| 
 
  ॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥ 
 ॥ श्रीभावार्थरामायण ॥ 
 युद्धकांड 
 ॥  अध्याय सातवा ॥  अंगदाकडून रावणाची निंदा
 
 ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ 
अंगदाचे रावणाच्या सभेत उड्डाण : 
अंगद आकाशमार्गेंसीं । शीघ्र आला तो  लंकेसीं ।प्रवेशला रावणसभेसीं । अति विन्यासीं ते ऐका ॥ १ ॥
 
 
सोऽभिपत्य मुहूर्तेन श्रीमद्रावणमंदिरम् ।ददर्शासीनमव्यग्रं रावणं सचिवैःसह ॥१॥
 ततस्तस्याविदूरेण निपत्य हरिपुंगवः ॥२॥
 
सभासद व रावणावर त्याचा परिणामः 
रावणसभेपुढें जाण । आलें अंगदाचें   उड्डाण ।तेणें दचकला दशानन । कंपायमान भयभीत ॥ २ ॥
 पडतां अंगदाची उडी । लंका अत्यंत हडबडी ।
 दडाल्या वीरांचिया कोडी । जालीं बापुडीं राक्षसें ॥ ३ ॥
 कराव्या अवघ्यांचा घात । पुढतीं आला रें हनुमंत ।
 ऐसा वळसा लंकेआंत । अति आकांत राक्षसां ॥ ४ ॥
 कपिभयें भयभीत । रावणसभा पैं समस्त ।
 जैसें चित्रींचें लिखित । तैसें तटस्थ अवघेही ॥ ५ ॥
 अंगदेसीं स्वयें संमुख । बोलो न शके दशमुख ।
 आणीक कोण बोले मशक । टकमक पाहती राक्षस ॥ ६ ॥
 होतां अंगदाचें आगमन । राक्षसां पाडिलें   महामौन ।
 चाकाटला दशानन । तें देखोन कपिबोले ॥ ७ ॥
 मी तंव सभेचा अतीत । कोणी पुसेना स्वागत ।
 भयभ्रमें अति भ्रांत । निजनिश्चित महामूर्ख ॥ ८ ॥
 तुम्हा अवघ्यांसीं पडिलें मौन । त्याही मौनाचें कारण ।
 तें म्यां लक्षिलें संपूर्ण । सावधान अवधारा ॥ ९ ॥
 
अंगद त्याचे कारण सांगतो : 
वानरांच्या निजदळीं । श्रीराम आला आतुर्बळी ।तेणें तुम्हां दांतखिळी । वचनावळी खुंटली ॥ १० ॥
 अचुकसंधानी रघुनाथ । देखोनियां छत्रपात ।
 वेडावला लंकानाथ । युक्तायुक्त विसरला ॥ ११ ॥
 येतां देखोनि रघुनंदन । राक्षससभा आणि ।
 प्रधान अवघ्यां पडलें महामौन । वचनावचन खुंटलें ॥ १२ ॥
 असो ही श्रीरामाची ख्याती । तुम्हांसी गांगिलें मारुतीं ।
 खुंटली हनुमंतें वचनोक्ती । तेही उपपत्ती अवधारा  ॥ १३ ॥
 
हनुमंताच्या पराक्रमाचा प्रताप : 
हनुमान अशोक वनीं बळी । केली राक्षसा रवंदळी ।तेणें तुम्हां दांतखिळी । वचनावळी खुंटली ॥ १४ ॥
 हनुमान पुच्छाच्या निजज्वाळीं । लंका करितां पैं होळी ।
 तेणे बैसली दांतखिळी । वचनावळी खुंटली ॥ १५ ॥
 अचुकसंधानी रघुनाथ बळी । कपिपुच्छाच्या निजज्वाळीं ।
 केली राक्षसां रवंदळी । वचनावळी खुंटली   ॥ १६ ॥
 रावणें फुकितां अग्निज्वाळी । खांडमिशां जाहली होळी ।
 तेणें बैसली दांतखिळी । वचनावळी खुंटली ॥ १७ ॥
 हनुमंतें राक्षसांस । रणीं दिधला अति त्रास ।
 तेणें वाचा पडली ओस । कोणी कोणास पुसेना ॥ १८ ॥
 लंकेसीं भोवडोनि आवर्त । आतुर्बळी हनुमंत ।
 कैसा असे रामकटकांत । कपिवृत्तांत अवधारा ॥ १९ ॥
 
 
यो युष्माकमदीदहत्पुरमिदं योऽदीदलत्काननंयोऽक्षं वीरममीमरद्रिरिगुहां यौऽबीभरद्राक्षसान् ।
 सोऽस्माकं कटके कदाचिदपि नो र्वरिषु संभाव्यते
 दूतत्वेन इतस्ततः प्रतिदिनं संप्रेष्यते सांप्रतम् ॥ ३ ॥
 
 
जो कां अशोकवनाआंत । वने उपाडी हनुमंत ।करोनि अखयाचा घात । केला निःपात राक्षसां ॥ २० ॥
 वनकर किंकर प्रधानपुत्र । हेही मारिले समग्र ।
 गांगोनि इंद्रजित ज्येष्ठ कुमर । सैन्यसंभार निर्दाळिला ॥ २१ ॥
 रावण अपमानोनियां भारी । जाळोनिया लंकापुरी ।
 मारोनियां राक्षसहारी । लंकागिरिदरी पूर्ण केली ॥ २२ ॥
 राक्षसदातांच्या राशी थोरी । हनुमान मोजी कुडवेंवरी ।
 तो श्रीराम कटकामाझारी । महावीरीं गणिजेना ॥ २३ ॥
 सांपेंसांपे पैं देख । चिट्टीपत्रांचे पायिक ।
 लंके धाडिले ते एक रंक । अति मशक हनुमंत  ॥ २४ ॥
 
रावणाची दुरुक्ती : 
करावया अंगदाचें छळण । दुरुक्तिबोलाचें विंदान ।स्वयें अनुवादे रावण । सावधान अवधारा ॥ २५ ॥
 सांडूनि दुर्गद्वारभूमी । तूं आलासी अमार्गगामी ।
 यालागीं तुजसी न बोलों आम्ही । मौनानुक्रमीं राहिलों ॥ २६ ॥
 अमार्गगाम्यासी संभाषण । हें तव आम्हांसी अति दूषण ।
 ऐकोनि रावणाचें वचन । हास्यवदन अंगद ॥ २७ ॥
 
 
श्लोकार्ध – सपश्यति परं दोषमात्मदोषं न पश्यति ॥ ४ ॥ 
अंगदाची प्रतिक्रिया, रावणाचा उपहास व बळाचा अविष्कार : 
रावणा ऐक   सावधान । देखती पुढिलांचे अवगुण ।आपुलें न देखती दूषण । रासभ पूर्ण ते एक      ॥ २८ ॥
 पुच्छ रासभाचे ठायीं । हे तंव लांडे गधडे पाहीं ।
 स्वधर्मविवेक ज्यां नाहीं । ते तर भुई भारभूत ॥ २९ ॥
 वानरां आकाशगमन । हें तव आमुचें स्वधर्माचरण ।
 स्वधर्मा लाविजे जें दुषण । शूकर श्वान तो एक ॥ ३० ॥
 मुख्य अधर्म तस्करपण । तेहीं परदारहरण ।
 खतेला पापी तूं रावण । काळें वदन तिहीं लोकीं ॥ ३१ ॥
 वेदबाह्य तूं एक जाण । स्वधर्मकर्मीं तुज दुषण ।
 महापापी तूं रावण । काळें वदन तिहीं लोकी ॥ ३२ ॥
 निकट देखोनि रावण । त्याचें करावया निर्दळण ।
 आलें अंगदासी स्फुरण । रोम संपूर्ण थरकती ॥ ३३ ॥
 रावण मारीन मारिलिया ठायीं । अवघी खंडली शिष्टाई ।
 म्हणोनि सरसावला पाहीं । आठव कांहीं नाठवे ॥ ३४ ॥
 अंगद खवळला देखोन ।चळीं कांपे   दशानन ।
 राक्षस कांपती प्रधान । दुसरें विघ्न हें आलें ॥ ३५ ॥
 पहिला करोनि गेला  होळी । दुसरा आला त्याहूनि बळी ।
 राक्षस कांपती चळाचळीं । आतुर्बळी वानर ॥ ३६ ॥
 लंका निरोधी श्रीरघुनाथ । निःशंक एकला रामदूत ।
 आम्हांसी करुं आला अंत । चळीं कांपत राक्षस ॥ ३७ ॥
 अंगदाचें दृष्टीकडे । पाहतां रावण जालें वेडें ।
 राक्षससैन्य तें  बापुडें । येर दडे येरामागें ॥ ३८ ॥
 रावणहंता श्रीरघुनाथ । यालागीं न मारीच हनुमंत ।
 मूर्खपणे मी उन्मत्त । लंकानाथ मारुं पाहें ॥ ३९ ॥
 करितां श्रीरामनामस्मरण । समूळ पळे मूर्खपण ।
 क्रोधानुवृत्तीं गिळोनि जाण । सावधान पैं जाला ॥ ४० ॥
 स्वमुखें बोलिला रघुपती । अंगदाअंगीं शौर्य शांती ।
 गिळोनियां क्रोधनुवृत्ती । सभेप्रति बैसला ॥ ४१ ॥
 
 
तस्य वेदवसुयोजनमानं भद्रपीठमुदवेक्ष्य सुंदरम् ।वायुसूनुरिव पुच्छचिवृद्धिर्यातुधानसममाशु ववर्ध ॥ ५ ॥
 
पुच्छाचे आसनावर बैठक : 
चौर्यायसी संख्या योजन । उंच रावणसिंहासन ।अंगदही तत्समान । घाली आसन तें एका ॥ ४२ ॥
 जेंवी लंकादहनहेत । पुच्छ वाढवी हनुमंत ।
 रावणासम आसनार्थ । पुच्छ पुरुषार्थी अंगद ॥ ४३ ॥
 पुच्छ वाढवोनियां जाण । त्याचें वेळोनि  पुच्छसन ।
 अंगद बैसला आपण । समसमान दशमुखा ॥ ४४ ॥
 दशमुखेंसीं संमुख । अंगद बैसला निःशंक ।
 रावणा लागली टकमक । अति साशंक राक्षस ॥ ४५ ॥
 अंगदा येथोनि परता सर । ऐसें म्हणावया दशशिर ।
 न संभवे पैं उत्तर । ऐसा अत्युग्र कपि भासे ॥ ४६ ॥
 रावणासंमुख सिंहासनी । अंगद बैसोनि पुच्छासनीं ।
 वाकुंल्या दावी फळें खाऊनी । मिचकावूनी नयनातें ॥ ४७ ॥
 अंगद श्रीरामाचा दूत । एकला आलासे सभेआंत ।
 तेणें राक्षसां आकांत । भयाकुळित रावण ॥ ४८ ॥
 
रावणाच्या प्रश्नाला अंगदाचे उत्तर : 
अंगद बैसला देखोन । हळूच पुसे दशानन ।हनुमान नव्हेसी तरी तू कोण । आगमन किमर्थ ॥ ४९ ॥
 ऐसें पुसतां लंकानाथ । अंगद आपुला वृत्तांत ।
 स्वयें असे पैं सांगत । श्रीरघुनाथ स्मरोनी ॥ ५० ॥
 
 
दूतोऽहं कोशलेंद्रस्य रामस्याक्लिष्टकर्मणः ।वालिपुत्रोंऽगदो नाम यदि ते श्रोत्रमागतः॥६॥
 
अंगदाची दूताची भूमिका : 
ज्याचा निर्दुष्ट पुरुषार्थ । जेणे खरदूषणा केला घात ।त्या श्रीरामाचा मी दूत । वाळिसुत अंगद ॥ ५१ ॥
 मारीच मारिला वनाआंत । ज्या संमुख न ये लंकानाथ ।
 त्या श्रीरामाचा मी दूत । वाळिसुत अंगद ॥ ५२ ॥
 कौसल्योदरपंचानन । कौसल्यानंदवर्धन ।
 त्या श्रीरामाचा दूत मी जाण । वाळिनंदन अंगद ॥ ५३ ॥
 देवां वाळी दैत्यां वाळीं । सुरां असुरां दानवां वाळी ।
 त्या वाळीचा अंगद बळी । आलों तुजजवळी तें ऐक ॥ ५४ ॥
 रावणा सुनी काखेतळीं । सप्तसमुद्रीं केली आंघोळीं ।
 त्या वाळीचा पुत्र अंगद बळी । रामे तुजजवळी धाडिलें ॥ ५५ ॥
 दुंदुभी मारिला किष्किंधेजवळी । तत्पुत्र मारिला विवरसमेळीं ।
 त्या वाळीचा पुत्र मी अंगद बळी । रामें तुजजवळी धाडिलें ॥ ५६ ॥
 सहा मास निराहारी निरुदक । विवरीं मारिले दैत्य अनेक ।
 त्या वाळीचा मी अंगद देख । रामें आवश्यक मज धाडिलें ॥ ५७ ॥
 सीता देवोनि शरणागत । जाहल्या वांचेल लंकानाथ ।
 येरव्हीं त्याचा करीन घात । ऐसें रघुनाथ बोलिला ॥ ५८ ॥
 
रावणाची दुष्ट वाणी : 
छळावया अंगदोक्ती । क्षोभे बोले लंकापती ।रावणाच्या छळणोक्ती । अति व्युत्पत्ती अवधारा ॥ ५९ ॥
 
 
रे रे अंगद सांप्रतं तव पिता रामेण हत्वा स्वयंसत्यं ते मम नारदेन कथितं तारार्पिता सुग्रीवे ।
 दूतत्वेन कथं न लज्जसि कपे रामस्य लोकस्य
 वा भूभार शृणु जीवनं कपिकुले साधर्म्यनष्टाधम ॥७॥
 
 
धिग् धिग् अंगदा तुझा पुरुषार्थ । धिग् धिग् अंगदा तुझा बळार्थ ।जेणें पित्याचा केला घात । त्याचा दूत म्हणविसी ॥ ६० ॥
 संमुख संग्रामीं न करी घात । ठकून मारिला युद्धाआंत ।
 ऐसा नष्ट श्रीरघुनाथ । त्याचा दूत म्हणविसी ॥ ६१ ॥
 आणिक एक अभिनव कहाणी । नारदें सांगितलें मजलागूनी ।
 रामें हिरोनि तुझी जननी । केली निजपत्नी सुग्रीवा ॥ ६२ ॥
 ठकवोनि केला पित्याचा घात । मातेसी आणिक योजिला कांत ।
 ऐसा नष्ट श्रीरघुनाथ । त्याचा दूत म्हणविसी ॥ ६३ ॥
 अंगदा तूं निर्लज्ज मूर्तिमंत । आमचेही सभेआंत ।
 न लाजसी म्हणवितां रामदूत । धिक् पुरुषार्थ अंगदा ॥ ६४ ॥
 पोटीं पुत्र व्हावा रुढ । तेणें घ्यावा पित्याचा सूड ।
 तूं तंव जन्मलासि दगड । वृथा माकड श्लाघसी      ॥ ६५ ॥
 अंगदासारिखा निलाजिरा । पाहतां न दिसे दुसरा ।
 काय मुख दाविसी वानरा । रिघोनि सागरां जीव देईं ॥ ६६ ॥
 नातरी करीं आड विहिरी । कां पोटीं घालीं सुरी ।
 जळो तुझी वाढीव थोरी । निंद्य संसारीं तूं एक ॥ ६७ ॥
 
भेदनीतीचा अवलंब : 
छळणा बोले लंकानाथ । अंगदा तूं सभाग्यवंत ।मज रावणासी जाहल्या शरणागत । अभयहस्त तुज माझा ॥ ६८ ॥
 साधावया पितृकार्यार्थ । मिथ्या म्हणविसी रामदूत ।
 हाही कळला तुझा वृत्तांत । शरणागत तूं माझा ॥ ६९ ॥
 सूड घ्यावा पिता वाळी । शरण आलासी मजजवळी ।
 मी रावण आतुर्बळी । तुज तत्काळीं कुढावीत ॥ ७० ॥
 मारोनि श्रीराम लक्ष्मण । करोनि रणकंदन ।
 अंगदा देईन किष्किंधाभुवन । सत्य वरदान हें माझें ॥ ७१ ॥
 
त्यावर अंगदाची प्रतिक्रिया : 
ऐसें बोलतां दशानन । अंगद झाला हास्यवदन ।कैंसें देतो प्रतिवचन । सावधान अवधारा ॥ ७२ ॥
 स्वयंवरीं धनुष्यीं वाहतां गुण । सभे पडलासी उलथून ।
 तुझ्या अंगीं नपुंसकपण । केंवी म्यां शरण रिघावें ॥ ७३ ॥
 स्वयंवरीं श्रीरामें आपण । करितां त्र्यंबक भंजन ।
 रावणाचें काळें वदन । तुज म्यां शरण केंवी यावें ॥ ७४ ॥
 संमुख न येववे रघुनाथा । मारीचा देवोनि मरणार्था ।
 सीता चोरोनि होसी  पळता । शरणागता कोण न राखे ॥ ७५ ॥
 नपुंसक हीन दीन रावण । त्या तुज मी केंवी रिघावें शरण ।
 उलटें हाणितां चडकाण । धाकेंचि प्राण सांडिसी ॥ ७६ ॥
 म्हणोनि उचलितां हात । गजबजिला लंकानाथ ।
 अंगदें कोप करोनि शांत । अनुवादत रामाज्ञा ॥ ७७ ॥
 
रावणाच्या यापूर्वी झालेल्या अपमानित अवस्थांचा झाडा अंगद क्रमाने घेतो : 
बहुत ऐकिले रावण । त्यांमाजील तूं कोण ।विविध रावणांचें लक्षण । वदे विचक्षण अंगद     ॥ ७८ ॥
 एका रावणाची थोरी । सहस्रार्जुनासी युद्ध करी ।
 तेणें कवळोनि वामकरीं । क्षणामाझारीं धरियेला ॥ ७९ ॥
 
सहस्रार्जुनाकडून रावणाची शोभा : 
सहस्रार्जुन कृपावंत । रावण हीन दीन    अशक्त ।नगरोद्वंधें संरक्षित । कारागृहांत न घालीच ॥ ८० ॥
 दुर्गद्वारपाळ पाचारुन । स्वमुखें सांगे सहस्रार्जुन ।
 दहा मुखांचा रावण । बाहेर आपण जाऊ नेदीं ॥ ८१ ॥
 नगरदुर्गोद्वंधन । पायीं शृंगखलाबंधन ।
 यापरी राखोनि रावण । वाहवी जीवन रेवेचें ॥ ८२ ॥
 रावणाच्या दाह शिरीं । देवोनियां दहा घागरी ।
 जळ वाहे निरंतरीं । घरोघरीं उदकार्थ ॥ ८३ ॥
 राजगृहींचें जें भातें । खावय न पुरें रावणातें ।
 दहाही मुखें समसमितें । केलें तेथे तें एका ॥ ८४ ॥
 बैसोनियां जांत्यावरी । गीत गाय दहाही स्वरीं ।
 कणी कचरडा झाल्यावरी । दहाही शिरीं देती टोले ॥ ८५ ॥
 कुटका भाकरी हाता येत । रावण धापसे तेथें नाचत ।
 इफिइफि पिंगा गात । मागे भात घरोघरीं ॥ ८६ ॥
 दाही मुखें दोहरे गात । वीसही नाचवी हात ।
 थै थै थैकार दावित । चणे मागत पसारा ॥ ८७ ॥
 ताक मागावयालागूनी । श्वानवाणी रासभवाणी ।
 रावण भुंके दहाही वदनीं । दावी रडणी श्वानाची ॥ ८८ ॥
 सहस्रार्जुनें कानडदेवतेसी । राखण ठेविलें नगरासीं ।
 तिचें रक्षण चौपासीं । अहर्निशीं सावध ॥ ८९ ॥
 रावण पळतां आकाशगतीं । कानडदेवता रक्षणस्थिती ।
 वेताटी माथां वाजती । पडे क्षितीं मूर्च्छित ॥ ९० ॥
 ऐसा सहा महिनेवरी । निर्गम न पुरेचि ते नगरीं ।
 नेसणें फाटल्या उघड्या टिरी । उवा लिखा शिरीं बुचबुचित  ॥ ९१ ॥
 तेथें पौलस्ति पुत्रस्नेहेंसीं । येवोनि सहस्रार्जुनापासीं ।
 मुक्त करवी रावणासी । तंव तो त्यासी नाठवे ॥ ९२ ॥
 पौलस्तीस पाठवी कारागृहांत । देखें दशमुख असंख्यात ।
 तेणें पौलस्ति अति विस्मित । रावण तेथ असेना ॥ ९३ ॥
 तंव रावणशिरीं घागरी । थै थै नाचे नानापरी ।
 चण्यावारीं घरोघरीं । देखोनि दुरी पौलस्ति ॥ ९४ ॥
 रावण धरोनियां  हातीं । पौलस्ति नेतां लंकाप्रती ।
 द्वारपाळीं केली विनंती । नव्हे निर्गति अचिन्हीं      ॥ ९५ ॥
 पौलस्ति पुसे चिन्हसंज्ञा । काळें करोनियां वदना ।
 नाकीं लाविलिया चुना । उद्वधना निर्मुक्ति ॥ ९६ ॥
 राजमुद्रा घेवोनि करीं । शिघ्र आलिया नगरद्वारीं ।
 सुखरुप निगमाची थोरी । जाण निर्धारीं ऋषिवर्या ॥ ९७ ॥
 पौलस्ति आणूं गेला सुद्रेसी । रावणें मसी लावोनि मुखासीं ।
 चुना लावोनियां नाकासीं । केला द्वारेसीं निर्गम ॥ ९८ ॥
 सावध ऐकें लंकापती । ऐसी एक्या रावणाची गती ।
 ऐक दुजियाची स्थिती । ते मी तुजप्रती सांगेन ॥ ९९ ॥
 
बळीच्या राज्यात रावणाची दुर्दशा : 
दुजा रावण उन्मादबळी । सवेग रिघोनि सुतळीं ।रणीं जिणावया बळी । क्रोधानळीं चालिला ॥ १०० ॥
 बळिद्वारी द्वारपाळ  वामन । तेणें जावों दिधला रावण ।
 बळीपुढें दशकंठ तृण । लज्जायमान राहिला ॥ १ ॥
 बळि  आणि विंध्यावळी । सारिपाट खेळती सुखसमेळीं ।
 रावण आलिया जवळी । मशकसमेळीं । लक्षेना ॥ २ ॥
 रावण दशमुखीं किडें । किंवा आलेंसे घुंगरडें ।
 हे न दिसे बळीपुढें । खेळाकडे विगुंतला ॥ ३ ॥
 बळि तृणप्राय न गणी । कळलें रावणा मनीं ।
 त्यासी मारावें सिंतरुनी । आवांका धरोनी उभा असे ॥ ४ ॥
 सारीपाट खेळतां आवेशा । हातींचा गळोनि पडिला फांसा ।
 दे दे म्हणतां लंकेशा । त्यासीं तो सहसा उचलेना ॥ ५ ॥
 एके हातीं दोहीं हातीं । चहूं हातीं दहाही हातीं ।
 वामनें आकर्षिली शक्ती । विसां हातीं उचलेना ॥ ६ ॥
 उचलूं जातां लज्जामेळीं । फांसा आदळला कपाळीं ।
 देवोनि आक्रंदें आरोळी । पडिला तळीं मूर्च्छित ॥ ७ ॥
 रावण पडतांचि भूतळीं । दहाही मुखीं भरली धुळी ।
 देखोनि हांसे विध्यावळी । पिटिली टाळी सेवकीं ॥ ८ ॥
 रावण पडतां मुर्च्छित । कपाळीं अशुद्ध प्रवाहत ।
 तेणें तो दिसताहे आरक्त । जैसें कां प्रेत अहेवेचें ॥ ९ ॥
 दहाही शिरें वीस हात । करंटें होणें आणिले येथ ।
 याचें पडो नये रक्त । काढा म्हणे विंध्यावळी ॥ ११० ॥
 येवोनि बळीचे सेवक । अलंकार एक एक ।
 वस्त्रें वस्त्रें हिरोनि देख । नेला दशमुख अति दूरी ॥ ११ ॥
 अति बळेंसीं कुंथत । युद्धा आला लंकानाथ ।
 त्याचा निवडला पुरुषार्थ । विटंबनार्थ तो ऐका ॥ १२ ॥
 आगें लंड पिछे गांड । सेवकीं केलें भंडोभंड ।
 रावणाचें काळें तोंड । लज्जावितंड तेणें त्यासीं ॥ १३ ॥
 रावण राजा अति समर्थ । न्हावी न मिळेचि तेथ ।
 केश लांब दहा हात । असे दावीत जगासी       ॥ १४ ॥
 आशीर्वाद दिधला ऋषीं । केशवृद्धि जाली त्यांसीं ।
 जो तो रावण उपहासी । उकासाबुकसीं स्फुंदत ॥ १५ ॥
 
रावणाला त्रस्त करण्यासाठी वामन प्रयत्नशील : 
रावणाच्या निजमूळीं । वामन लागला समूळीं ।तेणीं मेळविला धुळी । केली रांगोळी गर्वाची ॥ १६ ॥
 लज्जान्वित दशानन । जाऊ पाहे जीव निघोन ।
 वामनें राखिलासे कोंडोन । द्वार धरोन बैसला       ॥ १७ ॥
 रावण म्हणे वामनासी । तूं कां आता द्वंद्वा चाळिसी ।
 स्फुंदस्फुंदोन रडे उकसाबुकसीं । सोडीं आम्हांसीं जाऊं दे ॥ १८ ॥
 वामन म्हणे मी बळीचा सेवक । राजाज्ञेवांचून देख ।
 जाऊ नेदीं राव रंक । व्रत निष्टंक हें माझें ॥ १९ ॥
 वामनातें चुकावून । खेचरगती दशानन ।
 जातां गगनीं देखे वामन । पळे परतोन भयभीत ॥ १२० ॥
 पाताळगती करितां गमन । धरधरुनी आणी वामन ।
 भयभीत दशानन । येत परतोन माघारा ॥ २१ ॥
 राक्षसां अदृश्यगतीं गमन । अदृश्यद्रष्टा वामन ।
 त्यातें देखोनि रावण । पळे आपण अति धाकें ॥ २२ ॥
 पूर्वपश्चिमदक्षिणदिशीं । पळों जातां उत्तरेसीं ।
 वामन कोंदला । वामन कोंदला आकाशीं । देखे दशदिशांसी वामन ॥ २३ ॥
 रावण चिंता करितां गहन । चिंतामूळीं देखे वामन ।
 दहाही मुखीं शंखस्फुरण । करी रावण अति भयें ॥ २४ ॥
 वामनें परविली पाठी । खुंटली निर्गमाची गोष्टी ।
 जाजावोनि दशकंठी । होवोनि हिंपुटी राहिला ॥ २५ ॥
 ठकवोनियां रघुपती । पुढें चोरील सीता सती ।
 तणें रागें वामनमूर्तीं । परम आपत्ती भोगवी ॥ २६ ॥
 निर्गम न लभेचि दशानन । क्षुधेनें पिडिला रावण ।
 चणे मागावया जाण । गेला आपण अश्वशाळे ॥ २७ ॥
 अश्ववाहकांची कथा । जरी तूं लीद वाहसी माथां ।
 मूठ मूठ चणे देऊं आतां । मानी क्षधार्त रावण ॥ २८ ॥
 जंव लागली नाहीं भूक । तंव राजा दशमुख ।
 वामनें चेतविली अधिक । मागवी भीक उदरार्थ ॥ २९ ॥
 दशमुकुट लंकानाथा । लीद चढती तये माथां ।
 पोट न भरे चणे खातां । दुःखावस्था तळमळी ॥ १३० ॥
 कांतन कोष्ट्यासी सांगे लंकानाथ । मज आहेत वीस हात ।
 दहाही राहटीं कांतीन सूत । अन्न निश्चित मज द्यावें ॥ ३२ ॥
 वाटूं जातां कापुसासी । रावण पडला तोंडघसीं ।
 सरक्या रिघतां नासिकासी । अति लज्जेसीं सलज्ज ॥ ३२ ॥
 कांताया बैसला लंकानाथ । वांकले स्वधर्माचे चात ।
 तुटलें सूक्ष्मत्वाचें सूत । फिसके कांत तडतडां ॥ ३३ ॥
 म्हणती दशमुख खोटा । मोडिलें सत्कर्माचे रहाटा ।
 पिजिला रु नाशिला सांटा । देती थापटा नरनारी ॥ ३४ ॥
 नाशिला मुदलींचा सांठा । अवघे मोडिलें राहाटां ।
 दशमुख पोटींचा खोटा । देती चापटा नरनारी ॥ ३५ ॥
 उपाय येती अपायासीं । नेणेंचि न मिळे खावयासी ।
 वामने आपदा लाविली ऐसी । उकसाबुकसीं स्फुदत ॥ ३६ ॥
 लंकापती दशमुखा । मागें पुढें लाविला सुडका ।
 पोटेंवीण केला रोडका । वामनें देखा गांजिला     ॥ ३७ ॥
 पहिलें येतां दशानन । वामन हीन दीन ।
 आतां त्याचा प्रताप गहन । तेणे        त्रिभुवन व्यापिलें ॥ ३८ ॥
 रात्रीं पळतां रावण । अंधारीं देखणा वामन ।
 तेणें गांजिला दशानन । करी रुदन अति दुःखें ॥ ३९ ॥
 सोडवावया रावणासी । पौलस्ति आला  बळीपासीं ।
 अति सन्मानें पूजोनि त्यासी । कार्यार्थासी बळि पुसे ॥ १४० ॥
 
पौलस्तिची मध्यस्थी : 
पौलस्ति सांगे पैं आपण । तुवां कां रोखिला रावन ।ऐकतां ऋषिवचन । अति उद्विग्न बळि जाला ॥ ४१ ॥
 बळीनें वाहिली आण । माझ्या राज्यामाजी जाण ।
 रोगराईचें नाहीं बंधन । बंदिखान येथें कैंचें ॥ ४२ ॥
 कोणे ठायीं कोणें देशीं । कोणें राखिलें रावणासी ।
 शोधोनि आणा मजपासीं । सन्मानेंसीं सोडीन ॥ ४३ ॥
 पौलस्ति स्वयें पाहूं जातां । लिदीच्या पाट्यां दहाही माथां ।
 पोट न भरे खणे खातां । भीक मागतां देखिला ॥ ४४ ॥
 दहाही मुखीं भुंके रावण । खंडेरायाचें होवोनि श्वान ।
 हडहड करितां जन । लज्जयमान पौलस्ति ॥ ४५ ॥
 भुंकिन्नला होवोनि श्वान । पौलस्ति देखतां आपण ।
 तेणें रावण लज्जायमान । अधोवदन राहिला ॥ ४६ ॥
 पौलस्ति पुसे रावणासी । एवढ्या लावोनि आपदांसी ।
 येथें कां बळीनें राखिलासी । अति लज्जेसीं सांगत ॥ ४७ ॥
 वामनें घालोनि अटका । मागे पुढें लावोनि सुडका ।
 क्षुधा तृषा केला रोडका । अति दुःखें देखा गांगिलें ॥ ४८ ॥
 वामनापासीं विद्या सकळ । वामनापुढें न चले बळ ।
 म्यांही विद्या करितां प्रबळ । न चले छळ वामनासीं ॥ ४९ ॥
 कार्य नाहीं  बळीपासीं । आज्ञा पुसिल्या वामनासीं ।
 सुखेची आहे निर्गम आम्हांसी । पौलस्तिसी सांगितलें ॥ १५० ॥
 मग घेवोनियां पुत्रासी । पौलस्ति आला वामनापासीं ।
 आज्ञा द्यावी रावणासी । निजनगरासी न्यावया ॥ १५१ ॥
 पौलस्ति येतांचि आपण । वामनें घातलें लोटांगण ।
 मस्तकीं वंदोनियां चरन । धर्मवचन अनुवादे ॥ ५२ ॥
 मी तंव बळीचा सेवक । द्वारपाळ प्रतिहारक ।
 आज्ञेवेगळा एकाएक । राव रंक जाऊं नेदीं ॥ ५३ ॥
 राजाज्ञा आणिलिया जाण । सुखेंचि मरावें गमन ।
 नाहीं तरी केलिया चिन्ह । निर्गमन राजाज्ञा  ॥ ५४ ॥
 
राजाज्ञा किंवा वामनाच्या अटी : 
पौलिस्ता पुसे कैसें चिन्ह । वामन सांगे संतोषोन ।दहाही मस्तकां वपन । आणि मुंडण खांडमिशां ॥ ५५ ॥
 काळें करोनि दशवदन । दहाही नाकीं कवड्या बांधोन ।
 वदनीं श्वेत पीत लेखन । निर्गमन येचिं चिन्हीं ॥ ५६ ॥
 पौलस्ति म्हणे रावणासी । जाऊ चाल बळीपासीं ।
 आज्ञा देईल सन्मानेंसीं । निजनगरासी जावया  ॥ ५७ ॥
 रावण म्हणें हेचिं बरवे । मान्य केलें माझिया जीवें ।
 परंतु बळीपासीं जावें । जीवे भावें मानेना ॥ ५८ ॥
 मूर्च्छित पडिलों फासा देतां । त्यापासी म्यां मुख दावितां ।
 लज्जा प्राण जाईल ताता । नयें सर्वथा त्यापासीं ॥ ५९ ॥
 
वामनाच्या अटी मान्य करुन सुटका : 
युद्धा गेलों अति सत्राणें । त्या मज जालें लाजिरवाणें ।येथेचि आतां प्राण देणें । नाहीं येणें बळीपासीं ॥ १६० ॥
 ऋषि म्हणे निषिद्ध राजपवन । येरु म्हणे कैचें राजलक्षण ।
 सुडला लागला अति दीन । केल्या मुंडन भय काय ॥ ६१ ॥
 जे जे होती बंदिनिर्मुक्त । त्यांसी पाहिजे प्रायश्चित्त ।
 मज आजीच आला सिंहस्थ । निषिद्धार्थ न वदावा ॥ ६२ ॥
 वामनापासून निर्मुक्ती । कदा नव्हे गा कल्पांतीं ।
 माझेनि भाग्यें वपनोक्ती । बोलिला निगुतीं वामन ॥ ६३ ॥
 ऐसें बोलोनि दशवदन । खांडमिशां मस्तकवपन ।
 काळें करोनि वदनचिन्ह । आला आपण अति शिघ्र ॥ ६४ ॥
 देखोनि रावणाचें चिन्ह । लाजविती सकळ जन ।
 गोमयपिंडी अभिषिंचन । दिधला सोडून वामनें ॥ ६५ ॥
 एका जनार्दना शरण । अंगद वक्ता विचक्षण ।
 रावणातें निर्भर्त्सून । वदे आपण निःशंक ॥ ६६ ॥
 पुढील प्रसंगीं रावणकथा । विचित्रवाणी अंगद वक्ता ।
 अपूर्व अप्रमेय अभिनव वार्ता । द्यावें श्रोतां अवधान ॥ ६७ ॥
 स्वस्ति श्रीभावार्थरामायणे युद्धकांडें एकाकारटीकायां
 अंगदरावणच्छलनं नाम सप्तमोऽध्यायः॥ ७ ॥
 ओंव्या ॥ १७६ ॥ श्लोक ॥ ७ ॥ एवं ॥ १७४ ॥
 
 GO TOP 
 
 |