॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥

॥ श्रीभावार्थरामायण ॥

युद्धकांड

॥ अध्याय त्रेसष्टावा ॥
रावणाचा वध

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

उभय सैन्याला उद्देशून रावणाने केलेली श्रीरामांची स्तुती :

श्रीरामें रावण जाण । निजबोधबाणेंकरुन ।
निवटिंतांचि संपूर्ण । काय दशानन बोलत ॥ १ ॥
ऐका गा हे सेनास्थित । नर वानर राक्षस बहुत ।
उभय सेनेचे समस्त । माझा वचनार्थ परिसावा ॥ २ ॥
ऐकोत देव दानव । यक्ष आणि गंधर्व ।
सिद्धचारणादि सर्व । श्रीरामवैभव परिसत ॥ ३ ॥
श्रीराम माणूस नव्हे जाण । राम सर्वांतर्यामी पूर्ण ।
राम सर्वातीत सनातन । राम चिद्धन चिन्मूर्ति ॥ ४ ॥
राम सकळलोककर्ता । राम ब्रह्मादिकां पाळिता ।
राम काळाचा आकळिता । सकळांचे माथां श्रीराम ॥ ५ ॥
श्रीराम आदिहेतु उत्पत्ती । राम स्थितीची निजस्थिती ।
राम विश्रांतीची विश्रांती । गतीची गती श्रीराम ॥ ६ ॥
रामें बोलविल्या वेद बोले । रामें चालविल्या वायु चाले ।
रामें चाळिल्या प्राण चळे । जेणें रक्षिलें देहमात्र ॥ ७ ॥
रामें प्रकाशिला भास्कर । झाला सकळां प्रकाशकर ।
रामें निवविला हिमकर । निववी साचार सकळांसी ॥ ८ ॥
रामें धरिली धरा राहे । राम जीवना जीवविताहे ।
श्रीरामतेजें पावक पाहें । देदीप्त होय पाचनीं ॥ ९ ॥
रामें मोकलितां सावकाश । गगनीं उदंड अवकाश ।
रामविस्मरणी अहंकारास । अति उल्लास देहबुद्धी ॥ १० ॥
राम इंद्राचा आदिइंद्र । राम नरेंद्राचा नरेंद्र ।
राम यमाचा संहारकर । ईश्वरा ईश्वर श्रीराम ॥ ११ ॥
श्रीरामें चेतविलें पाहें । चित्त चेतनेतें धरिताहे ।
रामे अधिष्ठिला होये । बोध स्वयें बुद्धीसीं ॥ १२ ॥
श्रीरामप्रभावें अल्प । मनीं स्फुरती संकल्प ।
त्या श्रीरामाचे स्वरुप । वाग्जल्प केंवी जल्पे ॥ १३ ॥
श्रीराम रणीं रणकल्लोळ । राम कृपाळुवां कृपाळ ।
राम दीनांचा दयाळ । प्रणतपाळ श्रीराम ॥ १४ ॥

माझ्या उद्धारासाठीच श्रीराम वनांत आले :

देहदरिद्रें पीडतां । देखोन मज लंकानाथा ।
कृपा उपजली रघुनाथा । वना तत्वतां तेणें आला ॥ १५ ॥
छळोनियां कैकेयी माता । वना धाडिलें श्रीरघुनाथा ।
उद्धरावया लंकानाथा । वना तत्वतां राम धाडी ॥ १६ ॥

माझ्या उद्धारासाठीच परमगुरु वसिष्ठांनी रामांना सीतेसह धाडले :

श्रीरामाचा गुरु वसिष्ठ । तो माझा परम गुरु श्रेष्ठ ।
वसिष्ठें अनिष्ट‍इष्ट । कळलें स्पष्ट आजि मज ॥ १७ ॥
प्रबोधोनि सकळांसी । सवें दिधलें जानकीसी ।
हें अद्यापि कोणासी । जनीं जनासीं लक्षेना ॥ १८ ॥
उद्धारावया रावण । सद्‍गुरुसीं कळवळा पूर्ण ।
तेणें जानकीसी देऊन । रघुनंदन पाठविला ॥ १९ ॥
श्रीरामाची निजशक्ती । सीता पतिव्रता महासती ।
अनुग्रहावया लंकापती । लंकेप्रती स्वयें आली ॥ २० ॥
रावण बापुडें अति दीन । तें केंवी करी सीताहरण ।
स्वयेंचि येवोनि आपण । दशानन उद्धरिला ॥ २१ ॥
जाणे स्वामीचें मनोगत । निरपराधें न करी घात ।
करोनि अपराधी लंकानाथ । श्रीरामें घात करूं आली ॥ २२ ॥
श्रीरामाची निजशक्ति सीता । सतीशिरोमणी पतिव्रता ।
विश्वाची ते विश्वमाता । लंकानाथा कळवळिली ॥ २३ ॥
मिनधा कोप वरीवरी । माता कृपाळु अंतरी ।
कृपें कोपोनि रावणावरी । सहपरिवारीं उद्धरिला ॥ २४ ॥
श्रीरामाचा नव्हे बाण । सायुज्याचा मुळ्हारी पूर्ण ।
छेदूनि माझें दशवदन । विश्वमुख पूर्ण मज केलें ॥ २५ ॥
जितुकें रामाचें पूर्णपण । तितुकी माझी व्याप्ति पूर्ण ।
लागतां श्रीरामाचा बाण । एवढी स्थिति जाण मज आली ॥ २६ ॥
अनंत ब्रह्मांडें ज्यामाजि जाण । तो मज माजी रघुनंदन ।
सगळा बुडाला आपण । एवढें पूर्णपण मज आलें ॥ २७ ॥

श्रीराम – रावण यांचि एकरुपता :

श्रीरामें वधिला रावण । कीं रावणें राम गिळिला पूर्ण ।
दोघांचेंही दोहीपण । हरपोनी पूर्ण श्रीराम झालें ॥ २८ ॥
अवनी दहन जीवन जाण । पवनेंसहित गगन ।
श्रीरामाचें रामपण । स्वयें रावण होऊन ठेला ॥ २९ ॥
माझें रावणपण देख । राम झाला स्वयें एक ।
त्रिसप्त चौदा लोक । लोकालोक तेथें कैंचे ॥ ३० ॥
सकळ सुखांचें सोलीव सुख । स्वयें श्रीराम सम्यक ।
त्याचाही प्रकाशक । रावण देख मी झालों ॥ ३१ ॥
चंद्रकिरणींचें अमृत । जेंवी सोमकांतें द्रवत ।
तेंवी श्रीरामसुख समस्त । माझेनि प्रगटत जगामाजी ॥ ३२ ॥
म्यां विरोधिलें नाहीं श्रीरामासी । उद्धरावया सकळ कुळासी ।
हिरोनि आणिलें जानकीसी । त्या भावार्थासी सांगेन ॥ ३३ ॥
जेथें जेथें अधिष्ठान । श्रीरामाचें संपूर्ण ।
त्याचें करोनि निरोधन । कुळ‍उद्धरण म्यां केलें ॥ ३४ ॥
श्रीरामकृपा सनातन । देवांवरी आहे पूर्ण ।
म्हणोनियां निरोधन । केलें आपण देवांचें ॥ ३५ ॥
सीता रामाची शक्ती । ते म्यां आणिली याचि प्रीतीं ।
धांवोनि येईल रघुपती । देईल मुक्ती सकळांसी ॥ ३६ ॥

सीतेला ओलीस ठेविली म्हणून श्रीराम धावून आले व मी उद्धरलो :

आपुलें मागावया ठेवणें । वोल धरिती शाहणे ।
तैसें म्यां केलें रावणें । कोप झणें कोणी म्हणा ॥ ३७ ॥
उद्धरावया सकळ कुळासी । म्यां ओली धरिली सीतेसीं ।
त्या ओलीलागीं राघवासी । निजमानसीं कळवळा ॥ ३८ ॥
अति प्रीतीं श्रीरघुपती । ओल सोडवावया निश्चितीं ।
येथें येवोनि शीघ्रगती । सकुळ लंकापती उद्धारिला ॥ ३९ ॥
लागतां श्रीरामाचा बाण । चहूं देहांसी त्रिपुटीचें भान ।
एकाएकीं छेदून पूर्ण । चैतन्यघन मज केलें ॥ ४० ॥
श्रीरामाचा तो नव्हे शर । चैतन्याचा धांवणेकर ।
सकळ कुळेंसीं दशवक्त्र । केला चिन्मात्र निमेषार्धे ॥ ४१ ॥
दिवस मास न लागतां । संधान आवेशें करितां ।
उडाली शून्याची शून्यवार्ता । चिदाभासता कोंदली ॥ ४२ ॥
हेत मात दृष्टांत । न रिघे ज्याचे शिंवेआंत ।
तो पूर्णब्रह्म रघुनाथ । सदोदित कोंदला ॥ ४३ ॥
न दिसे रामाचे रामपण । सौ‍मित्रादि सुग्रीव सहसैन्य ।
सहसैन्य बुडाला रावण । चैतन्यघन कोंदला ॥ ४४ ॥
जेथें परतल्या श्रुती । उपनिषदें मौनावती ।
शास्त्रें थोंटावलीं ठाती । रघुपती देखतां ॥ ४५ ॥
निजविश्वासें रावण । या रीतीं रघुनंदन ।
स्तवोनियां आपण । करी विनवण जिवलगा ॥ ४६ ॥


राग नीरागतां गच्छ द्वेष निर्देषतां भज ।
भवद्‌भ्यां सुचिरं कालमिह प्रकिडितं मया ॥१॥

रावणाची रागद्वेषादिकांची प्रार्थना :

रागदिक समुदायासी । माझें लोटांगण सकळांसी ।
विनवीत आहे तुम्हांसी । तें विनंतीसी परिसावें ॥ ४७ ॥
तुमचे संगतीस्तव जाण । तुमचेनि धर्मेकरुन ।
विविध भोग दारुण । म्यां संपूर्ण भोगिले ॥ ४८ ॥
सज्जनांची ऐसी स्थिती । अवंचक मित्रकार्यार्थी ।
मज अनुग्रहिलें रघुपतीं । निजविश्रांती द्यावया ॥ ४९ ॥
माझे पुत्रपौत्रादि प्रधान । बंधुसहित सकळ सैन्य ।
मजहीआधीं माझे जन । श्रीरामें आपण उद्धरिले ॥ ५० ॥
सकळ कुळा देवोनि मुक्ती । मजही उद्धराया निश्चितीं ।
राम उभा रणाप्रती । म्हणोनि तुम्हाप्रती प्रार्थितों ॥ ५१ ॥
तुम्हांवगळा मोक्ष घेतां । लागों पाहें वंचकता ।
म्हणोनियां तुम्हई आतां । भजा रघुनाथा सर्वभावें ॥ ५२ ॥
विनवित असें कामासी । भजावें निष्काम रामासी ।
तेणें निजसुख पावसीं । अनायासीं श्रीरामें ॥ ५३ ॥
द्वेषा तुज लोटांगण । निर्द्वेष रघुनंदन ।
तुवां भजुनि अविच्छिन्न । पावावें कल्याण शांतीचें ॥ ५४ ॥
वासनादिकां समस्तांसी । माझें लोटांगण सर्वांसी ।
निर्वासना श्रीरामासी । अविकळतेसीं भजावें ॥ ५५ ॥
तेणें तुम्हां निजसुख । वेगें पावाल आवश्यक ।
यालागीं मिळोनि सकळिक । रघुकुळटिळक भजावा ॥ ५६ ॥

कामक्रोधादिकांचे रावणास उत्तर :

ऐसें विनवितां रावण । तंव हासिन्नले कामादिगण ।
तुझें तुज न कळे चिन्ह । श्रीरघुनंदननिजकृपा ॥ ५७ ॥
आमची वस्ती अंतरीं । राम अंतर्यामीं निर्धारीं ।
तो पूर्वीच आम्हांवरी । अनुग्रह करीं तुजहूनी ॥ ५८ ॥
पूर्वी सर्वभावेंशीं आम्ही । अनुसरलो राघवासी ।
तरीच श्रीरामें रावणा तुजसी । अति प्रीतीसीं अंगीकारिलें ॥ ५९ ॥
आम्ही अनुसरलों नसतां । कृपा तया रघुनाथा ।
नये नये गा सर्वथा । जाण तत्वतां लंकेशा ॥ ६० ॥
तूं आमुचा निजसखा । तुझेनि धर्मे सकळिकां ।
भेटी झाली रघुकुळटिळका । अनंत सुखा मेळविलें ॥ ६१ ॥
ऐसें परस्परें येरयेर । कामादिक पैं समग्र ।
आणि स्वयें दशवक्त्र । येरयेर स्तविताती ॥ ६२ ॥

आपल्या आघाताने रावणाचा शिरच्छेद होईना म्हणून
रामबाण विस्मय पावला त्या बाणाला रावणाकडून समज :

तंव श्रीरामाचा निजबाण । करी शिरांचें छेदन ।
तरी पडेना दशानन । विस्मित बाण स्वयें झाला ॥ ६३ ॥
देखोनि बाणाचा विस्मयो । रावण बोलतसे पहा हो ।
श्रीरामाचा पूर्णानुग्रहो । तुज स्वयमेवो कळेना ॥ ६४ ॥
श्रीरामामृतकूपिका । अखंड माझे हृदयीं देखा ।
ते प्रसवत असे मुखां । तुझा आवांका तो किती ॥ ६५ ॥
प्रकाशावया निजमहिमान । शिरें प्रसवत रघुनंदन ।
लाजली तुझी आंगवन । नामामृत जाण अनिवार ॥ ६६ ॥
निग्रहो द्यावा तुम्हांसी । राम प्रसवत शिरांसी ।
अद्यापि न कळे तुम्हांसी । जरी अहर्निशीं जिवलग ॥ ६७

रामनाममहिमा ऐकून रामबाण लज्जित झाला :

ऐकोनि रावणाचें वचन । लाजा संकोचला बाण ।
अलोट नामाचें महिमान । माझी आंगवण ते किती ॥ ६८ ॥
अहर्निशीं जवळी असतां । श्रीराममहिमा तत्वतां ।
न कळे न कळे सर्वथा । आलों वृथा संसारा ॥ ६९ ॥
गुळामाजील दगड । सर्वांगीं दिसे जैसा गोड ।
परिपाकीं दावी निवाड । अति अवघड कठिनत्वें ॥ ७० ॥
श्रीरामाचे निजभातां । आम्ही अहर्निशीं जवळी असतां ।
श्रीराम न कळे तत्वतां । काय आता वल्गेजों ॥ ७१ ॥
श्रीरामवैभव नेणोन । स्वयें थोटावला बाण ।
क्षीण माझी आंगवण । करूं कंदन राहिला ॥ ७२ ॥

ते पाहून रावणाकडून रामबाणाला वंदन व त्याची स्तुती :

तें देखोनि दशानन । नमिता झाला श्रीरामबाण ।
तुझेनि धर्में आम्हां जाण । वैभवज्ञान रामाचें ॥ ७३ ॥
कंठीं लागतां तुझा घावो । हृदयीं झाला आविर्भावो ।
सर्वसाक्षी श्रीरामरावो । अद्वितीय अखंड ॥ ७४ ॥
अद्वितीय श्रीरघुनाथ । ऐसा बाणला इत्यर्थ ।
तेचि नाममृतकूपिका येथ । शिरें अनंत प्रसवती ॥ ७५ ॥
एकदेशी परिच्छिन्न । होतों करंटा दशवदन ।
तो सर्वगत सनातन । श्रीरघुनंदन स्वयें झालों ॥ ७६ ॥
तरी सज्जनांचा ऐसा महिमा । भेतलिया उत्तमाधमां ।
उडवोनि द्वंद्वंधर्मा । निजधामा पावविती ॥ ७७ ॥
चोरटा वाल्मीक तत्वतां । नारद भेटला अवचितां ।
निरसोनि मागील दुरिता । पावविलों श्रीरघुनाथ । कृतकृत्य करुनी ॥ ७९ ॥
परस्परें दोघे जण । येरयेरांचें करितां स्तवन ।
शब्दासी उपरती होऊन पूर्ण । समाधान पावले ॥ ८० ॥
उपरती होवोनि शब्दांसी । स्मरतां श्रीरामस्वरुपासी ।
बाहेर देहाची दशा कैसी । न कळतां भूमींसीं उलंडले ॥ ८१ ॥
रावणाचीं पंचमहाभूतें । मिनलीं भूतात्म्या श्रीरामातें ।
इंद्रियचेष्टाही तेथें । चिन्मूर्तीतें विनटल्या ॥ ८२ ॥


स शरो रावणं हत्वा रुधिरार्द्रमुखच्छविः ।
भृत्यवत्कर्मणि कृते स तूणं पुनरागतः ॥२॥

रावणाचा शिरच्छेद करुन तो बाण पुनः रामांच्या भात्यात शिरला :

भूमीवरी पडतां रावण । आनंदमय झाला बान ।
कार्य साधिलें संपूर्ण । नमून रघुनंदन भातां रिघे ॥ ८३ ॥
जेंवी इतर सेवक । स्वामिकार्य साधूनि देख ।
स्वयें परते एकाएक । विजयसुख सांगत ॥ ८४ ॥
जैसी स्वामीची आज्ञा होती । कार्य साधिलें त्याच रीतीं ।
ऐसें सांगोनि स्वामीप्रती । धरी उन्नती निजगर्वे ॥ ८५ ॥
तैसा नव्हे श्रीरामबाण । अजय त्रैलोक्यीं रावण ।
त्याचें करोनि निर्दळण । अणुही जाण गर्व नाहीं ॥ ८६ ॥
मौनेंचिकरीं श्रीरामासी । बाणें नमोनि वेगेंसी ।
जाणोनि स्वामीच्या वैभवासी । रिघे पाठीसीं भात्यांत ॥ ८७ ॥
लौकिकीं प्रथा ऐसी । जे वधावया रावणासी ।
प्रसन्न करोनि सूर्यासी । रामें दशवक्त्रासी निवटिलें ॥ ८८ ॥
ज्याचेनि तेजें रविशशी । प्रकाशरुप जगासीं ।
तो शरण जाईल आणिकासीं । कदा काळेंसीं घडेना ॥ ८९ ॥

प्रचंड रावण रणभूमीवर कोसळला :

भूमीं पडतां दशकंठ । प्रवाहे रुधिराचा लोट ।
चिडाणी झाली उद्‌भट । झाला शेवट युद्धाचा ॥ ९० ॥
द्रुम शिखरेंसहित । जेंवी उलंडे पर्वत ।
तेंवी पडला लंकानाथ । अति विख्यात पुरुषार्थी ॥ ९१ ॥
भूमीं पडतां रावण । दणाणिलें त्रिभुवन ।
कैलास झाला आंदोलायमान । सत्यलोक पूर्ण डळमळिला ॥ ९२ ॥
विसां खांदियांचें दिंड । झाड उन्मूळिलें वितंड ।
तेंवी वीसही बाहु प्रचंड । रावण उदंड उलंडला ॥ ९३ ॥
सुवर्णबंदी कार्मुक । भूमीं लोळत असे देख ।
बाण पडिले रुक्मपुंख । शस्त्रें अनेक लोळती ॥ ९४ ॥
रत्‍नजडित मुकुट । भूमीं लोळत तेजिष्ठ ।
रणीं पडला लखलखाट । जडित उद्‍भट भूषणें ॥ ९५ ॥

रणभूमीवरील विदारक दृश्य :

महावीर रणकर्कश । रनयोद्धे अति दुर्धर्ष ।
रणीं पडले बहुवस । मोकळे केश लोळती ॥ ९६ ॥
बाहु लोळती सांगद । मस्तकें मुकुटेंसीं विविध ।
करचरणहित कबंध । रणीं बहुविध लोळती ॥ ९७ ॥
कोटी सैन्य रणीं पडत । तैं एक कबंध उठत ।
ऐसी बंधें अनंत । सैरा रणांत धांवती ॥ ९८ ॥
असंख्य सैन्य पडिलें रणीं । रत्‍नखचित मुकुटाभरणीं ।
तेथें पातल्या पक्षिश्रेणी । विचित्र ध्वनीं बोलत ॥ ९९ ॥

मांसभक्षणार्थ पशु-पक्ष्यांचे व भूतादिकांसह
कात्यायनी चामुंडा व कंकाळीचे आगमन :

घार गीध श्येन काक । गोमायु पातले असंख्य ।
मांशभक्षणीं अति हरिख । रणीं सकळिक मानिती ॥ १०० ॥
भूतें पातलीं तत्क्षणीं । नव कोटी कात्यायनी ।
छपन्न कोटी दळ घेऊनी । चामुंडायणी पातली ॥ १ ॥
औट कोटी भूतावळी । घेवोनि आली कंकाळी ।
नाचों लागलीं गोंधळीं । मांस सकळीं सेवावया ॥ २ ॥
सेवावया मांस रुधिर । येरापुढें धांवे येर ।
दुजे म्हणती परतें सर । हावें फार भरलीस ॥ ३ ॥
एक म्हणती आलों पहिलें । दुजा म्हणे नवल झालें ।
शेंतीं रावण ठेविलें । त्यासीं काय आलें धणीपण ॥ ४ ॥
पहिलें होतासी राखण । तरी भाते घे पां मोजून ।
अमूप घ्यावया आंगवण । सर्वथा जाण तुज नाहीं ॥ ५ ॥
बळें घेऊं जाय आवेशीं । दुजा त्यातें सुबद्ध धुमसी ।
बोंब सुटली रणभूमीसीं । कलह भूतांसीं लागला ॥ ६ ॥

सर्व भूतांचे भांडण चामुंडेनें सोडवून श्रीराम महिमा त्यांना कथन केला :

सकळां श्रेष्ठ चामुंडायणी । तिणें देखोनि झोंटधरणी ।
सकळां समीप बोलावूनी । पुसे भांडणीं काय काज ॥ ७ ॥
तेही सांगती वृत्तांत । येरी खदकदां हासत ।
तुमचा कलह समस्त । लागला येथ तोडावा ॥ ८ ॥
श्रीराम रणामाझारी । पीक आलेंसे घुमरी ।
तुम्हांसीं भांडण परस्परीं । भक्षावारी लागलें ॥ ९ ॥
पूर्विले वेळे हनुमंतें । विभागून यथार्थे ।
समजावोनि सकळांतें । केलीं भूतें पैं तृप्त ॥ ११० ॥
त्याहूनि आतां येथें । तृप्ती होईल सकळांतें ।
संदेह न धरावा चित्तें । श्रीराम रणातें पावूनी ॥ ११ ॥
नाम स्मरतां रघुनाथ । महापापी उद्धरत ।
तो संमुख असतां रणाआंत । कोण अतृप्त राहूं शके ॥ १२ ॥
ज्याचे दासाचेनि सामर्थ्ये । तृप्ती झाली सकळ भूतांतें ।
तो श्रीराम असतां येथें । केंवी अतृप्तें रहाल ॥ १३ ॥
सहिष्णुर्विजयी भवेत् । ऐसें श्रुतिशास्त्र गर्जत ।
त्वरा न कारावी तुम्हीं येथ । तृप्ति अद्‍भुत पावाल ॥ १४ ॥
ऐसें चंडेश्वरी बोलतां । आनंद झाला सकळ भूतां ।
कलह सांडून परता । भाग तत्वतां वांछिती ॥ १५ ॥

श्रीरामाज्ञेने रामबाणाने सर्व मांसाची वांटणी केली :

श्रीराम नेटका विंदानी । आज्ञापिलें बाणालागूनी ।
आदरिली भागवांटणी । सावधानीं अवधारा ॥ १६ ॥
श्रीरामबाण तो मापारी । नरकपाल कुडवेंकरीं ।
मविता झाला अति कुसरीं । खळेकरी भैरव ॥ १७ ॥
छप्पन्न कोटी भुतावळी । घेऊन आली भद्रकाळी ।
मानिली भूजगणीं सकळीं । स्वामिणी भली राजभागा ॥ १८ ॥
नवकोटी सैन्यासमवेत । कात्यायनी पातली तेथ ।
प्रजाभाग पैं समस्त । हातोहात तिणें नेला ॥ १९ ॥
सैन्य घेवोनि औटकोडी । चामुंडा आली लवडसवडी ।
शेषतळा उडाउडीं । अति तांतडीं घेऊनि गेली ॥ १२० ॥
निजसमुदायासकट । झाली कंकाळी प्रकट ।
पाडेवरीचे जे पाट । तेणें उद्‌भट सुखावली ॥ २१ ॥
बलुतें काढिलें उभेरासी । मेसको घेवोनि गेली त्यासी ।
सुखावोनि निजमानसीं । श्रीरामासी ओवाळिती ॥ २२ ॥
मेसकोची निजदासी । ते मारको आली आवेशीं ।
खळें मातेरें देवोनि तिसी । अति प्रीतीसीं समजावी ॥ २३ ॥
पाडव आणि मापारी । कराळी त्यातें अंगीकारी ।
श्रीरामबाण जो मापारी । आपण करी दास्य त्याचें ॥ २४ ॥
भैरव वेताळ दोन्ही । देव ब्राह्मण त्यांलागूनी ।
देवोनि अति सन्मानीं । रणांगणी सुखी केले ॥ २५ ॥
पिराणा आणि फकिराणा । मैळिमुकीलागोनि जाणा ।
देवोनियां अति सन्माना । रणामाजी गौरविलीं ॥ २६ ॥
रणामाजीं समस्तें । बाणें समजाविलीं भूतें ।
संतोष मानोनि चित्तें । निजभागातें पैं घेती ॥ २७ ॥

शरीरभागांची विभागणी :

मुख्य काळीज तो राजभाग । काळिका घेवोनि गेली सांग ।
मज्जा जो कां प्रजाभाग । कात्यायनी सवेग घेऊन गेली ॥ २८ ॥
मांगभाग चामुंडेसी । रुधिर ते कंकळीसी ।
मेद दिधलें मेसकोसी । अस्थि मारकोसी पैं देखा ॥ २९ ॥
भाग वांटिती ते वेळे । मागत्याचे मिळती पाळे ।
म्हणोनि धर्मालागीं वहिलें । शिर काढिलें पैं देखा ॥ १३० ॥
धर्मार्थ सार अर्पिती । ते उभयलोकीं सुख भोगिती ।
यालागीं उत्तमांगें निश्चिती । धर्माप्रती अर्पिलीं ॥ ३१ ॥
तेणें भैरव वेताळ । दोघे पावले सुखकल्लोळ ।
त्वचा काढिली जे सकळ । ते नेली तत्काळ मैळ्यामुक्या ॥ ३२ ॥
खंकाळें जे आणिकीं भूतें । निःशेष विसरोनि रामातें ।
सैरा धांवती खाकातें । विषयभोगातें वांछूनि ॥ ३३ ॥
त्यांचे तृप्तिलागीं देख । लिंग काढून देती एक ।
तेणेचि करोनि तृप्तिसुख । तेंही अशेख मानिलें ॥ ३४ ॥
एवं सकळां निजतृप्तीं । श्रीरामबाणें निश्चितीं ।
करोनियां शीघ्रगतीं । रणीं समस्तीं गौरविलें ॥ ३५ ॥
तेणें सुखावलीं समग्र । होवोनिया आल्हादपर ।
परस्परें पाहुणेर । अत्यादर मांडिला ॥ ३६ ॥
देखतांचि श्रीरघुनाथ । आनंद कांदला बहुत ।
कलह तुटला समस्त । सुख अद्‍भुत उलथलें ॥ ३७ ॥
पहिलीं झालीं जीं भांडणें । तीं विसरावयाकारणें ।
घालिती येरयेरां जेवणें । देती वाणें परस्परें ॥ ३८ ॥
अत्यंत होवोनियां नम्र । परस्परें अत्यादर ।
भोजन मांडिलें एकत्र । मांसरुधिरसमरसीं ॥ ३९ ॥
महावीरांचा रणमद । तेंचि भोजनीं घेती मद्य ।
मांस भक्षिती विविध । अति आल्हाद मांडिला ॥ १४० ॥
मेद आणि मद्यमांस । आवडीं सेवितां सावकाश ।
आनंद चढला भूतांस । रणभूमीसीं नाचती ॥ ४१ ॥
विश्वजननी सीता सती । धरोनि आणिली लंकापतीं ।
तें सुटावया निश्चितीं । नवसी होती नवसिले ॥ ४२ ॥
तो दुरात्मा रावण । श्रीरामबाणेंकरुन ।
वधिला न लागतां क्षण । आनंद पूर्ण तेणें त्यांसी ॥ ४३ ॥
सिद्धी पावले नवस । तेणें आनंद भूतांस ।
मिळोनियां रणभूमीस । निज नवस उजविती॥ ४४ ॥
आदिशक्ति सीता सती । तीलगीं सकळही भूतीं ।
मिळोनियां रणाप्रती । गोंधळ घातला स्वानंदें ॥ ४५ ॥
काळी कराळी कंकाळी । मारको मेसको भद्रकाळी ।
हरिखें लंकेच्या पाबळीं । गोंधळ सकळीं मांडिला ॥ ४६ ॥
काहळा भोंवळा मांदळ । गिडबिडीं गुजबुजीं टाळ ।
सूक्ष्म वाद्यें चिनकाहळ । तुरें बंभाळ वाजविलीं ॥ ४७ ॥
रणीं यक्षिणी निजवेशीं । विसरोनि देहभावासी ।
नाचों लागलीं उल्लासीं । अति प्रीतीसी स्वानंदें॥ ४८ ॥
मेद मांस रुधिर । प्रीतीं वांटिती येरां येर ।
उन्मत्त झाली अपार । करिती गजर आल्हादें ॥ ४९ ॥
तृप्ति झाली रणभूमीसीं । तेणें आनंद भूतांसी ।
स्तविते झाले श्रीरामासी । निजगजरेंसीं अति प्रीतीं ॥ १५० ॥
दुर्जय जो त्रैलोक्यासीं । जेणें निग्रहिलें देवांसी ।
त्या निवटिलें रावणासी । श्रीरामें ऐसी ख्याती केली ॥ ५१ ॥
जन्मादारभ्य आजिवरी । सकळ भूतां एकसरी ।
तृप्तिदाता संसारी । कोणी धरेवरी नव्हताचि ॥ ५२ ॥
तीं आजि श्रीरघुनाथे । तृप्त केली सकळ भूतें ।
म्हणोनि गोंधळ ये रणभूमीतें । सावचित्तें माजविला ॥ ५३ ॥
तरी नवल नाहीं याचें । राम जीवन जगाचें ।
पाळण करावें सृष्टीचें । हेंचि श्रीरामाचें निजव्रत ॥ ५४ ॥
राम विश्वाचा विश्वात्मा । राम जीवाचा जीवात्मा ।
राम पराचा परमात्मा । राम परमात्मा निजाचा ॥ ५५ ॥
ऐसे करितां स्तवन । उडालें भूतांचे भूतपण ।
अवघीं झालीं चैतन्यघन । श्रीरघुनंदननिजकृपा ॥ ५६ ॥
वधोनियां अहंरावण । विजयी झाला रघुनंदन ।
एका जनार्दना शरण । सुखसमाधान श्रीरामें ॥ १५७ ॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे युद्धकांडे एकाकारटीकायां
रावणवधो नाम त्रिषष्टिमोऽध्याय : ॥ ६३ ॥
ओंव्या ॥ १५७ ॥ श्लोक ॥ २ ॥ एवं ॥ १५९ ॥


GO TOP