श्रीमद् वाल्मीकि रामायणे
उत्तरकाण्डे
॥ अष्टषष्टितमः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
लवणासुरस्याहारार्थं निर्गमनं शत्रुघ्नस्य मधुपुरीद्वारि समवस्थानं निवृत्तेन लवणेन सह तस्य सरोषो वार्तालापश्च -
लवणासुराचे आहारासाठी बाहेर पडणे, शत्रुघ्नांनी मधुपुरीच्या द्वारावर खिळून राहाणे आणि परत आलेल्या लवणासुराबरोबर त्यांचे रोषपूर्ण संभाषण -
कथां कथयतां तेषां जयं चाकाङ्‌क्षतां शुभम् ।
व्यतीता रजनी शीघ्रं शत्रुघ्नस्य महात्मनः ॥ १ ॥
याप्रकारे कथा सांगत आणि शुभ विजयाची आकांक्षा बाळगून त्या मुनिंशी बोलता बोलता महात्मा शत्रुघ्नांची ती रात्र शीघ्रच निघून गेली. ॥१॥
ततः प्रभाते विमले तस्मिन् काले स राक्षसः ।
निर्गतस्तु पुराद् वीरो भक्ष्याहारप्रचोदितः ॥ २ ॥
तदनंतर निर्मल प्रभातकाल झाल्यावर भक्ष्य पदार्थ तसेच भोजनाच्या संग्रहाच्या इच्छेने प्रेरित होऊन तो वीर राक्षस आपल्या नगरांतून बाहेर पडला. ॥२॥
एतस्मिन्नन्तरे वीरः शत्रुघ्नो यमुनां नदीम् ।
तीर्त्वा मधुपुरद्वारि धनुष्पाणिरतिष्ठत ॥ ३ ॥
इतक्यातच वीर शत्रुघ्न यमुना नदीला पार करून हातात धनुष्य घेऊन मधुपुरीच्या द्वारावर येऊन उभे राहिले. ॥३॥
ततोऽर्धदिवसे प्राप्ते क्रूरकर्मा स राक्षसः ।
आगच्छद् बहुसाहस्रं प्राणिनां भारमुद्वहन् ॥ ४ ॥
तत्पश्चात्‌ मध्याह्न झाल्यावर तो क्रूरकर्मा राक्षस हजारो प्राण्यांचे ओझे घेऊन तेथे आला. ॥४॥
ततो ददर्श शत्रुघ्नं स्थितं द्वारि धृतायुधम् ।
तमुवाच ततो रक्षः किमनेन करिष्यसि ॥ ५ ॥

ईदृशानां सहस्राणि सायुधानां नराधम ।
भक्षितानि मया रोषात् कालेनानुगतो ह्यसि ॥ ६ ॥
त्यासमयी त्याने शत्रुघ्नांना अस्त्रे-शस्त्रे घेऊन द्वारावर उभे असलेले पाहिले. ते पाहून तो राक्षस म्हणाला -नराधमा ! या हत्याराने तू माझे काय करशील ? तुझ्या सारखे हजारो अस्त्र-शस्त्रधारी मनुष्यांना मी रोषपूर्वक खाऊन चुकलो आहे. असे वाटत आहे की काळ तुझ्या मस्तकावर नाचत राहिला आहे. ॥५-६॥
आहारश्चास्य सम्पूर्णो ममायं पुरुषाधम ।
स्वयं प्रविष्टोऽद्य मुखं कथमासाद्य दुर्मते ॥ ७ ॥
पुरुषाधम ! आजचा हा माझा आहारही पूरा नाही आहे. दुर्मते ! तू स्वतःच माझ्या मुखात कसा येऊन पडला आहेस ? ॥७॥
तस्यैवं भाषमाणस्य हसतश्च मुहुर्मुहुः ।
शत्रुघ्नो वीर्यसम्पन्नो रोषादश्रूण्यवासृजत् ॥ ८ ॥
तो राक्षस या प्रकारच्या गोष्टी बोलत वारंवार हसत होता. हे पाहून पराक्रमी शत्रुघ्नांच्या नेत्रातून रोषामुळे अश्रुपात होऊ लागला. ॥८॥
तस्य रोषाभिभूतस्य शत्रुघ्नस्य महात्मनः ।
तेजोमया मरीच्यस्तु सर्वगात्रैर्विनिष्पतन् ॥ ९ ॥
रोषाच्या वशीभूत होऊन महामनस्वी शत्रुघ्नांच्या सर्व अंगांतून तेजोमय किरण विखुरले जाऊ लागले. ॥९॥
उवाच च सुसंक्रुद्धः शत्रुघ्नस्तं निशाचरम् ।
योद्धुमिच्छामि दुर्बुद्धे द्वन्द्वयुद्धं त्वया सह ॥ १० ॥
त्या समयी अत्यंत कुपित झालेले शत्रुघ्न त्या निशाचराला म्हणाले - दुर्बुद्धे ! मी तुझ्याशी द्वंद युद्ध करू इच्छितो. ॥१०॥
पुत्रो दशरथस्याहं भ्राता रामस्य धीमतः ।
शत्रुघ्नो नाम शत्रुघ्नो वधाकाङ्‌क्षी तवागतः ॥ ११ ॥
मी महाराज दशरथांचा पुत्र आणि परम बुद्धिमान्‌ राजा श्रीरामांचा भाऊ आहे. माझे नाव शत्रुघ्न आहे आणि मी कामानेही शत्रुघ्न (शत्रूंचा संहार करणारा)च आहे. या समयी तुझा वध करण्यासाठी येथे आलो आहे. ॥११॥
तस्य मे युद्धकामस्य द्वन्द्वयुद्धं प्रदीयताम् ।
शत्रुस्त्वं सर्वभूतानां न मे जीवन् गमिष्यसि ॥ १२ ॥
मी युद्ध करू इच्छितो म्हणून तू मला द्वंदयुद्धाचा अवसर दे. तू संपूर्ण प्राण्यांचा शत्रु आहेस, म्हणून आता माझ्या हातून जिवंत वाचून जाऊ शकणार नाहीस. ॥१२॥
तस्मिंस्तथा ब्रुवाणे तु राक्षसः प्रहसन्निव ।
प्रत्युवाच नरश्रेष्ठं दिष्ट्या प्राप्तोऽसि दुर्मते ॥ १३ ॥
त्यांनी असे सांगितल्यावर तो राक्षस त्या नरश्रेष्ठ शत्रुघ्नांशी हसत हसत बोलला - दुर्मते ! सौभाग्याची गोष्ट आहे की आज तू स्वतःच येऊन मला भेटला आहेस. ॥१३॥
मम मातृष्वसुर्भ्राता रावणो राक्षसाधिपः ।
हतो रामेण दुर्बुद्धे स्त्रीहेतोः पुरुषाधम ॥ १४ ॥
दुर्बुद्धि असणार्‍या नराधमा ! रावण नामक राक्षस माझी मावशी शूर्पणखा हिचा भाऊ होता, ज्याला तुझा भाऊ राम याने एका स्त्रीच्यासाठी मारून टाकले. ॥१४॥
तच्च सर्वं मया क्षान्तं रावणस्य कुलक्षयम् ।
अवज्ञां पुरतः कृत्वा मया यूयं विशेषतः ॥ १५ ॥
इतकेच नव्हे तर त्याने रावणाच्या कुळाचा संहार केला आहे. तथापि मी हे सर्व काही सहन केले. तुम्ही लोकांनी केलेली अवहेलना समोर ठेवून - प्रत्यक्ष पाहूनही मी तुम्हां सर्वांच्या प्रति विशेषरूपाने क्षमाभावाचा परिचय दिला. ॥१५॥
निहताश्च हि ते सर्वे परिभूतास्तृणं यथा ।
भूताश्चैव भविष्याश्च यूयं च पुरुषाधमाः ॥ १६ ॥
जे नराधम भूतकाळी माझा सामना करण्यासाठी आले होते त्या सर्वांना मी गवताच्या काडीप्रमाणे तुच्छ समजून तिरस्कृत करून त्यांना मारून टाकले. जे भविष्यकाळी येतील त्यांचीही तीच दशा होईल आणि वर्तमानकाळी येणारे तुझ्या सारखे नराधम तर माझ्या हातून मेलेलेच आहेत (असे समज) ॥१६॥
तस्य ते युद्धकामस्य युद्धं दास्यामि दुर्मते ।
तिष्ठं त्वं च मुहूर्तं तु यावदायुधमानये ॥ १७ ॥
दुर्मते ! तुला युद्धाची इच्छा आहे ना ? मी तुला आत्ता युद्धाचा अवसर देतो. तू एक मुहूर्तभर थांब. तो पर्यंत मीही आपले अस्त्र घेऊन येतो. ॥१७॥
ईप्सितं यादृशं तुभ्यं सज्जये यावदायुधम् ।
तमुवाचाशु शत्रुघ्नः क्व मे जीवन् गमिष्यसि ॥ १८ ॥
तुझ्या वधासाठी जसे अस्त्र असणे मला अभीष्ट आहे, तशा अस्त्राला मी प्रथम सुसज्जित करून घेऊन, नंतर युद्धाचा अवसर देईन. हे ऐकून शत्रुघ्न तात्काळ बोलले - आता तू माझ्या हातून जिवंत सुटून कोठे जाशील ? ॥१८॥
स्वयमेवागतः शत्रुः न मोक्तव्यः कृतात्मना ।
यो हि विक्लवया बुद्ध्या प्रसरं शत्रवे दिशेत् ।
स हतो मन्दबुद्धिः स्याद् यद्यथा कापुरुषस्तथा ॥ १९ ॥
कुणी ही बुद्धिमान्‌ पुरुषाने आपल्या समोर आलेल्या शत्रुला सोडता कामा नये. जो आपल्या घाबरलेल्या बुद्धिमुळे शत्रुला निघून जाण्याची संधि देतो, तो मंदबुद्धि पुरुष भित्र्या पुरुषाप्रमाणे मारला जातो. ॥१९॥
तस्मात्सुदृष्टं कुरु जीवलोकं
शरैः शितैस्त्वां विविधैर्नयामि ।
यमस्य गेहाभिमुखं हि पापं
रिपुं त्रिलोकस्य च राघवस्य ॥ २० ॥
म्हणून राक्षसा ! आता तू या जीव-जगताला चांगल्या तर्‍हेने पाहून घे. मी नाना प्रकारच्या तीक्ष्ण बाणांच्या द्वारा तुला पाप्याला आत्ता यमराजाच्या घरी धाडून देतो, कारण की तू तीन्ही लोकांचा तसेच राघवांचाही शत्रु आहेस. ॥२०॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् उत्तरकाण्डेऽष्टषष्टितमः सर्गः ॥ ६८ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील उत्तरकाण्डाचा अडुसष्ठावा सर्ग पूरा झाला. ॥६८॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP