श्रीमद् वाल्मीकि रामायणे
युद्धकाण्डे
॥ एकनवतितमः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीरामपार्श्वमागस्य लक्ष्मण-विभीषणप्रभृतिभिः इन्द्रजिद् वध वृत्तान्तस्य श्रावणं संतुष्टेन श्रीरामेण लक्ष्मणं परिष्वज्य तस्य प्रशंसनं सुषेणेन लक्ष्मणादीनां चिकित्सनं च -
लक्ष्मण आणि विभीषण आदिंचे श्रीरामचंद्रांच्या जवळ जावून इंद्रजिताच्या वधाचा समाचार ऐकविणे, प्रसन्न झालेल्या श्रीराम द्वारा लक्ष्मणांना हृदयाशी धरून त्यांची प्रशंसा करणे तसेच सुषेण द्वारा लक्ष्मण आदिंची चिकित्सा -
रुधिरक्लिन्नगात्रस्तु लक्ष्मणः शुभलक्षणः ।
बभूव हृष्टस्तं हत्वा शक्रजेतारमाहवे ॥ १ ॥
संग्रामभूमीत शुभलक्षण संपन्न लक्ष्मणाचे सर्व शरीर रक्ताने माखलेले होते. शत्रुविजयी इंद्रजिताचा वध करून ते अत्यंत प्रसन्न झाले. ॥१॥
ततः स जाम्बवन्तं च हनुमन्तं च वीर्यवान् ।
सन्निहत्य महातेजाः तांश्च सर्वान् वनौकसः ॥ २ ॥

आजगाम ततः शीघ्रं यत्र सुग्रीवराघवौ ।
विभीषणमवष्टभ्य हनूमन्तं च लक्ष्मणः ॥ ३ ॥
बळ-विक्रम संपन्न महातेजस्वी सौमित्र जाम्बवान्‌ आणि हनुमंतांना धावत जाऊन भेटले आणि त्या समस्त (वानरांसहित) वानरांना बरोबर घेऊन शीघ्रतापूर्वक जेथे वानरराज सुग्रीव आणि भगवान्‌ श्रीराम विद्यमान्‌ होते त्या स्थानी आले. त्या समयी लक्ष्मण विभीषण आणि हनुमंतांचा आधार घेऊन चालत होते. ॥२-३॥
ततो राममभिक्रम्य सौमित्रिरभिवाद्य च ।
तस्थौ भ्रातृसमीपस्थ शक्रस्येन्द्रानुजो यथा ॥ ४ ॥
श्रीरामांच्या समोर येऊन त्यांच्या चरणांना प्रणाम करून सौमित्र आपल्या ज्येष्ठ भ्रात्याजवळ, जसे इंद्रांजवळ उपेन्द्र (वामनरूपधारी श्रीहरि) उभे राहातात त्याप्रमाणे, उभे राहिले. ॥४॥
निष्टनन्निव चागत्यम्य राघवाय महात्मने ।
आचचक्षे तदा वीरो घोरमिन्द्रजितो वधम् ॥ ५ ॥
त्यासमयी वीर विभीषण प्रसन्नतापूर्वक परत येण्याद्वारेच शत्रु मारला गेल्याचे जणु सूचित करत आले आणि महात्मा राघवांस म्हणाले - प्रभो ! इंद्रजिताच्या वधाचे भयंकर कार्य संपन्न झाले आहे. ॥५॥
रावणेस्तु शिरश्छिन्नं लक्ष्मणेन महात्मना ।
न्यवेदयत रामाय तदा हृष्टो विभीषणः ॥ ६ ॥
विभीषणांनी अत्यंत हर्षाने श्रीरामांना हे निवेदन केले की महात्मा लक्ष्मणांनीच रावणकुमार इंद्रजिताचे मस्तक छाटले आहे. ॥६॥
श्रुत्वैव तु महावीर्यो लक्ष्मणेनेन्द्रजिद् वधम् ।
प्रहर्षमतुलं लेभे वाक्यं चेदमुवाच ह ॥ ७ ॥
लक्ष्मणांच्या द्वारे इंद्रजिताचा वध झाला आहे हा समाचार ऐकताच महापराक्रमी श्रीरामांना अनुपम हर्ष प्राप्त झाला आणि ते याप्रकारे बोलले - ॥७॥
साधु लक्ष्मण तुष्टोऽस्मि कर्मणा सुकृतं कृतम् ।
रावणेर्हि विनाशेन जितमित्युपधारय ॥ ८ ॥
शाबास ! लक्ष्मणा ! मी तुझ्यावर फार प्रसन्न आहे. आज तुम्ही फार दुष्कर पराक्रम केला आहे. रावणपुत्र इंद्रजित मारला गेला आहे या वरून तुम्ही हे निश्चित समजा की आता आपण युद्धात जिंकलो आहोत. ॥८॥
स तं शिरस्युपाघ्राय लक्ष्मणं कीर्तिवर्धनम् ।
लज्जमानं बलात् स्नेहाद् अङ्‌कमारोप्य वीर्यवान् ॥ ९ ॥

उपवेश्य तमुत्सङ्‌गे परिष्वज्यावपीडितम् ।
भ्रातरं लक्ष्मणं स्निग्धं पुनः पुनरुदैक्षत ॥ १० ॥
यशाची वृद्धि करणारे लक्ष्मण (यावेळी आपली प्रशंसा ऐकून) लाजले होते, परंतु पराक्रमी श्रीरामांनी त्यांना बलपूर्वक ओढून मांडीवर घेतले आणि अत्यंत स्नेहाने त्यांचे मस्तक हुंगले. शस्त्रांच्या आघातांनी पीडित झालेल्या स्नेही बंधु लक्ष्मणांना मांडीवर बसवून आणि हृदयाशी धरून ते अत्यंत प्रेमाने वारंवार त्यांच्याकडे पाहू लागले. ॥९-१०॥
शल्यसम्पीडितं शस्तं निश्वसन्तं तु लक्ष्मणम् ।
रामस्तु दुःखसन्तप्तं तदा निःश्वासपीडितम् ॥ ११ ॥

मूर्ध्नि चैनमुपाघ्राय भूयः संस्पृश्य च त्वरन् ।
उवाच लक्ष्मणं वाक्यं आश्वस्य पुरुषर्षभः ॥ १२ ॥
लक्ष्मण आपल्या शरीरात घुसलेल्या बाणांच्या द्वारा अत्यंत पीडित होते. त्यांच्या अंगावर जागोजागी जखमा झालेल्या होत्या. ते वारंवार दीर्घ श्वास घेत होते, आघातजनित क्लेशांनी संतप्त होत होते, तसेच त्यांना श्वास घेण्यासही फार पीडा होत होती. त्या अवस्थेमध्ये पुरूषोत्तम श्रीरामांनी स्नेहाने त्यांचे मस्तक हुंगून पीडा दूर करण्यासाठी पुन्हा त्यांच्या शरीरावरून हलकेच हात फिरविला आणि आश्वासन देऊन लक्ष्मणांना याप्रकारे म्हटले - ॥११-१२॥
कृतं परमकल्याणं कर्म दुष्करकर्मणा ।
अद्य मन्ये हते पुत्रे रावणं निहतं युधि ॥ १३ ॥

अद्याहं विजयी शत्रौ हते तस्मिन् दुरात्मनि ।
रावणस्य नृशंसस्य दिष्ट्या वीर त्वया रणे ॥ १४ ॥

छिन्नो हि दक्षिणो बाहुः स हि तस्य व्यापश्रयः ।
वीरा ! तू आपल्या दुष्कर पराक्रमाने परम कल्याणकारी कार्य संपन्न केले आहेस. आज पुत्र मारला गेल्याने युद्धस्थळी रावणालाही मी मारला गेलेलाच मानतो. त्या दुरात्मा शत्रुचा वध होण्याने आज मी वास्तविक विजयी झालो आहे. सौभाग्याची गोष्ट आहे की तू रणभूमीमध्ये इंद्रजिताचा वध करून निर्दयी निशाचर रावणाचा उजवा हातच तोडून टाकला आहेस. कारण तोच त्याचा सर्वात मोठा आधार होता. ॥१३-१४ १/२॥
विभीषणहनूमद्‌भ्यां कृतं कर्म महद् रणे ॥ १५ ॥

अहोरात्रैस्त्रिभिर्वीरः कथंचिद् विनिपातितः ।
निरमित्रः कृतोऽस्म्यद्य निर्यास्यति हि रावणः ॥ १६ ॥
विभीषण आणि हनुमानानेही समरभूमीमध्ये महान्‌ पराक्रम करून दाखविला आहे. तुम्ही सर्व लोकांनी मिळून तीन दिवस आणि तीन रात्री सतत युद्ध करीत त्या वीर राक्षसाला मारून टाकले आहे तसेच मला शत्रुहीन बनविले आहे. आता रावणच युद्धासाठी बाहेर पडेल. ॥१५-१६॥
बलव्यूहेन महता निर्यास्यति हि रावणः ।
बलव्यूहेन महता श्रुत्वा पुत्रं निपातितम् ॥ १७ ॥
महान्‌ सैन्य समुदायासहित पुत्र मारला गेला आहे हे ऐकून रावण विशाल सेना बरोबर घेऊन युद्धासाठी येईल. ॥१७॥
तं पुत्रवधसन्तप्तं निर्यान्तं राक्षसाधिपम् ।
बलेनावृत्य महता निहनिष्यामि दुर्जयम् ॥ १८ ॥
पुत्राच्या वधाने संतप्त होऊन बाहेर पडलेल्या त्या दुर्जय राक्षसराज रावणाला मी आपल्या फार मोठ्‍या सेनेच्या द्वारे घेरून मारून टाकीन. ॥१८॥
त्वया लक्ष्मण नाथेन सीता च पृथिवी च मे ।
न दुष्प्रापा हते तस्मिन् शक्रजेतरि चाहवे ॥ १९ ॥
लक्ष्मणा ! इंद्रजित इंद्रालाही जिंकून चुकला होता. जेव्हा त्यालाही तू युद्धभूमीमध्ये मारून टाकले आहे; तेव्हा तुझ्यासारखा रक्षक आणि सहायक असल्याने मला सीता आणि भूमण्डलाचे राज्य यांना प्राप्त करण्यात काहीच अडचण येणार नाही. ॥१९॥
स तं भ्रातरमाश्वास्य परिष्वज्य च राघवः ।
रामः सुषेणं मुदितः समाभाष्येदमब्रवीत् ॥ २० ॥
याप्रकारे भावाला आश्वासन देऊन राघव श्रीरामांनी त्यास हृदयाशी धरले आणि प्रसन्नतापूर्वक सुषेणास बोलावून म्हटले - ॥२०॥
सशल्योऽयं महाप्राज्ञ सौमित्रिर्मित्रवत्सलः ।
यथा भवति सुस्वस्थः तस्तथा त्वं समुपाचर ॥ २१ ॥
परम बुद्धिमान्‌ सुषेणा ! तू तात्काळ असा उपचार कर की ज्यायोगे हे मित्रवत्सल सौमित्र पूर्णतः स्वस्थ होतील आणि यांच्या शरीरांतून बाण निघून घाव भरून येऊन त्याच बरोबर त्यांची सारी पीडाही दूर होईल. ॥२१॥
विशल्यः क्रियतां क्षिप्रं सौमित्रिः सविभीषणः ।
ऋक्षवानरसैन्यानां शूराणां द्रुमयोधिनाम् ॥ २२ ॥

ये चाप्यन्येऽत्र युध्यन्ति सशल्या व्रणिनस्तथा ।
तेऽपि सर्वे प्रयत्‍नेन क्रियन्तां सुखिनस्त्वया ॥ २३ ॥
सौमित्र लक्ष्मण आणि विभीषण दोघांच्याही शरीरातून तुम्ही तात्काळच बाण काढून टाका आणि घावही बरे करा. वृक्षांच्या द्वारे युद्ध करणारे जे शूरवीर अस्वले आणि वानर सैनिक आहेत, त्यांच्यापैकीही जे अनेक लोक बाणांनी विंधले जाऊन घायाळ होऊन युद्ध करत आहेत, त्या सर्वांना तुम्ही प्रयत्‍न करून सुखी आणि स्वस्थ करा. ॥२२-२३॥
एवमुक्तः स रामेण महात्मा हरियूथपः ।
लक्ष्मणाय ददौ नस्तः सुषेणः परमौषधम् ॥ २४ ॥
महात्मा श्रीरामचंद्रांनी असे सांगितल्यावर वानर-यूथपति सुषेणांनी लक्ष्मणांच्या नाकास एक फारच उत्तम औषधी लावली. ॥२४॥
स तस्या गन्धमाघ्राय विशल्यः समपद्यत ।
तथा निर्वेदनश्चैव संरूढव्रण एव च ॥ २५ ॥
तिचा गंध हुंगताच लक्ष्मणांच्या शरीरांतून बाण निघून गेले आणि त्यांची सारी पीडा दूर झाली. त्यांच्या शरीरामध्ये जितके घाव होते ते सर्व भरून आले. ॥२५॥
विभीषणमुखानां च सुहृदां राघवाज्ञया ।
सर्ववानरमुख्यानां चिकित्सां अकरोत् तदा ॥ २६ ॥
राघवांच्या आज्ञेने सुषेणांनी विभीषण आदि सुहृदांची आणि समस्त वानर शिरोमणींची तात्काळ चिकित्सा केली. ॥२६॥
ततः प्रकृतिमापन्नो हृतशल्यो गतक्लमः ।
सौमित्रिर्मुमुदे तत्र क्षणेन विगतज्वरः ॥ २७ ॥
नंतर तर क्षणभरात बाण निघून गेल्याने आणि पीडा दूर झाल्याने सौमित्र स्वस्थ आणि निरोगी होऊन हर्षाचा अनुभव करू लागले. ॥२७॥
तथैव रामः प्लवगाधिपस्तथा
विभीषणश्चर्क्षपतिश्च जाम्बवान् ।
अवेक्ष्य सौमित्रिमरोगमुत्थितं
मुदा ससैन्याः सुचिरं जहर्षिरे ॥ २८ ॥
त्यासमयी भगवान्‌ श्रीराम, वानरराज सुग्रीव, विभीषण तसेच पराक्रमी ऋक्षराज जाम्बवान्‌, लक्ष्मणांना निरोगी होऊन उभे राहिलेले पाहून सेनेसहित फार प्रसन्न झाले. ॥२८॥
अपूजयत् कर्म स लक्ष्मणस्य
सुदुष्करं दाशरथिर्महात्मा ।
बभूव हृष्टा युधि वानरेन्द्रो
निशम्य तं शक्रजितं निपातितम् ॥ २९ ॥
दशरथनंदन महात्मा श्रीरामांनी लक्ष्मणांच्या अत्यंत दुष्कर पराक्रमाची पुन्हा पुन्हा प्रशंसा केली. इंद्रजित युद्धात मारला गेला हे ऐकून वानरराज सुग्रीवही फार प्रसन्न झाले. ॥२९॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् युद्धकाण्डे एकनवतितमः सर्गः ॥ ९१ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील युद्धकाण्डाचा एक्याण्णवावा सर्ग पूरा झाला. ॥९१॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP