श्रीमद् वाल्मीकि रामायणे
किष्किंधाकाण्डे
॥ पञ्चषष्टितमः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
पर्यायेण वानरैः स्वस्वदूरगमनशक्ति परिमाणस्य प्रतिपादनं, जाम्बवदंगदयोः संलापो, जांबवतो हनुमंतं प्रेरयितुं तत्पार्श्वे गमनम् - एका पाठोपाठ एका वानर वीरांनी आपापल्या गमनशक्तीचे वर्णन करणे, जाम्बवान् आणि अंगद यांची चर्चा तसेच जाम्बवानाचे हनुमानास प्रेरित करण्यासाठी त्यांच्याजवळ जाणे -
अथाङ्‌ग्दवचः श्रुत्वा ते सर्वे वानरर्षभाः ।
स्वं स्वं गतौ समुत्साहं ऊचूस्तत्र यथाक्रमम् ॥ १ ॥
अंगदाचे हे भाषण ऐकून ते सर्व श्रेष्ठ वानर लांब उड्डाण करण्यासंबंधीच्या आपापल्या उत्साहाचा - शक्तीचा परिचय देऊ लागले. ॥१॥
गजो गवाक्षो गवयः शरभो गंधमादनः ।
मैंदश्च द्विविदश्चैव सुषेणो जांबवांस्तथा ॥ २ ॥
गज, गवाक्ष, गवय, शरभ, गंधमादन, मैंद, द्विविद, सुषेण आणि जाम्बवान् - या सर्वांनी आपापल्या शक्तीचे वर्णन केले. ॥२॥
आबभाषे गजस्तत्र प्लवेयं दशयोजनम् ।
गवाक्षो योजनान्याह गमिष्यामीति विंशतिम् ॥ ३ ॥
यापैकी गजाने म्हटले - ’ मी दहा योजना इतके उड्डाण करू शकतो.’ गवाक्ष म्हणाला- ’मी वीस योजनापर्यंत निघून जाईन.’ ॥३॥
गवयो वानरस्तत्र वानरांस्तानुवाच ह ।
त्रिंशतं तु गमिष्यामि योजनानां प्लवंगमाः ॥ ४ ॥
यानंतर तेथे शरभ नामक वानराने त्य कपिवरांना म्हटले- ’वानरांनो ! मी तीस योजनापर्यंत एका उडीत निघून जाईन.’ ॥४॥
ऋषभो वानरस्तत्र वानरांस्तानुवाच ह ।
चत्वारिंशद् गमिष्यामि योजनानां न संशयः ॥ ५ ॥
त्यानंतर कपिवर ऋषभाने त्या वानरांना सांगितले- ’मी चाळीस योजनापर्यत जाईन यात संशय नाही.’ ॥५॥
वानरांस्तु महातेजा अब्रवीद् गंधमादनः ।
योजनानां गमिष्यामि पञ्चाशत्तु न संशयः ॥ ६ ॥
तत्पश्चात् महातेजस्वी गंधमादनाने त्या वानरांना म्हटले- ’यात संशय नाही की मी पन्नास योजनापर्यत एका उड्डाणात निघून जाईन.’ ॥६॥
मैंदस्तु वानरस्तत्र वानरांस्तानुवाच ह ।
योजनानां परं षष्टिं अहं प्लवितुमुत्सहे ॥ ७ ॥
त्यानंतर तेथे वानर-वीर मैंद त्या वानरांना म्हणाले- ’मी साठ योजना पर्यंत एका उडीत जाण्याचा उत्साह बाळगत आहे.’ ॥७॥
ततस्तत्र महातेजा द्विविदः प्रत्यभाषत ।
गमिष्यामि न संदेहः सप्ततिं योजनान्यहम् ॥ ८ ॥
तदनंतर महातेजस्वी द्विविद बोलले- ’मी सत्तर योजनांपर्यंत निघून जाईन यात संदेह नाही.’ ॥८॥
सुषेणस्तु महातेजाः सत्त्ववान् कपिसत्तमः ।
अशीतिं प्रतिजानेऽहं योजनानां पराक्रमे ॥ ९ ॥
त्यानंतर धैर्यशाली कपिश्रेष्ठ महातेजस्वी सुषेण बोलले- ’मी एका उडीत ऐंशी योजनापर्यंत जाण्याची प्रतिज्ञा करतो.’ ॥९॥
तेषां कथयतां तत्र सर्वांस्ताननुमान्य च ।
ततो वृद्धतमस्तेषां जांबवान् प्रत्यभाषत ॥ १० ॥
याप्रकारे सांगणार्‍या सर्व वानरांचा सन्मान करून ऋक्षराज जाम्बवान् , जे सर्वात वृद्ध होते, म्हणाले - ॥१०॥
पूर्वमस्माकमप्यासीत् कश्चिद्गजतिपराक्रमः ।
ते वयं वयसः पारं अनुप्राप्ताः स्म सांप्रतम् ॥ ११ ॥

किंतु नैवं गते शक्यं इदं कार्यमुपेक्षितुम् ।
यदर्थं कपिराजश्च रामश्च कृतनिश्चयौ ॥ १२ ॥

सांप्रतं कालमस्माकं या गतिस्तां निबोधत ।
नवतिं योजनानां तु गमिष्यामि न संशयः ॥ १३ ॥
’प्रथम युवावस्थेमध्ये माझ्यामध्येही दूरपर्यंत उड्डाण करण्याची काही शक्ती होती. जरी आता मी त्या अवस्थेला पार करून चुकलो आहे तरी ज्या कार्यासाठी वानरराज सुग्रीव तसेच भगवान् श्रीराम दृढ निश्चय करून चुकले आहेत, त्याची माझ्याकडून उपेक्षा केली जाऊ शकत नाही. या समयी माझी जी गति आहे ती आपण लोकांनी ऐकावी. मी एका उडीत नव्वद योजनापर्यंत निघून जाईन यात संशय नाही.’ ॥११-१३॥
तांश्च सर्वान् हरिश्रेष्ठान् जांबवानिदमब्रवीत् ।
न खल्वेतावदेवासीद् गमने मे पराक्रमः ॥ १४ ॥

मया वैरोचने यज्ञे प्रभविष्णुः सनातनः ।
प्रदक्षिणीकृतः पूर्वं क्रममाणस्त्रिविक्रमम् ॥ १५ ॥
असे म्हणून जाम्बवान् त्या समस्त श्रेष्ठ वानरांना पुन्हा याप्रकारे बोलले - ’पूर्वकाळी माझ्या ठिकाणी इतकेच दूरपर्यंत जाण्याची शक्ती नव्हती. पूर्वी राजा बलिच्या यज्ञात सर्वव्यापी तसेच सर्वांचे कारणभूत सनातन भगवान् विष्णु जेव्हा तीन पावले भूमि मोजण्यासाठी आपले पाऊल वाढवीत राहिले होते त्यासमयी मी त्यांच्या त्या विराट स्वरूपाची थोड्याच समयात परिक्रमा केली होती. ॥१४-१५॥
स इदानीमहं वृद्धः प्लवने मंदविक्रमः ।
यौवने च तदासीन्मे बलमप्रतिमं परैः ॥ १६ ॥
’यासमयी तर मी म्हातारा झालो आहे, म्हणून उड्डाण मारण्याची माझी शक्ती खूपच कमी झालेली आहे, परंतु युवावस्थे मध्ये माझ्या ठिकाणी ज्याची कोठे तुलनाच करता येत नाही असे महान् बल होते. ॥१६॥
संप्रत्येतावदेवाद्य शक्यं मे गमने स्वतः ।
नैतावता च संसिद्धिः कार्यस्यास्य भविष्यति ॥ १७ ॥
’आजकाल तर माझ्यात स्वतः चालण्या इतपतच शक्ति आहे परंतु एवढ्याशा गतिने समुद्रलंघनरूपी या वर्तमान कार्याची सिद्धि होऊ शकत नाही.’ ॥१७॥
अथोत्तरमुदारार्थं अब्रवीदङ्‌गधदस्तदा ।
अनुमान्य महाप्राज्ञो जांबवंतं महाकपिः ॥ १८ ॥
त्यानंतर बुद्धिमान् महाकपि अंगदांनी त्यासमयी जाम्बवानांचा विशेष आदर करून ही उदारतापूर्ण गोष्ट सांगितली- ॥१८॥
अहमेतद् गमिष्यामि योजनानां शतं महत् ।
निवर्तने तु मे शक्तिः स्यान्न वेति न निश्चितम् ॥ १९ ॥
’मी या महासागराच्या शंभर योजनांच्या अंतरास ओलांडून जाईन, परंतु तेथून परत येण्यासाठी माझी अशी शक्ति राहील अथवा नाही हे निश्चितरूपाने सांगणे शक्य नाही.’ ॥१९॥
तमुवाच हरिश्रेष्ठं जांबवान् वाक्यकोविदः ।
ज्ञायते गमने शक्तिः तव हर्यृक्षसत्तम ॥ २० ॥
तेव्हा वाक्यकोविद जाम्बवानांनी कपिश्रेष्ठ अंगदास म्हटले- ’अस्वले आणि वानरांमध्ये श्रेष्ठ युवराज ! तुमच्या गमनशक्तीशी आम्ही लोक उत्तम प्रकारे परिचित आहोत. ॥२०॥
कामं शतसहस्रं वा नह्येष विधिरुच्यते ।
योजनानां भवान् शक्तो गंतुं प्रतिनिवर्तितुम् ॥ २१ ॥
’भलेही तुम्ही एक लाख योजन पर्यंत निघून जाल, तथापि तुम्ही सर्वांचे स्वामी आहात म्हणून तुम्हांला धाडणे आम्हांला उचित नाही. तुम्ही लाखो योजने जाण्यास आणि परत येण्यास समर्थ आहात. ॥२१॥
नहि प्रेषयिता तात स्वामी प्रेष्यः कथञ्चन ।
भवतायं जनः सर्वः प्रेष्यः प्लवगसत्तम ॥ २२ ॥
’परंतु तात ! वानरश्रेष्ठ ! जो सर्वांना धाडणारा स्वामी आहे तो कशा प्रकारे प्रेष्य (आज्ञापालक) होऊ शकत नाही. हे सर्व लोक तुमचे सेवक आहेत. तुम्ही यांच्यापैकी कोणालाही धाडावे. ॥२२॥
भवान्कलत्रमस्माकं स्वामिभावे व्यवस्थितः ।
स्वामी कलत्रं सैन्यस्य गरितेषा परंतप ॥ २३ ॥
’तुम्ही कलत्र (स्त्री प्रमाणे रक्षणीय) आहात, (जशी नारी पतिच्या हृयाची स्वमिनी असते त्या प्रकारे) तुम्ही आमच्या स्वामीच्या पदावर प्रतिष्ठित आहात. परंतप ! स्वामी सेनेसाठी कलत्राप्रमाणे संरक्षणीय असतो. हीच लोकांची मान्यता आहे. ॥२३॥
अपि वै तस्य कार्यस्य भवान् मूलमरिंदम ।
तस्मात् कालत्रवत् तात प्रतिपाल्यः सदा भवान् ॥ २४ ॥
’शत्रुदमन ! तात ! तुम्ही या कार्याचे मूळ आहात, म्हणून सदा कलत्राप्रमाणे तुमचे पालन करणे उचित आहे. ॥२४॥
मूलमर्थस्य संरक्ष्यं एष कार्यविदां नयः ।
मूले हि सति सिध्यंति गुणाः पुष्पफलोदयाः ॥ २५ ॥
’कार्याच्या मूळाचे रक्षण केले पाहिजे. हीच कार्याचे तत्व जाणणार्‍या विद्वानांची नीति आहे, कारण की मूळ राहाण्यानेच सर्व गुण सफल सिद्ध होतात. ॥२५॥
तद् भवानस्य कार्यस्य साधनं सत्यविक्रम ।
बुद्धिविक्रमसंपन्नो हेतुरत्र परंतप ॥ २६ ॥
’म्हणून सत्यपराक्रमी शत्रुदमन वीरा ! तुम्हीच या कार्याचे साधन तसेच बुद्धि आणि पराक्रमाने संपन्न हेतु आहात. ॥२६॥
गुरुश्च गुरुपुत्रश्च त्वं हि नः कपिसत्तम ।
भवंतमाश्रित्य वयं समर्था ह्यर्थसाधने ॥ २७ ॥
’कपिश्रेष्ठ ! तुम्ही आमचे गुरू आणि गुरूपुत्र आहात ! तुमचा आश्रय घेऊनच आम्ही सर्व लोक कार्यसाधन्यात समर्थ होऊ शकतो.’ ॥२७॥
उक्तवाक्यं महाप्राज्ञं जांबवंतं महाकपिः ।
प्रत्युवाचोत्तरं वाक्यं वालिसूनुरथाङ्‌गसदः ॥ २८ ॥
’जेव्हा परम बुद्धिमान् जाम्बवान् पूर्वोक्त गोष्ट सांगून चुकले तेव्हा महाकपि वालिकुमार अंगदांनी याप्रकारे उत्तर दिले- ॥२८॥
यदि नाहं गमिष्यामि नान्ये वानरपुंगवः ।
पुनः खल्विदमस्माभिः कार्यं प्रायोपवेशनम् ॥ २९ ॥
’जर मी गेलो नाही आणि दुसरा कोणीही श्रेष्ठ वानर जाण्यास तयार झाला नाही तर मग आपण लोकांनी निश्चितपणे मरणांत उपवासच करावयास पाहिजे. ॥२९॥
न ह्यकृत्वा हरिपतेः संदेशं तस्य धीमतः ।
तत्रापि गत्वा प्राणानां पश्यामि परिरक्षणम् ॥ ३० ॥
’बुद्धिमान् वानरराज सुग्रीवांच्या आदेशाचे पालन न करता जर आपण लोक किष्किंधेस परत निघालो तर तेथे जाऊनही आपल्याला आपल्या प्राणांच्या रक्षणाचा काही उपाय दिसून येणार नाही. ॥३०॥
न हि प्रसादे चात्यर्थं कोपे च हरिरीश्वरः ।
अतीत्य तस्य संदेशं विनाशो गमने भवेत् ॥ ३१ ॥
’ते आमच्यावर कृपा करण्यास अथवा अत्यंत कुपित होऊन आम्हांला दण्ड देण्यास समर्थ आहेत. त्यांच्या आज्ञेचे उल्लंघन केल्यावर आमचा विनाश अवश्यंभावी आहे. ॥३१॥
तत्तथा ह्यस्य कार्यस्य न भवत्यन्यथा गतिः ।
तद् भद्‌भहवानेव दृष्टार्थः सञ्चिंतयितुमर्हति ॥ ३२ ॥
’म्हणून ज्या उपायाने ह्या सीतादर्शनरूपी कार्याच्या सिद्धिमध्ये अडथळा येणार नाही, त्याचा आपण विचार करावा, कारण की आपल्याला सर्व गोष्टींचा अनुभव आहे.’ ॥३२॥
सो ऽङ्‌गहदेन तदा वीरः प्रत्युक्तः प्लवगर्षभः ।
जांबवानुत्तमं वाक्यं प्रोवाचेदं ततोऽङ्‌गतदम् ॥ ३३ ॥
त्यासमयी अंगदांनी असे म्हटल्यावर वीर वानरशिरोमणि जाम्बवानांनी त्यांना ही उत्तम गोष्ट सांगितली- ॥३३॥
अस्य ते वीर कार्यस्य न किञ्चित्परिहास्यते ।
एष सञ्चोदयाम्येनं यः कार्यं साधयिष्यति ॥ ३४ ॥
’वीरा ! तुमच्या या कार्यात किंचितहि त्रुटि येणार नाही. आता मी अशा वीराला प्रेरित करीत आहे की जो या कार्याची सिद्धि करू शकेल.’ ॥३४॥
ततः प्रतीतं प्लवतां वरिष्ठं
एमेकांतमाश्रित्य सुखोपविष्टम् ।
सञ्चोदयामास हरिप्रवीरो
हरिप्रवीरं हनुमंतमेव ॥ ३५ ॥
असे म्हणून वानरे आणि भालु यांचे वीर यूथपति जाम्बवानांनी वानरसेनेचे श्रेष्ठ वीर हनुमान् यांना प्रेरित केले; जे एकान्तात जाऊन मजेत बसलेले होते. त्यांना कुठल्याही गोष्टीची चिंता नव्हती आणि ते दूरपर्यंत उड्डाण करणारात सर्वांहून श्रेष्ठ होते. ॥३५॥
इत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये किष्किंधाकाण्डे पञ्चषष्टितमः सर्गः ॥ ६५ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील किष्किंधाकाण्डाचा पासष्ठावा सर्ग पूरा झाला. ॥६५॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP