॥ श्रीमद् अध्यात्मरामायण ॥

॥ किष्किन्धाकाण्ड ॥

॥ प्रथमः सर्ग: ॥

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]सुग्रीवाशी मैत्री -


श्रीमहादेव उवाच
ततः सलक्ष्मणो रामः शनैः पम्पासरस्तटम् ।
आगत्य सरसां श्रेष्ठां दृष्ट्‍वा विस्मयमाययौ ॥ १ ॥
श्रीमहादेव म्हणाले- हे पार्वती, त्यानंतर लक्ष्मणासह श्रीराम हळूहळू पंपा सरोवराच्या तटावर आले. सरोवरांमध्ये श्रेष्ठ असे ते सरोवर पाहून ते विस्मयचकित झाले. (१)

क्रोशपात्रं सुविस्तीर्णं अगाधामलशम्बरम् ।
उत्फुल्लाम्बुजकह्लार कुमुदोत्पलमण्डितम् ॥ २ ॥
ते सरोवर एक कोसभर पसरलेले होते. त्यात अगाध, निर्मल पाणी होते. फुललेली कमळे, कल्हारे, कुमुदे आणि उत्पले यांनी ते मंडित झालेले होते. (२)

हंसकारण्डवाकीर्णं चक्रवाकादिशोभितम् ।
जलकुक्कुटकोयष्टि क्रौञ्चनादोपनादितम् ॥ ३ ॥
हंस आणि कारंडव या पक्ष्यांनी ते गजबजले होते. चक्रवाक इत्यादी पक्ष्यांनी ते शोभित झाले होते. पाणकोंबडे, कोठे आणि क्रौंच पक्ष्यांच्या आवाजांनी ते निनादित झाले होते. (३)

नानापुष्पलताकीर्णं नानाफलसमावृतम् ।
सतां मनःस्वच्छजलं पद्मकिञ्जल्कवासितम् ॥ ४ ॥
नाना प्रकारच्या पुष्यलतांनी ते भरले होते. नाना प्रकारच्या फलयुक्त वृक्षांनी ते घेरलेले होते. त्याचे पाणी सज्जनांच्या मनाप्रमाणे स्वच्छ होते. तसेच ते कमळांच्या परागांनी सुगंधित झालेले होते. (४)

तत्रोपस्पृश्य सलिलं पीत्वा श्रमहरं विभुः ।
सानुजः सरसस्तीरे शीतलेन पथा ययौ ॥ ५ ॥
तेथे त्या सरोवरातील पाण्यात स्नान करून व धाकट्या भावासह प्रभू राम ते शीण घालवणारे पाणी प्याले आणि मग ते त्या सरोवराच्या तीरावरून शीतल छायेने युक्त अशा मार्गावरून पुढे चालू लागले. (५)

ऋष्यमूकगिरेः पार्श्वे गच्छन्तौ रामलक्ष्मणौ ।
धनुर्बाणकरौ दान्तौ जटावल्कलमण्डितौ ।
पश्यन्तौ विविधान् वृक्षान् गिरेः शोभां सुविक्रमौ ॥ ६ ॥
हातात धनुष्य व बाण घेतलेले, इंद्रियनिग्रही, जटा आणि वल्कल यांनी मंडित तसेच अतिशय पराक्रमी राम व लक्ष्मण हे विविध वृक्ष आणि पर्वत यांची शोभा पाहात, ऋष्यमूक पर्वताच्या जवळून जात होते. (६)

ुग्रीवस्तु गिरेर्मूर्ध्नि चतुर्भिः सह वानरैः ।
स्थित्वा ददर्श तौ यान्तौ आरुरोह गिरेः शिरः ॥ ७ ॥
त्या वेळी चार वानर मंत्र्यासह पर्वताच्या माथ्यावर बसलेल्या सुग्रीवाने त्या दोघांना जाताना पाहिले. आणि तो त्या पर्वताच्या सर्वात उंच शिखरावर पळाला. (७)

भयादाह हनूमन्तं कौ तौ वीरवरौ सखे ।
गच्छ जानीहि भद्रं ते वटुर्भूत्वा द्विजाकृतिः ॥ ८ ॥
भयभीत होऊन सुग्रीव हनुमंताला म्हणाला, मित्रा, हे दोन श्रेष्ठ वीर कोण आहेत ? ब्राह्मण बटूचे रूप धारण करून तू त्यांच्याजवळ जा आणि ते कोण आहेत हे तू जाणून घे. तुझे कल्याण असो. (८)

वालिना प्रेषितौ किंवा मां हन्तुं समुपागतौ ।
ताभ्यां सम्भाषणं कृत्वा जानीहि हृदयं तयोः ॥ ९ ॥
त्यांना वालीने पाठविले आहे काय ? किंवा ते मला मारण्यासाठी आलेले आहेत काय ? या बाबतीत त्यांच्याशी संभाषण करून तू त्या दोघांचे मनोगत जाणून घे. (९)

यदि तौ दुष्टहृदयौ संज्ञां कुरु कराग्रतः ।
विनयावनतो भूत्वा एवं जानीहि निश्चयम् ॥ १० ॥
जर त्यांचे हृदय दुष्ट आहे असे तुला वाटले तर तू बोटांनी मला खूण कर. त्यांच्यापुढे विनयाने नम्र होऊन, तू हे सर्व खात्रीपूर्वक जाणून घे. (१०)

तथेति वटुरूपेण हनुमान् समुपागतः ।
विनयावनतो भूत्वा रामं नत्वेदमब्रवीत् ॥ ११ ॥
'ठीक आहे' असे म्हणून ब्रह्मचारी बटूचे रूप धारण करून हनुमान रामलक्ष्मणांचे जवळ गेला. विनयाने नम्र होऊन आणि रामांना नमस्कार करून तो म्हणाला. (११)

कौ युवां पुरुषव्याघ्रौ युवानौ वीरसम्मतौ ।
द्योतयन्तौ दिशः सर्वाः प्रभया भास्कराविव ॥ १२ ॥
अहो पुरुषश्रेष्ठांनो, तरूण, वीर पुरुषांना आदरणीय, सूर्याप्रमाणे स्वतःच्या प्रभेने सर्व दिशांना प्रकाशित करणारे तुम्ही दोघे कोण आहात ? (१२)

युवां त्रैलोक्यकर्तारौ इति भाति मनो मम ।
युवां प्रधानपुरुषौ जगद्धेतु जगन्मयौ ॥ १३ ॥
मायया मानुषाकारौ चरन्तौ इव लिलया ।
भूभारहरणार्थाय भक्तानां पालनाय च ॥ १४ ॥
माझ्या मनाला असे वाटते की तुम्ही दोघे त्रैलोक्य निर्माण करणारे आहात. विश्वाचे कारण असणारे, जगन्मय असणारे, प्रधान व पुरूष असे तुम्ही दोघे असून, तुम्ही मायेने मनुष्यरूप धारण करून, भूमीचा भार हरण करण्यासाठी आणि भक्तांचे पालन करण्यासाठी दोघे सहजपणे फिरत आहात. (१३-१४)

अवतीर्णौ इह परौ चरन्तौ क्षत्रियाकृती ।
जगत्स्थितिलयौ सर्गं लीलया कर्तुमुद्यतौ ॥ १५ ॥
तुम्ही दोघे श्रेष्ठ असून क्षत्रियांचे रूप धारण करून येथे पृथ्वीवर अवतीर्ण होऊन फिरत आहात. लीलेने जगाची उत्पत्ती, स्थिती आणि नाश करण्यास तयार झालेले, असे दिसता. (१५)

स्वतन्‍त्रौ प्रेरकौ सर्व हृदयस्थाविहेश्वरौ ।
नरनारायणौ लोके चरन्तौ इति मे मतिः ॥ १६ ॥
तुम्ही दोघे स्वतंत्र, सर्वांच्या हृदयात राहून प्रेरणा करणारे, ईश्वररूप असे नर आणि नारायण असून तुम्ही दोघे येथे फिरत आहात, असे मला वाटते. (१६)

श्रीरामो लक्ष्मणं प्राह पश्यैनं वटुरूपिणम् ।
शब्दशास्त्रमशेषेण श्रुतं नूनमनेकधा ॥ १७ ॥
ते ऐकल्यावर श्रीराम लक्ष्मणाला म्हणाले, या बटुरूप ब्रह्मचार्याला पाहा. याने खरोखर नाना प्रकारे संपूर्ण शब्दशास्त्र पढलेले दिसते. (१७)

अनेन भाषितं कृत्स्नं न किञ्चित् अपशब्दितम् ।
ततः प्राह हनूमन्तं राघवो ज्ञानविग्रहः ॥ १८ ॥
याच्या संपूर्ण बोलण्यात कोणताही चुकीचा शब्द नव्हता. त्यानंतर ज्ञानरूप राघव हनुमंताला म्हणाले. (१८)

अहं दाशरथी रामः त्वयं मे लक्ष्मणोऽनुजः ।
सीतया भार्यया सार्धं पितुर्वचनगौरवात् ॥ १९ ॥
आगतस्तत्र विपिने स्थितोऽहं दण्डके द्विज ।
तत्र भार्या हृता सीता रक्षसा केनचिन्मम ।
तां अन्वेष्टुं इहायातौ त्वं को वा कस्य वा वद ॥ २० ॥
"हे ब्राह्मणा, मी दशरथाचा पुत्र राम आहे. हा माझा धाकटा भाऊ लक्ष्मण आहे. पित्याची आज्ञा शिरसावंद्य मानून, सीता या माझ्या पत्‍नीसह येऊन दंडकारण्यात राहात होतो. तेथे माझ्या सीता या भार्येला एका राक्षसाने हरण करून नेले आहे. तिला शोधत शोधत आम्ही दोघे येथे आलो आहोत. तू कोण आहेस आणि कुणाचा आहेस हे सांग बरे ?" (१९-२०)

वटुरुवाच
सुग्रीवो नाम राजा यो वानराणां महामतिः ।
चतुर्भिर्मन्‍त्रिभिः सार्धं गिरिमूर्धनि तिष्ठति ॥ २१ ॥
बटू बोलला- महाबुद्धिमान सुग्रीव नावाचा जो वानरांचा राजा आहे, तो येथे पर्वताच्या माथ्यावर चार मंत्र्यांसह राहात आहे. (२१)

भ्राता कनियान् सुग्रीवो वालिनः पापचेतसः ।
तेन निष्कासितो भार्या हृता तस्येह वालिना ॥ २२ ॥
सुग्रीव हा दुष्ट मनाच्या वालीचा धाकटा भाऊ आहे. त्या वालीने सुग्रीवाला हाकलून देऊन त्याची बायको पळविली आहे. (२२)

तद्‌भयात् ऋष्यमूकाख्यं गिरिमाश्रित्य संस्थितः ।
अहं सुग्रीवसचिवो वायुपुत्रो महामते ॥ २३ ॥
हनुमान्नाम विख्यातो ह्यञ्जनीगर्भसम्भवः ।
तेन सख्यं त्वया युक्तं सुग्रीवेण रघूत्तम ॥ २४ ॥
त्या वालीच्या भीतीने सुग्रीव ऋष्यमूक नावाच्या पर्वताचा आश्रय घेऊन राहिला आहे. हे महाबुद्धिमान पुरुषा, मी सुग्रीवाचा मंत्री आहे. माझे 'हनुमान' हे नाव आहे. अंजनीपासून उत्पन्न झालेला मी वायूचा पुत्र आहे. हे रघुश्रेष्ठा, मला वाटते की त्या सुग्रीवाबरोबर मैत्री करणे हे तुमच्या दृष्टीने योग्य होईल. (२३-२४)

भार्यापहारिणं हन्तुं सहायस्ते भविष्यति ।
इदनीमेव गच्छाम आगच्छ यदि रोचते ॥ २५ ॥
तुमच्या भार्येचे अपहरण करणार्‍या राक्षसाला मारण्यास तो तुम्हाला सहायक होईल. जर तुम्हाला पसंत असेल, तर चला, आत्ताच आपण त्याच्याजवळ जाऊ या. (२५)

श्रीराम उवाच
अहमप्यागतस्तेन सख्यं कर्तुं कपीश्वर ।
सख्युस्तस्यापि यत्कार्यं तत्करिष्याम्यसंशयम् ॥ २६ ॥
श्रीराम म्हणाले- "हे कपिश्रेष्ठा, मीसुद्धा त्या सुग्रीवाशी मैत्री करण्यास आलो आहे. त्या मित्राचेसुद्धा जे कार्य असेल ते मी निःसंशयपणे करीन." (२६)

हनुमान् स्वस्वरूपेण स्थितो राममथाब्रवीत् ।
आरोहतां मम स्कन्धौ गच्छामः पर्वतोपरि ॥ २७ ॥
यत्र तिष्ठति सुग्रीवो मन्‍त्रिभिर्वालिनो भयात् ।
तथेति तस्यारुरोह स्कन्धं रामोऽथ कक्ष्मणः ॥ २८ ॥
तेव्हा स्वतःचे मूळ रूप धारण करून हनुमान तेथे उभा राहिला. मग तो श्रीरामाना म्हणाला, "तुम्ही दोघे माझ्या खांद्यावर आरूढ व्हा. वालीच्या भीतीने, आपल्या मंत्र्यांसह सुग्रीव पर्वताच्या शिखरावर जेथे राहात आहे तेथे आपण जाऊया." 'ठीक आहे' असे म्हणून श्रीराम तसेच लक्ष्मण हे त्याच्या खांद्यावर आरूढ झाले. (२७-२८)

उत्पपात गिरेर्मूर्ध्नि क्षणादेव महाकपिः ।
वृक्षच्छायां समाश्रित्य स्थितौ तौ रामलक्ष्मणौ ॥ २९ ॥
तो महावानर उ्ड्डाण करून एका क्षणातच पर्वताच्या माथ्यावर पोचला. तेथे एका वृक्षाच्या छायेत श्रीराम व लक्ष्मण उभे राहिले. (२९)

हमुमानपि सुग्रीवं उपगम्य कृताञ्जलिः ।
व्येतु ते भयमायातौ राजन् श्रीरामलक्ष्मणौ ॥ ३० ॥
हनुमानसुद्धा सुग्रीवाजवळ जाऊन हात जोडून त्याला म्हणाला, हे राजन, भिऊ नकोस. श्रीराम आणि लक्ष्मण येथे आलेले आहेत. (३०)

शीघ्रमुत्तिष्ठ रामेण सख्यं ते योजितं मया ।
अग्निं साक्षिणमारोप्य तेन सख्यं द्रुतं कुरु ॥ ३१ ॥
लौकर ऊठ. श्रीरामांशी तुझी मैत्री व्हावी, असे मी योजिले आहे. तेव्हा अग्नीला साक्षी ठेवून तू लगेच त्यांच्याशी सख्य कर. (३१)

ततोऽतिहर्षात्सुग्रीवः समागम्य रघूत्तमम् ।
वृक्षशाखां स्वयं छित्वा विष्टराय ददौ मुदा ॥ ३२ ॥
तेव्हा अतिशय आनंदाने सुग्रीव रघूत्तमाजवळ गेला. त्याने स्वतःच एका वृक्षाची फांदी तोडली आणि ती आसन म्हणून आनंदाने श्रीरामांना दिली. (३२)

हनूमाँल्लक्ष्मणायादात् सुग्रीवाय च लक्ष्मणः ।
हर्षेण महताविष्टाः सर्व एवावतस्थिरे ॥ ३३ ॥
हनुमानाने लक्ष्मणाला वृक्षाच्या शाखेचे आसन दिले तर लक्ष्मणाने सुग्रीवाला तसेच आसन दिले. अशा प्रकारे ते सर्वच जण अतिशय आनंदाने बसले. (३३)

लक्ष्मणस्त्वब्रवीत्सर्वं रामवृत्तान्तमादितः ।
वनवासाभिगमनं सीताहरेणमेव च ॥ ३४ ॥
त्यानंतर पहिल्यापासून प्रारंभ करून, वनवासात आगमन आणि सीतेचे अपहरण इत्यादी सर्व वृत्तांत लक्ष्मणाने कथन केला. (३४)

लक्ष्मणोक्तं वचः श्रुत्वा सुग्रीवो राममब्रवीत् ।
अहं करिष्ये राजेन्द्र सीतायाः परिमार्गणम् ॥ ३५ ॥
लक्ष्मणाचे बोलणे ऐकून सुग्रीव श्रीरामांना बोलला, हे राजेंद्रा, मी सीतेचा शोध करीन. (३५)

सहाय्यमपि ते राम करिष्ये शत्रुघातिनः ।
शृणु राम मया दृष्टं किञ्चित्ते कथवाम्यहम् ॥ ३६ ॥
आणि तुम्ही शत्रूचा वध करीत असताना मी तुम्हांला साहाय्य सुद्धा करीन. हे श्रीरामा, सीतेच्या संदर्भात मी जे काही पाहिले आहे, ते तुम्हांला सांगतो. ते तुम्ही ऐका. (३६)

एकदा मन्‍त्रिभिः सार्धं स्थितोऽहं गिरिमूर्धनि ।
विहायसा नीयमानां केनचित् प्रमदोत्तमाम् ॥ ३७ ॥
क्रोशन्तीं रामरामेति दृष्ट्‍वास्मान् पर्वतोपरि ।
आमुच्याभरणान्याशु स्वोत्तरीयेण भामिनी ॥ ३८ ॥
निरीक्ष्याधः परित्यज्य क्रोशन्ती तेन रक्षसा ।
नीताहं भूषणान्याशु गुहायामक्षिपं प्रभो ॥ ३९ ॥
एकदा मी मंत्र्यांसह पर्वतशिखरावर बसलो होतो. त्या वेळी कोणी तरी राक्षस आकाश मार्गाने एका श्रेष्ठ स्त्रीला पळवून नेत असताना आम्ही पाहिले. ती ' राम, राम ' असा आक्रोश करीत होती. पर्वतावर बसलेल्या आम्हांला पाहून त्या सुंदर स्त्रीने चटदिशी आपल्या अंगावरील अलंकार उतरवून ते आपल्या उत्तरीय वस्त्रात बांधले आणि आमच्याकडे पाहात खाली सोडले. हे प्रभो, ती स्त्री आक्रोश करीत असताना त्या राक्षसाने तिला पळवून नेले. ते अलंकार मी त्वरेने उचलले आणि एका गुहेत ठेवून दिले. (३७-३९)

इदानीमपि पश्य त्वं जानीहि तव वा न वा ।
इत्युक्‍त्वानीय रामाय दर्शयामास वानरः ॥ ४० ॥
आता तुम्ही ते बघा. आणि ते तुमचे आहेत की नाहीत हे पाहून घ्या. असे सांगून सुग्रीवाने ते अलंकार तेथे आणले आणि त्याने रामांना दाखविले. (४०)

विमुच्य रामस्तद्‍दृष्ट्‍वा हा सीतेति मुहुर्मुहुः ।
हृदि निक्षिप्य तत्सर्वं रुरोद प्राकृतो यथा ॥ ४१ ॥
उत्तरीय वस्त्राची गाठ सोडून, ते सर्व अलंकार पाहिल्यावर रामांनी ते ओळखले आणि ते सर्व आपल्या हृदयाशी धरून, एखाद्या सामान्य माणसाप्रमाणे 'हाय सीते ! हाय सीते !' असे वारंवार म्हणत, राम रडू लागले. (४१)

अश्वास्य राघवं भ्राता लक्ष्मणो वाक्यमब्रवीत् ।
अचिरेणैव ते राम प्राप्यते जानकी शुभा ।
वानरेन्द्रसहायेन हत्वा रावणमाहवे ॥ ४२ ॥
राघवांचे सांत्वन करीत लक्ष्मण बोलला, 'अहो रामा, वानराज सुग्रीवाच्या सहाय्याने युद्धात रावणाला ठार मारल्यावर, तुम्हांला लौकरच शुभलक्षणी सीता प्राप्त होईल.' (४२)

सुग्रीवोऽप्याह हे राम प्रतिज्ञां करवाणि ते ।
समरे रावणं हत्वा तव दास्यामि जानकीम् ॥ ४३ ॥
सुग्रीवसुद्धा म्हणाला, "हे रामा, मी तुमच्यापुढे प्रतिज्ञा करतो. युद्धामध्ये रावणाला ठार करून मी तुम्हांला जानकी मिळवून देईन." (४३)

ततो हनूमान्प्रज्वाल्य तयोरग्निं समीपतः ।
तावुभौ रामसुग्रीवौ अग्नौ साक्षिणि तिष्ठति ॥ ४४ ॥
बाहू प्रसार्य चालिङ्‌ग्य परस्परमकल्मषौ ।
समीपे रघुनाथस्य सुग्रीवः समुपाविशत् ॥ ४५ ॥
त्यानंतर त्या दोघांच्याजवळ हनुमानाने अग्नी पेटविला. तेव्हा अग्नी हा साक्षी म्हणून असताना, त्या दोघा पुण्यशील राम आणि सुग्रीव यांनी आपापले बाहू पसरून एकमेकांना आलिंगन दिले. तदनंतर सुग्रीव रघुनाथांच्या जवळ बसला. (४४-४५)

स्वोदन्तं कथयामास प्रणयाद् रघुनायके ।
सखे शृणु ममोदन्तं वालिना यत्कृतं पुरा ॥ ४६ ॥
आणि प्रेमाने तो रघुनायकांना स्वतःची हकीगत सांगू लागला. मित्रा, माझ्या बाबतीत वालीने पूर्वी जे काही केले तो सर्व वृत्तांत तुम्ही आता ऐका. (४६)

मयपुत्रोऽथ मायावी नाम्ना परमदुर्मदः ।
किष्किन्धां समुपागत्य वालिनं समुपाह्वयत् ॥ ४७ ॥
सिंहनादेन महता वाली तु तदमर्षणः ।
निर्ययौ क्रोधताम्राक्षो जघान दृढमुष्टिना ॥ ४८ ॥
एकदा अतिशय मदोन्मत्त, मायावी नावाचा मयाचा पुत्र किष्किंधा नगरीत आला आणि त्याने फार मोठा सिंहनाद करून वालीला युद्धासाठी आव्हान दिले. ते वालीला सहन झाले नाही. त्याचे डोळे रागाने लाल झाले. तो घरातून बाहेर आला आणि त्याने त्या मायावीला बळकट मुठीने तडाखा दिला. (४७-४८)

दुद्राव तेन संविग्नो जगाम स्वगुहां प्रति ।
अनुदुद्राव तं वाली मायाविनमहं तथा ॥ ४९ ॥
त्यामुळे व्याकूळ झालेला मायावी आपल्या गुहेकडे पळून गेला. तेव्हा वालीने आणि मीसुद्धा त्या मायावीचा पाठलाग केला. (४९)

ततः प्रविष्टमालोक्य गुहां मायाविनं रुषा ।
वाली मामाह तिष्ठ त्वं बहिर्गच्छाम्यहं गुहाम् ।
इत्युक्‍त्वाविश्य स गुहां मासमेकं न निर्ययौ ॥ ५० ॥
नंतर तो मायावी गुहेत शिरला आहे हे पाहून रागावलेला वाली मला म्हणाला, "तू बाहेरच थांब. मी आत गुहेत जातो." असे सांगून तो गुहेत शिरला. पण एक महिना झाला तरी तो बाहेर आला नाही. (५०)

मासादूर्ध्वं गुहाद्वारान् निर्गतं रुधिरं बहु ।
तद्‍दृष्ट्‍वा परितप्ताङ्‌गो मृतो वालीति दुःखितः ॥ ५१ ॥
एक महिना झाल्यावर, गुहेच्या दारातून पुष्कळ रक्त बाहेर आले. ते पाहून, "वाली मेला" असे वाटून मी दुःखी झालो आणि दुःखाने माझे अंग तप्त झाले. (५१)

गुहाद्वारि शिलामेकां निधाय गृहामागतः ।
ततोऽब्रवं मृतो वाली गुहायां रक्षसा हतः ॥ ५२ ॥
(तेव्हा मायावीने गुहेबाहेर येऊन मलाही मारू नये या हेतूने) मी गुहेच्या तोंडाशी एक शिळा ठेवली आणि मी घरी परत आलो आणि सर्वांना सांगितले की गुहेमध्ये राक्षसाकडून वाली मारला गेला आहे. (५२)

तच्छ्रुत्वा दुःखिताः सर्वे मामनिच्छन्तमप्युत ।
राज्येऽभिषेचनं चक्रुः सर्वे वानरमन्‍त्रिणः ॥ ५३ ॥
ते ऐकून सर्व जण दुःखी झाले आणि मग माझी इच्छा नसतानासुद्धा सर्व वानरमंत्र्यांनी मला राज्यपदावर अभिषेक केला. (५३)

शिष्टं तदा मया राज्यं किञ्चित्कालमरिन्दम ।
ततः समागतो वाली मामाह परुषं रुषा ॥ ५४ ॥
त्यानंतर हे शत्रुदमना रामा, काही काळ मी राज्यशासन केले. तितक्यात वाली परत आला आणि रागाने मला कठोर शब्द बोलू लागला. (५४)

बहुधा भर्त्सयित्वा मां निजघान च मुष्टिभिः ।
ततो निर्गत्य नगरात् अधावं परया भिया ॥ ५५ ॥
नाना प्रकारे माझी निर्भर्त्सना करून वाली मला मुठींनी मारू लागला. तेव्हा अतिशय घाबरून नगरातून बाहेर पडून मी धावत सुटलो. (५५)

लोकान् सर्वान्परिक्रम्य ऋष्यमूकं समाश्रितः ।
ऋषेः शापभयात्सोऽपि नायातीमं गिरिं प्रभो ॥ ५६ ॥
हे प्रभो, आसरा मिळविण्यासाठी मी सर्व लोकांतून हिंडलो आणि शेवटी या ऋष्यमूक पर्वताचा आश्रय घेतला. ऋषीचा शाप होईल या भीतीने वालीसुद्धा या पर्वताकडे येत नाही. (५६)

तदामि मम भार्यां स स्वयं भुङ्‌क्ते विमूढधीः ।
अतो दुःखेन सन्तप्तो हृतदारो हृताश्रयः ॥ ५७ ॥
वसाम्यद्य भवत्पाद संस्पर्शात्सुखितोऽस्म्यहम् ।
मित्रदुःखेन सन्तप्तो रामो राजीवलोचनः ॥ ५८ ॥
हनिष्यामि तव द्वेष्यं शीघ्रं भार्यापहारिणम् ।
इति प्रतिज्ञामकरोत् सुग्रीवस्य पुरस्तदा ॥ ५९ ॥
तेव्हांपासून दुष्ट बुद्धीचा वाली माझ्या पत्‍नीबरोबर राहात आहे आणि माझी पत्‍नी आणि आसरा मी गमावून बसलो आहे. त्यामुळे मी दुःखाने कुढत येथे राहात आहे. पण आज मात्र तुमच्या पायांच्या स्पर्शाने मी सुखी झालो आहे. तेव्हा मित्राच्या दुःखाने दुःखी झालेल्या कमलनयन रामांनी सुग्रीवासमोर प्रतिज्ञा केली की, "तुझ्या पत्‍नीचे अपहरण करणार्‍या तुझ्या शत्रूला मी लौकरच ठार करीन." (५७-५९)

सुग्रीवोऽप्याह राजेन्द्र वाली बलवतां बली ।
कथं हनिष्यति भवान् देवैरपि दुरासदम् ॥ ६० ॥
तेव्हा सुग्रीवसुद्धा म्हणाला, अहो राजेंद्र, वाली हा बलवानांमध्येही श्रेष्ट असा बलवान योद्धा आहे. देवांना सुद्धा जिंकण्यास कठीण असणार्‍या त्या वालीला तुम्ही कसे बरे ठार करू शकाल ? (६०)

शृणु ते कथयिष्यामि तद्‌बलं बलिनां वर ।
कदाचिद् दुन्दुभिर्नाम महाकायो महाबलः ॥ ६१ ॥
किष्किन्धां अगमद् राम महामहिषरूपधृक् ।
युद्धाय वालिनं रात्रौ समाह्वपत भीषणः ॥ ६२ ॥
हे बलवानातील पुरुषश्रेष्ठा, त्या वालीचे सामर्थ्य मी तुम्हांला सांगतो. ऐका. हे रामा, दुंदुभी नावाचा, प्रचंड शरीराचा व अतिशय सामर्थ्य संपन्न असा एक राक्षस प्रचंड रेड्याचे रूप धारण करून किष्किंधा नगरीत आला आणि त्या भयंकर राक्षसाने रात्रीच्या वेळी वालीला युद्धासाठी आव्हान दिले. (६१-६२)

तच्छ्रुत्वासहमानोऽसौ वाली परमकोपनः ।
महिषं शृङ्‌गयोर्धृत्वा पातयामास भूतले ॥ ६३ ॥
ते ऐकल्यावर आव्हान सहन न झालेला वाली अतिशय रागावला. त्याने त्या रेड्याची शिंगे धरून त्याला जमिनीवर आपटले. (६३)

पादेनैकेन तत्कायं आक्रम्यास्य शिरो महत् ।
हस्ताभ्यां भ्रामयंश्छित्त्वा तोलयित्वाक्षिपद्‌भुवि ॥ ६४ ॥
नंतर आपल्या एका पायाने त्याचे शरीर दाबून धरून, त्याने त्या रेड्याचे प्रचंड मस्तक आपल्या हातांनी पिरगाळून तोडून टाकले आणि ते जमिनीवर दूर भिरकावून दिले. (६४)

पपात तच्छिरो राम मातङ्‌गाश्रमसन्निधौ ।
योजनात्पतितं तस्मात् मुनेराश्रममण्डले ॥ ६५ ॥
रक्तवृष्टिः पपातोच्चैः दृष्ट्‍वा तां क्रोधमूर्च्छितः ।
मातङ्‌गो वालिनं प्राह यद्यागन्तासि मे गिरिम् ॥ ६६ ॥
इतः परं भग्नशिरा मरिष्यसि न संशयः ।
एवं शप्तस्तदारभ्य ऋष्यमूकं न यात्यसौ ॥ ६७ ॥
हे रामा, मग ते मस्तक मातंग ऋषीच्या आश्रमाजवळ जाऊन पडले. तेथून ते पुनः उसळून वर उडाल्यामुळे त्या मुनींच्या आश्रममंडलाच्या एक योजन परिसरात त्या मस्तकातून उंचावरून रक्ताची वृष्टी झाली. ती पाहून अतिशय क्रोधाविष्ट झालेले मातंग ऋषी वालीला म्हणाले, 'यापुढे जर तू माझ्या पर्वतावर येशील तर तुझे डोके फुटून तू मरून जाशील, यात संशय नाही.' अशा प्रकारे शाप मिळाल्यामुळे तेव्हापासून वाली या ऋष्यमूक पर्वतावर येत नाही. (६५-६७)

एतज्ज्ञात्वाहमप्यत्र वसामि भयवर्जितः ।
राम पश्य शिरस्तस्य दुन्दुभेः पर्वतोपमम् ॥ ६८ ॥
हे कळल्यावर मीसुद्धा निर्भय होऊन येथेच राहात आहे. श्रीरामा, कुंभीचे पर्वताप्रमाणे असणारे ते मस्तक पाहा. (६८)

तत्क्षणेपणे यदा शक्तः शक्तस्त्वं वालिनो वधे ।
इत्युक्‍त्वा दर्शयामास शिरस्तद्‌गिरिसन्निभम् ॥ ६९ ॥
ते मस्तक फेकून देण्यास जर तुम्ही समर्थ असाल तर तुम्ही वालीचा वध करू शकाल. असे बोलून सुग्रीवाने ते पर्वताप्रमाणे प्रचंड असणारे मस्तक रामांना दाखविले. (६९)

दृष्ट्‍वा रामः स्मितं कृत्वा पादाङ्‌गुष्ठेन चाक्षिपत् ।
दशयोजनपर्यन्तं तदद्‌भूतमिवाभवत् ॥ ७० ॥
ते पाहून रामांनी लीलया स्मित करीत आपल्या पायाच्या अंगठ्यानेच ते मस्तक दहा योजने दूर उडविले. ते एक आश्चर्यच होते. (७०)

साधु साध्विति सम्प्राह सुग्रीवो मन्‍त्रिभिः सह ।
पुनरप्याह सुग्रीवो रामं भक्तपरायणम् ॥ ७१ ॥
'छान ! छान !' असे मंत्र्यासह सुग्रीव उद्‌गारला. भक्तांचे श्रेष्ठ आश्रयस्थान असणार्‍या रामांना सुग्रीव पुन्हा म्हणाला. (७१)

एते ताला महासाराः सप्त पश्य रघूत्तम ।
एकैकं चालयित्वासौ निष्पत्रान् कुरुतेऽञ्जसा ॥ ७२ ॥
हे रघुश्रेष्ठा, हे पाहा, फार बळकट असणारे हे सात ताल वृक्ष आहेत. त्यांतील एकेकाला हलवून वाली त्यांना विनासायास पर्णहीन करतो. (७२)

यदि त्वमेकबाणेन विद्‍ध्वा छिद्रं करोषि चेत् ।
हतस्त्वया तदा वाली विश्वासो मे प्रजायते ।
तथेति धनुरादाय सायकं तत्र सन्दधे ॥ ७३ ॥
बिभेद च तदा रामः सप्त तालान्महाबलः ।
तालान्सप्त विनिर्भिद्य गिरिं भूमिं च सायकः ॥ ७४ ॥
पुनरागत्य रामस्य तूणीरे पूर्ववत्स्थितः ।
ततोऽपिहर्षात्सुग्रीवो राममाहातिविस्मितः ॥ ७५ ॥
जर तुम्ही एका बाणाने त्यांचा वेध घेऊन त्यांना छिद्र पाडाल, तर मला विश्वास वाटेल की वाली तुमच्याकडून मारला जाईल. तेव्हा महासामर्थ्यसंपन्न रामांनी 'ठीक आहे' असे म्हणून, धनुष्य घेऊन त्यावर बाण चढविला आणि त्या बाणाने सातही ताल वृक्षांचा वेध घेतला. तो बाण सात ताल वृक्ष, पर्वत व पृथ्वी यांना वेधून परत रामाच्या भात्यात पूर्वीप्रमाणे येऊन बसला. तेव्हा अतिशय विस्मयचकित झालेला सुग्रीव अत्यंत आनंदाने रामांना म्हणाला. (७३-७५)

देव त्वं जगतां नाथः परमात्मा न संशयः ।
मत्पूर्वकृतपुण्यौघैः सङ्‌गतोद्य मयास ह ॥ ७६ ॥
हे देवा, तुम्ही सर्व जगाचे स्वामी परमात्मा आहात यात संशय नाही. मी पूर्वी केलेल्या पुण्याच्या संचयामुळे आज तुमच्याबरोबर माझी भेट झाली आहे. (७६)

त्वां भजन्ति महात्मानः संसारविनिवृत्तये ।
त्वां प्राप्य मोक्षसचिवं प्रार्थयेऽहं कथं भवम् ॥ ७७ ॥
संसारबंधनाच्या निवृत्तीसाठी महात्मे लोक तुमचा आश्रय घेतात. मोक्षदायक तुम्ही मला प्राप्त झाल्यावर मी सांसारिक गोष्टींची कशी बरे इच्छा करू ? (७७)

दाराः पुत्रा धनं राज्यं सर्वं त्वन्मायया कृतम् ।
अतोऽहं देवदेवेश नाकाङ्‌क्षेऽन्यत्प्रसीद मे ॥ ७८ ॥
हे देवदेवेश्वरा, पत्‍नी, पुत्र, धन, राज्य हे सर्व काही तुमच्या मायेचे कार्य आहे. म्हणून मी तुमच्याशिवाय अन्य कशाचीही इच्छा करीत नाही. तुम्ही माझ्यावर प्रसन्न व्हा. (७८)

आनंदानुभवं त्वाद्य प्राप्तोहं भाग्यगौरवात् ।
मृदर्थं यतमानेन निधानमिव सत्पते ॥ ७९ ॥
हे सज्जनांच्या स्वामी, मातीच्या प्राप्तीसाठी खणण्याचा प्रयत्‍न करणार्‍याला द्रव्याचा साठा सापडावा, त्या प्रमाणे माझ्या थोर भाग्यामुळे आनंदाचा अनुभव देणारे तुम्ही मला मिळाले आहात. (७९)

अनाद्यविद्यासंसिद्धं बन्धनं छिन्नमद्य नः ।
यज्ञदानतपः कर्म पूर्तेष्टादिभिरप्यसौ ॥ ८० ॥
न जीर्यते पुनर्दार्ढ्यं भजते संसृतिः प्रभो ।
त्वत्पाददर्शनात्सद्यो नाशमेति न संशयः ॥ ८१ ॥
अनादी अविद्येमुळे उत्पन्न झालेले आमचे संसाराचे बंधन आज तुटले आहे. हे प्रभो, यज्ञ, दान, तप, इष्टापूर्त इत्यादी कर्मांनी हा संसारसुद्धा नष्ट होत नाही तर उलट तो बळकटच होत जातो. परंतु तुमच्या पायाच्या दर्शनाने मात्र तो ताबडतोब नाशाप्रत जातो, यात संशय नाही. (८०-८१)

क्षणार्धमपि यच्चित्तं त्वयि तिष्ठत्यचञ्चलम् ।
तस्याज्ञानमनर्थानां मूलं नश्यति तत्क्षणात् ॥ ८२ ॥
ज्याचे निश्चल झालेले चित्त अर्धा क्षणसुद्धा तुमच्या ठिकाणी स्थिर होते, त्याचे अज्ञान - जे सर्व अनर्थाचे मूळ आहे ते - त्याच क्षणी नष्ट होते. (८२)

तत्तिष्ठतु मनो राम त्वयि नान्यत्र मे सदा ॥ ८३ ॥
म्हणून हे रामा, माझे मनसुद्धा तुमच्या ठिकाणी राहू दे. ते अन्यत्र कुठेही जाऊ नये. (८३)

रामरामेति यद्वाणी मधुरं गायति क्षणम् ।
स ब्रह्महा सुरापो वा मुच्यते सर्वपातकैः ॥ ८४ ॥
ज्याची वाणी एक क्षणभर 'राम राम' असे मधुर गायन करते, तो ब्रह्मघातक असो अगर सुरा पिणारा असो, तो सर्व पातकांतून मुक्त होऊन जातो. (८४)

नकाङ्‌क्षे विजयं राम न च दारसुखादिकम् ।
भक्तिमेव सदाकाङ्‌क्षे त्वयि बन्धविमोचनीम् ॥ ८५ ॥
हे रामा, आता मला वालीवर विजय मिळविण्याची इच्छा उरली नाही, तसेच पत्‍नीचे सुख इत्यादी सुखे मिळविण्याची इच्छाही राहिलेली नाही. संसाराच्या बंधनातून मोकळे करणारी तुमच्या ठिकाणची सततची भक्ती आता मला हवी आहे. (८५)

त्वन्मायाकृतसंसारः त्वदंशोऽहं रघूत्तम ।
स्वपादभक्तिमादिश्य त्राहि मां भवसङ्‌कटात् ॥ ८६ ॥
हे रघुश्रेष्ठा, हा संसार तुमच्या मायेने निर्माण केलेला आहे. आणि मी तुमचाच अंश आहे. तुमच्या चरणांची भक्ती देऊन तुम्हीच संसाररूपी संकटातून माझे रक्षण करा. (८६)

पूर्वं मित्रार्युदासीनाः त्वन्मायावृतचेतसः ।
आसन्मेऽद्य भवत्पाद दर्शनादेव राघव ॥ ८७ ॥
सर्वं ब्रह्मैव मे भाति क्व मित्रं क्व च मे रिपुः ।
यावत्त्वन्मायया बद्धः तावद्‍गुणविशेषता ॥ ८८ ॥
तुमच्या मायेने माझे चित्त झाकलेले असल्यामुळे पूर्वी मला मित्र, शत्रू व उदासीन असे पुरुषांचे भेद वाटत होते. परंतु हे राघवा, आता मात्र तुमचे दर्शन झाल्यापासूनच 'सर्व काही ब्रह्म आहे' असे मला वाटत आहे. आता माझा कोण मित्र आहे आणि कोण शत्रू ? जोपर्यंत एकादा माणूस तुमच्या मायेने बद्ध झालेला असतो तोपर्यंतच त्याच्यावर सत्त्व इत्यादी गुणांचा विशेष प्रभाव पडत असतो. (८७-८८)

सा यावदस्ति नानात्वं तावद्‌भवति नान्यथा ।
यावन्नानात्वमज्ञानात् तावत्कालकृतं भयम् ॥ ८९ ॥
जोपर्यंत ती माया असते तोपर्यंतच या जगात सर्वत्र शत्रू मित्र, इत्यादी भेदभाव असतो, नाही तर नाही, आणि जोपर्यंत अज्ञानामुळे येणारा भेदभाव आहे, तोपर्यंत मृत्यूमुळे निर्माण होणारे भय असते. (८९)

अतोऽविद्यामुपास्ते यः सोऽन्धे तमसि मज्जति ।
मायामूलमिदं सर्वं पुत्रदारादिबन्धनम् ।
तदुत्सारय मायां त्वं दासीं तव रघूत्तम ॥ ९० ॥
म्हणून जो कोणी अज्ञानजनित पदार्थाची इच्छा करतो तो गाढ अशा अंधारात पडतो. पुत्र, पत्‍नी इत्यादी सर्व बंधन मायेमुळे निर्माण होते. हे रघुश्रेष्ठा, तुमची दासी असणारी ही माया माझ्यापासून दूर हाकलून द्या. (९०)

    त्वत्पादपद्मार्पितचित्तवृत्तिः -
त्वन्नामसङ्‌गीतकथासु वाणी ।
    त्वद्‌भक्तसेवानिरतौ करौ मे
त्वदङ्‌गसङ्‌गं लभतां मदङ्‌गम् ॥ ९१ ॥
माझ्या चित्ताची वृत्ती ही तुमच्या चरणकमळी लागलेली असो. माझी वाणी तुमच्या नामाचे संकिर्तन आणि तुमच्या कथा यांतच रमून राहू दे. माझे दोन्ही हात हे तुमच्या भक्तांची सेवा करण्यात रत होऊन जाऊ देत. आणि माझे शरीर हे तुमच्या पदस्पर्शाच्या निमित्ताने तुमच्या शरीराचा स्पर्श प्राप्त करून घेवो. (९१)

त्वन्मूर्तिभक्तान् स्वगुरुं च चक्षूः
    पश्यत्वजस्रं स शृणोति कर्णः ।
त्वज्जन्मकर्माणि च पादयुग्मं
    व्रजत्वजस्रं तव मन्दिराणि ॥ ९२ ॥
माझे डोळे हे तुमची मूर्ती, तुमचे भक्त आणि स्वतःचे गुरू यांचे दर्शन करू देत. माझे कान हे सतत तुमचा अवतार व त्यांतील तुमची लीला सतत ऐकोत आणि माझे दोन्ही पाय हे सतत तुमच्या मंदिराकडे वळोत. (९२)

अङ्‌गानि ते पादरजोविमिश्र-
    तीर्थानि बिभ्रत्वहिशत्रुकेतो ।
शिरस्त्वदीयं भवपद्मजाद्यैः-
    जुष्टं पदं राम नमत्वजस्रम् ॥ ९३ ॥
हे गरुडध्वजा, माझे अवयव हे तुमची चरणधूळ ज्यात मिसळली आहे अशा तीर्थजलांना धारण करोत आणि हे रामा, शंकर, ब्रह्मदेव इत्यादी देवगण ज्या तुमच्या चरणांची सतत सेवा करतात, त्या तुमच्या चरणांना माझे मस्तक सदा नमस्कार करो.(९३)

इति श्रीमद् अध्यात्मरामायणे उमामहेश्वरसंवादे
किष्किन्धाकाण्डे प्रथमः सर्गः ॥ १ ॥
इति श्रीमद् अध्यात्मरामायणे उमामहेश्वरसंवादे किष्किधाकांडे प्रथमः सर्गः ॥ १ ॥


GO TOP