श्रीरामेण सीतां प्रति सरिद्वराया मन्दाकिन्याः सुषमाया वर्णनम् -  
 |  
 
श्रीरामांनी सीतेला मंदाकिनी नदीची शोभा वर्णन करणे - 
 | 
अथ शैलाद् विनिष्क्रम्य मैथिलीं कोसलेश्वरः ।  
अदर्शयच्छुभजलां रम्यां मन्दाकिनीं नदीम् ॥ १ ॥  
 |  
 
त्यानंतर पर्वतावर निघून कोसलनरेश श्रीरामचंद्रांनी मैथिलीला पुण्यसलिला रमणीय मंदाकिनी नदीचे दर्शन घडविले. ॥ १ ॥ 
 | 
अब्रवीच्च वरारोहां चन्द्रचारुनिभाननाम् ।  
विदेहराजस्य सुतां रामो राजीवलोचनः ॥ २ ॥  
 |  
 
आणि त्या समयी कमलनयन श्रीरामांनी चंद्राप्रमाणे मनोहर मुख आणि सुंदर कटिप्रदेश असणार्या विदेहराज नंदिनी सीतेला याप्रमाणे म्हटले - ॥ २ ॥
 | 
विचित्रपुलिनां रम्यां हंससारससेविताम् ।  
कुसुमैरुपसंपन्नां पश्य मन्दाकिनीं नदीम् ॥ ३ ॥  
 |  
 
’प्रिये ! आता मंदाकिनी नदीची शोभा पहा. हंस आणि सारसांनी सेवित होण्यामुळे ही किती सुंदर दिसत आहे. हिचा किनारा फार विचित्र आहे. नाना प्रकारची फुले हिची शोभा वाढवित आहेत. ॥ ३ ॥ 
 | 
नानाविधैस्तीररुहैर्वृतां पुष्पफलद्रुमैः ।  
राजन्तीं राजराजस्य नलिनीमिव सर्वतः ॥ ४ ॥  
 |  
 
फळा फुलांच्या भारांनी लगडलेल्या नाना प्रकारच्या तटवर्ती वृक्षांनी घेरलेली ही मंदाकिनी कुबेराच्या सौगंधिक सरोवराप्रमाणे सर्व बाजूंनी सुशोभित होत आहे. ॥ ४ ॥ 
 | 
मृगयूथनिपीतानि कलुषाम्भांसि सांप्रतम् ।  
तीर्थानि रमणीयानि रतिं सञ्जनयन्ति मे ॥ ५ ॥  
 |  
 
’हरिणांच्या झुंडेनी पाणी पिऊन जरी या वेळी येथील जल गढूळ केले आहे, तथापि हिचे रमणीय घाट माझ्या मनाला मोठा आनंद देत आहेत. ॥ ५ ॥ 
 | 
जटाजिनधराः काले वल्कलोत्तरवाससः ।  
ऋषयस्त्ववगाहन्ते नदीं मन्दाकिनीं प्रिये ॥ ६ ॥  
 |  
 
’प्रिये ! हे पहा. जटा, मृगचर्म आणि वल्कलाचे उत्तरीय धारण करणारे महर्षि उपयुक्त समयी येऊन या मंदाकिनी नदीत स्नान करीत आहेत. ॥ ६ ॥ 
 | 
आदित्यमुपतिष्ठन्ते नियमादूर्ध्वबाहवः ।  
एते परे विशालाक्षि मुनयः संशितव्रताः ॥ ७ ॥  
 |  
 
’विशाल लोचने ! हे दुसरे मुनि जे कठोर व्रताचे पालन करणारे आहेत, नैत्यिक नियमांमुळे दोन्ही भुजा उंच करून सूर्याचे उपस्थान करीत आहेत. ॥ ७ ॥ 
 | 
मारुतोद्धूतशिखरैः प्रनृत्त इव पर्वतः ।  
पादपैः पुष्पपत्राणि सृजद्भिरभितो नदीम् ॥ ८ ॥  
 |  
 
’वार्याच्या झोताने ज्यांच्या डहाळ्या हलत आहेत आणि त्यामुळे जे मंदाकिनी नदीच्या उभय तटावर फुले आणि पाने विखरून टाकीत आहेत अशा वृक्षांनी उपलक्षित झालेला हा पर्वत जणु नृत्यच करीत आहे असे भासते आहे. ॥ ८ ॥ 
 | 
क्वचिन्मणिनिकाशोदां क्वचित् पुलिनशालिनीम् ।  
क्वचित् सिद्धजनाकीर्णां पश्य मन्दाकिनीं नदीम् ॥ ९ ॥  
 |  
 
’पहा मंदाकिनी नदीची कशी शोभा आहे. कोठे तर तिच्यात मोत्यांच्या सारखे स्वच्छ जल वहात आहे असे दिसून येत आहे, तर काही ठिकाणी ही वालुकेच्या ढिगांनीच शोभत आहे (तेथील जल त्या वालुका राशीमुळे लपले जाण्याने दिसून येत नाही) आणि काही ठिकाणी सिद्धजन तिच्यात अवगाहन करीत असल्याने त्यांच्या योगेच ती व्याप्त झालेली दिसत आहे. ॥ ९ ॥ 
 | 
निर्द्धूतान् वायुना पश्य विततान् पुष्पसञ्चयान् ।  
पोप्लूयमानानपरान् पश्य त्वं जलमध्यमे ॥ १० ॥  
 |  
 
’हे तनुमध्यमे ! पहा, वायुच्या द्वारा उडून आणली गेलेली ही ढिगभर फुले कशा प्रकारे मंदाकिनीच्या दोन्ही तटावर पसरलेली आहेत आणि ते दुसरे पुष्पसमूह तिच्या पाण्यावर तरंगत आहेत. ॥ १० ॥ 
 | 
पश्यैतद्वल्गुवचसो रथाङ्गाह्वयना द्विजाः ।  
अधिरोहन्ति कल्याणि निष्कूजन्तः शुभा गिरः ॥ ११ ॥  
 |  
 
कल्याणी ! पहा तर खरे, हे मधुर बोली बोलणारे चक्रवाक पक्षी किती सुंदर कलरव करीत कशा प्रकारे नदीच्या तटावर आरूढ होत आहेत. ॥ ११ ॥ 
 | 
दर्शनं चित्रकूटस्य मन्दाकिन्याश्च शोभने ।  
अधिकं पुरवासाच्च मन्ये च तव दर्शनात् ॥ १२ ॥  
 |  
 
शोभने ! येथे जे प्रतिदिन चित्रकूटाचे आणि मंदाकिनीचे दर्शन होत आहे, ते नित्य निरंतर तुझे दर्शन होण्यामुळे अयोध्या निवासापेक्षाही अधिक सुखद वाटत आहे. ॥ १२ ॥ 
 | 
विधूतकल्मषैः सिद्धैस्तपोदमशमान्वितैः ।  
नित्यविक्षोभितजलां विगाहस्व मया सह ॥ १३ ॥  
 |  
 
’या नदीत प्रतिदिन तपस्या, इंद्रियसंयम आणि मनोनिग्रहाने संपन्न सिद्ध महात्म्यांच्या अवगाहन करण्याने हिचे जल विक्षुब्ध होत राहते आहे. चल, तूही माझ्या बरोबर हिच्यात स्नान कर. ॥ १३ ॥ 
 | 
सखीवच्च विगाहस्व सीते मन्दाकिनीं नदीम् ।  
कमलान्यवमज्जन्ती पुष्कराणि च भामिनि ॥ १४ ॥  
 |  
 
’भामिनी सीते ! एक सखी ज्याप्रमाणे दुसर्या सखीबरोबर क्रीडा करीत असते त्याच प्रकारे तूही मंदाकिनी नदीमध्ये उतरून हिच्या लाल आणि श्वेत कमलांना पाण्यात बुडवून हिच्यामध्ये स्नान क्रीडा कर. ॥ १४ ॥ 
 | 
त्वं पौरजनवद् व्यालानयोध्यामिव पर्वतम् ।  
मन्यस्व वनिते नित्यं सरयूवदिमां नदीम् ॥ १५ ॥  
 |  
 
’प्रिये ! तू या वनातील रहिवाश्यांना पुरवासी मनुष्याप्रमाणे समज, चित्रकूट पर्वताला अयोध्येच्या तुल्य मान आणि या मंदाकिनी नदीला शरयू सदृश जाण. ॥ १५ ॥ 
 | 
लक्ष्मणश्चापि धर्मात्मा मन्निदेशे व्यवस्थितः ।  
त्वं चानुकूला वैदेहि प्रीतिं जनयती मम ॥ १६ ॥  
 |  
 
’वैदेही ! धर्मात्मा लक्ष्मण सदा माझ्या आज्ञेच्या अधीन राहात आहे आणि तूही माझ्या मनास अनुकूलच वागत आहेस, यामुळे मला फार प्रसन्नता होत आहे. ॥ १६ ॥ 
 | 
उपस्पृशंस्त्रिषवणं मधुमूलफलाशनः ।  
नायोध्यायै न राज्याय स्पृहये च त्वया सह ॥ १७ ॥  
 |  
 
’प्रिये तुझ्या बरोबर तिन्ही काळ स्नान करून मधुर फलमुळाचा आहार करीत मी अयोध्येला जाण्याची इच्छाच करीत नाही, अथवा राज्य मिळविण्याचीही इच्छा करीत नाही. ॥ १७ ॥ 
 | 
इमां हि रम्यां मृगयूथलोडितां  
    निपीततोयां गजसिंहवानरैः ।  
सुपुष्पितां पुष्पभरैरलङ्कृतां  
    न सोऽस्ति यः स्यान्न गतक्लमः सुखी ॥ १८ ॥  
 |  
 
’जिला हत्तींचा समूह घुसळून काढीत असतो, तसेच सिंह आणि वानरे जिचे पाणी पीत असतात आणि जिच्या तटावर सुंदर फुलांनी लगडलेले वृक्ष शोभून दिसत असतात, आणि जी पुष्पसमूहांनी अलंकृत आहे, अशा या रमणीय मंदाकिनी नदीमध्ये स्नान करून जो ग्लानीरहित आणि सुखी होणार नाही असा मनुष्य या संसारात नाही." ॥ १८ ॥ 
 | 
इतीव रामो बहुसङ्गतं वचः  
    प्रियासहायः सरितं प्रति ब्रुवन् ।  
चचार रम्यं नयनाञ्जनप्रभं  
    स चित्रकूटं रघुवंशवर्धनः ॥ १९ ॥  
 |  
 
रघुवंशाची वृद्धी करणारे श्रीराम मंदाकिनी नदीसंबंधी अशा अनेक प्रकारच्या सुसंगत गोष्टी करीत नीलकांति असलेल्या रमणीय चित्रकूट पर्वतावर आपली प्रियपत्नी सीता हिच्यासह विचरण करू लागले. ॥ १९ ॥ 
 | 
इत्यार्षे श्रीमद्रामायणे वाल्मीकीये आदिकाव्येऽयोध्याकाण्डे पञ्चनवतितमः सर्गः ॥ ९५॥  
 |  
 
या प्रकारे श्रीवाल्मीकि निर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील अयोध्या काण्डाचा पंच्याण्णवावा सर्ग पूरा झाला ॥ ९५ ॥ 
 |