॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥

॥ श्रीभावार्थरामायण ॥

सुंदरकांड

॥ अध्याय तिसावा ॥
असाळीवधाचे वर्णन

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

सीतेच्या आज्ञेला प्रमाण मानून त्याप्रमाणे वर्तन

हनुमंताचें युद्धकंदन । मुख्यत्वें वनविध्वंसन ।
घेवोनि सीतेचें आज्ञापन । फळभोजन मांडिलें ॥ १ ॥
जोंवरी होय क्षुधाहरण । पडलीं फळें खाय वेंचोन ।
घातली श्रीरामाची आण । फळें तोडोन न खावीं ॥ २ ॥
जानकीआज्ञा वंदोनि शिरीं । वनाची करावया बोहरी ।
हनुमान जाऊनियां दूरी । फळाहारीं बैसला ॥ ३ ॥
काळाग्नि आव्हाहूनि जठरीं । मग बैसला फळाहारी ।
वना आली महामारीं । वन संहारीं कपिपुच्छ ॥ ४ ॥
सीतेची आज्ञा प्रमाण । घातली श्रीरामाची आण ।
पुच्छें वृक्ष उपडोन । तळीं झाडोन फळें खाय ॥ ५ ॥
पहिलें साकरेंचें टेंक । सव्यें सेवी पित्तशामक ।
वृक्षउपाडा केला अनेक । भक्षोनि वृक्ष झुगारी ॥ ६ ॥
हनुमान आपोशन न मोडी । बैसली बैसका न सोडी ।
पुच्छ पुरवी नाना परवडी । वनीं वृक्ष उपडीं समूळ ॥ ७ ॥
कपिभोजन धर्मस्थिती । पहिलें द्विजां घाली तृप्ती ।
ते बैसविले दोहीं पंक्तीं । फळें अर्पीं अति प्रीतीं ॥ ८ ॥
द्विजशेष सेवी हनुमंत । तेणें होवोनियां तृप्त ।
धालेपणाचें ढेंकर देत । वनविघातें कपिपुच्छ ॥ ९ ॥
अनुसंधानावांचून । हनुमान नेघे अवदान ।
वनफळांचें भाग्य गहन । ब्रह्मार्पण कपिमुखें ॥ १० ॥
पिकलीं फळें रामार्पण । जारसीं करी कृष्णार्पण ।
हिरवीं करी ब्रह्मार्पण । सावधान प्रतिग्रासीं ॥ ११ ॥
फळें खात गटगटां । मिटक्या देतसें मटमटां ।
वांकुल्या दावी सुरश्रेष्ठा । दावी आंगोठा दैत्यांसी ॥ १२ ॥
पिकलीं खाय आवडीकरीं । हिरवीं तोंडपालटावरीं ।
पिंपळी मिरें कोशिंबिरी । लोणच्यावारीं खातसे ॥ १३ ॥
अलवणता वाटे ज्यासीं । सामुद्रिक मेळवीं त्यासीं ।
पुच्छ विध्वंसी वनासी । वृक्ष चौपासीं उपडोनि ॥ १४ ॥
ताळ तमाळ वृक्ष सरळीं । खर्जुरी पोफळी नारिकेळी ।
उपडोनि करी वडवाळी । रणकल्लोळीं हाणावया ॥ १५ ॥
राक्षससैन्य आतुर्बळी । रणीं करितां रवंदळी ।
हाणावया हातातळीं । करी वडवाळी वृक्षांच्या ॥ १६ ॥

वनकरांशी भांडण :

युद्ध होईल निश्चित । ऐसें जाणोनि हनुमंत ।
शिळा पाषाण वृक्ष पर्वत । आणिले तेथ युद्धार्थी ॥ १७ ॥
वृक्ष उपडितां कपींद्रें । जागीं जालीं वनकरें ।
म्हणती मारा रे मारा रे । वन वांनरें भंगिलें ॥ १८ ॥
बोंब उठिली एकसरीं । वन भंगिलें चौफेरीं ।
शस्त्र घेवोनि वनकरीं । वानरावरी लोटले ॥ १९ ॥
एक तळपती वोडणखांडें । एक विंधती लक्षोनि कांडें ।
एक हाणिती गोफणगुंडे । एक ते धोंडें टाकिती ॥ २० ॥
वन उपडिलें माकडें । सांगतां रावो मानील कुंडें ।
यासी धरावें रोकडें । रावणापुढें न्यावया ॥ २१ ॥
पुच्छ लांब आहे विशेष । टपोनि धरा म्हणती एक ।
एक म्हणती आवश्यक । घालूनि झडप धरूं यासी ॥ २२ ॥
ऐसी वनकरांची मात । ऐकोनियां हनुमंत ।
त्यांचा करावया घात । मग कृतांत क्षोभला ॥ २३ ॥
हाणितां पुच्छाचा पैं साट । त्यांची शस्त्रें करोनि पीठ ।
अवघे कवळोनि एकवट । बांधिली मोट वनकरांची ॥ २४ ॥
चौदा सहस्त्र वनकरां । पुच्छें बांधोनियां भारा ।
निक्षेपिलें पैं सागरा । मत्स्यमकरां आहारार्थ ॥ २५ ॥
राक्षसीं आटिती सीतेसी । तुवां संवाद केला ज्यासीं ।
तेणें मारोनि वनकरांसीं । केला वनासीं विध्वंस ॥ २६ ॥
एकीं सुटला अधोवात । एकी फळफळां मूतत ।
एकी चळचळां कांपत । मूर्च्छागत पैं एकी ॥ २७ ॥
द्वंद्वा पिटला वानरू । तुज धरू चिरूं मारूं ।
तुझ्या रक्ताचा घोट भरूं । गटका करूं सगळाचि ॥ २८ ॥
सीता गांजिता सुंदरी । हनुमान गुरूगुरी तयांवरी ।
भेणें पळाल्या निशाचरी । आपांपरीं ते ऐका ॥ २९ ॥
भेणें पळाली देहस्मृती । नेसणीं गळालीं नाठवें चित्तीं ।
नागव्या जावोनि रावणाप्रती । मग सांगती वनबोंब ॥ ३० ॥
कैचें नेणो आलें वानर । वन विध्वंसिले परिकर ।
चौदा सहस्त्र वनकर । पुच्छें समग्र मारिले ॥ ३१ ॥

किंकरांची योजना व त्यांचा संहार :

भरंवशाचे निधडे वीर । ऐशीं सहस्त्र किंकर ।
रावणें धाडिले सत्वर । आणा वानरा बांधोनि ॥ ३२ ॥
रणीं रगडोनि मारावी धूर । ऐसे ऐशीं सहस्त्र किंकर ।
शस्त्रें वर्षती अपार । शेखीं वानर बूजिला ॥ ३३ ॥
हनुमान विचारी पोटांत । मज न रूतती शस्त्रघात ।
साहोनियां शस्त्रसंपात । काय समस्त करितील ॥ ३४ ॥
हनुमान निश्चळ शस्त्रांतळी । तंव किंकरीं पिटिली टाळीं ।
वानरें केली रणरांगोळी । महाबळी आम्ही रणमारें ॥ ३५ ॥
घायीं तुटला निवटला । बाणीं तृणप्राय केला ।
ऐकोनि किंकरांच्या बोला । कपि कोपला रणरागें ॥ ३६ ॥
कपि पुच्छासीं सांगे गोष्टी । आजि निर्दाळू राक्षसकोटी ।
हाणितां पुच्छाच्या आघाटीं । जीवा साटी किंकरां ॥ ३७ ॥
लागता पुच्छाचा आघात । त्यांच्या शस्त्रां करोनि भस्मांत ।
किंकर मारिले समस्त । कपि गर्जत जयरामें ॥ ३८ ॥
मी तंव श्रीरामाचा दूत । सीता शुद्धीसी आलो हनुमंत ।
सीता सांपडली येथ । आला अंत राक्षसा ॥ ३९ ॥
राक्षसां करोनि रगडा । झाडीन इंद्रजिताचा पादाडा ।
रावण गांजोनियां गाढा । राम रोकडा आणीन ॥ ४० ॥
ऐकतां हनुमंताची मात । बोंब उठली लंकेआंत ।
ऐकोनि किंकरांचा घात । लंकानाथ दचकला ॥ ४१ ॥

जंबुमाळीचा वध :

प्रहस्तसुत आतुर्बळी । रागें धाडिला जंबुमाळी ।
कपि बांधोनि गळसमेळीं । मजजवळी आणावा ॥ ४२ ॥
जरी येसी कपि न मारून । तरी तुझे मस्तका मूत्रवपन ।
शेखीं नासिका छेदीन । खरारोहण विटंब ॥ ४३ ॥
जंबुमाळी क्रोधायमान । वर्षला शरधारा दारूण ।
पृथ्वी आकाश व्यापून । शरीं संपूर्ण कोंदलें ॥ ४४ ॥
माझ्या आंगीं बाण न रूपती । शंका न मानीच मारूती ।
रामनामाच्या आवृत्तीं । निःशंकस्थिति विचरत ॥ ४५ ॥
पंचक्रोश शिळा प्रचंड । वानरें हाणितली वितंड ।
जंबु धनुर्वाडा अखंड । केली शतखंड बाणें एकें ॥ ४६ ॥
कपि हाणितां वृक्षघाय । तोही केला तिळप्राय ।
हनुमान म्हणे धन्य माय । योद्धा होय जगजेठी ॥ ४७ ॥
माझे शिळाघाय वृक्षसमेळीं । निवारोनि महाबळी ।
योद्धा होय राक्षसकुळीं । जंबुमाळी महावीर ॥ ४८ ॥
अर्धचंद्रबाणसमेळीं । कपींद्र विंधिला कपाळीं ।
बाण हिसळोनि ते वेळीं । लागला निढळीं जंबूच्या ॥ ४९ ॥
लागतां बाणाचा आघात । जंबुमाळी पडे मूर्च्छित ।
हनुमान गदगदां हांसत । विपरीतार्थ येथें जाला ॥ ५० ॥
मज न रूपती तुझे बाण । तुझाचि घेवों पाहाती प्राण ।
आतां कायसें रे रण । जाय परतोन मी न मारीं ॥ ५१ ॥
ऐकोनि कपीचें वचन । जंबु विचारी आपण ।
परतलिया दंडील रावण । करूं निर्वाण युद्ध यासीं ॥ ५२ ॥
वनचामुंडावरददत्त । परिघ टाकिला घंटायुक्त ।
करावया हनुमंताचा घात । रागें सोडित राक्षस ॥ ५३ ॥
माझे परिघाचा घात । आजि निमाला हनुमंत ।
कैसेनि राखे रघुनाथ । रणपुरूषार्थ पाहों याचा ॥ ५४ ॥
परिघ येतां आंगापासीं । हनुमान उडाला आकांशी ।
वरदसामर्थ्यशक्ति कैसी । लावी परिघासी कपिपाठीं ॥ ५५ ॥
सवेग जातां हनुमंतासी । परिघ न संडी पाठिलागासी ।
विस्मयो करी कपि मानसीं । शस्त्राची ऐसी निजशक्ति ॥ ५६ ॥
विचारीं पडतां वानर । स्वर्गी उठिला हाहाकार ।
परिघ सुटला दुर्धर । आजि कपींद्र वांचेना ॥ ५७ ॥
ऐशा ऐकतां गोष्टी । परिघ येतां देखोनि पाठीं ।
कपिपुच्छें घातली आठी । चेपिली घांटी वनदेवतेची ॥ ५८ ॥
देवता म्हणे श्रीरामभक्ता । तुज मी शरण आलें आतां ।
शस्त्रदेवता समस्ता । शरणागता तुज होती ॥ ५९ ॥
शस्त्रशक्ति भूतशक्ती । मंत्रतंत्रयंत्रशक्ती ।
अवघ्या शरण तुज येती । मज मारूती वांचविल्या ॥ ६० ॥
सोडूनि पुच्छाचे बंधन । शस्त्रदेवता वांचवून ।
शक्तिमंडळा लोटांगण । घाली आपण हनुमंत ॥ ६१ ॥
मारूं नये शरणागता । म्हणोनि वांचविली शस्त्रदेवता ।
भूतीं देखोनि रघुनाथा । शक्ति समस्ता वंदिल्या ॥ ६२ ॥
उदो म्हणोनि समस्त शक्ती । हनुमंतातें ओंवाळिती ।
राक्षसां विमुख आम्ही समस्ती । साह्य युद्धार्थी श्रीरामा ॥ ६३ ॥
सीता आमुची आदिशक्ती । तिसी गांजितो लंकापती ।
रणीं राक्षसां लावोनि ख्याती । आम्ही युद्धार्थीं तुज साह्य ॥ ६४ ॥
हनुमान म्हणे पुच्छा जगजेठीं । युद्धीं माझी राखोनि पाठी ।
साह्य शक्ती कोट्यनुकोटी । पुच्छासाठीं मज जाल्या ॥ ६५ ॥
करोनि पुच्छाची पैं स्तुती । युद्धा परतला मारूती ।
परिघ देखोन त्याचे हातीं । जंबूचे चित्तीं चळकांप ॥ ६६ ॥
माझा परिघ हा तत्वतां । गेला हनुमंताचे हाता ।
रावणाच्या अधर्मता । शस्त्रदेवता क्षोभलिया ॥ ६७ ॥
ऐसें जंबु जंव विचारीं । तंव परिघ वाजिंनला शिरीं ।
रथसारथीचीं चकचुरी । जंबुची उरी नुरेचि ॥ ६८ ॥
रथ वारू ना सारथी । ना त्याचें शिर ना त्या अस्थी ।
पाहतां त्याची न दिसे व्यक्ती । नेले अव्यक्तीं वानरें ॥ ६९ ॥

अखयाकुमाराचा वध :

हनुमंतें जंबुमाळी । घायें केली रवंदळी ।
बोंब गेली रावणाजवळी । क्रोधानळीं भयभीत ॥ ७० ॥
मारावया पैं वानर । प्रधानपुत्र दश सहस्त्र ।
रागें धाडी दशशिर । महावीर रणयोद्धें ॥ ७१ ॥
ध्वज पताका रणप्रयुक्तीं । पुढें वाजंत्री वाजती ।
मागें माता शंख करिती । पुत्रसंतती निमाली ॥ ७२ ॥
प्रधानपुत्र गजभारीं । येतां देखोनि महागजरीं ।
हनुमान गर्जे भुभुःकारीं । पुच्छ अंबरीं तळपत ॥ ७३ ॥
पुच्छें कळवळोनि समस्त । हनुमान करी पर्वतघात ।
घायें निमाले समस्त । जाला प्राणांत समकाळें ॥ ७४ ॥
प्रधानपुत्रां केला घात । ऐकोनि धाके लंकानाथ ।
आतुर्बळी हनुमंत । काळकृतांत रणमारें ॥ ७५ ॥
रावण पडिला चिंतावर्तीं । रणीं नाटोपे मारूती ।
वीर मारोनि भद्रजाती । लाविली ख्याती राक्षसां ॥ ७६ ॥
रणकर्कश रणरगडे । पांच सेनानी निधडे ।
कपीसी मारावया रोकडे । धाडी वेगाढे युद्धासीं ॥ ७७ ॥
चौघे राहोनि चहूं दिशांसीं । एक राहोनि आकाशीं ।
मारावया हनुमंतासी । विकट विन्यासीं विंधिती ॥ ७८ ॥
कपिपुच्छ महाबळी । त्यांचे शस्त्रा करोनि होळी ।
पांच जणांतें आकळी । पुच्छसमेळी कवळोन ॥ ७९ ॥
स्वयें योगिया आपण । जेंवी निरोधी पंच प्राण ।
तेंवी कपिपुच्छें पांच जण । आकळोन राखिले ॥ ८० ॥
विवेकवैराग्यसंपन्न । पंचविषयां करिती दमन ।
तेंवी कपिपुच्छें पांच जण । निर्बंधून राखिले ॥ ८१ ॥
पंचभूतांची निवृत्ती । गेलिया सुख पावे परमार्थीं ।
पांचही मारोनि पर्वतघातीं । सुखें मारूती सुखावे ॥ ८२ ॥
एकेचि घाये कपी आपण । घेतला पांचांचाही प्राण ।
ऐकोनि दचकला रावण । सेना प्रधान कांपती ॥ ८३ ॥
रावणा कोप आला दुर्धर । रणीं मारावया वानर ।
स्वयें धाडिला अखया कुमर । रणचतुर दिव्यमारें ॥ ८४ ॥
अखया जाणे रणकंदनार्थ । शस्त्रीं अस्त्रीं अतर्क्य घात ।
निरालंबी चढवोनि रथ । मारी हनुमंत साटोपे ॥ ८५ ॥
आज्ञा देता दशानना । तुरें वाजती निशाणां ।
अखया आला अशोकवना । रथछत्रसेनागजदळें ॥ ८६ ॥
अखया शरसंपातीं । रणीं आच्छादिला मारूती ।
वीर सिंहनाद करिती । मारिला म्हणती वानर ॥ ८७ ॥
अखयाविजयाची नवायी । वाजंत्र्यांची लागली एकचि घायी ।
ह्नुमंतें तिये समयी । केलें कायी तें ऐका ॥ ८८ ॥
भोंवता पुच्छाचा पैं साट । त्याचीं शस्त्रें करोनि पिष्ट ।
सैन्य मारिलें समसगट । अखया उद्‌भट त्रासिला ॥ ८९ ॥
पुच्छें आकळितां अखयासी । रथ उडविला आकाशीं ।
धरितां न धरवे हनुमंतासी । लघुलाघवेंसीं तळपत ॥ ९० ॥
हनुमान अखया दोन्ही वीर । युद्ध करिती निराधार ।
विस्मयो करिती सुरवर । चक्राकारपरिभ्रमती ॥ ९१ ॥
क्षणैक क्षितीं क्षणैक अंबरीं । क्षणैक रथ दिसे सागरीं ।
क्षणैक दिसे त्रिकूटावरी । अखया भारी लाघवी ॥ ९२ ॥
पुच्छ कोपोनि लागें पाठीं । रथ पळतां दिक्पुटीं ।
पुच्छें बांधोनि कडकडाटीं । रागें आपटी भूतळीं ॥ ९३ ॥
रथ आपटितांचि क्षिती । वोडणखांडें घेवोनि हातीं ।
अखया उसळोनि लघुगती । मारूं मारूती धाविंनला ॥ ९४ ॥
मारावया हनुमंत । वोडणखड्गेंसीं तळपत ।
कपीचा करावया घात । गगनाआंत उसळला ॥ ९५ ॥
अखया उडतां आकाशीं । हनुमंतें धरिला पायांसीं ।
गरगरां भोंवंडितां त्यासी । देहभावासी विसरला ॥ ९६ ॥
खड्ग पडिलें मातेचे वाडां । मुकुट पडिला रावणापुढां ।
ओडण पडिलें लंकेच्या कडां । केला नितोडा बळाचा ॥ ९७ ॥
आपटितांचि शिळातळीं । निधा उठिला पाताळीं ।
दिग्गजांची बैसलीं टाळी । झाली रांगोळी हाडांची ॥ ९८ ॥
करितां अखया समाप्ती । हनुमंताची अगाध किर्ती ।
स्वर्गीं सुरवर वानिती । वानिती क्षितीं ऋषीश्वर ॥ ९९ ॥
मुकुट पडतांचि पुढें । वार्ता ऐकतां रावण रडे ।
म्हणे म्यांच केले कुडें । पुत्र कां पुढे ढाडिला ॥ १०० ॥

रावणाचा शोकावेग व स्वतः जाण्याची तयारी :

वानरें अखया पाडिला धरणीं । बोंब आली वनींहूनी ।
रावण धुळी घाली वदनीं । पडिला धरणीं मूर्च्छित ॥ १०१ ॥
पुत्रशोकें कंपायमान । क्रोधें झाला सावधान ।
माझें जें अशोकवन । शोकस्थान तें झालें ॥ १०२ ॥
रणीं मर्दिलें वानरें । वीरीं घेतलें घायवारें ।
अखयाचेनि कैवारें । धाडावया दुसरें दिसेना ॥ १०३ ॥
घ्यावया अखयाच्या सुडासी । मीच जाईन वनासी ।
वानरा मारीन निश्चयेंसीं । कास सरसी घातली ॥ १०४ ॥
म्यां मारिलिया तो वानरे । अखयाचा सूड पावला खरें ।
मज मारिलिया निर्धारें । सीता सुंदरी निर्मुक्त ॥ १०५ ॥
ऐसा करोनि विचार । युद्धा निघाला दशशिर ।
तंव वेगें धांविला ज्येष्ठ कुमर । महावीर इंद्रजित ॥ १०६ ॥

इंद्रजिताची इच्छा :

म्हणे एकलें वनचर । केवळ जें कां पालेखाइर ।
त्यावरी जाणें लंकेश्वर । श्रेष्ठ विचार हा नोहे ॥ १०७ ॥
वीरीं घेतला रणधाक । म्हणोनि जाणें दशमुख ।
मी तंव घरगुती सेवक । अवश्यक मज धाडीं ॥ १०८ ॥
वाहतों सदाशिवाची आण । शिवतों स्वामी तुझें चरण ।
वानरा रणीं न मारून । गळां बांधोन आणीन ॥ १०९ ॥
निराहारी ब्रह्मचारी । तो इंद्रजितातें मारी ।
इंद्रजित न मारवे कपीच्या करीं । हा फळाहारी यथेष्ट ॥ ११० ॥
ऐसें विचारोनि रावण । इंद्रजितासी दिधलें आज्ञापन ।
रणीं वानरां गांजून । गळां बांधोन आणावें ॥ १११ ॥
इंद्रजित युद्धा निघतां वेळीं । निशाणें त्राहाटिली तें काळीं ।
कंगल टोप राघावळी । केली आरोळी महावीरीं ॥ ११२ ॥
शायसीं प्रयुत मत्तहस्ती । कोट्यनुकोटी महारथी ।
अनिवार नेणों किती । वीर पदाती असंख्यात ॥ ११३ ॥
वीरां कवचें रत्‍नखचित । शस्त्रें सैन्य लखलखित ।
पाखरा तेजीं झळकत । वीर गर्जत सिंहनादें ॥ ११४ ॥
तडक फुटले एकसरें । भिंडिमाळांचे पांगोरे ।
खाखाइलीं रणतुरें । निजगजरें चालिले ॥ ११५ ॥

इंद्रजिताला झालेले अपशकुन, ब्रह्मदेवाचे भविष्य

इंद्रजित निघतां उल्हासेंसीं । नग्न कुमारी शिंके पाठीसीं ।
आशंका पडली इंद्रजितासी । रावणासी चळकांप ॥ ११६ ॥
चिन्ह पुसतां ब्रह्मयासी । भविष्य कळलें तयासीं ।
तोही तैसांचि सांगे त्यासी । अति गुह्यासीं गुह्योक्ति ॥ ११७ ॥
युद्ध करितां वानरांसीं । अपेश यशी यश अपेशीं ।
इंद्रजित बांधोनि कपीसी । तुजपासीं आणील ॥ ११८ ॥
ऐकोनि ब्रह्मयाचें वचन । जयजयकारें स्वयें गर्जोन ।
इंद्रजितें केलें नमन । पुढील कथन अवधारा ॥ ११९ ॥
येतां देखोनि इंद्रजित । आनंदें नाचे हनुमंत ।
पुरवावया युद्धमनोरथ । श्रीरघुनाथ तुष्टला ॥ १२० ॥
पुच्छ नाचवीत रणीं । चौफेरेंसीं सैन्य आकळोनि ।
रणीं मारोनि वीरश्रेणीं । रूधिरें धरणीं न्हाणीन ॥ १२१ ॥
कपिपुच्छ विचक्षण । भूतां दिधलें आमंत्रण ।
मांसभक्षण रूधिरपान । रणभोजन करावें ॥ १२२ ॥
वधोनि राक्षसांच्या कोडी । ज्याचे पोटीं जे आवडी ।
ते ते पुरवीन परवडी । वाढावाढी रणमारें ॥ १२३ ॥
आतांचि हे भाजीभाकरी । तुम्हीं करावी न्याहारी ।
पुढें श्रीराम नरकेसरी । पंचधारीं निववील ॥ १२४ ॥

असाळीचे विदारण :

इंद्रजित येता सहदळीं । पुढें धांविंनली असाळी ।
जेणें मारिला अखया बळी । त्याची होळी मी करीन ॥। १२५ ॥
ठाकोनि आली अशोकवन । पुढां हनुमंतें लक्षोन ।
विकट वटारिले नयन । विक्राळ वदन पसरोनी ॥ १२६ ॥
एक जाभाडें भूतळीं । दुजें लाविलें नभोमंडळीं ।
कराळ विक्राळ दांताळी । जिव्हा काळी लवथवित ॥ १२७ ॥
अणुप्रमाण होवोनि तेथ । जिव्हा दांतां नातळत ।
वेगीं रिघाला घशांत । गेला उदरांत मारूती ॥ १२८ ॥
मुखीं रिघाला मारूती । नातळेचि जिव्हादांतीं ।
असाळी विस्मयो मानी चित्ती । ठकिलें निश्चितीं वानरें ॥ १२९ ॥
गोड कडु कीं खारट । आंबट तिखट कीं तुरट ।
कांहीं चवी न कळे स्पष्ट । अहा कटकट राक्षसीं ॥ १३० ॥
कपि न मरेचि माझे हातीं । वानर गेला अतर्क्यगती ।
पुढें काय करील ख्याती । जीवीं धाकली असाळी ॥ १३१ ॥
इंद्रजितासीं करावया रण । हनुमंतांसीं आवडी पूर्ण ।
तिच्या उदरीं न राहे एक क्षण । केलें विंदाण तें ऐका ॥ १३२ ॥
काळीज उपडोनि सदेंठ । बेंबीपासी फाडोनि पोट ।
हनुमान रिघोनियां स्पष्ट । केला उद्‌भटा भुभुःकार ॥ १३३ ॥
असाळियें गिळीला हनुमंत । कथा विस्तारिली लोकाआंत ।
चुकला इंद्रजिताचा अनर्थ । युद्धकंदनार्थ सैन्याचा ॥ १३४ ॥
पूर्वींच गिळीती वानर । तरी कां मरता अखया कुमर ।
वनकर किंकर प्रधान पुत्र । जंबुवीर वांचता ॥ १३५ ॥
रावणा हरिखें सांगे दूत । असाळियें गिळीला हनुमंत ।
सवेंच दुसरी बोंब सांगत । केला निःपात असाळीचा ॥ १३६ ॥
क्रौंचां मारिली पडलंकां । विटंबिली शूर्पणखा ।
आतां मारिली असाळिका । कोण कोण दुःखा मी सोसूं ॥ १३७ ॥
जो रिघोनि उदरांआत । करी राक्षसिणींचा निःपात ।
तो इंद्रजिताचा करील घात । चळीं कांपत रावण ॥ १३८ ॥
एकाजनार्दना शरण । जालें असाळीनिर्दळण ।
पुढें इंद्रजितहनुमद्रण । सावधान अवधारा ॥ १३९ ॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे सुंदरकांडे एकाकारटीकायां
ब्रह्मलिखितहनुमन्नसाळीवधो नाम त्रिंशत्तमोऽध्यायः ॥ ३० ॥
॥ ओव्यां १३९ ॥ श्लोक - ॥ एवं संख्या १३९ ॥



GO TOP