[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीमद् वाल्मीकि रामायणे
अयोध्याकाण्डे
। चतुर्दशः सर्गः ।
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
कैकेय्या राज्ञः सत्ये दृढतरावस्थानाय प्रेरणं निजप्रार्थितवरपूर्तये तं प्रति दुराग्रहप्रकटनं च, अन्तःपुरद्वारमागत्य वसिष्ठेन सुमन्त्रस्य महाराजसंनिधौ प्रेरणं राजाज्ञया सुमन्त्रस्य श्रीराममानेतुं ततो गमनं च - कैकेयीने राजाला सत्यावर दृढ राहण्यासाठी प्रेरणा देऊन आपल्या वरांच्या पूर्तिसाठी दुराग्रह दाखविणे, महर्षि वसिष्ठांचे अंतःपुराच्या द्वारावर आगमन आणि सुमंत्रास महाराजांजवळ धाडणे, राजाच्या आज्ञेने सुमंत्रांनी श्रीरामास बोलविण्यासाठी जाणे -
पुत्रशोकार्दितं पापा विसञ्ज्ञं पतितं भुवि ।
विचेष्टमानमुत्प्रेक्ष्य ऐक्ष्वाकमिदमब्रवीत् ॥ १ ॥
इक्ष्वाकुनंदन राजा दशरथ पुत्रशोकाने पीडित होऊन पृथ्वीवर निश्चेष्ट पडलेले होते आणि वेदनेने तळमळत होते. त्यांना या अवस्थेत पाहून पापीण कैकेयी त्यांना याप्रकारे बोलली- ॥१॥
पापं कृत्वैव किमिदं मम संश्रुत्य संश्रवम् ।
शेषे क्षितितले सन्नः स्थित्यां स्थातुं त्वमर्हसि ॥ २ ॥
'महाराज ! आपण मला दोन वर देण्याची प्रतिज्ञा केली होती आणि ज्यावेळी मी ते मागितले, तेव्हा आपण या प्रकारे सुन्न होऊन पृथ्वीवर पडला आहात, जणु काही कुणी पाप करून पश्चाताप करत आहे; ही काय गोष्ट आहे ? आपण सत्पुरुषांच्या मर्यादेत स्थीर राहाणे आवश्यक आहे. ॥२॥
आहुः सत्यं हि परमं धर्मं धर्मविदो जनाः ।
सत्यमाश्रित्य च मया त्वं धर्मं प्रतिचोदितः ॥ ३ ॥
धर्मज्ञ पुरुष सत्यालाच सर्वश्रेष्ठ धर्म म्हणतात. त्या सत्याचा आश्रय घेऊन मी आपल्याला धर्माचे पालन करण्यासाठी प्रेरीत केले आहे. ॥३॥
संश्रुत्य शैब्यः श्येनाय स्वां तनुं जगतीपतिः ।
प्रदाय पक्षिणे राजा जगाम गतिमुत्तमाम् ॥ ४ ॥
पृथ्वीपति राजा शैब्याने ससाण्याला आपले शरीर देण्याची प्रतिज्ञा करून ते देऊनही टाकले; आणि देऊन उत्तम गति प्राप्त केली. ॥४॥
तथा ह्यलर्कस्तेजस्वी ब्राह्मणे वेदपारगे ।
याचमाने स्वके नेत्रे उद्धृत्याविमना ददौ ॥ ५ ॥
याच प्रकारे तेजस्वी राजा अलर्काने वेदांतील पारंगत विद्वान ब्राह्मणाला त्याने याचना केल्यावर मनात खेद न आणता आपले दोन्ही डोळे काढून देऊन टाकले होते. ॥५॥
सरितां तु पतिः स्वल्पां मर्यादां सत्यमन्वितः ।
सत्यानुरोधात् समये वेलां स्वां नातिवर्तते ॥ ६ ॥
सत्यास प्राप्त झालेला समुद्र सत्याचे अनुसरण करीत असल्याने पर्व आदिच्या समयीही आपल्या छोट्याशा सीमातट भूमीचे उल्लंघन करीत नाही. ॥६॥
सत्यमेकपदं ब्रह्म सत्ये धर्मः प्रतिष्ठितः ।
सत्यमेवाक्षया वेदाः सत्येनैवाप्यते परम् ॥ ७ ॥
सत्य हेच प्रणवरूप ब्रह्म आहे. सत्यांतच धर्म प्रतिष्ठीत आहे, सत्यच अविनाशी वेद आहे आणि सत्यानेच परब्रह्माची प्राप्ति होते. ॥७॥
सत्यं समनुवर्तस्व यदि धर्मे धृता मतिः ।
स वरः सफलो मेऽस्तु वरदो ह्यसि सत्तम ॥ ८ ॥
म्हणून जर आपली बुद्धि धर्मामध्ये स्थित आहे तर सत्याचे अनुसरण करावे. साधुशिरोमणी ! मी मागितलेला हा वर सफल व्हावयास पाहिजे; कारण की आपण स्वतःच त्या वरांचे दाता आहात. ॥८॥
धर्मस्यैवाभिकामार्थं मम चैवाभिचोदनात् ।
प्रव्राजय सुतं रामं त्रिः खलु त्वां ब्रवीम्यहम् ॥ ९ ॥
धर्माच्याही अभीष्ट फलाच्या सिद्धीसाठी तथा माझ्या प्रेरणेनेही आपण आपला पुत्र राम यांस घरांतून बाहेर घालवून लावा. मी माझे हे कथन त्रिवार उच्चारित आहे. ॥९॥
समयं च ममार्येमं यदि त्वं न करिष्यसि ।
अग्रतस्ते परित्यक्ता परित्यक्ष्यामि जीवितम् ॥ १० ॥
'आर्य ! जर माझ्या कडून केल्या गेलेल्या या प्रतिज्ञेचे पालन आपण केले नाहीत, तर मी आपल्या पासून (परित्यक्त) उपेक्षित होऊन आपल्या समोरच आपल्या प्राणांचा परित्याग करीन. ॥१०॥
एवं प्रचोदितो राजा कैकेय्या निर्विशङ्‌‍कया ।
नाशकत् पाशमुन्मोक्तुं बलिरिन्द्रकृतं यथा ॥ ११ ॥
याप्रकारे कैकेयीने जेव्हा निःशंक होऊन राजांना प्रेरीत केले, तेव्हा ते त्या सत्यरूपी बंधनाला सोडू शकले नाहीत. ज्याप्रमाणे राजा बली इंद्रप्रेरीत वामनाच्या पाशातून आपल्या मुक्त करण्यास असमर्थ झाले होते त्याप्रमाणे महाराज दशरथ त्या बंधनातून आपल्याला कुठल्याही प्रकारे मुक्त करू शकले नाहीत. ॥११॥
उद्‍भ्रान्तहृदयश्चापि विवर्णवदनोऽभवत् ।
स धुर्यो वै परिस्पन्दन् युगचक्रान्तरं यथा ॥ १२ ॥
दोन चाकांच्या मध्ये फसून तेथून बाहेर निघण्याचा प्रयत्‍न करणार्‍या गाडीच्या बैलाप्रमाणे त्यांचे हृदय उद्‌भ्रांत झाले होते आणि त्यांच्या मुखाची कांतीही फिकी पडली होती. ॥१२॥
विह्वलाभ्यां च नेत्राभ्यामपश्यन्निव भूमिपः ।
कृच्छ्राद् धैर्येण संस्तभ्य कैकेयीमिदमब्रवीत् ॥ १३ ॥
आपल्या विकल नेत्रांनी काहीही बघण्यास असमर्थ होऊन भूपाल दशरथांनी पयत्‍नपूर्वक धैर्य धारण करून आपले हृदय संभाळले आणि कैकेयीला या प्रमाणे बोलले - ॥१३॥
यस्ते मन्त्रकृतः पाणिरग्नौ पापे मया धृतः ।
त्यजामि स्वयं चैव तव पुत्रं सह त्वया ॥ १४ ॥
'पापिणी ! मी अग्निच्या समीप 'सांगुष्ठं ते गृभ्णामि सौभगत्वाय हस्तम्' इत्यादि वैदिक मंत्रांचा पाठ करून तुझ्या ज्या हाताला धरले होते, तो हात मी आज सोडून देत आहे. त्या बरोबरच तुझ्या आणि माझ्या द्वारा उत्पन्न झालेल्या तुझ्या पुत्राचाही मी त्याग करीत आहे. ॥१४॥
प्रयाता रजनी देवि सूर्यस्योदयनं प्रति ।
अभिषेकाय हि जनस्त्वरयिष्यति मां ध्रुवम् ॥ १५ ॥
'देवि ! रात्र निघून गेली आहे. सूर्योदय होताच सर्वलोक निश्चितच रामाच्या राज्याभिषेकासाठी मला शीघ्रता करण्यास सांगतील. ॥१५॥
रामाभिषेकसम्भारैस्तदर्थमुपकल्पितैः ।
रामः कारयितव्यो मे मृतस्य सलिलक्रियाम् ॥ १६ ॥

सपुत्रया त्वया नैव कर्तव्या सलिलक्रिया ।
'त्यासमयी जे सामान रामाच्या अभिषेकासाठी जमविले गेले आहे त्याच्या द्वारा मी मेल्यानंतर रामाच्या हातांनी मला जलाञ्जलि देवविली जावी, परंतु आपल्या पुत्रासहित तू माझ्यासाठी जलाञ्जलि देऊ नको. ॥१६ १/२॥
व्याहन्तास्यशुभाचारे यदि रामाभिषेचनम् ॥ १७ ॥

न च शक्तोऽद्यास्म्यहं द्रष्टुं दृष्ट्‍वा पूर्वं तथासुखम् ।
हतहर्षं तथानन्दं पुनर्जनमवाङ्‌‍मुखम् ॥ १८ ॥
'पापाचारिणी ! जर तू रामाच्या अभिषेकात विघ्न आणलेस (तर तुला माझ्यासाठी जलाञ्जलि देण्याचा काही अधिकार राहाणार नाही.) मी प्रथम रामाच्या राज्याभिषेकाच्या समाचाराने ज्या जन-समुदायाचा हर्षोल्लासाने परिपूर्ण, उत्तम मुखे पाहून चुकलो आहे, ती पाहिल्यानंतर आज पुन्हा त्याच जनतेची हर्ष आणि आनंद-शून्य (रहित) खाली घातलेली मुखे मी पाहू शकणार नाही. ॥१७-१८॥
तां तथा ब्रुवतस्तस्य भूमिपस्य महात्मनः ।
प्रभाता शर्वरी पुण्या चन्द्रनक्षत्रशालिनी ॥ १९ ॥
महात्मा राजा दशरथ कैकेयीशी या प्रकारे बोलत असतांनाच चंद्रमा आणि नक्षत्रमालांनी अलंकृत ती पुण्यमय रजनी निघून गेली आणि प्रभात काल आला. ॥१९॥
ततः पापसमाचारा कैकेयी पार्थिवं पुनः ।
उवाच परुषं वाक्यं वाक्यज्ञा रोषमूर्च्छिता ॥ २० ॥
त्यानंतर संभाषणांतील मर्म जाणणारी पापाचारिणी कैकेयी रोषाने जणू मूर्च्छित झाल्याप्रमाणे राजांना पुन्हा कठोर वाणीने म्हणाली - ॥२०॥
किमिदं भाषसे राजन् वाक्यं गररुजोपमम् ।
आनाययितुमक्लिष्टं पुत्रं राममिहार्हसि ॥ २१ ॥

स्थाप्य राज्ये मम सुतं कृत्वा रामं वनेचरम् ।
निःसपत्‍नां च मां कृत्वा कृतकृत्यो भविष्यसि ॥ २२ ॥
'राजन् ! आपण विष आणि शूल आदि रोगांच्या प्रमाणे कष्ट देणारी अशी वचने का बोलत आहात ? (या गोष्टीनी काहीही फरक पडणार नाही.) आपण कुठल्या क्लेषाशिवाय आपला पुत्र राम यास येथे बोलावून घ्या. माझ्या पुत्राला राज्यावर प्रतिष्ठित करा आणि रामाला वनात धाडून मला निष्कण्टक बनवा, तेव्हाच आपण कृतकृत्य होऊ शकाल'. ॥२१-२२॥
स तुन्न इव तीक्ष्णेन प्रतोदेन हयोत्तमः ।
राजा प्रचोदितोऽभीक्ष्णं कैकेय्या वाक्यमब्रवीत् ॥ २३ ॥
तीक्ष्ण चाबकाच्या फटकार्‍याने पीडित झालेल्या उत्तम अश्वाप्रमाणे कैकेयी द्वारा वारंवार प्रेरीत होऊन व्यथित झालेल्या राजा दशरथांनी या प्रकारे म्हटले- ॥२३॥
धर्मबन्धेन बद्धोऽस्मि नष्टा च मम चेतना ।
ज्येष्ठं पुत्रं प्रियं रामं द्रष्टुमिच्छामि धार्मिकम् ॥ २४ ॥
'मी धर्माच्या बंधनाने बांधला गेलो आहे. माझी चेतना लुप्तशी होत आहे. म्हणून या समयी मी आपल्या धर्मपरायण परम प्रिय ज्येष्ठ पुत्र रामाला पाहू इच्छितो. ॥२४॥
ततः प्रभातां रजनीं उदिते च दिवाकरे ।
पुण्ये नक्षत्रयोगे च मुहूर्ते च समाहिते ॥ २५ ॥

वसिष्ठो गुणसम्पन्नः शिष्यैः परिवृतस्तथा ।
उपगृह्याशु सम्भारान् प्रविवेश पुरोत्तमम् ॥ २६ ॥
तिकडे जेव्हां रात्र सरली आणि प्रभात झाली, सूर्य देवाचा उदय झाला आणि पुष्य नक्षत्राच्या योगात अभिषेकाचा शुभमुहूर्त येऊन ठेपला, त्या समयी शिष्यांनी घेरलेले शुभ गुणसंपन्न महर्षि वसिष्ठ अभिषेकासाठी आवश्यक सामग्रीचा संग्रह करून शीघ्रतापूर्वक त्या श्रेष्ठपुरीत आले. ॥२५-२६॥
सिक्तसम्मार्जितपथां पताकोत्तमभूषिताम् ।
संहृष्टमनुजोपेतां समृद्धविपणापणाम् ॥ २७ ॥
त्या पुण्यवेळी अयोध्येचे रस्ते झाडून-सवरून साफ केले गेले होते. आणि त्यांच्यावर पाण्यानी सडे शिंपडले गेले होते. सारी पुरी उत्तम पताकांनी सुशोभित झाली होती. तेथील सर्व माणसे हर्ष आणि उल्हासाने भरून गेलेली होती. बाजार आणि दुकाने अशा तर्‍हेने सजविली गेली होती की त्यांची समृद्धी पाहूनच घ्यावी. ॥२७॥
महोत्सवसमायुक्तां राघवार्थे समुत्सुकाम् ।
चन्दनागुरुधूपैश्च सर्वतः परिधूमिताम् ॥ २८ ॥
सर्वत्र महान उत्सव सुरू होता. सर्व नगरी राघवाच्या अभिषेकासाठी उत्सुक झाली होती. चहू बाजूस चंदन, अगरू आणि धूपाचा सुगंध व्याप्त झाला होता. ॥२८॥
तां पुरीं समतिक्रम्य पुरंदरपुरोपमाम् ।
ददर्शान्तःपुरं श्रीमान् नानाध्वजगणायुतम् । । २९ ॥
इंद्रनगरी अमरावती प्रमाणे शोभून दिसणार्‍या त्या पुरीला पार करुन श्रीमान वसिष्ठांनी राजा दशरथांच्या अंतःपुराचे दर्शन केले जेथे हजारो ध्वजा फडकत होत्या. ॥२९॥
पौरजानपदाकीर्णं ब्राह्मणैरुपशोभितम् ।
यष्टिमद्‌भिः सुसम्पूर्णं सदश्वैः परमार्चितैः ॥ ३० ॥
नगरातील आणि जनपदातील लोकांची गर्दी झाली होती. बरेचसे ब्राह्मण त्या स्थानाची शोभा वाढवत होते. छडीदार राजसेवक आणि सजलेले - सजविलेले सुंदर घोडे तेथे मोठ्या संख्येत उपस्थित होते. ॥३०॥
तदन्तःपुरमासाद्य व्यतिचक्राम तं जनम् ।
वसिष्ठः परमप्रीतः परमर्षिभिरावृतः ॥ ३१ ॥
श्रेष्ठ महर्षिंनी घेरलेले वसिष्ठ परम प्रसन्न होऊन अंतःपुरात पोहोचून त्या जन-समुदायाला ओलांडून पुढे गेले. ॥३१॥
स त्वपश्यद् विनिष्क्रान्तं सुमन्त्रं नाम सारथिम् ।
द्वारे मनुजसिंहस्य सचिवं प्रियदर्शनम् ॥ ३२ ॥
तेथे त्यांनी महाराजांचे सुंदर सचिव तथा सारथि सुमंत्राला अंतःपुराच्या द्वारी उपस्थित असलेले पाहिले, जे त्याच वेळी आतून बाहेर आले होते. ॥३२॥
तमुवाच महातेजाः सूतपुत्रं विशारदम् ।
वसिष्ठः क्षिप्रमाचक्ष्व नृपतेर्मामिहागतम् ॥ ३३ ॥
तेव्हा महातेजस्वी वसिष्ठांनी परमचतुर सूतपुत्र सुमंत्रांना म्हटले - 'सूत ! तुम्ही महाराजांना शीघ्रच माझ्या आगमनाची सूचना द्या. ॥३३॥
इमे गङ्‌‍गोदकघटाः सागरेभ्यश्च काञ्चनाः ।
औदुम्बरं भद्रपीठमभिषेकार्थमाहृतम् ॥ ३४ ॥
त्यांना सांगा की श्रीरामाच्या राज्याभिषेका साठी सारी सामग्री एकत्र केली गेली आहे. हे गंगाजलाने भरलेले कलश, ठेवलेले आहेत. हे औदुंबराच्या लाकडाचे बनविलेले भद्रपीठ आहे जे अभिषेकासाठी आणले गेले आहे. याच्यावर बसवून रामाचा अभिषेक होईल. ॥३४॥
सर्वबीजानि गन्धाश्च रत्‍नानि विविधानि च ।
क्षौद्रं दधि घृतं लाजा दर्भाः सुमनसः पयः ॥ ३५ ॥

अष्टौ च कन्या रुचिरा मत्तश्च वरवारणः ।
चतुरश्वो रथः श्रीमान् निस्त्रिंशो धनुरुत्तमम् ॥ ३६ ॥

वाहनं नरसंयुक्तं छत्रं च शशिसन्निभम् ।
श्वेते च वालव्यजने भृङ्‌‍गारं च हिरण्मयम् ॥ ३७ ॥

हेमदामपिनद्धश्च ककुद्मान् पाण्डरो वृषः ।
केसरी च चतुर्दंष्ट्रो हरिश्रेष्ठो महाबलः ॥ ३८ ॥

सिंहासनं व्याघ्रतनुः समिद्धश्च हुताशनः ।
सर्ववादित्रसङ्‌‍घाश्च वेश्याश्चालङ्‌‍कृताः स्त्रियः ॥ ३९ ॥

आचार्या ब्राह्मणा गावः पुण्याश्च मृगपक्षिणः ।
पौरजानपदश्रेष्ठा नैगमाश्च गणैः सह ॥ ४० ॥

एते चान्ये च बहवः प्रीयमाणाः प्रियंवदाः ।
अभिषेकाय रामस्य सह तिष्ठन्ति पार्थिवैः ॥ ४१ ॥
सर्व प्रकारची बीजे, गंध, वेगवेगळ्या प्रकारची रत्‍ने, मधु, दही, तूप, लाह्या, कुश, फूले, दूध, आठ सुंदर कन्या, मत्त गजराज, चार घोड्यांचा रथ, तळपणारे खड्‍ग, उत्तम धनुष्य, मनुष्यांच्या द्वारा वाहिले जाणारे वाहन (पालखी आदि) चंद्रम्या प्रमाणे श्वेत छ्त्र, सफेद चवरी, सोन्याची झारी, सुवर्णाच्या मालांनी अलंकृत उंच व शिंड असलेला श्वेतपीत वर्णाचा वृषभ, चार दाढा असलेला सिंह, महाबलवान उत्तम अश्व, सिंहासन, व्याघ्रचर्म, समिधा, अग्नि, सर्व प्रकारची वाद्ये, वारांगना, शृंगारयुक्त सौभाग्यवती स्त्रिया, आचार्य, ब्राह्मण, गाई, पवित्र पशु पक्षी, नगर आणि जनपदांतील श्रेष्ठ पुरुष आपल्या सेवक- गणांसहित, श्रेष्ठ श्रेष्ठ व्यापारी - हे तथा आणखीही बरेचसे प्रियवादी मनुष्य, बहुसंख्यक राजांच्या सहित प्रसन्नतापूर्वक रामाच्या अभिषेकासाठी येथे उपस्थित आहेत. ॥३५-४१॥
त्वरयस्व महाराजं यथा समुदितेऽहनि ।
पुण्ये नक्षत्रयोगे च रामो राज्यमवाप्नुयात् ॥ ४२ ॥
'तुम्ही महाराजांना त्वरा करण्यास सांगा, ज्या योगे आता सूर्योदया नंतर पुष्य नक्षत्राच्या योगामध्ये राम राज्य प्राप्त करतील. ॥४२॥
इति तस्य वचः श्रुत्वा सूतपूत्रो महात्मनः ।
स्तुवन् नृपतिशार्दूलं प्रविवेश निवेशनम् ॥ ४३ ॥
वसिष्ठांचे हे वचन ऐकून महाबली सूतपूत्र सुमंत्रांनी राजसिंह दशरथांची स्तुति करीत त्यांच्या भवनात प्रवेश केला. ॥४३॥
तं तु पूर्वोदितं वृद्धं द्वारस्था राजसम्मताः ।
न शेकुरभिसंरोद्धुं राज्ञः प्रियचिकीर्षवः ॥ ४४ ॥
राजांचे प्रिय करण्याची इच्छा बाळगणारे आणि त्यांच्या द्वारे सन्मानित द्वारपाल त्या वृद्ध सचिवांना आत जाण्यापासून रोखू शकले नाहीत; कारण त्यांच्यासाठी प्रथमपासूनच महाराजांची आज्ञा होती की ते कुठल्याही समयी आत जाण्यापासून रोखले जाऊ नयेत. ॥४४॥
स समीपस्थितो राज्ञस्तामवस्थामजज्ञिवान् ।
वाग्भिः परमतुष्टाभिरभिष्टोतुं प्रचक्रमे ॥ ४५ ॥
सुमंत्र राजाच्या जवळ जाऊन उभे राहिले. त्यांना राजांच्या त्या अवस्थेचा पत्ता नव्हता, म्हणून अत्यंत संतोषदायक वचनांचे द्वारा महाराजांची स्तुति करण्यास उद्यत झाले. ॥४५॥
ततः सूतो यथापूर्वं पार्थिवस्य निवेशने ।
सुमन्त्रः प्राञ्जलिर्भूत्वा तुष्टाव जगतीपतिम् ॥ ४६ ॥
सूत सुमंत्र राजांच्या महालात पूर्वी प्रमाणेच हात जोडून महाराजांची स्तुति करू लागले - ॥४६॥
यथा नन्दति तेजस्वी सागरो भास्करोदये ।
प्रीतः प्रीतेन मनसा तथा नन्दय नस्ततः ॥ ४७ ॥
'महाराज ! ज्याप्रमाणे सूर्योदय होताच तेजस्वी समुद्र स्वयं हर्षाच्या तरंगानी उल्हासित होऊन त्याच्यात स्नान करण्याची इच्छा असणार्‍यांना (मनुष्यांना) आनंदित करतो, त्या प्रकारे आपण स्वतः प्रसन्न होऊन प्रसन्नतापूर्वक हृदयाने आम्हां सेवकांना आनंद प्रदान करावा. ॥४७॥
इन्द्रमस्यां तु वेलायामभितुष्टाव मातलिः ।
सोऽजयद् दानवान् सर्वांस्तथा त्वां बोधयाम्यहम् ॥ ४८ ॥
देवसारथी मातलिने याच वेळे मध्ये देवराज इंद्रांची स्तुती केली होती, ज्यायोगे त्यांनी समस्त दानवांवर विजय प्राप्त केला. त्याच प्रकारे मीही स्तुति-वचनांच्या द्वारा आपणास जागे करीत आहे. ॥४८॥
वेदाः सहाङ्‌‍गा विद्याश्च यथा ह्यात्मभुवं विभुम् ।
ब्रह्माणं बोधयन्त्यद्य तथा त्वां बोधयाम्यहम् ॥ ४९ ॥
सहा अंगांसहित चारी वेद तथा समस्त विद्या ज्याप्रमाणे स्वयंभू भगवान ब्रह्मदेवांना जागवितात, त्याच प्रकारे आज मी आपणास जागवीत आहे. ॥४९॥
आदित्यः सह चंद्रेण यथा भूतधरां शुभाम् ।
बोधयत्यद्य पृथिवीं तथा त्वां बोधयाम्यहम् ॥ ५० ॥
ज्याप्रमाणे चंद्रमा सह सूर्य समस्त भूतांची आधारभूत असलेल्या या शुभ-स्वरूपा पृथ्वीला जागवीत असतो त्याचप्रमाणे आज मी आपल्याला जागे करीत आहे. ॥५०॥
उत्तिष्ठ सुमहाराज कृतकौतुकमङ्‌‍गलः ।
विराजमानो वपुषा मेरोरिव दिवाकरः ॥ ५१ ॥
'महाराज ! उठावे, आणि उत्सवकालीन मंगलकृत्य पूर्ण करून वस्त्रा-भूषणांनी सुशोभित होऊन सिंहासनावर विराजमान व्हावे. नंतर मेरू पर्वतावरून वर चढून येणार्‍या सूर्यदेवाप्रमाणे आपली शोभा होत रहावी. ॥५१॥
सोमसूर्यौ च काकुत्स्थ शिववैश्रवणावपि ।
वरुणश्चाग्निरिन्द्रश्च विजयं प्रदिशन्तु ते ॥ ५२ ॥
'हे काकुस्थ ! चंद्रमा, सूर्य, शिव, कुबेर, वरूण, अग्नि आणि इंद्र आपल्याला विजय प्रदान करोत. ॥५२॥
गता भगवती रात्रिः कृतं कृत्यमिदं तव ।
बुध्यस्व नृपशार्दूल कुरु कार्यमनन्तरम् ॥ ५३ ॥
'राजासिंह ! भगवती रात्रिदेवी निघून गेलेली आहे. आपण ज्यासाठी आज्ञा दिली होती, आपले सर्व कार्य पूर्ण झालेले आहे. ही गोष्ट आपण जाणून घ्यावी आणि यानंतर जे अभिषेकाचे कार्य शेष आहे ते पूर्ण करावे. ॥५३॥
उदतिष्ठत रामस्य समग्रमभिषेचनम् ।
पौरजानपदैश्चापि नैगमैश्च कृताञ्जलिः ॥ ५४ ॥
'रामाच्या अभिषेकाची सारी तयारी झाली आहे. नगर आणि जनपदांतील लोक तथा मुख्य मुख्य व्यापारीही हात जोडून उपस्थित झाले आहेत. ॥५४॥
स्वयं वसिष्ठो भगवान् ब्राह्मणैः सह तिष्ठति ।
क्षिप्रमाज्ञाप्यतां राजन् राघवस्याभिषेचनम् ॥ ५५ ॥
'राजन ! हे भगवान वसिष्ठ मुनि ब्राह्मणांसह द्वारावर उभे आहेत, म्हणून राघवाचा अभिषेकाच्या कार्याचा आरंभ करण्याविषयी शीघ्र आज्ञा द्यावी. ॥५५॥
यथा ह्यपालाः पशवो यथा सेना ह्यनायका ।
यथा चन्द्रं विना रात्रिर्यथा गावो विना वृषम् ॥ ५६ ॥

एवं हि भवता राष्ट्रं यत्र राजा न दृश्यते ।
ज्याप्रमाणे गुराख्याशिवाय पशु, सेनापतिविना सेना, चंद्रम्याशिवाय रात्र आणि सांड (बैलाशिवाय) गायींची शोभा नाही, तशीच दशा त्या राष्ट्राची होऊन जाते जेथे राजाचे दर्शन होत नाही. ॥५६ १/२॥
एवं तस्य वचः श्रुत्वा सान्त्वपूर्वमिवार्थवत् ॥ ५७ ॥

अभ्यकीर्यत शोकेन भूय एव महीपतिः ।
सुमंत्रांनी याप्रकारे म्हटलेले सांत्वनापूर्ण आणि सार्थक वचन ऐकून राजा दशरथ पुन्हा शोकग्रस्त झाले. ॥५७ १/२॥
ततः स राजा तं सूतं सन्नहर्षः सुतं प्रति ॥ ५८ ॥

शोकरक्तेक्षणः श्रीमानुद्वीक्ष्योवाच धार्मिकः ।
वाक्यैस्तु खलु मर्माणि मम भूयो निकृन्तसि ॥ ५९ ॥
त्यावेळी पुत्राच्या वियोगाच्या संभावनेमुळे त्यांची प्रसन्नता नष्ट झाली होती. शोकामुळे त्यांचे नेत्र लाल झाले होते. त्या धर्मात्मा नरेशांनी एक वेळ दृष्टि वर करून सूताकडे पाहिले आणि या प्रकारे बोलले - ' तुम्ही अशा गोष्टी ऐकवून माझ्या मर्मस्थानावर अधिक आघात का बरे करत आहात ?' ॥५८ -५९॥
सुमन्त्रः करुणं श्रुत्वा दृष्ट्‍वा दीनं च पार्थिवम् ।
प्रगृहीताञ्जलिः किंचित् तस्माद् देशादपाक्रमत् ॥ ६० ॥
राजांचे हे करूण वचन ऐकून आणि त्यांच्या दीन दशेवर दृष्टिपात करून सुमंत्र हात जोडूनच त्या स्थानापासून थोडे मागे सरले. ॥६०॥
यदा वक्तुं स्वयं दैन्यान्न शशाक महीपतिः ।
तदा सुमन्त्रं मन्त्रज्ञा कैकेयी प्रत्युवाच ह ॥ ६१ ॥
ज्यावेळी दुःख आणि दीनतेच्या कारणामुळे राजा स्वयं काही बोलू शकले नाहीत, तेव्हा मंत्रणेचे ज्ञान असणार्‍या कैकेयीने सुमंत्रास याप्रकारे उत्तर दिले - ॥६१॥
सुमन्त्र राजा रजनीं रामहर्षसमुत्सुकः ।
प्रजागरपरिश्रान्तो निद्रावशमुपागतः ॥ ६२ ॥
'सुमंत्र ! राजे रात्रभर रामाच्या राज्याभिषेक जनित हर्षामुळे उत्कंठित होऊन जागत राहिले आहेत. अधिक जागरणाने थकल्यामुळे यासमयी त्यांना झोप येत आहे. ॥६२॥
तद् गच्छ त्वरितं सूत राजपुत्रं यशस्विनम् ।
राममानय भद्रं ते नात्र कार्या विचारणा ॥ ६३ ॥
'म्हणून सूता ! तुमचे भले होवो. तुम्ही त्वरित जा आणि यशस्वी राजपुत्र रामांना येथे बोलावून आणा. या विषयात तुम्ही कुठलाही अन्यथा विचार करता कामा नये.' ॥६३॥
अश्रुत्वा राजवचनं कथं गच्छामि भामिनि ।
तच्छ्रुत्वा मन्त्रिणो वाक्यं राजा मन्त्रिणमब्रवीत् ॥ ६४ ॥
तेव्हा सुमंत्रांनी म्हटले - 'भामिनी ! महाराजांची आज्ञा ऐकल्या शिवाय मी कसा जाऊ शकेन ? मंत्र्याचे म्हणणे ऐकून राजांनी त्यांना म्हटले - ॥६४॥
सुमन्त्र रामं द्रक्ष्यामि शीघ्रमानय सुन्दरम् ।
स मन्यमानः कल्याणं हृदयेन ननन्द च ॥ ६५ ॥
'सुमंत्र ! मी सुंदर श्रीरामाला पाहू इच्छितो. तुम्ही शीघ्र त्यांना येथे घेऊन या'. त्या समयी रामाच्या दर्शनानेंच कल्याण मानून राजा मनांतल्या मनात आनंदाचा अनुभव करू लागले. ॥६५॥
निर्जगाम च स प्रीत्या त्वरितो राजशासनात् ।
सुमन्त्रश्चिन्तयामास त्वरितं चोदितस्तया ॥ ६६ ॥
इकडे सुमंत्र राजाच्या आज्ञेने तात्काळ प्रसन्नतापूर्वक तेथून निघून गेले. कैकेयीने जी तात्काळ रामांना बोलावून आणण्याची आज्ञा दिली होती तिचे स्मरण करुन ते विचार करू लागले - 'कळत नाही, की त्यांना बोलावून आणण्यासाठी इतकी घाई का करीत आहे ?' ॥६६॥
व्यक्तं रामाभिषेकार्थे इहायास्यति धर्मराट् ।
इति सूतो मतिं कृत्वा हर्षेण महता पुनः ॥ ६७ ॥

निर्जगाम महातेजाः राघवस्य दिदृक्षया ।
सागरह्रदसंकाशात्सुमन्त्रोऽन्तःपुराच्छुभात् ।
निष्क्रम्य जनसम्बाधं ददर्श द्वारमग्रतः ॥ ६८ ॥
'असे वाटत आहे की श्रीरामाच्या अभिषेकासाठीच ही अशी घाई करत असावी. या कार्यात धर्मराज राजा दशरथांना अधिक आयास करावे लागत आहेत (कदाचित यामुळेच ते बाहेर पडत नसावेत)' असा निश्चय करून महातेजस्वी सूत सुमंत्र नंतर मोठ्या आनंदाने राघवाच्या दर्शनाच्या इच्छेने चालू लागले. समुद्राच्या अंतर्वती जलाशया समान त्या सुंदर अंतःपुरातून बाहेर पडल्यावर सुमंत्राने द्वाराच्या समोर माणसांची खूप गर्दी एकत्र झालेली पाहिली. ॥६७- ६८॥
ततः पुरस्तात् सहसा विनिःसृतो
     महीपतेर्द्वारगतान् विलोकयन् ।
ददर्श पौरान् विविधान् महाघना-
     नुपस्थितान् द्वारमुपेत्य विष्ठितान् ॥ ६९ ॥
राजाच्या अंतःपुरातून सहसा निघून सुमंत्रांनी द्वाराशी एकत्र झालेल्या लोकांकडे दृष्टिपात केला. त्यांनी पाहिले की बहुसंख्य पुरवासी तेथे उपस्थित होते आणि अनेकानेक महाधनवान पुरुषही राजद्वारावर येऊन उभे राहिले होते. ॥६९॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् अयोध्याकाण्डे चतुर्दशः सर्गः ॥ १४ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील अयोध्याकाण्डाचा चौदावा सर्ग पूरा झाला. ॥१४॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP