श्रीमद् वाल्मीकि रामायणे
बालकाण्डे
। त्रिपञ्चाशः सर्गः ।
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
कामधेनुसाहाय्येनोत्तमान्नपानतस्तृप्तेन ससैन्येन विश्वामित्रेण वसिष्ठं प्रति कामधेनोरेव याचनं, वसिष्ठेन तु तद्‌याञ्चाया अनङ्‌गीकरणम् - कामधेनूच्या सहाय्याने उत्तम अन्न-पान द्वारा सेनेसहित तृप्त झालेल्या विश्वामित्रांनी वसिष्ठांजवळ त्यांच्या कामधेनूची मागणी करणे आणि त्यांनी देण्यास नकार देणे -
एवमुक्ता वसिष्ठेन शबला शत्रुसूदन ।
विदधे कामधुक् कामान् यस्य यस्येप्सितं यथा ॥ १ ॥
'शत्रुसूदन ! महर्षि वसिष्ठांनी असे सांगितल्यावर चितकबर्‍या रंगाच्या त्या कामधेनूने ज्याची जशी इच्छा होती त्याच्यासाठी तशीच सामग्री जुळवली ॥ १ ॥
इक्षून् मधूंस्तथा लाजान् मैरेयांश्च वरासवान् ।
पानानि च महार्हाणि भक्ष्यांश्चोच्चावचानपि ॥ २ ॥
ऊस, मधु, लावा, मैरेय, श्रेष्ठ आसवे, पानक रस आदि नाना प्रकारचे बहुमूल्य भक्ष्य पदार्थ प्रस्तुत केले. ॥ २ ॥
उष्णाढ्यस्यौदनस्यात्र राशयः पर्वतोपमाः ।
मृष्टान्यन्नानि सूपांश्च दधिकुल्यास्तथैव च ॥ ३ ॥
गरम गरम भाताचे पर्वत सदृश ढीग लावले गेले. मिष्टान्न (खीर आदि) आणि डाळ आदिही तयार झाले. दूध, दही आणि तुपाचे तर पाटच वाहू लागले. ॥ ३ ॥
नानास्वादुरसानां च खाण्डवानां तथैव च ।
भोजनानि सुपूर्णानि गौडानि च सहस्रशः ॥ ४ ॥
नाना प्रकारचे सुस्वादु रस , खाण्डन तथा नाना प्रकारच्या भोजनांनी भरलेल्या हजारो चांदीच्या थाळ्या सजविल्या गेल्या. ॥ ४ ॥
सर्वमासीत् सुसंतुष्टं हृष्टपुष्टजनायुतम् ।
विश्वामित्रबलं राम वसिष्ठेन सुतर्पितम् ॥ ५ ॥
श्रीरामा ! महर्षि वसिष्ठांनी विश्वामित्रांच्या सैन्यातील सार्‍या लोकांना उत्तम प्रकारे तृप्त केले. त्या सेनेत बरेच हृष्ट-पुष्ट सैनिक होते. ते सर्व दिव्य भोजन मिळाल्याने फार संतुष्ट झाले. ॥ ५ ॥
विश्वामित्रो हि राजर्षिर्हृष्टपुष्टस्तदाभवत् ।
सांतःपुरवरो राजा सब्राह्मणपुरोहितः ॥ ६ ॥
राजर्षि विश्वामित्रही त्या समयी अंतःपुरातील राण्या, ब्राह्मण आणि पुरोहितांसह बरेच संतुष्ट झाले. ॥ ६ ॥
सामात्यो मन्त्रिसहितः सभृत्यः पूजितस्तदा ।
युक्तः परमहर्षेण वसिष्ठमिदमब्रवीत् ॥ ७ ॥
अमात्य, मंत्री आणि भृत्यांसहित पूजित होऊन ते फार प्रसन्न झाले आणि वसिष्ठांना या प्रकारे म्हणाले - ॥ ७ ॥
पूजितोऽहं त्वया ब्रह्मन् पूजार्हेण सुसत्कृतः ।
श्रूयतामभिधास्यामि वाक्यं वाक्यविशारद ॥ ८ ॥
"ब्रह्मन् ! आपण स्वतः मला पूजनीय आहात तरीही आपण माझे पूजन केलेत, उत्तम प्रकारे स्वागत सत्कार केलात. वाक्यविशारद महर्षे ! आता मी एक गोष्ट सांगतो ती ऐकावी. ॥ ८ ॥
गवां शतसहस्रेण दीयतां शबला मम ।
रत्‍नं हि भगवन्नेतद् रत्‍नहारी च पार्थिवः ॥ ९ ॥

तस्मान्मे शबलां देहि ममैषा धर्मतो द्विज ।
'भगवन् ! आपण माझ्यापासून एक लाख गायी घेऊन ही चितकबरी गाय मला देऊन टाका; कारण ही गाय रत्‍नरूप आहे आणि र‍त्‍न घेण्याचा अधिकारी राजा असतो. ब्रह्मन् ! माझ्या या कथनाकडे लक्ष देऊन मला ही शबला गाय द्यावी. कारण धर्मतः ही माझी वस्तु आहे." ॥ ९ १/२ ॥
एवमुक्तस्तु भगवान् वसिष्ठो मुनिपुङ्‌गवः ॥ १० ॥

विश्वामित्रेण धर्मात्मा प्रत्युवाच महीपतिम् ।
विश्वामित्रांनी असे म्हटल्यावर धर्मात्मा मुनिवर भगवान् वसिष्ठ राजाला उत्तर देत म्हणाले - ॥ १० १/२ ॥
नाहं शतसहस्रेण नापि कोटिशतैर्गवाम् ॥ ११ ॥

राजन् दास्यामि शबलां राशिभी रजतस्य वा ।
न परित्यागमर्हेयं मत्सकाशादरिंदम ॥ १२ ॥
"शत्रूंचे दमन करणार्‍या नरेश्वरा ! मी एक लाख गायी अथवा शंभर कोटी गायींच्या बदल्यात, अथवा चांदीची रास घेऊनही त्याच्या बदल्यात या शबला गायीला देणार नाही. ही माझ्यापासून लांब (वेगळी) राहण्यास योग्य नाही. ॥ ११-१२ ॥
शाश्वती शबला मह्यं कीर्तिरात्मवतो यथा ।
अस्यां हव्यं च कव्यं च प्राणयात्रा तथैव च ॥ १३ ॥
ज्याप्रमाणे मनस्वी पुरुषाची अक्षय कीर्ति त्याच्यापासून अलग राहू शकत नाही त्याप्रमाणे ही सदा माझ्याशी संबंध ठेवणारी शबला गाय माझ्यापासून पृथक् राहू शकत नाही. माझे हव्य-कव्य आणि जीवन निर्वाह हिच्यावरच निर्भर आहे. ॥ १३ ॥
आयत्तमग्निहोत्रं च बलिर्होमस्तथैव च ।
स्वाहाकारवषट्कारौ विद्याश्च विविधास्तथा ॥ १४ ॥
'राजर्षे ! माझे अग्निहोत्र, बलि, होम, स्वाहा, षट्कार आणि नाना प्रकारच्या विद्या या कामधेनूच्याच अधीन आहेत. ॥१४ ॥
आयत्तमत्र राजर्षे सर्वमेतन्न संशयः ।
सर्वस्वमेतत् सत्येन मम तुष्टिकरी तथा ॥ १५ ॥

कारणैर्बहुभी राजन् न दास्ये शबलां तव ।
राजर्षे ! माझे हे सर्व काही या गायीच्याच स्वाधीन आहे यांत संशय नाही, हे मी खरे सांगत आहे. ही गाय हेच माझे सर्वस्व आहे आणि तीच मला सर्वप्रकारे संतुष्ट करणारी आहे. राजन् ! बरीच अशी कारणे आहेत की ज्यांनी बध्य होऊन मी ही शबला गाय आपल्याला देऊ शकत नाही. ॥ १५ १/२ ॥
वसिष्ठेनैवमुक्तस्तु विश्वामित्रोऽब्रवीत् तदा ॥ १६ ॥

संरब्धतरमत्यर्थं वाक्यं वाक्यविशारदः ।
वसिष्ठांनी असे म्हटल्यावर संभाषण कुशल विश्वामित्र अत्यंत क्रोधाने या प्रकारे बोलले - ॥ १६ १/२ ॥
हैरण्यकक्ष्यग्रैवेयान् सुवर्णाङ्‍कुशभूषितान् ॥ १७ ॥

ददामि कुञ्जराणां ते सहस्राणि चतुर्दश ।
'मुने ! मी तुम्हाला चवदा हजार असे हत्ती देत आहे की ज्यांना बांधून ठेवण्याचे दोर, गळ्यातील आभूषणे आणि अंकुशही सोन्याचे बनविलेले असतील आणि त्या सर्वांनी ते हत्ती विभूषित होतील. ॥ १७ १/२ ॥
हैरण्यानां रथानां ते श्वेताश्वानां चतुर्युजाम् ॥ १८ ॥

ददामि ते शतान्यष्टौ किङ्‌किणीकविभूषितान् ।
हयानां देशजातानां कुलजानां महौजसाम् ।
सहस्रमेकं दश च ददामि तव सुव्रत ॥ १९ ॥

नानावर्णविभक्तानां वयःस्थानां तथैव च ।
ददाम्येकां गवां कोटिं शबला दीयतां मम ॥ २० ॥
उत्तम व्रताचे पालन करणार्‍या मुनीश्वरा ! याशिवाय मी आठशे सुवर्णमय रथ प्रदान करीन ज्याच्यात शोभेसाठी सोन्याचे घूंगुर लावलेले असतील, आणि प्रत्येक रथाला चार चार श्वेत रंगाचे घोडे जोडलेले असतील. तसेच चांगल्या जातीचे आणि उत्तम देशात उत्पन्न झालेले महातेजस्वी अकरा हजार घोडेही आपल्या सेवेत अर्पण करीन. इतकेच नव्हे तर नाना प्रकारच्या रंगांच्या नविन अवस्था असलेल्या एक कोटी गायीही देईन. परंतु ही शबला गाय मला द्या. ॥ १८-२० ॥
यावदिच्छसि रत्‍नानि हिरण्यं वा द्विजोत्तम ।
तावद् ददामि तत्सर्वं दीयतां शबला मम ॥ २१ ॥
द्विजश्रेष्ठ ! या व्यतिरिक्त आपण जितकी रत्‍ने अथवा सुवर्ण घेण्याची इच्छा कराल, ते सर्व आपल्याला द्यावयास मी तयार आहे. परंतु ही चितकबरी गाय मला द्यावी." ॥ २१ ॥
एवमुक्तस्तु भगवान् विश्वामित्रेण धीमता ।
न दास्यामीति शबलां प्राह राजन् कथञ्चन ॥ २२ ॥
बुद्धिमान विश्वामित्रांनी असे म्हटल्यावर भगवान वसिष्ठ म्हणाले - "राजन् ! मी ही चितकबरी गाय तुम्हाला कोणत्याही प्रकारे देणार नाही. ॥ २२ ॥
एतदेव हि मे रत्‍नमेतदेव हि मे धनम् ।
एतदेव हि सर्वस्वमेतदेव हि जीवितम् ॥ २३ ॥
'हीच माझे र‍त्‍न आहे, हीच माझे धन आहे, हीच माझे सर्वस्व आहे, आणि हीच माझे जीवन आहे. ॥ २३ ॥
दर्शश्च पौर्णमासश्च यज्ञाश्चैवाप्तदक्षिणाः ।
एतदेव हि मे राजन् विविधाश्च क्रियास्तथा ॥ २४ ॥
'राजन् ! माझे दर्श, पौर्णमास, प्रचुर दक्षिणावाले यज्ञ आणि निरनिराळ्या प्रकारची पुण्यकर्मे ही सर्व ही गायच आहे. हिच्यावरच माझे सर्व काही निर्भर आहे. ॥ २४ ॥
अतोमूलाः क्रियाः सर्वा मम राजन् न संशयः ।
बहुना किं प्रलापेन न दास्ये कामदोहिनीम् ॥ २५ ॥
'नरेश्वर ! माझ्या सर्व शुभकर्मांचे मूल हीच आहे यात संशय नाही. जास्त व्यर्थ गोष्टी बोलून काय लाभ ? मी या कामधेनुला कदापि देणार नाही. ॥ २५ ॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् बालकाण्डे त्रिपञ्चाशः सर्गः ॥ ५३ ॥
या प्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यातील बालकाण्डाचा त्रेपन्नावा सर्ग समाप्त झाला. ॥ ५३ ॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP