथपतिंना जे पर्वतासमान विशालकाय, मेघासमान गंभीर गर्जना करणारे, बलवान् तसेच वानरांचे शासक होते आणि चंद्रमा आणि सूर्याप्रमाणे कांति असणार्‍या वानरांसह उपस्थित झाले होते त्यांना म्हटले- ’वानरश्रेष्ठा ! तुम्ही देश आणि काळास अनुसरून नीतिचा प्रयोग करणारे तसेच कार्याचा निश्चय करण्यात चतुर आहात. तुम्ही एक लाख वानरांसह पर्वत, वन आणि काननांसहित पूर्व दिशेकडे जा आणि तेथील पहाडांच्या दुर्गम प्रदेशात, वनात आणि सरितांमध्ये वैदेही सीता आणि रावणाच्या निवास स्थानाचा शोध घ्या. ॥१६-१९ १/२॥
नदीं भागीरथीं रम्यां सरयूं कौशिकीं तथा ॥ २० ॥

कालिंदीं यमुनां रम्यां यामुनं च महागिरिम् ।
सरस्वतीं च सिंधुं च शोणं मणिनिभोदकम् ॥ २१ ॥

महीं कालमहीं चापि शैलकाननशोभिताम् ।
’भागीरथी गंगा, रमणीय शरयू, कौशिकी, सुरम्य कलिंदनंदनी यमुना, महापर्वत यामुन, सरस्वती नदी, सिंधु मण्यांसमान निर्मल जलाचा शोणभद्र, मही तसेच पर्वत आणि वनांनी सुशोभित कालमही आदि नद्यांचे किनारे शोधून पहा. ॥२०-२१ १/२॥
ब्रह्ममालान् विदेहांश्च मालवान् काशिकोसलान् ॥ २२ ॥

मागधांश्च महाग्रामान् पुण्ड्रान्वंगांस्तथैव च ।
’ब्रह्ममाल, विदेह, मालव, काशी, कोसल, मगध देशातील मोठमोठी गांवे, पुण्ड्रदेश तसेच अंग आदि जनपदात शोध घ्या. ॥२२ १/२॥
भूमिं च कोशकाराणां भूमिं च रजताकराम् ॥ २३ ॥

सर्वं च तद् विचेतव्यं मार्गयद्‌भिस्ततस्ततः ।
रामस्य दयितां भार्यां सीतां दशरथस्नुषाम् ॥ २४ ॥
रेशमाच्या किड्यांच्या उत्पत्ति-स्थानात आणि चांदिच्या खाणीमध्येही शोध केला पाहिजे. इकडे तिकडे हिंडून शोध घेणार्‍या तुम्ही सर्व लोकांनी राजा दशरथांची पुत्रवधू तसेच श्रीरामचंद्रांची प्रिय पत्‍नी सीतेचे अन्वेषण केले पाहिजे. ॥२३-२४॥
समुद्रमवगाढांश्च पर्वतान् पत्तनानि च ।
मंदरस्य च ये कोटिं संश्रिताः केचिदालयाः ॥ २५ ॥
’समुद्रात प्रविष्ट झालेल्या पर्वतांवर, त्यांच्या अंतर्वर्ती द्वीपांच्या विभिन्न नगरांत, तसेच मंदराचलाच्या शिखरावर जे काही वसलेले आहेत त्या सर्वांमध्ये सीतेचे अनुसंधान करा. ॥२५॥
कर्णप्रावरणाश्चैव तथा चाप्योष्ठकर्णकाः
घोरलोहमुखाश्चैव जवनाश्चैकपादकाः ॥ २६ ॥

अक्षया बलवंतश्च पुरुषाः पुरुषादकाः ।
किराताः तीक्ष्णचूडाश्च हेमाभाः प्रियदर्शनाः ॥ २७ ॥

आममीनाशनाश्चापि किराता द्वीपवासिनः ।
अंतर्जलचरा घोरा नरव्याघ्रा इति स्मृताः ॥ २८ ॥

एतेषामाश्रयाः सर्वे विचेयाः काननौकसः ।
जे कर्णप्रावरण (वस्त्राप्रमाणे ज्यांचे कान पायापर्यंत लटकत आहेत असे), ओठकर्णक (ओठापर्यंत ज्यांचे कान पसरलेले आहेत असे) तसेच घोरलोहमुख (लोहा प्रमाणे काळे आणि भयंकर मुख असणारे) आहेत, जे एकच पाय असूनही वेगपूर्वक चालणारे आहेत, ज्यांची संतान परंपरा कधी क्षीण होत नाही ते पुरुष तसेच जे बलवान् नरभक्षी राक्षस आहेत, जे सूर्याच्या अग्रभागाप्रमाणे तीक्ष्ण शिखा असणारे, सुवर्णासमान कंतिमान्, प्रियदर्शन (सुंदर) कच्ची मासळी खाणारे आहेत, द्वीपवासी तसेच जलाच्या आत विचरण करणारे किरात आहेत; ज्यांचा खालचा आकार मनुष्याप्रमाणे आणि वरील आकृति व्याघ्रासमान आहे, असे जे भयंकर प्राणी सांगितले गेले आहेत, वानरांनो ! या सर्वांच्या निवासस्थानात जाऊन तुम्ही सीता आणि रावणाचा शोध केला पाहिजे. ॥२६-२८ १/२॥
गिरिभिर्ये च गम्यंते प्लवनेन प्लवेन च ॥ २९ ॥
’ज्या द्वीपांमध्ये पर्वतांवरून जावे लागते, जेथे समुद्र पोहून अथवा नाव आदि द्वारा पोहोचावे लागते त्या सर्व स्थानांमध्ये सीतेचा शोध घ्यावयास हवा. ॥२९॥
यत्‍नभवंतो यवद्वीपं सप्तराज्योपशोभितम् ।
सुवर्णरूप्यकद्वीपं सुवर्णाकरमण्डितम् ॥ ३० ॥
’याशिवाय तुम्ही लोक यत्‍नशील होऊन सात राज्यांनी सुशोभित यवद्वीप (जावा) सुवर्णद्वीप (सुमात्रा) तसेच रूप्यक द्वीपातही, जे सुवर्णांच्या खाणींनी सुशोभित आहे, शोध घेण्याचा प्रयत्‍न करा. ॥३०॥
यवद्वीपमतिक्रम्य शिशिरो नाम पर्वतः ।
दिवं स्पृशति शृङ्‌गेाण देवदानवसेवितः ॥ ३१ ॥
’यवद्विपाला ओलांडून पुढे गेल्यावर एक शिशिर नामक पर्वत लागतो, ज्याच्यावर देवता आणि दानव निवास करतात. तो पर्वत आपल्या उंच शिखरांनी स्वर्गलोकाला स्पर्श करीत असल्यासारखा वाटतो. ॥३१॥
एतेषां गिरिदुर्गेषु प्रपातेषु वनेषु च ।
मार्गध्वं सहिताः सर्वे रामपत्‍नींन यशस्विनीम् ॥ ३२ ॥
’या सर्व द्वीपांच्या पर्वतांना तसेच शिशिर पर्वताच्या दुर्गम प्रदेशात झर्‍यांच्या आसपास आणि जंगलात तुम्ही सर्व लोक एकत्र राहून रामांच्या यशस्विनी पत्‍नी सीतेचे अन्वेषण करावे. ॥३२॥
ततो रक्तजलं प्राप्य शोणाख्यं शीघ्रवाहिनम् ।
गत्वा पारं समुद्रस्य सिद्धचारणसेवितम् ॥ ३३ ॥

तस्य तीर्थेषु रम्येषु विचित्रेषु वनेषु च ।
रावणः सह वैदेह्या मार्गितव्यस्ततस्ततः ॥ ३४ ॥
त्यानंतर समुद्राच्या पार जेथे सिद्ध आणि चारण निवास करतात, तेथे जाऊन लाल जलाने भरलेल्या शीघ्र प्रवाहित होणार्‍या शोण नामक नदीच्या तटावर पोहोचून जाल. त्याच्या तटवर्ती रमणीय तीर्थे आणि विचित्र वनात जेथे-तेथे वैदेही सीतेचा आणि रावणाचा शोध करावा. ॥३३-३४॥
पर्वतप्रभवा नद्यः सुभीमबहुनिष्कुटाः ।
मार्गितव्या दरीमंतः पर्वताश्च वनानि च ॥ ३५ ॥
पर्वतांपासून निघालेल्या अशा बर्‍याचशा नद्या लागतील की ज्यांच्या तटावर फार भयंकर अनेकानेक उपवने प्राप्त होतील. त्याच बरोबर तेथे बर्‍याचशा गुहा असलेले पर्वत उपलब्ध होतील आणि अनेक वनेही दृष्टिगोचर होतील. त्या वनांतही सीतेचा पत्ता लावला पाहिजे. ॥३५॥
ततः समुद्रद्वीपांश्च सुभीमान् द्रष्टुमर्हथ ।
ऊर्मिमंतं समुद्रं च क्रोशंतमनिलोद्धतम् ॥ ३६ ॥
’तत्पश्चात पूर्वोक्त देशांच्या पलिकडे जाऊन तुम्ही इक्षुरसांनी परिपूर्ण समुद्र तसेच त्यांच्या द्वीपांना बघाल; जी फारच भयंकर प्रतीत होतात. इक्षुरसाचा तो समुद्र महाभयंकर आहे. त्यात वार्‍याच्या वेगाने उत्ताल लाटा उठत राहातात तसेच तो जणु गर्जना करीत असल्याप्रमाणे भासत असतो. ॥३६॥
तत्रासुरा महाकायाः छायां गृह्णंति नित्यशः ।
ब्रह्मणा समनुज्ञाता दीर्घकालं बुभुक्षिताः ॥ ३७ ॥
त्या समुद्रात बरेचसे विशालकाय असुर निवास करतात. ते फार दिवसांचे भुकेले असतात आणि छाया पकडूनच प्राण्यांना आपल्या जवळ खेचून घेतात. हाच त्यांचा नित्याचा आहार आहे. यासाठी त्यांना ब्रह्मदेवांकडून अनुमति मिळून चुकली आहे. ॥३७॥
तं कालमेघप्रतिमं महोरगनिषेवितम् ।
अभिगम्य महानादं तीर्थेनैव महोदधिम् ॥ ३८ ॥

ततो रक्तजलं भीमं लोहितं नाम सागरम् ।
गता प्रेक्ष्यथ तां चैव बृहतीं कूटशाल्मलीम् ॥ ३९ ॥
’इक्षुरसाचा तो समुद्र काळ्या मेघासमान श्याम दिसून येतो. मोठ मोठे नाग त्याच्या आतमध्ये निवास करतात. त्यामुळे फारच मोठी गर्जना होत असते. विशेष उपायांनी त्या महासागराच्या पार जाऊन तुम्ही लाल रंगाच्या जलाने भरलेल्या लोहित नामक भयंकर समुद्राच्या तटावर पोहोचून जाल आणि तेथे शाल्मली द्वीपाच्या चिह्नभूत कूटशाल्मली नामक विशाल वृक्षाचे दर्शन कराल. ॥३८-३९॥
गृहं च वैनतेयस्य नानारत्‍नचविभूषितम् ।
तत्र कैलाससंकाशं विहितं विश्वकर्मणा ॥ ४० ॥
’त्याच्या जवळच विश्वकर्म्याने बनविलेले विनतानंदन गरूडाचे एक सुंदर भवन आहे, जे नाना प्रकारच्या रत्‍नांनी विभूषित तसेच कैलास पर्वतासमान उज्वल आणि विशाल आहे. ॥४०॥
तत्र शैलनिभा भीमा मंदेहा नाम राक्षसाः ।
शैलशृङ्‌गेयषु लंबंते नानारुपा भयावहाः ॥ ४१ ॥
’त्या द्वीपात पर्वतासमान शरीर असणारे भयंकर मंदेह नामक राक्षस निवास करतात जे सुरा समुद्राच्या मध्यवर्ती शैल-शिखरांवर लटकत राहातात. ते अनेक प्रकारची रूपे धारण करणारे आणि भयदायक आहेत. ॥४१॥
ते पतंति जले नित्यं सूर्यस्योदयनं प्रति ।
अभितप्ताः स्म सूर्येण लंबंते स्म पुनः पुनः ॥ ४२ ॥

निहता ब्रह्मतेजोभिः अहन्यहनि राक्षसाः ।
’प्रतिदिन सूर्योदयाच्या समयी ते राक्षस ऊर्ध्वमुख होऊन सूर्याशी झंजु लागतात, परंतु सूर्यमण्डलाच्या तापाने संतप्त तसेच ब्रह्मतेजाने निहत होतात आणि सुरा समुद्राच्या जलात पडतात. तेथून परत जीवित होऊन परत त्याच शैल-शिखरांवर लटकले जातात. त्यांचा वारंवार असाच क्रम चालू असतो. ॥४२ १/२॥
ततः पाण्डरमेघाभं क्षीरोदं नाम सागरम् ॥ ४३ ॥
शाल्मलीद्वीप आणि सुरा-समुद्राच्या पुढे गेल्यावर (क्रमशः) घृत आणि दधिचे समुद्र प्राप्त होतात. तेथे सीतेचा शोध केल्यानंतर जेव्हा पुढे जाल तेव्हां पांढर्‍या ढगांसारखी आभा असणार्‍या क्षीर समुद्राचे दर्शन होईल. ॥४३॥
गता द्रक्ष्यथ दुर्धर्षा मुक्ताहारमिवोर्मिभिः ।
तस्य मध्ये महान् श्वेतो ऋषभो नाम पर्वतः ॥ ४४ ॥
’दुर्धर्ष वानरांनो ! तेथे पोहोचल्यावर ज्याच्यात लाटा उठत आहेत अशा क्षीर सागराला पाहून जणु त्याने मोत्यांचा हार धारण केला आहे की काय असे वाटेल. त्या सागराच्या मध्ये ऋषभ नावाने प्रसिद्ध एक फार उंच पर्वत आहे जो श्वेत वर्णाचा आहे. ॥४४॥
दिव्यगंधैः कुसुमितै राजतैश्च नगैर्वृतः ।
सरश्च राजतैः पद्मैः ज्वलितैर्हेमकेसरैः ॥ ४५ ॥

नाम्ना सुदर्शनं नाम राजहंसैः समाकुलम् ।
त्या पर्वतास सर्व बाजूनी, फुलांनी सुशोभित आणि दिव्य गंधाने सुवासित असे बरेचसे वृक्ष घेरून उभे आहेत. त्यावर सुदर्शन नामक एक सरोवरही आहे ज्यात चांदी सारख्या श्वेत रंगाची कमळे विकसित झालेली आहेत. त्या कमळांचे केसर सुवर्णमय असतात आणि सदा दिव्य दीप्तीने चमकत असतात. ते सरोवर राजहंसांनी भरलेले असते. ॥४५ १/२॥
विबुधाश्चारणा यक्षाः किन्नराश्चाप्सरोगणाः ॥ ४६ ॥

हृष्टाः समभिगच्छंति नलिनीं तां रिरंसवः ।
’देवता, चारण, यक्ष, किन्नर आणि अप्सरा अत्यंत प्रसन्नतेने जल-विहार करण्यसाठी तेथे येत असतात. ॥४६ १/२॥
क्षीरोदं समतिक्रम्य ततो द्रक्ष्यथ वानराः ॥ ४७ ॥

जलोदं सागरं शी सर्वभूतभयावहम् ।
तत्र तत्कोपजं तेजः कृतं हयमुखं महत् ॥ ४८ ॥
’वानरांनो ! क्षीरसागर ओलांडून जेव्हा तुम्ही लोक पुढे जाल तेव्हा लवकरच सुस्वादु जलाने भरलेला समुद्र पहाल. तो महासागर समस्त प्राण्यांना भय देणारा आहे, त्यांत ब्रह्मर्षि और्व यांच्या कोपापासून प्रकट झालेले वडवामुख नामक महान् तेज विद्यमान् आहे. ॥४७-४८॥
अस्याहुस्तन्महावेगं ओदनं सचराचरम् ।
तत्र विक्रोशतां नादो भूतानां सागरौकसाम् ।
श्रूयते चासमर्थानां दृष्ट्‍वाभूद् वडवामुखम् ॥ ४९ ॥
’त्या समुद्रामध्ये जे चराचर प्राण्यांसहित महान् वेगवान् जल आहे, तोच त्या वडवामुख नामक अग्निचा आहार सांगितला जातो. तेथे जो वडवानल प्रकट झालेला आहे त्याला पाहून त्यात पडण्याच्या भयामुळे किंचाळणार्‍या - ओरडणार्‍या समुद्रनिवासी असमर्थ प्राण्यांचा आर्तनाद निरंतर ऐकू येत असतो. ॥४९॥
स्वादूदस्योत्तरे देशे योजनानि त्रयोदश ।
जातरूपशिलो नाम सुमहान् कनकप्रभः ॥ ५० ॥
’स्वादिष्ट जलाने भरलेल्या त्या समुद्राच्या उत्तरेस तेरा योजनांच्या अंतरावर सुवर्णमय शिलांनी सुशोभित कनकाची कमनीय कांति धारण करणारा एक फार उंच पर्वत आहे. ॥५०॥
तत्र चंद्रप्रतीकाशं पन्नगं धरणीधरम् ।
पद्मपत्रविशालाक्षं ततो द्रक्ष्यथ वानराः ॥ ५१ ॥

आसीनं पर्वतस्याग्रे सर्वभूतनमस्कृतम् ।
सहस्रशिरसं देवं अनंतं नीलवाससम् ॥ ५२ ॥
’वानरांनो ! त्याच्या शिखरावर या पृथ्वीला धारण करणारे भगवान् अनंत बसलेले दिसून येतील. त्यांचा श्रीविग्रह चंद्रम्या समान गौरवर्णाचा आहे, ते सर्प जातिचे आहेत, परंतु त्यांचे स्वरूप देवतातुल्य आहे. त्यांचे नेत्र प्रफुल्ल कमलदला समान आहेत आणि शरीर नीलवस्त्राने आच्छादित आहे. त्या अनंतदेवांना सहस्त्र मस्तके आहेत. ॥५१-५२॥
त्रिशिराः काञ्चनः केतुः तालस्तस्य महात्मनः ।
स्थापितः पर्वतस्याग्रे विराजति सवेदिकः ॥ ५३ ॥
’पर्वताच्या वर त्या महात्म्यांची ताडाच्या चिन्हांनी युक्त सुवर्णमय ध्वजा फडकत असते. त्या ध्वजेच्या तीन शिखा आहेत आणि तिच्या खालच्या आधार भूमीवर वेदी बनविलेली आहे. याप्रकारे त्या ध्वजाला खूप शोभा प्राप्त झाली आहे.॥५३॥
पूर्वस्यां दिशि निर्माणं कृतं तत् त्रिदशेश्वरैः ।
ततः परं हेममयः श्रीमानुदयपर्वतः ॥ ५४ ॥
’हाच तालध्वज पूर्व दिशेच्या सीमेचे सूचक चिन्ह या रूपांत देवतांच्या द्वारा स्थापित केला गेला आहे. त्यानंतर सुवर्णमय उदयपर्वत आहे, जो दिव्य शोभेने संपन्न आहे. ॥५४॥
तस्य कोटिर्दिवं स्पृष्ट्‍वा शतयोजनमायता ।
जातरूपमयी दिव्या विराजति सवेदिका ॥ ५५ ॥
’त्याचे गगनचुंबी शिखर शंभर योजने लांबीचे आहे. त्याचा आधारभूत पर्वतही तसाच आहे. त्याच्यासह ते दिव्य सुवर्णशिखर अद्‌भुत शोभा प्राप्त करीत आहे. ॥५५॥
सालैस्तालैस्तमालैश्च कर्णिकारैश्च पुष्पितैः ।
जातरूपमयैर्दिव्यैः शोभते सूर्यसंनिभैः ॥ ५६ ॥
’तेथील साल, ताल, तमाल आणि फुलांनी लगडलेले कण्हेर आदि वृक्षही सुवर्णमयच आहेत. त्या सूर्यतुल्य तेजस्वी दिव्य वृक्षांच्यामुळे उदयगिरी फारच शोभून दिसतो. ॥५६॥
तत्र योजनविस्तारं उच्छ्रितं दशयोजनम् ।
शृङ्‌गंम सौमनसं नाम जातरूपमयं ध्रुवम् ॥ ५७ ॥
’त्या शंभर योजन लांब उदयगिरीच्या शिखरावर एक सौमनस नामक सुवर्णमय शिखर आहे, ज्याची रूंदी एक योजन आणि उंची दहा योजन आहे. ॥५७॥
तत्र पूर्वं पदं कृत्वा पुरा विष्णुस्त्रिविक्रमे ।
द्वितीयं शिखरे मेरोश्चकार पुरुषोत्तमः ॥ ५८ ॥
’पूर्वकाळी वामन अवताराच्या समयी पुरुषोत्तम भगवान् विष्णुंनी आपले पहिले पाऊल त्या सौमनस नामक शिखरावर ठेवून दुसरे पाऊल मेरू पर्वताच्या शिखरावर ठेवले होते. ॥५८॥
उत्तरेण परिक्रम्य जंबूद्वीपं दिवाकरः ।
दृश्यो भवति भूयिष्ठं शिखरं तन्महोच्छ्रयम् ॥ ५९ ॥
’सूर्यदेव उत्तरेस फिरून जंबूद्वीपाची परिक्रमा करीत जेव्हा अत्यंत उंच सौमनस नामक शिखरावर येऊन स्थित होतात, तेव्हा जंबूदीप निवासी लोकांना त्यांचे अधिक स्पष्टपणे दर्शन होते. ॥५९॥
तत्र वैखानसा नाम वालखिल्या महर्षयः ।
प्रकाशमाना दृश्यंते सूर्यवर्णास्तपस्विनः ॥ ६० ॥
’त्या सौमनस नामक शिखरावर वैखानस महात्मा महर्षि बालखिल्यगण प्रकाशित होत असलेले दिसून येतात, जे सूर्यासमान कांतिमान् आणि तपस्वी आहेत. ॥६०॥
अयं सुदर्शनो द्वीपः पुरो यस्य प्रकाशते ।
यस्मिंस्तेजश्च चक्षुश्च सर्वप्राणभृतामपि ॥ ६१ ॥
’या उदयगिरिच्या सौमनस शिखराच्या समोरचे द्वीप सुदर्शन नावाने प्रसिद्ध आहे. कारण त्या शिखरावर जेव्हा भगवान् सूर्य उदित होतात तेव्हाच त्या द्वीपावरील समस्त प्राण्यांचा तेजाशी संबंध येतो आणि सर्वांच्या नेत्रांना प्रकाश प्राप्त होतो. (तेच या द्वीपाचे ’सुदर्शन’ नाम होण्याचे कारण आहे.) ॥६१॥
शैलस्य तस्य पृष्ठेषु कंदरेषु वनेषु च ।
रावणः सह वैदेह्या मार्गितव्यस्ततस्ततः ॥ ६२ ॥
’उदयचलाच्या पृष्ठभागी कंदरांमध्ये तसेच वनांमध्येही तुम्ही जिथे-तिथे वैदेही सीतेसहित रावणाचा शोध घेतला पाहिजे. ॥६२॥
काञ्चनस्य च शैलस्य सूर्यस्य च महात्मनः ।
आविष्टा तेजसा संध्या पूर्वा रक्ता प्रकाशते ॥ ६३ ॥
’त्या सुवर्णमय उदयाचलाने तसेच महात्मा सूर्यदेवांच्या तेजाने व्याप्त झालेली उदयकालीन पूर्व संध्या रक्तवर्णाच्या प्रभेने प्रकाशित होत असते. ॥६३॥
पूर्वमेतत् कृतं द्वारं पृथिव्या भुवनस्य च ।
सूर्यस्योदयनं चैव पूर्वा ह्येषा दिगुच्यते ॥ ६४ ॥
’सूर्याच्या उदयाचे हे स्थान सर्वात प्रथम ब्रह्मदेवांनी बनविलेले आहे म्हणून हेच पृथ्वी आणि ब्रह्मलोकाचे द्वार आहे. (वरील लोकात राहाणारे प्राणी याच द्वाराने भूलोकात प्रवेश करतात तसेच भूलोकावरील प्राणी याच द्वाराने ब्रह्मलोकात जातात) प्रथम याच दिशेमध्ये या द्वाराची निर्मिति झाली म्हणून हिला पूर्व दिशा म्हणतात. ॥६४॥
तस्य शैलस्य पृष्ठेषु निर्झरेषु गुहासु च ।
रावणः सह वैदेह्या मार्गितव्यस्ततस्ततः ॥ ६५ ॥
’उदयचलाच्या पृष्ठभागी, निर्झर आणि गुहांमध्ये जिकडे तिकडे घुसून तुम्ही वैदेही सीतेसहित रावणाचा शोध घेतला पाहिजे. ॥६५॥
ततः परमगम्या स्याद् दिक् पूर्वा त्रिदशावृता ।
रहिता चंद्रसूर्याभ्यां अदृश्या तमसावृता ॥ ६६ ॥
’याच्यापुढे पूर्व दिशा अगम्य आहे. तिकडे देवता राहातात. त्या बाजूला चंद्राचा अथवा सूर्याचा प्रकाश नसल्याने तेथील भूमी अंधकाराने आच्छन्न आणि अदृश्य आहे. ॥६६॥
शैलेषु तेषु सर्वेषु कंदरेषु नदीषु च ।
ये च नोक्ता मयोद्देशा विचेया तेषु जानकी ॥ ६७ ॥
’उदयाचलाच्या आसपासच्या ज्या पर्वत कंदरा आणि नद्या आहेत त्यांत तसेच ज्या स्थानांचा मी निर्देश केलेला नाही त्यांतही तुम्ही जानकीचा शोध केला पाहिजे. ॥६७॥
एतावद् वानरैः शक्यं गंतुं वानरपुंगवाः ।
अभास्करममर्यादं न जानीमस्ततः परम् ॥ ६८ ॥
’वानरश्रेष्ठांनो ! केवळ उदयगिरीपर्यंतच वानरे पोहोचूं शकतात. याच्या पुढे सूर्याचा प्रकाश नाही आणि देश आदिची कुठली सीमाही नाही; म्हणून पुढील भूमीच्या बाबतीत मला काहीही माहिती नाही. ॥६८॥
अधिगम्य तु वैदेहीं निलयं रावणस्य च ।
मासे पूर्णे निवर्तध्वं उदयं प्राप्य पर्वतम् ॥ ६९ ॥
’तुम्ही लोक उदयाचलापर्यत जाऊन सीता आणि रावणाच्या स्थानाचा पत्ता लावा आणि एक महिना पूरा होत असतांनाच परत या. ॥६९॥
ऊर्ध्वं मासान्न वस्तव्यं वसन् वध्यो भवेन्मम ।
सिद्धार्थाः संनिवर्तध्वं अधिगम्य च मैथिलीम् ॥ ७० ॥
’एक महिन्याहून अधिक थांबू नका. जे अधिक काळपर्यत तेथे राहतील ते माझ्याकडून मारले जातील. मैथिली सीतेचा शोध लागून अन्वेषणाचे प्रयोजन सिद्ध होताच अवश्य परत या. ॥७०॥
महेंद्रकांतां वनषण्डमण्डितां
दिशं चरित्वा निपुणेन वानराः ।
अवाप्य सीतां रघुवंशजप्रियां
ततो निवृत्ताः सुखिनो भविष्यथ ॥ ७१ ॥
’वानरांनो ! वनसमूहाने अलंकृत पूर्व दिशेमध्ये चांगल्या प्रकारे भ्रमण करून रघुवंशी रामांची प्रिय पत्‍नी सीतेचा समाचार जाणून घेऊन तुम्ही तेथून परत या. या योगे तुम्ही सुखी व्हाल.’ ॥७१॥
इत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये किष्किंधाकाण्डे चत्वारिंशः सर्गः ॥ ४० ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील किष्किंधाकाण्डाचा चाळीसावा सर्ग पूरा झाला. ॥४०॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP