श्रीमद् वाल्मीकि रामायणे
बालकाण्डे
। एकचत्वारिंशः सर्गः ।
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
सगरस्याज्ञयांशुमता रसातलं गत्वा ततो यज्ञियाश्वस्यानयनं स्वपितृव्यानां निधनवृत्तस्य वर्णनं च - सगराच्या आज्ञेने अंशुमानाचे रसातलात जाऊन घोड्यास घेऊन येणे आणि आपला चुलत्यांच्या निधनाचा समाचार ऐकविणे -
पुत्राञ्चिरगताञ्ज्ञात्वा सगरो रघुनन्दन ।
नप्तारमब्रवीद् राजा दीप्यमानं स्वतेजसा ॥ १ ॥
'रघुनन्दना ! पुत्रांना जाऊन बरेच दिवस होऊन गेले हे जाणून सगराने आपला पौत्र अंशुमानास, जो आपल्या तेजाने देदीप्यमान दिसत होता, म्हटले - ॥ १ ॥
शूरश्च कृतविद्यश्च पूर्वैस्तुल्योऽसि तेजसा ।
पितॄणां गतिमन्विच्छ येन चाश्वोऽपवाहितः ॥ २ ॥
'वत्सा ! तू शूरवीर, विद्वान आणि आपल्या पूर्वजांच्या सारखाच तेजस्वी आहेस. तूही आपल्या चुलत्यांच्या मार्गाचे अनुसरण कर आणि त्या चोराचा पत्ता लाव, ज्याने माझ्या यज्ञसंबंधी अश्वाचे अपहरण केले आहे. ॥ २ ॥
अन्तर्भौमानि सत्त्वानि वीर्यवन्ति महान्ति च ।
तेषां त्वं प्रतिघातार्थं सासिं गृह्णीष्व कार्मुकम् ॥ ३ ॥
'पहा, पृथ्वीच्या आत मोठमोठे बलवान जीव राहतात, म्हणून त्यांच्यी टक्कर घेण्यासाठी तू तलवार आणि धनुष्य घेऊन जा. ॥ ३ ॥
अभिवाद्याभिवाद्यांस्त्वं हत्वा विघ्नकरानपि ।
सिद्धार्थः संनिवर्तस्व मम यज्ञस्य पारगः ॥ ४ ॥
जो वंदनीय पुरुष असेल त्यांना प्रणाम कर, आणि जे तुझ्या मार्गात विघ्न आणणारे असतील त्यांना मारून टाक. असे करीत सफल मनोरथ होऊन परत ये आणि माझा हा यज्ञ पूर्ण करविण्यास साहाय्य कर. ॥ ४ ॥
एवमुक्तोंऽशुमान् सम्यक् सगरेण महात्मना ।
धनुरादाय खङ्‍गं च जगाम लघुविक्रमः ॥ ५ ॥
महात्मा सगरांनी असे म्हटल्यावर शीघ्रतापूर्वक पराक्रम करून दाखविणार्‍या वीरवर अंशुमानाने धनुष्य आणि तलवार घेऊन तेथून प्रयाण केले. ॥ ५ ॥
स खातं पितृभिर्मार्गमन्तर्भौमं महात्मभिः ।
प्रापद्यत नरश्रेष्ठः तेन राज्ञाभिचोदितः ॥ ६ ॥
नरश्रेष्ठ ! त्याच्या मनस्वी चुलत्यांनी पृथ्वीच्या आंत जो मार्ग बनविला होता त्या मार्गावरूनच तो राजा सगराच्या प्रेरणेने जाऊ लागला. ॥ ६ ॥
दैत्यदानवरक्षोभिः पिशाचपतगोरगैः ।
पूज्यमानं महातेजा दिशागजमपश्यत ॥ ७ ॥
तेथे त्या महातेजवी वीराने एक दिग्गज पाहिला ज्याची देवता, दानव, राक्षस, पिशाच्च, पक्षी आणि नाग, सर्व पूजा करीत होते. ॥ ७ ॥
स तं प्रदक्षिणं कृत्वा पृष्ट्‍वा चैव निरामयम् ।
पितॄन् स परिपप्रच्छ वाजिहर्तारमेव च ॥ ८ ॥
त्याची परिक्रमा करून कुशल मंगल विचारून अंशुमानाने त्या त्या दिग्गजाला आपल्या चुलत्यांचा समाचार, तसेच अश्व चोरणाराचा पत्ता विचारला. ॥ ८ ॥
दिशागजस्तु तच्छ्रुत्वा प्रत्युवाच महामतिः ।
आसमञ्ज कृतार्थस्त्वं सहाश्वः शीघ्रमेष्यसि ॥ ९ ॥
त्याचा प्रश्न ऐकून परम बुद्धिमान दिग्गजाने या प्रकरे उत्तर दिले, "असमञ्जकुमार, ! तू आपले कार्य सिद्ध करून घोड्यासहित शीघ्र परत येशील. ॥ ९ ॥
तस्य तद् वचनं श्रुत्वा सर्वानेव दिशागजान् ।
यथाक्रमं यथान्यायं प्रष्टुं समुपचक्रमे ॥ १० ॥
तैश्च सर्वैर्दिशापालैर्वाक्यज्ञैर्वाक्यकोविदैः ।
पूजितः सहयश्चैवागन्तासीत्यभिचोदितः ॥ ११ ॥
वाक्याचे मर्म समजण्यात व बोलण्यात कुशल अशा त्या सर्व दिग्गजांनी अंशुमानाचा सत्कार केला आणि तीच शुभकामना प्रकट केली की - "तू घोड्यासहित परत येशील." ॥ ११ ॥
तेषां तद् वचनं श्रुत्वा जगाम लघुविक्रमः ।
भस्मराशीकृता यत्र पितरः तस्य सागराः ॥ १२ ॥
त्यांचा आशिर्वाद ऐकून अंशुमान शीघ्रतापूर्वक पावले उचलत ज्या स्थानी त्याचे चुलते सगरपुत्र राखेचा ढीग होऊन पडले होते तेथे येऊन पोहोचला. ॥ १२ ॥
स दुःखवशमापन्नस्त्वसमञ्जसुतस्तदा ।
चुक्रोश परमार्तस्तु वधात् तेषां सुदुःखितः ॥ १३ ॥
त्यांच्या वधाने असमञ्जपुत्र अंशुमानास अत्यंत दुःख झाले. तो शोकाला वश होऊन अत्यंत आर्तभावाने आक्रोश करू लागला. ॥ १३ ॥
यज्ञीयं च हयं तत्र चरन्तमविदूरतः ।
ददर्श पुरुषव्याघ्रो दुःखशोकसमन्वितः ॥ १४ ॥
दुःखशोकात बुडलेल्या पुरुषसिंह अंशुमानाने आपल्या यज्ञसंबंधी अश्वालाही तेथे जवळच चरत असताना पाहिले. ॥ १४ ॥
स तेषां राजपुत्राणां कर्तुकामो जलक्रियाम् ।
स जलार्थी महातेजा न चापश्यज्जलाशयम् ॥ १५ ॥
महातेजस्वी अंशुमानाने त्या राकुमारांना जलाञ्जली देण्यासाठी जलाची इच्छा केली परंतु तेथे कोठेही त्याला जलाशय दिसून आला नाही. ॥ १५ ॥
विसार्य निपुणां दृष्टिं ततोऽपश्यत् खगाधिपम् ।
पितॄणां मातुलं राम सुपर्णमनिलोपमम् ॥ १६ ॥
'श्रीरामा ! तेव्हां त्याने दूरवर असलेल्या वस्तू पाहण्यास समर्थ आपल्या दृष्टीने सर्वत्र पाहिले. त्यावेळी त्याला वायुप्रमाणे वेगवान पक्षिराज गरुड दिसून आले जे त्यांच्या चुलत्यांचे (सगरपुत्रांचे) मामा होते. ॥ १६ ॥
स चैनमब्रवीद् वाक्यं वैनतेयो महाबलः ।
मा शुचः पुरुषव्याघ्र वधोऽयं लोकसम्मतः ॥ १७ ॥
महाबली विनतानन्दन गरुडाने अंशुमानास म्हटले. "पुरुषसिंह ! शोक करू नको. या राजकुमारांचा वध संपूर्ण जगताच्या मंगलासाठी झाला आहे. ॥ १७ ॥
कपिलेनाप्रमेयेण दग्धा हीमे महाबलाः ।
सलिलं नार्हसि प्राज्ञ दातुमेषां हि लौकिकम् ॥ १८ ॥
'विद्वन् ! अनंत प्रभावशाली महात्मा कपिलाने या महाबली राजकुमारांना दग्ध केले आहे. त्यांच्यासाठी तू लौकिक जलाची अंजली देणे उचित नाही. ॥ १८ ॥
गङ्‍गा हिमवतो ज्येष्ठा दुहिता पुरुषर्षभ ।
तस्यां कुरु महाबाहो पितॄणां सलिलक्रियाम् ॥ १९ ॥
'नरश्रेष्ठ महाबाहो ! हिमवानाची जी ज्येष्ठ कन्या गंगा आहे, तिच्या जलाने आपल्या चुलत्यांचे तर्पण कर. ॥ १९ ॥
भस्मराशीकृतानेतान् प्लावयेल्लोकपावनी ।
तया क्लिन्नमिदं भस्म गङ्‍गया लोककान्तया ।
षष्टिं पुत्रसहस्राणि स्वर्गलोकं गमिष्यति ॥ २० ॥
'ज्यावेळी लोकपावनी गंगा राखेचा ढीग होऊन पडलेया त्या साठ जहार राजकुमारांना आपल्या जलाने आप्लावित करील, त्याच समयी ती त्या सर्वांना स्वर्गलोकात पोहोचवील. लोककमनीय गंगेच्या जलाने भिजलेली ही भस्म-रास या सर्वांना स्वर्गलोकात घेऊन जाईल. ॥ २० ॥
निर्गच्छाश्वं महाभाग संगृह्य पुरुषर्षभ ।
यज्ञं पैतामहं वीर निर्वर्तयितुमर्हसि ॥ २१ ॥
'महाभाग ! पुरुषप्रवर ! वीर ! तू आता घोडा घेऊन जा आणि आपल्या पितामहाचा यज्ञ पूर्ण कर." ॥ २१ ॥
सुपर्णवचनं श्रुत्वा सोंऽशुमानतिवीर्यवान् ।
त्वरितं हयमादाय पुनरायान्महातपाः ॥ २२ ॥
गरुडाचे हे म्हणणे ऐकून अत्यंत पराक्रमी महातपस्वी अंशुमान घोडा घेऊन तात्काळ परत आला. ॥ २२ ॥
ततो राजानमासाद्य दीक्षितं रघुनन्दन ।
न्यवेदयद् यथावृत्तं सुपर्णवचनं तथा ॥ २३ ॥
रघुनन्दना ! यज्ञात दीक्षित झालेल्या राजाजवळ जाऊन त्याने सर्व समाचार निवेदन केला आणि गरुडाने सांगितलेली गोष्टही त्यांना ऐकविली. ॥ २३ ॥
तच्छ्रुत्वा घोरसङ्‍काशं वाक्यमंशुमतो नृपः ।
यज्ञं निर्वर्तयामास यथाकल्पं यथाविधि ॥ २४ ॥
अंशुमानाच्या मुखाने हा भयंकर समाचार ऐकून राजा सगराने कल्पोक्त नियमास अनुसरून आपला यज्ञ विधिवत् पूर्ण केला. ॥ २४ ॥
स्वपुरं त्वगमच्छ्रीमानिष्टयज्ञो महीपतिः ।
गङ्‍गायाश्चागमे राजा निश्चयं नाध्यगच्छत ॥ २५ ॥
यज्ञ समाप्त करून पृथ्वीपति महाराज सगर आपल्या राजधानीस परत आले. तेथे आल्यावर त्यांनी गंगेला आणण्याच्या विषयावर खूप विचार केला परंतु कोणत्याही निश्चयावर पोहोचू शकले नाहीत. ॥ २५ ॥
अगत्वा निश्चयं राजा कालेन महता महान् ।
त्रिंशद्वर्षसहस्राणि राज्यं कृत्वा दिवं गतः ॥ २६ ॥
दीर्घकाल पर्यंत विचार करूनही त्यांना काही निश्चित उपाय सुचला नाही; आणि तीस हजार वर्षेपर्यंत राज्य करून ते स्वर्गलोकी निघून गेले. ॥ २६ ॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् बालकाण्डे एकचत्वारिंशः सर्गः ॥ ४१ ॥ या प्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यातील बालकाण्डाचा एकेचाळीसावा सर्ग समाप्त झाला. ॥ ४१ ॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP