श्रीमद् वाल्मीकि रामायणे
युद्धकाण्डे
॥ सप्ताशीतितम: सर्ग: ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

इन्द्रजित् विभीषणयोः सरोषः संवादः -
इन्द्रजित आणि विभीषणाचे रोषपूर्ण संभाषण -
एवमुक्त्वा तु सौमित्रिं जातहर्षो विभीषणः ।
धनुष्पाणिं तमादाय त्वरमाणो जगाम ह ॥ १ ॥
पूर्वोक्त वचन बोलून हर्षाने भरलेले विभीषण धनुर्धर सौमित्रास बरोबर घेऊन मोठ्‍या वेगाने पुढे निघाले. ॥१॥
अविदूरं ततो गत्वा प्रविश्य च महद् वनम् ।
दर्शयामास तत्कर्म लक्ष्मणाय विभीषणः ॥ २ ॥
थोड्‍या अंतरावर जाताच विभीषणाने एका महान्‌ वनात प्रवेश करून लक्ष्मणास इन्द्रजिताच्या कर्मानुष्ठानाचे स्थान दाखविले. ॥२॥
नीलजीमूतसङ्‌काशं न्यग्रोधं भीमदर्शनम् ।
तेजस्वी रावणभ्राता लक्ष्मणाय न्यवेदयत् ॥ ३ ॥
तेथे एक वटवृक्ष होता जो श्याम मेघाप्रमाणे सघन आणि दिसण्यात भयंकर होता. रावणाचा तेजस्वी भ्राता विभीषणाने लक्ष्मणास तेथील सर्व वस्तु दाखवून म्हटले - ॥३॥
इहोपहारं भूतानां बलवान् रावणात्मजः ।
उपहृत्य ततः पश्चात् सङ्‌ग्रामं अभिवर्तते ॥ ४ ॥
सौमित्र ! हा बलवान्‌ रावणकुमार प्रतिदिन येथेच येऊन प्रथम भूतांना बळि देतो, त्यानंतर युद्धास प्रवृत्त होतो. ॥४॥
अदृश्यः सर्वभूतानां ततो भवति राक्षसः ।
निहन्ति समरे शत्रून् बध्नाति च शरोत्तमैः ॥ ५ ॥
यामुळे संग्रामभूमीमध्ये हा राक्षस संपूर्ण भूतांसाठी अदृश्य होऊन जातो आणि उत्तम बाणांनी शत्रूंना मारतो तसेच बांधून ठेवतो. ॥५॥
तमप्रविष्टं न्यग्रोधं बलिनं रावणात्मजम् ।
विध्वंसय शरैस्तीक्ष्णैः सरथं साश्वसारथिम् ॥ ६ ॥
म्हणून जो पर्यत हा या वटवृक्षाखाली आलेला नाही त्यापूर्वीच आपण आपल्या तेजस्वी बाणांच्या द्वारा या बलवान्‌ रावणकुमारास रथ, घोडे आणि सारथ्यासहित नष्ट करून टाकावे. ॥६॥
तथेत्युक्त्वा महातेजाः सौमित्रिर्मित्रनन्दनः ।
बभूवावस्थितस्तत्र चित्रं विस्फारयन् धनुः ॥ ७ ॥
तेव्हा ’फार चांगले’ असे म्हणून मित्रांचा आनंद वाढविणारे महातेजस्वी सौमित्र आपल्या विचित्र धनुष्याचा टणत्कार करीत तेथे उभे राहिले. ॥७॥
स रथेनाग्निवर्णेन बलवान् रावणात्मजः ।
इन्द्रजित् कवची धन्वी सध्वजः प्रत्यदृश्यत ॥ ८ ॥
इतक्यांतच बलवान्‌ रावणकुमार इन्द्रजित अग्निसमान तेजस्वी रथावर बसून कवच, खड्ग आणि ध्वजेसहित दृष्टिस पडला. ॥८॥
तमुवाच महातेजाः पौलस्त्यमपराजितम् ।
समाह्वये त्वां समरे सम्यग् युद्धं प्रयच्छ मे ॥ ९ ॥
तेव्हा महातेजस्वी लक्ष्मणांनी पराजित न होणार्‍या पुलत्स्यकुलनंदन इन्द्रजितास म्हटले - ’ राक्षसकुमारा ! मी तुला युद्धासाठी आव्हान देत आहे. तू उत्तम प्रकारे संभाळून माझ्याशी युद्ध कर. ॥९॥
एवमुक्तो महातेजा मनस्वी रावणात्मजः ।
अब्रवीत् परुषं वाक्यं तत्र दृष्ट्‍वा विभीषणम् ॥ १० ॥
लक्ष्मणांनी असे म्हटल्यावर महातेजस्वी आणि मनस्वी रावणकुमाराने तेथे विभीषणाला उपस्थित पाहून कठोर शब्दात म्हटले - ॥१०॥
इह त्वं जातसंवृद्धः साक्षाद् भ्राता पितुर्मम ।
कथं द्रुह्यसि पुत्रस्य पितृव्यो मम राक्षस ॥ ११ ॥
राक्षसा ! येथेच तुझा जन्म झाला आणि येथेच तू वाढून इतका मोठा झालास. तू माझ्या पित्याचा सख्खा भाऊ आणि माझा चुलता आहेस मग तू आपल्या पुत्राशी - माझ्याशी द्रोह का करीत आहेस ? ॥११॥
न ज्ञातित्वं न सौहार्दं न जातिस्तव दुर्मते ।
प्रमाणं न च सौदर्यं न धर्मो धर्मदूषण ॥ १२ ॥
दुर्मते ! तुझ्या ठिकाणी कुटुंबीजनांविषयी आपलेपणाचा भाव नाही, अथवा आत्मीयजनांविषयी स्नेह नाही आणि आपल्या जातीचा अभिमानही नाही. तुझ्यामध्ये कर्तव्य - अकर्तव्यादि मर्यादा, भ्रातृप्रेम आणि धर्म काहीही नाही आहे. तू राक्षसधर्माला कलंकित करणारा आहेस. ॥१२॥
शोच्यस्त्वमसि दुर्बुद्धे निन्दनीयश्च साधुभिः ।
यस्त्वं स्वजनमुत्सृज्य परभृत्यत्वमागतः ॥ १३ ॥
दुर्बुद्धे ! तू स्वजनांचा परित्याग करून दुसर्‍यांची गुलामी स्वीकारली आहेस. म्हणून तू सत्पुरूषांच्या द्वारा निन्दनीय आणि शोकास योग्य आहेस. ॥१३॥
नैतच्छिथिलया बुद्ध्या त्वं वेत्सि महदन्तरम् ।
क्वच स्वजनसंवासः क्व च नीच पराश्रयः ॥ १४ ॥
नीच निशाचरा ! तू आपल्या शिथिल बुद्धिच्या द्वारा या महान्‌ अन्तरास समजू शकत नाहीस की कोठे स्वजनांच्या बरोबर राहून स्वच्छन्दतेचा आनंद घेणे आणि कोठे दुसर्‍यांची गुलामी करीत जगणे आहे. ॥१४॥
गुणवान् वा परजनः स्वजनो निर्गुणोऽपि वा ।
निर्गुणः स्वजनः श्रेयान् यः परः पर एव सः ॥ १५ ॥
दुसरे लोक कितीही गुणवान्‌ का असेनात आणि स्वजन गुणहीन कां असेनात ? पण गुणहीन स्वजन ही दुसर्‍यापेक्षा श्रेष्ठच आहेत, कारण परका हा परकाच असतो. (तो कधी आपला होऊ शकत नाही.) ॥१५॥
यः स्वपक्षं परित्यज्य परपक्षं निषेवते ।
स स्वपक्षे क्षयं प्राप्ते पश्चात् तैरेव हन्यते ॥ १६ ॥
जो आपला पक्ष सोडून दुसर्‍या पक्षाच्या लोकांचे सेवन करतो, तो आपला पक्ष नष्ट झाल्यावर नंतर त्यांच्याच द्वारा मारला जातो. ॥१६॥
निरनुक्रोशता चेयं यादृशी ते निशाचर ।
स्वजनेन त्वया शक्यं परुषं रावणानुज ॥ १७ ॥
रावणाच्या कनिष्ठ बंधु निशाचरा ! तुम्ही लक्ष्मणाला या स्थानापर्यंत आणून माझा वध करविण्यासाठी प्रयत्‍न करून ही अशी निर्दयता दाखविली आहे, असा पुरूषार्थ तुमच्या सारखा स्वजनच करू शकतो. तुमच्या शिवाय दुसर्‍या कुणा स्वजनासाठी असे करणे सम्भव नाही आहे. ॥१७॥
इत्युक्तो भ्रातृपुत्रेण प्रत्युवाच विभीषणः ।
अजानन्निव मच्छीलं किं राक्षस विकत्थसे ॥ १८ ॥
आपल्या पुतण्याचे हे बोलणे ऎकून विभीषणाने उत्तर दिले - ’राक्षसा ! तू आज अशी शेखी का मिरवत आहेस ? असे वाटते आहे की तुला माझ्या स्वभावाचा पत्ता नाही आहे. ॥१८॥
राक्षसेन्द्रसुतासाधो पारुष्यं त्यज गौरवात् ।
कुले यद्यप्यहं जातो रक्षसां क्रूरकर्मणाम् ।
गुणो यः प्रथमो नृणां तन्मे शीलमराक्षसम् ॥ १९ ॥
अधमा ! राक्षसराजकुमारा ! मोठ्यांच्या मोठेपणाची दखल घेऊन तू या कठोरतेचा परित्याग कर. यद्यपि माझा जन्म क्रूरकर्मा राक्षसांच्या कुळांतच झाला आहे तथापि माझे शील-स्वभाव राक्षसांच्या सारखा नाही. सत्पुरूषांचा जो प्रधान गुण, सत्व आहे, मी त्याचाच आश्रय घेतलेला आहे. ॥१९॥
न रमे दारुणेनाहं न चाधर्मेण वै रमे ।
भ्रात्रा विषमशीलोऽपि कथं भ्राता निरस्यते ॥ २० ॥
क्रूरतापूर्ण कर्मामध्ये माझे मन लागत नाही. अधर्मामध्ये माझी रूचि होत नाही. जर आपल्या भावाचे शील-स्वभाव आपल्या शील-स्वभावाशी मिळते जुळते नसेल तरीही मोठा भाऊ लहान भावाला घरांतून कसा घालवून देऊ शकतो ? परंतु मला घरांतून हाकलून दिले गेले मग मी दुसर्‍या सत्पुरूषांचा आश्रय कां घेऊ नये ? ॥२०॥
धर्मात् प्रच्युतशीलं हि पुरुषं पापनिश्चयम् ।
त्यक्त्वा सुखमवाप्नोति हस्तादाशीविषं यथा ॥ २१ ॥
ज्याचे शील-स्वभाव धर्मापासून भ्रष्ट झालेले आहे, ज्याने पाप करण्याचा दृढ निश्चय केलेला आहे, अशा पुरूषाचा त्याग करून प्रत्येक प्राणी, ज्याप्रमाणे हातावर बसलेल्या विषारी सर्पाचा त्याग करून मनुष्य जसा निर्भय होतो, त्याप्रकारे सुखी होतो. ॥२१॥
परस्वहरणे युक्तं परदाराभिमर्शनम् ।
त्याज्यं आहुः दुरात्मानं वेश्म प्रज्वलितं यथा ॥ २२ ॥
जो दुसर्‍याचे धन लुटत असतो आणि परक्याच्या स्त्रीला स्पर्श करतो त्या दुरात्म्याला जळत्या घराप्रमाणे त्यागणेच योग्य सांगितले आहे. ॥२२॥
परस्वानां च हरणं परदाराभिमर्शनम् ।
सुहृदामतिशङ्‌का च त्रयो दोषाः क्षयाबहाः ॥ २३ ॥
परधनाचे अपहरण, परस्त्रीशी संसर्ग आणि आपल्या हितैषी सुहृदांबद्दल अधिक शंका- अविश्वास हे तीन दोष विनाशकारी सांगितले गेले आहेत. ॥२३॥
महर्षिणां वधो घोरः सर्वदेवैश्च विग्रहः ।
अभिमानश्च रोषश्च वैरत्वं प्रतिकूलता ॥ २४ ॥

एते दोषा मम भ्रातुः जीवितैश्वर्यनाशनाः ।
गुणान् प्रच्छादयामासुः पर्वतानिव तोयदाः ॥ २५ ॥
महर्षिंचा भयंकर वध, सम्पूर्ण देवतांशी विरोध, अभिमान, रोष, वैर आणि धर्माच्या प्रतिकूल वागणे - हे दोष माझ्या भावाच्या ठिकाणी विद्यमान आहेत, जे त्याचे प्राण आणि ऎश्वर्य दोन्हींचा नाश करणारे आहेत. ज्याप्रमाणे ढग पर्वतांना आच्छादित करतात, त्याप्रकारे या दोषांनी माझ्या भावाच्या सर्व गुणांना झाकून टाकले आहे. ॥२४-२५॥
दोषैरेतैः परित्यक्तो मया भ्राता पिता तव ।
नेयमस्ति पुरी लङ्‌का न च त्वं न च ते पिता ॥ २६ ॥
या दोषांच्या कारणांमुळेच मी आपला भाऊ तसेच तुझ्या पित्याचा त्याग केला आहे. आता तर ही लंकापुरी राहाणार नाही, तूही राहाणार नाही आणि तुझा पिताही राहाणार नाही. ॥२६॥
अतिमानी च बालश्च दुर्विनीतश्च राक्षस ।
बद्धस्त्वं कालपाशेन ब्रूहि मां यद् यदिच्छसि ॥ २७ ॥
राक्षसा ! तू अत्यंत अभिमानी, उद्दण्ड आणि मूर्ख आहेस. काळाच्या जाळ्यात फसलेला आहेस, म्हणून तुझी जी जी इच्छा असेल, मला सांग. ॥२७॥
अद्य ते व्यसनं प्राप्तं यन्मां परुषमुक्तवान् ।
प्रवेष्टुं न त्वया शक्यं न्यग्रोधं राक्षसाधम ॥ २८ ॥
नीच राक्षसा ! तू मला जे कठोर वचन बोलला आहेस त्याचे हे फळ आहे की आज तुझ्यावर येथे घोर संकट आले आहे. आता तू वटवृक्षाच्या खालपर्यंत जाऊच शकणार नाहीस. ॥२८॥
धर्षयित्वा च काकुत्स्थौ न शक्यं जीवितुं त्वया ।
युद्ध्यस्व नरदेवेन लक्ष्मणेन रणे सह ।
हतस्त्वं देवताकार्यं करिष्यसि यमक्षयम् ॥ २९ ॥
काकुत्स्थ कुलभूषण लक्ष्मणांचा अपमान करून तू आता जिवंत राहू शकणार नाहीस. म्हणून या नरदेव लक्ष्मणाशी रणभूमीत युद्ध कर. येथे मारला जाऊन तू यमलोकात पोहोचशील आणि देवता लोकांचे कार्य करशील. त्यांना संतुष्ट करशील. ॥२९॥
निदर्शयस्वात्मबलं समुद्यतं
कुरुष्व सर्वायुधसायकव्ययम् ।
न लक्ष्मणस्यैत्य हि बाणगोचरं
त्वमद्य जीवन् सबलो गमिष्यसि ॥ ३० ॥
आता तू आपले वाढलेले सर्व बळ दाखव, समस्त आयुधे आणि सायकांचा व्यय करून घे, परंतु लक्ष्मणांच्या बाणांचे लक्ष्य बनून आज तू सेनेसहित जिवंत परत जाऊ शकणार नाहीस. ॥३०॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् युद्धकाण्डे सप्ताशतीतितमः सर्गः ॥ ८७ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील युद्धकाण्डाचा सत्त्याऎंशीवा सर्ग पूरा झाला. ॥८७॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP