[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीमद् वाल्मीकि रामायणे
अयोध्याकाण्डे
। चतुरशीतितमः सर्गः ।
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
स्वबंधून् नदीसंरक्षणाय युद्धार्थमुद्यमाय चादिश्य गुहेनोपहारवस्तून्यादाय भरतस्य समीपे गमनं तं प्रत्यातिथ्यं स्वीकर्तुमनुरोधश्च -
निषादराज गुहाचे आपल्या बंधुंना नदिचे रक्षण करीत युद्धासाठी तैयार राहाण्याचा आदेश देऊन भेटीची सामग्री घेऊन भरताजवळ जाणे आणि त्यांनी आतिथ्य स्वीकारावे म्हणून अनुरोध करणे -
ततो निविष्टां ध्वजिनीं गङ्‌गामन्वाश्रितां नदीम् ।
निषादराजो दृष्ट्‍वैव ज्ञातीन् स परितोऽब्रवीत् ॥ १ ॥
तिकडे निषादराज गुहाने गंगानदीच्या तटावर उतरलेल्या भरताच्या सेनेला पाहून सर्व बाजूस बसलेल्या आपल्या बंधुबांधवांना म्हटले - ॥१॥
महतीयमितः सेना सागराभा प्रदृश्यते ।
नास्यान्तमवगच्छामि मनसापि विचिन्तयन् ॥ २ ॥
’बंधुंनो ! या बाजूस ही जी विशाल सेना उतरली आहे ती समुद्राप्रमाणे अपार दिसून येत आहे, मी मनाने बराच विचार करुनही तिचा पार पावू शकत नाही. ॥२॥
यदा तु खलु दुर्बुद्धिर्भरतः स्वयमागतः ।
स एष हि महाकायः कोविदारध्वजो रथे ॥ ३ ॥
’निश्चितच यात दुर्बुद्धी भरतही आलेला आहे, ही कोविदार चिह्नाची विशाल ध्वजा त्याच्याच रथावर फडकत राहिली आहे. ॥३॥
बन्धयिष्यति वा पाशैरथ वाऽस्मान् वधिष्यति ।
अनु दाशरथिं रामं पित्रा राज्याद् विवासितम् ॥ ४ ॥
’मला वाटते की हा आपल्या मंत्र्यांकडून प्रथम आपल्याला पाशांत बांधून ठेवील अथवा आपला वध करून टाकील आणि नंतर ज्यांना पित्याने राज्यांतून घालवून दिले आहे त्या दाशरथि रामांनाही मारून टाकील. ॥४॥
संपन्नां श्रियमन्विच्छंस्तस्य राज्ञः सुदुर्लभाम् ।
भरतः कैकयीपुत्रो हन्तुं समधिगच्छति ॥ ५ ॥
’कैकेयीचा पुत्र भरत राजा दशरथांच्या संपन्न आणि सुदुर्लभ राजलक्ष्मीला एकटाच हडप करू इच्छित आहे, म्हणून तो श्रीरामांना वनांत ठार मारण्यासाठीच जात आहे. ॥५॥
भर्त्ता चैव सखा चैव रामो दाशरथिर्मम ।
तस्यार्थकामाः सन्नद्धा गङ्‌गानूपेऽत्र तिष्ठत ॥ ६ ॥
’परंतु दाशरथि राम माझे स्वामी आणि सखा आहेत; म्हणून त्यांच्या हिताची कामना ठेवून तुम्ही सर्व लोक अस्त्राशस्त्रांनी सुसज्जित होऊन येथे गंगेच्या तटावर हजर रहा. ॥६॥
तिष्ठन्तु सर्वदाशाश्च गङ्‌गामन्वाश्रिता नदीम् ।
बलयुक्ता नदीरक्षा मांसमूलफलाशनाः ॥ ७ ॥
’सर्व नावाडी सेनेसह नदीचे रक्षण करीत गंगेच्या तटावरच उभे रहा आणि नावेवर ठेवलेल्या फल-मूल आदिच्या आहार करूनच आजची रात्र घालवू देत. ॥७॥
नावां शतानां पञ्चानां कैवर्तानां शतं शतम् ।
सन्नद्धानां तथा यूनां तिष्ठन्त्वित्यभ्यचोदयत् ॥ ८ ॥
’आमच्याजवळ पाचशे नावा आहेत; त्यांतील एकेका नावेवर नावाड्यांचे शंभर शंभर युवक युद्ध सामग्रीने सुसज्जित होऊन बसून राहू देत.’ याप्रकारे गुहाने सर्वांना आदेश दिला. ॥८॥
यदा तुष्टस्तु भरतो रामस्येह भविष्यति ।
सेयं स्वस्तिमती सेना गङ्‌गामद्य तरिष्यति ॥ ९ ॥
त्याने परत म्हटले की ’जर येथे भरताचा भाव श्रीरामांच्या प्रति संतोषजनक असेल तरच त्याची ही सेना आज कुशलतापूर्वक गंगापार जाऊ शकेल.’ ॥९॥
इत्युक्त्वोपायनं गृह्य मत्स्यमांसमधूनि च ।
अभिचक्राम भरतं निषादाधिपतिर्गुहः ॥ १० ॥
असे म्हणून निषादराज गुह मत्स्यण्डी (मिश्री)(येथे मूळात ’मत्स्य’ शब्द ’मत्स्यण्डी’ अर्थात मिश्रीचा वाचक आहे. ’मत्स्यण्डी’ या नामाचा एक अंश ’मत्स्य’ आहे म्हणून नामाच्या एक अंशाच्या ग्रहणाने संपूर्ण नामाचे ग्रहण केले गेले आहे. ), फळांचा गर आणि मध आदि भेटीची सामग्री घेऊन भराताजवळ गेला. ॥१०॥
तमायान्तं तु सम्प्रेक्ष्य सूतपुत्रः प्रतापवान् ।
भरतायाचचक्षेऽथ समयज्ञो विनीतवत् ॥ ११ ॥
त्याला येताना पाहून समयोचित कर्तव्याला समजणार्‍या प्रतापी सूतपुत्र सुमंत्रांनी विनीतवत भरतास म्हटले- ॥११॥
एष ज्ञातिसहस्रेण स्थपतिः परिवारितः ।
कुशलो दण्डकारण्ये वृद्धो भ्रातुश्च ते सखा ॥ १२ ॥

तस्मात् पश्यतु काकुत्स्थ त्वां निषादाधिपो गुहः ।
असंशयं विजानीते यत्र तौ रामलक्ष्मणौ ॥ १३ ॥
’काकुस्थ ! हा वृद्ध निषादराज गुह आपल्या हजारो बंधु-बांधवासह येथे निवास करीत आहे. तो तुमचे मोठे बंधु श्रीराम यांचा सखा आहे. याला दण्डकारण्याच्या मार्गाची विशेष माहिती आहे. निश्चितच त्याला पत्ता असेल की दोघे भाऊ राम-लक्ष्मण कोठे आहेत, म्हणून निषादराज गुह येथे येऊन तुम्हांला भेटेल यासाठी अवसर द्यावा’. ॥१२-१३॥
एतत् तु वचनं श्रुत्वा सुमन्त्राद् भरतः शुभम् ।
उवाच वचनं शीघ्रं गुहः पश्यतु मामिति ॥ १४ ॥
सुमंत्राच्या मुखाने हे शुभवचन ऐकून भरतांनी म्हटले - ’ निषादराज गुह मला त्वरित भेटतील- अशी व्यवस्था केली जावी. ’ ॥१४॥
लब्ध्वानुज्ञां सम्प्रहृष्टो ज्ञातिभिः परिवारितः ।
आगम्य भरतं प्रह्वो गुहो वचनमब्रवीत् ॥ १५ ॥
भेटण्याची अनुमती मिळताच गुह आपल्या बंधु-बांधवांच्या सह प्रसन्नतापूर्वक तेथे आला आणि भरतास भेटून अत्यंत नम्रतेने म्हणाला- ॥१५॥
निष्कुटश्चैव देशोऽयं वञ्चिताश्चापि ते वयम् ।
निवेदयाम ते सर्वं स्वके दाशगृहे वस ॥ १६ ॥
’हा वन-प्रदेश आपल्यासाठी घरात लावलेल्या बगीच्याप्रमाणे आहे. आपण आपल्या आगमनाची सूचना न देता आम्हाला धोक्यात ठेवून दिले- आम्ही आपल्या स्वागताची काहीही तयारी करू शकलो नाही. आमच्या जवळ जे काही आहे ते सर्व आपल्या सेवेत अर्पित आहे. हे निषादांचे घर आपलेच आहे, आपण येथे सुखपूर्वक निवास करावा. ॥१६॥
अस्ति मूलफलं चैतन्निषादैः स्वयमर्जितम् ।
आर्द्रं शुष्कं तथा मांसं वन्यं चोच्चावचं तथा ॥ १७ ॥
’हे फल-मूल आपल्या सेवेत प्रस्तुत आहे. यांना निषाद लोकांनी स्वतः तोडून आणले आहे. यांतील काही फळे तर आता ताजी आहेत आणि काही सुकून गेलेली आहेत. यांच्या बरोबर तयार केलेला फळांचा गरही आहे. या सर्वांशिवाय नाना प्रकारचे दुसरे वन्य पदार्थही आहेत. हे सर्व ग्रहण करावे. ॥१७॥
आशंसे स्वाशिता सेना वत्स्यत्येनां विभावरीम् ।
अर्चितो विविधैः कामैः श्वः ससैन्यो गमिष्यसि ॥ १८ ॥
’आम्ही आशा करतो की ही सेना आजची रात्र येथेच थांबून राहील आणि आम्ही दिलेले भोजन स्वीकार करील. नाना प्रकारच्या मनोवाञ्छित वस्तूंनी आज आम्ही सेनासहित आपला सत्कार करू. नंतर उद्या सकाळी आपण आपल्या सैनिकांसह येथून अन्यत्र जावे.’ ॥१८॥
इत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीये आदिकाव्येऽयोध्याकाण्डे चतुरशीतितमः सर्गः ॥ ८४ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यातील अयोध्याकाण्डाचा चौर्‍यांशीवा सर्ग पूरा झाला. ॥८४॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP