[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीमद् वाल्मीकि रामायणे
अरण्यकाण्डे
॥ चतुर्थः सर्गः॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
श्रीरामलक्ष्मणकर्तृको विराधस्य वधः -
श्रीराम आणि लक्ष्मण द्वारा विराधाचा वध -
ह्रियमाणौ तु काकुत्स्थौ दृष्ट्‍वा सीता रघूत्तमौ ।
उच्चैः स्वरेण चुक्रोश प्रगृह्य सुमहाभुजौ ॥ १ ॥
दोन्ही काकुत्स्थ श्रेष्ठ वीर श्रीराम आणि लक्ष्मण यांना राक्षस घेऊन जात आहे - हे पाहून सीता आपले दोन्ही बाहु वर उचलून जोरजोराने रडू, ओरडू लागली - ॥१॥
एष दाशरथी रामः सत्यवाञ्च्छीलवाञ्छुचिः ।
रक्षसा रौद्ररूपेण ह्रियते सहलक्ष्मणः ॥ २ ॥
’हाय ! या सत्यवादी, शीलवान आणि शुद्ध आचार विचाराच्या दशरथनंदन श्रीराम आणि लक्ष्मणांना हा रौद्ररूपधारी राक्षस घेऊन जात आहे. ॥२॥
मामृक्षा भक्षयिष्यन्ति शार्दूल द्वीपिनस्तथा ।
मां हरोत्सृज काकुत्स्थौ नमस्ते राक्षसोत्तम ॥ ३ ॥
’राक्षस शिरोमणी ! तुला नमस्कार आहे. या वनात अस्वले, व्याघ्र आणि चित्ते मला खाऊन टाकतील, म्हणून तू मलाच घेऊन चल, परंतु या दोन्ही काकुत्स्थवंशी वीरांना सोडून दे.’ ॥३॥
तस्यास्तद् वचनं श्रुत्वा वैदेह्या रामलक्ष्मणौ ।
वेगं प्रचक्रतुर्वीरौ वधे तस्य दुरात्मनः ॥ ४ ॥
वैदेही सीतेचे हे बोलणे ऐकून ते दोन्ही वीर श्रीराम आणि लक्ष्मण त्या दुरात्मा राक्षसाचा वध करण्यासाठी घाई करू लागले. ॥४॥
तस्य रोद्रस्य सौमित्रिः सव्यं बाहुं बभञ्ज ह ।
रामस्तु दक्षिणं बाहुं तरसा तस्य रक्षसः ॥ ५ ॥
सुमित्राकुमार लक्ष्मणांनी त्या राक्षसाचा डावा आणि श्रीरामांनी त्याचा उजवा बाहु अत्यंत वेगाने तोडून टाकला. ॥५॥
स भग्नबाहुः संविग्नः पपाताशु विमूर्च्छितः ।
धरण्यां मेघसङ्‌काशो वज्रभिन्न इवाचलः ॥ ६ ॥
भुजा तुटल्यावर तो मेघाप्रमाणे काळा राक्षस व्याकुळ झाला आणि शीघ्रच मूर्च्छित होऊन वज्राने तुटलेल्या पर्वतशिखराप्रमाणे पृथ्वीवर कोसळला. ॥६॥
मुष्टिभिर्बाहुभिः पद्‌भिः सूदयन्तौ तु राक्षसम् ।
उद्यम्योद्यम्य चाप्येनं स्थण्डिले निष्पिपेषतुः ॥ ७ ॥
तेव्हा श्रीराम आणि लक्ष्मण विराधाला भुजांनी, बुक्यांनी आणि लाथांनी मारु लागले तसेच त्याला उचलून उचलून आपटू लागले आणि पृथ्वीवर रगडू लागले. ॥७॥
स विद्धो बहुभिर्बाणैः खड्गाभ्यां च परिक्षतः ।
निष्पिष्टो बहुधा भूमौ न ममार स राक्षसः ॥ ८ ॥
बहुसंख्य बाणांनी घायाळ होऊन आणि तलवारांनी क्षत-विक्षत होऊन तसेच वारंवार पृथ्वीवर रगडला जाऊनही तो राक्षस मेला नाही. ॥८॥
तं प्रेक्ष्य रामः सुभृशमवध्यमचलोपमम् ।
भयेष्वभयदः श्रीमान् इदं वचनमब्रवीत् ॥ ९ ॥
अवध्य आणि पर्वतासमान अचल विराधाला वारंवार पाहून भयाच्या प्रसंगी अभय देणारे श्रीमान् राम लक्ष्मणास असे म्हणाले - ॥९॥
तपसा पुरुषव्याघ्र राक्षसोऽयं न शक्यते ।
शस्त्रेण युधि निर्जेतुं राक्षसं निखनावहे ॥ १० ॥
’पुरुषसिंह ! हा राक्षस तपस्येमुळे (वर मिळून) अवध्य झाला आहे. याला शस्त्रांच्या द्वारे युद्धात जिंकता येणे शक्य नाही. म्हणून आपण निशाचर विराधाला पराजित करण्यासाठी आता खड्डा खोदून गाडून टाकू. ॥१०॥
कुञ्जरस्येव रौद्रस्य राक्षस्यास्य लक्ष्मणः ।
वनेऽस्मिन् सुमहच्छ्वभ्रं खन्यतां रौद्रवर्चसः ॥ ११ ॥
लक्ष्मणा ! हत्ती प्रमाणे भयंकर तसेच रौद्र तेज असणार्‍या या राक्षसासाठी या वनात फार मोठा खड्डा खण.’ ॥११॥
इत्युक्त्वा लक्ष्मणं रामः प्रदरः खन्यतामिति ।
तस्थौ विराधमाक्रम्य कण्ठे पादेन वीर्यवान् ॥ १२ ॥
या प्रकारे लक्ष्मणाला खड्डा खोदण्याची आज्ञा देऊन पराक्रमी श्रीराम आपल्या एका पायाने विराधाचा गळा दाबून उभे राहिले. ॥१२॥
तच्छ्रुत्वा राघवेणोक्तं राक्षसः प्रश्रितं वचः ।
इदं प्रोवाच काकुत्स्थं विराधः पुरुषर्षभम् ॥ १३ ॥
राघवांनी सांगितलेली ही गोष्ट ऐकून राक्षस विराधाने पुरुषप्रवर काकुत्स्थास ही विनययुक्त गोष्ट सांगितली - ॥१३॥
हतोऽहं पुरुषव्याघ्र शक्रतुल्यबलेन वै ।
मया तु पूर्वं त्वं मोहान्न ज्ञातः पुरुषर्षभः ॥ १४ ॥
’पुरुषसिंह ! नरश्रेष्ठ ! आपले बल देवराज इंद्राप्रमाणे आहे. मी आपल्या हातून मारला गेलो. मोहवश मी पहिल्याने आपल्याला ओळखू शकलो नाही. ॥१४॥
कौसल्या सुप्रजास्तात रामस्त्वं विदितो मया ।
वैदेही च महाभागा लक्ष्मणश्च महायशाः ॥ १५ ॥
’तात ! आपल्या द्वारा माता कौसल्या उत्तम संतान असलेली ठरली आहे. मी हे जाणले आहे की आपणच श्रीराम आहात, ही महाभागा वैदेही सीता आहे आणि हे आपले लहान भाऊ महायशस्वी लक्ष्मण आहेत. ॥१५॥
अभिशापादहं घोरां प्रविष्टो राक्षसीं तनुम् ।
तुम्बुरुर्नाम गन्धर्वः शप्तो वैश्रवणेन ह ॥ १६ ॥
’मला शापामुळे या भयंकर राक्षस शरीरात यावे लागले होते. मी तुम्बरू नामक गंधर्व आहे. कुबेरांनी मला राक्षस होण्याचा शाप दिला होता. ॥१६॥
प्रसाद्यमानश्च मया सोऽब्रवीन्मां महायशाः ।
यदा दाशरथी रामस्त्वां वधिष्यति संयुगे ॥ १७॥

तदा प्रकृतिमापन्नो भवान् स्वर्गं गमिष्यति ।
’जेव्हां मी त्यांना प्रसन्न करण्याचा प्रयत्‍न केला तेव्हा ते महायशस्वी कुबेर मला या प्रकारे म्हणाले- ’गंधर्वा ! जेव्हा दाशरथी राम युद्धात तुझा वध करतील, तेव्हा तुला आपले पहिले स्वरूप प्राप्त होऊन तू स्वर्गलोकास जाशील.’ ॥१७ १/२॥
अनुपस्थीयमानो मां स क्रुद्धो व्याजहार ह ॥ १८ ॥

इति वैश्रवणो राजा रम्भासक्तमुवाच ह ।
’मी रंभा नामक अप्सरेमध्ये आसक्त होतो म्हणून एक दिवस योग्य समयी त्यांच्या सेवेत उपस्थित होऊ शकलो नाही. म्हणून रागावून राजा वैश्रवणा (कुबेरा) ने मला पूर्वोक्त शाप देऊन त्यातून सुटण्याचा मार्ग सांगितला होता’. ॥१८ १/२॥

तव प्रसादान्मुक्तोऽहमभिशापात् सुदारुणात् ॥ १९ ॥

भुवनं स्वं गमिष्यामि स्वस्ति वोऽस्तु परंतप ।
’परंतप रघुवीर ! आज आपल्या कृपेने माझी त्या भयंकर शापांतून सुटका झाली. आपले कल्याण होवो ! आता मी आपल्या लोकाला जाईन. ॥१९ १/२॥
इतो वसति धर्मात्मा शरभङ्‌गः प्रतापवान् ॥ २० ॥

अध्यर्धयोजने तात महर्षिः सूर्यसंनिभः ।
तं क्षिप्रमभिगच्छ त्वं स ते श्रेयोऽभिधास्यति ॥ २१ ॥
’तात येथून दीड योजन अंतरावर सूर्यासमान तेजस्वी प्रतापी आणि धर्मात्मा महामुनि शरभङ्‌ग निवास करीत आहेत. त्यांच्या जवळ आपण लवकरच निघून जा. ते आपल्या कल्याणाची गोष्ट सांगतील. ॥२०-२१॥
अवटे चापि मां राम निक्षिप्य कुशली व्रज ।
रक्षसां गतसत्त्वानामेष धर्मः सनातनः ॥ २२ ॥
’श्रीराम ! आपण माझ्या शरीरास खड्ड्यात पुरून कुशलपूर्वक निघून जावे. मेलेल्या राक्षसांच्या शरीराला खड्ड्यात पुरणे (खड्डे खोदून त्यात पुरून टाकणे) हा त्यांच्यासाठी सनातन (परंपरा प्राप्त) धर्म आहे. ॥२२॥
अवटे ये निधीयन्ते तेषां लोकाः सनातनाः ।
एवमुक्त्वा तु काकुत्स्थं विराधः शरपीडितः ॥ २३ ॥

बभूव स्वर्गसम्प्राप्तो न्यस्तदेहो महाबलः ।
’जे राक्षस खड्ड्यात पुरले जातात, त्यांना सनातन लोकांची प्राप्ती होते. काकुत्स्थ रामांना असे सांगून बाणांनी पीडित झालेला महाबली विराध (जेव्हा त्याचे शरीर खड्ड्यात पुरले गेले तेव्हा) त्या शरिरास सोडून स्वर्गलोकास निघून गेला. ॥२३ १/२॥
तच्छ्रुत्वा राघवो वाक्यं लक्ष्मणं व्यादिदेश ह ॥ २४ ॥

कुञ्जरस्येव रौद्रस्य राक्षसस्यास्य लक्ष्मण ।
वनेऽस्मिन् सुमहान्सुञ्श्वभ्रः खन्यतां रौद्रकर्मणः ॥ २५ ॥
(तो कशा प्रकारे खड्यात पुरला गेला ? - हेच आता सांगितले जात आहे) त्याचे बोलणे ऐकून राघवांनी लक्ष्मणास आज्ञा दिली - ’लक्ष्मण ! भयंकर कर्म करणार्‍या तसेच हत्तीप्रमाणे भयानक या राक्षसासाठी या वनात एक खूप मोठा खड्डा खण.’ ॥२४-२५॥
इत्युक्त्वा लक्ष्मणं रामः प्रदरः खन्यतामिति ।
तस्थौ विराधमाक्रम्य कण्ठे पादेन वीर्यवान् ॥ २६ ॥
या प्रकारे लक्ष्मणाला खड्डा खोदण्याचा आदेश देऊन पराक्रमी श्रीराम एक पायाने विराधाचा गळा दाबून उभे राहिले. ॥२६॥
ततः खनित्रमादाय लक्ष्मणः श्वभ्रमुत्तमम् ।
अखनत् पार्श्वतस्तस्य विराधस्य महात्मनः ॥ २७ ॥
तेव्हा लक्ष्मणांनी फावडे घेऊन त्या विशालकाय विराधाच्या जवळच एक फार मोठा खड्डा खोदून तयार केला. ॥२७॥
तं मुक्तकण्ठमुत्क्षिप्य शङ्‌कुकर्णं महास्वनम् ।
विराधं प्राक्षिपच्छ्वभ्रे नदन्तं भैरवस्वनम् ॥ २८ ॥
तेव्हा श्रीरामांनी त्याचा गळा सोडून दिला आणि लक्ष्मणाने खुंटीसारखे कान असणार्‍या त्या विराधाला उचलून त्या खड्ड्यात टाकले, त्या वेळी तो फार भयानक आवाजात जोजोराने गर्जना करीत होता. ॥२८॥
तमाहवे निर्जितमाशुविक्रमौ
स्थिरावुभौ संयति सामलक्ष्मणौ ।
मदान्वितौ चिक्षिपतुर्भयावहं
नदन्तमुत्क्षिप्य बलेन राक्षसम् ॥ २९ ॥
युद्धात स्थिर राहून शीघ्रता पूर्वक पराक्रम करणार्‍या त्या दोन्ही भावांनी श्रीराम आणि लक्ष्मणांनी रणभूमीमध्ये क्रूरतापूर्ण कर्म करणार्‍या त्या भयंकर राक्षस विराधाला बलपूर्वक उचलून खड्ड्यांत फेकून दिले. त्या समयी तो जोरजोराने ओरडत होता. त्याला खड्ड्यांत टाकून ते दोन्ही बंधु खूप प्रसन्न झाले. ॥२९॥
अवध्यतां प्रेक्ष्य महासुरस्य तौ
शितेन शस्त्रेण तदा नरर्षभौ ।
समर्थ्य चात्यर्थविशारदावुभौ
बिले विराधस्य वधं प्रचक्रतुः ॥ ३० ॥
महान असुर विराधाचा तीक्ष्ण शस्त्रांनी वध होणार नाही हे पाहून अत्यंत कुशल दोन्ही भाऊ नरश्रेष्ठ श्रीराम आणि लक्ष्मणांनी त्या समयी खड्डा खणून त्या खड्ड्यात त्याला टाकला आणि त्या खड्ड्यात माती टाकून तो बुझवून त्या राक्षसाचा वध करून टाकला. ॥३०॥
स्वयं विराधेन हि मृत्युरात्मनः
प्रसह्य रामेण यथार्थमीप्सितः ।
निवेदितः काननचारिणा स्वयं
न मे वधः शस्त्रकृतो भवेदिति ॥ ३१ ॥
वास्तविक श्रीरामांच्या हातूनच हट्टाने मरणे त्याला अभिष्ट होते. त्या आपल्या मनोवाञ्छित मृत्युची प्राप्ति व्हावी या उद्देश्याने स्वतः वनचारी विराधानेच श्रीरामांना, ’शस्त्र द्वारा माझा वध होऊ शकत नाही’ हे सांगून टाकले होते. ॥३१॥
तदेव रामेण निशम्य भाषितं
कृता मतिस्तस्य बिलप्रवेशने ।
बिलं च तेनातिबलेन रक्षसा
प्रवेश्यमानेन वनं विनादितम् ॥ ३२ ॥
त्यांनी सांगितलेली ती गोष्ट ऐकून श्रीरामांनी त्याला खड्ड्यात पुरून टाकण्याचा विचार केला होता. ज्यावेळी त्याला खड्ड्यात टाकले जाऊ लागले त्या वेळी त्या अत्यंत बलवान राक्षसाने आपल्या ओरडण्याने सारा वनप्रांत दणाणून सोडला होता. ॥३२॥
प्रहृष्टरूपाविव रामलक्ष्मणौ
विराधमुर्व्यां प्रदरे निपात्य तम् ।
ननन्दतुर्वीतभयौ महावने
शिलाभिरन्तर्दधतुश्च राक्षसम् ॥ ३३ ॥
राक्षस विराधाला पृथ्वीच्या आत खड्ड्यात टाकून श्रीराम आणि लक्ष्मणानी मोठ्या प्रसन्नतेने त्याच्यावर वरून बरेचसे दगड टाकले आणि खड्डा बुझवला. नंतर ते निर्भय होऊन त्या महान वनात सानंद विचरण करू लागले. ॥३३॥
ततस्तु तौ काञ्चनचित्रकार्मुकौ
निहत्य रक्षः परिगृह्य मैथिलीम् ।
विजह्रतुस्तौ मुदितौ महावने
दिवि स्थितौ चन्द्रदिवाकराविव ॥ ३४ ॥
याप्रकारे त्या राक्षसाचा वध करून मैथिली सीतेला बरोबर घेऊन सोन्याच्या विचित्र धनुष्यांनी सुशोभित होऊन ते दोघे भाऊ आकाशात स्थित असलेल्या चंद्र, सूर्याप्रमाणे त्या महान वनात आनंदमग्न होऊन विचरण करू लागले. ॥३४॥
इत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीये आदिकाव्येऽरण्यकाण्डे चतुर्थः सर्गः ॥ ४ ॥
या प्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यातील अरण्यकाण्डाचा चौथा सर्ग पूरा झाला. ॥४॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP