श्रीमद् वाल्मीकि रामायणे
उत्तरकाण्डे
॥ एकसप्ततितमः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
अल्पैः सैनिकैः सह शत्रुघ्नस्य अयोध्यायां प्रति प्रस्थानं, मार्गे वाल्मीक्याश्रमे श्रीरामचरितस्य गानं श्रुत्वा तेषां विस्मयः -
शत्रुघ्नांचे थोड्‍याशा सैनिकांसह अयोध्येला प्रस्थान, मार्गात वाल्मीकिंच्या आश्रमांत रामरचित गान ऐकून त्या सर्वांचे आश्चर्यचकित होणे -
ततो द्वादशमे वर्षे शत्रुघ्नो रामपालिताम् ।
अयोध्यां चकमे गन्तुं अल्पभृत्यबलानुगः ॥ १ ॥
त्यानंतर बाराव्या वर्षात थोडेसे सेवक आणि सैनिकांना बरोबर घेऊन शत्रुघ्नांनी रामपालित अयोध्येला जाण्याचा विचार केला. ॥१॥
ततो मन्त्रिपुरोगांश्च बलमुख्यान् निवर्त्य च ।
जगाम हयमुख्येन रथानां च शतेन सः ॥ २ ॥
म्हणून आपले मुख्य मुख्य मंत्री तसेच सेनापतिंना परत धाडून - पुरीच्या रक्षणासाठी तेथेच सोडून ते चांगले घोडे असलेले शंभर रथ बरोबर घेऊन अयोध्येकडे जाण्यास निघाले. ॥२॥
स गत्वा गणितान् वासान् सप्ताष्टौ रघुनन्दनः ।
वाल्मीक्याश्रममागत्य वासं चक्रे महायशाः ॥ ३ ॥
महायशस्वी रघुनंदन शत्रुघ्न यात्रा करण्यास निघाल्यावर मार्गात सात-आठ परिगणित स्थानांवर मुक्काम करीत वाल्मीकि मुनिंच्या आश्रमावर जाऊन पोहोचले आणि रात्री तेथेच थांबले. ॥३॥
सोऽभिवाद्य ततः पादौ वाल्मीकेः पुरुषर्षभः ।
पाद्यमर्घ्यं तथातिथ्यं जग्राह मुनिहस्ततः ॥ ४ ॥
त्या पुरुषश्रेष्ठ रघुवीरांनी वाल्मीकिंच्या चरणी प्रणाम करून त्यांच्या हातून पाद्य आणि अर्ध्य आदि अतिथि सत्काराची सामग्री ग्रहण केली. ॥४॥
बहुरूपाः सुमधुराः कथास्तत्र सहस्रशः ।
कथयामास स मुनिः शत्रुघ्नाय महात्मने ॥ ५ ॥
तेथे महर्षि वाल्मीकिंनी महात्मा शत्रुघ्नाला ऐकण्यासाठी विविध प्रकारच्या हजारो सुमधुर कथा सांगितल्या. ॥५॥
उवाच च मुनिर्वाक्यं लवणस्य वधाश्रितम् ।
सुदुष्करं कृतं कर्म लवणं निघ्नता त्वया ॥ ६ ॥
नंतर ते लवणाच्या वधाविषयी म्हणाले - लवणासुराला मारून तुम्ही अत्यंत दुष्कर कर्म केले आहे. ॥६॥
बहवः पार्थिवाः सौम्य हताः सबलवाहनाः ।
लवणेन महाबाहो युध्यमाना महाबलाः ॥ ७ ॥
सौम्या ! महाबाहो ! लवणासुराबरोबर युद्ध करून बरेचसे महाबली भूपाल सेना आणि वाहनांसहित मारले गेलेले आहेत. ॥७॥
स त्वया निहतः पापो लीलया पुरुषर्षभ ।
जगतश्च भयं तत्र प्रशान्तं तव तेजसा ॥ ८ ॥
पुरुषश्रेष्ठ ! तोच पापी लवणासुर तुमच्या द्वारा अनायासेच मारला गेला. त्याच्यामुळे जगतात जे भय पसरले होते ते तुमच्या तेजाने शान्त झाले. ॥८॥
रावणस्य वधो घोरो यत्‍नेीन महता कृताः ।
इदं तु सुमहत्कर्म त्वया कृतमयत्‍न८तः ॥ ९ ॥
रावणाचा घोर वध प्रयत्‍नांनी केला गेला होता, परंतु हे महान्‌ कर्म तू विनासायासच सिद्ध केलेस. ॥९॥
प्रीतिश्चास्मिन् परा जाता देवानां लवणे हते ।
भूतानां चैव सर्वेषां जगतश्च प्रियं कृतम् ॥ १० ॥
लवणासुर मारला गेल्याने देवतांना फार प्रसन्नता वाटली. तू समस्त प्राण्यांचे आणि सार्‍या जगताचे प्रिय कार्य केले आहेस. ॥१०॥
तच्च युद्धं मया दृष्टं यथावत् पुरुषर्षभ ।
सभायां वासवस्याथ उपविष्टेन राघव ॥ ११ ॥
नरश्रेष्ठा ! मी इंद्रांच्या सभेत बसलो होतो. जेव्हा ती विमानाकार सभा युद्ध पहाण्यासाठी आली, तेव्हा मीही बसल्या बसल्या तुमचे आणि लवणाचे युद्ध चांगल्याप्रकारे पाहिले होते. ॥११॥
ममापि परमा प्रीतिः हृदि शत्रुघ्न वर्तते ।
उपाघ्रास्यामि ते मूर्ध्नि स्नेहस्यैषा परा गतिः ॥ १२ ॥
शत्रुघ्न ! माझ्या हृदयातही तुझ्याबद्दल खूप प्रेम आहे. म्हणून मी तुझ्या मस्तकाचे अवघ्राण करीन (तुझे मस्तक हुंगीन) हीच प्रेमाची पराकाष्ठा आहे. ॥१२॥
इत्युक्त्वा मूर्ध्नि शत्रुघ्नं उपाघ्राय महामुनिः ।
आतिथ्यं अकरोत् तस्य ये च तस्य पदानुगाः ॥ १३ ॥
असे म्हणून परम बुद्धिमान्‌ वाल्मीकिनी शत्रुघ्नांचे मस्तक हुंगले आणि त्यांचा तसेच त्यांच्या साथीदारांचा अतिथि सत्कार केला. ॥१३॥
स भुक्तवान् नरश्रेष्ठो गीतमाधुर्यमुत्तमम् ।
शुश्राव रामचरितं तस्मिन् कृले यथाकृमम् ॥ १४ ॥
नरश्रेष्ठ शत्रुघ्नांनी भोजन केले आणि त्या समयी रामचरिताचे क्रमशः वर्णन ऐकले जे गीताच्या माधुर्यामुळे फारच प्रिय तसेच उत्तम वाटत होते. ॥१४॥
तन्त्रीलयसमायुक्तं त्रिस्थानकरणान्वितम् ।
संस्कृतं लक्षणोपेतं समतालसमन्वितम् ॥ १५ ॥

शुश्राव रामचरितं तस्मिन् काले पुरा कृतम् ।
त्यावेळी त्यांना जे रामचरित ऐकायला मिळाले, ते पूर्वीच काव्यबद्ध केले गेले होते. ते काव्यगान वीणेच्या लयीच्या साथीसह होत होते, हृदय, कण्ठ आणि मूर्धा - या तीन स्थानांमध्ये मंद्र, मध्यम आणि तार स्वराच्या भेदासह उच्चारित होऊन राहिले होते. संस्कृत भाषेत निर्मिती होऊन व्याकरण छंद, काव्य आणि संगीतशास्त्राच्या लक्षणांनी संपन्न होते आणि गानोचित तालासह गायले गेले होते. ॥१५ १/२॥
न्यक्षराणि सत्यानि यथावृत्तानि पूर्वशः ॥ १६ ॥

श्रुत्वा पुरुषशार्दूलो विसंज्ञो बाष्पलोचनः ।
त्या काव्यातील सर्व अक्षरे आणि वाक्ये सत्य घटनांचे प्रतिपादन करीत होती आणि प्रथम जो वृत्तांत घडून चुकला होता त्याचा यथार्थ परिचय देत होते. ते अद्‍भुत काव्यगान ऐकून पुरुषसिंह शत्रुघ्न मूर्च्छित झाल्यासारखे झाले. त्यांच्या नेत्रांतून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. ॥१६ १/२॥
स मुहूर्तमिवासंज्ञो विनिःश्वस्य मुहुर्मुहुः ॥ १७ ॥

तस्मिन् गीते यथावृत्तं वर्तमानमिवाशृणोत् ।
ते एक मुहूर्तापर्यंत अचेत झाल्यासारखे होऊन वारंवार दीर्घ श्वास ओढत होते. त्या गानात त्यांनी घडलेल्या गोष्टींना वर्तमानाप्रमाणे ऐकले. ॥१७ १/२॥
पदानुगाश्च ये राज्ञः तां श्रुत्वा गीतिसम्पदम् ॥ १८ ॥

अवाङ्‌मुखाश्च दीनाश्च ह्याश्चर्यमिति चाब्रुवन् ।
राजा शत्रुघ्नांचे जे साथी होते, तेही त्या गीत-संपत्तिला ऐकून दीन आणि नतमस्तक होऊन बोलले - ही तर फार आश्चर्याची गोष्ट आहे. ॥१८ १/२॥
परस्परं च ये तत्र सैनिकाः सम्बभाषिरे ॥ १९ ॥

किमिदं क्व च वर्तामः किमेतत् स्वप्नदर्शनम् ।
अर्थो यो नः पुरा दृष्टः तमाश्रमपदे पुनः ॥ २० ॥
शत्रुघ्नांचे जे सैनिक तेथे उपस्थित होते, ते परस्परात म्हणू लागले - ही काय गोष्ट आहे ? आपण कोठे आहोत ? हे काही स्वप्न तर आपण पहात नाही ना ? ज्या गोष्टी आपण पूर्वी पाहून चुकलो आहो त्यांनाच आपण या आश्रमावर जशाच तशा ऐकत आहोत. ॥१९-२०॥
शृणुमः किमिदं स्वप्नो गीतबन्धनमुत्तमम् ।
विस्मयं ते परं गत्वा शत्रुघ्नमिदमब्रुवन् ॥ २१ ॥
काय ह्या उत्तम गीतबंधाला आपण स्वप्नात ऐकत आहोत ? नंतर अत्यंत विस्मयात पडून ते शत्रुघ्नांना म्हणाले - ॥२१॥
साधु पृच्छ नरश्रेष्ठ वाल्मीकिं मुनिपुङ्‌गवम् ।
शत्रुघ्नस्त्वब्रवीत् सर्वान् कौतूहलसमन्वितान् ॥ २२ ॥

सैनिकानक्षमोऽस्माकं परिप्रष्टुमिहेदृशः ।
आश्चर्याणि बहूनीह भवन्त्यस्याश्रमे मुनेः ॥ २३ ॥
नरश्रेष्ठ ! आपण या विषयी मुनिवर वाल्मीकिना चांगल्या प्रकारे विचारा. यावर शत्रुघ्नांनी कुतुहलाने भरलेल्या त्या सर्व सैनिकांना म्हटले - मुनिंच्या या आश्रमात अशा अनेक आश्चर्यजनक घटला होत राहातात. त्यांच्या विषयी त्यांच्याकडे काही चौकशी करणे आपल्यासाठी उचित नाही आहे. ॥२२-२३॥
न तु कौतूहलाद् युक्तं अन्वेष्टुं तं महामुनिम् ।
एवं तद् वाक्यमुक्त्वा तु सैनिकान् रघुनन्दनः ।
अभिवाद्य महर्षिं तं स्वं निवेशं ययौ तदा ॥ २४ ॥
कौतुहलवश महामुनि वाल्मीकिंना या गोष्टींच्या विषयी जाणणे वा विचारणे उचित होणार नाही. आपल्या सैनिकांना असे सांगून रघुनंदन शत्रुघ्न महर्षिंना प्रणाम करून आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी निघून गेले. ॥२४॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् उत्तरकाण्डे एकसप्ततिमः सर्गः ॥ ७१ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील उत्तरकाण्डाचा एकाहत्तरावा सर्ग पूरा झाला. ॥७१॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP