श्रीमद् वाल्मीकि रामायणे
बालकाण्डे
। द्वादशः सर्गः ।
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

राज्ञ ऋषीन् प्रति यज्ञं कारयितुं प्रस्तावः, ऋषीभी राजानं प्रति राज्ञा चामात्यान् प्रति यज्ञसमग्रीसंभरणायादेशदानम् - राजाचा ऋषिंना यज्ञ करणासाठी प्रस्ताव, ऋषिंचा राजाला आणि राजाचा मंत्र्यांना यज्ञाची आवश्यक तयारी करण्यासाठी आदेश देणे -
ततः काले बहुतिथे कस्मिंश्चित् सुमनोहरे ।
वसन्ते समनुप्राप्ते राज्ञो यष्टुं मनोऽभवत् ॥ १ ॥
त्यानंतर बराच काळ लोटल्यावर एक परम मनोहर व कार्यारंभासाठी दोषरहित शुभसमय प्राप्त झाला. त्यावेळी वसंत ऋतूचा प्रारंभ झाला होता. राजा दशरथांनी त्याच शुभ समयी यज्ञाचा आरंभ करण्याचा विचार केला. ॥ १ ॥
ततः प्रणम्य शिरसा तं विप्रं देववर्णिनम् ।
यज्ञाय वरयामास सन्तानार्थं कुलस्य च ॥ २ ॥
तत्पश्चात् त्यांनी देवोपम कान्ति असण्यार्‍या विप्रवर ऋष्यशृंगांना मस्तक नमवून प्रणाम केला आणि वंशपरंपरेचे रक्षण करण्यासाठी पुत्र-प्राप्ति निमित्त यज्ञ करविण्याच्या उद्देशाने त्यांचे वरण केले. ॥ २ ॥
तथेति च स राजानमुवाच वसुधाधिपम् ।
सम्भाराः सम्भ्रियन्तां ते तुरगश्च विमुच्यताम् ॥ ३ ॥

सरय्वाचोत्तरे तीरे यज्ञभूमिर्विधीयताम् ।
ऋष्यशृंगांनी 'फार चांगले' असे म्हणून त्यांच्या प्रार्थनेचा स्वीकार केला आणि त्या पृथ्वीपति नरेशांना म्हटले, "राजन् ! यज्ञाची सामग्री एकत्रित करवावी. भूमण्डलात भ्रमण करण्यासाठी आपला यज्ञसंबंधी अश्व सोडण्यात यावा आणि शरयूच्या उत्तर तटावर यज्ञभूमीची निर्मीति केली जावी.' ॥ ३ १/२ ॥
ततो‍ऽब्रविन्नृपो वाक्यं ब्राह्मणान् वेदपारगान् ॥ ४ ॥

सुमन्त्रावाहय क्षिप्रमृत्विजो ब्रह्मवादिनः ।
सुयज्ञं वामदेवं च जाबालिमथ काश्यपम् ॥ ५ ॥

पुरोहितं वसिष्ठं च ये चान्ये द्विजसत्तमाः ।
तेव्हां राजा सुमंत्रास म्हणाले - "सुमंत्र ! तुम्ही तात्काळ वेदविद्येत पारंगत ब्राह्मणांना आणि ब्रह्मवादी ऋत्विजांना बोलावून घ्यावे. सुयज्ञ, वामदेव, जाबालि, काश्यप, पुरोहित वसिष्ठ आणि अन्य जे श्रेष्ठ ब्राह्मण आहेत त्या सर्वांना बोलावून घ्या." ॥ ४-५ १/२ ॥
ततः सुमन्त्रस्त्वरितं गत्वा त्वरितविक्रमः ॥ ६ ॥

समानयत् स तान् सर्वान् समस्तान् वेदपारगान् ।
तेव्हां शीघ्रगामी सुमंत्राने तात्काळ जाऊन वेदविद्येच्या पारगामी समस्त ब्राह्मणांना बोलावून आणले. ॥ ६ १/२ ॥
तान् पूजयित्वा धर्मात्मा राजा दशरथस्तदा ॥ ७ ॥

धर्मार्थसहितं युक्तं श्लक्ष्णं वचनमब्रवीत् ।
धर्मात्मा राजा दशरथांनी त्या सर्वांचे पूजन केले आणि त्यांना उद्देशून ते धर्म आणि अर्थाने युक्त मधुर वचन बोलले - ॥ ७ १/२ ॥
मम तातप्यमानस्य पुत्रार्थं नास्ति वै सुखम् ॥ ८ ॥

पुत्रार्थं हयमेधेन यक्ष्यामीति मतिर्मम ।
महर्षिंनो ! मी पुत्रासाठी निरंतर संतप्त राहात असतो. पुत्राशिवाय या राज्य वैभवादि पासून मला सुख मिळत नाही. म्हणून मी हा विचार केला आहे की पुत्र प्राप्तिसाठी अश्वमेध यज्ञाचे अनुष्ठान करावे. ॥ ८ १/२ ॥
तदहं यष्टुमिच्छामि शास्त्रदृष्टेन कर्मणा ॥ ९ ॥

ऋषिपुत्रप्रभावेण कामान् प्राप्स्यामि चाप्यहम् ।
या संकल्पास अनुसरून मी अश्वमेध यज्ञाचा आरंभ करू इच्छितो. मला विश्वास आहे की ऋषिपुत्र ऋष्यशृंगांच्या प्रभावाने मी आपल्या सर्व कामनांची पूर्ति करू शकेन. ॥ ९ १/२ ॥
ततः साध्विति तद्वाक्यं ब्राह्मणाः प्रत्यपूजयन् ॥ १० ॥

वसिष्ठप्रमुखाः सर्वे पार्थिवस्य मुखाच्च्युतम् ।
राजा दशरथांच्या मुखातून निघालेल्या या वचनांची वसिष्ठा आदि सर्व ब्राह्मणांनी 'साधु साधु' म्हणून मोठी प्रशंसा केली. ॥ १० १/२ ॥
ऋष्यशृङ्‍गपुरोगाश्च प्रत्यूचुर्नृपतिं तदा ॥ ११ ॥

सम्भाराः सम्भ्रियन्तां ते तुरगश्च विमुच्यताम् ।
सरय्वाचोत्तरे तीरे यज्ञभूमिर्विधीयताम् ॥ १२ ॥
यानंतर ऋष्यशृंग आदि सर्व महर्षिंनी राजा दशरथास पुन्हा असे सांगितले - "महाराज ! यज्ञसामग्रीचा संग्रह केला जावा. यज्ञसंबंधी अश्व सोडला जावा आणि शरयूच्या उत्तर तटावर यज्ञभूमिची निर्मिती केली जावी. ॥ १२ ॥
सर्वथा प्राप्स्यसे पुत्रांश्चतुरोऽमितविक्रमान् ।
यस्य ते धार्मिकी बुद्धिरियं पुत्रार्थमागता ॥ १३ ॥
'तुम्ही यज्ञद्वारा चार अमित पराक्रमी पुत्र प्राप्त कराल कारण, पुत्रासाठी तुमच्या मनात अशा धार्मिक विचारांचा उदय झाला आहे." ॥ १३ ॥
ततः प्रीतोऽभवद् राजा श्रुत्वा तु द्विजभाषितम् ।
अमात्यानब्रवीद् राजा हर्षेणेदं शुभाक्षरम् ॥ १४ ॥
ब्राह्मणांचे हे म्हणणे ऐकून राजाला अत्यंत प्रसन्नता वाटली. त्यांनी मोठ्या आनंदाने आपल्या मंत्र्यांना ही शुभ वार्ता सांगितली. ॥ १४ ॥
गुरूणां वचनाच्छीघ्रं सम्भाराः सम्भ्रियन्तु मे ।
समर्थाधिष्ठितश्चाश्वः सोपाध्यायो विमुच्यताम् ॥ १५ ॥
"गुरुजनांच्या आज्ञेनुसार तुम्ही शीघ्रच माझ्यासाठी यज्ञाची सामग्री जमवा. शक्तिशाली वीरांच्या संरक्षणात यज्ञीय अश्व सोडला जाऊ दे आणि त्याच्याबरोबर प्रधान ऋत्विज्‌ही असावेत. ॥ १५ ॥
सरय्वाश्चोत्तरे तीरे यज्ञभूमिर्विधीयताम् ।
शान्तयश्चाभिवर्धन्तां यथाकल्पं यथाविधि ॥ १६ ॥
'शरयूच्या उत्तर तटावर यज्ञभूमिची निर्मिति व्हावी. शास्त्रोक्त विधिच्या अनुसार क्रमशः शान्तिकर्म, पुण्याहवाचन आदिंचे विस्तारपूर्वक अनुष्ठान केले जावे ज्यायोगे विघ्नांचे निवारण होईल. ॥ १६ ॥
शक्यः कर्तुमयं यज्ञः सर्वेणापि महीक्षिता ।
नापराधो भवेत् कष्टो यद्यस्मिन् क्रतुसत्तमे ॥ १७ ॥
'जर या श्रेष्ठ यज्ञात कष्टप्रद अपराध होण्याचे भय नसेल तर सर्व राजे याचे संपादन करू शकतात. ॥ १७ ॥
छिद्रं हि मृगयन्त्येते विद्वांसो ब्रह्मराक्षसाः ।
विधिहीनस्य यज्ञस्य सद्यः कर्ता विनश्यति ॥ १८ ॥
परंतु असे होणे कठीण आहे कारण, विद्वान ब्रह्मराक्षस यज्ञात विघ्न आणण्यासाठी दोष शोधत असतात. विधिहीन यज्ञाचे अनुष्ठान करणारा यजमान तात्काळ नष्ट होऊन जातो. ॥ १८ ॥
तद् यथा विधिपूर्वं मे क्रतुरेष समाप्यते ।
तथा विधानं क्रियतां समर्थाः करणेष्विह ॥ १९ ॥
'म्हणून माझा हा यज्ञ ज्याप्रकारे विधिपूर्वक संपन्न होऊ शकेल असा उपाय केला जावा. तुमी सर्वजण असे साधन प्रस्तुत करण्यास समर्थ आहात." ॥ १९ ॥
तथेति च ततः सर्वे मन्त्रिणः प्रत्यपूजयन् ।
पार्थिवेन्द्रस्य तद्वाक्यं यथाज्ञप्तमकुर्वत ॥ २० ॥
तेव्हां 'फार चांगले' असे म्हणून सर्व मंत्र्यांनी राजराजेश्वर दशरथांच्या आज्ञेचा आदर केला आणि त्यास अनुसरून सर्व व्यवस्था केली. ॥ २० ॥
ततो द्विजास्ते धर्मज्ञमस्तुवन् पार्थिवर्षभम् ।
अनुज्ञातास्ततः सर्वे पुनर्जग्मुर्यथागतम् ॥ २१ ॥
तत्पश्चात् ब्राह्मणांनीही धर्मज्ञ नृपश्रेष्ठ दशरथांची प्रशंसा केली आणि त्यांची आज्ञा घेऊन ते सर्व जसे आले होते तसे निघून गेले. ॥ २१ ॥
गतेषु तेषु विप्रेषु मंत्रिणस्तान् नराधिपः ।
विसर्जयित्वा स्वं वेश्म प्रविवेश महामतिः ॥ २२ ॥
सर्व ब्राह्मण निघून गेल्यावर मंत्र्यांनाही निरोप देऊन महाबुद्धिमान नरेश आपल्या महालात गेले. ॥ २२ ॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् बालकाण्डे द्वादशः सर्गः ॥ १२ ॥
या प्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यातील बालकाण्डाचा बारावा सर्ग समाप्त झाला. ॥ १२ ॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP