॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥

॥ श्रीभावार्थरामायण ॥

उत्तरकांड

॥ अध्याय चाळिसावा ॥
वानरांचे स्वदेशी गमन

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

रामांकडून सुग्रीवाची प्रशंसा व त्याची पाठवणी :

तदनंतर ऋक्ष वानर-राक्षस । अयोध्येसीं आनंदें बहुवस ।
क्रमिला तेथें एक मास । सुखउल्हास सर्वांसी ॥१॥
वानररावो जो भूपती । तयाप्रति बोले श्रीरघुपती ।
तुझे उपकार आठवितां चित्तीं । थोर सुख होतसे ॥२॥
तुझेनि संगें वानर । मिळाले गा अपरंपार ।
तुझेनि मज सीता सुंदर । प्राप्त झाली किष्किंधेशा ॥३॥
तरी आतां आपुले नगरासी । वेगीं जावें किष्किंधेसी ।
जे कां अटक देवां दैत्यांसी । काळाचें तिसी न चले कांहीं ॥४॥
ऐसिया किष्किंधेप्रती । राज्य करीं गा वानरपती ।
पाळीं प्रधान सेना संपत्तीं । निष्कंटक राज्य करीं ॥५॥

सुग्रीवाला उपदेश :

महाबहो किष्किंधानाथा । परम प्रीतीने पाहें तारासुता ।
जैसा पिता तैसा चुलता । पुत्रत्वें पाळीं तयातें ॥६॥
अंगद वीर धीर परम शूर । सज्ञान ज्ञाता विवेकी चतुर ।
त्यावरी कृपा करीं अपार । हा गुणसागर अंगद ॥७॥
हनुमंतातें परम प्रीतीं । तूं प्रधानत्वें पाहीं गा नृपती ।
जयाची वानितां गुणकीर्तीं । दुसरा क्षितीं ऐसा नाहीं ॥८॥
मारुतीची मारुतीस उपमा । आन नाहीं ग वानरोत्तमा ।
याकारणें वर्णावया आम्हां । उत्कंठा होत नाहीं ॥९॥
सुषेण तुझा श्वशुर । तारेचा पिता महाशूर ।
आणीक तार वानर । परमधीर संग्रामीं ॥१०॥
कुमुद महादुर्धर्ष । नीळ वानर रणकर्कश ।
शतबळीनामा शूर बहुवस । नामेंच त्रास परवीरां ॥११॥
मैंद द्विविद गंधमादन । गज गवाक्ष गवय शरभ जाण ।
हेमकूट तपन ध्वज वैद्य सुषेण । प्रतपन केसरी तरु तराळ ॥१२॥
नळ जो शिळातारक । विश्वकर्मा जयाचा जनक ।
सेतुकार्या निपुण अधिक । राक्षसां धाक बहु त्याचा ॥१३॥
जांबवंतादि ऋक्षगण । मजकारणें कष्टले दारुण ।
मजलागीं इहीं त्यजिला प्राण । प्रिय पुत्र धन सांडोनी ॥१४॥
या समस्तातें पाळीं प्रीति करुन । अन्यथा न करीं माझें वचन ।
माझें स्वरुप सनातन । तेथें मन ठेवोनी ॥१५॥
माझे स्वरुपीं ठेवोनि मनासी । राज्य करीं सुखसंतोषीं ।
ऐसें आज्ञापोनि सुग्रीवासी । परम प्रीतीसी कारोनी ॥१६॥

सुग्रीवाची प्रशंसा व त्याला श्रीरामाचा निरोप :

तदनंतर श्रीरघुपती । बिभीषणेंसीं अति युक्तीं ।
मधुराक्षरीं अक्षरपंक्ती । बोलता झाला श्रीराम ॥१७॥
कीं चकोराचें देखोनि आर्त । हृदयीं जाणोनि अति क्षुधित ।
तयासि इंदु सुधा देत । तैसा श्रीरघुनाथ बोलता झाला ॥१८॥
श्रीराम म्हणे बिभीषणा । तूं आमुचा बंधु सुहृद प्राणा ।
तुझे उपकार वर्णावया मज रघुनंदना । वाचे वळण पडतसे ॥१९॥
अगा धर्मज्ञा लंकापती । राक्षसकुळीं तूं धर्ममूर्तीं ।
आतां शीघ्र स्वपुरीप्रती । जाई जियेप्रती परिघ सागरु ॥२० ॥
पूर्वी कुबेरापासून । हरिलें लंकाभवन ।
बंधूसि देवोनि अपमान । अनुचित दारुण रावणें केलें ॥२१॥
जरी स्वधर्मे राज्य करिता । सर्वभूतीं दया समता ।
तयाच्या राज्या क्षयो कल्पांता । न येता तत्वता निर्धारें ॥२२॥
जनकादिका केवळ मुक्त । आसोनि प्रपंचीं वर्तत ।
जगत् ब्रह्मस्वरुप देखत । मुळींचें अन्वयेंकरोनी ॥२३॥
तरीं तूं बिभीषणा अवधारीं । तूं राज्य ब्रह्मत्वें करीं ।
अधर्माचा लेश पुरी । माजि प्रवेशों न घ्यावा ॥२४॥
बंधु ज्येष्ठ तुझा कुबेर । तयाचा करावा आदर ।
आणीक वृद्ध थोर थोर । ते ब्रह्मदृष्टीं पहावे ॥२५॥
मज तुम्ही दोघे जण । परम प्रीतिमात्र पढियंते पूर्ण ।
तुमचें मी अहर्निशीं स्मरण । मनामाजीं करीतसें ॥२६॥
आतां तुम्हीं दोघे जण । स्वसैन्येंसीं करावे गमन ।
सांडा हृदयीचें दुःख दारुण । परमानंदें पूर्ण पैं जावें ॥२७॥
ऐकोनि श्रीरघुनाथाचें वचन । ऋक्ष वानर राक्षसगण ।
म्हणते झाले धन्य धन्य । सूर्यवंशाभरण श्रीराम ॥२८॥
समस्त म्हणती रावणारी । तुझिया वचनामृताची तरी ।
भरली आमुच्या हृदयसागरीं । मर्यादेवेगळी मिसळली ॥२९॥
तुझें वचन ब्रह्मलिखित । तूं विधात्याचा विधाता निश्चित ।
तूं ब्रह्म सदोदित । श्रुतीतें अंत न कळे तुझा ॥३०॥

मारुतीची प्रार्थना :

तदनंतर मारुती । स्वामीप्रति करी विनंती ।
म्हणे प्रसन्न झालेती रघुपती । तरी मी एक मागतसें ॥३१॥
तुझी कृपा मजवरी । जरी आहे गा रावणारी ।
तरी तुझी भक्ति मम हृदयाभीतरीं । चिरकाळ राहो दातारा ॥३२॥
जंववरी तुझें चरित्र । भूमंडळीं राहे निश्चित ।
तंववरी माझ्या शरीरांत । प्राण राहो दातारा ॥३३॥
तुझें कथेचीं आर्ती । अखंड राहो माझ्या चित्तीं ।
आणीक मी न मागें रघुपती । इतुकें देईं दातारा ॥३४॥
ऐकोनि हनुमंतमुखींची गोष्टी । श्रीरामासि आनंद पोटीं ।
धांवोनि खेंवा दिधली मिठी । पाठी थापटी श्रीराम ॥३५॥

रामांचे वरदान :

श्रीराम म्हणे गा मारुती । संतोषलों तुझिये भक्ती ।
जे जे अपेक्षा तुझे चित्तीं । ते ते त्रिशुद्धी पावसी ॥३६॥
लोकालोक जंवपर्यंत माझे चरित्र ।
जोंपर्यंत जन स्वधर्मीं रत । तंवपर्यंत कथा असे ॥३७॥
माझी कथा हे भूमंडळीं । तंववरी तुझे हृदयस्थळीं ।
असतील जंव अंतराळीं । शशी सूर्य भ्रमण करित ॥३८॥
दिव्य रत्नांचा हार । चंद्रासारिखा मनोहर ।
श्रीरामें काढोनि सत्वर । हनुम्याकंठीं घातला ॥३९॥

रामांचा निरोप घेऊन जड अंतःकरणाने सर्वजण निघाले :

हनुमान लागला पायीं । सवेंचि आलिंगिली दोहीं बाहीं ।
श्रीरामप्रदक्षिणा करोनि वज्रदेही । निजस्थळासी निघाला ॥४०॥
सुग्रीवें करोनि प्रदक्षिण । अंगदासहित वंदोनि चरण ।
निघते झाले स्वराज्या जाण । आज्ञा घेवोन रामाची ॥४१॥
बिभीषणेंही तैसेच परी । नमस्कारिला निजबंधूचा अरी ।
समस्तां अश्रु आले ते अवसरीं । सद्गदित कंठ पैं झाले ॥४२॥
जैसें मूर्खाचें भ्रमे चित्त । भ्रांत होय न स्मरे हित ।
तैसे श्रीरामवियोगें अति दुःखित । आपुलाले दिशे चालले ॥४३॥
जैसा कृपणाचा जाय ठेवा । आणि भ्रांति उपजे त्याच्या जीवा ।
तैसें समस्तां झालें तेव्हां । श्रीरामाच्य वियोगें ॥४४॥
श्रीरामसन्निधानेंकरुन । पावन झाले ऋक्षवानरगण ।
बिभीषणादि राक्षस जाण । झाले पावन तिहीं लोकीं ॥४५॥
एका जनार्दना शरण । वानरीं स्वदेशा केलें गमन ।
मागें श्रीरामें सभा विसर्जून । केलें मध्यान्हभोजन ॥४६॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे उत्तरकांडे एकाकारटीकायां
समस्तवानरादिस्वदेशगमनं नाम चत्वारिंशोऽध्यायः ॥४०॥ ओंव्या ॥४६॥

GO TOP