[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीमद् वाल्मीकि रामायणे
सुन्दरकाण्डे
॥ षष्टितम: सर्ग: ॥
॥ श्रीसीतारामचन्द्राभ्यां नमः ॥
लङ्‌कां जित्वा सीताया आनयनार्थमगदस्योत्साहसमन्वितो विचारो जाम्बवता तस्य निवारणं च -
अंगदाचा लंकेस जिंकून सीतेला घेऊन येण्याचा उत्साहपूर्ण विचार आणि जांबवानाचे द्वारा त्याचे निवारण -
तस्य तद्वचनं श्रुत्वा वालिसूनुरभाषत ।
अश्विपुत्रौ महावेगौ बलवन्तौ प्लवंगमौ ॥ १ ॥
हनुमन्ताचे ते वचन ऐकून वालिपुत्र अंगद म्हणाला—'अश्विनीकुमारांचे पुत्र हे मैन्द आणि द्विविद दोन्ही वानर अत्यन्त वेगवान आणि बलवान आहेत.॥१॥
पितामहवरोत्सेकात् परमं दर्पमास्थितौ ।
अश्विनोर्माननार्थं हि सर्वलोकपितामहः ॥ २ ॥

सर्वावध्यत्वमतुलमनयोर्दत्तवान् पुरा ।
वरोत्सेकेन मत्तौ च प्रमथ्य महतीं चमूम् ॥ ३ ॥

सुराणाममृतं वीरौ पीतवन्तौ महाबलौ ।
पूर्वकाली ब्रह्मदेवाचा वर मिळाल्याने यांचा अभिमान वाढला आणि हे पराकाष्ठेचे गर्विष्ठ झाले. संपूर्ण लोकांचे पितामह ब्रह्मदेव यानी अश्विनीकुमारांचा मान राखण्यासाठी या दोघांना प्रथम असे अनुपम वरदान दिले होते की तुम्हाला कोणीही मारू शकणार नाही. त्या वराच्या अभिमानाने मत्त होऊन या दोन्ही महाबलाढ्य वीरांनी देवतांच्या विशाल सेनेचा पराजय करून अमृत प्राशन केले होते.॥२-३ १/२॥
एतावेव हि संक्रुधौ सवाजिरथकुञ्जराम् ॥ ४ ॥

लङ्‌कां नाशयितुं शक्तौ सर्वे तिष्ठन्तु वानराः ।
आता हेच दोघे जर क्रुद्ध झाले तर अश्व, रथ, हत्ती यांच्यासह संपूर्ण लंकेचा नाश करू शकतात मग इतर सर्व वानर भलेही स्वस्थ बसून राहू देत. ॥४ १/२॥
अहमेकोऽपि पर्याप्तः सराक्षसगणां पुरीम् ॥ ५ ॥

तां लङ्‌कां तरसा हन्तुं रावणं च महाबलम् ।
किं पुनः सहितो वीरैर्बलवद्‌भिः कृतात्मभिः ॥ ६ ॥

कृतास्त्रैः प्लवगैः शक्तैर्भवद्‌भिर्विजयैषिभिः ।
अथवा राक्षसगणांसह ती समस्त लङ्‌कानगरी आणि तेथील तो महाबलाढ्य रावण यांचा वेगाने नाश करून टाकण्यास मी एकटाच पुरेसा आहे. मग जर संपूर्ण अस्त्रांना जाणणारे आपल्यासारखे वीर, बलवान, शुद्धात्मा, शक्तिशाली आणि विजयाभिलाषी वानरांची सहायता मिळाली तर काय विचारावयाचे आहे ?॥५-६ १/२॥
वायुसूनोर्बलेनैव दग्धा लंकेति नः श्रुतम् ॥ ७ ॥

दृष्टा देवी न चानीता इति तत्र निवेदितुम् ।
न युक्तमिव पश्यामि भवद्‌भिः ख्यातपौरुषैः ॥ ८ ॥
वायुपुत्र हनुमन्ताने एकटयानेच जाऊन आपल्या पराक्रमानेच लङ्‌का दग्ध करून टाकली आहे ही गोष्ट आपण सर्वांनी ऐकलीच आहे. आपल्या सारखे प्रख्यात पराक्रमी पुरुषार्थी वीर सहाय्यकर्ते असूनही 'सीता देवीचे दर्शन झाले परन्तु तिला आणू शकलो नाही' असे निवेदन भगवान श्रीरामांसमोर जाऊन करणे मला उचित वाटत नाही.॥७-८॥
न हि वः प्लवने कश्चिन्नापि कश्चित् पराक्रमे ।
तुल्यः सामरदैत्येषु लोकेषु हरिसत्तमाः ॥ ९ ॥
'हे वानरश्रेष्ठ हो, उड्डाण करण्यात अथवा पराक्रम गाजविण्यात देव आणि दैत्य यांच्यामध्ये सुद्धा त्रैलोक्यात तुमची बरोबरी करणारा कोणीही नाही.॥९॥
जित्वा लङ्‌कां सरक्षौघां हत्वा तं रावणं रणे ।
सीतामादाय गच्छामः सिद्धार्था हृष्टमानसाः ॥ १० ॥
म्हणून सर्व राक्षसगणांसह लङ्‌का जिंकून आणि युद्धात रावणाचा वध करून, सीतेला बरोबर घेऊन सफल मनोरथ आणि प्रसन्नचित्त होऊन आपण आनन्दाने रामाकडे जाऊं. ॥१०॥
तेष्वेवं हतवीरेषु राक्षसेषु हनूमता ।
किमन्यदत्र कर्तव्यं गृहीत्वा याम जानकीम् ॥ ११ ॥
जर हनुमानांनी राक्षसांमधील प्रमुख वीरांचा वध केलाच आहे, तर त्यामध्ये थोडेच वीर अवशिष्ट राहिले असतांना आता तेथे आपले दुसरे कर्तव्य ते काय उरले आहे ? म्हणून आपण जानकीला घेऊनच रामाकडे जाऊं. ॥११॥
रामलक्ष्मणयोर्मध्ये न्यस्याम जनकात्मजाम् ।
किं व्यलीकैस्तु तान् सर्वान् वानरान् वानरर्षभान् ॥ १२ ॥

वयमेव हि गत्वा तान् हत्वा राक्षसपुंगवान् ।
राघवं द्रष्टुमर्हामः सुग्रीवं सहलक्ष्मणम् ॥ १३ ॥
कपिवीरांनो ! आता आपणच जानकीला घेऊन जाऊन रामलक्ष्मणांच्यामध्ये उभी करूं. किष्किन्धेत एकत्रित झालेल्या त्या सर्व वानरांना कष्ट देण्याची काय आवश्यकता आहे ? आपणच लंकेत जाऊन तेथील मुख्य-मुख्य राक्षसांचा वध करू आणि त्यानन्तर परत येऊन राघव, लक्ष्मण आणि सुग्रीवाचे दर्शन घेऊ. ॥१२-१३॥
तमेवं कृतसङ्‌‍कल्पं जाम्बवान् हरिसत्तमः ।
उवाच परमप्रीतो वाक्यमर्थवदर्थवित् ॥ १४ ॥
याप्रमाणे अंगदाचा असा संकल्प जाणून वानर व अस्वलांमध्ये श्रेष्ठ आणि अर्थतत्त्वाचा ज्ञाता जो जांबवान तो अत्यन्त प्रसन्न झाला आणि याप्रमाणे सार्थक वचन बोलला—॥१४॥
नैषा बुद्धिर्महाबुद्धे यद् ब्रवीषि महाकपे ।
विचेतुं वयमाज्ञप्ता दक्षिणां दिशमुत्तमाम् ॥ १५ ॥

नानेतुं कपिराजेन नैव रामेण धीमता ।
'हे महाबुद्धिमान श्रेष्ठ वानरा ! तू अत्यंत बुद्धिमान आहेस पण यावेळी तू जे काही सांगत आहेस ती बुद्धिमानास शोभण्यासारखी गोष्ट नाही आहे. कारण वानरराज सुग्रीव तसेच परम बुद्धिमान भगवान श्रीरामांनी आम्हांला उत्तम दक्षिण दिशेस केवळ सीतेचा शोध घेण्याची आज्ञा दिली आहे, तिला बरोबर घेऊन येण्याची नव्हे. ॥१५ १/२॥
कथंचिन्निर्जितां सीतामस्माभिर्नाभिरोचयेत् ॥ १६ ॥

राघवो नृपशार्दूलः कुलं व्यपदिशन् स्वकम् ।
जरी समजा आपण कुठल्याही प्रकारे सीतेला जिंकून त्याच्या समीप घेऊनही गेलो तरी नृपश्रेष्ठ श्रीरामास स्वत:च्या कुळाच्या व्यवहाराचे स्मरण होऊन ते आपले हे कार्य पसंत करणार नाहीत. ॥१६ १/२॥
प्रतिज्ञाय स्वयं राजा सीताविजयमग्रतः ॥ १७ ॥

सर्वेषां कपिमुख्यानां कथं मिथ्या करिष्यति ।
राजा श्रीरामांनी सर्व प्रमुख वानरवीरांच्या समोर स्वत:च सीतेला जिंकून घेऊन येण्याची प्रतिज्ञा केली आहे; त्या प्रतिज्ञेला ते मिथ्या कसे करतील ? ॥१७ १/२॥
विफलं कर्म च कृतं भवेत् तुष्टिर्न तस्य च ॥ १८ ॥

वृथा च दर्शितं वीर्यं भवेत् वानरपुंगवाः ।
म्हणून हे वानरशिरोमणी ! अशा स्थितिमध्ये आम्ही केलेले वा करविलेले कार्य निष्फल होऊन जाईल. भगवान श्रीरामांना सन्तोषही होणार नाही आणि आमचे पराक्रम दाखविणेही व्यर्थ सिद्ध होईल.॥१८ १/२॥
तस्माद् गच्छाम वै सर्वे यत्र रामः सलक्षणः ।
सुग्रीवश्च महातेजाः कार्यस्यास्य निवेदने ॥ १९ ॥
म्हणून आपण सर्व जण या कार्याची सूचना देण्यासाठी जेथे लक्ष्मणासह भगवान श्रीराम आणि महातेजस्वी सुग्रीव विद्यमान आहेत तेथे जाऊ. ॥१९॥
न तावदेषा मतिरक्षमा नो
यथा भवान् पश्यति राजपुत्र ।
यथा तु रामस्य मतिर्निविष्टा
तथा भवान् पश्यतु कार्यसिद्धिद्धम् ॥ २० ॥
हे राजकुमारा ! तू जसा विचार केलास तो विचार आमच्यासाठी योग्य ही आहे—तसेच आम्ही याप्रकारे करू शकणार नाही अशीही गोष्ट नाही आहे. तथापि या बाबतीत भगवान श्रीरामांचा जसा निश्चय आहे त्यास अनुसरून तुला कार्यसिद्धिवर दृष्टि ठेवली पाहिजे. ॥२०॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये सुन्दरकाण्डे षष्टितमः सर्गः ॥ ६० ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यान्तील सुन्दरकाण्डाचा साठावा सर्ग पूरा झाला.॥६०॥
॥ श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु ॥

GO TOP