[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीमद् वाल्मीकि रामायणे
सुन्दरकाण्डे
॥ सप्तचत्वारिंशः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचन्द्राभ्यां नमः ॥
रावणेरक्षस्य पराक्रमे वधश्च -
रावणपुत्र अक्षकुमाराचा पराक्रम आणि वध -
सेनापतीन् पञ्च स तु प्रमापितान्
हनूमता सानुचरान् सवाहनान् ।
समीक्ष्य राजा समरोद्धतोन्मुखं
कुमारमक्षं प्रसमैक्षताक्षम् ॥ १॥
हनुमन्ताने वाहने आणि अनुयायी यांच्यासह आपल्या पाचही सेनापतींचा वध केल्याचे ऐकून राक्षसराज रावणाने आपल्या समोरच बसलेल्या आपल्या पुत्राकडे - अक्षकुमाराकडे पाहिले की जो संग्रामामध्ये भयंकर आणि युद्धाविषयी उत्सुक राहणारा होता. ॥१॥
स तस्य दृष्ट्यर्पणसम्प्रचोदितः
प्रतापवान् काञ्चनचित्रकार्मुकः ।
समुत्पपाताथ सदस्युदीरितो
द्विजातिमुख्यैर्हविषेव पावकः ॥ २॥
राक्षसराज रावणाने नेत्रसंकेताने सुचविले असतां जाण्याची आज्ञा मिळालेला तो प्रतापी वीर युद्धास जाण्यासाठी उत्साहाने उठला. त्याचे धनुष्य सुवर्णजडित असल्याने त्याची शोभा फार विचित्रपूर्ण होती. यज्ञमंडपात श्रेष्ठ ब्राह्मणांच्या द्वारा हविष्याची आहुती दिली गेल्यानन्तर अग्नि जसा प्रज्वलित होतो, अशाप्रकारे तो अक्षकुमार सभेमध्ये उठून उभा राहिला. ॥२॥
ततो महान् बालदिवाकरप्रभं
प्रतप्तजाम्बूनदजालसन्ततम् ।
रतं समास्थाय ययौ स वीर्यवान्
महाहरिं तं प्रति नैर्ऋतर्षभः ॥ ३॥
त्यानन्तर बालसूर्याप्रमाणे ज्याची प्रभा आहे आणि उत्कृष्ट सोन्याच्या अलङ्‌कारांनी विभूषित अशा रथावर आरूढ होऊन तो प्रचंड राक्षसश्रेष्ठ वीर्यवान अक्ष त्या महाकपि हनुमन्ताकडे निघाला. ॥३॥
ततस्तपःसंग्रहसंचयार्जितं
प्रतप्तजाम्बूनदजालसन्ततम् ।
पताकिनं रत्‍ विभूषितध्वजं
मनोजवाष्टाश्ववरैः सुयोजितम् ॥ ४ ॥

सुरासुराधृष्यमसङ्‌गचारिणं
तडित्प्रभं व्योमचरं समाहितम् ।
सतूणमष्टासिनिबद्धबन्धुरं
यथाक्रमावेशितशक्तितोमरम् ॥ ५॥

विराजमानं प्रतिपूर्णवस्तुना
सहेमदाम्ना शशिसूर्यवर्चसा ।
दिवाकराभं रथमास्थितस्ततः
स निर्जगामामरतुल्यविक्रमः ॥ ६॥
तो रथ त्याला फार मोठ्‍या तपस्येच्या संग्रहामुळे प्राप्त झालेला होता. त्याला तप्त केलेल्या जांबूनद नांवाच्या उत्कृष्ट सोन्याची जाळी जडविलेली होती. त्यावर पताका फडकत होती आणि त्या रथाचा ध्वजदण्ड रत्‍नजडित होता. मनाप्रमाणे वेग असणारे श्रेष्ठ आठ घोडे त्याला उत्तम रीतीने जुंपले होते. देवता अथवा असुर कोणीही त्या रथास नष्ट करू शकत नव्हते. त्याची गति कुठेही कुंठित होत नव्हती. त्याची प्रभा विद्युल्लते प्रमाणे होती आणि तो आकाशातच चालत होता. तो सर्व युद्धसामग्रीने युक्त होता. त्याच्यावर भाते ठेवलेले होते व त्याच्या आठही बाजूस तलवारी लटकविलेल्या असल्याने तो अधिकच सुन्दर दिसत होता. त्याच्यात यथास्थान शक्ति आणि तोमर आदि अस्त्र-शस्त्रे यथाक्रम ठेवली गेली होती. चन्द्र आणि सूर्यासमान दीप्तिमान आणि सोन्याच्या दोरीने युक्त, युद्धोपयोगी समस्त उपकरणांनी सुशोभित अशा त्या सूर्याप्रमाणे तेजस्वी रथावर आरूढ होऊन देवतांप्रमाणे पराक्रमी अक्षकुमार राजमहालान्तून बाहेर पडला. ॥४-६॥
स पूरयन् खं च महीं च साचलां
तुरङ्‌गमातङ्‌गमहारथस्वनैः ।
बलैः समेतैः स हि तोरणस्थितं
समर्थमासीनमुपागमत् कपिम् ॥ ७॥
घोडे, हत्ती आणि मोठमोठे रथ यांच्या घडघडाटाने दणाणून भयंकर आवाजाने पर्वतांसहित पृथ्वी तसेच आकाशाला दुमदुमून टाकीत तो फार मोठी सेना बरोबर घेऊन अशोकवाटिकेच्या द्वारावर बसलेल्या शक्तिशाली वीर वानर हनुमानाजवळ पोहोचला. ॥७॥
स तं समासाद्य हरिं हरीक्षणो
युगान्तकालाग्निमिव प्रजाक्षये ।
अवस्थितं विस्मितजातसम्भ्रमं
समैक्षताक्षो बहुमानचक्षुषा ॥ ८॥
सिंहासमाने क्रोधदृष्टीने युक्त असलेला तो अक्ष तेथे पोहोचल्यावर लोकसंहाराच्या समयी प्रज्वलित होणार्‍या प्रलयाग्निप्रमाणे स्थित आणि विस्मयचकित आणि संभ्रमात पडलेल्या हनुमन्ताकडे अत्यन्त गर्वाने युक्त अशा दृष्टीने पाहू लागला. ॥८॥
स तस्य वेगं च कपेर्महात्मनः
पराक्रमं चारिषु रावणात्मजः ।
विचारयन् स्वं च बलं महाबलो
युगक्षये सूर्य इवाभिवर्धत ॥ ९॥
त्यानन्तर महात्मा कपिश्रेष्ठ हनुमन्ताचा वेग तसेच शत्रूंवर त्यानी गाजविलेला महान पराक्रम आणि आपले स्वतःचे बळ याचा विचार करुन तो महाबलाढ्‍य रावणपुत्र अक्ष प्रलयकाळच्या सूर्याप्रमाणे वाढू लागला. ॥९॥
स जातमन्युः प्रसमीक्ष्य विक्रमं
स्थिरं स्थितः संयति दुर्निवारणम् ।
समाहितात्मा हनुमन्तमाहवे
प्रचोदयामास शितैः शरैस्त्रिभिः ॥ १०॥
हनुमन्ताच्या पराक्रमावर दृष्टिपात करताच तो अक्ष अत्यन्त क्रुद्ध झाला. पण स्थिरतापूर्वक स्थित होऊन मनामध्ये यतकिंचितही गोन्धळून न जाता त्याने एकाग्रचित्ताने तीक्ष्ण अशा तीन बाणांनी रणदुर्जय अशा हनुमन्तास युद्धाकरिता आव्हाहन दिले. ॥१०॥
ततः कपिः तं प्रसमीभ्य गर्वितं
जितश्रमं शत्रुपराजयोचितम् ।
अवैक्षताक्षः समुदीर्णमानसः
स बाणपाणिः प्रगृहीतकार्मुकः ॥ ११॥
नन्तर हनुमानांनी, "खेद अथवा थकवा यांस जिंकलेले आहे, ते शत्रूंचा पराजय करण्यास समर्थ आहेत आणि युद्धासाठी ते उत्कंठित असून गर्विष्ठ आहेत" - असे जाणून हातामध्ये धनुष्य-बाण घेतलेला अक्ष, हनुमन्ताकडे पाहू लागला. ॥११॥
स हेमनिष्काङ्‌गदचारुकुण्डलः
समाससादाशुपराक्रमः कपिम् ।
तयोर्बभूवाप्रतिमः समागमः
सुरासुराणामपि सम्भ्रमप्रदः ॥ १२॥
गळ्यात सुवर्णपदक, बाहूवर बाजूबन्द आणि कानात मनोहर कुंडले धारण केलेला तो शीघ्र पराक्रमी रावणकुमार हनुमन्तांच्या जवळ आला. त्यासमयी ते दोन्ही वीर एकमेकास भिडले असता त्यांचा जो सामना झाला, त्याला तुलनाच नव्हती. त्यांचे ते द्वन्द युद्ध, देव आणि असुर यांच्याही मनात भिती-मोह उत्पन्न करणारे होते. ॥१२॥
ररास भूमिर्न तताप भानुमान्
ववौ न वायुः प्रचचाल चाचलः ।
कपेः कुमारस्य च वीर्यसंयुगं
ननाद च द्यौरुदधिश्च चुक्षुभे ॥ १३॥
आणि अक्षकुमाराचे ते युद्ध पाहून भूतलावरील सर्व प्राणी आक्रोश करू लागले, सूर्याचा ताप कमी झाला, (तो निस्तेज झाला) वायूची गति रूद्ध झाली, पर्वत हलू लागले, आकाशात भयंकर शब्द होऊ लागला आणि समुद्रही क्षुब्ध होऊन त्यात वादळ निर्माण झाले. ॥१३॥
ततः स वीरः सुमुखान् पतत्त्रिणः
सुवर्णपुङ्‌खान् सविषानिवोरगान् ।
समाधिसंयोगविमोक्षतत्त्ववि-
च्छरानथ त्रीन् कपिमूर्ध्न्यपातयत् ॥ १४॥
अक्षकुमार निशाण साधणे, धनुष्यावर बाण चढविणे आणि त्यास लक्ष्यावर अचूक सोडणे यात अत्यन्त प्रवीण होता. त्या वीराने विषयुक्त भुजंगच की काय असे भयंकर, सुवर्णमय पिसांनी युक्त आणि उत्कृष्ट अग्रे यांनी युक्त असे पत्रयुक्त तीन बाण हनुमन्तांच्या मस्तकावर मारले. ॥१४॥
स तैः शरैर्मूर्ध्नि समं निपातितैः
क्षरन्नसृग्दिग्धविवृत्तनेत्रः ।
नवोदितादित्यनिभः शरांशुमान्
व्यराजतादित्य इवांशुमालिकः ॥ १५॥
ते तीन्ही बाण एकाच वेळी हनुमन्तांच्या मस्तकावर लागून त्यांनी जखमा होऊन त्यातून रक्ताच्या धारा वाहून त्यांचे शरीर रक्ताने न्हाऊन गेले आणि त्यांचे नेत्र क्रोधाने गरगरा फिरू लागले. त्यावेळी बाणरूपी किरणांनी युक्त होऊन ते नुकत्याच उगवलेल्या बालसूर्याप्रमाणे, किरण समुदाय धारण केल्याप्रमाणे, शोभून दिसू लागले. ॥१५॥
ततः प्लवङ्‌गाधिपमन्त्रिसत्तमः
समीक्ष्य तं राजवरात्मजं रणे ।
उदग्रचित्रायुधचित्रकार्मुकं
जहर्ष चापूर्यत चाहवोन्मुखः ॥ १६॥
नन्तर राक्षसराज रावणाचा पुत्र अक्ष संग्रामामध्ये आपली अद्‍भुत आयुधे आणि चकित करून सोडणारे धनुष्य सज्ज करून उभा आहे हे पाहून वानरराज सुग्रीवाचे ते श्रेष्ठ मन्त्री हनुमान हर्षित झाले आणि युद्धाविषयी उत्कण्ठित होऊन आपल्या शरीरास वृद्धिंगत करू लागले. ॥१६॥
स मन्दराग्रस्थ इवांशुमाली
विवृद्धकोपो बलवीर्यसंवृतः ।
कुमारमक्षं सबलं सवाहनं
ददाह नेत्राग्निमरीचिभिस्तदा ॥ १७॥
मन्दार पर्वताच्या शिखरावर आलेल्या मध्यान्हकाळच्या सूर्याप्रमाणे ज्यांचे क्रोधरूपी तेज वाढलेले होते आणि बळ आणि पराक्रमाने संपन्न असलेले ते हनुमान डोळ्यातील अग्निच्या किरणांनी त्या राजकुमार अक्षाला सैन्य आणि वाहने यांसह जणु जाळून टाकू लागले. ॥१७॥
ततः स बाणासनशक्रकार्मुकः
शरप्रवर्षो युधि राक्षसाम्बुदः ।
शरान् मुमोचाशु हरीश्वराचले
बलाहको वृष्टिमिवाचलोत्तमे ॥ १८॥
तेव्हा एखादा ढग ज्याप्रमाणे श्रेष्ठ पर्वतावर जलाची वृष्टी करतो त्याप्रमाणे त्या युद्धस्थळावर आपल्या शरासनरूपी इन्द्रधनुष्याने युक्त अशा त्या राक्षसरूपी मेघाने, कपिश्रेष्ठ हनुमानरूपी पर्वतावर अत्यन्त वेगाने बाणांची वृष्टी करण्यास आरंभ केला. ॥१८॥
कपिस्ततस्तं रणचण्डविक्रमं
विवृद्धतेजोबलवीर्यसायकम् ।
कुमारमक्षं प्रसमीक्ष्य संयुगे
ननाद हर्षाद् घनतुल्यनिःस्वनः ॥ १९॥
युद्धामध्ये प्रचंड पराक्रम करणार्‍या, तेज, बळ आणि वीर्य यांनी युक्त आणि उत्तरोत्तर अधिक करणार्‍या बाणांसहित अशा त्या रथारूढ अक्षकुमाराला युद्धस्थळावर पाहून हनुमन्तास अत्यन्त हर्ष आणि उत्साह वाटला आणि त्यांनी मेघाप्रमाणे भयानक गर्जना केली. ॥१९॥
स बालभावाद् युधि वीर्यदर्पितः
प्रवृद्धमन्युः क्षतजोपमेक्षणः ।
समाससादाप्रतिमं कपिं रणे
गजो महाकूपमिवावृतं तृणैः ॥ २०॥
युद्धभूमीवर बळाच्या घमेंडित चूर असणार्‍या त्या अक्षकुमाराला त्यांची गर्जना ऐकून फार क्रोध आला. त्याचे डोळे रक्ताप्रमाणे लाल भडक झाले. तो आपल्या बालोचित अज्ञानामुळे अनुपम पराक्रमी हनुमन्तांचा सामना करण्यासाठी पुढे सरसावला. जणु काही तृणांनी आच्छादित अशा विशाल कूपाकडे एखादा हत्ती अग्रेसर होत असतो, त्याप्रमाणे त्याची ही कृती होती. ॥२०॥
स तेन बाणैः प्रसभं निपातितै-
श्चकार नादं घननादनिस्वनः ।
समुत्सहेनाशु नभः समारुजन्
भुजोरुविक्षेपणघोरदर्शनः ॥ २१॥
त्याच्या बळपूर्वक सोडलेल्या बाणांनी विद्ध होऊन तात्काळ हनुमन्तांनी उत्साहपूर्वक आकाशास विदिर्ण करणार्‍या मेघगर्जनेप्रमाणे गंभीर स्वरात भीषण गर्जना केली. त्यावेळी दोन्ही भुजा आणि पाय हालविण्यामुळे ते अत्यन्त भयानक दिसत होते. ॥२१॥
समुत्पतन्तं समभिद्रवद् बली
स राक्षसानां प्रवरः प्रतापवान् ।
रथी रथश्रेष्ठतरः किरञ्छरैः
पयोधरः शैलमिवाश्मवृष्टिभिः ॥ २२॥
हनुमन्तास आकाशान्त उड्डाण करतांना पाहून रथींमध्ये श्रेष्ठ आणि रथारूढ अशा त्या बलवान, प्रतापी राक्षसशिरोमणी वीराने बाणांचा वर्षाव करीत हनुमन्ताचा पाठलाग केला. त्यावेळी एखाद्या पर्वतावर गारा आणि पाण्याची वृष्टी करणार्‍या एखाद्या मेघाप्रमाणे तो भासत होता. ॥२२॥
स ताञ्छरांस्तस्य हरिर्विमोक्षय-
श्चचार वीरः पथि वायुसेविते ।
शरान्तरे मारुतवद् विनिष्पतन्
मनोजवः संयति भीमविक्रमः ॥ २३॥
त्या युद्धास्थळावर मनासमान वेगवान वीर हनुमान आपला पराक्रम प्रकट करू लागले. अक्षकुमाराच्या बाणांना व्यर्थ करीत ते वायुच्या पथावर विचरत असतां दोन बाणांच्या मधून वायुप्रमाणे निघून जात होते. ॥२३॥
तमात्तबाणासनमाहवोन्मुखं
खमास्तृणन्तं विशिखैः शरोत्तमैः ।
अवैक्षताक्षं बहुमानचक्षुषा
जगाम चिन्तां स च मारुतात्मजः ॥ २४॥
अक्षकुमार हातान्त धनुष्य घेऊन युद्धासाठी उत्सुक होऊन नाना प्रकारच्या उत्तम बाणांनी आकाश आच्छादित करू लागला. पवनकुमारानी त्याच्याकडे अत्यन्त आदराने पाहिले आणि ते मारूतात्मज मनातल्या मनात विचार करु लागले. ॥२४॥
ततः शरैर्भिन्नभुजान्तरः कपिः
कुमारवर्येण महात्मना नदन् ।
महाभुजः कर्मविशेषतत्त्वविद्
विचिन्तयामास रणे पराक्रमम् ॥ २५॥
इतक्यात महात्मा वीर अक्षकुमाराने आपल्या बाणांनी कपिश्रेष्ठ हनुमन्तांच्या दोन्ही भुजांच्या मध्यभागी छातीवर जोराने आघात केला. हनुमन्तांचे वक्षःस्थळ भेदून टाकले. ते महाबाहु वानरवीर समयोचित कर्तव्यविशेषास उत्तम प्रकारे जाणत होते म्हणून ते रणागणांवर तो तीव्र आघात सोसून सिंहनाद करीत त्याच्या पराक्रमाविषयी याप्रमाणे विचार करू लागले- ॥२५॥
अबालवद् बालदिवाकरप्रभः
करोत्ययं कर्म महन्महाबलः ।
न चास्य सर्वाहवकर्मशालिनः
प्रमापणे मे मतिरत्र जायते ॥ २६॥
हा महाबली अक्षकुमार बालसूर्यासारखा तेजस्वी आहे आणि बालक असूनही मोठ्‍यांसारखी महान कृती करीत आहे. युद्धासंबन्धी सर्व कर्मात कुशल असल्याने अद्‍भुत शोभा लाभलेल्या या वीराचा आताच येथे वध करावा अशी इच्छा मला होत नाही आहे. ॥२६॥
अयं महात्मा च महांश्च वीर्यतः
समाहितश्चातिसहश्च संयुगे ।
असंशयं कर्मगुणोदयादयं
सनागयक्षेर्मुनिभिश्च पूजितः ॥ २७॥
हा महामनस्वी राक्षसकुमार बळ पराक्रमाच्या दृष्टीने महान आहे. युद्धात दक्ष आणि एकाग्रचित्त आहे तसेच शत्रूचा वेग सहन करण्यास समर्थ आहे. आपले कर्म आणि गुणांच्या उत्कृष्टतेमुळे हा नाग, यक्ष आणि मुनिंच्या द्वाराही वाखाणला गेला असणार यात संशय नाही आहे. ॥२७॥
पराक्रमोत्साहविवृद्धमानसः
समीक्षते मां प्रमुखागतः स्थितः ।
पराक्रमो ह्यस्य मनांसि कम्पयेत्
सुरासुराणामपि शीघ्रकारिणः ॥ २८॥
पराक्रम आणि उत्साह यांच्या योगाने ज्याचे मन विकास पावले आहे असा हा माझ्यासमोर उभा असलेला राक्षस माझ्याकडेच पहात आहे. परन्तु या शीघ्रतापूर्वक युद्ध करणार्‍या उत्साही राक्षसाचा पराक्रम, देव आणि दैत्यांच्याही मनाचा थरकाप उडविण्यायोग्य आहे. ॥२८॥
न खल्वयं नाभिभवेदुपेक्षितः
पराक्रमो ह्यस्य रणे विवर्धते ।
प्रमापणं ह्यस्य ममाद्य रोचते
न वर्धमानोऽग्निरुपेक्षितुं क्षमः ॥ २९॥
परन्तु जर याची उपेक्षा केली गेली तर हा मलाही परास्त केल्याखेरिज राहाणार नाही, कारण संग्रामात याचा पराक्रम वाढत चालला आहे. म्हणून याला ठार मारणेच मला आता योग्य वाटत आहे. वाढत जाणार्‍या अग्निची उपेक्षा करणे कदापि उचित नाही. ॥२९॥
इति प्रवेगं तु परस्य तर्कयन्
स्वकर्मयोगं च विधाय वीर्यवान् ।
चकार वेगं तु महाबलस्तदा
मतिं च चक्रेऽस्य वधे तदानीम् ॥ ३०॥
याप्रमाणे शत्रूच्या वेगाचा विचार करून त्याचा प्रतिकार करण्यासंबन्धी आपल्या कर्तव्याचा निश्चय करून महान बळ आणि पराक्रम यांनी संपन्न हनुमन्तांनी त्यावेळी आपला वेग वाढविला आणि त्या शत्रूला ठार मारण्याचा निश्चय केला. ॥३०॥
स तस्य तानष्ट वरान् महाहयान्
समाहितान् भारसहान् विवर्तने ।
जघान वीरः पथि वायुसेविते
तलप्रहारैः पवनात्मजः कपिः ॥ ३१॥
त्यानन्तर आकाशान्त विचरत असतानांच वीर वानर पवनकुमारांनी आपल्या थप्पडांच्या माराने अक्षकुमाराच्या त्या आठ उत्तम आणि विशाल घोड्‍यांना, जे भार सहन करण्यास समर्थ आणि नाना प्रकारे पवित्रे बदलण्याच्या कलेत सुशिक्षित होते, यमलोकात पोहोचविले. ॥३१॥
ततस्तलेनाभिहतो महारथः
स तस्य पिङ्‌गाधिपमन्त्रिनिर्जितः ।
स भग्ननीडः परिवृत्तकूबरः
पपात भूमौ हतवाजिरम्बरात् ॥ ३२॥
त्यानन्तर वानरराज सुग्रीवाचे मन्त्री असलेल्या हनुमन्तांनी अक्षकुमाराच्या त्या विशाल रथांचाही चुराडा केला. त्यांनी तळ हाताचा तडाखा देऊन रथाची बैठक आणि रथजोडही तोडून टाकली. घोडे तर प्रथमच मेले होते. म्हणून तो महान रथ आकाशान्तून पृथ्वीवर कोसळला. ॥३२॥
स तं परित्यज्य महारथो रथं
सकार्मुकः खड्गधरः खमुत्पतन् ।
तपोभियोगाद्‌ऋषिरुग्रवीर्यवान्
विहाय देहं मरुतामिवालयम् ॥ ३३॥
त्यावेळी महारथी अक्षकुमार धनुष्य आणि तलवार घेऊन, रथ सोडून अन्तरिक्षात उडू लागला. एखाद्या उग्रशक्तिने संपन्न महर्षि योगमार्गाने शरीर त्यागून स्वर्गलोकाकडे जात असावा त्याप्रमाणे अक्षकुमार भासू लागला. ॥३३॥
कपिस्ततस्तं विचरन्तमम्बरे
पतत्त्रिराजानिलसिद्धसेविते ।
समेत्य तं मारुततुल्यविक्रमः
क्रमेण जग्राह स पादयोर्दृढम् ॥ ३४॥
त्यावेळी वायुसमान वेग आणि पराक्रम असणार्‍या कपिवर हनुमन्तानी पक्षिराज गरूड, वायु आणि सिद्धांनी सेवित आकाशमार्गाने विचरत असता त्या राक्षसाच्या जवळ जाऊन क्रमशः त्याचे दोन्ही पाय दृढतापूर्वक पकडून धरले. ॥३४॥
स तं समाविध्य सहस्रशः कपि-
र्महोरगं गृह्य इवाण्डजेश्वरः ।
मुमोच वेगात् पितृतुल्यविक्रमो
महीतले संयति वानरोत्तमः ॥ ३५॥
नन्तर तर आपला पिता वायुदेव यांच्या तुल्य पराक्रमी वानर शिरोमणी हनुमन्तानी गरूड ज्याप्रकारे मोठमोठ्‍या सर्पांना घुमवतो, गरगर फिरवतो त्याप्रमाणे त्या अक्षाला हजारो वेळा गरगर फिरवून अत्यन्त वेगाने त्याला युद्धभूमीवर आपटला. ॥३५॥
स भग्नबाहूरुकटीशिरोधरः
क्षरन्नसृङ्‌निर्मथितास्थिलोचनः ।
सम्भिन्नसन्धिः प्रविकीर्णबन्धनो
हतः क्षितौ वायुसुतेन राक्षसः ॥ ३६॥
खाली पडतांच त्याच्या भुजा, जांघा, कंबर आणि छातीचे तुकडे तुकडे झाले. रक्ताची धार वाहू लागली, शरीरान्तील हाडांचा चूराचूरा झाला, डोळे बाहेर आले, अस्थिंचे सान्धे तुटून गेले आणि शिरा आणि नाड्‍यांची बन्धने शिथिल झाली. याप्रकारे तो राक्षस पवनकुमार हनुमन्तांच्या हातांनी मारला गेला. ॥३६॥
महाकपिर्भूमितले निपीड्य तं
चकार रक्षोऽधिपतेर्महद्‌भयम् ।
महर्षिभिश्चक्रचरैः महागतैः
समेत्य भूतैश्च सयक्षपन्नगैः ।
सुरैश्च सेन्द्रैर्भृशजातविस्मयै-
र्हते कुमारे स कपिर्निरीक्षितः ॥ ३७॥
अक्षकुमाराला पृथ्वीवर आपटून महाकपि हनुमन्तानी रावणाच्या हृदयात अत्यन्त महान भय उत्पन्न केले. तो मारला गेल्यावर नक्षत्र मंडळात विचरण करणारे महर्षि, यक्ष, नाग, भूते आणि इन्द्रासहित सर्व देवता तेथे एकत्र आल्या आणि त्यांनी मोठ्‍या विस्मयाने हनुमन्तांचे दर्शन घेतले. ॥३७॥
निहत्य तं वज्रिसुतोपमं रणे
कुमारमक्षं क्षतजोपमेक्षणम् ।
तदेव वीरोऽभिजगाम तोरणं
कृतक्षणः काल इव प्रजाक्षये ॥ ३८॥
युद्धात इन्द्रपुत्र जयन्तासमान पराक्रमी आणि लाल लाल नेत्र असणार्‍या अक्षकुमाराचा वध करून वीरवर हनुमान प्रजेच्या संहारासाठी उद्यत झालेल्या काळाप्रमाणे पुन्हा युद्धाची प्रतीक्षा करीत त्या वाटिकेच्या त्याच द्वारावर जाऊन पोहोंचले. ॥३८॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये सुन्दरकाण्डे सप्तचत्वारिंशः सर्गः ॥ ४७॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यान्तील सुन्दरकाण्डाचा सत्तेचाळिसावा सर्ग पूर्ण झाला. ॥४७॥
॥ श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु ॥

GO TOP