श्रीमद् वाल्मीकि रामायणे
उत्तरकाण्डे
॥ सप्ताशीतितमः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
श्रीरामेण लक्ष्मणं प्रतीलोपाख्यानस्य कथनम् - इलस्य मासावधिकस्त्रीत्वस्य मासावधिकपुरुषत्वस्य च प्राप्तिः -
श्रीरामांनी लक्ष्मणांना राजा इलाची कथा ऐकविणे - इलाला एकेक मासपर्यंत स्त्रीत्व आणि पुरुषत्वाची प्राप्ति -
तच्छ्रुत्वा लक्ष्मणेनोक्तं वाक्यं वाक्यविशारदः ।
प्रत्युवाच महातेजाः प्रहसन् राघवो वचः ॥ १ ॥
लक्ष्मणांचे वाक्य ऐकून वाक्यविशारद महातेजस्वी राघव हसत हसत म्हणाले - ॥१॥
एवमेव नरश्रेष्ठ यथा वदसि लक्ष्मण ।
वृत्रघातमशेषेण वाजिमेधफलं च यत् ॥ २ ॥
नरश्रेष्ठ लक्ष्मणा ! वृत्रासुराचा सारा प्रसंग आणि अश्वमेघ यज्ञाचे जे फल तू जसे सांगितलेस, ते सर्व त्या रूपात ठीक आहे. ॥२॥
श्रूयते हि पुरा सौम्य कर्दमस्य प्रजापतेः ।
पुत्रो बाह्लीश्वरः श्रीमान् इलो नाम सुधार्मिकः ॥ ३ ॥
सौम्या ! असे ऐकिवात आहे की पूर्वकाळी कर्दमांचे पुत्र श्रीमान्‌ इल बाह्लिक देशाचे राजे होते. ते फार धर्मात्मा नरेश होते. ॥३॥
स राजा पृथिवीं सर्वां वशे कृत्वा महाशयाः ।
राज्यं चैव नरव्याघ्र पुत्रवत् पर्यपालयत् ॥ ४ ॥
पुरुषसिंह ! ते महायशस्वी भूपाल सार्‍या पृथ्वीला अधीन ठेवून आपल्या राज्यातील प्रजेचे पुत्राप्रमाणे पालन करत होते. ॥४॥
सुरैश्च परमोदारैः दैतेयैश्च महाधनैः ।
नागराक्षसगन्धर्वैः यक्षैश्च सुमहात्मभिः ॥ ५ ॥

पूज्यते नित्यशः सौम्य भयार्तै रघुनन्दन ।
अबिभ्यंश्च त्रयो लोकाः सरोषस्य महात्मनः ॥ ६ ॥
सौम्य ! रघुनंदना ! परम उदार देवता, महाधनी दैत्य तसेच नाग, राक्षस, गंधर्व आणि महामनस्वी यक्ष - हे सर्व भयभीत होऊन सदा राजा इलाची स्तुति-पूजा करीत होते तसेच त्या महामना नरेशाच्या रुष्ट होण्याने तीन्ही लोकांतील प्राण्यांचा भयाने थरकाप होत होता. ॥५-६॥
स राजा तादृशो‍प्यासीद् धर्मे वीर्ये च निष्ठितः ।
बुद्ध्या च परमोदारो बाह्लीकेशो महायशाः ॥ ७ ॥
असे प्रभावशाली असूनही बाह्लिक देशाचे स्वामी महायशस्वी परम उदार राजा इला धर्म आणि पराक्रमात दृढतापूर्वक स्थित राहात होते आणि त्यांची बुद्धिही स्थिर होती. ॥७॥
स प्रचक्रे महाबाहुः मृगयां रुचिरे वने ।
चैत्रे मनोरमे मासि सभृत्यबलवाहनः ॥ ८ ॥
एका समयाची गोष्ट आहे. सेवक, सेना आणि वाहनांसहित त्या महाबाहु नरेशाने मनोरम चैत्रमासात एका सुंदर वनात शिकार खेळण्यास आरंभ केला. ॥८॥
प्रजघ्ने च नृपोऽरण्ये मृगान् शतसहस्रशः ।
हत्वैव तृप्तिर्नाभूच्च राज्ञस्तस्य महात्मनः ॥ ९ ॥
राजाने त्या वनात शेकडो-हजारो हिंस्त्र जंतुचा वध केला, परंतु इतक्या जंतुंचा वध करूनही त्या महामनस्वी नरेशाची तृप्ति झाली नाही. ॥९॥
नानामृगाणामयुतं वध्यमानं महात्मना ।
यत्र जातो माहासेनः तं देशमुपचक्रमे ॥ १० ॥
नंतर त्या महामना इलाच्या हाताने नाना प्रकारचे दहा हजार हिंस्त्र पशु मारले गेले. तत्पश्चात्‌ ते जेथे महासेनाचा (स्वामी कार्तिकेयांचा) जन्म झाला होता त्या प्रदेशात गेले. ॥१०॥
तस्मिन्प्रदेशे देवेशः शैलराजसुतां हरः ।
रमयामास दुर्धर्षः सर्वैरनुचरैः सह ॥ ११ ॥
त्या स्थानात देवतांचे स्वामी दुर्जय देवता भगवान्‌ शिव आपल्या समस्त सेवकांसहित राहून गिरिराजकुमारी उमेचे मनोरंजन करीत होते. ॥११॥
कृत्वा स्त्रीरूपमात्मानं उमेशो गोपतिध्वजः ।
देव्याः प्रियचिकीर्षुः संस्तस्मिन् पर्वतनिर्झरे ॥ १२ ॥
ज्यांच्या ध्वजावर वृषभांचे चिह्न सुशोभित झालेले आहेत ते भगवान्‌ उमावल्लभ आपणा स्वतःलाही स्त्रीरूपात प्रकट करून देवी पार्वतीचे प्रिय करण्याच्या इच्छेने तेथील पर्वतीय झर्‍यांच्याजवळ तिच्यासह विहार करीत होते. ॥१२॥
ये तु तत्र वनोद्देशे सत्त्वाः पुरुषवादिनः ।
वृक्षाः पुरुषनामानः ते सर्वे स्त्रीजना भवन् ॥ १३ ॥
त्या वनाच्या विभिन्न भागात जेथे जेथे पुल्लिंग नामधारी जंतु अथवा वृक्ष होते ते सर्वच्या सर्व स्त्रीलिंगात परिणत झालेले होते. ॥१३॥
यच्च किञ्चन तत्सर्वं नारीसंज्ञं बभूव ह ।
एतस्मिन्नन्तरे राजा स इलः कर्दमात्मजः ॥ १४ ॥

निघ्नन् मृगसहस्राणि तं देशमुपचक्रमे ।
तेथे जो काही चराचर प्राण्यांचा समूह होता, तो सर्व स्त्रीनामधारी झाला होता. याच समयी कर्दमांचे पुत्र राजा इला हजारो हिंस्त्र पशुंचा वध करीत त्या देशात येऊन पोहोचले. ॥१४ १/२॥
स दृष्ट्‍वा स्त्रीकृतं सर्वं सव्यालमृगपक्षकम् ॥ १५ ॥

आत्मनं स्त्रीकृतं चैव सानुगं रघुनन्दन ।
तेथे येऊन त्यांनी पाहिले सर्प, पशु आणि पक्ष्यांसहित त्या वनांतील सारा प्राणी समुदाय स्त्रीरूप झाला आहे. रघुनंदना ! सेवकांसहित आपणा स्वतःलाही त्यांनी स्त्रीरूपात परिणत होतांना पाहिले. ॥१५ १/२॥
तस्य दुःखं महच्चासीद् दृष्ट्‍वाऽऽत्मानं तथागतम् ॥ १६ ॥

उमापतेश्च तत्कर्म ज्ञात्वा त्रासमुपागमत् ।
आपल्याला त्या अवस्थेत पाहून राजाला फार दुःख झाले. हे सारे कार्य उमावल्लभ महादेवांच्या इच्छेने झाले आहे, हे जाणून ते भयभीत झाले. ॥१६ १/२॥
ततो देवं महात्मानं शितिकण्ठं कपर्दिनम् ॥ १७ ॥

जगाम शरणं राजा सभृत्यबलवाहनः ।
त्यानंतर सेवक, सेना आणि वाहनांसहित राजा इल जटाजूटधारी महात्मा भगवान्‌ नीलकंठांना शरण गेले. ॥१७ १/२॥
ततः प्रहस्य वरदः सह देव्या महेश्वरः ॥ १८ ॥

प्रजापतिसुतं वाक्यं उवाच वरदः स्वयम् ।
तेव्हा पार्वतीदेवीसह विराजमान वरदायक देवता महेश्वर हसून प्रजापति पुत्र इलाला स्वतः म्हणाले - ॥१८ १/२॥
उत्तिष्ठोत्तिष्ठ राजर्षे कार्दमेय महाबल ॥ १९ ॥

पुरुषत्वं ऋते सौम्य वरं वरय सुव्रत ।
कर्दमकुमार महाबली राजर्षे ! उठ, उठ ! सुव्रत सौम्य नरेश ! पुरुषत्व सोडून जी इच्छा असेल तो वर मागून घे. ॥१९ १/२॥
ततः स राजा शोकार्तः प्रत्याख्यातो महात्मना ॥ २० ॥

स्त्रीभूतोऽसौ न जग्राह वरमन्यं सुरोत्तमात् ।
महात्मा भगवान्‌ शंकरांनी याप्रकारे पुरुषत्व देण्यास नकार दिल्यावर स्त्रीरूप झालेले राजा इल शोकाने व्याकुळ झाले. त्यांनी सुरश्रेष्ठ महादेवांकडून दुसरा कुठलाही वर ग्रहण केला नाही. ॥२० १/२॥
ततः शोकेन महता शैलराजसुतां नृपः ॥ २१ ॥

प्रणिपत्य ह्युमां देवीं सर्वेणैवान्तरात्मना ।
ईशे वराणां वरदे लोकानामसि भामिनी ॥ २२ ॥

अमोघदर्शने देवी भज सौम्येन चक्षुषा ।
त्यानंतर महान्‌ शोकाने पीडित होऊन राजाने गिरिराजकुमारी उमादेवीच्या चरणी संपूर्ण हृदयपूर्वक प्रणाम करून ही प्रार्थना केली- संपूर्ण वरांची अधीश्वरी देवी ! आपण मानिनी आहात ! समस्त लोकांना वर देणार्‍या आहात. देवी आपले दर्शन कधी निष्फळ होत नाही. म्हणून आपण आपल्या सौम्य दृष्टिने माझ्यावर अनुग्रह करावा. ॥२१-२२ १/२॥
हृद्‌गतं तस्य राजर्षेः विज्ञाय हरसन्निधौ ॥ २३ ॥

प्रत्युवाच शुभं वाक्यं देवी रुद्रस्य संमता ।
राजर्षि इलाचा हार्दिक अभिप्राय जाणून रूद्रप्रिया देवी पार्वतीनी महादेवांच्या जवळच हे शुभ वाक्य उच्चारले - ॥२३ १/२॥
अर्धस्य देवो वरदो वरार्धस्य तव ह्यहम् ॥ २४ ॥

तस्मादर्धं गृहाण त्वं स्त्रीपुंसोर्यावदिच्छसि ।
राजन्‌ ! तू पुरुषत्व प्राप्तिरूप जो वर इच्छितोस, त्याच्या अर्ध्या भागाचे दाते तर महादेव आहेत आणि अर्धा वर तुला मी देऊ शकते (अर्थात्‌ तुला संपूर्ण जीवनासाठी जे स्त्रीत्व मिळाले आहे, त्याला मी अर्ध्याजीवनासाठी पुरुषत्वात परिवर्तीत करू शकते) म्हणून तू मी दिलेला अर्धा वर स्वीकार कर. तू किती काळपर्यंत स्त्री आणि पुरुष राहू इच्छितोस ते माझ्यासमोर सांग. ॥२४ १/२॥
तदद्‌भुततरं श्रुत्वा देव्या वरमनुत्तमम् ॥ २५ ॥

सम्प्रहृष्टमना भूत्वा राजा वाक्यमथाब्रवीत् ।
यदि देवि प्रसन्ना मे रूपेणाप्रतिमा भुवि ॥ २६ ॥

मासं स्त्रीत्वमुपासित्वा मासं स्यां पुरुषः पुनः ।
देवी पार्वतीचा तो परम उदार आणि अत्यंत अद्‍भुत वर ऐकून राजांच्या मनांत फार हर्ष झाला आणि ते म्हणाले - देवी ! जर आपण माझ्यावर प्रसन्न आहात तर मी एक मासपर्यंत भूतलावर अनुपम रूपवती स्त्रीच्या रूपात राहून परत एक मासपर्यंत पुरुष होऊन राहीन. ॥२५-२६ १/२॥
ईप्सितं तस्य विज्ञाय देवी सुरुचिरानना ॥ २७ ॥

प्रत्युवाच शुभं वाक्यं एवमेव भविष्यति ।
राजन् पुरुषभूतस्त्वं स्त्रीभावं न स्मरिष्यसि ॥ २८ ॥

स्त्रीभूतश्च परं मासं न स्मरिष्यसि पौरुषम् ।
राजाचा मनोभाव जाणून सुमुखी पार्वतीदेवी हे शुभ वचन बोलली - असेच होईल. राजन्‌ ! ज्यावेळी तू पुरुषरूपात रहाशील त्यासमयी तुला आपल्या स्त्रीजीवनाची आठवण राहाणार नाही आणि ज्यावेळी तू स्त्रीरूपात रहाशील त्यासमयी तुला एक मासपर्यंत आपल्या पुरुषभावाचे स्मरण होणार नाही. ॥२७-२८ १/२॥
एवं स राजा पुरुषो मासं भूत्वाथ कार्दमिः ।
त्रैलोक्यसुंदरी नारी मासमेकं इलाऽभवत् ॥ २९ ॥
याप्रकारे कर्दमकुमार राजा इल एक मासपर्यंत पुरुष राहून नंतर परत एक महिना त्रैलोक्यसुंदरी नारी इलेच्या रूपात राहू लागले. ॥२९॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् उत्तरकाण्डे सप्ताशीतितमः सर्गः ॥ ८७ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील उत्तरकाण्डाचा सत्त्याऐंशीवा सर्ग पूरा झाला. ॥८७॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP