श्रीमद् वाल्मीकि रामायणे
उत्तरकाण्डे
॥ चतुस्त्रिंशः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
वालिना रावणस्य पराभवो, रावणस्य तेन सह मैत्रीभावश्च -
वालीच्या द्वारा रावणाचा पराभव तसेच रावणाने त्यांना आपले मित्र बनविणे -
अर्जुनेन विमुक्तस्तु रावणो राक्षसाधिपः ।
चचार पृथिवीं सर्वां अनिर्विण्णस्तथा कृतः ॥ १ ॥
अर्जुनापासून सुटका होताच राक्षसराज रावण निर्वेदरहित होऊन पुन्हा सार्‍या पृथ्वीवर विचरण करू लागला. ॥१॥
राक्षसं वा मनुष्यं वा शृणुते यं बलाधिकम् ।
रावणस्तं समासाद्य युद्धे ह्वयति दर्पितः ॥ २ ॥
राक्षस असो वा मनुष्य असो, ज्याला कुणाला तो बळात आपल्याहून वरचढ आहे असे ऐके, त्याच्यापाशी पोहोचून अभिमानी रावण त्याला युद्धासाठी आव्हान देत होता. ॥२॥
ततः कदाचित् किष्किन्धां नगरीं वालिपालिताम् ।
गत्वा ह्वयति युद्धाय वालिनं हेममालिनम् ॥ ३ ॥
त्यानंतर एक दिवस तो वालिद्वारा पालित किष्किंधापुरीमध्ये जाऊन सुवर्णमाळा धारण करणार्‍या वालिला युद्धासाठी ललकारू लागला. ॥३॥
ततस्तु वानरामात्याः तारस्तारापिता प्रभुः ।
उवाच वानरो वाक्यं युद्धप्रेप्सुमुपागतम् ॥ ४ ॥
त्यासमयी युद्धाच्या इच्छेने आलेल्या रावणाला वालीचे मंत्री तार, तारेचा पिता सुषेण तसेच युवराज अंगद आणि सुग्रीवाने म्हटले - ॥४॥
राक्षसेन्द गतो वाली यस्ते प्रतिबलो भवेत् ।
कोऽन्यः प्रमुखतः स्थातुं तव शक्तः प्लवङ्‌गमः ॥ ५ ॥
राक्षसराज ! यासमयी वालि तर बाहेर गेलेले आहेत. तेच आपल्या जोडीचे होऊ शकतात. दुसरा कोणी वानर आपल्या समोर टिकू शकतो ? ॥५॥
चतुर्भ्योऽपि समुद्रेभ्यः सन्ध्यामन्वास्य रावण ।
इमं मुहूर्तमायाति वाली तिष्ठ मुहूर्तकम् ॥ ६ ॥
रावणा ! चारी समुद्रांतून संधोपासना करून वालि आता येतच असतील, आपण एक मुहूर्तपर्यंत थांबावे. ॥६॥
एतानस्थिचयान् पश्य य एते शङ्‌खपाण्डुराः ।
युद्धार्थिनामिमे राजन् वानराधिपतेजसा ॥ ७ ॥
राजन्‌ ! पहा हे जे शंखासमान उज्ज्वल हाडांचे ढीग लागले आहेत ते वालीशी युद्धाच्या इच्छेने आलेल्या आपल्या सारख्या वीरांचेच आहेत. वानरराज वालिच्या तेजानेच या सर्वांचा अंत झाला आहे. ॥७॥
यद्वाऽमृतरसः पीतः त्वया रावण राक्षस ।
तदा वालिनमासाद्य तदन्तं तव जीवितम् ॥ ८ ॥
राक्षस रावणा ! जरी आपण अमृतरसाचे पान केले असेल तरीही जेव्हा आपण वालिशी टक्कर द्याल तेव्हा तोच आपल्या जीवनांतील अंतिम क्षण होईल. ॥८॥
पश्येदानीं जगच्चित्रं इमं विश्रवसः सुत ।
इदं मुहूर्तं तिष्ठस्व दुर्लभं ते भविष्यति ॥ ९ ॥
विश्रवाकुमार ! वालि संपूर्ण आश्चर्याचे भांडार आहे. आपण यावेळी त्यांचे दर्शन कराल. केवळ ह्या मुहूर्तापर्यंतच त्यांची प्रतीक्षा करण्यासाठी थांबा मग तर आपल्यासाठी जीवन दुर्लभ होऊन जाईल. ॥९॥
अथवा त्वरसे मर्तुं गच्छ दक्षिणसागरम् ।
वालिनं द्रक्ष्यसे तत्र भूमिष्ठमिव पावकम् ॥ १० ॥
अथवा जर आपणास मरण्याची घाईच झाली असेल तर दक्षिण समुद्राच्या तटावर जा. तेथे आपल्याला पृथ्वीवर स्थित झालेल्या अग्निदेवासमान वालिचे दर्शन होईल. ॥१०॥
स तु तारं विनिर्भर्त्स्य रावणो लोकरावणः ।
पुष्पकं तत्समारुह्य प्रययौ दक्षिणार्णवम् ॥ ११ ॥
तेव्हा लोकांना रडविणार्‍या रावणाने तारची निर्भत्सना करून तो पुष्पकविमानावर आरूढ होऊन दक्षिण समुद्राच्या दिशेने प्रस्थित झाला. ॥११॥
तत्र हेमगिरिप्रख्यं तरुणार्कनिभाननम् ।
रावणो वालिनं दृष्ट्‍वा सन्ध्योपासनतत्परम् ॥ १२ ॥
तेथे रावणाने सुवर्णगिरि प्रमाणे उंच वालिला संध्योपासना करतांना पाहिले. त्यांचे मुख प्रभातकाळच्या सूर्याप्रमाणे अरूण प्रभेने उद्‌भासित होत होते. ॥१२॥
पुष्पकादवरुह्याथ रावणोऽञ्जनसंनिभः ।
ग्रहीतुं वालिनं तूर्णं निःशब्दपदमाव्रजत् ॥ १३ ॥
त्यांना पाहून काजळाप्रमाणे काळा रावण पुष्पकविमानांतून खाली उतरला आणि वालिला पकडण्यासाठी भराभर त्याच्या दिशेने जाऊ लागला. त्यासमयी तो आपल्या पावलांची जराही चाहूल लागू देत नव्हता. ॥१३॥
यदृच्छया तदा दृष्टो वालिनापि स रावणः ।
पापाभिप्रायवान् दृष्ट्‍वा चकार न तु सम्भ्रमम् ॥ १४ ॥
दैवयोगाने वालिनेही रावणास पाहिले, परंतु त्याचा पापपूर्ण अभिप्राय जाणूनही ते घाबरले नाहीत. ॥१४॥
शशमालक्ष्य सिंहो वा पन्नगं गरुडो यथा ।
न चिन्तयति तं वाली रावणं पापनिश्चयम् ॥ १५ ॥
सिंह जसा सशाला अथवा गरूड सर्पाला पाहूनही त्याची पर्वा करत नाही त्याच प्रकारे वालिने पापपूर्ण विचार बाळगणार्‍या रावणाला पाहूनही चिंता केली नाही. ॥१५॥
जिघृक्षमाणमायान्तं रावणं पापचेतसम् ।
कक्षावलम्बिनं कृत्वा गमिष्ये त्रीन्महार्णवान् ॥ १६ ॥
त्यांनी हा निश्चय केला होता की जेव्हा पापात्मा रावण मला पकडण्याच्या इच्छेने जवळ येईल तेव्हा मी त्याला काखेत दाबून धरून लटकत ठेवीन आणि त्याला घेऊनच शेष तीन महासागरांवर जाऊन येईन. ॥१६॥
द्रक्ष्यन्त्यरिं ममाङ्‌कस्थं स्रंसदूरुकराम्बरम् ।
लम्बमानं दशग्रीवं गरुडस्येव पन्नगम् ॥ १७ ॥
याच्या मांड्‍या, हात, पाय आणि वस्त्र ओढली जातील. तो माझ्या काखेत दाबला जाईल आणि त्याच दशेमध्ये लोक माझ्या शत्रुला, गरूडाच्या पंज्यात दाबल्या गेलेल्या सर्पासमान लटकताना पाहतील. ॥१७॥
इत्येवं मतिमास्थाय वाली मौनमुपास्थितः ।
जपन् वै नैगमान् मंत्रा तस्थौ पर्वतराडिव ॥ १८ ॥
अशा निश्चय करून वालि मौन राहिला आणि वैदिक मंत्रांचा जप करीत गिरिराज सुमेरूप्रमाणे उभा राहिला. ॥१८॥
तावन्योन्यं जिघृक्षन्तौ हरिराक्षसपार्थिवौ ।
प्रयत्‍नावन्तौ तत् कर्म ईहतुर्बलदर्पितौ ॥ १९ ॥
याप्रकारे बळाच्या अभिमानाने भरलेले ते वानरराज आणि राक्षसराज दोघेही एकमेकांना पकडू इच्छित होते. दोघेही यासाठीच प्रयत्‍नशील होते आणि दोघेही ते काम साधण्याच्या संधीच्या शोधात होते. ॥१९॥
हस्तग्राहं तु तं मत्वा पादशब्देन रावणम् ।
पराङ्‌मुखोऽपि जग्राह वाली सर्पमिवाण्डजः ॥ २० ॥
रावणाच्या पावलांची हलकीशी चाहूल लागतांच वालिने हे जाणले की आता रावण हात पुढे करून मला पकडू इच्छित आहे. मग तर त्याने दुसरीकडे तोंड केलेले असताच त्याला, गरूड जसे सर्पाला दाबून धरतो तसे एकाएकी (रावणाला) पकडले. ॥२०॥
ग्रहीतुकामं तं गृह्य रक्षसामीश्वरं हरिः ।
खमुत्पपात वेगेन कृत्वा कक्षावलम्बिनम् ॥ २१ ॥
पकडण्याची इच्छा करणार्‍या त्या राक्षसराजाला वालिने स्वतःच पकडले आणि आपल्या काखेत लटकविले आणि अत्यंत वेगाने त्यांनी आकाशात झेप घेतली. ॥२१॥
तं चापीडयमानं तु वितुदन्तं नखैर्मुहुः ।
जहार रावणं वाली पवनस्तोयदं यथा ॥ २२ ॥
रावण आपल्या नखांनी वारंवार वालिला ओरबाडत आणि पीडा देत राहिला होता. तरीही वायु जसा ढगांना उडवून लावतो त्याचप्रकारे वालि रावणाला काखेत दाबून धरूनच फिरत होता. ॥२२॥
अथ ते राक्षसामात्या ह्रियमाणं दशाननम् ।
मुमोक्षयिषवो वालिं रवमाणा अभिद्रुताः ॥ २३ ॥
याप्रकारे रावणाचे हरण झाल्यावर त्याचे मंत्री त्याला वालिपासून सोडविण्यासाठी कोलाहल करत त्याच्या मागोमाग पळू लागले. ॥२३॥
अन्वीयमानस्तैर्वाली भ्राजतेऽम्बरमध्यगः ।
अन्वीयमानो मेघौघैः अम्बरस्थ इवांशुमान् ॥ २४ ॥
मागोमाग राक्षस येत होते आणि वालि पुढे पुढे जात होता. या अवस्थेत आकाशाच्या मध्यभागात पोहोचून मेघसमूहांनी अनुगत झालेल्या आकाशवर्ती अंशुमाळी सूर्याप्रमाणे वालि शोभत होता. ॥२४॥
तेऽशक्नुवन्तः सम्प्राप्तुं वालिनं राक्षसोत्तमाः ।
तस्य बाहूरुवेगेन परिश्रान्ता व्यवस्थिताः ॥ २५ ॥
ते श्रेष्ठ राक्षस खूप प्रयत्‍न करूनही वालिच्या जवळही पोहोचू शकले नाहीत. वालिच्या भुजा आणि जांघांच्या वेगाने उत्पन्न झालेल्या वायुच्या थपडा खाऊन ते थकून तेथेच उभे राहिले. ॥२५॥
वालिमार्गादपाक्रामन् पर्वतेन्द्रापि गच्छतः ।
किं पुनर्जीवितप्रेप्सुः बिभ्रद् वै मांसशोणितम् ॥ २६ ॥
वालि मार्गाने उडत असता मोठ मोठे पर्वतही बाजूला सरकत असत मग रक्तमांसमय शरीर धारण करणारे आणि शरीराचे रक्षण व्हावे अशी इच्छा करणारे प्राणी त्यांच्या मार्गातून बाजूला जातील, याबद्दल सांगण्याचीच आवश्यकता काय ? ॥२६॥
अपक्षिगणसम्पातान् वानरेन्द्रो महाजवः ।
क्रमशः सागरान् सर्वान् सन्ध्याकालमवन्दत ॥ २७ ॥
जितक्या वेळात वालि समुद्रापर्यंत पोहोचत होता, तितक्या वेळात शीघ्रगामी पक्ष्यांचे समूहही पोहोचू शकत नव्हते. त्या महान्‌ वेगशाली वानरराजाने क्रमशः सर्व समुद्रांच्या तटावर पोहोचून संध्यावंदन केले. ॥२७॥
संपूज्यमानो यातस्तु खचरैः खचरोत्तमः ।
पश्चिमं सागरं वाली ह्याजगाम सरावणः ॥ २८ ॥
समुद्रांची यात्रा करणार्‍या आकाशचारीमध्ये श्रेष्ठ वालीची सर्व खेचर प्राणी पूजा तसेच प्रशंसा करीत होते. ते रावणाला काखेत दाबून धरून पश्चिम समुद्राच्या तटावर आले. ॥२८॥
तस्मिन् संध्यां उपासित्वा स्नात्वा जप्त्वा च वानरः ।
उत्तरं सागरं प्रायाद् वहमानो दशाननम् ॥ २९ ॥
तेथे स्नान, संध्योपासना आणि जप करून ते वानरवीर दशाननास घेऊन उत्तर समुद्राच्या तटावर जाऊन पोहोचले. ॥२९॥
बहुयोजनसाहस्रं वहमानो महाहरिः ।
वायुवच्च मनोवच्च जगाम सह शत्रुणा ॥ ३० ॥
वायु आणि मनाच्या वेगासमान ते महावानर वाली काही सहस्त्र योजनापर्यंत रावणाला वहात राहिले. नंतर ते आपल्या शत्रुसहच उत्तर समुद्राच्या किनार्‍यावर गेले. ॥३०॥
उत्तरे सागरे सन्ध्यां उपासित्वा दशाननम् ।
वहमानोऽगमद् वाली पूर्वं वै स महोदधिम् ॥ ३१ ॥
उत्तर सागराच्या तटावर संध्योपासना करून दशाननाचा भार वाहून नेत वाली पूर्व दिशावर्ती महासागराच्या किनार्‍यावर गेले. ॥३१॥
तत्रापि सन्ध्यामन्वास्य वासविः स हरीश्वरः ।
किष्किन्धामभितो गृह्य रावणं पुनरागमत् ॥ ३२ ॥
तेथे ही संध्योपासना संपन्न करून ते इंद्रपुत्र वानरराज वाली दशमुख रावणाला काखेत दाबून धरून परत किष्किंधापुरीच्या निकट आले. ॥३२॥
चतुर्ष्वपि समुद्रेषु सन्ध्यामन्वास्य वानरः ।
रावणोद्वहनश्रान्तः किष्किन्धोपवनेऽपतत् ॥ ३३ ॥
याप्रमाणे चारी समुद्रांमध्ये संध्योपासनेचे कार्य पूर्ण करून रावणाला वहाण्याच्या (श्रमामुळे) थकलेले वानरराज वाली किष्किंधेच्या उपवनात येऊन पोहोचले. ॥३३॥
रावणं तु मुमोचाथ स्वकक्षात् कपिसत्तमः ।
कुतस्त्वमिति चोवाच प्रहसन् रावणं मुहुः ॥ ३४ ॥
तेथे येऊन त्या कपिश्रेष्ठांनी रावणाला आपल्या काखेतून सोडून दिले आणि वारंवार हसत विचारले -सांगा बरे तुम्ही कोठून आला आहात ? ॥३४॥
विस्मयं तु महद्‌ गत्वा श्रमलोलनिरीक्षणः ।
राक्षसेन्द्रो हरीन्द्रं तं इदं वचनमब्रवीत् ॥ ३५ ॥
रावणाचे डोळे श्रमामुळे चंचल होत होते. वालीचा हा अद्‍भुत पराक्रम पाहून त्याला महान्‌ आश्चर्य वाटले आणि त्या राक्षसराजाने त्या वानरराजाला याप्रकारे म्हटले - ॥३५॥
वानरेन्द्र महेन्द्राभ राक्षसेन्द्रोऽस्मि रावणः ।
युद्धेप्सुरिह सम्प्राप्तः स चाद्यासादितस्त्वया ॥ ३६ ॥
महेंद्राप्रमाणे पराक्रमी वानरेंद्र ! मी राक्षसेंद्र रावण आहे आणि युद्ध करण्याच्या इच्छेने येथे आलो होतो, तर ते युद्ध तर आपल्या कडून मिळालेच आहे. ॥३६॥
अहो बलमहो वीर्यं अहो गाम्भीर्यमेव च ।
येनाहं पशुवद्‌गृह्य भ्रामितश्चतुरोऽर्णवान् ॥ ३७ ॥
अहो ! आपल्यामध्ये अद्‌भुत बळ आहे, अद्‌भुत पराक्रम आहे आणि आश्चर्यजनक गंभीरता आहे. आपण मला पशुप्रमाणे पकडून चारी समुद्रांवर फिरवलेत. ॥३७॥
एवमश्रान्तवद् वीर शीघ्रमेव महार्णवान् ।
मां चैवोद्वहमानस्तु कोऽन्यो वीरः क्रमिष्यति ॥ ३८ ॥
वानरवीरा ! तुमच्याशिवाय दुसरा कोण असा शूरवीर असेल जो मला याप्रकारे न थकतां शीघ्रतापूर्वक वाहून नेऊ शकेल. ॥३८॥
त्रयाणामेव भूतानां गतिरेषा प्लवङ्‌गम ।
मनोनिलसुपर्णानां तव चात्र न संशयः ॥ ३९ ॥
वानरराज ! अशी गति तर मन, वायु आणि गरूड - या तीन भूतांचीच ऐकलेली आहे. निःसंदेह या जगतात चौथे आपणच अशी तीव्र गति असणारे आहात. ॥३९॥
सोऽहं दृष्टबलस्तुभ्यं इच्छामि हरिपुङ्‌गव ।
त्वया सह चिरं सख्यं सुस्निग्धं पावकाग्रतः ॥ ४० ॥
कपिश्रेष्ठ ! मी आपले बळ पाहिले आहे. आता मी अग्निला साक्षी ठेवून आपल्याशी कायमची स्नेहपूर्ण मैत्री करू इच्छितो. ॥४०॥
दाराः पुत्राः पुरं राष्ट्रं भोगाच्छादनभोजनम् ।
सर्वमेवाविभक्तं नौ भविष्यति हरीश्वर ॥ ४१ ॥
वानरराज ! स्त्री, पुत्र, नगर, राज्य, भोग, वस्त्र आणि भोजन - या सर्व वस्तुंच्यावर आपला दोघांचा अविभक्त अधिकार असेल. ॥४१॥
ततः प्रज्वालयित्वाग्निं तावुभौ हरीराक्षसौ ।
भ्रातृत्वं उपसम्पन्नौ परिष्वज्य परस्परम् ॥ ४२ ॥
तेव्हा वानरराज आणि राक्षसराज दोघांनी अग्नि प्रज्वलित करून एक दुसर्‍याला हृदयाशी धरून आपसात भ्रातृत्वाचा संबंध जोडला. ॥४२॥
अन्योन्यं लम्बितकरौ ततस्तौ हरिराक्षसौ ।
किष्किन्धां विशतुर्हृष्टौ सिंहौ गिरिगुहामिव ॥ ४३ ॥
नंतर ते दोघे वानर आणि राक्षस एक दुसर्‍याचा हात पकडून अत्यंत प्रसन्नतेने किष्किंधापुरीच्या आत गेले, जणु दोन सिंहच गुफेमध्ये प्रवेश करीत होते. ॥४३॥
स तत्र मासमुषितः सुग्रीव इव रावणः ।
अमात्यैरागतैर्नीतः त्रैलोक्योत् सादनार्थिभिः ॥ ४४ ॥
रावण तेथे सुग्रीवासमान सन्मानित होऊन महिनाभर राहिला. नंतर तीन्ही लोकांना उखडून फेकून देण्याची इच्छा ठेवणार्‍या (रावणाचे) मंत्री येऊन त्याला घेऊन गेले. ॥४४॥
एवमेतत् पुरा वृत्तं वालिना रावणः प्रभो ।
धर्षितश्च वृतश्चापि भ्राता पावकसंनिधौ ॥ ४५ ॥
प्रभो ! याप्रकारे ही घटना पूर्वी घडली होती. वालीने रावणाला हरविले आणि नंतर अग्निसमीप त्याला आपला भाऊ बनवून घेतले. ॥४५॥
बलमप्रतिमं राम वालिनोऽभवदुत्तमम् ।
सोऽपि त्वया विनिर्दग्धः शलभो वह्निना यथा ॥ ४६ ॥
श्रीरामा ! वालीमध्ये खूपच अधिक आणि अनुपम बळ होते, परंतु आपण त्यालाही आपल्या बाणाग्निने, आग जशी पतंगाला दग्ध करून टाकते त्याप्रमाणे दग्ध करून टाकलेत. ॥४६॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् उत्तरकाण्डे चतुस्त्रिंशः सर्गः ॥ ३४ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील उत्तरकाण्डाचा चौतिसावा सर्ग पूरा झाला. ॥३४॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP