[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीमद् वाल्मीकि रामायणे
अरण्यकाण्डे
॥ चतुःपञ्चाशः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
सीतया पञ्चवानराणां मध्ये स्वाभूषणवस्त्राणां पातनं लङ्‌कां गत्वा रावणेन सीतायाः स्वान्तःपुरे रक्षणं जनस्थाने गुप्तचरया निवासं कर्तुमष्टानां राक्षसानां प्रेषणं च -
सीतेने पाच वानरांच्या मध्ये आपली भूषणे आणि वस्त्रे टाकणे, रावणाचे लंकेत पोहोंचून सीतेला अंतःपुरात ठेवणे तसेच जनस्थानात आठ राक्षसांना गुप्तचरांच्या रूपात राहाण्यासाठी पाठवणे -
ह्रियमाणा तु वैदेही कंचिन्नाथमपश्यती ।
ददर्श गिरिशृङ्‌गस्थान् पञ्च वानरपुङ्‌गवान् ॥ १ ॥
रावणाच्या द्वारा हरल्या जाणार्‍या वैदेही सीतेला त्या समयी आपला कुणी सहाय्यक दिसून येत नव्हता. मार्गात तिने एका पर्वतशिखरावर पाच श्रेष्ठ वानरांना बसलेले पाहिले. ॥१॥
तेषां मध्ये विशालाक्षी कौशेयं कनकप्रभम् ।
उत्तरीयं वरारोहा शुभान्याभरणानि च ॥ २ ॥

मुमोच यदि रामाय शंसेयुरिति भामिनी ।
वस्त्रमुत्सृज्य तन्मध्ये निक्षिप्तं सहभूषणम् ॥ ३ ॥
तेव्हा सुंदर अंगे असलेल्या विशाललोचना भामिनी सीतेने कदाचित्‌ हे भगवान्‌ श्रीरामांना काही समाचार सांगू शकतील असा विचार करून आपल्या सोनेरी रंगाच्या उत्तरीयात वस्त्र आणि आभूषणे बांधून ते त्यांच्या मध्ये फेकून दिले. ॥२-३॥
संभ्रमात् तु दशग्रीवस्तत्कर्म च न बुद्धवान् ।
पिङ्‌गाक्षास्तां विशालाक्षीं नेत्रैरनिमिषैरिव ॥ ४ ॥

विक्रोशन्तीं तदा सीतां ददृशुर्वानरोत्तमाः ।
रावण अत्यंत भ्यायलेला होता त्यामुळे सीतेने केलेले हे कृत्य तो जाणू शकला नाही. ते पिंगट डोळ्याचे श्रेष्ठ वानर त्या समयी उच्च स्वरात विलाप करणार्‍या विशालाक्षी सीतेकडे एकटक लावून पहात राहिले. ॥४ १/२॥
स च पम्पामतिक्रम्य लङ्‌कामभिमुखः पुरीम् ॥ ५ ॥

जगाम मैथिलीं गृह्य वैदेहीं राक्षसेश्वरः ।
राक्षसराज रावण पंपासरोवरास ओलांडून रडत असलेल्या सीतेस बरोबर घेऊन लंकापुरीकडे निघाला. ॥५ १/२॥
तां जहार सुसंहृष्टो रावणो मृत्युमात्मनः ॥ ६ ॥

उत्सङ्‌गेनैव भुजगीं तीक्ष्णदंष्ट्रां महाविषाम् ।
निशाचर रावण अत्यंत आनंदाने सीतेच्या रूपात आपल्या मृत्युलाच हरण करुन घेऊन निघाला होता. त्याने वैदेहीच्या रूपात तीक्ष्ण दात असलेली महाविषारी नागीणीलाच आपल्या अंगावर उचलून घेतले होते. ॥६ १/२॥
वनानि सरितः शैलान् सरांसि च विहायसा ॥ ७ ॥

स क्षिप्रं समतीयाय शरश्चापादिव च्युतः ।
तो धनुष्यातून सुटलेल्या बाणाप्रमाणे तीव्र गतीने आकाशमार्गाने जात असता अनेकानेक वने, नद्या, पर्वत आणि सरोवरांना तात्काळ ओलांडून गेला. ॥७ १/२॥
तिमिनक्रनिकेतं तु वरुणालयमक्षयम् ॥ ८ ॥

सरतां शरणं गत्वा समतीयाय सागरम् ।
नंतर त्याने तिमि नामक मोठमोठ्या माशांचे व सुसरींचे निवासस्थान, तसेच वरुणाचे स्थान म्हणजे सर्व नद्यांचा आश्रय असलेला समुद्र, यांना पार केले ॥८ १/२॥
संभ्रमात् परिवृत्तोर्मी रुद्धमीनमहोरगः ॥ ९ ॥

वैदेह्यां ह्रियमाणायां बभूव वरुणालयः ।
वैदेही जगन्माता जानकीचे अपहरण होते समयी वरूणालय समुद्रास फारच भीती वाटली. त्यामुळे त्याच्यात उठणार्‍या लहरी शान्त होऊन गेल्या. त्याच्यात राहणार्‍या माशांची आणि मोठमोठ्‍या सर्पांची गतिही रूद्ध झाली. ॥९ १/२॥
अन्तरिक्षगता वाचः ससृजुश्चारणास्तदा ॥ १० ॥

एतदन्तो दशग्रीव इति सिद्धास्तथाऽब्रुवन् ।
त्या समयी आकाशात विचरण करणारे चारण असे म्हणाले - आता दशग्रीव रावणाचा अंतःकाळ जवळ येऊन ठेपला आहे. तसेच सिद्धांनीही या गोष्टीचा पुनरूच्चार केला. ॥१० १/२॥
स तु सीतां विचेष्टन्तीमङ्‌केनादाय रावणः ॥ ११ ॥

प्रविवेश पुरीं लङ्‌कां रूपिणीं मृत्युमात्मनः ।
सीता तडफडत होती. रावणाने आपल्या साकार मृत्युप्रमाणे तिला अंगावर घेऊन लंकापुरीत प्रवेश केला. ॥११ १/२॥
सोऽभिगम्य पुरीं लङ्‌कां सुविभक्तमहापथाम् ॥ १२ ॥

संरूढकक्ष्यां बहुलां स्वमन्तःपुरमाविशत् ।
तेथे पृथक पृथक विशाल राजमार्ग बनलेले होते. पुरीच्या द्वारावर बरेचसे राक्षस इकडे तिकडे दिसून येत होते. तसेच त्या नगरीचा विस्तारही फारच मोठा होता. तिच्यात जाऊन रावणाने आपल्या अंतःपुरात प्रवेश केला. ॥१२ १/२॥
तत्र तामसितापाङ्‌गीं शोकमोहसमन्विताम् ॥ १३ ॥

निदधे रावणः सीतां मयो मायामिवासुरीम् ।
काळे नेत्रप्रान्त असलेली सीता शोक आणि मोहात बुडून गेली होती. रावणाने तिला अंतःपुरात ठेवले. जणु मायासुराने मूर्तिमंत आसुरी मायेलाच* तेथे स्थापित करून ठेवले होते.॥१३ १/२॥
* रामायणतिलक नामक व्याख्येचे विद्वान लेखक यांनी असे म्हटले आहे की येथे जी सीतेला मायेची उपमा दिली गेली आहे त्या द्वारा हाच अभिप्राय व्यक्त केला आहे की मायामयी सीताच लंकेत आली होती. मुख्य सीता तर अग्नित प्रविष्ट झालेली होती. म्हणूनच रावण तिला आणू शकला नाही. मायारूपिणी असल्या कारणानेच रावणाला हिच्या स्वरूपाचे ज्ञान होऊ शकले नाही.)
अब्रवीच्च दशग्रीवः पिशाचीर्घोरदर्शनाः ॥ १४ ॥

यथा नैनां पुमान् स्त्री वा सीतां पश्यत्यसम्मतः ।
यानंतर दशग्रीवाने भयंकर आकाराच्या पिशाच्चिनींना बोलावून म्हटले - तुम्ही सर्व सावधान राहून सीतेचे रक्षण करा. कोणीही स्त्री अथवा पुरुष माझ्या आज्ञेशिवाय सीतेला पाहू अथवा भेटू शकता कामा नये. ॥१४ १/२॥
मुक्तामणिसुवर्णानि वस्त्राण्याभरणानि च ॥ १५ ॥

यद् यदिच्छेत् तदैवास्या देयं मच्छन्दतो यथा ।
तिला मोती, मणि, सुवर्ण, वस्त्र आणि आभूषणे आदि ज्या ज्या वस्तूची इच्छा होईल ती तात्काळ दिली जावी यासाठी माझी युक्त आज्ञा आहे. ॥१५ १/२॥
या च वक्ष्यति वैदेहीं वचनं किञ्चिदप्रियम् ॥ १६ ॥

अज्ञानाद् यदि वा ज्ञानान्न तस्या जीवितं प्रियम् ।
तुम्हा लोकांपैकी जी कोणी जाणून अथवा अजाणता वैदेही सीतेस अप्रिय अशी काही गोष्ट बोलेल तर मी समजेन की तिला आपले आयुष्य प्रिय नाही. ॥१६ १/२॥
तथोक्त्वा राक्षसीस्तास्तु राक्षसेन्द्रः प्रतापवान् ॥ १७ ॥

निष्क्रम्यान्तःपुरात् तस्मात् किं कृत्यमिति चिन्तयन् ।
ददर्शाष्टौ महावीर्यान् राक्षसान् पिशिताशनान् ॥ १८ ॥
राक्षसींना अशी आज्ञा देऊन प्रतापी राक्षसराज आता या पुढे काय केले पाहिजे असा विचार करीत अंतःपुरातून बाहेर निघाला आणि कच्च्या मांसाचा आहार करणार्‍या आठ महा पराक्रमी राक्षसांना तात्काळ भेटला. ॥१७-१८॥
स तान् दृष्ट्‍वा महावीर्यो वरदानेन मोहितः ।
उवाच तानिदं वाक्यं प्रशस्य बलवीर्यतः ॥ १९ ॥
त्यांना भेटून ब्रह्मदेवांच्या वरदानाने मोहित झालेल्या महापराक्रमी रावणाने त्यांच्या बलाची आणि शौर्याची प्रशंसा करून त्यांना या प्रकारे म्हटले- ॥१९॥
नानाप्रहरणाः क्षिप्रमितो गच्छत सत्वराः ।
जनस्थानं हतस्थानं भूतपूर्वं खरालयम् ॥ २० ॥
वीरांनो ! तुम्ही लोक नाना प्रकारची अस्त्रे- शस्त्रे बरोबर घेऊन शीघ्रच जनस्थानात, जेथे पूर्वी खर राहात होता, तेथे जा. ते स्थान यावेळी उजाड झालेले आहे. ॥२०॥
तत्रास्यतां जनस्थाने शून्ये निहतराक्षसे ।
पौरुषं बलमाश्रित्य त्रासमुत्सृज्य दूरतः ॥ २१ ॥
तेथील सर्व राक्षस मारले गेलेले आहेत. त्या शून्य जनस्थानात तुम्ही लोक आपल्या स्वतःच्याच बलपौरूषाचा भरवंसा धरून भयाला दूर सारून रहा. ॥२१॥
बहुसैन्यं महावीर्यं जनस्थाने निवेशितम् ।
सदूषणखरं युद्धे निहतं रामसायकैः ॥ २२ ॥
मी तेथे फार मोठ्‍या सेनेसह महापराक्रमी खर आणि दूषणांना ठेवले होते परंतु ते सर्वच्या सर्व युद्धात रामाच्या बाणांनी मारले गेले आहेत. ॥२२॥
ततः क्रोधो ममापूर्वो धैर्यस्योपरि वर्धते ।
वैरं च सुमहज्जातं रामं प्रति सुदारुणम् ॥ २३ ॥
त्यामुळे माझ्या मनात अपूर्व क्रोध जागृत झाला आहे आणि तो धैर्याच्या सीमेस पार करून वाढू लागला आहे. म्हणून रामाशी माझे फारच मोठे आणि भयंकर वैर पक्के झाले आहे. ॥२३॥
निर्यातयितुमिच्छामि तच्च वैरं महारिपोः ।
नहि लप्स्याम्यहं निद्रामहत्वा संयुगे रिपुम् ॥ २४ ॥
मी आपल्या महान्‌ शत्रूच्या त्या वैराचा सूड घेण्याची इच्छा करीत आहे. त्या शत्रुला संग्रामात मारल्याशिवाय मी सुखाने झोपू शकणार नाही. ॥२४॥
तं त्विदानीमहं हत्वा खरदूषण घातिनम् ।
रामं शर्मोपलप्स्यामि धनं लब्ध्वेव निर्धनः ॥ २५ ॥
रामाने खर आणि दूषणाचा वध केला आहे म्हणून मी त्याला मारून जेव्हा बदला घेईन तेव्हाच मला शांति मिळेल. जसा निर्धन मनुष्य धन मिळून संतुष्ट होतो त्याच प्रमाणे मीही रामाचा वध करूनच शांति मिळवू शकेन. ॥२५॥
जनस्थाने वसद्‌भिस्तु भवद्‌भी राममाश्रिता ।
प्रवृत्तिरुपनेतव्या किं करोतीति तत्त्वतः ॥ २६ ॥
जनस्थानात राहून तुम्ही लोक रामाचा समाचार जाणून घ्या आणि ते केव्हा काय करीत आहेत याचा ठीक ठीक पत्ता मिळवत राहा आणि जे काही माहित होईल त्याची सूचना माझ्याकडे धाडीत जा. ॥२६॥
अप्रमादाच्च गन्तव्यं सर्वैरेव निशाचरैः ।
कर्तव्यश्च सदा यत्‍नो राघवस्य वधं प्रति ॥ २७ ॥
तुम्ही सर्व निशाचर सावधान राहून तेथे जा आणि रामाच्या वधासाठी सदा प्रयत्‍न करीत राहा. ॥२७॥
युष्माकं तु बलं ज्ञातं बहुशो रणमूर्धनि ।
अतश्चास्मिञ्जनस्थाने मया यूयं निवेशिताः ॥ २८ ॥
मला अनेक वेळा युद्धाच्या आरंभीच तुम्हा लोकांचा परिचय झालेला आहे म्हणून या जनस्थानात मी तुम्हा लोकांना ठेवण्याचा निश्चय केला आहे. ॥२८॥
ततः प्रियं वाक्यमुपेत्य राक्षसा
     महार्थमष्टावभिवाद्य रावणम् ।
विहाय लङ्‌कां सहिताः प्रतस्थिरे
     यतो जनस्थानमलक्ष्यदर्शनाः ॥ २९ ॥
रावणाचे हे महान्‌ प्रयोजनाने भरलेले प्रिय भाषण ऐकून ते आठ राक्षस त्याला प्रणाम करून अदृश्य होऊन एकदमच लंकेला सोडून जनस्थानाकडे प्रस्थित झाले. ॥२९॥
ततस्तु सीतामुपलभ्य रावणः
     सुसंप्रहृष्टः परिगृह्य मैथिलीम् ।
प्रसज्य रामेण च वैरमुत्तमं
     बभूव मोहान्मुदितः स रावणः ॥ ३० ॥
त्यानंतर मैथिली सीतेला प्राप्त करून तिला राक्षसींच्या देखरेखीखाली सोपवून रावणाला अत्यंत हर्ष झाला. श्रीरामाशी भारी वैर धरून तो राक्षस मोहवश आनंद मानू लागला. ॥३०॥
इत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीये आदिकाव्येऽरण्यकाण्डे चतुःपञ्चाशः सर्गः ॥ ५४ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकि निर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील अरण्यकाण्डाचा चौपन्नावा सर्ग पूरा झाला. ॥५४॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP