॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥


॥ श्रीभावार्थरामायण ॥


युद्धकांड


॥ अध्याय ब्याण्णवावा ॥
श्रीरामचरित्र -


॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

श्रीरामसभेचे वर्णन :


यानंतरें दुसरे दिवशी । करोनियां प्रातःस्नानासी ।
वंदोनियां महर्षींसी । भद्रपीठासीं श्रीराम आला ॥ १ ॥
सभा बैसली घनदाट । दुजे उपमेसी वैकुंठ ।
तेथींचा महिमा उत्कट । अति श्रेष्ठ रामसभा ॥ २ ॥
अंकीं घेवोनि जनकनंदिनी । श्रीराम बैसला सिंहासनीं ।
येवोनि भरतादि प्रधानीं । लोटांगणी वंदिला ॥ ३ ॥
छत्र धरिलें सुमंतें । अकोपन घरी चामरातें ।
राष्ट्रवर्धन धरी व्यजनातें । आतपत्रातें धर्मपाळ ॥ ४ ॥
रामचरणांनिकट भरत । उभा राहे जोडोनि हात ।
तो युवराजा अति विख्यात । नम्र विनीत भावार्थी ॥ ५ ॥
हाती धरोनि धनुष्यबाण । सव्य भागीं लक्ष्मण ।
उभा राहोनि विचक्षण । श्रीरामचरण लक्षित ॥ ६ ॥
शत्रुघ्न आणि सेनानी । वेत्र निजहस्तें धरोनि ।
उभे राहिले रघुनंदनीं । लक्ष ठेवोनी निजचित्तें ॥ ७ ॥
सुग्रीवादि बिभीषण । उभे राहिले कर जोडून ।
सन्मुख तिष्ठे वायुनंदन । जिवलग पूर्ण श्रीरामाचा ॥ ८ ॥
वेद होवोनियां भाट । वर्णित श्रीरामप्रताप श्रेष्ठ ।
साही शास्त्रे घडघडाट । स्तुति उद्‌भट वानिती ॥ ९ ॥


श्रीराम सगुण की निर्गुण :


एक म्हणती राम सगुण । एक म्हणती राम निर्गुण ।
दुजा म्हणे न कळे खूण । राम चिद्घन एकला ॥ १० ॥
तिजा म्हणे राम एकला । तरी कां बहुरूपें भासला ।
चौथा म्हणे न कळे तुला । तोचि झाला निजांगें ॥ ११ ॥
ऐसें ऐकोनियां वचन । एक म्हणे हें बहुभाषण ।
राम अविकारी निर्गुण । त्यासी आन न म्हणावें ॥ १२ ॥
रामें विश्वाभास केला । आम्ही मानूं या बोला ।
परी रामचि विश्व झाला । वय। बोला न मानूं ॥ १३ ॥
गारुडी युक्ति मंत्रकळा । करोनि वादीचा सर्प केला ।
कीं गारुडी सर्प झाला । म्हणतां जनाला मानेल ॥ १४ ॥
घट कुलालें निर्मिला । कीं कुलालचि घट झाला ।
तैसा रामें प्रपंच रचिला । कीं रामचि झाला प्रपंच ॥ १५ ॥
माळिये देवोनि जीवन । स्वयें वाढविलें उपवन ।
कीं तो जाहला आपण । ऐसें सांगोन मज द्यावें ॥ १६ ॥
तुम्हांसी नाहीं पूर्ण ज्ञान । वृथा बोलाचें वल्गन ।
निर्गुणातें म्हणां सगुण । राम बहुभूषण राहों द्या ॥ १७ ॥
राम अविकारी निर्मळ । राम निरंजन निश्चळ ।
राम निर्धर्म निष्फळ । न लगे मळ तयासी ॥ १८ ॥
राम परंज्योती अमळ । राम परंधाम सोल्यळ ।
राम अद्वयानंद केवळ । न लगे मळ तयासी ॥ १९ ॥
राम अरूप आद्य अखिल । राम परमानंद बहळ ।
राम अनाम अगोत्र अचळ । नलगे मळ तयासी ॥ २० ॥
राम अद्वयानंद गहन । तोचि अंगें झाला जन ।
ऐसें म्हणतां अवघे जण । मज हें ज्ञान मानेना ॥ २१ ॥
ऐसी ऐकोनि वदंती । गर्जोनि उठिला वेदांती ।
म्हणे एकडोळा जगतीं । डोळस त्याप्रति न म्हणावें ॥ २२ ॥
निर्गुण म्हणसी श्रीरामातें । साधूनि नाना दृष्टांतांतें ।
त्या दृष्टांतांचे कारण येथें । न दिसे मातें जाण पां ॥ २३ ॥
अणोरणीयान् आदिश्रुति । ऐक्य संपादूं वर्तती ।
तुझ्या दृष्टांतांची गणती । कोण निश्चितीं धरील ॥ २४ ॥
म्हणसी कुलाल नव्हे घट । परी हे बोलचि वटवट ।
व्यर्थ युक्तीची खटपट । अंतर्निष्ठ न मानिती ॥ २५ ॥
मृत्तिका विजाती कुलाला । म्हणोनि घट तियेचा केला ।
तैसा श्रीरामवेगळा । प्रपंच झाला काशाचा ॥ २६ ॥
म्हणसी राम निर्विकार । तैं काय होत आकार ।
त्याचा केला विश्राकार । हें साचार सांगावें ॥ २७ ॥
आकाश पृथ्वी आप जीवन । तेज आदि पांचै जाण ।
केलीं काशाचीं घडून । मजलागून सांगावें ॥ २८ ॥
रामावेगळें काय होतें । मा त्याचीं केली पंचभूतें ।
ऐसे ज्ञान न कळे तूतें । काय दृष्टातें सांगसी ॥ २९ ॥
तुझे पूर्वोक्त दृष्टांत । ते न होती समयोचित ।
रामस्वरूप इत्यंभूत । तुज साद्यंत सांगतो ॥ ३० ॥
बीजामाजी वृक्षाकार । सुवर्णीं जेंवी अलंकार ।
तेंवी श्रीरामी संसार । मज साचार भासत ॥ ३१ ॥
जेंवी बीजचि झाला तरुवर । सुवर्ण झाला अलंकार ।
तेवी श्रीरामचि निर्विकार । स्वयें साकार जाहला ॥ ३२ ॥
राम म्हणावा निर्विकार । तंव तो भासतो साकार ।
साकार ना निराकार । परात्यर श्रीराम ॥ ३३ ॥
राम म्हणावा जरी निर्गुण । तरी तो प्रत्यक्ष भासे सगुण ।
एवं सगुण ना निर्गुण । आनंदघन श्रीराम ॥ ३४ ॥
ऐसी ऐकोनियां मात । वेद राहिले निवांत ।
अवघे वेदांतयासी नमित । धन्य म्हणत तत्वज्ञ ॥ ३५ ॥


हमुमंतकृत रामस्वरूपवर्णन :


हें ऐकोनि हनुमंत । अवघियांसी नमस्कारित ।
म्हणे माझेही हृद्‌गत । तुम्हीं समस्त परिसावें ॥ ३६ ॥
तुम्ही बोलिलां जो अर्थ । तो तंव शुद्धत्वें परमार्थ ।
श्रीरामाचें इत्थंभूत । स्वरूप निश्चित सांगितलें ॥ ३७ ॥
परंतु ऐका वेडें प्रेम । सुंदर सावळा श्रीराम ।
हेंचि माझें अद्वय ब्रह्म । न कळे वर्म आणिक ॥ ३८ ॥
हातीं घेवोनि धनुष्यबाण । जेणें मर्दिला रावण ।
तें हें सावळे ब्रह्म पूर्ण । पाहतां नयन निवती ॥ ३९ ॥
दासांसाठी अवतार धरित । वनरांचा तरी अंकित ।
तो हा माझा श्रीरघुनाथ । ब्रह्म निश्चित मज वाटे ॥ ४० ॥
राम ज्ञानाचें निजज्ञान । राम ध्यानाचें निजध्यान ।
राम समाधी समाधान । चैतन्यघन श्रीराम ॥ ४१ ॥
राम भक्तांचें माहेर । राम ज्ञानाचें जिव्हार ।
राम साराचें निजसार । हा निर्धार पै माझा ॥ ४२ ॥
रामांवाचूनि ब्रह्मज्ञान । आम्हांसी नलगे नलगे जाण ।
आमुचें ब्रह्म रघुनंदन । बोले गर्जोन हनुमंत ॥ ४३ ॥
राम सर्वदा मुखीं गाऊं । राम सर्वदा नित्य ध्याऊं ।
राम सर्वदा नेत्रीं पाहू । तरोनि जाऊं भवसिंधु ॥ ४४ ॥


राजाधिराज श्रीरामांचा सर्वांकडून एकमुखाने जयजयकार :


ऐसिया हनुमंताचे वचनीं । गर्जो लागल्या संतश्रेणी ।
भला भला रे इहीं वचनी । झाली गगनीं पुष्पवृष्टि ॥ ४५ ॥
ऋषिवरांचा जयजयकार । वानरांचा भुभुःकार ।
मगळवाद्यांचा गजर । नादें अंबर कोंदलें ॥ ४६ ॥
परमानंदं रघुनाथ । हनुमंतासी आलिंगित ।
स्वयें उचलोनि आनंदभरित । बैसवित निजासनीं ॥ ४७ ॥
राम वोळला परमानंद । झाला त्रैलोक्यां आनंद ।
एका जनार्दनीं स्वानंद । नित्यानंद रामायणीं ॥ ४८ ॥


युद्धकांडात आलेली रामकथा :


येथून संपले युद्धकांड । पुढे ऐका उत्तरकांड ।
जनार्दनकृपा अखंड । कांडे कांड अर्थवी ॥ ४९ ॥
श्रीरामें जावोनि सुवेळेसी । दुर्गी देखोनि रावणासी ।
बाणें छेदोनि छत्रासी । युद्धकांडासी संपविलें ॥ ५० ॥
शिष्ट धाडोनि अंगदासी । सभे गांजून दशमुखासी ।
प्रथम करोनि महारणासी । युद्धकांडासी संपविले ॥ ५१ ॥
प्रहस्तादि प्रधानासीं । अतिकायादि कुमारासीं ।
मारोनियां रणभिवेषीं । युद्धकांडासी संपविलें ॥ ५२ ॥
उठवोनि कुंभकर्णासी । रावण धाडी रणभूमीसीं ।
रामें निवटोनियां त्यासी । युद्धकांडासी संपविलें ॥ ५३ ॥
होम करितां निकुंभिळेसीं । तेथें धाडोनि लक्ष्मणासी ।
रणीं मारोनि इंद्रजितासी । युद्धकांडासी संपविलें ॥ ५४ ॥
द्विवार आणोनि द्रोणाद्रीसी । उठविलें लक्ष्मणा वानरांसी ।
यश देवोनि हनुमंतासी । युद्धकांडासी संपविलें ॥ ५५ ॥
अहिमहि वीर प्रचंड । होते पाताळीं वितंड ।
त्यांतें करोनि खंडविखंड । युद्धकांड संपविलें ॥ ५६ ॥
होम करितां अति वितंड । वानर पाठवोनि प्रचंड ।
युद्धा आणोनि दशमुंड । युद्धकांड संपविलें ॥ ५७ ॥
रावण योद्धा अति प्रचंड । शिरें प्रसवला उदंड ।
रामें ठेंचोनि त्याचें तोंड । युद्धकांड संपविलें ॥ ५८ ॥
बाण सोडोनि प्रचंड । रावणाचें गर्वबंड ।
क्षणें करोनि खंडविखंड । युद्धकांड संपविलें ॥ ५९ ॥
रावणासी करोनि दंड । देव सोडविले उदंड ।
बिभीषण स्थापोनि अखंड । युद्धकांड संपविलें ॥ ६० ॥
मुक्ति देवोनि रावणासी । भेटोनि दशरथासी ।
दिव्य घेवोनि सीतेसीं । युद्धकांडासी संपविलें ॥ ६१ ॥
विमानीं बैसोनि त्वरेंसीं । केले रामेश्वरनमनासी ।
भेटोनियां अगस्तीसी । युद्धकांडासी संपविलें ॥ ६२ ॥
भेटोनि भरद्वाजासी । सवेंचि भेटोनि गुहकासी ।
देवोनियां समाधानासी । युद्धकांडासी संपविलें ॥ ६३ ॥
चौदा वर्षे निराहारेंसी । भरत राहिला नंदिग्रामासीं ।
भेटोनियां स्वबंधूसी । युद्धकांडासी संपविलें ॥ ६४ ॥
रामें भेटोनि निजमातांसी । केलें व्रतविसर्जनासी ।
अंगीकरोनि निजराज्यासी । युद्धकांडासीं संपविलें ॥ ६५ ॥
यौवराज्य देवोनि भरतासी । सेनानीपण शत्रुघ्नासी ।
सुखी केलें कैकयीसी । युद्धकांडासी संपविलें ॥ ६६ ॥
सुखी केलें दासदासींसी । सुखी केलें निजप्रजेसी ।
आनंदवोनि निजवाक्येंसीं । युद्धकांडासी संपविलें ॥ ६७ ॥
संपलें युद्धकांड-निरूपण । पुढें उत्तरकांडकथा गहन ।
एका विनवी जनार्दन । श्रोते सज्ञान परिसोत ॥ ६८ ॥
माझी मिरासी मूर्खपण । नेणें पदबंधव्याख्यान ।
माथां हात ठेवोनि जनार्दन । वदवी रामायण निजसत्ता ॥ ६९ ॥
जनार्दनाची कृपा ऐशी । मूर्खाहातीं रामायणासीं ।
वदविलें रामकथेसी । कृपा ऐशी संतांची ॥ ७० ॥
सद्‌गुरूची कृपा घडे । तै पागुळा पर्वत चढे ।
एकनाथें तेणें पाडे । केलें रोकडे मज सरतें ॥ ७१ ॥
एका जनार्दना शरण । झालें युद्धकांडनिरूपण ।
श्रीरामकथा अति गहन । करी पावन महापापी ॥ ७२ ॥
कथा शतकोटिविस्तार । त्यांतील एकैक अक्षर ।
पडता कानीं शुद्ध पापी नर । श्रीरामकथाक्षर पुण्यपावन ॥ ७३ ॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे युद्धकांडे एकाकारटीकायां
श्रीरामचरितकथनं नाम द्विनवतितमोऽथ्याय: ॥ ९२ ॥
॥ ओंव्या ॥ ७३ ॥ श्रीरामचंद्रार्पणमस्तु ॥

युद्धकांडं समाप्तम्

GO TOP