[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीमद् वाल्मीकि रामायणे
अयोध्याकाण्डे
। षटषष्टितमः सर्गः ।
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
राजार्थं कौसल्याया विलापस्तत्कर्तृकं कैकेय्या भर्त्सनं मंत्रिभी राज्ञः शवस्य तैलपूर्णे कटाहे स्थापनं विलापोऽयोध्यापुर्य्याः श्रीहीनता पुरवासिनां शोकश्च -
राजासाठी कौसल्येचा विलाप आणि कैकयीची निंदा, मंत्र्यांचे राजाच्या शवाला तेलाने भरलेल्या काहिलीत झोपवणे, राण्यांचा विलाप, पुरीची श्रीहीनता आणि पुरवासी जनांचा शोक -
तमग्निमिव संशान्तमम्बुहीनमिवार्णवम् ।
हतप्रभमिवादित्यं स्वर्गस्थं प्रेक्ष्य पार्थिवम् ॥ १ ॥

कौसल्या बाष्पपूर्णाक्षी विविधं शोककर्शिता ।
उपगृह्य शिरो राज्ञः कैकेयीं प्रत्यभाषत ॥ २ ॥
विझलेली आग, जलहीन समुद्र, तसेच प्रभाहीन सूर्याप्रमाणे शोभाहीन झालेले दिवंगत राजाचे शव पाहून कौसल्येच्या डोळ्यात अश्रु दाटून आले. ती अनेक प्रकारांनी शोकाकुल होऊन राजांचे मस्तक मांडीवर घेऊन कैकेयीला या प्रकारे बोलली. ॥ १-२ ॥
सकामा भव कैकेयि भुङ्‌क्ष्व राज्यमकण्टकम् ।
त्यक्त्वा राजानमेकाग्रा नृशंसे दुष्टचारिणि ॥ ३ ॥
’दुराचारणी कैकेयी ! घे तुझी कामना सफल झाली; आता राजांचाही त्याग करून एकाग्रचित्त होऊन आपले अकण्टक राज्य भोग. ॥ ३ ॥
विहाय मां गतो रामो भर्ता च स्वर्गतो मम ।
विपथे सार्थहीनेव नाहं जीवितुमुत्सहे ॥ ४ ॥
’राम मला सोडून वनात निघून गेले आणि माझे स्वामी स्वर्गवासी झाले, आतां मी दुर्गम मार्गात साथीदांरापासून ताटातूट झालेल्या असहाय अबले प्रमाणे जिवंत राहू शकत नाही. ॥ ४ ॥
भर्तारं तु परित्यज्य का स्त्री दैवतमात्मनः ।
इच्छेज्जीवितुमन्यत्र कैकेय्यास्त्यक्तधर्मणः ॥ ५ ॥
’नारीधर्माचा त्याग करणार्‍या कैकेयी शिवाय संसारात अशी दुसरी कोण स्त्री असेल की जी आपल्या आराध्य देवस्वरुप पतिचा परित्याग करुन जगण्याची इच्छा करेल ? ॥ ५ ॥
न लुब्धो बुध्यते दोषान् किंपाकमिव भक्षयन् ।
कुब्जानिमित्तं कैकेय्या राघवाणां कुलं हतम् ॥ ६ ॥
’ज्याप्रमाणे एखादा लोभी मनुष्य दुसर्‍यास विष खाऊ घालतो आणि त्यामुळे होणार्‍या हत्येच्या दोषाकडे लक्ष देत नाही त्याप्रमाणे या कैकेयीने कुब्जेमुळे रघुवंशियांच्या या कुळाचा नाश करून टाकला. ॥ ६ ॥
अनियोगे नियुक्तेन राज्ञा रामं विवासितम् ।
सभार्यं जनकः श्रुत्वा परितप्स्यत्यहं यथा ॥ ७ ॥
’कैकेयीने महाराजांना अयोग्य कार्य करावयास लावले आणि त्यांच्या द्वारा पत्‍नीसहीत श्रीरामास वनवास द्यावयास लावला. हा समाचार जेव्हा जनक राजा ऐकतील तेव्हा माझ्याप्रमाणेच त्यांनाही अत्यंत कष्ट होतील. ॥ ७ ॥
स मामनाथां विधवां नाद्य जानाति धार्मिकः ।
रामः कमलपत्राक्षो जीवन्नाशमितो गतः ॥ ८ ॥
’मी अनाथ आणि विधवा झाले - ही गोष्ट माझे धर्मात्मा पुत्र कमलनयन राम यांना माहीत नाही. ते तर येथून जिवंत असून अदृश्य झाले आहेत. ॥ ८ ॥
विदेहराजस्य सुता तथा चारुतपस्विनी ।
दुःखस्यानुचिता दुःखं वने पर्युद्विजिष्यति ॥ ९ ॥
’पतिसेवारूपी मनोहर तप करणारी विदेह राजकुमारी सीता दुःख भोगण्यास योग्य नाही. ती वनात दुःखाचा अनुभव करून उद्विग्न होऊन जाईल. ॥ ९ ॥
नदतां भीमघोषाणां निशासु मृगपक्षिणाम् ।
निशम्यमाना संत्रस्ता राघवं संश्रयिष्यति ॥ १० ॥
’रात्रीच्या वेळी भयानक शब्द करणार्‍या पशुपक्ष्याचे ओरडणे ऐकून भयभीत होऊन सीता श्रीरामांनाच शरण जाईल, त्यांचाच आश्रय घेईल (त्यांनाच जाऊन बिलगेल). ॥ १० ॥
वृद्धश्चैवाल्पपुत्रश्च वेदैहीमनुचिन्तयन् ।
सोऽपि शोकसमाविष्टो ननु त्यक्ष्यति जीवितम् ॥ ११ ॥
’ जे वृद्ध झालेले आहेत आणि कन्या हीच ज्यांची संतती आहे ते राजा जनकही सीतेचीच वारंवार चिंता करीत शोकात बुडून अवश्यच आपल्या प्राणांचा परित्याग करतील. ॥ ११ ॥
साहमद्यैव दिष्टान्तं गमिष्यामि पतिव्रता ।
इदं शरीरमालिङ्‌ग्य प्रवेक्ष्यामि हुताशनम् ॥ १२ ॥
’ मी ही आजच म्रुत्युचे वरण करीन. एखाध्या पतिव्रतेप्रमाणे पतिच्या शरीरास आलिंगन देऊन चितेच्या आगीत प्रवेश करीन. ॥ १२ ॥
तां ततः सम्परिष्वज्य विलपन्तीं तपस्विनीम् ।
व्यपनिन्युः सुदुःखार्तां कौसल्यां व्यावहारिकाः ॥ १३ ॥
’पतिच्या शरिराला ह्रदयाशी धरून अत्यंत दुःखाने आर्त होऊन करूण विलाप करीत असलेल्या तपस्विनी कौसल्येला राजकाज पहाणार्‍या मंत्र्यांनी दुसर्‍या स्त्रीयांच्या द्वारे तेथून दूर नेले. ॥ १३ ॥
तैलद्रोण्यां तदामात्याः संवेश्य जगतीपतिम् ।
राज्ञः सर्वाण्यथादिष्टाश्चक्रुः कर्माण्यनन्तरम् ॥ १४ ॥
’नंतर त्यांनी महाराजांच्या शरीराला तेलाने भरलेल्या काहीलीत ठेऊन वसिष्ठ आदिंच्या आज्ञेनुसार शवाचे रक्षण आदि अन्य सर्व राजकीय कार्याची व्यवस्था लावण्यास आरंभ केला. ॥ १४ ॥
न तु संकालनं राज्ञो विना पुत्रेण मन्त्रिणः ।
सर्वज्ञाः कर्तुमीषुस्ते ततो रक्षन्ति भूमिपम् ॥ १५ ॥
’ते सर्वज्ञ मंत्री पुत्राशिवाय राजांचा दाहसंस्कार करू शकले नाहीत, म्हणून त्यांच्या शवाचे रक्षण करू लागले. ॥ १५ ॥
तैलद्रोण्यां शायितं तं सचिवैस्तु नराधिपम् ।
हा मृतोऽयमिति ज्ञात्वा स्त्रियस्ताः पर्यदेवयन् ॥ १६ ॥
’जेव्हा मंत्र्यांनी राजाच्या शवाला तेलाच्या काहीलीत झोपवले तेव्हा हे जाणून सार्‍या राण्या ’हाय ! हे महाराज परलोकवासी झाले’ असे म्हणत पुन्हा विलाप करू लागल्या. ॥ १६ ॥
बाहूनुच्छ्रित्य कृपणा नेत्रप्रस्रवणैर्मुखैः ।
रुदत्यः शोकसंतप्ताः कृपणं पर्यदेवयन् ॥ १७ ॥
त्यांच्या मुखावरून नेत्रातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या होत्या. त्या आपले हात उंचावून दीनभावाने रडू लागल्या आणि शोकसंतप्त होऊन दयनीय विलाप करू लागल्या. ॥ १७ ॥
हा महाराज रामेण सन्ततं प्रियवादिना ।
विहीनाः सत्यसन्धेन किमर्थं विजहासि नः ॥ १८ ॥
त्या म्हणाल्या- ’हा महाराज ! आम्ही सत्यप्रतिज्ञ आणि सदाप्रिय बोलणार्‍या आपल्या पुत्रापासून रामापासून दुरावलोच होतो. आता आपणही आमचा परित्याग करीत आहांत ? ॥ १८ ॥
कैकेय्या दुष्टभावाया राघवेण विवर्जिताः ।
कथं स्वपत्‍न्या वत्स्यामः समीपे विधवा वयम् ॥ १९ ॥
’राघवापासून वियोग झालेल्या आम्ही सर्व विधवा या दुष्ट विचारांच्या सवत कैकेयीच्या समीप कशा राहू शकू ? ॥ १९ ॥
स हि नाथः स चास्माकं तव च प्रभुरात्मवान् ।
वनं रामो गतः श्रीमान् विहाय नृपतिश्रियम् ॥ २० ॥
’जे आमचे आणि आपलेही रक्षक होते, ते मनस्वी श्रीराम राजलक्ष्मीला सोडून वनात निघून गेले आहेत. ॥ २० ॥
त्वया तेन च वीरेण विना व्यसनमोहिताः ।
कथं वयं निवत्स्यामः कैकेय्या च विदूषिताः ॥ २१ ॥
’वीरवर श्रीराम आणि आपणही न राहिल्याने आमच्यावर भारी संकट कोसळले आहे ज्यायोगे आम्ही मोहित होत आहो .आता सवत कैकेयी द्वारा तिरस्कृत होऊन आम्ही येथे कशा राहू शकू ? ॥ २१ ॥
यया च राजा रामश्च लक्ष्मणश्च महाबलः ।
सीतया सह सन्त्यक्ताः सा कमन्यं न हास्यति ॥ २२ ॥
’जिने राजांचा तसेच सीतेसहीत रामांचा आणि महाबली लक्ष्मणांचाही परित्याग केला, ती दुसर्‍या कोणाचा त्याग करणार नाही ? ॥ २२ ॥
ता बाष्पेण च संवीताः शोकेन विपुलेन च ।
व्यवेष्टन्त निरानन्दा राघवस्य वरस्त्रियः ॥ २३ ॥
’रघुकुलनरेश दशरथांच्या त्या सुंदर राण्या महान शोकाने ग्रस्त होऊन अश्रु ढाळीत नानाप्रकारच्या चेष्टा आणि विलाप करीत होत्या. त्यांचा आनंद हिरावून घेतला गेला होता. ॥ २३ ॥
निशा नक्षत्रहीनेव स्त्रीव भर्तृविवर्जिता ।
पुरी नाराजतायोध्या हीना राज्ञा महात्मना ॥ २४ ॥
महामना राजा दशरथावाचून ती अयोध्यापुरी नक्षत्रहीन रात्री प्रमाणे आणि पतिविहिन नारी प्रमाणे श्रीहीन झाली होती. ॥ २४ ॥
बाष्पपर्याकुलजना हाहाभूतकुलाङ्‌गना ।
शून्यचत्वरवेश्मान्ता न बभ्राज यथापुरम् ॥ २५ ॥
नगरातील सर्व माणसे अश्रु ढाळीत होती आणि कुलवती स्त्रिया हाहाकार करीत होत्या. चौक आणि घरांचे दरवाजे शून्य दिसत होते (तेथे साफ-सफाई, लिंपणे- चोपडणे तसेच बलिअर्पण करणे आदि क्रिया होत नव्हत्या ) याप्रकारे ती पुरी पूर्वीप्रमाणे शोभून दिसत नव्हती. ॥ २५ ॥
गते तु शोकात् त्रिदिवं नराधिपे
     महीतलस्थासु नृपाङ्‌गयनासु च ।
निवृत्तचारः सहसा गतो रविः
     प्रवृत्तचारा रजनी ह्युपस्थिता ॥ २६ ॥
राजा दशरथ शोकवश स्वर्गवासी झाले आणि त्यांच्या राण्या शोकाने भूतळावर लोळत होत्या . या शोकातच एकाएकी सूर्याच्या किरणांचा प्रसार बंद झाला आणि सूर्यदेव अस्तास गेले. त्यानंतर अंधकाराचा प्रसार करीत रात्र उपस्थित झाली. ॥ २६ ॥
ऋते तु पुत्राद् दहनं महीपते-
     र्नारोचयंस्ते सुहृदः समागताः ।
इतीव तस्मिञ्शयने न्यवेशयन्
     विचिन्त्य राजानमचिन्त्यदर्शनम् ॥ २७ ॥
तेथे आलेल्या सुहृदांना कुठल्याही पुत्राशिवाय दाह संस्कार करणे उचित वाटले नाही. आता राजाचे दर्शन अचिन्त्य झाले असा विचार करून त्या सर्वांनी त्या तैलपूर्ण काहीलीमध्ये राजाच्या शवास सुरक्षित ठेवले. ॥ २७ ॥
गतप्रभा द्यौरिव भास्करं विना
     व्यपेतनक्षत्रगणेव शर्वरी ।
पुरी बभासे रहिता महात्मना
     कण्ठास्रकण्ठाकुलमार्गचत्वरा ॥ २८ ॥
सूर्याशिवाय प्रभाहीन आकाशाप्रमाणे तसेच नक्षांत्रशिवाय रात्रीप्रमाणे आयोध्यापुरी महात्मा राजा दशरथांशिवाय श्रीहीन प्रतीत होत होती. तिच्या रस्त्यांवर आणि चौकातून अश्रूनी कण्ठरूद्ध झालेल्या माणसांची गर्दी एकत्र जमली होती. ॥ २८ ॥
नराश्च नार्यश्च समेत्य सङ्‌घशो
     विगर्हमाणा भरतस्य मातरम् ।
तदा नगर्यां नरदेवसंक्षये
     बभूवुरार्ता न च शर्म लेभिरे ॥ २९ ॥
स्त्रिया आणि पुरूषांच्या झुंडीच्या झुंडी एकाचवेळी उभ्या राहून भरतमाता कैकेयीची निंदा करू लागल्या. त्यासमयी महाराजांच्या मृत्युने अयोध्यापुरीत राहाणारे सर्व लोक शोकाकुल होत होते. कुणाला शांति मिळत नव्हती. ॥ २९ ॥
इत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीये आदिकाव्येऽयोध्याकाण्डे षट्षष्टितमःसर्गः ॥ ६६ ॥
या प्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यातील अयोध्याकाण्डाचा सहासष्टावा सर्ग पूरा झाला ॥ ६६ ॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP