[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीमद् वाल्मीकि रामायणे
अरण्यकाण्डे
॥ षट्षष्ठितमः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
लक्ष्मणेन श्रीरामस्य प्रबोधनम् -
लक्ष्मणांचे श्रीरामास समजाविणे -
तं तथा शोकसन्तप्तं विलपन्तमनाथवत् ।
मोहेन महाता युक्तं परिद्यूनमचेतनम् ॥ १ ॥

ततः सौमित्रिराश्वास्य मुहूर्तादिव लक्ष्मणः ।
रामं संबोधयामास चरणै चाभिपीडयन् ॥ २ ॥
श्रीराम शोकाने संतप्त होऊन अनाथाप्रमाणे विलाप करू लागले. ते महान्‌ मोहाने युक्त आणि अत्यंत दुर्बल होऊन गेले. त्यांचे चित्त स्वस्थ नव्हते. त्यांना या अवस्थेत पाहून सौमित्र लक्ष्मणाने मुहूर्तभर त्यांना आश्वासन दिले. नंतर त्यांचे पाय चेपत ते त्यांना समजावूं लागले - ॥१-२॥
महता तपसा चापि महता चापि कर्मणा ।
राज्ञा दशरथेनासीlलब्धोऽमृतमिवामरैः ॥ ३ ॥
बंन्धो ! आपले पिता महाराज दशरथ यांनी खूप तपस्या आणि महान्‌ कर्माचे अनुष्ठान करून आपल्याला पुत्ररूपाने प्राप्त केले होते जसे देवतांनी महान्‌ प्रयत्‍नाने अमृत प्राप्त केले होते. ॥३॥
तव चैव गुणैर्बद्धsत्वद्वियोगान्महीपतिः ।
राजा देवत्वमापन्नो भरतस्य यथा श्रुतम् ॥ ४ ॥
आपण भरताच्या मुखाने जसे ऐकले होते त्यास अनुसरून भूपाल महाराज दशरथ आपल्याच गुणांनी बद्ध झालेले होते आणि आपलाच वियोग होण्यामुळे देवलोकास प्राप्त झाले. ॥४॥
यदि दुःखमिदं प्राप्तं काकुत्स्थ न सहिष्यसे ।
प्राकृतश्चाल्पसत्त्वश्च इतरः कः सहिष्यति ॥ ५ ॥
काकुत्स्थ ! जर आपल्यावर आलेल्या या दुःखास आपणच धैर्यपूर्वक सहन केले नाहीत तर दुसरा कुठला साधारण पुरुष, ज्याची शक्ती अति मर्यादित असते, सहन करू शकेल ? ॥५॥
आश्वसिहि नरश्रेष्ठ प्राणिनः कस्य नापदः ।
संस्पृशन्त्यग्निवद् राजन् क्षणेन व्यपयान्ति च ॥ ६ ॥
नरश्रेष्ठ ! आपण धैर्य धारण करावे ! संसारात कुठल्या प्राण्यावर आपत्ती येत नाहीत ? राजन्‌ ! आपत्ती अग्निप्रमाणे एका क्षणात स्पर्श करतात आणि दुसर्‍याच क्षणी निघून जातात. ॥६॥
दुःखितो हि भवाँल्लोकांस्तेजसा यदि धक्ष्यते ।
आर्ताः प्रजा नरव्याघ्र क्व नु यास्यन्ति निर्वृतिम् ॥ ७ ॥
पुरुषसिंह ! जर आपण दुःखी होऊन आपल्या तेजाने समस्त लोकांना दग्ध करून टाकाल तर पीडित झालेली प्रजा कुणाला शरण जाऊन सुख आणि शांति मिळवेल ? ॥७॥
लोकस्वभाव एवैष ययातिर्नहुषात्मजः ।
गतः शक्रेण सालोक्यमनयस्तं समस्पृशत् ॥ ८ ॥
लोकांचा हा स्वभावच आहे की येथे सर्वांवर दुःख-शोक येत-जात रहात असते. नहुषपुत्र ययातिला इंद्रासमान लोकाची (देवेन्द्र पदाची) प्राप्ती झाली होती. परंतु तेथेही अन्यायमूलक दुःख त्यांना स्पर्श केल्यावाचून राहिले नाही. ॥८॥
महर्षिर्यो वसिष्ठस्तु यः पितुर्नः पुरोहितः ।
अह्ना पुत्रशतं जज्ञे तथैवास्य पुनर्हतम् ॥ ९ ॥
आपल्या पित्याचे पुरोहित जे महर्षि वसिष्ठ आहेत त्यांना एकाच दिवशी शंभर पुत्र प्राप्त झाले आणि नंतर एकाच दिवशी ते सर्वच्या सर्व विश्वामित्रांच्या हस्ते मारले गेले. ॥९॥
या चेयं जगतो माता सर्वलोकनमस्कृता ।
अस्याश्च चलनं भूमेः दृश्यते कोसलेश्वर ॥ १० ॥
कोसलेश्वर ! ही जी विश्ववंदिता जगन्माता पृथ्वी आहे, हिचे ही हलणे- डोलणे दिसून येत असते. ॥१०॥
यौ धर्मौ जगतौ नेत्रौ यत्र सर्वं प्रतिष्ठितम् ।
आदित्यचंद्रौ ग्रहणमभ्युपेतौ महाबलौ ॥ ११ ॥
जे धर्माचे प्रवर्तक आणि संसाराचे नेत्र आहेत, ज्यांच्या आधारावर हे सारे जगत टिकून आहे, ते महाबली सूर्य आणि चंद्रमाही राहुच्या द्वारा ग्रहणास प्राप्त होत असतात. ॥११॥
सुमहान्त्यपि भूतानि देवाश्च पुरुषर्षभ ।
न दैवस्य प्रमुञ्चन्ति सर्वभूतानि देहिनः ॥ १२ ॥
पुरुषप्रवर ! मोठ मोठी भूते आणि देवता देखील दैवाच्या (प्रारब्ध कर्माच्या) अधीनतेपासून मुक्त होऊ शकत नाहीत, मग समस्त देहधारी प्राण्यांच्या बद्दल तर काय सांगावे ! ॥१२॥
शक्रादिष्वपि देवेषु वर्तमानौ नयानयौ ।
श्रूयेते नरशार्दूल न त्वं शोचितुमर्हसि ॥ १३ ॥
नरश्रेष्ठ ! इंद्र आदि देवतांनाही नीति आणि अनीतिमुळे सुख आणि दुःखाची प्राप्ती होते असे ऐकिवात आहे; म्हणून आपण शोक करता उपयोगी नाही. ॥१३॥
मृतायामपि वैदेह्यां नष्टायामपि राघव ।
शोचितुं नार्हसे वीर यथान्यः प्राकृतस्तथा ॥ १४ ॥
वीर रघुनंदना ! वैदेही सीता जरी मारली गेली अथवा नष्ट होऊन गेली तरीही आपण प्राकृत माणसाप्रमाणे शोक चिन्ता करता कामा नये. ॥१४॥
त्वद्विधा न हि शोचन्ति सततं सर्वदर्शनाः ।
सुमहत्स्वपि कृच्छ्रेषु रामानिर्विण्णदर्शनाः ॥ १५ ॥
श्रीरामा ! आपल्या सारखे सर्वज्ञ पुरुष मोठ्‍यात मोठी विपत्ती आल्यावरही कधी शोक करीत नाहीत. ते निर्वेद (खेद) रहित होऊन आपल्या विचार शक्तिला नष्ट होऊ देत नाहीत. ॥१५॥
तत्त्वतो हि नरश्रेष्ठ बुद्ध्या समनुचिन्तय ।
बुद्ध्या युक्ता महाप्राज्ञा विजानन्ति शुभाशुभे ॥ १६ ॥
नरश्रेष्ठ ! आपण बुद्धिच्या द्वारा तात्विक विचार करावा - काय करावयास पाहिजे आणि काय नाही; काय उचित आहे आणि काय अनुचित - याचा निश्चय करावा; कारण बुद्धियुक्त महाज्ञानी पुरुषच शुभ आणि अशुभ (कर्तव्य- अकर्तव्य, तसेच उचित- अनुचित) यास उत्तम प्रकारे जाणतात. ॥१६॥
अदृष्टगुणदोषाणामध्रुवाणां तु कर्मणाम् ।
नान्तरेण क्रियां तेषां फलमिष्टं च वर्तते ॥ १७ ॥
ज्यांचे गुण-दोष पाहिले अथवा जाणले गेलेले नाहीत तसेच जे अध्रुव आहे - फळ देऊन नष्ट होणारे आहे, अशा कर्मांचे शुभाशुभ फळ त्यांना आचरणात आणल्याशिवाय प्राप्त होत नाही. ॥१७॥
मामेवं हि पुरा राम त्वमेव बहुशोक्तवान् ।
अनुशिष्याद्धि को नु त्वामपि साक्षाद् बृहस्पतिः ॥ १८ ॥
वीर ! पूर्वी आपणच अनेक वेळा अशा प्रकारच्या गोष्टी सांगून मला समजावून चुकला आहात, आपल्याला कोण शिकवू शकणार आहे ? साक्षात्‌ बृहस्पतिही आपल्याला उपदेश देण्याची शक्ती ठेवू शकत नाही. ॥१८॥
बुद्धिश्च ते महाप्राज्ञ देवैरपि दुरन्वया ।
शोकेनाभिप्रसुप्तं ते ज्ञानं संबोधयाम्यहम् ॥ १९ ॥
महाप्राज्ञ ! देवतांनाही आपल्या बुद्धिचा पत्ता लागणे कठीण आहे. या समयी शोकामुळे आपले ज्ञान जणु हरवल्या सारखे वाटत आहे. म्हणून मी त्यास जागे करीत आहे. ॥१९॥
दिव्यं च मानुषं चैवं आत्मनश्च पराक्रमम् ।
इक्ष्वाकुवृषभावेक्ष्य यतस्व द्विषतां वधे ॥ २० ॥
इक्ष्वाकुकुलशिरोमणे ! आपल्या देवोचित तथा मानवोचित पराक्रमाला जाणून त्याचा योग्य समयी उपयोग करून त्याचा आपण शत्रुंचा वध करण्याचा प्रयत्‍न करावा ॥२०॥
किं ते सर्वविनाशेन कृतेन पुरुषर्षभ ।
तमेव तु रिपुं पापं विज्ञायोद्धर्तुमर्हसि ॥ २१ ॥
पुरुषप्रवर ! समस्त संसाराचा विनाश करून आपल्याला काय लाभ होणार आहे ? त्या पापी शत्रुचा पत्ता लावून त्यालाच उचलून फेकून देण्याचा प्रयत्‍न करावयास पाहिजे. ॥२१॥
इत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीये आदिकाव्येऽरण्यकाण्डे षट्षष्ठितमः सर्गः ॥ ६६ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकि निर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील अरण्यकाण्डाचा सहासष्टावा सर्व पूरा झाला. ॥६६॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP