श्रीमद् वाल्मीकि रामायणे
उत्तरकाण्डे
॥ सप्तषष्टितमः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
च्यवनेन शत्रुघ्नं लवणासुरशूलशक्तिं परिचाययता पूर्वघटितस्य राज्ञो मान्धातुर्वधस्य श्रावणम् -
च्यवन मुनिंनी शत्रुघ्नांना लवणासुराच्या शूलाच्या शक्तिचा परिचय देत असता राजा मान्धात्याच्या वधाचा प्रसंग ऐकविणे -
अथ रात्र्यां प्रवृत्तायां शत्रुघ्नो भृगुनन्दनम् ।
पप्रच्छ च्यवनं विप्रं लवणस्य यथाबलम् ॥ १ ॥

शूलस्य च बलं ब्रह्मन् के च पूर्वं विनाशिताः ।
अनेन शूलमुख्येन द्वन्द्वयुद्धमुपागताः ॥ २ ॥
एके दिवशी रात्रीच्या वेळी शत्रुघ्नांनी भृगुनंदन ब्रह्मर्षि च्यवनांना विचारले - ब्रह्मन्‌ ! लवणासुराच्या ठिकाणी किती बळ आहे ? त्याच्या शूलामध्ये किती शक्ति आहे ? त्या उत्तम शूलाच्या द्वारे त्याने द्वंद युद्धासाठी आलेल्या कोणा कोणा योद्ध्यांचा वध केला आहे ? ॥१-२॥
तस्य तद् वचनं श्रुत्वा शत्रुघ्नस्य महात्मनः ।
प्रत्युवाच महातेजाः च्यवनो रघुनन्दनम् ॥ ३ ॥
महात्मा शत्रुघ्नांचे ते वचन ऐकून महातेजस्वी च्यवनांनी त्या रघुनंदन राजकुमारांना म्हटले - ॥३॥
असंख्येयानि कर्माणि यान्यस्य रघुनन्दन ।
इक्ष्वाकुवंशप्रभवे यद् वृत्तं तच्छृणष्व मे ॥ ४ ॥
रघुनंदन ! या लवणासुराची कर्मे असंख्य आहेत. त्यापैकी एका अश्या कर्माचे वर्णन केले जाते, जे इक्ष्वाकुवंशी राजा मांधाता याच्या संबंधात घडलेले आहे. तू माझ्या मुखाने ऐक. ॥४॥
अयोध्यायां पुरा राजा युवनाश्वसुतो बली ।
मान्धातेति स विख्यातः त्रिषु लोकेषु वीर्यवान् ॥ ५ ॥
पूर्वकाळातील गोष्ट आहे. अयोध्यापुरीमध्ये युवनाश्वांचे पुत्र राजा मान्धाता राज्य करीत होते. ते फार बलवान्‌, पराक्रमी तसेच तीन्ही लोकात विख्यात होते. ॥५॥
स कृत्वा पृथिवीं कृत्स्नां शासने पृथिवीपतिः ।
सुरलोकमितो जेतुं उद्योगमकरोन्नृपः ॥ ६ ॥
त्या पृथ्वीपति नरेशांनी सार्‍या पृथ्वीला आपल्या अधिकारात घेऊन येथून स्वर्गलोकावर विजय मिळविण्याचा उद्योग आरंभला होता. ॥६॥
इन्द्रस्य च भयं तीव्रं सुराणां च महात्मनाम् ।
मान्धातरि कृतोद्योगे देवलोकजिगीषया ॥ ७ ॥
राजा मान्धात्याने जेव्हा देवलोकावर विजय प्राप्त करण्याच्या इच्छेने उद्योगास प्रारंभ केला तेव्हा इंद्र तसेच महामनस्वी देवतांना फार भय वाटले. ॥७॥
अर्धासनेन शक्रस्य राज्यार्धेन च पार्थिवः ।
वन्द्यमानः सुरगणैः प्रतिज्ञामध्यरोहत ॥ ८ ॥
मी इंद्राचे अर्धे सिंहासन तसेच त्यांचे अर्धे राज्य घेऊन भूमण्डलाचा राजा होऊन देवतांच्या कडून वंदित होऊन राहीन अशी प्रतिज्ञा करून ते स्वर्गलोकावर चाल करून गेले. ॥८॥
तस्य पापमभिप्रायं विदित्वा पाकशासनः ।
सान्त्वपूर्वमिदं वाक्यं उवाच युवनाश्वजम् ॥ ९ ॥
त्यांचा खोटा अभिप्राय जाणून पाकशासन इंद्र त्या युवनाश्व पुत्र मान्धात्याच्या जवळ गेले आणि शान्तिपूर्वक समजावून याप्रकारे बोलले - ॥९॥
राजा त्वं मानुषे लोके न तावत् पुरुषर्षभ ।
अकृत्वा पृथिवीं वश्यां देवराज्यमिहेच्छसि ॥ १० ॥
पुरुषप्रवर ! अद्याप तू सार्‍या मर्त्यलोकाचाही राजा नाहीस. संपूर्ण पृथ्वी वश केल्याशिवायच देवतांचे राज्य घेऊ इच्छित आहेस ? ॥१०॥
यदि वीर समग्रा ते मेदिनी निखिला वशे ।
देवराज्यं कुरुष्वेह सभृत्यबलवाहनः ॥ ११ ॥
वीरा ! जर सारी पृथ्वी तुझ्या ताब्यात आली तर तू सेवक, सेना, आणि वाहनांसहित येथे देवलोकाचे राज्य कर. ॥११॥
इन्द्रमेवं ब्रुवाणं तं मान्धाता वाक्यमब्रवीत् ।
क्व मे शक्र प्रतिहतं शासनं पृथिवीतले ॥ १२ ॥
असे सांगण्यार्‍या इंद्रांना मान्धात्याने विचारले - देवराज ! सांगा तर खरे, या पृथ्वीवर कोठे माझ्या आदेशाची अवहेलना होत आहे ? ॥१२॥
तमुवाच सहस्राक्षो लवणो नाम राक्षसः ।
मधुपुत्रो मधुवने न तेऽऽज्ञां कुरुतेऽनघ ॥ १३ ॥
तेव्हा इंद्रांनी म्हटले - निष्पाप नरेशा ! मधुवनात मधुचा पुत्र लवणासुर रहात आहे. तो तुमची आज्ञा मानत नाही. ॥१३॥
तच्छ्रुत्वा विप्रियं घोरं सहस्राक्षेण भाषितम् ।
व्रीडितोऽवाङ्‌मुखो राजा व्याहर्तुं न शशाक ह ॥ १४ ॥
इंद्रांनी सांगितलेली ही घोर अप्रिय गोष्ट ऐकून राजा मान्धात्यांचे मुख लज्जेने नमले. ते काही बोलू शकले नाहीत. ॥१४॥
आमन्त्र्य तु सहस्राक्षं ह्रिया किञ्चिदवाङ्‌मुखः ।
पुनरेवागमच्छ्रीमान् इमं लोकं नरेश्वरः ॥ १५ ॥
ते नरेश इंद्रांचा निरोप घेऊन मान खाली घालून तेथून निघाले आणि पुन्हा या मर्त्यलोकात येऊन पोहोंचले. ॥१५॥
स कृत्वा हृदयेऽमर्षं सभृत्यबलवाहनः ।
आजगाम मधोः पुत्रं वशे कर्तुमरिन्दमः ॥ १६ ॥
त्यांनी आपल्या हृदयात अमर्ष भरून घेतला. नंतर ते शत्रुदमन मान्धाता मधुच्या पुत्राला वश करण्यासाठी सेवक, सेना आणि वाहनांसहित त्याच्या राजधानीच्या समीप आले. ॥१६॥
स काङ्‌क्षमाणो लवणं युद्धाय पुरुषर्षभः ।
दूतं सम्प्रेषयामास सकाशं लवणस्य सः ॥ १७ ॥
त्या पुरुषप्रवर नरेशांनी युद्धाच्या इच्छेने लवणाजवळ आपला दूत धाडला. ॥१७॥
स गत्वा विप्रियाण्याह बहूनि मधुनः सुतम् ।
वदन्तमेवं तं दूतं भक्षयामास राक्षसः ॥ १८ ॥
दूताने तेथे जाऊन मधुच्या पुत्राला खूप कटुवचने ऐकविली. याप्रकारे कठोर वचने बोलणार्‍या त्या दूताला त्या राक्षसाने तात्काळ खाऊन टाकले. ॥१८॥
चिरायमाणे दूते तु राजा क्रोधसमन्वितः ।
अर्दयामास तद् रक्षः शरवृष्ट्या समन्ततः ॥ १९ ॥
जेव्हा दूताला परत येण्यास उशीर झाला, तेव्हा राजा फार क्रुद्ध झाले आणि बाणांची वृष्टि करून त्या राक्षसाला सर्व बाजूनी पीडित करू लागले. ॥१९॥
ततः प्रहस्य तद् रक्षः शूलं जग्राह पाणिना ।
वधाय सानुबन्धस्य मुमोचायुधमुत्तमम् ॥ २० ॥
तेव्हा लवणासुराने हसून हातात तो शूल उचलला आणि सेवकांसहित राजा मान्धात्याचा वध करण्यासाठी त्या उत्तम अस्त्राला त्यांच्यावर सोडून दिले. ॥२०॥
तच्छूलं दीप्यमानं तु सभृत्यबलवाहनम् ।
भस्मीकृत्वा नृपं भूयो लवणस्यागमत् करम् ॥ २१ ॥
तो चमकणारा शूल सेवक, सेना आणि वहाने यांच्यासहित राजा मान्धात्याला भस्म करून पुन्हा परत लवणासुराचा हातामध्ये आला. ॥२१॥
एवं स राजा सुमहान् हतः सबलवाहनः ।
शूलस्य तु बलं सौम्य अप्रमेयमनुत्तमम् ॥ २२ ॥
याप्रकारे सारी सेना आणि वहानांसहित महाराज मान्धाता मारले गेले. सौम्य ! त्या शूलाची शक्ति असीम आणि सर्वापेक्षा वरचढ आहे. ॥२२॥
श्वः प्रभाते तु लवणं वधिष्यसि न संशयः ।
अगृहीतायुधं क्षिप्रं ध्रुवो हि विजयस्तव ॥ २३ ॥
राजन्‌ ! उद्या सकाळी जो पर्यंत तो राक्षस त्या अस्त्राला घेणार नाही तो पर्यंतच शीघ्रता केल्यानंतर तुम्ही निःसंदेह त्याचा वध करू शकाल आणि याप्रकारे निश्चितच तुमचा विजय होईल. ॥२३॥
लोकानां स्वस्ति चैवं स्यात् कृते कर्मणि च त्वया ।
एतत् ते सर्वमाख्यातं लवणस्य दुरात्मनः ॥ २४ ॥

शूलस्य च बलं घोरमप्रमेयं नरर्षभ ।
विनाशश्चैव मान्धातुः यत्तेनाभूच्च पार्थिव ॥ २५ ॥
तुमच्या द्वारा हे कार्य झाल्यावर समस्त लोकांचे कल्याण होईल. नरश्रेष्ठ ! याप्रकारे मी तुम्हांला दुरात्मा लवणाचे सारे बळ सांगितले आहे आणि त्यांच्या शूलाचाही घोर तसेच असीम शक्तिचा परिचय दिला आहे. पृथ्वीनाथ ! इंद्राच्या प्रयत्‍नामुळे त्याच शूलाद्वारे राजा मान्धात्याचा विनाश झाला होता. ॥२४-२५॥
त्वं श्वः प्रभाते लवणं महात्मन्
वधिष्यसे नात्र तु संशयो मे ।
शूलं विना निर्गतमामिषार्थे
ध्रुवो जयस्ते भविता नरेन्द्र ॥ २६ ॥
महात्मन्‌ ! उद्या सकाळी जेव्हा तो शूल न घेतांच मांसाचा संग्रह करण्यासाठी बाहेर पडेल, तेव्हा तू त्याचा वध करून टाकशील यात संशय नाही. नरेंद्र ! अवश्य तुमचा विजय होईल. ॥२६॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् उत्तरकाण्डे सप्तषष्टितमः सर्गः ॥ ६७ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील उत्तरकाण्डाचा सदुसष्ठावा सर्ग पूरा झाला. ॥६७॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP