श्रीमद् वाल्मीकि रामायणे
किष्किंधाकाण्डे
॥ द्विपञ्चाशः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
स्वयंप्रभया पृष्ट्ऐर्वानरैस्तां प्रति स्ववृत्तांतस्य वर्णनं तस्याः प्रभावेण च गुहातो बहिर्निष्क्रम्य तेषां सागरतटे समुद्रगमनम् - तापसी स्वयंप्रभेने विचारल्यावर वानरांनी तिला आपला वृत्तांत सांगणे आणि तिच्या प्रभावाने गुहेच्या बाहेर निघून समुद्र तटावर पोहोचणे -
अथ तानब्रवीत् सर्वान् विक्रांतान् हरियूथपान् ।
इदं वचनमेकाग्रा तापसी धर्मचारिणी ॥ १ ॥
तत्पश्चात् जेव्हां सर्व वानर-यूथपति खाऊन-पिऊन विश्राम करून चुकले तेव्हा धर्मांचे आचरण करणारी ती एकाग्र हृदया तपस्विनी त्या सर्वांना या प्रकारे म्हणाली- ॥१॥
वानरा यदि वः खेदः प्रनष्टः फलभक्षणात् ।
यदि चैतन्मया श्राव्यं श्रोतुमिच्छामि तां कथाम् ॥ २ ॥
’वानरांनो ! जर फळे खाण्याने तुमचा थकवा दूर झाला असेल तर आणि जर तुमचा वृत्तांत मी ऐकण्यासारखा असेल तर मी तो ऐकूं इच्छिते.’ ॥२॥
तस्यास्तद् वचनं श्रुत्वा हनुमान् मारुतात्मजः ।
आर्जवेन यथातत्त्वं आख्यातुमुपचक्रमे ॥ ३ ॥
तिचे हे बोलणे ऐकून पवनपुत्र हनुमानांनी अत्यंत सरलपणे यथार्थ गोष्ट सांगण्यास सुरूवात केली- ॥३॥
राजा सर्वस्य लोकस्य महेंद्रवरुणोपमः ।
रामो दाशरथिः श्रीमान् प्रविष्टो दण्डकावनम् ॥ ४ ॥
’देवी ! संपूर्ण जगताचे राजा दशरथनंदन श्रीमान् भगवान राम, जे देवराज इंद्र आणि वरूणांसमान तेजस्वी आहेत दण्डकारण्यात आले होते. ॥४॥
लक्ष्मणेन सह भ्रात्रा वैदेह्या सह भार्यया ।
तस्य भार्या जनस्थानाद् रावणेन हृता बलात् ॥ ५ ॥
’त्यांच्या बरोबर त्यांचे लहान भाऊ लक्ष्मण तसेच त्यांची धर्मपत्‍नी विदेहनंदिनी सीताही होती. जनस्थानात येऊन रावणाने त्यांच्या स्त्रीचे बलपूर्वक अपहरण केले आहे. ॥५॥
वीरस्तस्य सखा राज्ञः सुग्रीवो नाम वानरः ।
राजा वानरमुख्यानां येन प्रस्थापिता वयम् ॥ ६ ॥

अगस्त्यचरितामाशां दक्षिणां यमरक्षिताम् ।
सहैभिर्वानरैर्मुखैः अङ्‌गयदप्रमुखैर्वयम् ॥ ७ ॥
’श्रेष्ठ वानरांचे राजे वानरजातीय वीरवर सुग्रीव महाराज श्रीरामचंद्रांचे मित्र आहेत. त्यांनी या अंगद आदि प्रधान वीरांबरोबर आम्हा लोकांना सीतेचा शोध करण्यासाठी अगस्त्य सेवित आणि यमराज द्वारा सुरक्षित दक्षिण दिशेला धाडले आहे. ॥६-७॥
रावणं सहिताः सर्वे राक्षसं कामरूपिणम् ।
सीतया सह वैदेह्या मार्गध्वमिति चोदिताः ॥ ८ ॥
’त्यांनी आज्ञा दिली होती की तुम्ही सर्व लोक एकत्र राहून वैदेही सीतेसहित, त्या इच्छानुसार रूप धारण करणार्‍या राक्षसराज रावणाचा शोध घ्यावा. ॥८॥
विचित्य तु वनं सर्वं समुद्रं दक्षिणां दिशम् ।
वयं बुभुक्षिताः सर्वे वृक्षमूलमुपाश्रिताः ॥ ९ ॥
’आम्ही येथील सर्व जंगल पिंजून काढले. आता दक्षिण दिशेमध्ये समुद्रामध्ये तिचे अन्वेषण करावयाचे आहे. आतापर्यंत सीतेचा काही पत्ता लागला नाही आणि आम्ही लोक भूक आणि तहानेने पीडित झालो. शेवटी आम्ही सर्वच्या सर्व एका वृक्षाखाली थकून बसून गेलो. ॥९॥
विवर्णवदनाः सर्वे सर्वे ध्यानपरायणाः ।
नाधिगच्छामहे पारं मग्नाश्चिंतामहार्णवे ॥ १० ॥
’आमच्या मुखांची कांति फिकी पडली. आम्ही सर्व चिंतेमध्ये मग्न झालो. चिंतेच्या महासागरात बुडून जाऊन आम्ही त्याच्या पार जाऊं शकत नव्हतो. ॥१०॥
चारयंतः ततश्चक्षुः दृष्टवंतो महद् बिलम् ।
लतापादपसञ्छन्नं तिमिरेण समावृतम् ॥ ११ ॥
’याचवेळी चोहोबाजूस दृष्टी टाकल्यावर आम्हांला ही विशाल गुहा दिसून आली, जी लता आणि वृक्षांनी झाकून गेलेली होती तसेच अंधकाराने आच्छादित होती. ॥११॥
अस्माद्धंसा जलक्लिन्नाः पक्षैः सलिलरेणुभिः ।
कुरराः सारसाश्चैव निष्पतंति पतत्त्रिणः ॥ १२ ॥
’थोड्याच वेळाने या गुहेतून हंस, कुरर आणि सारस आदि पक्षी बाहेर पडले, ज्यांचे पंख जलांनी भिजलेले होते आणि त्यांना चिखल लागलेला होता. ॥१२॥
साध्वत्र प्रविशामेति मया तूक्ताः प्लवंगमाः ।
तेषामपि हि सर्वेषां अनुमानमुपागतम् ॥ १३ ॥
’तेव्हा मी वानरांना म्हटले- आपण या गुहेच्या आत प्रवेश केला तर ते चांगले होईल. या सर्व वानरांनीही असे अनुमान केले की गुहेमध्ये पाणी आहे. ॥१३॥
अस्मिन् निपतिताः सर्वेऽपि अथ कार्यत्वरान्विताः ।
ततो गाढं निपतिता गृह्य हस्तौ परस्परम् ॥ १४ ॥
’आम्ही सर्व लोक आपल्या कार्याच्या सिद्धीसाठी उतावळे झालेले होतोच म्हणून या गुहेत उडी मारली. आपल्या हातांनी एक दुसर्‍याला दृढतापूर्वक पकडून आम्ही या गुहेमध्ये पुढे पुढे सरकू लागलो. ॥१४॥
इदं प्रविष्टाः सहसा बिलं तिमिरसंवृतम् ।
एतन्नः कार्यमेतेन कृत्येन वयमागताः ॥ १५ ॥
’या प्रकारे एकाएकी आम्ही लोकांनी या काळोखाने व्याप्त गुहेत प्रवेश केला. हेच आमचे कार्य आहे आणि या कार्यामुळेच आम्ही इकडे आलो आहोत. ॥१५॥
त्वां चैवोपगताः सर्वे परिद्यूना बुभुक्षिताः ।
आतिथ्यधर्मदत्तानि मूलानि च फलानि च ॥ १६ ॥

अस्माभिरुपयुक्तानि बुभुक्षापरिपीडितैः ।
’भुकेने व्याकुळ आणि दुर्बळ झाल्या कारणाने आम्ही सर्व आपणांस शरण आलो. आपण आतिथ्य-धर्मास अनुसरून आम्हांला फळे आणि मूळे अर्पित केलीत आणि आम्हीही भुकेने पीडित झाल्यामुळे ती पोटभर खाल्ली. ॥१६ १/२॥
यत्त्वया रक्षिताः सर्वे म्रियमाणा बुभुक्षया ॥ १७ ॥

ब्रूहि प्रत्युपकारार्थं किं ते कुर्वंतु वानराः ।
’देवी ! आम्ही भुकेने मरत होतो. तुम्ही सर्व लोकांचे प्राण वाचविले आहेत. म्हणून हे वानर तुमच्या उपकारांतून उतराई होण्यासाठी तुमची काय सेवा करू देत ते तुम्ही सांगा.’ ॥१७ १/२॥
एवमुक्ता तु सर्वज्ञा वानरैस्तैः स्वयंप्रभा । ॥ १८ ॥

प्रत्युवाच ततः सर्वानिदं वानरयूथापान् ।
’स्वयंप्रभा सर्वज्ञ होती. त्या वानरांनी असे सांगितल्यावर तिने त्या सर्व यूथपतिंना या प्रकारे उत्तर दिले- ॥१८ १/२॥
सर्वेषां परितुष्टाऽस्मि वानराणां तरस्विनाम् ॥ १९ ॥

चरंत्या मम धर्मेण न कार्यमिह केनचित् ।
’मी तुम्हां सर्व वेगवान् वानरांवर आधीच खूप संतुष्ट आहे. धर्मानुष्ठानातच लागून राहिल्याने मला कोणापासून काही प्रयोजन राहिलेले नाही. ॥१९ १/२॥
एवमुक्तः शुभं वाक्यं तापस्या धर्मसंहितम् ॥ २० ॥

उवाच हनुमान् वाक्यं तामनिंदितलोचनाम् ।
त्या तपस्विनीने जेव्हा या प्रकारे धर्मयुक्त उत्तम गोष्ट सांगितली तेव्हा हनुमानांनी निर्दोष दृष्टि असणार्‍या त्या देवीला म्हटले- ॥२० १/२॥
शरणं त्वां प्रपन्नाः स्मः सर्वे वै धर्मचारिणीम् ॥ २१ ॥

यः कृतः समयोऽस्मासु सुग्रीवेण महात्मना ।
स च कालो व्यतिक्रांतो बिले च परिवर्तताम् ॥ २२ ॥
’देवी ! तुम्ही धर्माचरणात लागलेल्या आहात. म्हणून आम्ही सर्व लोक तुम्हांला शरण आलो आहोत. महात्मा सुग्रीवांनी आम्हां लोकांना परतून येण्यासाठी जो समय निश्चित केला होता, तो या गुहेत फिरण्यातच उलटून गेला आहे. ॥२१-२२॥
सा त्वमस्माद् बिद्विलादस्मान् उत्तारयितुमर्हसि ।
तस्मात् सुग्रीववचनाद् अतिक्रांतान् गतायुषः ॥ २३ ॥

त्रातुमर्हसि नः सर्वान् सुग्रीवभयशंकितान् ।
आता तुम्ही कृपा करून आम्हांला या बिळातून बाहेर काढा. सुग्रीवांनी सांगितलेला समय तर आम्ही ओलांडून चुकलो आहोत; म्हणून आता आमचे आयुष्य पूर्ण होऊन चुकले आहे. आम्ही सर्वच्या सर्व सुग्रीवाच्या भयामुळे घाबरलेले आहोत. म्हणून तुम्ही आमचा उद्धार करा. ॥२३ १/२॥
महच्च कार्यमस्माभिः कर्तव्यं धर्मचारिणि ॥ २४ ॥

तच्चापि न कृतं कार्यं अस्माभिरिह वासिभिः ।
’धर्मचारिणी ! आम्हाला जे महान् कार्य करावयाचे आहे तेही या गुहेत राहून आम्ही करू शकत नाही.’ ॥२४ १/२॥
एवमुक्ता हनुमता तापसी वाक्यमब्रवीत् ॥ २५ ॥

जीवता दुष्करं मन्ये प्रविष्टेन निवर्तितुम् ।
तपसः सुप्रभावेन नियमोपार्जितेन च ॥ २६ ॥

सर्वानेव बिलादस्माद् तारयिष्यामि वानरान् ।
हनुमानांनी असे म्हटल्यावर तापसी म्हणाली -’मला माहित आहे की एक वेळा जो या गुहेत येतो, त्याचे जिवंत असता परत जाणे फारच कठीण होऊन जाते. तथापि नियमांचे पालन आणि तपस्येच्या उत्तम प्रभावाने मी सर्व वानरांना या गुहेतून बाहेर काढून देईन. ॥२५-२६ १/२॥
निमीलयत चक्षूंषि सर्वे वानरपुंगवाः ॥ २७ ॥

नहि निष्क्रमितुं शक्यं अनिमीलितलोचनैः ।
’श्रेष्ठ वानरांनो ! तुम्ही सर्व लोक आपापले डोळे बंद करा. डोळे बंद केल्याशिवाय येथून निघणे असंभव आहे.’ ॥२७ १/२॥
ततो निमीलिताः सर्वे सुकुमाराङ्‌गुललैः करैः ॥ २८ ॥

सहसा पिदधुर्दृष्टिं हृष्टा गमनकाङ्‌क्षलया ।
हे ऐकून सर्वांनी सुकुमार बोटे असलेल्या हातांनी डोळे झाकून घेतले. गुहेतून बाहेर निघण्याच्या इच्छेने प्रसन्न होऊन त्या सर्वांनी एकाएकी नेत्र बंद करून घेतले. ॥२८ १/२॥
वानरास्तु महात्मानो हस्तरुद्धमुखास्तदा ॥ २९ ॥

निमेषांतरमात्रेण बिलादुत्तारितास्तया ।
या प्रकारे त्या समयी हातांनी तोंड झांकून घेतल्यामुळे त्या महात्मा वानरांना स्वयंप्रभेने डोळ्याचे पाते लवते न लवते तोच बिळांतून बाहेर काढले. ॥२९ १/२॥
उवाच सर्वांस्तांस्तत्र तापसी धर्मचारिणी ॥ ३० ॥

निःसृतान् विषमात् तस्मात् सत्समाश्वास्येदमब्रवीत् ।
तत्पश्चात् तेथे त्या धर्मपरायण तापसीने त्या विषम गुहेतून बाहेर निघालेल्या समस्त वानरांना आश्वासन देऊन याप्रकारे म्हटले- ॥३० १/२॥
एष विंध्यो गिरिः श्रीमान् नान्नानाद्रुमलतायुतः ॥ ३१ ॥

एष प्रस्रवणः शैलः सागरोऽयं महोदधिः ।
स्वस्ति वोऽस्तु गमिष्यामि भवनं वानरर्षभाः ।
इत्युक्त्वा तद्बितलं श्रीमत् प्रविवेश स्वयंप्रभा ॥ ३२ ॥
’श्रेष्ठ वानरांनो ! हा राहिला नाना प्रकारच्या वृक्षांनी आणि लतांनी व्याप्त शोभाशाली विंध्यगिरि ! इकडे हा प्रस्त्रवण गिरि आहे आणि समोर हा महासागर लहरत आहे. तुमचे कल्याण होवो. आता मी आपल्या स्थानावर जाते.’ असे म्हणून स्वयंप्रभा त्या सुंदर गुहेत निघून गेली. ॥३१-३२॥
इत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये किष्किंधाकाण्डे द्विपञ्चाशः सर्गः ॥ ५२ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील किष्किंधाकाण्डाचा बावन्नावा सर्ग पूरा झाला. ॥५२॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP