श्रीमद् वाल्मीकि रामायणे
बालकाण्डे
। सप्तमः सर्गः ।
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

राजामात्यानां गुणानां नीतेश्च वर्णनम् - राजमंत्र्यांच्या गुण व नीतिचे वर्णन -
तस्यामात्या गुणैरासन्निक्ष्वाकोः सुमहात्मनः ।
मन्त्रज्ञाश्चेङ्‌‍गितज्ञाश्च नित्यं प्रियहिते रताः ॥ १ ॥

अष्टौ बभूवुर्वीरस्य तस्यामात्या यशस्विनः ।
शुचयश्चानुरक्ताश्च राजकृत्येषु नित्यशः ॥ २ ॥
इक्ष्वाकुवंशी वीर महात्मा महाराज दशरथांचे मंत्री जनोचित गुणांनी संपन्न आठ मंत्री होते. ते सर्व मंत्र्याचे तत्त्व जाणणारे आणि मनुष्याचे बाह्य वर्तन पाहूनच त्याच्या अंतरीचे भाव जाणणारे होते. ते सदाच राजाचे प्रिय आणि हित करण्यातच प्रयत्‍नशील होते, म्हणून त्यांचे यश खूप पसरले होते. ते सर्वच शुद्ध आचारा विचारांनी युक्त होते आणि राजकीय कार्यात निरंतर संलग्न राहात असत. ॥ १-२ ॥
धृष्टिर्जयन्तो विजयः सुराष्ट्रो राष्ट्रवर्धनः ।
अकोपो धर्मपालश्च सुमंत्रश्चाष्टमोऽर्थवित् ॥ ३ ॥
त्यांची नावे या प्रमाणे होती - धृष्टि, जयंत, विजय, सुराष्ट्र, राष्ट्रवर्धन, अकोप, धर्मपाल आणि आठवे सुमंत्र, जे अर्थशास्त्राचे ज्ञाते होते. ॥ ३ ॥
ऋत्विजौ द्वावभिमतौ तस्यास्तामृषिसत्तमौ ।
वसिष्ठो वामदेवश्च मन्त्रिणश्च तथाऽपरे ॥ ४ ॥

सुयज्ञोऽप्यथ जाबालिः काश्यपोऽप्यथ गौतमः ।
मार्कण्डेयस्तु दीर्घायुस्तथा कात्यायनो द्विजः ॥ ५ ॥
ऋषिंमध्ये श्रेष्ठतम वसिष्ठ आणि वामदेव, हे दोन्ही राजाचे माननीय ऋत्विज (पुरोह्त) होते. याशिवाय सुयज्ञ, जाबालि, काश्यप, गौतम्, दीर्घायु मार्कण्डेय आणि विप्रवर कात्यायन देखील महाराजांचे मंत्री होते. ॥ ४-५ ॥
एतैर्ब्रह्मर्षिभिर्नित्यमृत्विजस्तस्य पौर्वकाः ।
विद्याविनीता ह्रीमन्तः कुशला नियतेन्द्रियाः ॥। ६ ॥

श्रीमन्तश्च महात्मानः शास्त्रज्ञा दृढविक्रमाः ।
कीर्तिमन्तः प्रणिहिता यथावचनकारिणः ॥ ७

तेजःक्षमायशःप्राप्ताः स्मितपूर्वाभिभाषिणः ।
क्रोधात् कामार्थहेतोर्वा न ब्रूयुरनृतं वचः ॥ ८ ॥
या ब्रह्मर्षिंच्या बरोबरच राजाचे पूर्वपरंपरागत ऋत्विजही सदा मंत्र्यांचे कार्य करीत असत. ते सर्वच्या सर्व विद्वान असल्याने विनयशील, सलज्ज, कार्यकुशल, जितेन्द्रिय, श्रीसंपन्न, महात्मा, शस्त्र विद्येचे ज्ञाते, सुदृढ, पराक्रमी, यशस्वी, समस्त कार्यात सावधान, राजाच्या आज्ञेस अनुसरून कार्य करणारे, तेजस्वी, क्षमाशील, कीर्तिमान तथा प्रसन्न राहून संभाषण करणारे होते. ते कधीही काम, क्रोध अथवा स्वार्थाला वश होऊन खोटे बोलत नसत. ॥ ६-८ ॥
तेषामविदितं किञ्चित् स्वेषु नास्ति परेषु वा ।
क्रियमाणं कृतं वापि चारेणापि चिकीर्षितम् ॥ ९ ॥
आपल्या अथवा शत्रुपक्षाच्या राजांची कुठलीही गोष्ट त्यांच्यापासून लपून राहू शकत नसे. इतर राजे काय करीत आहेत, काय करून चुकले आहेत, आणि काय करू इच्छितात - या सर्व गोष्टी गुप्तचरांच्या द्वारा त्यांना ज्ञात होत असे. ॥ ९ ॥
कुशला व्यवहारेषु सौहृदेषु परीक्षिताः ।
प्राप्तकालं यथा दण्डं धारयेयुः सुतेष्वपि ॥ १० ॥
ते सर्व व्यवहारकुशल होते. त्यांच्या सौहार्दाची अनेक वेळा परीक्षा घेण्यात आली होती. तसाच प्रसंग आला तर आपल्या पुत्रालाही उचित दण्ड करण्यास ते कधी मागेपुढे पाहात नसत. ॥ १० ॥
कोशसङ्‌ग्रहणे युक्ता बलस्य च परिग्रहे ।
अहितं चापि पुरुषं न हिंस्युरविदूषकम् ॥ ११ ॥
कोषाचा संचय आणि चतुरंगिणी सेनेच्या संग्रहात ते सदा प्रयत्‍नशील असत. शत्रूनेही जर अपराध केला नसेल तर ते त्याची हिंसा करत नसत. ॥ ११ ॥
वीराश्च नियतोत्साहा राजशास्त्रमनुष्ठिताः ।
शुचीनां रक्षितारश्च नित्यं विषयवासिनाम् ॥ १२ ॥
त्या सर्वांमध्ये सदा शौर्य आणि उत्साह ओसंडत असे. ते राजनितिस अनुसरून कार्य करीत आणि आपल्या राज्यात राहणार्‍या सत्पुरुषांचे सदा रक्षण करीत असत. ॥ १२ ॥
ब्रह्मक्षत्रमहिन्सन्तस्ते ते कोशं समपूरयन् ।
सुतीक्ष्णदण्डाः सम्प्रेक्ष्य पुरुषस्य बलाबलम् ॥ १३ ॥
ब्राह्मणांना आणि क्षत्रियांना वृथा कष्ट न देता ते न्यायोचित धनाने राजाचा खजिना भरत असत. ते अपराधी पुरुषाचे बलाबल पाहून त्याच्या प्रति तीक्ष्ण अथवा मृदु दण्डाचा प्रयोग करीत असत. ॥ १३ ॥
शुचीनामेकबुद्धीनां सर्वेषां सम्प्रजानताम् ।
नासीत्पुरे वा राष्ट्रे वा मृषावादी नरः क्वचित् ॥ १४ ॥

कश्चिन्न दुष्टस्तत्रासीत् परदाररतिर्नरः ।
प्रशान्तं सर्वमेवासीद् राष्ट्रं पुरवरं च तत् ॥ १५ ॥
त्या सर्वांचे भाव शुद्ध आणि विचार एकसारखे होते. त्यांच्या माहितीप्रमाणे अयोध्यापुरीत अथवा कोसल राज्याच्या अंतर्गत एकही मनुष्य मिथ्यावादी, दुष्ट आणि परस्त्रीलम्पट नव्हता. संपूर्ण राष्ट्रात आणि नगरात पूर्ण शान्तिचे साम्राज्य होते. ॥ १४-१५ ॥
सुवाससः सुवेषाश्च ते च सर्वे सुचिव्रताः ।
हितार्थश्च नरेन्द्रस्य जाग्रतो नयचक्षुषा ॥ १६ ॥
त्या मंत्र्यांची वस्त्रे व वेष स्वच्छ आणि सुंदर होते. ते उत्तम व्रताचे पालन करणारे आणि राजाचे हितैषी होते. नीतिरूप नेत्रांनी पाहून ते सदा सावधान राहात असत. ॥ १६ ॥
गुरोर्गुणगृहीताश्च प्रख्याताश्च पराक्रमैः ।
विदेशेष्वपि विज्ञाताः सर्वतो बुद्धिनिश्चयाः ॥ १७ ॥
आपल्या गुणांच्यामुळे ते सर्व मंत्री गुरुतुल्य समादरणीय राजाचे अनुग्रहपात्र होते. आपल्या पराक्रमामुळे त्यांची सर्वत्र ख्याती होती. विदेशातही सर्व लोक त्यांना जाणत होते. ते सर्व बाबतीत बुद्धिद्वारा उत्तम प्रकारे विचार करूनच कुठल्याही निश्चयाप्रत पोहोचत असत. ॥ १७ ॥
अभितो गुणवन्तश्च न चासन् गुणवर्जिताः ।
संधिविग्रहतत्त्वज्ञाः प्रकृत्या सम्पदान्विताः ॥ १८
समस्त देशात आणि कालात ते गुणवानच सिद्ध होत असत. संधि आणि विग्रहाचा उपयोग आणि अवसर यांचे त्यांना उत्तम ज्ञान होते. ते स्वभावानेच संपत्तीशाली (दैवी संपत्तीने युक्त) होते. ॥ १८ ॥
मन्त्रसंवरणे शक्ताः शक्ताः सूक्ष्मासु बुद्धिषु ।
नीतिशास्त्रविशेषज्ञाः सततं प्रियवादिनः ॥ १९ ॥
त्यांच्यामध्ये राजकीय मंत्रणेला गुप्त ठेवण्याची पूर्ण शक्ति होती. ते सूक्ष्म विषयाचा विचार करण्यात कुशल होते. नीतिशास्त्राचे त्यांना विशेष ज्ञान होते आणि ते सदाच प्रिय वाटणारे संभाषण करीत असत. ॥ १९ ॥
ईदृशैस्तैरमात्यैश्च राजा दशरथोऽनघः ।
उपपन्नो गुणोपेतैरन्वशासद् वसुन्धराम् ॥ २० ॥
अशा गुणवान मंत्र्यांच्या बरोबर राहून निष्पाप राजा दशरथ त्या भूमण्डलाचे शासन करीत होते. ॥ २० ॥
अवेक्ष्यमाणश्चारेण प्रजा धर्मेण रक्षयन् ।
प्रजानां पालनं कुर्वन्नधर्मं परिवर्जयन् ॥ २१ ॥
ते गुप्तचरांच्या द्वारे आपल्या आणि शत्रु राज्यातील वृत्तांतावर (घडामोडीवर) दृष्टी ठेवीत असत. प्रजेचे धर्मपूर्वक पालन करीत होते आणि प्रजापालन करीत असता अधर्मापासून दूरच राहात असत. ॥ २१ ॥
विश्रुतस्त्रिषु लोकेषु वदान्यः सत्यसंगरः ।
स तत्र पुरुषव्याघ्रः शशास पृथिवीमिमाम् ॥ २२ ॥
त्यांची तिन्ही लोकात प्रसिद्धि होती. ते उदार आणि सत्यप्रतिज्ञ होते. पुरुषसिंह राजा दशरथ अयोध्येतच राहून पृथ्वीचे शासन करीत होते. ॥ २२ ॥
नाध्यगच्छद्विशिष्टं वा तुल्यं वा शत्रुमात्मनः ।
मित्रवान्नतसामन्तः प्रतापहतकण्टकः ।
स शशास जगद् राजा दिवं देवपतिर्यथा ॥ २३ ॥
त्यांना कधी आपल्याहून मोठा अथवा आपल्या तोडीचाही शत्रु भेटला नाही. त्यांच्या मित्रांची संख्या पुष्कळ होती. सर्व सामन्त त्यांच्या चरणी मस्तक नमवीत होते. त्यांच्या प्रतापाने राज्यातले सारे कंटक (शत्रु तसेच चोर आदि) नष्ट झाले होते. ज्याप्रमाणे देवराज इंद्र स्वर्गात राहून तिन्ही लोकांचे पालन करतो, त्याप्रमाणे राजा दशरथ अयोध्येत राहून संपूर्ण जगताचे शासन करीत होते. ॥ २३ ॥
तैः मन्त्रिभिर्मन्त्रहितेनिविष्टै-
     र्वृतोऽनुरक्तैः कुशलैः समर्थैः ।
स पार्थिवो दीप्तिमवाप युक्त-
      स्तेजोमयैः गोभिरिवोदितोऽर्कः ॥ २४ ॥
त्यांचे मंत्री मंत्रणेला गुप्त ठेवण्यात आणि राज्याचे हित साधण्यात संलग्न राहात असत. ते राजाच्या प्रति अनुरक्त, कार्यकुशल आणि शक्तिशाली होते. जसा सूर्य आपल्या तेजोमय किरणांसह उदित होऊन प्रकाशित होतो, त्याचप्रकारे दशरथ राजे त्या तेजस्वी मंत्र्यांनी घेरलेले असता फार शोभून दिसत असत. ॥ २४ ॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् बालकाण्डे सप्तमः सर्गः ॥ ७ ॥
या प्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यातील बालकाण्डाचा सातवा सर्ग समाप्त झाला. ॥ ७ ॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP