[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीमद् वाल्मीकि रामायणे
सुन्दरकाण्डे
॥ द्वितियः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचन्द्राभ्यां नमः ॥
लङ्‌कापुर्या वर्णनं, तत्र प्रवेशविषये हनुमतो विचारो, लघुरूपधरस्य तस्य पुर्यां प्रवेशः, तदानीं चन्द्रोदयशोभाया वर्णनम् -
लङ्‌कापुरीचे वर्णन, तिच्यामध्ये प्रवेश करण्यासंबन्धी हनुमन्तांचा विचार, त्यांचा लघुरूपाने पुरीमध्ये प्रवेश तथा चन्द्रोदयाचे वर्णन.
स सागरमनाधृष्यं अतिक्रम्य महाबलः ।
त्रिकूटशिखरे लङ्‌कां स्थितः स्वस्थो ददर्श ह ॥ १ ॥
दुस्तर अशा सागराचे उल्लंघन करून महाबली हनुमान त्रिकूट (लंब) नामक पर्वताच्या शिखरावर जाऊन स्वस्थ बसले आणि लङ्‌कापुरीची शोभा पाहू लागले. ॥१॥
ततः पादपमुक्तेन पुष्पवर्षेण वीर्यवान् ।
अभिवृष्टस्ततस्तत्र बभौ पुष्पमयो हरिः ॥ २ ॥
त्यासमयी वृक्षांपासून झडलेल्या फुलांची त्यांच्यावर सर्व बाजूने वृष्टि होऊ लागली आणि त्यामुळे त्या ठिकाणी बसलेले ते पराक्रमी हनुमान जणु पुष्पमय वानरासारखेच दिसू लागले. ॥२॥
योजनानां शतं श्रीमांस्तीर्त्वाप्युत्तमविक्रमः ।
अनिःश्वसन् कपिस्तत्र न ग्लानिमधिगच्छति ॥ ३॥
ते महापराक्रमी श्रीमान्‌ वानरवीर हनुमान शंभर योजने समुद्र उल्लंघून आले असूनही त्यांना थकवा मुळीच आला नव्हता आणि म्हणून ते पूर्वीपेक्षा अधिक जोराने श्वासो-श्वासही करीत नव्हते. ॥३॥
शतान्यहं योजनानां क्रमेयं सुबहून्यपि ।
किं पुनः सागरस्यान्तं सङ्‌ख्यातं शतयोजनम् ॥ ४॥
उलट ते असा विचार करीत होते की मी शत शत योजने विस्तीर्ण असे अनेक समुद्र ओलांडून जाण्यास समर्थ आहे मग या परिमित अशा शंभर योजनेच असलेल्या समुद्राच्या पैलतीराची काय कथा. ॥४॥
स तु वीर्यवतां श्रेष्ठः प्लवतामपि चोत्तमः ।
जगाम वेगवांल्लङ्‌कां लङ्‌घयित्वा महोदधिम् ॥ ५॥
असे वीर्यवान पुरूषात श्रेष्ठ आणि उड्‍डाण करून जाणार्‍यात वरिष्ठ असे ते अत्यन्त वेगवान्‌ पवनकुमार महासागराचे उल्लंघन करून शीघ्र लंकेमध्ये पोहोचले. ॥५॥
शाद्वलानि च नीलानि गन्धवन्ति वनानि च ।
मधुमन्ति च मध्येन जगाम नगवन्ति च ॥ ६॥
कोमल हिरवेगार गवत असलेले आणि मध, सुगन्ध आणि वृक्षांनी भरलेली अनेक वने पहात पहात ते मध्यमार्गाने जाऊ लागले. ॥६॥
शैलांश्च तरुसंछन्नान् वनराजीश्च पुष्पिताः ।
अभिचक्राम तेजस्वी हनुमान् प्लवगर्षभः ॥ ७॥
ते तेजस्वी वानरशिरोमणी हनुमान वृक्षांनी आच्छादित पर्वत आणि प्रफुल्लित वनराजी या मध्ये विचरण करू लागले. ॥७॥
स तस्मिन्नचले तिष्ठन् वनान्युपवनानि च ।
स नगाग्रे स्थितां लङ्‌कां ददर्श पवनात्मजः ॥ ८॥
त्या त्रिकूटाचलावर हनुमान प्रथम बसले आणि वने, उपवने आणि त्या पर्वताच्या अग्रभागी वसलेली लङ्‌काही त्यांनी पाहून घेतली. ॥८॥
सरलान् कर्णिकारांश्च खर्जूरांश्च सुपुष्पितान् ।
प्रियालान् मुचुलिन्दांश्च कुटजान् केतकानपि ॥ ९॥

प्रियङ्‌गून् गन्धपूर्णांश्च नीपान् सप्तच्छदांस्तथा ।
असनान् कोविदारांश्च करवीरांश्च पुष्पितान् ॥ १०॥

पुष्पभारनिबद्धांश्च तथा मुकुलितानपि ।
पादपान् विहगाकीर्णान् पवनाधूतमस्तकान् ॥ ११॥
देवदार, करविरास, खजूर, ईडलिंबे, कुडे, केवडा, वाघंटी, सुगन्धयुक्त कदंब, मोगरा, प्रफुल्लित कण्हेर आणि त्याच प्रमाणे पुष्पभारांनी आणि कळ्यांनी बहरलेले, पक्ष्यांनी गजबजलेले आणि वायुमुळे चंचळ अग्रांनी युक्त असे अनेक वृक्ष त्यांनी पाहिले. ॥९-११॥
हंसकारण्डवाकीर्णा वापीः पद्मोत्पलायुताः ।
आक्रीडान् विविधान् रम्यान् विविधांश्च जलाशयान् ॥ १२ ॥
हंस आणि कारंडव पक्ष्यांनी व्याप्त तसेच कमळे आणि उत्पले यांनी आच्छादित झालेल्या अनेक वापी, नाना प्रकारची रमणीय क्रीडास्थाने आणि विविध प्रकारचे जलाशयही त्यांच्या दृष्टिपथास आले. ॥१२॥
सन्ततान् विविधैर्वृक्षैः सर्वर्तुफलपुष्पितैः ।
उद्यानानि च रम्याणि ददर्श कपिकुञ्जरः ॥ १३॥
त्या जलाशयांच्या चारी बाजूस सर्व ऋतूमध्ये फळे, फुले देणारे अनेक प्रकारचे वृक्ष पसरलेले होते. त्या वानरश्रेष्ठाने तेथे अनेक रमणीय उद्यानेही पाहिली. ॥१३॥
समासाद्य च लक्ष्मीवांल्लङ्‌कां रावणपालिताम् ।
परिघाभिः सपद्माभिः सोत्पलाभिरलंकृताम् ॥ १४॥

सीतापहरणात् तेन रावणेन सुरक्षिताम् ।
समन्ताद् विचरद्‌भिश्च राक्षसैरुग्रधन्वभिः ॥ १५॥
नन्तर अद्‍भुत शोभेने संपन्न हनुमान, हळू हळू त्या रावणाने जिचे पालन केले आहे अशा त्या लङ्‌कापुरीजवळ पोहोंचले. ती लङ्‌का अनेक प्रकारच्या उत्पल, कमळांनी भरलेल्या आणि चारी बाजूने खोदलेल्या खन्दकानी भूषित झाली होती. या लंके मध्येच सीतेला हरण करून आणून ठेवले होते म्हणून त्या रावणाने लंकेभोवती सतत संचार करणार्‍या प्रचंड धनुर्धारी राक्षसांना ठेवून, लंकेच्या संरक्षणाची विशेष व्यवस्था केली होती. ॥१४-१५॥
काञ्चनेनावृतां रम्यां प्राकारेण महापुरीम् ।
गृहैश्च ग्रहसंकाशैः शारदाम्बुदसंनिभैः ॥ १६॥
ती रम्य महानगरी सोन्याच्या प्राकारांनी (तटबन्दीने) व्याप्त होती आणि पर्वताप्रमाणे उंच आणि शरद ऋतूतील मेघांप्रमाणे श्वेत अशा गृहांनी ती युक्त होती. ॥१६॥
पाण्डुराभिः प्रतोलीभिरुच्चाभिरभिसंवृताम् ।
अट्टालकशताकीर्णां पताकाध्वजशोभिताम् ॥ १७॥
तिच्यात मोठमोठे शुभ्रवर्ण रस्ते होते, त्यांनी ती सर्व बाजूंनी वेढलेली होती. तसेच ती शेकडो अट्‍टालिकांनी (वाड्‍यांनी) गजबजून गेलेली होती. सर्वत्र पताका आणि ध्वज यांच्या योगे ती सुशोभित झाली होती. ॥१७॥
तोरणैः काञ्चनैर्दिव्यैर्लतापङ्‌क्तिविराजितैः ।
ददर्श हनुमांल्लङ्‌कां देवो देवपुरीमिव ॥ १८॥
तिची बाहेरची दारे सोन्याची होती आणि त्यांच्या भिन्ती लता-वेली इत्यान्दीच्या चित्रांनी सुशोभित होत्या. सुवर्णमय तोरणांनी ती शृगांरलेली होती. अशा प्रकारची ती लङ्‌का दिवसा हनुमानांनी पाहिली तेव्हा जणु त्यांना ती अमरावतीच भासली. ॥१८॥
गिरिमूर्ध्नि स्थितां लङ्‌कां पाण्डुरैर्भवनैः शुभैः ।
ददर्श स कपि श्रीमान् पुरीमाकाशगामिव ॥ १९॥
सुन्दर शुभ्र वर्णाच्या शुभ गृहांनी भरून गेलेली आणि पर्वताच्या शिखरावर स्थित अशी ती भव्य लङ्‌का आकाशातील नगरीप्रमाणे कपिश्रेष्ठ हनुमानांनी अवलोकन केली. ॥१९॥
पालितां राक्षसेन्द्रेण निर्मितां विश्वकर्मणा ।
प्लवमानामिवाकाशे ददर्श हनुमान् कपिः ॥ २० ॥
विश्वकर्म्याने निर्मिलेली आणि राक्षसाधिपती रावणाने संरक्षण केलेली ती लङ्‌का जणु आकाशात तरंगतच आहे की काय अशी हनुमानांनी पाहिली. ॥२०॥
वप्रप्राकारजघनां विपुलाम्बुवनाम्बराम् ।
शतघ्नीशूलकेशान्तामट्टालकावतंसकाम् ॥ २१ ॥

मनसेव कृतां लङ्‌कां निर्मितां विश्वकर्मणा ।
विश्वकर्म्याने बनविलेली ती लङ्‌का जणु त्याच्या मानसिक संकल्पाद्वारे रचली गेलेली एक सुन्दर स्त्रीच होती. किल्ले आणि तट हा जिचा कटिप्रदेश आहे. समुद्राची विशाल जलराशी आणि असे जिचे वस्त्र आहे आणि शतघ्नी आणि शूळ हे जिचे केस आहेत आणि मोठ मोठ्‍या अट्टालिका (वाडे) ही जिची कर्णभूषणे आहेत; ॥२१ १/२॥
द्वारमुत्तरमासाद्य चिन्तयामास वानरः ॥ २२ ॥

कैलासनिलयप्रख्यमालिखन्तमिवाम्बरम् ।
ध्रियमाणमिवाकाशमुच्छ्रितैर्भवनोत्तमैः ॥ २३ ॥
अशी लङ्‌का पाहिल्यावर कपि हनुमान तिच्या उत्तरद्वाराशी गेले आणि विचार करू लागले. कैलास शिखरा प्रमाणे उंच असणारे ते उत्तरद्वार जणु काही गगनचुंबित होते आणि उंच उंच असलेल्या उत्कृष्ट घरांच्या योगे जसे काही आकाशालाच धारण करून राहिल्या सारखे दिसत होते. ॥२२-२३॥
संपूर्णा राक्षसैर्घोरैर्नागैर्भोगवतीमिव ।
अचिन्त्यां सुकृतां स्पष्टां कुबेराध्युषितां पुरा ॥ २४ ॥
पाताळातील भोगवती नगरी जशी नागांनी व्याप्त असते त्याप्रमाणे लङ्‌कापुरी भयानक राक्षसांनी व्याप्त होती. तिची निर्माणकला अचिन्त्य होती आणि तिची रचना सुन्दर रीतीने केली गेली होती, हे हनुमन्तास स्पष्ट दिसून येत होते. पूर्वकाळी साक्षात कुबेर तेथे निवास करीत होते. ॥२४॥
दंष्ट्राभिर्बहुभिः शूरैः शूलपट्टिशपाणिभिः ।
रक्षितां राक्षसैर्घोरैर्गुहामाशीविषैरिव ॥ २५ ॥
ज्याप्रमाणे विषारी सर्प आपल्या पुरीचे (भोगवतीचे) रक्षण करीत असतात त्याप्रमाणे हातान्त शूळ आणि पट्‍टीश घेतलेले मोठ मोठ्‍या दाढा असलेले शूरवीर धीर राक्षस लङ्‌कापुरीचे रक्षण करीत होते. ॥२५॥
तस्याश्च महतीं गुप्तिं सागरं च निरीक्ष्य सः ।
रावणं च रिपुं घोरं चिन्तयामास वानरः ॥ २६॥
लंकेभोवती असलेला समुद्राचा खन्दक, तिच्यातील कडेकोट बन्दोबस्त आणि रावणासारखा भयंकर शत्रू ही सर्व लक्षात आणून हनुमान आपल्याशीच विचार करू लागले- ॥२६॥
आगत्यापीह हरयो भविष्यन्ति निरर्थकाः ।
नहि युद्धेन वै लङ्‌का शक्या जेतुं सुरैरपि ॥ २७॥
(ते म्हणाले) वानर जरी येथे आले तरी त्यांचा काही एक उपयोग होणार नाही, कारण युद्ध करून लङ्‌का जिंकणे देवांना ही शक्य नाही. ॥२७॥
इमां त्वविषमां दुर्गां लङ्‌कां रावणपालिताम् ।
प्राप्यापि सुमहाबाहुः किं करिष्यति राघवः ॥ २८॥
ज्या स्थानापेक्षा विषम (संकटपूर्ण) स्थान दुसरे नाही अशा या रावणाने संरक्षण केलेल्या दुर्गम लंकेत येऊन अत्यन्त महापराक्रमी राघव (राम) तरी काय करणार ? ॥२८॥
अवकाशे न साम्नस्तु राक्षसेष्वभिगम्यते ।
न दानस्य न भेदस्य नैव युद्धस्य दृश्यते ॥ २९॥
राक्षसांच्या ठिकाणी साम, दाम आणि भेद यापैकी कशाचाच उपयोग होणार नाही आणि युद्ध (दण्ड) करूनही काही उपयोग होईल असे दिसत नाही. ॥२९॥
चतुर्णामेव हि गतिर्वानराणां तरस्विनाम् ।
वालिपुत्रस्य नीलस्य मम राज्ञश्च धीमतः ॥ ३०॥
वालिपुत्र अंगद, नील, मी आणि बुद्धिमान्‌ राजा सुग्रीव या चार बलाढ्‍य वानरांचीच गति येथपर्यन्त येण्यासारखी आहे. ॥३०॥
यावज्जानामि वैदेहीं यदि जीवति वा न वा ।
तत्रैव चिन्तयिष्यामि दृष्ट्‍वा तां जनकात्मजाम् ॥ ३१ ॥
सर्वप्रथम विदेहकुमारी सीता जिवन्त आहे की नाही याचा शोध घेतला पाहिजे. त्या जनकनन्दिनीला पाहिल्यावरच मी या विषयासंबन्धी पुढील काय तो विचार करीन. ॥३१॥
ततः स चिन्तयामास मुहूर्तं कपिकुञ्जरः ।
गिरिः शृङ्‌गे स्थितस्तस्मिन् रामस्याभ्युदयं ततः ॥ ३२ ॥
अशा प्रकारे मनात विचार करून त्या पर्वत शिखरावर उभे असलेले कपिश्रेष्ठ हनुमान श्रीरामचन्द्राच्या अभ्युदयासाठी सीतेचा शोध घेण्यासाठी काय उपाय योजावा यावर दोन घटिका विचार करीत राहिले. ॥३२॥
अनेन रूपेण मया न शक्या रक्षसां पुरी ।
प्रवेष्टुं राक्षसैर्गुप्ता क्रूरैर्बलसमन्वितैः ॥ ३३॥
हनुमतांनी विचार केला की मी या रूपाने या राक्षसांच्या नगरीत प्रवेश करू शकत नाही कारण अनेक क्रूर आणि बलाढ्‍य राक्षस हिचे रक्षण करीत आहेत. ॥३३॥
महौजसो महावीर्या बलवन्तश्च राक्षसाः ।
वञ्चनीया मया सर्वे जानकीं परिमार्गता ॥ ३४॥
महातेजस्वी, अत्यन्त वीर्यवान आणि बलाढ्‍य राक्षसांची नजर चुकवूनच (स्वतःच त्यांच्या दृष्टीस न पडू देता) मला जानकीचा शोध केला पाहिजे. ॥३४॥
लक्ष्यालक्ष्येण रूपेण रात्रौ लङ्‌कापुरी मया ।
प्राप्तकालं प्रवेष्टुं मे कृत्यं साधयितुं महत् ॥ ३५॥
म्हणून मला रात्रीच्या वेळीच नगरात प्रवेश केला पाहिजे आणि सीतेच्या शोधाचे हे महान समयोचित कार्य सिद्ध करण्यासाठी अशा रूपाचा आश्रय घेतला पाहिजे की जे डोळ्यांना दिसून येणे शक्य नाही. (केवळ कार्यावरून कोणी तरी आले होते असे अनुमान होऊ शकेल) ॥३५॥
तां पुरीं तादृशीं दृष्ट्‍वा दुराधर्षां सुरासुरैः ।
हनुमांश्चिन्तयामास विनिःश्वस्य मुहुर्मुहुः ॥ ३६॥
असा विचार केल्यानन्तर देव अथवा दैत्यांनाही जिच्यावर हल्ला करता येणे शक्य नाही अशा प्रकारच्या त्या लङ्‌कानगरीला पाहून आणि वारंवार दीर्घ सुस्कारे टाकून हनुमान पुन्हा विचार करू लागले- ॥३६॥
केनोपायेन पश्येयं मैथिलीं जनकात्मजाम् ।
अदृष्टो राक्षसेन्द्रेण रावणेन दुरात्मना ॥ ३७॥
दुरात्मा राक्षसाधिपती रावणाच्या स्वतः दृष्टीस न पडतां जनकात्मजा मैथिली सीता हिचे दर्शन मला होईल, यासाठी मी कुठला उपाय करूं ? ॥३७॥
न विनश्येत् कथं कार्यं रामस्य विदितात्मनः ।
एकामेकस्तु पश्येयं रहिते जनकात्मजाम् ॥ ३८॥
कुठल्या प्रकारे कार्य केले असता जगदविख्यात श्रीरामांचे कार्यही बिघडणार नाही आणि मी एकान्तात एकट्‍या जानकीची भेटही घेऊ शकेन ? ॥३८॥
भूताश्चार्था विनश्यन्ति देशकालविरोधिताः ।
विक्लवं दूतमासाद्य तमः सूर्योदये यथा ॥ ३९॥
सूर्योदय ज्याप्रमाणे अन्धःकाराचा नाश करतो, त्याप्रमाणे अयोग्य दूतांची निवड केल्याने तसेच देश आणि काल विरूद्ध झाल्याने जवळ जवळ सिद्धिस गेलेली कार्येही नाहींशी होतात. ॥३९॥
अर्थानर्थान्तरे बुद्धिः निश्चितापि न शोभते ।
घातयन्तीह कार्याणि दूताः पण्डितमानिनः ॥ ४०॥
राजा आणि मन्त्री यांच्या द्वारा निश्चित केला गेलेला कर्तव्याकर्तव्य विषयक विचारही अयोग्य (अविवेकी) दूतांची गांठ पडल्यावर सफल होत नाही. आपल्या स्वतःला (पण्डित) शहाणे समजणारे अविवेकी दूत स्वामी कार्याचा नाश करतात. ॥४०॥
न विनश्येत् कथं कार्यं वैक्लव्यं न कथं भवेत् ।
लङ्‌घनं च समुद्रस्य कथं नु न भवेत् वृथा ॥ ४१ ॥
तेव्हा आता आपण काय केले असतां स्वामींच्या कार्याचा नाश होणार नाही ? कसे वागले असतां बुद्धिभ्रंश होणार नाही आणि माझे हे समुद्र उल्लंघनाचे कार्यही व्यर्थ जाणार नाही ? ॥४१॥
मयि दृष्टे तु रक्षोभी रामस्य विदितात्मनः ।
भवेद् व्यर्थंमिदं कार्यं रावणानर्थमिच्छतः ॥ ४२ ॥
मी त्या राक्षसांच्या दृष्टीस पडलो तर रावणाच्या नाशाची इच्छा करणार्‍या उदारहृदयी रामाचे सर्व कार्य व्यर्थ होईल. ॥४२॥
नहि शक्यं क्वचित् स्थातुमविज्ञातेन राक्षसैः ।
अपि राक्षसरूपेण किमुतान्येन केनचित् ॥ ४३॥
येथे दुसर्‍या कुठल्या रूपाची गोष्ट तर राहू द्या, पण राक्षसाचे रूप धारण करूनही राक्षसांच्या नकळत कुठे थांबणे राहाणे असंभव आहे. ॥४३॥
वायुरप्यत्र नाज्ञातश्चरेदिति मतिर्मम ।
नह्यत्राविदितं किंचिद् रक्षसां भीमकर्मणाम् ॥ ४४॥
माझा तर असा विश्वास आहे की राक्षसांपासून लपून राहून वायुदेवही या ठिकाणी प्रवेश करू शकत नाही. कारण या भयंकर कर्म करणार्‍या राक्षसांना ज्ञात नाही असे येथे एकही स्थान नाही. ॥४४॥
इहाहं यदि तिष्ठामि स्वेन रूपेण संवृतः ।
विनाशमुपायास्यामि भर्तुरर्थश्च हास्यति ॥ ४५॥
जर मी आपल्या या (स्वाभाविक) रूपाने येथे लपून राहीन तर मी मारला जाईन आणि माझ्या स्वामींच्या कार्याचीही हानि होईल. ॥४५॥
तदहं स्वेन रूपेण रजन्यां ह्रस्वतां गतः ।
लङ्‌कामभिपतिष्यामि राघवस्यार्थसिद्धये ॥ ४६॥
म्हणून मी राघवाचे कार्य सिद्ध करण्यासाठी रात्री माझ्या या रूपानेच पण लहान रूप धारण करुन लंकेत प्रवेश करीन. ॥४६॥
रावणस्य पुरीं रात्रौ प्रविश्य सुदुरासदाम् ।
प्रविश्य भवनं सर्वं द्रक्ष्यामि जनकात्मजाम् ॥ ४७॥
जरी रावणाच्या या पुरीत जाणे अत्यन्त कठीण आहे तरीही रात्री नगरीत प्रवेश करून मी सर्व घरात घुसून जानकीचा शोध करीन. ॥४७॥
इति निश्चित्य हनुमान् सूर्यस्यास्तमयं कपिः ।
आचकाङ्‌क्षे तदा वीरो वैदेह्या दर्शनोत्सुकः ॥ ४८॥
असा निश्चय करून वीर वानर हनुमान वैदेहीच्या दर्शनासाठी उत्सुक होऊन त्यावेळीं सूर्यास्ताची प्रतीक्षा करू लागले. ॥४८॥
सूर्ये चास्तं गते रात्रौ देहं संक्षिप्य मारुतिः ।
वृषदंशकमात्रोऽथ सन् बभूवाद्‌भुतदर्शनः ॥ ४९॥
सूर्यास्त झाल्यानन्तर रात्रीच्या वेळी त्या मारूतीनी अगदी लहान देह धारण केला. ते विचित्र रूपे धारण करणारे हनुमान अगदी माञ्जरा एवढे झाले. ॥४९॥
प्रदोषकाले हनुमांस्तूर्णमुत्पत्य वीर्यवान् ।
प्रविवेश पुरीं रम्यां प्रविभक्तमहापथाम् ॥ ५०॥
प्रदोषकाळी पराक्रमी हनुमान त्वरित उडी मारून त्या रमणीय पुरीत घुसले. ती नगरी प्रशस्त आणि वेगवेगळ्या विशाल राजमार्गाने सुशोभित झाली होती. ॥५०॥
प्रासादमालाविततां स्तम्भैः काञ्चनसंनिभैः ।
शातकुम्भनिभैर्जालैगन्धर्वनगरोपमाम् ॥ ५१॥
मोठमोठ्‍या प्रासादाच्या लांबलचक रांगांनी ती दूरवर पसरली होती. सुवर्णतुल्य खांबांनी आणि सुवर्णासमान जाळ्यांनी (खिडक्यांनी) ती गन्धर्व नगरी प्रमाणे रमणीय भासत होती. ॥५१॥
सप्तभौमाष्टभौमैश्च स ददर्श महापुरीम् ।
तलैः स्फटिकसंकीर्णैः कार्तस्वरविभूषितैः ॥ ५२॥

वैदूर्यमणिचित्रैश्च मुक्ताजालविभूषितैः ।
तैस्तैः शुशुभिरे तानि भवनान्यत्र रक्षसाम् ॥ ५३॥
अशा प्रकारे सात-सात, आठ-आठ मजली हवेल्यांनी आणि स्फटिक मण्यांच्या फरशांनी युक्त अशी ती नगरी हनुमतांनी पाहिली. त्यावर वैडूर्य रत्‍नेही जडवलेली असल्याने त्यांची विचित्र शोभा दिसत होती. मोत्यांच्या जाळ्यांनी त्या हवेल्यांची शोभा वाढली होती. या सर्व कारणांमुळे त्या राक्षसांची घरे सुन्दर शोभेने संपन्न झाली होती. ॥५२-५३॥
काञ्चनानि विचित्राणि तोरणानि च रक्षसाम् ।
लङ्‌कां उद्योतयामासुः सर्वतः समलंकृताम् ॥ ५४॥
इतकेच नव्हे तर राक्षसांच्या घरांच्या द्वाराजवळ जी सुवर्णमय अद्‍भुत तोरणे होती त्यांनी सर्व बाजूनी सजविलेल्या राक्षसांच्या त्या लंकेला प्रभामयच करून सोडले होते. ॥५४॥
अचिन्त्यां अद्‌भुताकारां दृष्ट्‍वा लङ्‌कां महाकपिः ।
आसीद् विषण्णो हृष्टश्च वैदेह्या दर्शनोत्सुकः ॥ ५५॥
अशा विचित्र आकाराने युक्त असलेल्या त्या अतर्क्य लंकेला अवलोकन करून सीतेच्या दर्शनाकरिता उत्सुक झालेले ते हनुमान खिन्न झाले आणि तसेच आनन्दितही झाले. (कारण त्यांच्या मनान्त जानकीच्या दर्शनाची उत्कंठा होती) ॥५५॥
स पाण्डुराविद्धविमानमालिनीं
महार्हजाम्बूनदजालतोरणाम् ।
यशस्विनीं रावणबाहुपालितां
क्षपाचरैर्भीमबलैः सुपालिताम् ॥ ५६॥
परस्परास भिडलेल्या श्वेतवर्णाच्या सात मजली हवेल्यांच्या ओळी लङ्‌का नगरीची शोभा वाढवीत होत्या. बहुमूल्य जाम्बूनद नामक सुवर्णाच्या जाळ्या आणि तोरणांनी तेथील घरे सजविलेली होती. भयंकर बलाढ्‍य निशाचर त्या पुरीचे उत्तम प्रकारे रक्षण करीत होते. रावणाच्या बाहुबळानेही ती सुरक्षित होती. ज्याच्या यशाची ख्याती खूप दूरवर पसरलेली होती अशा लङ्‌कापुरीत हनुमानाने प्रवेश केला. ॥५६॥
चन्द्रोऽपि साचिव्यमिवास्य कुर्वं-
स्तारागणैर्मध्यगतो विराजन् ।
ज्योत्स्नावितानेन वितत्य लोका-
नुत्तिष्ठतेऽनेकसहस्ररश्मिः ॥ ५७॥
त्यावेळी समस्त तारागणांसह त्यांच्या मध्यभागी विराजमान असलेले, अनेक सहस्त्र किरणांनी युक्त चन्द्रदेव हनुमतांस जणुं काय सहाय्य करण्यासाठी समस्त लोकांवर आपल्या चान्दण्याचा प्रकाश पसरवत उदित झाले. ॥५७॥
शङ्‌खप्रभं क्षीरमृणालवर्ण-
मुद्‌गच्छमानं व्यवभासमानम् ।
ददर्श चन्द्रं स कपिप्रवीरः
पोप्लूयमानं सरसीव हंसम् ॥ ५८॥
वानरान्तील प्रमुख वीर हनुमन्तानी शंखासारखी, तसेच दुधासारखी आणि मृणालासारखी कान्ती (वर्ण) असलेल्या चन्द्रम्यास या प्रमाणे आकाशात उदित आणि प्रकाशित होतांना पाहिले तेव्हां एखाद्या सरोवरान्त कुणी राजहंसच पोहत आहे असे त्यांना भासले. ॥५८॥
इत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये सुन्दरकाण्डे द्वितायः सर्गः ॥ २॥
या प्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यान्तील सुन्दरकाण्डाचा दुसरा सर्ग पूर्ण झाला. ॥२॥
॥ श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु ॥

GO TOP