[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीमद् वाल्मीकि रामायणे
अयोध्याकाण्डे
। चतुर्दशाधिकशततमः सर्गः ।
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
भरतेनायोध्यादुरवस्थाया दर्शनमन्तःपुरे प्रविश्य तस्य दुःखपारवश्यम् -
भरतांच्या द्वारा अयोध्येच्या दुरावस्थेचे दर्शन तसेच अंतःपुरात प्रवेश करून भरतांचे दुःखी होणे -
स्निग्धगम्भीरघोषेण स्यन्दनेनोपयान् प्रभुः ।
अयोध्यां भरतः क्षिप्रं प्रविवेश महायशाः ॥ १ ॥
त्यानंतर प्रभावशाली महायशस्वी भरतांनी स्निग्ध, गंभीर, घरघर घोषाने युक्त रथाच्या द्वारे यात्रा करून शीघ्रच अयोध्येत प्रवेश केला. ॥ १ ॥
बिडालोलूकचरितामालीननरवारणाम् ।
तिमिराभ्याहतां कालीमप्रकाशां निशामिव ॥ २ ॥
त्या समयी तेथे बोके आणि घुबडे हिंडत होती. घरांची दारे बंद होती. सार्‍या नगरात अंधकार पसरला होता. प्रकाश नसल्याने ती सर्व पुरी कृष्ण पक्षातील काळ्या रात्रीप्रमाणे भासत होती. ॥ २ ॥
राहुशत्रोः प्रियां पत्‍नीं श्रिया प्रज्वलितप्रभाम् ।
ग्रहेणाभ्युदितेनैकां रोहिणीमिव पीडिताम् ॥ ३ ॥
ज्याप्रमाणे चंद्रम्याची प्रिय पत्‍नी आणि आपल्या शोभेने प्रकाशित कांति असणारी रोहिणी, उदित झालेल्या राहु नामक ग्रहाच्या द्वारा आपल्या पतिचा ग्रास घेतला गेल्यावर एकटी, असहाय होते; त्याच प्रकारे दिव्य ऐश्वर्याने प्रकाशित होणारी अयोध्या राजाच्या कालकवलित होण्याने पीडित आणि असहाय दिसत होती. ॥ ३ ॥
अल्पोष्णक्षुब्धसलिलां धर्मोत्तप्तविहङ्‌गमाम् ।
लीनमीनझषग्राहां कृशां गिरिनदीमिव ॥ ४ ॥
ती पुरी त्या पर्वतीय नदीप्रमाणे कृशकाय दिसत होती, जिचे जल सूर्याच्या किरणांनी तापून किंचित उष्ण आणि गढूळ होत होते, जिच्या परिसरांतील पक्षी उन्हाने संतप्त होऊन पळून गेलेले असावे अथवा जिच्यातील मीन, मत्स्य आणि ग्राह खोल जलांत लपून राहिलेले असावेत. ॥ ४ ॥
विधूमामिव हेमाभां शिखामग्नेः समुत्थिताम् ।
हविरभ्युक्षितां पश्चात् शिखां विप्रलयं गताम् ॥ ५ ॥
जी अयोध्या पूर्वी धूमरहित सोनेरी कांति असलेल्या प्रज्वलित अग्निशिखेसमान प्रकाशित होत असे तीच राम वनवासानंतर हवनीय दुधाने शिंपल्या गेलेल्या अग्निच्या ज्वाळेप्रमाणे विझून जणु विलीन झाली होती. ॥ ५ ॥
विध्वस्तकवचां रुग्णगजवाजिरथध्वजाम् ।
हतप्रवीरामापन्नां चमूमिव महाहवे ॥ ६ ॥
त्या समयी अयोध्या महासमरात संकटग्रस्त झालेल्या सेनेप्रमाणे प्रतीत होत होती. जिच्यातील कवचे तुटून पडलेली असावी; हत्ती, घोडे, रथ आणि ध्वजा छिन्न-भिन्न झालेल्या असाव्यात आणि मुख्य मुख्य वीर मारले गेलेले असावेत. ॥ ६ ॥
सफेना सस्वनां भूत्वा सागरस्य समुत्थिताम् ।
प्रशान्तमारुतोद्‌धूतां जलोर्मिमिव निःस्वनाम् ॥ ७ ॥
प्रबल वायुच्या वेगाने फेन आणि गर्जनेसह उठलेल्या समुद्राच्या उत्ताल लाटा,एकाएकी वायु शांत झाल्यावर ज्याप्रमाणे शिथील आणि नीरव होऊन जातात, त्याप्रमाणे कोलाहलपूर्ण अयोध्या शब्द शून्य झाल्यासारखी भासत होती. ॥ ७ ॥
त्यक्तां यज्ञायुधैः सर्वैरभिरूपैश्च याजकैः ।
सुत्याकाले विनिर्वृत्ते वेदिं गतरवामिव ॥ ८ ॥
यज्ञकाल समाप्त झाल्यावर ’स् पय’आदि यज्ञसंबंधी आयुधे आणि श्रेष्ठ याजकांवाचून सुनी झालेली वेदी जशी मंत्रोच्चारणाच्या ध्वनीरहित होऊन जाते त्याप्रमाणे अयोध्येत शुकशुकाट दिसून येत होता. ॥ ८ ॥
गोष्ठमध्ये स्थितामार्तामचरन्तीं नवं तृणम् ।
गोवृषेण परित्यक्तां गवां पत्‍नीमिवोत्सुकाम् ॥ ९ ॥
ज्याप्रमाणे एखादी गाय वळूबरोबर समागमासाठी उत्सुक झाली असता त्याच अवस्थेत तिला वळूपासून अलग केले जावे आणि ती नूतन गवत चरावयाचे सोडून आर्त भावाने बांधलेली उभी असावी त्याप्रमाणे अयोध्यापुरीही आंतरिक वेदनेने पीडित होती. ॥ ९ ॥
प्रभाकराद्यैः सुस्निग्धैः प्रज्वलद्‌भिरिवोत्तमैः ।
वियुक्तां मणिभिर्जात्यैर्नवां मुक्तावलीमिव ॥ १० ॥
एखाद्या मोत्यांच्या नूतन मालेतून अत्यंत सुंदर आणि चमकदार, उतमोत्तम मोतीची पद्मराग आदि रत्‍ने तिच्याकडून काढून अलग केले असतां ती माळ जशी श्रीहीन दिसते, तशी श्रीराम आदिंच्या रहित झालेली अयोध्याही श्रीहीन झाली होती. ॥ १० ॥
सहसा चरितां स्थानान्महीं पुण्यक्षयाद् गताम् ।
संहृतद्युतिविस्तारां तारामिव दिवश्च्युताम् ॥ ११ ॥
जी पुण्यक्षय झाल्याने एकाएकी आपल्या स्थानापासून भ्रष्ट होऊन पृथ्वीवर येऊन पोहोंचलेली असावी आणि म्हणून जिची विस्तृत प्रभा क्षीण झालेली असावी अशा आकाशांतून पतन पावलेल्या तारकेप्रमाणे अयोध्या शोभाहीन झाली होती. ॥ ११ ॥
पुष्पनद्धां वसन्तान्ते मत्तभ्रमरशालिनीम् ।
द्रुतदावाग्निविप्लुष्टां क्लान्तां वनलतामिव ॥ १२ ॥
जी ग्रीष्म ऋतूत प्रथम फुलांनी लगडलेली असल्याकारणाने मत्त भ्रमरांनी सुशोभित होत होती, आणि नंतर एकाएकी दावानलाच्या झळीने कोमेजून गेली असावी, वनांतील अशा लतेप्रमाणे पूर्वी उल्हासपूर्ण अयोध्या आता उदास होऊन गेली होती. ॥ १२ ॥
सम्मूढनिगमां सर्वां संक्षिप्तविपणापणाम् ।
प्रच्छन्नशशिनक्षत्रां द्यामिवाम्बुधरैर्वृताम् ॥ १३ ॥
तेथील व्यापारी, वाणी वगैरे शोकाने व्याकुळ झाल्याने किंकर्तव्यमूढ झालेले होते. बाजार्‍हाट, मोजकीच दुकाने तेवढी उघडी होती. त्या समयी सारी पुरी ज्या आकाशास ढगांच्या समुदायांनी घेरलेले असून ज्यातील तारे आणि चंद्रमा झाकले गेले आहेत, अशा आकाशाप्रमाणे अयोध्या शोभाहीन झाली होती. ॥ १३ ॥
क्षीणपानोत्तमैर्भग्नैः शरावैरभिसंवृताम् ।
हतशौण्डामिव ध्वस्तां पानभूमिमसंस्कृताम् ॥ १४ ॥
[त्या दिवसात अयोध्यापुरीतील रस्त्यांची झाडून साफसफाई केली गेली नव्हती म्हणून जिकडे तिकडे केरकचर्‍यांचे ढीग सांचले होते, त्या अवस्थेत] ती नगरी, जिची सफाई केली गेलेली नाही, तेथे मद्याचे रिकामे प्याले फुटक्या तुट्क्या अवस्थेत पडलेले आहेत आणि जेथील पिणारेही नष्ट झालेले आहेत; अशा उजाड झालेल्या पानभूमिप्रमाणे (मधुशालेप्रमाणे) श्रीहीन दिसत होती. ॥ १४ ॥
वृक्णभूमितलां निम्नां वृक्णपात्रैः समावृताम् ।
उपयुक्तोदकां भग्नां प्रपां निपतितामिव ॥ १५ ॥
त्या पुरीची दशा, जिच्यांतील खांब तुटले असल्याने जी ढासळली आहे आणि जलपात्रे तुटून फुटून इकडे तिकडे सर्वत्र विखरून पडलेली आहेत अशा पाणपोई सारखी झाली होती. ॥ १५ ॥
विपुलां विततां चैव युक्तपाशां तरस्विनाम् ।
भूमौ बाणैर्विनिष्कृत्तां पतितां ज्यामिवायुधात् ॥ १६ ॥
जी विशाल आणि संपूर्ण धनुष्यात पसरलेली असावी, जिच्या दोन्ही टोकांना बांधण्यासाठी जिच्यात रस्सी जोडलेली असावी; परंतु वेगवान वीरांच्या बाणांनी छाटली जाऊन जी धनुष्यापासून तुटून पृथ्वीवर पडलेली असावी अशा प्रत्यञ्चेप्रमाणेच अयोध्यापुरीही स्थान भ्रष्ट झाल्यासारखीच दिसत होती. ॥ १६ ॥
सहसा युद्धशौण्डेन हयारोहेण वाहिताम् ।
निहतां प्रतिसैन्येन वडवामिव पातिताम् ॥ १७ ॥
जिच्यावर युद्धकुशल घोडेस्वार आरूढ झालेला असावा आणि जिला शत्रुपक्षाच्या सेनेने एकाकी मारून खाली पाडलेले असावे, त्या युद्ध भूमीत पडलेल्या घोडीची जी दशा होते तशी त्या समयी अयोध्यापुरीची झाली होती. (कैकेयीच्या कुकर्माने तिच्या संचालक नरेशांचा स्वर्गवास आणि युवराज वनवासी झाला होता.) ॥ १७ ॥
भरतस्तु रथस्थः सञ्श्रीमान् दशरथात्मजः ।
वाहयन्तं रथश्रेष्ठं सारथिं वाक्यमब्रवीत् ॥ १८ ॥
रथावर बसलेले श्रीमान् दशरथनंदन भरत त्या समयी श्रेष्ठ रथाचे संचलन करणार्‍या सारथि सुमंत्रांना याप्रकारे म्हणाले - ॥ १८ ॥
किं नु खल्वद्य गम्भीरो मूर्च्छितो न निशाम्यते ।
यथापुरमयोध्यायां गीतवादित्रनिःस्वनः ॥ १९ ॥
आता अयोध्येत पूर्वीप्रमाणे सर्वत्र पसरणारा गाण्या-बाजावण्याचा गंभीर नाद ऐकू येत नाही ही किती कष्टाची (दुःखाची) गोष्ट आहे. ॥ १९ ॥
वारुणीमदगन्धश्च माल्यगन्धश्च मूर्च्छितः ।
चन्दनागुरुगन्धश्च न प्रवाति समन्ततः ॥ २० ॥
’आता चारी बाजूने वारुणी(मधु)चा मादक गंध, व्याप्त झालेला फुलांचा सुगंध तसेच चंदन आणि अगुराचा पवित्र गंध पसरत नाही आहे. ॥ २० ॥
यानप्रवरघोषश्च सुस्निग्धहयनिःस्वनः ।
प्रमत्तगजनादश्च महांश्च रथनिःस्वनः ॥ २१ ॥
उत्तम उत्तम वाहनांचे आवाज, घोड्यांच्या खिंकाळण्याचे सुस्निग्ध शब्द, मत्त हत्तींचे चित्कार तसेच रथांच्या घडघडाचा महान् शब्द - हे सर्व ऐकू येत नाहीत. ॥ २१ ॥
नेदानीं श्रूयते पुर्यामस्यां रामे विवासिते ।
चन्दनागुरुगन्धांश्च महार्हाश्च नवस्रजः ॥ २२ ॥

गते रामे हि तरुणाः संतप्ता नोपभुञ्जते ।
बहिर्यात्रां न गच्छन्ति चित्रमाल्यधरा नराः ॥ २३ ॥
श्रीरामचंद्र निर्वासित झाल्यामुळेच या पुरीत या समयी हे सर्व प्रकारचे शब्द ऐकू येत नाहीत. श्रीरामांच्या निघून जाण्यामुळे येथील तरुण फारच संतप्त झालेले आहेत. ते चंदन आणि अगुरुच्या सुगंधाचे सेवन करीत नाहीत तसेच बहुमूल्य वनमालाही धारण करीत नाहीत. आता या पुरीतील लोक विचित्र फुलांचे हार घालून बाहेर हिंडावयासही निघत नाहीत. ॥ २२-२३ ॥
नोत्सवाः सम्प्रवर्तन्ते रामशोकार्दिते पुरे ।
सा हि नूनं मम भ्रात्रा पुरस्यास्य द्युतिर्गता ॥ २४ ॥
श्रीरामांच्या शोकाने पीडित झालेल्या या नगरात आता नाना प्रकारचे उत्सवही होत नाहीत. निश्चितच या पुरीची ती सारी शोभा माझ्या भावाबरोबरच निघून गेली आहे. ॥ २४ ॥
नहि राजत्ययोध्येयं सासारेवार्जुनी क्षपा ।
कदा नु खलु मे भ्राता महोत्सव इवागतः ॥ २५ ॥

जनयिष्यत्ययोध्यायां हर्षं ग्रीष्म इवाम्बुदः ।
ज्याप्रमाणे वेगयुक्त वर्षा झाल्यामुळे शुक्लपक्षातील चांदणी रात्रही शोभून दिसत नाही; आता माझे भाऊ महोत्सवाप्रमाणे केव्हामयोध्येत परत येतील आणि ग्रीष्म ऋतूत प्रकट होणार्‍या मेघाप्रमाणे सर्वांच्या हृदयात हर्षाचा संचार करतील ? ॥ २५ १/२ ॥
तरुणैश्चारुवेषैश्च नरैरुन्नतगामिभिः ॥ २६ ॥

संपतद्‌भिरयोध्यायां नाभिभान्ति महापथाः ।
आता अयोध्येतील मोठमोठे रस्ते हर्षाने उसळी मारून चालणार्‍या मनोहर वेष धारण केलेल्या तरुणांच्या शुभागमनाने शोभा प्राप्त करीत नाहीत." ॥ २६ १/२ ॥
इति ब्रुवन् सारथिना दुःखितो भरतस्तदा ॥ २७ ॥

अयोध्यां सम्प्रविश्यैव विवेश वसतिं पितुः ।
तेन हीनां नरेन्द्रेण सिंहहीनां गुहामिव ॥ २८ ॥
याप्रकारे सारथ्याशी बोलत बोलत दुःखी भरत त्या समयी सिंहाच्या विरहित असलेल्या गुफेप्रमाणे राजा दशरथांशिवाय असलेल्या पित्याच्या निवासस्थानी राजमहालात गेले. ॥ २७-२८ ॥
तदा तदन्तःपुरमुज्झितप्रभं
     सुरैरिवोत्कृष्टमभास्करं दिनम् ।
निरीक्ष्य सर्वत्र विभक्तमात्मवान्
     मुमोच बाष्पं भरतः सुदुःखितः ॥ २९ ॥
ज्याप्रमाणे सूर्य दिसेनासा झाला की, दिवसाची शोभानष्ट होऊन जाते, आणि देवता शोक करू लागतात, त्याचप्रकारे त्या समयी ते अंतःपुर शोभाहीन झालेले होते आणि तेथील लोक शोकमग्न होते. त्याला सर्व बाजूंनी स्वच्छता आणि सजावट याशिवाय पाहून भरत धैर्यवान् असूनही अत्यंत दुःखी होऊन अश्रु ढाळू लागले. ॥ २९ ॥
इत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीये आदिकाव्येऽयोध्याकाण्डे चतुर्दशाधिकशततमः सर्गः ॥ ११४ ॥
या प्रकारे श्रीवाल्मिकीनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील अयोध्याकाण्डाचा एकशे चौदावा सर्ग पूरा झाला ॥ ११४ ॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP