॥ श्रीमद् अध्यात्मरामायण ॥

॥ बालकाण्ड ॥

॥ द्वितीयः सर्गः ॥

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]


पार्वती उवाच
धन्यास्म्यनुगृहीतास्मि कृतार्थास्मि जगत्प्रभो ।
विच्छिन्नो मेऽस्तिसन्देहग्रन्थिर्भवदनुग्रहात् ॥ १ ॥
त्वन्मुखाद्‍गलितं रामतत्त्वामृतरसायनम् ।
पिबन्त्या मे मनो देव न तृप्यति भवापहम् ॥ २ ॥
श्रीरामस्य कथा त्वत्तः शृता संक्षेपतो मया ।
इदानीं श्रोतुमिच्छामि विस्तरेण स्फुटाक्षरम् ॥ ३ ॥
श्रीमहादेव उवाच
शृणु देवि प्रवक्ष्यामि गुह्याद्‍गुह्यतरं महत् ।
अध्यात्मरामचरितं रामेणोक्तं पुरा मम ॥ ४ ॥
तदद्य कथयिष्यामि शृणु तापत्रयापहम् ।
यच्छृत्वा मुच्यते जन्तुरज्ञानोत्थमहाभयात् ।
प्राप्नोति परमामृद्धिं दीर्घायुः पुत्रसन्ततिम् ॥ ५ ॥
भूमिर्भारेण मग्ना
     दशवदनमुखाशेषरक्षोगणानां
धृत्वा गोरूपमादौ
     दिविजमुनिजनैः साकमब्जासनस्य
गत्वा लोकं रुदन्ती
     व्यसनमुपगतं ब्रह्मणे प्राह सर्वं
ब्रह्मा ध्यात्वा मुहूर्तं
     सकलमपिहृदावेदशेषात्मकत्वात् ॥ ६ ॥
तस्मात्क्षीरसमुद्र
     तीरमगमद् ब्रह्माथ देवैर्वृतो
देव्या चाखिललोक
     हृत्स्थमजरं सर्वज्ञमीशं हरिम् ।
अस्तौषीच्छृतिसिद्ध-
     निर्मलपदैः स्तोत्रैः पुराणोद्‌भवै-
र्भक्त्या गद्‍गदया
     गिरातिविमलैरानन्दबाष्पैर्वृतः ॥ ७ ॥
ततः स्फुरत्सहस्रांशुसहस्रसदृशप्रभः ।
आविरासीद्धरिः प्राच्यां दिशां व्यपनयंस्तमः ॥ ८ ॥
कथंचिद्दृष्टवान्ब्रह्मा दुर्दर्शमकृतात्मनाम् ।
इन्द्रनीलप्रतीकाशं स्मितास्यं पद्मलोचनम् ॥ ९ ॥
किरीटहारकेयूरकुण्डलैः कटकादिभिः ।
विभ्राजमानं श्रीवत्सकौस्तुभप्रभयान्वितम् ॥ १० ॥
स्तुवद्‌भिः सनकाद्यैश्च पार्षदैः परिवेष्टितम् ।
शङ्‍खचक्रगदापद्मवनमालाविराजितम् ॥ ११ ॥
स्वर्णयज्ञोपवीतेन स्वर्णवर्णाम्बरेण च ।
श्रिया भूम्या च सहितं गरुडोपरि संस्थितम् ॥ १२ ॥
हर्षगद्‍गदया वाचा स्तोतुं समुपचक्रमे ॥ १३ ॥
ब्रह्मोवाच
नतोऽस्मि ते पदं देव प्राणबुद्धीन्द्रियात्मभिः ।
यच्चिन्त्यते कर्मपाशाद्धृदि नित्यं मुमुक्षुभिः ॥ १४ ॥
मायया गुणमय्या त्वं सृजस्यवसि लुम्पसि ।
जगत्तेन न ते लेप आनन्दानुभवात्मनः ॥ १५ ॥
तथा शुद्धिर्न दुष्टानां दानाध्ययनकर्मभिः ।
शुद्धात्मता ते यशसि सदा भक्तिमतां यथा ॥ १६ ॥
अतस्तवाङ्‌घ्रिर्मे दृष्टश्चित्तदोषापनुत्तये ।
सद्योऽन्तर्हृदये नित्यं मुनिभिः सात्वतैर्वृतः ॥ १७ ॥
ब्रह्माद्यैः स्वार्थसिद्ध्‍यर्थंमस्माभिः पूर्वसेवितः ।
अपरोक्षानुभूत्यर्थं ज्ञानिभिर्हृदि भावितः ॥ १८ ॥
तवाङ्‌घ्रिपूजानिर्माल्यतुलसीमालया विभो ।
स्पर्धते वक्षसि पदं लब्ध्वापि श्रीः सपत्‍निवत् ॥ १९ ॥
अतस्त्वत्पादभक्तेषु तव भक्तिः श्रियोऽधिका ।
भक्तिमेवाभिवाञ्छन्ति त्वद्‌भक्ताः सारवेदिनः ॥ २० ॥
अतस्त्वत्पादकमले भक्तिरेव सदास्तु मे ।
संसारमयतप्तानां भेषजं भक्तिरेव ते ॥ २१ ॥
इति ब्रुवन्तं ब्रह्माणं बभाषे भगवान् हरिः ।
किं करोमीति तं वेधाः प्रत्युवाचातिहर्षितः ॥ २२ ॥
भगवन् रावणो नाम पौलस्त्यतनयो महान् ।
राक्षसानामधिपतिर्मद्दत्तवरदर्पितः ॥ २३ ॥
त्रिलोकीं लोकपालांश्च बाधते विश्वबाधकः ।
मानुषेण मृतिस्तस्य मया कल्याणकल्पिता ।
अतस्त्वं मानुषो भूत्वा जहि देवरिपुं प्रभो ॥ २४ ॥
श्रीभगवानुवाच
कश्यपस्य वरो दत्तस्तपसा तोषितेन मे ॥ २५ ॥
याचितः पुत्रभावाय तथेत्यङ्‌गीकृतं मया ।
स इदानीं दशरथो भूत्वा तिष्ठति भूतले ॥ २६ ॥
तस्याहं पुत्रतामेत्य कौसल्यायां शुभे दिने ।
चतुर्धात्मानमेवाहं सृजामीतरयोः पृथक् ॥ २७ ॥
योगमायापि सीतेति जनकस्य गृहे तदा ।
उत्पत्स्यते तया सार्धं सर्वं सम्पादयाम्यहम् ।
इत्युक्त्वान्तर्दधे विष्णुर्ब्रह्मा देवानथाब्रवीत् ॥ २८ ॥
ब्रह्मोवाच
विष्णुर्मानुषरूपेण भविष्यति रघोः कुले ॥ २९ ॥
यूयं सृजध्वं सर्वेऽपि वानरेष्वंशसम्भवान् ।
विष्णोः सहायं कुरुत यावत्स्थास्यति भूतले ॥ ३० ॥
इति देवान्समादिश्य समाश्वास्य च मेदिनीम् ।
ययौ ब्रह्मा स्वभवनं विज्वरः सुखमास्थितः ॥ ३१ ॥
देवाश्च सर्वे हरिरूपधारिणः
    स्थिताः सहायार्थमितस्ततो हरेः ।
महाबलाः पर्वतवृक्षयोधिनः
    प्रतीक्षमाणा भगवन्तमीश्वरम् ॥ ३२ ॥
इति श्रीमद् अध्यात्मरामयणे उमामहेश्वरसंवादे
बालकाण्डे द्वितीयः सर्गः ॥ २ ॥भारपीडित पृथ्वीचे ब्रह्मदेवाजवळ जाणे, तिच्या प्रार्थनेने
भगवंतांचे प्रकट होणे व त्यांनी तिला धीर देणे.


श्रीपार्वती म्हणाली-हे जगन्नाथा, आपल्या कृपेने अनुगृहीत होऊन मी धन्य झाले, कृतकृत्य झाले. तसेच माझी संशयग्रंथी पूर्णपणे नाहीशी झाली. (१) हे देवा, तुमच्या मुखातून आलेले, संसाराचे भय हरण करणारे, रामतत्त्वरूपी अमृतरसायन पिताना माझे मन तृप्त होत नाही. (२) श्रीरामचंद्रांची कथा मी आपल्या मुखातून संक्षेपाने ऐकली. आता तीच कथा विस्तारपूर्वक स्पष्ट शब्दांत ऐकावी, अशी माझी इच्छा आहे. (३) श्रीमहादेव म्हणाले-हे देवी, ऐक. गुह्यापेक्षा अधिक गुह्य असणारे, महान असे अध्यात्म रामायण मी तुला सांगतो. ते पूर्वी रामांनीच मला सांगितले होते. (४) त्रिविध तापांचे हरण करणारे अध्यात्म रामायण मी आज तुला सांगतो. ते तू ऐक. ते ऐकल्याने जीव हा अज्ञान-जनित अशा महाभयातून सुटून जातो आणि दीर्घायुषी होऊन तो परम ऐश्वर्य आणि पुत्रपौत्र इत्यादी प्राप्त करून घेतो. (५) रावण इत्यादी राक्षसांच्या भाराने दुःखी झालेली पृथ्वी ही पूर्वी एकदा गाईचे रूप धारण करून, देव आणि मुनी यांच्यासह, ब्रह्मदेवांच्या लोकात गेली. तेथे पोचल्यावर रडत रडत तिने आपल्यावर आलेले सर्व दुःख ब्रह्मदेवांना सांगितले. तेव्हां एक क्षणभर ध्यानस्थ होऊन, तिच्या दुःखनिवृत्तीचा उपाय ब्रह्मदेवांनी मनात जाणून घेतला; कारण ते सर्वांतर्यामी आहेत. (६) त्यानंतर सर्व देवांच्यासह ब्रह्मदेव भूदेवीला बरोबर घेऊन, तेथून निघाले आणि धीर-सागराच्या किनार्‍यावर गे ले. तेथे अतिशय निर्मल आनंदाश्रूंनी डोळे भरून ब्रह्मदेवांनी, श्रुतीमध्ये सिद्ध असणार्‍या निर्मल पदांनी आणि पुराणोक्त स्तोत्रांनी तसेच भक्तीने सद्‌गदित झालेल्या वाणीने सर्वांचे अंतर्यामी, जरारहित, सर्वज्ञ अशा भगवान श्रीहरींची स्तुती केली. (७) तेव्हा हजारो देदीप्यमान सूर्याप्रमाणे प्रभा असणारे भगवान हरी आपल्या तेजाने सर्व दिशांतील अंधकार दूर करीत पूर्व दिशेला प्रकट झाले. (८) पुण्यरहित पुरुषांना दर्शन मिळण्यास कठीण अशा भगवान हरींना ब्रह्मदेवांनीसुद्धा कसेबसे पाहिले. इंद्रनील मण्याप्रमाणे त्यांचा तेजोमय श्याम वर्ण होता. त्यांच्या मुखावर मधुर स्मितहास्य होते आणि त्यांचे डोळे कमलाप्रमाणे विशाल आणि मनोहर होते. किरीट, हार, केयूर आणि कुंडले तसेच कंकण इत्यादी अलंकारांनी ते सुशोभित होते. तसेच श्रीवत्स आणि कौस्तुभ मणी यांच्या प्रभेने ते युक्त होते. त्या स्तुती करणार्‍या सनकादिक आणि त्यांच्या इतर पार्षदांसमवेत ते होते. शंख, चक्र, गदा, पद्य आणि वनमाला यांनी ते शोभत होते. सोन्याचे यज्ञोपवीत आणि सोनेरी पीतांबर त्यांनी धारण केलेले होते. तसेच लक्ष्मीदेवी आणि भूदेवी यांच्यासह गरुडावर ते विराजमान होते. (असे त्यांचे दिव्यरूप पाहून) हर्षाने गद्‌गद झालेल्या वाणीने पितामह ब्रह्मदेवांनी त्यांची स्तुती करण्यास प्रारंभ केला. (९-१३) ब्रह्मदेव म्हणाले-"हे देवा, कर्माच्या पाशातून सुटण्यासाठी मुमुक्षु लोक आपले प्राण, बुद्धी, इंद्रिये आणि मन यांचे द्वारा ज्यांचे नित्य चिंतन आपल्या मनात करतात, त्या तुमच्या चरणारविंदांना मी नमरकार करतो. (१४) आपल्या त्रिगुणमय मायेचा आश्रय घेऊन तुम्ही या जगाची उत्पत्ती, पालन आणि लय करता. परंतु ज्ञान आणि आनंद हे स्वरूप असणारे तुम्ही त्या कर्मांनी लिप्त होत नाही. (१५) हे भगवन्, तुमच्या विमल यशाच्या ठिकाणी सदा प्रेम करणार्‍या भक्तांच्या अंतःकरणात जशी शुद्धता असते, तशी मलिन
अंतःकरण असणार्‍या दुष्ट पुरुषांना दान, अध्ययन इत्यादी शुभ कर्मे करूनसुद्धा प्राप्त होत नाही. (१६) म्हणून भक्त मुनिजन ज्यांचे निरंतर ध्यान आपल्या हृदयात करतात त्या आपल्या चरणांचे दर्शन माझ्या अंतःकरणातील दोषांचा तत्काळ नाश व्हावा म्हणून मी आज घेतले आहे. (१७) आपल्या इष्ट सिद्धीसाठी आम्ही ब्रह्मदेव इत्यादींनी या तुमच्या चरणांचे सेवन पूर्वी केले होते आणि ज्ञानी अशा मुनिजनांनी अपरोक्ष साक्षात्कार होण्यासाठी आपल्या हृदयात तुमच्या चरणांचे ध्यान केलेले आहे. (१८) हे विभो, तुमच्या वक्षःस्थलावर स्थान प्राप्त करून घेऊन सुद्धा, तुमच्या चरण-पूजेच्या वेळी वाहिलेल्या व निर्माल्य झालेल्या तुळसी मालेचा श्रीलक्ष्मीही एखाद्या सवतीप्रमाणे मत्सर करते. (१९) तुमच्या चरणकमलावर प्रेम करणार्‍या तुमच्या भक्तांच्या ठायी तुमचे प्रेम हे तुमच्या लक्ष्मीवरील प्रेमापेक्षाही अधिक आहे. म्हणून सार जाणणारे तुमचे भक्तजन हे केवळ तुमच्या भक्तीचीच इच्छा करतात. (२०) म्हणून हे देवा, तुमच्या चरणकमलांच्या ठिकाणीच माझी भक्ती सर्वदा असू दे. कारण संसार-रोगाने ग्रस्त झालेल्या रोग्यांसाठी तुमची भक्ती हेच एकमात्र औषध आहे." (२१) अशा प्रकारे स्तुती करणार्‍या ब्रह्मदेवांना भगवान श्रीहरी म्हणाले, "मी तुमचे कोणते कार्य करून ?" तेव्हा अत्यंत आनंदित होऊन ब्रह्मदेवांनी त्यांना प्रत्युत्तर दिले. (२२) "हे भगवन, पुलस्त्यपुत्र विश्रवा याचा पुत्र रावण आहे. तो राक्षसांचा महान राजा असून मी दिलेल्या वरामुळे तो अतिशय गर्विष्ठ झाला आहे. (२३) संपूर्ण विश्वाला पीडा देणारा तो तीन लोक आणि लोकपाल यांना त्रास देत आहे. हे कल्याणरूप विष्णू त्याचा मृत्यू माणसाच्या हातून होईल, अशी योजना मी केली आहे. म्हणून हे प्रभो, तुम्ही मनुष्यरूप धारण करून, देवांचा शत्रू असणार्‍या त्या रावणाचा वध करावा." (२४) श्रीभगवान् म्हणाले- "कश्यपाच्या तपस्येने संतुष्ट होऊन मी एकदा त्याला वर दिला होता. 'तुम्ही पुत्ररूपाने माझ्या घरी जन्मास यावे' अशी प्रार्थना त्याने मला केली होती. तेव्हा 'ठीक आहे' असे म्हणून मी त्याच्या प्रार्थनेचा स्वीकार केला होता. या वेळी तो कश्यप पृथ्वीतलावर या दशरथ नावाने विद्यमान आहे. (२५-२६) शुभ दिवशी मी त्याचा पुत्र म्हणून कौसल्या माता व इतर दोन मातांच्या ठिकाणी वेगवेगळ्या चार अंशांनी स्वतःच प्रगट होईन. (२७) त्याच वेळी माझी योगमायासुद्धा जनकाच्या घरी सीता या नावाने उत्पन्न होईल. तिला बरोबर घेऊन मी तुमचे सर्व कार्य सिद्ध करीन," असे सांगून भगवान विष्णू अंतर्धान पावले. तेव्हा ब्रह्मदेव देवांना म्हणाले. (२८) ब्रह्मदेव बोलले-"हे देवांनो, रघूच्या कुळात भगवान विष्णू मनुष्यरूपाने अवतार घेणार आहेत. तेव्हा तुम्ही सर्वजण स्वतःच्या अंशाने वानराच्या वंशात जन्म घ्या. तसेच जोपर्यंत भगवान श्रीविष्णू भूतलावर राहतील तोपर्यंत तुम्ही त्यांना साहाय्य करीत राहा." (२९-३०) अशा प्रकारे देवांना आज्ञा करून आणि पृथ्वीला आश्वासन देऊन, ब्रह्मदेव आपल्या लोकात निघून गेले, आणि तेथे निश्चिंत होऊन सुखाने राहू लागले. (३१) तेव्हा भगवान हरींना साहाय्य करण्यासाठी सर्व देव पर्वत व वृक्षांच्या आधारे लढणार्‍या महाबलवान वानरांचे रूप धारण करून भगवंतांच्या येण्याची वाट पाहात इकडे तिकडे राहू लागले. (३२) इति श्रीमद् अध्यात्मरामायणे उमामहेश्वरसंवादे बालकांडे द्वितीयः सर्गः ॥ २ ॥


GO TOP