श्रीमद् वाल्मीकि रामायणे
किष्किंधाकाण्डे
॥ द्वादशः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
श्रीरामेण सप्ततालवृक्षाणां भेदनं, श्रीरामस्याज्ञया सुग्रीवेण किष्किंधायामागत्य वालिनो युद्धाय आव्हानं, युद्धे ततः पराजितस्य तस्य मतंगवने पलायनं, तत्र श्रीरामेण तस्य समाश्वासनं तदभिज्ञानार्थं गले गजपुष्पीलतां निक्षिप्य तस्य पुनः प्रेषणं च - श्रीरामांच्या द्वारा सात साल-वृक्षांचे भेदन, श्रीरामांच्या आज्ञेने सुग्रीवांचे किष्किंधेत जाऊन वालीला ललकारणे आणि युद्धात त्याच्याकडून पराजित होऊन मतंगवनात पळून जाणे, तेथे श्रीरामांनी त्यांना आश्वासन देणे आणि गळ्यात घालण्यासाठी गजपुष्पीलता घालून त्यांना पुन्हा युद्धासाठी धाडणे -
एतच्च वचनं श्रुत्वा सुग्रीवेण सुभाषितम् ।
प्रत्ययार्थं महातेजा रामो जग्राह कार्मुकम् ॥ १ ॥
सुग्रीवाने सुंदर रीतीने बोललेले हे वचन ऐकून महातेजस्वी रामांनी त्यांना विश्वास वाटावा म्हणून धनुष्य हातात घेतले. ॥१॥
स गृहीत्वा धनुर्घोरं शरमेकं च मानदः ।
सालमुद्दिश्य चिक्षेप ज्यास्वनैः पूरयन् दिशः ॥ २ ॥
दुसर्‍यांना मान देणार्‍या रामाne ते भयंकर धनुष्य आणि एक बाण घेऊन धनुष्याच्या टणत्काराने संपूर्ण दिशांना निनादून टाकीत तो सालवृक्षाच्या दिशेने सोडला. ॥२॥
स विसृष्टो बलवता बाणः स्वर्णपरिष्कृतः ।
भित्त्वा सालान् गिरिप्रस्थे सप्त भूमिं विवेश ह ॥ ३ ॥
त्या बलवान् वीर शिरोमणीच्या द्वारा सोडला गेलेला तो सुवर्णभूषित बाण त्या सातही सालवृक्षांना एकाच वेळी भेदून, पर्वत तसेच पृथ्वीच्या सातही तलांना भेदून पाताळात गेला. ॥३॥
प्रविष्टश्च मुहूर्तेन धरां भित्त्वा महाजवः ।
निष्पत्य च पुनस्तूर्णं स्वतूर्णीं प्रविवेश ह ॥ ४ ॥
याप्रकारे एकाच मुहूर्तात त्या सर्वांचे भेदन करून तो महान् वेगवान बाण पुन्हा तेथून निघून त्यांच्या भात्यामध्ये प्रविष्ट झाला. ॥४॥
तान् दृष्ट्‍वा सप्त निर्भिन्नान् सालान् वानरपुंगवः ।
रामस्य शरवेगेन विस्मयं परमं गतः ॥ ५ ॥
श्रीरामांच्या बाणाच्या वेगाने त्या सातही साल वृक्षांना विदिर्ण झालेले पाहून वानरश्रेष्ठ सुग्रीवांना फार विस्मय वाटला. ॥५॥
स मूर्ध्ना न्यपतद्‌भू्मौ प्रलंबीकृतभूषणः ।
सुग्रीवः परमप्रीतो राघवाय कृताञ्चलिः ॥ ६ ॥
’त्याच बरोबर त्यांना मनातल्या मनात खूप प्रसन्नता वाटली. सुग्रीवांनी हात जोडून जमिनीवर मस्तक टेकविले आणि राघवांना साष्टांग प्रणाम केला. प्रणामासाठी ते जेव्हा वाकले तेव्हा त्यांची कण्ठहारादि भूषणे लटकत असलेली दिसून येत होती. ॥६॥
इदं चोवाच धर्मज्ञं कर्मणा तेन हर्षितः ।
रामं सर्वास्त्रविदुषां श्रेष्ठं शूरमवस्थितम् ॥ ७ ॥
श्रीरामांच्या त्या महान् कर्माने अत्यंत प्रसन्न होऊन त्यांनी समोर उभे असलेल्या संपूर्ण अस्त्रवेत्यामध्ये श्रेष्ठ, धर्मज्ञ, शूरवीर श्रीरामांना याप्रकारे म्हटले- ॥७॥
सेंद्रानपि सुरांत्सर्वांस्त्वं बाणैः पुरुषर्षभ ।
समर्थः समरे हंतुं किं पुनर्वालिनं प्रभो ॥ ८ ॥
’पुरुषप्रवर ! भगवन् ! आपण तर आपल्या बाणांनी समरांगणात इंद्रासहित संपूर्ण देवतांचाही वध करण्यास समर्थ आहात. मग वालीला मारणे आपल्यासाठी काय मोठी गोष्ट आहे ?’ ॥८॥
येन सप्त महासाला गिरिर्भूमिश्च दारिताः ।
बाणेनैकेन काकुत्स्थ स्थाता ते को रणाग्रतः ॥ ९ ॥
’काकुत्स्थ ! ज्यांनी सात मोठमोठे सालवृक्ष, पर्वत आणि पृथ्वीलाही एकाच बाणात विदीर्ण करून टाकले आहे त्या आपल्या समक्ष युद्धाच्या तोंडावर कोण उभे राहू शकेल ?’ ॥९॥
अद्य मे विगतः शोकः प्रीतिरद्यः परा मम ।
सुहृदं त्वां समासाद्य महेंद्रवरुणोपमम् ॥ १० ॥
’महेंद्र आणि वरूणासमान परक्रमी आपल्याला सुहृदाच्या रूपात प्राप्त करून आज माझा सर्व शोक दूर झाला आहे. आज मला माझी प्रसन्नता प्राप्त झाली आहे.’ ॥१०॥
तमद्यैव प्रियार्थं मे वैरिणं भ्रातृरूपिणम् ।
वालिनं जहि काकुत्स्थ मया बद्धो ऽयमञ्जलिः ॥ ११ ॥
’काकुत्स्थ ! मी हात जोडतो. आपण आजच माझे प्रिय करण्यासाठी त्या वालीचा, जो भावाच्या रूपात माझा शत्रू आहे; वध करून टाका.’ ॥११॥
ततो रामः परिष्वज्य सुग्रीवं प्रियदर्शनम् ।
प्रत्युवाच महाप्राज्ञो लक्ष्मणानुगतं वचः ॥ १२ ॥
’सुग्रीव, श्रीरामांना लक्ष्मणाप्रमाणे प्रिय झाले होते. त्यांचे बोलणे ऐकून महाप्राज्ञ श्रीरामांनी आपल्या प्रिय सुहृदाला हृदयशी धरले आणि याप्रकारे उत्तर दिले - ॥१२॥
अस्माद्ग च्छेम किष्किंधां क्षिप्रं गच्छ त्वमग्रतः ।
गत्वा चाह्वय सुग्रीव वालिनं भ्रातृगंधिनम् ॥ १३ ॥
’सुग्रीवा ! आपण लगेचच या स्थानापासून किष्किंधेला जाऊ या. तू पुढे जा आणि जाऊन व्यर्थच भाऊ म्हणविणार्‍या वालीला युद्धासाठी आव्हान दे.’ ॥१३॥
सर्वे ते त्वरितं गत्वा किष्किंधां वालिनः पुरीम् ।
वृक्षैरात्मानमावृत्य व्यतिष्ठन् गहने वने ॥ १४ ॥
’त्यानंतर ते सर्व जण वालीची राजधानी किष्किंधापुरीला गेले आणि तेथे गहन वनामध्ये वृक्षांच्या आड स्वतःस लपवून उभे राहिले. ॥१४॥
सुग्रीवो व्यनदद् घोरं वालिनो ह्वानकारणात् ।
गाढं परिहितो वेगान् नादैर्भिंदन्निवांबरम् ॥ १५ ॥
’सुग्रीवाने लंगोटाने आपली कंबर चांगली कसली आणि वालीला बोलवण्यासाठी भयंकर गर्जना केली. वेगपूर्वक केल्या गेलेल्या या सिंहनादाने जणु ते आकाशास विदीर्ण करून टाकत होते. ॥१५॥
तं श्रुत्वा निनदं भ्रातुः क्रुद्धो वाली महाबलः ।
निश्चक्राम सुसंरब्धो भास्करोऽस्ततटादिव ॥ १६ ॥
भावाचा सिंहनाद ऐकून महाबलाढ्य वालीला फार क्रोध आला. तो अमर्षांत भरून अस्ताचलांतून खाली जाणर्‍या सूर्याप्रमाणे अत्यंत वेगाने घराबाहेर पडला. ॥१६॥
ततः सुतुमुलं युद्धं वालिसुग्रीवयोरभूत् ।
गगने ग्रहयोर्घोरं बुधाङ्‌गानरकयोरिव ॥ १७ ॥
नंतर तर वाली आणि सुग्रीव यांच्यात फार भयंकर युद्ध जुंपले, जणु आकाशात बुध आणि मंगळ या दोन ग्रहात घोर संग्राम होत होता. ॥१७॥
तलैरशनिकल्पैश्च वज्रकल्पैश्चमुष्टिभिः ।
जघ्नतुः समरे ऽन्योन्यं भ्रातरौ क्रोधमूर्च्छितौ ॥ १८ ॥
ते दोघे भाऊ क्रोधाने बेभान होऊन एक दुसर्‍यावर वज्र आणि अशनि प्रमाणे तडाखे आणि बुक्यांचा प्रहार करू लागले. ॥१८॥
ततो रामो धनुष्पाणिस्तावुभौ समुदीक्ष्य तु ।
अन्योन्यसदृशौ वीरावुभौ देवाविवाश्विनौ ॥ १९ ॥
त्यावेळी श्रीरामचंद्रांनी धनुष्य हातात घेतले आणि त्या दोघांकडे पाहिले. ते दोन्ही वीर अश्विनीकुमारांप्रमाणे परस्परांशी मिळते जुळते दिसून आले. ॥१९॥
यन्नावगच्छत् सुग्रीवं वालिनं वापि राघवः ।
ततो न कृतवान् बुद्धिं मोक्तुमंतकरं शरम् ॥ २० ॥
श्रीरामांना याचा पत्ता लागेना की यात सुग्रीव कोण आहे आणि वाली कोण आहे, म्हणून त्यांनी आपला तो प्राणांतकारी बाण सोडण्याचा विचार स्थगित केला. ॥२०॥
एतस्मिन्नंतरे भग्नः सुग्रीवस्तेन वालिना ।
अपश्यन् राघवं नाथमृश्यमूकं प्रदुद्रुवे ॥ २१ ॥
इतक्यात वालीने सुग्रीवाचे पाय उखडून टाकले तेव्हा आपले रक्षक राघव न दिसल्याने, सुग्रीव ऋष्यमूक पर्वताकडे पळाले. ॥२१॥
क्लांतो रुधिरसिक्ताङ्‌गः् प्रहारैर्जर्जरीकृतः ।
वालिनाभिद्रुतः क्रोधात् प्रविवेश महावनम् ॥ २२ ॥
ते फारच थकून गेले होते. त्यांचे सारे शरीर रक्ताने न्हाऊन निघाले होते आणि प्रहारांमुळे जर्जर झालेले होते. यावरही वालीने क्रोधपूर्वक त्यांचा पाठलाग केला. परंतु सुग्रीव मत्तंगमुनिंच्या महान् वनात घुसून गेले. ॥२२॥
तं प्रविष्टं वनं दृष्ट्‍वा वाली शापभयार्दितः ।
मुक्तो ह्यसि त्वमित्युक्त्वा संनिवृत्तो महाद्युतिः ॥ २३ ॥
सुग्रीवांना त्या वनात प्रविष्ट झालेले पाहून महाबलाढ्य वाली शापाच्या भयाने तेथे गेला नाही आणि ’जा, तू वाचलास’ असे म्हणून परत आला. ॥२३॥
राघवो ऽपि सहभ्रात्रा सह चैव हनूमता ।
तदेव वनमागच्छत् सग्रीवो यत्र वानरः ॥ २४ ॥
इकडे राघवही आपला भाऊ लक्ष्मण तसेच श्रीहनुमान यांच्यासह त्याच वेळी वनात आले, जेथे वानर सुग्रीव विद्यमान होते. ॥२४॥
तं समीक्ष्यागतं रामं सुग्रीवः सहलक्ष्मणम् ।
ह्रीमान् दीनमुवाचेदं वसुधामवलोकयन् ॥ २५ ॥
लक्ष्मणासहित श्रीरामांना आलेले पाहून सुग्रीवास फारच लाज वाटली आणि ते कल्ली मान करून दीन वाणीने त्यांना म्हणाले- ॥२५॥
आह्वयस्वेति मामुक्त्वा दर्शयित्वा च विक्रमम् ।
वैरिणा घातयित्वा च किमिदानीं त्वया कृतम् ॥ २६ ॥

तामेव वेलां वक्तव्यं त्वया राघव तत्त्वतः ।
वालिनं न निहन्मीति ततो नाहमितो व्रजे ॥ २७ ॥
’राघवा ! तुम्ही आपला पराक्रम दाखविला आणि मला असे सांगून धाडलेत की जा वालीला युद्धासाठी आव्हान दे, आणि हे सर्व झाल्यावर आपण शत्रूकडून मला झोडपविले आणि स्वतः लपून बसलात. सांगा बरे, या वेळी आपण असे कां केलेत ? आपण त्याच वेळी खरे - खरे सांगून टाकायला हवे होते की मी वालीला मारणार नाही. अशा स्थितित मी येथून त्याचा जवळ गेलोच नसतो.’ ॥२६-२७॥
तस्य चैवं ब्रुवाणस्य सुग्रीवस्य महात्मनः ।
करुणं दीनया वाचा राघवः पुनरब्रवीत् ॥ २८ ॥
महात्मा सुग्रीवाने जेव्हा दीनवाणीने याप्रकारे करूणाजनक बोलावयास सुरूवात केली, तेव्हा राघव परत त्याला म्हणाले- ॥२८॥
सुग्रीव श्रूयतां तात क्रोधश्च व्यपनीयताम् ।
कारणं येन बाणो ऽयं न मया स विसर्जितः ॥ २९ ॥
’तात सुग्रीव ! माझे म्हणणे ऐक. क्रोधाला आपल्या मनांतून काढून टाक. मी बाण का सोडला नाही याचे कारण सांगतो. ॥२९॥
अलङ्‌कावरेण वेषेण प्रमाणेन गतेन च ।
त्वं च सुग्रीव वाली च सदृशौ स्थः परस्परम् ॥ ३० ॥
’सुग्रीवा ! वेषभूषा, शरीराची ठेवण आणि हालचाल यांत तुम्ही आणि वाली दोघे एकमेकाशी अगदी मिळते-जुळते आहांत. ॥३०॥
स्वरेण वर्चसा चैव प्रेक्षितेन च वानर ।
विक्रमेण च वाक्यैश्च व्यक्तिं वां नोपलक्षये ॥ ३१ ॥
’स्वर, कान्ति, दृष्टि, पराक्रम आणि बोलणे चालणे या द्वाराही मला तुम्हां दोघात काहीही अंतर दिसून आले नाही. ’ ॥३१॥
ततो ऽहं रूपसादृश्यान्मोहितो वानरोत्तम ।
नोत्सृजामि महावेगं शरं शत्रुनिबर्हणम् ॥ ३२ ॥
’वानरश्रेष्ठ ! तुमच्या दोघांच्या रूपात इतकी समानता पाहून मी मोहात पडलो - तुम्हाला ओळखू शकलो नाही, म्हणून मी आपला महान् वेगवान शत्रुसंहारक बाण सोडला नाही. ॥३२॥
जीवितांतकरं घोरं सादृश्यात्तु विशङ्‌किततः ।
मूलघातो न नौ स्याद्धि द्वयोरपिकृतो मया ॥ ३३ ॥
’माझा तो भयंकर बाण शत्रुचा प्राण घेणारा होता, म्हणून तुम्हा दोघांतील समानतेमुळे संदेहात पडून मी तो शत्रुसंहारक बाण सोडला नाही. मी विचार केला की असे होऊ नये की त्यामुळे आपल्या दोघांच्या मूळ उद्देश्याचाच विनाश होईल.’ ॥३३॥
त्वयि वीरे विपन्ने हि अज्ञानाल्लाघवान्मया ।
मौढ्यं च मम बाल्यं च ख्यापितं स्याद्धरीश्वर ॥ ३४ ॥
’वीर ! वानरराज ! जर अजाणतां अथवा उतावळेपणाने माझ्या बाणाने तुम्हीच मारले गेला असतात तर तर ती माझी कृति एका बालकालाच शोभेल अशी चपलता व मूढपणाच म्हटला गेला असता.’ ॥३४॥
दत्ताभयवधो नाम पातकं महदुच्यते ।
अहं च लक्ष्मणश्चैव सीता च वरवर्णिनी ॥ ३५ ॥

त्वदधीना वयं सर्वे वने ऽस्मिन् शरणं भवान् ।
तस्माद्युद्ध्यस्व भूयस्त्वं मा माशङ्‌कीजश्च वानर ॥ ३६ ॥
’ज्याला अभयदान दिले गेले असेल, त्याचा वध करण्याने फार मोठे पाप लागते. ते एक अद्‌भुत पातक आहे. या समयी मी, लक्ष्मण आणि सुंदरी सीता सर्व तुमच्या अधीन आहोत. या वनात तुम्ही आम्हा लोकांचा आश्रय आहात, म्हणून वानरराज शंका करू नका, पुन्हा चला आणि युद्धाला प्रारंभ करा. ॥३५-३६॥
एतन्मुहूर्ते सुग्रीव पश्य वालिनमाहवे ।
निरस्तमिषुणैकेन वेष्टमानं महीतले ॥ ३७ ॥
’तुम्ही याच मुहूर्तात वालीला माझ्या एकाच बाणाचे लक्ष्य बनून जमिनीवर कोसळलेला पहाल. ॥३७॥
अभिज्ञानं कुरुष्व त्वमात्मनो वानरेश्वर ।
येन त्वामभिजानीयां द्वंद्वयुद्धमुपागतम् ॥ ३८ ॥
’वानरेश्वर ! आपली ओळख पटावी म्हणून तुम्ही काही चिन्ह धारण करा, ज्यायोगे द्वंदयुद्धास प्रवृत्त झाल्यावर मी तुम्हाला ओळखू शकेन. ॥३८॥
गजपुष्पीमिमां फुल्लामुत्पाट्य शुभलक्षणाम् ।
कुरु लक्ष्मण कण्ठे ऽस्य सुग्रीवस्य महात्मनः ॥ ३९ ॥
(सुग्रीवाला असे म्हणून राम लक्ष्मणास म्हणाले) ’लक्ष्मणा ! ही उत्तम लक्षणांनी युक्त गजपुष्पीची लता फुललेली आहे. हिला उपटून तुम्ही महात्मा सुग्रीवांच्या गळ्यात घाला.’ ॥३९॥
ततो गरितटे जातामुत्पाट्य कुसुमाकुलाम् ।
लक्ष्मणो गृजपुष्पीं तां तस्य कण्ठे व्यसर्जयत् ॥ ४० ॥
ही आज्ञा मिळताच लक्ष्मणांनी पर्वताच्या किनार्‍यावर उत्पन्न झालेली फुलांनी भरलेली ती गजपुष्पी लता उपटून सुग्रीवांच्या गळ्यामध्ये घातली. ॥४०॥
स तया शुशुभे श्रीमान् लतया कण्ठसक्तया ।
मालयेव बलाकानां ससंध्य इव तोयदः ॥ ४१ ॥
गळ्यात पडलेल्या त्या लतेमुळे श्रीमान् सुग्रीव बकपंक्तीने अलंकृत झालेल्या संध्याकाळच्या मेघाप्रमाणे शोभू लागले. ॥४१॥
विभ्राजमानो वपुषा रामवाक्यसमाहितः ।
जगाम सह रामेण किष्किंधां पुनरापः सः ॥ ४२ ॥
श्रीरामांच्या वचनांने आश्वासित होऊन आपल्या सुंदर शरीराने शोभून दिसणारे सुग्रीव श्रीरामांसह परत किष्किंधापुरीत जाऊन पोहोंचले. ॥४२॥
इत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये किष्किंधाकाण्डे द्वादशः सर्गः ॥ १२ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामयण आदिकाव्यांतील किष्किंधाकाण्डाचा बारावा सर्ग पूरा झाला. ॥१२॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP