श्रीमद् वाल्मीकि रामायणे
उत्तरकाण्डे
॥ पञ्चनवतितमः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
स्वीयां शुद्धिं समर्थयितुं सीता शपथं करोत्विति श्रीरामस्य विचारः -
श्रीरामांचा सीतेकडून तिची शुद्धता प्रमाणित करण्यासाठी शपथ घेवविण्याचा विचार -
रामो बहून्यहान्येवं तद् गीतं परमं शुभम् ।
शुश्राव मुनिभिः सार्धं पार्थिवैः सह वानरैः ॥ १ ॥
याप्रकारे श्रीरामांनी ऋषि, राजे आणि वानरांसहित कित्येक दिवसपर्यंत ते उत्तर रामायण गायन ऐकले. ॥१॥
तस्मिन्गीते तु विज्ञाय सीतापुत्रौ कुशीलवौ ।
तस्याः परिषदो मध्ये रामो वचनमब्रवीत् ॥ २ ॥

दूतान् शुद्धसमाचारान् आहूयात्ममनीषया ।
मद्वचो ब्रूत गच्छध्वं इतो भगवतोऽन्तिके ॥ ३ ॥
त्या कथेपासूनच त्यांना हे कळून चुकले की कुश आणि लव दोन्ही कुमार सीतेचेच सुपुत्र आहेत. हे जाणून सभेमध्ये बसलेल्या श्रीरामांनी शुद्ध आचार विचार असणार्‍या दूतांना बोलावले आणि आपल्या बुद्धिने विचार करून सांगितले- तुम्ही लोक येथून भगवान्‌ वाल्मीकि मुनिंच्या जवळ जा आणि त्यांना माझा हा संदेश सांगा. ॥२-३॥
यदि शुद्धसमाचारा यदि वा वीतकल्मषा ।
करोत्विहात्मनः शुद्धिं अनुमान्य महामुनिम् ॥ ४ ॥
जर सीतेचे चरित्र शुद्ध आहे आणि जर तिच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे पाप नाही आहे तर तिने महामुनिंची अनुमति घेऊन येथे येऊन जनसमुदायात आपली शुद्धता प्रमाणित करावी. ॥४॥
छन्दं मुनेश्च विज्ञाय सीतायाश्च मनोगतम् ।
प्रत्ययं दातुकामायाः ततः शंसत मे लघु ॥ ५ ॥
तुम्ही या विषयी महर्षि वाल्मीकि तसेच सीतेचाही हार्दीक अभिप्राय जाणून शीघ्र मला सूचित करावा की काय ती येथे येऊन आपल्या शुद्धतेचा विश्वास देऊ इच्छित आहे ? ॥५॥
श्वः प्रभाते तु शपथं मैथिली जनकात्मजा ।
करोतु परिषन्मध्ये शोधनार्थं ममैव च ॥ ६ ॥
उद्या सकाळी मैथिली जानकीने भर सभेत यावे आणि माझा कलंक दूर करण्यासाठी शपथ घ्यावी. ॥६॥
श्रुत्वा तु राघवस्यैतद् वचः परममद्‌भुतम् ।
दूताः सम्प्रययुर्बाढं यत्र वै मुनिपुङ्‌गवः ॥ ७ ॥
राघवांचे हे अत्यंत अद्‍भुत वचन ऐकून दूत ज्या वाड्‍यात मुनिवर वाल्मीकि विराजमान होते त्या वाड्‍यात गेले. ॥७॥
ते प्रणम्य महात्मानं ज्वलन्तममितप्रभम् ।
ऊचुस्ते रामवाक्यानि मृदूनि मधुराणि च ॥ ८ ॥
महात्मा वाल्मीकि अत्यंत तेजस्वी होते आणि आपल्या तेजाने अग्निसमान प्रज्वलित होत होते. त्या दूतांनी त्यांना प्रणाम करून राघवांचे वचन मधुर आणि कोमल शब्दात बोलून ऐकविले. ॥८॥
तेषां तद् भाषितं श्रुत्वा रामस्य च मनोगतम् ।
विज्ञाय सुमहातेजा मुनिर्वाक्यमथाब्रवीत् ॥ ९ ॥
त्या दूतांचे ते भाषण ऐकून आणि श्रीरामांचे मनोगत जाणून ते महातेजस्वी मुनि याप्रकारे बोलले - ॥९॥
एवं भवतु भद्रं वो यथा वदति राघवः ।
तथा करिष्यते सीता दैवतं हि पतिः स्त्रियाः ॥ १० ॥
असेच होईल. तुम्हा लोकांचे भले होवो ! राघव जी आज्ञा देतात, सीता तेच करील, कारण की स्त्रीसाठी पतिच देवता आहे. ॥१०॥
तथोक्ता मुनिना सर्वे राजदूता महौजसम् ।
प्रत्येत्य राघवं क्षिप्रं मुनिवाक्यं बभाषिरे ॥ ११ ॥
मुनिंनी असे सांगितल्यावर ते सर्व राजदूत महातेजस्वी राघवांजवळ परत आले. त्यांनी मुनिंचे वाक्य जसेच्या तसे राघवांना ऐकविले. ॥११॥
ततः प्रहृष्टः काकुत्स्थः श्रुत्वा वाक्यं महात्मनः ।
ऋषींस्तत्र समेतांश्च राज्ञश्चैवाभ्यभाषत ॥ १२ ॥
महात्मा वाल्मीकिंचे वाक्य ऐकून काकुत्स्थ रामांना फार प्रसन्नता वाटली आणि त्यांनी तेथे आलेल्या ऋषिंना आणि राजांना म्हटले - ॥१२॥
भगवन्तः सशिष्या वै सानुगाश्च नराधिपाः ।
पश्यन्तु सीताशपथं यश्चैवान्योऽपि काङ्‌क्षते ॥ १३ ॥
आपण सर्व पूज्यपाद मुनि शिष्यांसह सभेमध्ये यावे. सेवकांसहित राजे लोकांनीही उपस्थित व्हावे तसेच दुसरेही जे कोणी सीतेची शपथ ऐकू इच्छितात, त्यांनी यावे. या प्रकारे सर्व लोकांनी एकत्रित होऊन सीतेचे शपथ-ग्रहण पहावे. ॥१३॥
तस्य तद् वचनं श्रुत्वा राघवस्य महात्मनः ।
सर्वेषां ऋषिमुख्यानां साधुवादो महानभूत् ॥ १४ ॥
महात्मा राघवेंद्रांचे हे वचन ऐकून समस्त महर्षिंच्या मुखांतून महान्‌ साधुवादाचा ध्वनि निनादू लागला. ॥१४॥
राजानश्च महात्मानं प्रशंसन्ति स्म राघवम् ।
उपपन्नं नरश्रेष्ठ त्वय्येव भुवि नान्यतः ॥ १५ ॥
राजेलोकही महात्मा राघवांची प्रशंसा करीत म्हणाले - नरश्रेष्ठ ! या पृथ्वीवर सर्व उत्तम गोष्टी केवळ आपल्यातच संभव आहेत. दुसर्‍या कुणाच्याही ठिकाणी नाही. ॥१५॥
एवं विनिश्चयं कृत्वा श्वोभूत इति राघवः ।
विसर्जयामास तदा सर्वांस्तान् शत्रुसूदनः ॥ १६ ॥
याप्रकारे दुसर्‍या दिवशी सीतेकडून शपथ घेण्याचा निश्चय करून शत्रुसूदन श्रीरामांनी त्या समयी सर्वांना निरोप दिला. ॥१६॥
इति सम्प्रविचार्य राजसिंहः
श्वोभूते शपथस्य निश्चयं ।
विससर्ज मुनीन् नृपांश्च सर्वान्
स महात्मा महतो महानुभावः ॥ १७ ॥
याप्रकारे दुसर्‍या दिवशी सकाळी सीतेकडून शपथ घेण्याचा निश्चय करून महानुभाव महात्मा राजसिंह श्रीरामांनी सर्व मुनि आणि नरेशांना आपापल्या स्थानावर जाण्याची अनुमति दिली. ॥१७॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् उत्तरकाण्डे पञ्चनवतितमः सर्ग ॥ ९५ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील उत्तरकाण्डाचा पञ्चाण्णवावा सर्ग पूरा झाला. ॥९५॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP